Thursday, 23 February 2017

#तिबेटस्वाती १७ #TibetSwati 17



Image result for chinese education system




#तिबेटस्वाती १७ #TibetSwati 17

भ्रष्टाचार एकदा पसरला की तो समाजाच्या सर्वच अंगामध्ये भिनतो भिनवल जातो. चीनचे समाजजीवन याला अपवाद नाही. कम्युनिस्ट पक्ष, सरकारी कार्यालये आणि लश्कर यांच्यामधल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शी जिन पिंग यांनी काय पावले उचलली ते आपण बघितले. पण जगामधली एक आर्थिक महासत्ता हो ऊ घातलेल्या चीनच्या औद्योगिक जीवनामध्ये काय परिस्थिती आहे ते पाहू.

एतद्देशीय कंपन्यांच्या जोडीने चीनमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या आज लोकप्रिय झाल्या आहेत. गुंतागुंतीचे अर्थव्यवहार सांभाळणार्‍या बॅंका आल्या आहेत. ह्या सर्वांना त्याच भ्रष्ट व्यवस्थेकडून आपली कामे करून घ्यायची असतात. सरकारी कर्मचार्‍यांचे हात ओले केल्याशिवाय कामे सरकत नाहीत असा त्यांचा अनुभव आहे. अनेक खाजगी कंपन्यांनी सरकारी अधिकार्‍यांच्या मुलांना आपल्या सेवेमध्ये घेतले आहे जेणेकरून तिथून कामे करून घेणे ’सोपे’ जावे. काही कंपन्या अधिकार्‍यांच्या मुलांचा परदेशातील शिक्षणाचा खर्च उचलतात. काही जणांनी दलाल नेमले आहेत. सरकारी निविदा भरताना काही सूट मिळवण्यासाठी दलालांना कन्सल्टन्सी म्हणून पैसा दिला जातो. ह्या वातावरणामुळे काही परदेशी कंपन्या चीनमध्ये व्यापार करण्यास उत्सुक नाहीत.

आर्थिक निर्बंध ढिलंढाल होते त्याचा फायदा घेऊन अधिकारी वर्ग गैरमार्गाने पैसा कमवत होता. एकाच अधिकार्‍याकडे वेगवेगळ्या नावाचे पासपोर्ट आहेत. भलत्या नावाने देशाबाहेर जाऊन आपल्याकडचा काळा पैसा ते परदेशी बॅंकांमध्ये जमाही करत असतात. भ्रष्टाचाराचे थैमान शिक्षण क्षेत्रामध्येही आहे. चीनमध्ये दर्जेदार शिक्षणसंस्थांची वानवा आहे. आपल्या मुलाला चांगली शाळा - कॉलेज मिळावे म्हणून पालक प्रवेश अधिकार्‍यांना लाच देणे पसंत करतात. एवढेच कशाला वैद्यकीय सेवेबाबत परिस्थिती हीच आहे. चांगला डॉक्टर - चांगले हॉस्पिटल - सुशिक्षित परिचारिका या गोष्टींसाठी सुद्धा दिडक्या मोजाव्या लागतात. ह्या वर्णनावरून सामान्य चिनी माणसाचे आयुष्य म्हणजे कसा नरक बनले आहे ह्याची आपण कल्पना करू शकतो.

त्या तप्त मनांना दिलासा मिळावा ह्या हेतूने का होईन पण शी यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेमुळे मथळे तरी आकर्षक येत असतात. कही तरी घडते आहे हे लोकांना पटावे म्हणून यातल्या काही कारवाया होत असतात असाही संशय कधी कधी लोकांना येतो. पण निदान वरकरणी शी ह्या विषयामध्ये गंभीर आहेत हे पुढे येते.

शी यांची गांभीर्य दाखवणार्‍या काही उपाययोजना बघू. ज्या नोकरशाहीला हाताशी धरून सुधारणा राबवायच्या आहेत त्या नोकरशाहीवरती शी यांनी नवी बंधने घातली आहेत. नोकरशहांनी महगाच्या भेटवस्तू घेऊ नयेत - लाच घेऊ नये - सरकारी वाहने खाजगी कामासाठी वापरू नयेत - महागड्या खर्चिक होटेलांमध्ये जाऊ नये - खाजगी क्लबमध्ये जाऊ नये - सरकारी पैसा खाजगी कामासाठी वा सफरीसाठी वापरू नये अशा प्रकारची कडक बंधने लागू करण्यात आली आहेत. (याचा दुसरा अर्थ असा की किती सहजतेने सरकारी कर्मचारी ह्या सगळ्या गैरप्रकारामध्ये गुंतले होते). शी यांनी सर्व सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपली संपत्ती जाहीर करण्याचे बंधन लागू केले आहे. कर्मचार्‍यांच्या वेतनमधली तफावत दूर करण्याचे प्रयत्न शी यांनी केले आहेत. त्यानुसार न्यायव्यवस्थेमधले कर्मचारी आणि न्यायाधीश, सरकारी कर्मचारी, लष्करी अशिकार्‍यांचे पगार वाढवले गेले आहेत. तर सरकारी कंपन्यांमधल्या अधिकार्‍यांचे पगार कमी केले गेले आहेत. पण भ्रष्टाचार लोकांच्या इतक्या अंगवळणी पडला आहे एखादे काम करून देण्याच्या बदल्यात घेतला जाणारा पैसा चुकीचा आहे असे त्यांना वाटेनासे झाले आहे. सुरुवातीला शी यांनी सरकारी कर्मचार्‍यांवर बंधने लागू केल्यानंतर नागडा भ्रष्टाचार थांबवावा लागेल हे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात आले होते. पण आपले अधिकार अजोनही वापरता येतील हे ते समजून होते. फार कोणाच्या डोळ्यावर न येता गुपचुप व्यवहार अजूनही हो ऊ शकतात अशी त्यांची समजूत होती. “Eat quietly, take gently, and play secretly.” हलकेच खा - नाजूक हाताने घ्या - गुपचुप व्यवहार करा ह्या न्यायाने सर्व काही मॅनेज करता येईल ह्याची त्यांना खात्री होती. ह्या सर्व अशा हळूहळू मावळत गेल्या. चरफडत का होईना त्यांना हे वास्तव स्वीकारावे लागत आहे. कोणी कितीही मोठा अधिकारी असो तो भ्रष्ट असल्याचे दिसून आले तर त्याची गय केली जाणार नाही हे जाहीर रीत्या सांगण्यात आले आहे. अशा निःसंदिग्ध शब्दात दिलेले आश्वासन जनमानसावर एक छाप पाडून जाते.

लाच देऊन का होईना आपली कामे खाजगी कंपन्या करून घेत होत्या. तो मार्ग बंद झाल्यामुळे काही ”निर्णय’ झटपट घेतले जात नाहीत. त्यामुळेही चीनची अर्थव्यवस्था थोडीशी धीमी झाली आहे. त्या परिस्थितीचे ओझे शेवटी येणार ते शी यांच्यावरच. सरकारला ही परिस्थिती हाताळण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये अनेक बदल अधिक वेगाने घडवून आणावे लागतील.

कम्युनिस्ट पक्ष - सरकारी नोकरशाही - शिक्षणव्यवस्था - आरोग्यव्यवस्था - लष्कर या सर्वांमधली अंधाधुंदी अशी आहे की भल्याभल्यांना विचार करायल लावेल. अशा समाजामध्ये आपले हेर हस्तक घुसवणे शत्रूला खूप सोपे जाते. जनता ज्या हाल अपेष्टांमधून जाते आहे त्याचा अर्थ स्पष्ट आहे. खरे तर चीनची अवस्था याबाबतीत भारतापेक्षाही वाईट आहे असे उघडम्हणता ये ईल. म्हणूनच इथल्या डाव्यांनी चिन्यांच्या अचाट सामर्थ्याचा - शक्तीचा कितीही डिंडिम फुंकला तरीही ते दावे कसे फुसकट आहेत हे लक्षात येते. वेगवेगळ्या कारणांमुळे पोखरलेला हा देश संधी मिळालीच तर भुसकटासारखा पेटवणे सोपे आहे हे उघड आहे. चीन जितकी मिजास मारून दाखवतो आहे त्याने आपल्या पायाखाली काय जळते आहे त्याचा अंदाज घेणे गरजेचे नाही काय?


No comments:

Post a Comment