Tuesday, 21 February 2017

तिबेट १४

Image result for xi jin ping

#तिबेटस्वाती १४  #Tibetswati 14

चीनपुढे आव्हान उभे करायचे तर त्याची बलस्थाने कोणती हे माहिती पाहिजे तसे त्याचे दुबळेपण कशात आहे हेही माहिती पाहिजे. आमच्या कडच्या डाव्यांना चीन सर्वशक्तिमान वाटतो. त्याच्यापुढे भारताने तोंडातून आवाज काढण्याचीही लायकी नाही असे ते समजतात. ज्या देशाची आज युरोपच्या च्या पुढे गेली आहे तिथे भारताचा काय पाडाव असे वाटणे सोपे आहे आणि पटवणे सुद्धा. पण पैसे म्हणजे सर्वस्व नव्हे. खरे तर चीनच्या राजकीय आणि लष्करी आस्थापनांमध्ये प्रचंड अंतर्गत संघर्ष चालू आहे. त्याची स्पंदने एक तर आपल्या पर्यंत पोहोचत नाहीत किंवा इथले फुरोगामी ती आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत.

शी जीन पींग हे एक वादळी नेतृत्व चीनला मिळाले आहे. साली सत्तेत आल्यानंतर त्यांनी चीनच्या राजकीय आणि सामाजिक समस्यांना मुळापासून हात घातला आहे. त्यातली सर्वात गंभीर म्हणजे भ्रष्टाचार. चीन सारख्या बंदिस्त कम्युनिस्ट देशातही भ्रष्टाचार असतो हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटते. पण सर्वंकष सत्ता कम्युनिस्ट पक्षाच्या हाती एकवटल्यामुळे भ्रष्टाचाराचे रान माजले आहे. तिथल्या न्यायव्यवस्थेकडे नागरिकांना दादही मागता येत नाही. त्यामुळे भ्रष्ट अधिकारी वर्गाचे साम्राज्य तयार झाले आहे. अधिकाऱ्यांच्या आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या आसपास लाळघोटे आणि तोंडपूजक जमा झाले आहेत. ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार कशी? अशी कारवाई वरच्या नेत्याने केली तरच होउ शकते नाही तर परिस्थितीत सुधारणेचे नाव नाही.

चीनमध्ये कम्युनिस्ट विचारसरणीमुळे नागरी प्रशासनामध्ये पक्षाचे पदाधिकारी व सदस्य यांची नेमणूक केली जाते. त्यांनी पक्षाच्या धोरणानुसार राज्य हाकावे अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात काय घडत असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. नोव्हेंबर २०१२ मध्ये शी जीन पींग चीनच्या कम्युनिस्ट पार्टी चे जनरल सेक्रेटरी झाले आणि मार्च २०१३ मध्ये चिनी प्रजासत्ताकाचे अध्यक्ष. यानंतर चीनमध्ये सुधारणांची एक लाट आली. भ्रष्टाचार ही केवळ एक समस्या नसून चिनी कम्युनिस्ट पार्टी तसेच प्रजासत्ताकाच्या अस्तित्वाला असलेला धोका असल्याचे प्रतिपादन ते करत होते. भ्रष्ट राज्यकर्ते सत्तास्थानी असतील तर शत्रूला वेगळे हेर हस्तक तयार करावे लागत नाहीत. असे भ्रष्ट लोक स्वतःहून पैशाच्या बदल्यात परकीय सत्तेला हवे तसे वागतात. नाही तर जाळ्यात ओढून त्यांच्याकडून हवे ते काम करून घेण्यात येते. भ्रष्टाचार हा म्हणूनच कम्युनिस्ट पार्टीच्या अस्तित्वाला धोका असल्याचे शी म्हणत असतील तर आपण ही समजू शकतो. सर्वंकष सत्ता पार्टीच्या हाती असल्यामुळे प्रत्यक्षात असा धोका देशहिताला असतो. अशा तर्‍हेने प्रचण्ड वेगाने प्रगती करणार्‍या चीनला सुद्धा भ्रष्टाचार हा देशहिताला धोका वाटत होता. आपल्याकडे तर तुलनाही करायला नको.

पार्टीच्या एकछत्री अंमलामध्ये असे बदल घडवून आणणे सोपे नसते. भ्रष्टाचाराची सवय ही बाब अशी आहे की सगळे भ्रष्ट पदाधिकारी एकत्र येऊन कारवाई करणार्‍याच्या विरोधात आपली ताकद दाखवू पाहतात. आपल्यामधलाच कोणी तरी उठतो आणि आपल्यावरच कारवाई करू पाहतो ही गोष्ट पचनी पडणार कशी? तेव्हा या एका बाबतीमध्ये शी जीन पींग यांची पक्षामधली कोंडी मोदींसारखीच आहे. सत्ता हाती घेतल्यापासून उसंत न घेता शी यांनी हे युद्ध पुकारले आणि पद्धतशीर कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर गेल्या तीन वर्षात जवळ जवळ २,७०,००० पक्ष सदस्यांना घरी बसवण्यात आले. बडतर्फ करण्यात आलेले पदाधिकारी सरकार आणि पक्ष यांच्या सर्व स्तरामधले आहेत. कित्येक सभासद पार्टीचे सामान्य सदस्य होते. त्या व्यतिरिक्त पॉलिट ब्युरोच्या २५ जणांना देखील काढून टाकण्यात आले. हे सद्य उच्चपदस्थ होते त्यांच्या हाती बरेच अधिकार होते. पण त्यांची गय केली गेली नाही. गंभीर आरोप असलेल्यांवर खटले चालवून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. यामधून पॉलिट ब्यूरोचे सभासदही सुटले नाहीत. अवघ्या २५ जणांच्या ह्या सर्वोच्च समितीमधल्या भ्र्ष्ट सभासदांना ब्यूरोमधून हाकलण्यात आले. स्टॅंडिंग समितीच्या एका सदस्याला अटक करण्यात आली. काही पक्ष सदस्यांना मृत्युदंडाची शिक्षाही झाली आहे.

असल्या धडाकेबाज कारवाईनंतर शी यांच्यामागे जनमत झुकले तर नवल नाही. पण माओच्या पिढीमधली जी मंडळी आहेत त्यांना शी आपल्यामधला वाटतो. माओ यांच्या मृत्यूनंतर ज्या रिव्हिजनिस्ट विचारसरणीने पक्षाचा ताबा घेतला होता तिला या पिढीमधल्या माओ निष्ठांचा विरोध आहे. पण रिव्हिजनिस्टांच्या पिढीमधले लोक मात्र याला विरोध करतात. शी यांना आपल्याला धार्जिणी माणसे पक्षाच्या पदांवर बसवायची आहेत आणि त्यांच्याशी एकनिष्ठ नसलेल्या माणसांचा काटा काढायचा आहे त्यापलिकडे या मोहिमेला काही अर्थ नाही असे आक्षेप घेणारेही दिसतात. शी यांच्या आधी अध्यक्ष पदावर असलेल्या जियांग जेमिन आणि हु जिंताओ यांनी शी यांना आपली मोहिम आवरती घेण्यास सांगितले आहे. अशाप्रकारे होणार्‍या विरोधाला सामोरे जात असतानाच कधी दोन पावले मागे आणि चार पावले पुढे टाकत शी यांना मोहिम पुढे रेटावी लागत आहे.

खरे तर भ्रष्टाचाराचे मूळ म्हणजे केंद्रामध्ये एकवटलेली एकतर्फी सत्ता हेच आहे. तेव्हा चार भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर यावीत - त्यातील गुन्हेगारांना शिक्षा व्हावी एवढाच जर का त्या मोहिमेचा हेतू ठेवला तर ती साचेबद्ध होईल. भ्रष्टाचाराच्या मुळाला हात घालण्याची हिंमत शी दाखवणार का हा प्रश्न आहे. तसे करयचे झाले तर एकहाती एकवटलेल्या सत्तेचे विकेंद्रीकरण करावे लागेल. आणि तसे करणे कम्युनिस्ट विचारसरणीमध्ये बसेल का अशी शंका येते. चार भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा करणे एक गोष्ट आहे पण व्यवस्थाच अशी बदलणार की भ्रष्टाचाराला वावच राहणार नाही? व्यवस्थेमध्ये असे कायम स्वरुपी आणि दीर्घकालीन बदल शी करवून आणू शकतात का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. प्रामाणिक आणि केंद्र सत्तेशी प्रामाणिक असलेले तपासकाम करणारे पथक - अधिकार्‍यांवर सातत्याने नजर आणि तपासकामाचा चाबूक या गोष्टींमुळे अधिकारी वर्गाची दृष्टी बदलेल आणि भ्रष्टाचारमुक्त असे सरकार लोकांना बघता ये ईल अशी शी यांची कल्पना आहे. पण त्यांच्या लेखी इतकाच बदल पुरेसा असावा. माध्यमांना स्वातंत्र्य - न्यायालयांना स्वातंत्र्य - विरोधी पक्ष स्थापनेला परवानगी आदि विषयांना हात घालण्याची गरज आहे असे त्यांना वाटत नसावे. पाश्चात्य पद्धतीच्या लोकशाहीमध्येही भ्रष्टाचार असतोच अशा मताचे ते असल्यामुळे अशा प्रकारच्या नागरी सुधारणा मात्र चीनमध्ये अजूनही होऊ घातलेल्या नाहीत. चीनच्या भरभराटीमागे केंद्रीय सत्तेचे स्थैर्य हा एक मोठा घटक आहे आणि ते स्थैर्य बिघडेल असे काहीही करण्यास त्यांची तयारी नाही. जिथे उत्पादनाची साधने - जमीन आणि व्यवसाय यावर कठोर सरकारी नियंत्रण आहे तिथे भ्रष्टाचाराला रान नेहमीच मोकळे राहील. पण आपणच घातलेल्या मर्यादांमध्ये का होईना भ्रष्टाचाराला आळा घालण्याबाबत शी गंभीर आहेत हे निश्चित. मी माझ्या प्राणाची आणि प्रतिष्ठेचीही पर्वा करणार नाही पण भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई अर्धवट सोडणार नाही अशी तंबीच त्यांनी पॉलिट ब्यूरोच्या सदस्यांना दिली आहे.

इतक्या टोकाला जाऊन निर्वाणीचा इशारा देण्याची पाळी शी यांच्यावर आली ह्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. वरकरणी बलाढ्य दिसणारा चीन आतून कसा पोकळ आहे - त्याच्या यंत्रणा कशा भुसभुशीत झाल्या आहेत याची चु्णूक मिळते. शी राज्यावर येण्यापूर्वी एखादे वर्ष आधी इजिप्तच्या तहरीर चौकामध्ये होस्नी मुबारक यांच्या विरोधात झालेले बंड आठवा - ह्या बंडाला अमेरिकेची फूस होती असे म्हणतात. त्यामध्ये मुबारक यांना सत्ता सोडावी लागली. हीच पाळी चीनवरती येऊ नये म्हणून निकराची लढाई पुकारणार्‍या शी यांनी लश्कराचे आव्हान कसे पेलले तेही बघू या पुढील भागामध्ये.






No comments:

Post a Comment