Friday 23 February 2018

रूमानी न सही रूझानी रूहानी

Image result for modi ruhani


इराणचे नवनिर्वाचित पंतप्रधान रुहानी  १६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी भारताच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदी नुकतेच मध्यपूर्वेच्या चार देशांना यशस्वी  भेट देऊन परतले होते. त्या पार्श्वभूमीवर रूहानी यांच्या भेटीत काय घडते याची उत्सुकता होती. पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरील या देशाशी भारताचे संबंध कसे आहेत याला रूढार्थाची लेबले लावता येत नाहीत. 

२००३ मध्ये श्री अटलजींनी इराणचे पंतप्रधान श्री मोहमद खतामी ह्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण दिले होते. तेव्हा रुहानी खतामी ह्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम बघत. तेही त्यांच्या बरोबर दिल्ली येथे आले होते. त्यानंतर जवळजवळ १५ वर्षांनी रुहानी ह्यांनी भारताला भेट दिली आहे. . २००३ नंतरचा काळ इराण आणि भारत ह्यांच्या संबंधांसाठी फार काही चांगला गेला नाही. २००५ ते २०१३ पर्यंत महमूद अहमदीनेजाद पंतप्रधान म्हणून निवडून आले होते.  त्याच काळात भारत - इराण संबंध दुरावत गेले. ह्या काळात  इराणमधून "भंगार" आयात केले गेले त्यामधून जे बॉम्ब आले त्यांच्या स्फोटाच्या बातम्या मला आठवतात. आता हे असे भंगार इराण मधून कोण आयात करत होते आणि त्यामधून कोणी बॉम्ब का पाठवले - माल जेव्हा कस्टम्स मधून सोडवला गेला तेव्हा त्यांचा मागमूस कसा लागला नाही - ह्या बॉम्ब स्फोटांच्या मागे कोण कोणाला कसला संदेश देत होते ह्या गोष्टींवरती अर्थातच भारतीय माध्यमांनी कधी प्रकाश टाकलाच नाही. 

अहमदीनेजाद ह्यांची कारकीर्द जगाशी भांडण करण्यात संपली. खास करून अमेरिकेशी! त्यांच्या भांडणाची किंमत जनता मोजत होती. अहमदीनेजाद ह्यांच्या अनुभवानंतर जनतेला कट्टरपंथी नेता नको होता. अमेरिकन अध्यक्ष बाराक ओबामा ह्यांच्या कारकीर्दीत अमेरिका - इराण ह्यांच्यामध्ये झालेल्या अणुकराराच्या चर्चेमध्ये रुहानीच प्रमुख होते. त्यामुळे जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षा मोठ्या होत्या. २०१५ मध्ये इराणमध्ये झालेल्या निवडणुकीत हासन रुहानी आपले प्रतिस्पर्धी इब्राहिम रईसी ह्यांचा सहज पराभव करून जिंकले तेव्हा त्यांनी इराणी जनतेला दिलेली आश्वासने पाहण्यासारखी आहेत. आर्थिक निर्बंधांमुळे भरडल्या गेलेल्या प्रजेला त्या जाचातून सोडवणाऱ्या नेत्याची आस लागलेली होती. रुहानी ह्यांनी जनतेला हेच पहिले आश्वासन दिले होते. जगामध्ये इराण एकटा पडला आहे आणि ह्या अवस्थेमधून त्याला बाहेर काढू. ह्या त्यांच्या आश्वासनावरती जनता खुश होती. इराणची महाद्वारे उघडून सर्व जगाच्या संपर्कात राहण्याचे - अधिक स्वातंत्र्य देणारे नागरी हक्क आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासन इराणी जनतेला आवडले. आता सत्तेमध्ये आल्यानंतर ही आश्वासने पाळण्याचे आटोकाट प्रयत्न ते करत आहेत. 

रुहानी ह्यांच्या अथक प्रयत्नांमधून ज्यावर स्वाक्षऱ्या झाल्या त्या न्यूक्लियर डील मुळे इराणमध्ये परकीय गंगाजळीचा ओघ पुन्हा सुरु होईल आणि आधुनिक तंत्रज्ञान तसेच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील अशी सामान्य जनतेची अपेक्षा होती. परंतु २०१६ मध्ये अध्यक्ष ट्रम्प ह्यांच्या निवडीनंतर त्यांनी इराणच्या बाबतीत अगदी ताठर भूमिका घेतली आहे. ह्यामुळे न्यूक्लियर डीलचे जे फायदे इराणला मिळायला हवे होते ते मिळताना दिसत नाहीत. 

तसे न होण्याचे  प्रतिबिंब पडले होते गेल्या काही महिन्यात इराणमध्ये असलेल्या सरकार विरोधाच्या लाटेमध्ये. ह्या आंदोलनाच्या अनेक बातम्या आणि व्हिडियो मी पोस्ट केल्या होत्या. आंदोलनाच्या बातम्यांमुळे आणि ट्रम्प ह्यांच्या ताठर भूमिकेमुळे आज इराणमध्ये परकीय गुंतवणूक होताना दिसत नाही. आंदोलनाने ही बाब पुढे आणली की तेथील प्रजा धार्मिक स्वातंत्र्यासाठी अधीर झाली आहे. त्यासाठी ते इस्लाम सोडून झोरॅष्ट्रियन धर्माकडेही परत जाण्यास उद्युक्त झाले आहेत - केले जात आहेत. ह्या परिस्थितीमध्ये रुहानी ह्यांना साहजिकच जनतेच्या आर्थिक हलाखीवरती काही तरी उपाययोजना चालू आहेत हे दाखवून देण्याचे राजकीय दडपण आहे. त्याची उणीव जितकी भरून काढता येईल तितक्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रुहानी ह्यांना भारताकडून मदतीची अपेक्षा आहे. आणि भारत इराण ह्यांच्या दरम्यान जे नऊ करार झाले त्यातून त्यांनीही कशाला प्राधान्य दिले आहे हे स्पष्ट होते.  रूहानी यांच्या तीन दिवसाच्या दौऱ्यात जे करार झाले ते पाहून आपण अचंबित होतो. ऊर्जा संरक्षण संस्कृती गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चर जनसंपर्क आणि कनेक्टिव्हिटी या विस्तृत यादीतील विषय पाहून आपल्याला वाटते की हे करार नव्हते तेव्हा हे दोन देश कसे एकत्र काम करत होते?? 

चाबहार हे इराणचे एक नैसर्गिक बंदर आहे. बलुचिस्तानमध्ये चीनने बांधलेल्या ग्वादर बंदरापासून ते अवघ्या १०० किमी वरती आहे. ग्वादर बंदराच्या आसपासच्या भागात कायम हिंसात्मक घटना आणि दहशतवादी घटना घडत असतात. तुलनेने चबहार बंदराचा प्रदेश मात्र शांत असतो. २०१६ मध्ये भारत - इराण करारानंतर भारताने सर्वस्व ओतून बंदराचे काम आश्चर्यकारकरीत्या कमीतकमी वेळात पूर्ण केले. आज हे बंदर व्यापारी कामासाठी वापरले जाऊ लागले आहे. बंदराला अफगाणिस्तानच्या झाहेदन शहराशी जोडणारी रेल्वे लाईन बनवण्याचे कंत्राटही भारताकडे असून ते काम आता सुरु करण्यात आले आहे. बंदराप्रमाणेच भारत रेल्वेचे कामही झपाट्याने पूर्ण करेल ही अपेक्षा आहे. ह्याचे कारण असे की त्यामुळे अनेक देशांना जोडणाऱ्या इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर INSTC ह्या प्रकल्पामधले महत्वाचे टप्पे जोडले जातील. बंदराच्या आसपासच्या भागामध्ये एक फ्री ट्रेड झोन बनवण्याचाही निर्णय झाला आहे. फ्री ट्रेंड झोन मध्ये तेल शुद्धीकरणाचे आणि अन्य पेट्रो प्रॉडक्ट्सचे कारखाने सुरु व्हावेत ही अपेक्षा आहे. ह्यामध्ये पेट्रोकेमिकल्स  - फर्टिलायझर्स - मेटॅलर्जी बनवण्याचे कारखाने सामील असतील. सदर कारखाने बंदराच्या बांधले जातील तेव्हा भारताला ऊर्जा मिळेल आणि इराणला नोकऱ्या - पैसा! इराणने चाबहार बंदराचा ताबा पुढचे १८ महिने भारताकडे देऊन एक मोठे पाऊल उचलले आहे. 

२००७ साली तीन भारतीय कंपन्यांनी मिळून केलेल्या प्रयत्नांमध्ये चाबहार बंदराजवळ फरझाद बी ह्या एका मोठ्या नैसर्गिक गॅस खाणीचा शोध लावला होता. तेव्हा ह्या संदर्भामधल्या निर्मितीचे कारखाने भारताला मिळावेत ही अपेक्षा होती. ह्याचा उल्लेख इराण व भारत ह्यांच्यामधील संयुक्त निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या प्रकरणातील छोटे मोठे मुद्दे सोडवून भारताला हे कंत्राट मिळेल ही आशा वाढली आहे. फरझाद बी गॅस फील्ड मधील गॅस भारताकडे आणण्यासाठी भारत उत्सुक आहे. त्यासाठी तिथे गॅस विहिरी खोदणे आणि समुद्राखालून पाईप लाईन टाकून तो भारताच्या किनाऱ्यापर्यंत आणणे व तिथे एका प्लांट मध्ये LNG बनवण्याचे काम हाती घेण्याची योजना आहे. ह्या संशोधनामध्ये भारताने आठ कोटी डॉलर खर्च केले होते आता तो खर्च भरून काढणे व केलेल्या कामाचे श्रेय आणि फळ मिळणे ह्यावर भारत भर देत आहे. 

दोन्ही देशातील व्यापार व उद्योग वाढावेत म्हणून डबल टॅक्सेशन करार करण्यात आला. इराणमध्ये भारतीय गुंतवणूक भारतीय रुपयात व्हावी असेही ठरले. अशी सोय ह्यापूर्वी  फक्त भूतान आणि नेपाळ ह्याच देशात उपलब्ध होती. इराणमध्ये इंटरनॅशनल बॅंका नाहीत. त्यामुळे ही सोय आवश्यक होती. तसेच अमेरिकेने पुनश्च आर्थिक निर्बंध लागू केले तर चालू उद्योगांवरती परिणाम होऊ नये म्हणून भारतीय उद्योगांना ही सोय उपयुक्त ठरेल. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ह्यांचे इराण मध्ये ऑफिस नव्हते. ते आता सुरु केले जाईल. (ह्या मूलभूत सोयी व्हायला ७० वर्षे का बरे जावी लागली? असो.) 

आरमारी बोटींची बंदरातली येजा आणि त्याविषयीच्या सुरक्षिततेचे मुद्दे - संरक्षण दलाला प्रशिक्षण तसेच त्यामध्ये नियमित देवाण घेवाण आणि संरक्षण विषयक अन्य सहकार्याचे विषय ह्यावरतीही दीर्घ चर्चा झाली ही चर्चा आवश्यक असून  ती   पुढे चालू ठेवण्याचा निर्णय झाला. एक म्हणजे दोन्ही देशांमध्ये परस्परांचे गुन्हेगार तडीपार करून मायदेशी पाठवण्याचा करार नव्हता तो करार ह्या भेटीत करण्यात आला. ( सत्तर वर्षे no extradition treaty!!!) 

आर्थिक आघाडीवरती इराण आणि भारत ह्यांच्यामधले चित्र बऱ्यापैकी आशादायक हे असे म्हणता येईल. परंतु भूराजकीय परिस्थितीच्या बाबत तेव्हढे आश्वस्त राहता येत नाही.  एककाळ असा होता की भारत आणि इराण रशियन गोटात धरले जात होते. भारत आपले ७०% तेल इराणकडून आयात करत असे. याचा मोबदला डॉलरमध्ये न मागता रूपयात चुकता करण्याची मुभा इराणने भारताला दिली होती. हा सौदा भारताला स्वस्त पडत असे. आज जागतिक राजकारणाचा भोवरा असा फिरतोय की इराण व भारत एकमेकांना जानी दोस्त म्हणू शकत नाहीत. अफगाणिस्तानमधील युद्ध - दहशतवादाचा प्रसार - सुनी संघटनांनी शियांविरुद्ध छेडलेली मोहीम आणि शिया दहशतवादी संघटनांचे त्याला प्रत्युत्तर अशा वावटळी उठतच होत्या. काळाच्या ओघामध्ये सोविएत युनियन कोसळल्यानंतर इराण आणि भारत ह्यांच्या संबंधांमध्ये फरक पडणे स्वाभाविक मानले पाहिजे. आज इराण अजूनही रशियाला जवळचा मानतो पण भारत मात्र नाही. त्यामुळे अनेक मुद्द्यांवरती इराण आणि भारताचे एकमत होउ शकत नाही. 

त्या सर्वांचा केंद्र बिंदू आहे मोदींच्या कारकीर्दीत भारताची अमेरिकेशी झालेली जवळीक. इराणच्या अनु प्रकल्पाला हरकत घेणारी अमेरिका आणि त्या मुद्द्यावरून त्याच्या अस्तित्वालाच हात घालणारी अमेरिका! मग तिच्याशी भारताचे सख्य झाले तर इराणला ते रुचणे अवघडच. ह्यामध्ये भर पडली आहे ती मोदींच्या मध्यपूर्वेतील राजकारणाची. अहमदीनेजाद ह्यांच्या काळात आपण हाती अण्वस्त्र आले तर इस्राएल वरती टाकून त्याला नष्ट करू म्हणून इराणने खुले आम घोषणा केली होती. त्या इस्रायलशी भारताने "ऐतिहासिक" दोस्ती केली आहे. आपल्या अस्तित्वाच्या प्रश्नाने विचलित झालेल्या इस्राईलने सौदी अरेबियाशी देखील जुळवून घेतले कारण इराणच्या अण्वस्त्रांची भीती सौदीलाही इस्राएल इतकीच आहे. तीच परिस्थिती भारत - संयुक्त अरब अमिरात संबंधांची म्हणावी लागेल. येमेन मधील सत्ता हटवण्यासाठी सौदीच्या पुढाकाराने सुनी अरबांची एक डील होऊन एक सैन्यही बनवण्यात आले आहे. येमेन मधील त्यांच्या कारवायांमुळे इराणला शाह बसतो कारण येमेन मधील बंडखोरांना इराण पाठिंबा देतो. सीरियामधून असद ह्यांना खाली खेचण्यासाठी सौदी जे प्रयत्न करते त्याला अमेरिका पाठिंबा देते. ह्या असदच्या मागे इराण खंबीरपणे उभा होता. 

थोडक्यात सांगायचे तर मध्यपूर्व असो की अमेरिका - दोन्ही बाबतीत इराण आणि भारत परस्पर विरोधातील भूमिका ठामपणे घेताना दिसतात.  आणि त्यामध्ये नजीकच्या भविष्यात तरी बदल होणे अशक्य आहे. तसे असले तरी ह्या मतभेदांकडे दुर्लक्ष करून ज्या मुद्द्यांवरती ऐक्य होउ शकते ते मुद्दे धरून पुढे जाण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. चाबहार बंदर - भोवताली उभे करायचे भारतीय उद्योग आणि INSTC साठी पाठिंबा हे जे फायदे इराणकडून मिळत आहेत तेही छोटे नाहीत. 

म्हणून तर म्हटले ना भलत्या रोमँटिक कल्पना डोक्यात ना ठेवता प्रश्न सोडवण्याकडे कल ठेवणारे रुहानी पुढे मतभेदावरती मात करण्याची तयारी ठेवतील आणि भारताचा NSG  आणि UNSC प्रवेश ह्यावरती वस्तुनिष्ठ भूमिका घेतील अशी निदान आशा करता येईल. 
















Tuesday 20 February 2018

मध्यपूर्वेतील भारतीय "झुंजुमुंजु" भाग ३


Image result for burj khalifa india



मध्यपूर्वेतील दौर्‍यामध्ये मोदींनी भेट दिली ते दुसरे महत्वाचे राष्ट्र म्हणजे संयुक्त अरब अमिरात. २०१७ मध्ये अबू धाबीचे सत्ताधीश ह्यांची प्रजासत्ताक दिनाला असलेली उपस्थिती - त्यांच्या लष्करी तुकडीने कवायतीमध्ये भाग घेणे आणि दुबई येथील बुर्ज खलिफा ही प्रतिष्ठित इमारत भारतीय झेंड्याच्या रंगात नाहून निघाल्याचे दृश्य ना भारतीय कधी विसरू शकत ना जगामधले अन्य देश. १९८४ मध्ये पाकिस्तानरणित दहशतवाद्यांनी भारतीय विमानाचे अपहरण करून ते दुबई येथे नेले. भारतीय सेवेतील श्री रोमेश भंडारी ह्यांचे तेथील राजघराण्याशी उत्तम संबंध होते. ते वापरून इंदिराजींनी पाकिस्तानच्या पेचावरती यशस्वी मात केली. दुबईने दिलेल्या सहकार्याची परतफेड म्हणून राजघराण्याच्या मालकीच्या नुकत्याच सुरु झालेल्या एमिरेटस् एयरवेजला भारतामध्ये नियमित सेवा देण्याची परवानगी देण्यात आली. अशी परवानगी देणारा भारत हा पहिला देश ठरला. 

पुढच्या वर्षांमध्ये ह्या संबंधांकडे दुर्लक्ष झाले. शिखर परिषदाही झाल्या नाहीत. हळू हळू अमिरात भारतापासून दूर जाऊ लागली. मग असा काळ आली की अमिरात आणि भारत ह्यांच्यामध्ये एक प्रचंड दरी निर्माण झाली होती. १९९९ मध्ये IC814 विमानाचे अपहरण झाले तेव्हा विमान लाहोर येथून उडवल्यानंतर इंधन भरण्यासाठी दुबई येथे उतरवण्यात आले होते. इथे  प्रवाश्यांना वाचवण्याची उत्तम संधी होती. अमिरातीने आपले बळ वापरून दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्याची भारताची विनंती अमिरातीने मान्य केली नाही आणि भारताची प्रचंड मानहानी झाली. १९८४ मध्ये जे जागतिक राजकारणाचे वातावरण होते ते १९९९ पर्यंत पूर्णपणे बदलले होते. ज्यांनी अफगाणिस्तानमधील तालिबानांच्या सत्तेला मान्यता दिली होती असे तीन देश होते - पाकिस्तान, कतर आणि संयुक्त अरब अमिरात! ९/११ च्या हल्ल्यांसाठी जर्मनीमध्ये मोहमद अट्टा गटाला ओमर सईदने पैसे पाठवले ते दुबईच्या बॅंकेमधून. ९/११ चे सर्व दहशतवादी कधी ना कधी आपल्या प्रवासात दुबईत थांबल्याचे दिसते. आपणा सर्व भारतीयांना दुबई माहिती आहे ती १९९३ च्या हल्ल्यामधला प्रमुख आरोपी दाऊद इब्रहिम आणि त्याची टोळी ह्यांचे दुसरे घर म्हणून! एकंदरीतच कित्येक भारतीयांनी अर्थार्जनासाठी दुबई आपलीशी केली असली तरी कट्टरतावादाकडे झुकलेल्या तिथल्या राजेशाहीने भारतापेक्षा पाकिस्तानला झुकते माप दिले होते. अगदी काशिरमधील भारतीय कारवाईचा निषेध करण्याचा ठराव युनोमध्ये मांडणारे अमिरातच होते. गल्फ कोऑर्डिनेशन कमिटीच्या (GCC) अथवा ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑर्डिनेशनच्या (OIC) व्यासपीठावरती महत्वाचे स्थान असलेले अमिरात पाकिस्तानसाठी आपले वजन वापरत होते. मग अशा संयुक्त अरब अमिरातीला मोदींनी इतके कसे वळवले? हा बदल काही केवळ पैशाच्या जोरावरती होऊच शकत नाही. 

संयुक्त अरब अमिरातीचे आर्थिक दृष्टीने असलेले खास महत्व भारत कधी विसरला नाही. उदा. मध्यपूर्वेमधील सर्व देशात मिळून भारताचा १५% जागतिक व्यापार होतो. त्यातही अमिरात तीन नंबर तर सौदी अरेबिया हा चार नंबरवरती आहे. भारतामधील परकीय गुंतवणुकीमध्ये अमिरातीचा दहावा नंबर लागतो. आणि अमिरातीमध्ये लाखोंच्या संख्येने राहणारे भारतीय हा भारताचा एक महत्वाचा asset आहे. २६ लाख भारतीय (अमिरातीच्या लोकसंख्येच्या ३०%) अमिरातीमधून २०१४ साली तब्बल १२६० कोटी डॉलर्स मायदेशी पाठवले होते. परकीय गंगाजळीचा हा एक मोठा हिस्सा आहे. मोदी ह्यांनी अमिरातीशी विशेष संबंध स्थापन करताना इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगांना प्राधान्य दिले आहे. ह्या करत नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड (NIIF) च्या स्थापनेला २०१७ मध्ये कॅबिनेटने मंजूरी दिली आहे. कोणत्याही जागतिक नेत्याला भेटताना मोदींनी इन्फ्रास्ट्रक्चर ह्या विषयाला प्राधान्य दिल्याचे दिसते. तेच सूत्र अमिरातीच्या बाबतीत लागू आहे. NIIF ने आपले काम चोख पार पाडले तर अमिरात हा भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करणारा देश म्हणून ओळखला जाईल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अमिरातीने भारताला पैसा देऊ केला आहे. तेलसाठ्याच्या बाबतीत तर भारताने अमिरातीशी जे समंजस्य प्राप्त केले आहे त्याला तोडच नाही. 

मोदी सत्तेवरती येण्यापूर्वी भारत फक्त काही दिवस पुरेल एव्हढाच तेलाचा साठा देशामध्ये ठेवत असे. गेली काही वर्षे तेलाच्या उतरत्या किंमतीचा आपण उपयोग करून घेतला नाही. ह्या धोरणाला छाट देत मोदींनी देशांतर्गत ५३.३ लाख टन तेल साठवता येईल असे साठे विशाखापट्टणम - मंगळुरू आणि पदुर इथे बांधण्याचा निर्णय घेतला. ह्यापैकी मंगलुरू येथील ५०% क्षमता वापरण्याचा करार अमिरातीच्या ADNOC ह्या कंपनीशी करण्यात येणार आहे. ह्या साठ्याचा वापर ADNOC कंपनी सुदूर पूर्वेकडील देशांना तेल पुरवण्यासाठी करू शकते. ह्या साठ्यापैकी २/३ तेल कोणत्याही आणिबाणीच्या प्रसंगी वापरण्याचा भारताला हक्क राहील. आणि त्याचे पैसे द्यावे लागणार नाहीत. थोडक्यात काय तर दर कमी असताना तेलाचा साठा करण्याची सोय भारताने उपलब्ध करून द्यावी आणि बदल्यात ते तेल गरज असेल तेव्हा वापरण्याचा हक्क भारताला असेल असा हा Barter पद्धतीचा व्यवहार आहे. प्रश्न असा आहे की मग खुद्द अमिरातच असा साठा का करत नाही? साठा करणे वेगळे आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी वेगळी. आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान जवळ असणे वेगळे. तेव्हा आपल्याकडील कौशल्याचा वापर अमिरातील करून देऊन मोदींनी भारताच्या तेअसाठ्याचा प्रश्न सोडवला आहे. हा साठा सुदूर पूर्वेकडील देशांना विकताना अमिरातीचा वाहतुकीचा खर्च लक्षणीय रीत्या कमी होईल हा फायदा तर वेगळाच. मध्यपूर्वेतील सततच्या युद्धजन्य परिस्थितीकडे बघता तेलाचा साठा देशापासून लांबवरती सुरक्षित आहे ही हमी देखील अमिरातीसाठी खूप महत्वाची आहे. 

इन्फ्रास्ट्रक्चर वगळता सायबर स्पेस = स्पेस रिसर्च - संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रामध्ये खाजगी आणि सरकारी कंपन्यांचे तंत्रज्ञान व उत्पादन ह्यासाठी प्रकल्पनिर्मिती - इलेक्ट्रॉनिक्स - आयटी - उर्जा सुरक्षा - रेन्यूएबल उर्जा - सागरी वाहतूक - ह्यूमन ट्रॅफिकिंग - कृषी - आदि विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याचे जे नवे करार करण्यात आले आहेत त्यातून दोन्ही देशांमधील आर्थिक व्यवहार विस्तारत असून अधिक दृढ पायावरती उभे करण्यात येत आहेत असे दिसते. अमिरातीशी इतका विस्तृत आर्थिक पाया असू शकतो ह्याचा ह्या आधीच्या कोणत्याही सरकारने विचारही केला नसावा. मोदी ह्यांच्या आधी अमिरातीशी असलेल्या व्यापारामध्ये ५०% हिस्सा तर केवळ तेलाचा होता. पण आता मात्र ह्या विविध क्षेत्रांचा प्रथमच सहभाग उभा राहू पाहत आहे. खास करून संरक्षण विषयक सामग्री बनवण्याचे कारखाने जर संयुक्त प्रकल्प म्हणून उभे राहिले तर त्याची व्याप्ती कुठपर्यंत वाढू शकते हे पाहून आपण अचंबित होतो. भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर इतका मोठा रेटा पहिल्यांदाच लागलेला पहायला मिळतो. ह्या प्रयत्नांना अमिरातीने उचित प्रतिसाद दिला आहे. पण आश्चर्य म्हणजे दोन्ही देशांमधले संबंध आर्थिक पायापेक्षा आणखी धोरणात्मक दृष्ट्या वेगळी पावले टाकताना दिसत आहेत त्यामुळे सगळे जग आणि खास करून पाकिस्तान भांबावला आहे. 

भारत आणि अमिरातीमधल्या संरक्षणविषयक सामंजस्याबद्दल थोडे पाहू. ११९५, १९९९ आणि २००४ ह्या वर्षांमध्ये भारत आणि अमिरातीच्या आरमाराने संयुक्त कवायती केल्या होत्या. पण भारताचा लष्कर प्रमुख कधी अमिरातीच्या भेटीला गेला नव्हता. २००७ साली प्रथमच आरमार प्रमुख अडमिरल सुरेश मेहता ह्यांनी पदारूढ होताच संयुक्त अरब अमिरात हा आमचा शेजारी देश आहे असे म्हणत तिथे भेट दिली आणि अमिरातीकडे विशेष लक्ष पुरवले. अमिरातीच्या लष्करी अधिकार्‍यांना भारतामध्ये प्रशिक्षण घेण्याची सुविधा खुली करण्यात आली. भारतीय आरमार तेलाची ने आण सुरक्षित असावी म्हणून तगडा पहारा देते. त्यातही लाल समुद्र आणि अरबी समुद्राला जोडणारे बाब अल मन्डब, केप ओफ गुड होपच्या दक्षिणेकडील विभाग आणि होर्मुझची सामुद्रधुनी ह्या तीन अरुंद पट्ट्याचे संरक्षण आरमारावरतीच आहे. जगातील ९०% तेलवाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. भारतीय आरमार ह्या सागरी वाटांवरचे ३० प्रोसेसिंग प्लॅटफ़ोर्म्स आणि १२५ तेलविहिरी ह्यांची अथक राखण करतो. शिवाय समुद्राच्या तळाशी असलेल्या आणि ३००० किमी पसरलेल्या गॅसच्या साठ्यावरतीही लक्ष ठेवावे लागते. हे काम पार पाडत असताना अमिरातीसारख्या देशाशी सामंजस्य असणे गरजेचे आहे.

प्रजासत्ताक दिनाचसाठी आजपर्यंत मध्यपूर्वेमधून केवळ दोनच वर्षी पाहुणे आले आहेत. एखाद्या देशाशी असलेले अतिमहत्वाचे करार डोळ्यासमोर ठेवून पाहुणे बोलावले जातात. (उदा. फ्रान्सचे वलांदे अथवा अमेरिकेचे ओबामा) अमिरातीमधून राजपुत्र शेख महमद बिन झायेद ह्यांची २०१७ च्या प्रजासत्ताक दिनी उपस्थिती आणि अमिरातीच्या लष्करी तुकडीने त्यामध्ये कवायत करणे ही एक अभूतपूर्व घटना होती. आणि महत्वाचे म्हणजे भारतमैत्रीचे चिन्ह म्हणून बुर्ज् खलीजवरती भारताचा झेंडा झळकला ते दृश्य!! अशा पार्श्वभूमीवरती अमिरातीशी भारत सरकार खास बोलणी करत आहे हे उघड आहे. ह्या मैत्रीची घनिष्ठता पाकिस्तानला इतकी बोचते आहे की अफगाणिस्तानमध्ये ह्या भेटीच्या पार्श्वभूमीवरती अमिरातीच्या वकिलातीच्या अधिकार्‍यांवरती भीषण दहशतवादी हल्ला चढवण्यात आला आणि त्यामध्ये अमिरातीच्या राजदूतासह चार अधिकारी बळी पडले. पाकिस्तान आपल्या कर्माने अमिरातीला दूर ढकलत नाही का?

ज्या अमिरातीला पाकिस्तान जवळचा वाटत होता त्याला आपल्याकडे खेचायचे अवघड कार्य मोदींनी कोणत्या मुद्यांवरती केले? प्रत्येक वेळी आपण परिस्थिती निर्माण करतो असे नाही. पण समोर असलेल्या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो ह्याची स्पष्ट कल्पना मोदी ह्यांच्यासमोर सतत असते. अमिरात आणि पाकिस्तान अथवा सौदी आणि पाकिस्तान ह्यांचे परस्परांशी बिघडण्याचे कारण त्यांनी स्वतःच जन्माला घातले आहे. त्याचे मूळ आहे येमेनमधील सशस्त्र संघर्षात. ह्या युद्धासाठी सौदीने पुढाकार घेऊन एक मुस्लिम सैन्य बनवण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात हा सुन्नी वि. शिया असा संघर्ष आहे. सौदी आणि अमिरातीने पाकिस्तानला पाचारण करून ह्या सैन्यासाठी आपले सैन्य पाठवावे असे सुचवले. इथे पाकिस्तानची कधी नव्हे ती कोंडी झाली. पाकिस्तानने सुन्नींना लढाईमध्ये मदत केली असे दिसले तर पाकिस्तानामधले शिया बंड करू शकतात. शिवाय अशातून इराण नाराज होईल. इराणची नाराजी ओढवून घेतली तर पाकिस्तानला आपले लष्कर पश्चिम सीमेवरती पाठवावे लागेल. आणि तसे केले तर भारताला लागून असलेल्या पूर्व सीमेवरती संरक्षणासाठी पुरेसे सैन्यही उरणार नाही. अशा संधीचा वापर भारताने करायचे म्हटले तर त्या प्रय्त्नांना साथ देण्यासाठी इराण प्रक्षुब्ध शियांना हाताशी धरून पाकिस्तानचे विघटनही घडवून आणू शकतो. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानपुढचा पेच हा जगण्यामरणाचा होऊन जातो. ही परिस्थिती भारताने उत्पन्न केलेली नाही. ती स्वाभाविकरीत्या निर्माण झाली आहे. पण पाकिस्तानच्या कोंडीचा पुरेपूर वापर मोदी आज करत आहेत. कारण आपण अरब सौन्यामध्ये सामिल होऊ शकत नाही आणि आपले सैन्य पाठवू शकत नाही असे पाकिस्तानने कळवले आहे. ह्या सरकारच्या निर्णयावरती त्यांच्या संसदेचेही शिक्कामोर्तब झाले आहे. सबब अमिरातीने वा सौदीने आपली परिस्थिती समजून घ्यावी ही पाकिस्तानची अपेक्षा आहे. पण गरजेच्या वेळी उभा राहत् नसेल तो मित्र कसला? पाकिस्तानला डोळे झाकून आजवर आपण मदत केली, त्याच्या हितासाठी GCC आणि OIC ह्या दोन्ही व्यासपीठांवरती त्याच्या पाठीशी उभे राहिलो आणि आर्थिक संकटातही मदत केली पण पाकिस्तानने मात्र आपल्याला टांग दिली आहे अशी दोन्ही देशांची भावना झाली आहे. ह्या फसवणूकीची वेदना तीव्र आहे. ह्याही पेक्षा मोठे म्हणजे माझा स्वतःचा असा अंदाज आहे की पाकिस्तानने ह्या दोन्ही देशांना ज्या काही थापा मारल्या आहेत आणि फसवणूक केली आहे त्याचे तपशीलच भारताने पेश केले असावेत!! ह्या वागण्यामुळे दुखावलेले हे देश भारताकडे आज आकर्षित झाले आहेत.

ह्याच भावनेमधून अमिरातीने दाऊद इब्राहिमची संपत्ती जप्त केली आणि त्याच्या गॅंगचे तेथील व्यवहार अशक्य करून टाकले आहेत. तसेच इसिस्शी संबंधित आरोपींना दुबई येथे अटक करून भारतामध्ये माघारी पाठवण्यात आले आहे. उरी येथे झालेल्या हल्ल्याचा अमिरातीने कडक शब्दात निषेधही केला आहे. अमिरातीशी जे करार झाले त्यामध्ये दहशतवाद - गुन्हेगारीविषयक माहितीची देवाणघेवाण - तस्करी - मनी लॉंडरींग - खेळावरील सट्टे व जुगार - अंमली पदार्थाचे व्यापार - गुन्हेगारांना परत पाठवणे आदि विषय सामिल केले गेले आहेत. दाऊद गॅंगचे राजरोस व्यवहार दुबईत बंद करण्यात आले आहेत. भारत अमिरात ह्यांच्या संयुक्त निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले की "काही देश वा संघटना धर्माच्या नावाने दहशतवादाला पाठिंबा देत असून अन्य देशांविरुद्ध वापरण्यास अदत करत आहेत. कोणत्याही राजकीय वादाला जातीय - पंथीय वा धार्मिक रंगाचा मुलामा देण्याचे अत्यंत गर्हणीय काम हे देश करत आहेत तसेच आपले राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर करत आहेत." पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेमुळे चिडलेल्या अमिरातीच्या विदेश मंत्री  अन्वर गरगश म्हणाले की लिबियापासून येमेनपर्यंत अरबांपुढे जे प्रश्न उभे आहेत त्यांच्यासाठी पाकिस्तान व तुर्कस्तान ह्यांनी घेतलेली संदिग्ध आणि परस्पर विरोधी भूमिकेची जबर किंमत त्यांना चुकती करावी लागेल."

अशा तर्‍हेने मोदींनी अमिरातीशी असलेले भारताच्या संबंधांमध्ये जे उत्साहाचे रंग भरले आहेत त्याचा उपयोग भारताला अमिरातीचा प्रभाव असलेल्या GCC आणि OIC सारख्या व्यासपीठांवरती करून घेता येईल. तसे झाले तर ASEAN मध्ये जे यश मिळाले त्या पातळीवरचे यश भारताला मध्यपूर्वेमध्येही मिळू शकेल. ह्यातूनच मध्यपूर्वेची दारे किलकिली झाली आहेत. म्हणून भारतासाठी ओमाननंतर संयुक्त अरब अमिरात हा मध्यपूर्वेतील संबंधांचा दुसरा महत्वाचा टेकू आहे असे दिसते. 

राफेलवरुन काँग्रेसचा फुसका बार

फ्रेंच कंपनी राफेल यांच्याकडून मध्यम आकाराची आणि वेगवेगळी कामे करू शकणारी विमाने विकत घेण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरून गेले दहा दिवस काँग्रेसने एकच राळ उठवली आहे. खासदार राजीव यांनी या कारभाराविषयी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण मंत्रालयाने हा करार गुप्त स्वरूपाचा असून त्याविषयी माहिती उघड करता येणार नाही, असे म्हटले होते. हे निमित्त साधून मोदी सरकार या कराराच्या मागे लपलेले गैरव्यवहार पाठीशी घालत आहे, असा प्रच्छन्न आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला. अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला जणू काही या करारामधून भरभक्कम लाच कंपनीने भाजपला दिली आहे. एकूणच भारतीय जनता भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती संवेदनशील आहे आणि याच मुद्द्यामुळे २०१४ मध्ये युपीए सरकारच्या विश्वासार्हतेला मोठा तडा गेला आणि त्यांची सत्ता संपुष्टात आली होती. त्यात संरक्षणविषयक करारामध्येही पैसे खाल्ले गेले तर असा वार जनतेच्या जिव्हारी लागतो. बोफोर्स प्रकरणाने तीस वर्षे उलटली तरी अजून गांधी घराण्याची पाठ सोडलेली नाही. तेव्हा मोदी सरकारवरती असाच संरक्षणविषयक भ्रष्टाचाराचा आरोप करण्यामध्ये काँग्रेसला रस आहे, असे दिसते. शिवाय अन्य कोणत्या कारभाराकडे बोट दाखविण्याची संधी नसल्यामुळेच नाईलाजाने राफेल करारावरती काँग्रेसने आपले लक्ष केंद्रित केले आहे, असे दिसते.
 
 
या करारामध्ये मोदी सरकारने पैसे खाल्ले, असा संशय नागरिकांच्या मनामध्ये उभा करणे हा या गदारोळाचा हेतू होता. गदारोळामुळे मुद्द्यावर विस्तृत चर्चा झाली असली तरीसुद्धा जनतेचे मत मोदी सरकारच्या विरोधात कलुषित झाले, असे काही म्हणता येणार नाही. याचे कारण संरक्षणविषयक करार असूनसुद्धा त्यामध्ये दाखविण्यात आलेली पुरेशी पारदर्शकता जनतेला दिसत आहे. राफेल करारावर आतापर्यंत सोशल मीडियावर भरपूर माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आपल्यामधले बरेच लोक त्याच्याशी परिचित असावेत.
 
 
भारतीय वायुदलाकडे सध्या जी विमाने आहेत, त्यामधली काही जुनी विमाने आता सेवामुक्त करावी लागणार आहेत. अर्थातच वायुदलाकडे विमाने कमी पडणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये मध्यम आकाराची पण विविध कामे करू शकणार्‍या विमानांचा शोध घेऊन त्यांची ऑर्डर देण्यासाठी युपीए काळामध्येच प्रयत्न सुरू झाले होते. वायुदलाने घेतलेल्या चाचण्यांमध्ये राफेल विमाने पास झाली होती. यानंतर त्यांच्या कमर्शियल अटींवरती चर्चा सुरू झाली. युपीए काळामध्ये सरकार व कंपनीमध्ये काही रकमेवर एकमत झाले, परंतु प्रत्यक्षात ऑर्डर मात्र दिली गेली नाही. या प्रकारामध्ये चार महत्त्वाची वर्षे निघून गेली. आपल्याला आठवत असेल की अशाच प्रकारे जेव्हा बोफोर्स प्रकरण बाहेर आले त्यानंतर लष्कराला हव्या असलेल्या तोफा गेली तीस वर्षे मिळू शकल्या नाहीत. जवळ दारूगोळा, साधनसामग्री, शस्त्रास्त्रे नसताना काँग्रेस सरकारने संरक्षण दलांना पंगू करून ठेवले होते. याला अपवाद अर्थातच वाजपेयींच्या कारकिर्दीचा. त्या काळामध्ये Gorshkov बोट विकत घेण्याच्या करारावरही अशीच टीका केली जात होती. आज Gorshkov आहे म्हणून भारतीय नौदलाकडे एक भक्कम साधन आहे. म्हणून जनतेनेही हे समजून घेतले पाहिजे की, अशा प्रकारचे वादंग जेव्हा उठवले जातात तेव्हा त्यांचे लक्ष्य प्रत्यक्षात लाच घेणारा राजकीय पुढारी हे नसून आपले संरक्षण दल हेच असते. याचा अर्थ असा नव्हे की लाच घेणारे पुढारी सहीसलामत सुटावेत. पण ही पार्श्वभूमी लक्षात ठेवून राफेल कराराकडे नजर टाकणे आवश्यक आहे.
 
 
राफेल विमानांचा उत्तमदर्जा वायुदलाने चाचण्या घेऊन मान्य केला असल्यामुळे दुय्यमदर्जाच्या विमानांचा करार मोदी सरकारने केला, असे काँग्रेसला म्हणता येत नाही किंवा त्याच्या अन्य बाबींवरसुद्धा आक्षेप घेता येत नाही. म्हणून किमतीवरून काहूर उठविण्यात आले आहे. राफेल विमाने विकत घेणे म्हणजे दोन साधी विमाने विकत घेण्यासारखे नाही. काँग्रेसने केलेला करार आणि मोदी सरकारने केलेला करार यामध्ये प्रचंड अंतर आहे. सोशल मीडियामध्ये याविषयी भरपूर माहिती आली आहे. तरीसुद्धा इथे नमूद करते की, मोदी सरकारने केलेल्या करारामध्ये त्यामध्ये आता बसविण्यात येणारी क्षेपणास्त्रे, शस्त्रास्त्रे, विविध उपकरणे, त्याची सविस्तर कागदपत्रे, प्रशिक्षण, केवळ भारताला हव्या असलेल्या खास सोयी-त्याच्या दुरुस्तीची सोय-तीदेखील दोन तळांवरती-कोणत्याही क्षणी किमान ७५ टक्के विमाने उड्डाण करण्याच्या अवस्थेत असावीत, याची राफेलने दिलेली हमी-एकाऐवजी दोन Squadron साठी लॉजिस्टिकस आणि तेही दोन तळाकरता उपलब्ध असणे, या सर्वांसाठी जी जास्तीची रक्कम दिली जात आहे त्यावरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरण्याचा अत्यंत हीन प्रयत्न चालवला आहे. सुरुवातीला ३६ पूर्ण तयार विमाने मिळतील व नंतरची विमाने भारतामध्येच निर्माण केली जातील. यासाठी राफेलने स्वतःला पसंत असलेला कोणताही भारतीय उत्पादक निवडण्याची त्यांना मुभा आहे. पण सरकारला पडणारी किंमत मात्र एकच राहील. शिवाय हा करार कंपनीशी करण्यात आला नसून तो फ्रान्सच्या सरकारशी केला जात आहे. साहजिकच त्याला केवळ कंपनी नव्हे तर फ्रान्सचे सरकार जबाबदार असेल. इतके सर्व फायदे आता सामान्य नागरिकांनाही पाठ झाले आहेत पण कॉंग्रेसला मात्र दुसर्‍याच्या डोळ्यांमधले कुसळ दिसते आहे आणि याचा नेमका अर्थ काय हे लक्षात घेतलेच पाहिजे. सत्तेमध्ये आल्यापासून मोदी सरकारने भारताच्या संरक्षणविषयक आयातीवर कात्री लावून भविष्यात आपल्या जास्तीत जास्त गरज देशांतर्गत उत्पादनातून भागवता येतील, यासाठी प्रयत्न चालवले आहेत आणि त्यांना उत्तमयशही येत आहे. ही काँग्रेसची पोटदुखी असू शकते. ’मेक इन इंडिया’ ही मोदींची घोषणा नेमकी काय आहे? आजपर्यंत पर्यटनासह इतर क्षेत्रामध्ये परकीय कंपन्या येतच होत्या, आपले भांडवल घालतच होत्या पण संरक्षणविषयक सामग्रीला हे स्वातंत्र्य नव्हते. संरक्षणविषयक मालाचे कारखाने इथे काढणे सोपे नाही. कारण त्याचे गिर्‍हाईक फक्त सरकारच असू शकते. मग आपण जे उत्पादन करू त्याला उठाव असल्याची हमी असल्याशिवाय कोणीही उत्पादक कारखाना उभारण्याचा धोका पत्करू शकत नाही. तेव्हा असे उत्पादन इथे वाढवायचे तर सरकारकडून हमी लागते. शिवाय काही प्रमाणात सरकार भांडवल गुंतविण्यास तयार आहे का? असल्यास किती टक्के? कोणत्या पार्श्वभूमीवरती अशी गुंतवणूक सरकारने करावी? वगैरे गुंतागुंतीचे प्रश्न असतात आणि त्यासाठी धोरण बनविण्यामध्ये सरकारचा काही काळ गेला. राफेल करारामध्ये उर्वरित १००+ विमाने भारतामध्ये खाजगी क्षेत्रात बनविण्याचा निर्णय असे धोरण अस्तित्वात आल्यामुळेच होऊ शकला, पण मुळात भारतामध्ये या मालाचे उत्पादन करण्यालाच काँग्रेस सरकार नाके मुरडते. कारण भारताने सदासर्वकाळ पाश्चात्त्यांचे बटिक राहावे आणि पाकिस्तानला जर उत्पादन करणे शक्य नसेल तर मग भारतानेही पंगूच राहावे, अशी मनोवृत्ती असलेली प्रजा काँग्रेसी सरकार चालवत होती. त्यांची पोटदुखी आपण समजू शकतो. राहता राहिला प्रश्न हा करार दोन सरकारमध्ये का केला गेला याचा. दोन सरकारमध्ये झालेल्या करारामध्ये भ्रष्टाचाराला वाव राहत नाही तसे आरोप होऊ शकत नाहीत हा एक फायदा होता, पण त्याहीपेक्षा मोठा फायदा होता तो भारत-फ्रान्स संबंध बळकट करण्याचा.
 
 
१९९९ नंतर म्हणजे अटलजींच्या कारकिर्दीपासून फ्रान्सचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला आहे. त्या अगोदर एकंदरीत परिस्थितीमध्ये फ्रान्सला भारतापेक्षा पाकिस्तान जवळचा वाटत होता. फ्रान्सचे वैशिष्ट्य असे की त्याने न्यूक्लियर सप्लाय ग्रुपमध्ये भारताला प्रवेश देण्यास पाठिंबा दिला आहे. आज भारताची बाजू एखाद्या प्रकरणामध्ये युरोपियन देशांसमोर मांडायची झाली तर फ्रान्स आपल्यामागे उभा असला तर हे कामसोपे होते. ब्रिटनच्या पाठोपाठ मोदींनी फ्रान्सलाही आपलेसे करून घेतल्यामुळे पाकिस्तानमध्ये आणि त्यांच्या इथल्या पिट्‌ट्यांमध्ये अस्वस्थता आहे.
 
 
राफेल विमाने कमी उंचीवरून उडू शकतात, लांबवर जाऊन बॉम्ब फेकू शकतात, हवेमध्ये विशिष्ट उंची गाठायला अत्यंत कमी वेळ घेतात, शत्रूच्या विमानांनी विमानतळ किंवा पूल किंवा खनिज तेलाच्या शुद्धीकरणाचे कारखाने वगैरेंवर हल्ला केला तर चपळाईने तो चुकविण्यासाठी आवश्यक कसरती त्यात बसून वैमानिकाला करता येतात, इतकेच नव्हे तर न्यूक्लियर हल्ले करण्यासाठी त्यांचा वापर होऊ शकतो, या बाबींची पाकिस्तानने धास्ती घेतली आहे आणि नेमकी हीच वैशिष्ट्ये आहेत ज्यासाठी भारताने अधिक किंमत मोजायचे मान्य केले असावे. आता ही वैशिष्ट्ये अर्थातच गुप्त राखावी लागतात. हे देशाचा कारभार ७० वर्षे हाकणार्‍या कॉंग्रेसला माहिती असायला नको काय? (खुद्द काँग्रेसने केलेले असे अन्य करारही गुप्त राखण्याचे प्रावधान केलेले असते आणि अशीच उत्तरे काँग्रेसने देखील यापूर्वी दिली आहेतच.) मग असे असूनही ते जर हे तपशील मागत असतील तर त्यातून फायदा पाकिस्तानला होईल हेही त्यांना कळत असणारच. तेव्हा त्यांचे नेमके हेतू काय आहेत हे जनतेसमोर अगदी स्पष्ट झाल्यामुळे आणि करारामध्ये जास्तीचे पैसे दिले गेले, अशी कोणतीही भावना जनतेच्या मनात निर्माण न झाल्यामुळे कॉंग्रेसचा हा बार फुसका ठरला आहे. या निमित्ताने वायुदलाच्या अत्यावश्यक गरज पूर्ण करण्याचा निर्णय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोदी सरकारने घेऊन उपक्रमतडीस नेण्याचे धाडस दाखवले, त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.
 

Saturday 17 February 2018

मध्यपूर्वेतील भारतीय "झुंजुमुंजु" भाग २

Image result for oman modi


आजकाल कोणत्याही दोन देशांमधल्या संबंधांना "strategic" (धोरणात्मक) म्हटले जाते. पण असे संबंध धोरणात्मक आहेत की डावपेचात्मक हे ठरवावे लागते. धोरणात्मक संबंध हे दीर्घ पल्ल्याच्या कार्यवाहीशी संबंधित असावे लागते तर tactical मात्र लघु पल्ल्याचे असते. केवळ एकमेकांचा वापर करून घेण्याने संबंध धोरणात्मक होऊ शकत नाहीत. तर त्यामध्ये परस्परांचे हितसंबंध जपले जातात की नाही हे बघितले पाहिजे. धोरणात्मक संबंध हे एखाद्या धर्मादाय कामाप्रमाणे असू शकत नाहीत जिथे एकच बाजू दुसर्‍या बाजूवरती धर्मादाय हेतूने दुसरी बाजू सुखसुविधांचा वर्षाव करते ते संबंध धोरणात्मक असू शकत नाहीत. धोरणात्मक संबंधांमध्ये देवाणघेवाण असावी लागते. आणि अंतीमतः धोरणात्मक संबंध हे दोन्ही राष्ट्रांच्या विविध अंगांना स्पर्श करणारे असावे लागतात. उदा. राजकीय, आर्थिक, लष्करी संरक्षण आणि विचारधारा अशा सर्व अंगांनी एकमेकांचे हितसंबंध जपणारे देवाणघेवाणीचे व्यवहार दीर्घ काळासाठी नियोजित केले जातात अशी नाती धोरणात्मक म्हणता येतात. 

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी मध्यपूर्वेमध्ये भारतासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आज जरी तेथील काही देशांशी भारताचे संबंध strategic अशा प्रकारात मोडत नसले तरी प्रयत्नांची दिशा तीच असावी असे दिसते. गेल्या आठवड्यामध्ये श्री. मोदी ह्यांनी ओमान - संयुक्त अरब अमिरात - पॅलेस्टाईन आणि जॉर्डनला भेट दिली. ओमान - संयुक्त अरब अमिरात - जॉर्डन ह्या देशांमध्ये काही समानता आहे. तेव्हा जो एकच एक धागा ह्या देशांना भारताशी बांधू शकतो असा धागा पकडून घडामोडी घडताना दिसतात. त्याचे तपशील समजण्यापूर्वी ह्या देशांची पार्श्वभूमी थोडक्यात बघितली पाहिजे. पैकी ओमानने भारताला दुकम बंदर नाविक तळ म्हणून वापरण्याची संधी दिल्यामुळे मोदींच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसते. इतक्या दशकांपासून दुरावलेले संबंध अचानक लष्करी वापरासाठी बंदर देण्यापर्यंत कसे सुधारले आणि त्यासाठी नेमके काय करावे लागले - भारताला बंदर देऊ करण्यामागे ओमानचा हेतू काय आणि हे बंदर ताब्यात घेण्यामागे भारताचे नियोजन काय आहे - दुकम खेरीज अन्य कोणते सहकार्याचे करार भारत व ओमान यांच्यामध्ये झाले हे बघू या. 

ओमानमध्ये राजेशाही व्यवस्था आहे. तिथे कायदेमंडळ - अंमल आणि न्याय अशा तिन्ही अंगांचे अंतीम स्वामी तिथले राजेच आहेत. १९७० मध्ये सध्याचे राजे सुलतान कुबूस आपल्या वडिलांना हटवून सत्तरूढ झाले. ओमानचे राजे इस्लाममधील इबाधिया ह्या पंथाचे आहेत. इबाधिया पंथ एक प्रकारे अन्य पंथांच्या तुलनेमध्ये उदारमतवादी मानला पाहिजे. ओमानमध्ये अन्य धर्मियांना आपापला धर्म पाळण्याची अनुमती मिळते. संघर्षाच्या काळामध्ये वैचारिक देवघेवीने आणि चर्चा करून सभ्य वातावरणामध्ये कलह सोडवण्याकडे इबादी पंथाचा कल असल्यामुळे ते अन्य इस्लामी पंथांमध्ये उठून दिसतात. सुल्तान कुबूस ह्यांनी सत्तारूढ झाल्यानंतर अनेक सुधारणा घडवून आणल्या. मध्यपूर्वेच्या कर्मठ वातावरणाच्या पार्श्वभूमीवरती ओमानमधील राजे म्हणजे सहृदय हुकूमशहा म्हटले पाहिजेत. देशाच्या उन्नतीचा विचार केला तर अनेकदा त्यांची तुलना सिंगापूरचे ली क्वान येव ह्यांच्याशी केली जाते. १९८१ मध्ये गल्फ कोऑर्डिन्शन कमिटी (GCC) ची स्थापना करण्यामध्ये कुबूस हे संस्थापक सदस्य म्हणून सामिल झाले होते. ओमानमध्ये लोकप्रतिनिधी निवडले जातात आणि १९९७ पासून स्त्रियांना मतदानाचा तसेच निवडणुकीसाठी उभे राहण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. 

सुलतान कुबूस १९७० मध्ये सत्तेवरती आले आणि लगेचच म्हणजे १९७२ मध्ये त्यांच्या विरोधात एक बंड पुकारण्यात आले होते. कुबूस ह्यांचे वडिल पुराणमतवादी होते. त्यांनी तंत्रज्ञानाच्या बाबतीत ओमानने पूर्णतः ब्रिटनवर अवलंबून राहावे असे ठरवले होते. ओमान हा एक मागासलेला देश होता. तिथे साधे डांबरी रस्ते सुद्धा नव्हते. ओमानची राजधानी मस्कतचे दरवाजे सूर्यास्ताला बंद केले जात. अंधार पडल्यावरती रस्त्यामध्ये माणसे दिसत नसत. एखादा बाहेर पडलाच तर पुढे दुसर्‍याला कंदिल हाती घेऊन रस्ता दाखवावा लागे. ओमानमध्ये तेलाचा शोध घेतला गेला होता. आणि अल्प प्रमाणात उत्पादन सुरु झाले होते. ही राजधानीची अवस्था असेल तर अन्य प्रांताची कल्पना आपण करू शकतो. सुलतानाने आधुनिक औषधे, चष्मे आणि रेडियोवरती बंदी घातलेली होती. दक्षिण ओमानचा एक प्रांत धोफर सांस्कृतिकदृष्ट्या आणि वांशिक दृष्ट्या ओमानी जनतेपेक्षा भिन्न होता. सुलतानाच्या धोरणांमुळे प्रजा दारिद्याने गांजलेली होती. आणि त्याचा फायदा घेऊन हे बंड पुकारण्यात आले होते.  

येमेनमध्ये तेव्हा कम्युनिस्ट विचारसरणीचे सत्ताधीश होते. त्यांचा धोफर बंडखोरांना पाठिंबा होता. ह्या सरकारने बंडखोरांना आपले केंद्र येमेनमधून चालवण्याची अनुमती दिली होती. खेरीज पैसा आणि शस्त्रास्त्रे पुरवली होती. कम्युनिस्ट सरकारने अन्य कम्युनिस्ट देशांकडून पाठिंबा मिळवून दिला होता. उदा. चीनने बंडखोरांना आपल्या भूमीवरती प्रशिक्षण दिले. शिवाय चिनी तज्ञ प्रत्यक्ष रणभूमीवरती मार्गदर्शनासाठी येत असत. उत्तर कोरियाच्या सरकारने त्यांना घातपात करण्याचे प्रशिक्षण दिले तर क्यूबा आणि सोव्हिएत युनियनने प्रशिक्षण आणि पैसा पुरवला. हे बंड मोडून काढण्यासाठी ओमानने भारताकडे मदत मागितली परंतु अरब देशामध्ये कोणत्याच गटाला दुखावण्याच्या परिस्थितीमध्ये भारत नव्हता तसेच त्याकाळात भारत रशियाकडे झुकलेला असल्यामुळेही कम्युनिस्ट विचारसरणीची झालर असल्याने त्या बंडाला इंदिराजींनी मदत पाठवली नाही. ह्या लेखमालेच्या पहिल्या भागामध्ये मी म्हटले होते की अलिप्ततावादाचे खूळ आणि रशियाच्या गटाच्या प्रवेशद्वारावरचे राजकारण ह्यामुळे ओमान भारतापासून दुरावल आणि पाकिस्तानच्या जवळ गेला. ब्रिटिश काळामध्ये मध्यपूर्वेला संरक्षण देणारा देश म्हणून जी भारताची ख्याती होती ती पाकिस्तानने हिरावून घेतली. भारतीय धोरणाचा हा सर्वात मोठा पराभव होता. अखेर अमेरिकन गटामधले इराणचे शहा, पाकिस्तान, अरब आणि ब्रिटन ह्यांनी कुबूस ह्यांना बंड चिरडण्यासाठी मदत केली. बंडाचा एक फायदा असा झाला की देशामध्ये आर्थिक आणि राजकीय सुधारणा अत्यावश्यक बनल्या आहेत ह्याची बोचरी जाणीव कुबूस ह्यांना झाली आणि ओमानमध्ये सुधारणांचे एक युग अवतरले. 

सुलतान कुबूस ह्यांचे शिक्षण ब्रिटनच्या सॅंडहर्स्ट येथे झालेले असल्याने ते पाश्चात्य संस्कृतीमध्ये रुळलेले होते. ब्रिटनने ओमानमध्ये सुधारणांसाठी एक सिव्हिल एक्शन टीम पाठवली. त्यांच्या द्वारे देशात रस्ते बांधणी - गावागावात विहिरी - दवाखाने - शाळा उभारण्याचे काम केले गेले. अशा तर्‍हेने ओमानच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. जसे सिंगापूर मलाक्का सामुद्रधुनीच्या तोंडावर बसले आहे तसेच ओमान हे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडावर बसले आहे. त्यामुळे त्याचे भौगोलिक महत्व सिंगापूरसारखेच आहे. १९७२-७६ च्या धोफर युद्धामध्ये भारतापासून दुरावलेल्या ओमानला इतके असूनही भारतच संरक्षणासाठी जवळचा का वाटावा? ह्याची दोन कारणे आहेत. १९९४ मध्ये सुलतान कुबूस ह्यांच्या विरोधात एक बंड करण्यात आले. ह्या बंडाचा झेंडा ओमानमधील १५-२०% सुन्नी नागरिकांची संघटना मुस्लिम ब्रदरहूडने उभारला होता. पण ह्या आतल्या नागरिकांना पाकिस्तानने सहाय्य पुरवले होते असे कुबूस ह्यांचे अनुमान होते. बंड मोडून काढताना जवळजवळ ३०० नागरिकांना अटक झाली. आश्चर्य म्हणजे कुबूस ह्यांनी बंड चिरडले त्यात ओमानचे अमेरिकेमधले एक माजी राजदूत, एक माजी एअर फोर्स कमांडर आणि ओमान सरकारमधले दोन तत्कालीन अंडरसेक्रेटरी ह्यांनाही अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावरती खटला चालवला गेला. मुस्लिम ब्रदरहूडने ओमानचे सरकार अगदी वरिष्ठ पातळीवरती पोखरून काढले होते असे धक्कादायक दृश्य पुढे आले. ह्या घटनेनंतर कुबूस ह्यानी पाकिस्तानवरती अवलंबून राहण्याचे टाळले. बंडखोरांवरती खटले भरले गेले व त्यांना शिक्षाही फर्मावण्यात आली होती. त्यामधल्या सामान्य नागरिकांची शिक्षा कुबूस ह्यांनी माफ केली आणि नेते तेव्हढे आत ठेवले.  ह्या घटनेनंतर संरक्षणासाठी ओमान भारताकडे वळला. तेव्हा भारताचे पंतप्रधान गैर नेहरू घराण्यातील नरसिंह राव होते. त्यांनी समयोचित मूल्यमापन करून ओमानशी नव्या दृष्टीने संबंध स्थापन करण्याचे प्रयत्न केले.


१९९४ मध्ये गल्फ कोऑर्डिनेशन कमिटीची स्थापना करण्यात आली व त्याचे कुबूस हे संस्थापक सदस्य होते. ओमानने "अरब कॉज" ह्या संकल्पनेला कधीच पाठिंबा दिला नाही आणि तसे पुकारणार्‍या शक्तींपासून ते चार हात लांब राहिले आहेत. ओमान ओपेकचा सदस्य नव्हता. कारण गटबाजी करून पेट्रोल किंमती ठरवण्याच्या तंत्राला त्यांचा पाठिंबा नव्हता. कुबूस ह्यांनी इस्राएलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत. इस्राएलचे पंतप्रधान यित्झाक राबिन आणि शिमॉन पेरेस ह्यांना ओमान भेटीचे निमंत्रण दिले व मस्कत येथे त्यांचे जोरदार स्वागतही केले होते.  राबिन ह्यांच्या मृत्यूनंतर अंतीम संस्कारांसाठी ओमानचा प्रतिनिधी पाठवण्यात आला होता. 

ओमान आणि बलुचिस्तान ह्यांच्यातील भावनिक संबंधांचा उल्लेख केल्याशिवाय ओमान प्रकरण संपवता येत नाही. ओमानमध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामधले अनेक नागरिक कामानिमित्त राहतात. ओमानी प्रजेमध्ये अनेक जण बलुच वंशाचे आहेत. आज जे ग्वादर बंदर पाकिस्तानने चीनला बहाल केले आहे तो मकरान प्रांत खरे तर ओमानच्या मालकीचा होता. ओमानने तो भारताला देऊ केला होता. पण नेहरुव्हियन परराष्ट्र धोरणामध्ये भारताचे हित कसे बसणार? त्यांनी ती ऑफर नाकारली!! पुढे १९६० मध्ये पाकिस्तानने तो पैसे देऊन खरेदी केला. तसे झाले नसते तर आज ग्वदर - चाबहार आणि दुकम तिन्ही बंदरांचा वापर भारत होरमुझच्या सामुद्रधुनीच्या संरक्षणासाठी वापरू शकला असता. ज्या सामुद्रधुनीमधून जगातील ३५% तेल अन्यत्र वाहून नेले जाते आणि चीनसकट कित्येक महासत्तांचे तेलही इथूनच बाहेर काढावे लागते त्याच्या भौगोलिक स्थानाचे महत्व शेंबड्या पोरालाही कळते पण नेहरूंना कळले नाही. मकरान हा ओमानच्याच मालकीच असल्यामुळे फार पूर्वीपासून बलुच जनता ओमानच्या सैन्यामध्ये भरती होत असे. ही परंपरा पुढेही चालू राहिली. पाकिस्तानचे पंतप्रधान लिअकत अली ह्यांनी ह्यावरती आक्षेप घेतला होता. पण त्यांना न जुमानता ओमानने बलुचींना आपले म्हणून स्वीकारले आहे. अगदी २०१४च्या नोव्हेंबरमध्येही ओमानने ४०० बलुचींना सैन्यामध्ये घेतले. आजदेखील ओमानच्या आधुनिक सैन्यामध्ये बलुचींचे प्रमाण (२५%) मोठे आहे. ओमानचा स्वतंत्र बलुचिस्तानला अगदी हार्दिक पाठिंबा का आहे हे इथे स्पष्ट होईल.

ओमानशी भरताचे सैनिकी संबंध जुने आहेत. आणि हे आजवरती काहीसे गुप्त स्वरूपाचे राहिले आहेत. ओमान हा अमेरिकन सैन्याचा मोठा तळ मानला जातो. येथे अमेरिकेने मोठ्या प्रमाणावरती दारुगोळा - शस्त्रास्त्रे आणि वायुदलाला आवश्यक असलेली मशिनरी  ठेवली आहे. LEMOA सारखे करार असलेल्या भारताला दुकम येथील बंदराचा वापर करायचा झाला तर ह्या साधनसामग्रीचा मुक्त वापर करता येईल. १९७१ च्या युद्धातही भारताने प्रथम होरमुझची सामुद्रधुनी पाकिस्तानला बंद केली आणि नंतर कराची बंदरामधले त्यांचे पेट्रोलचे साठे हल्ले करून पेटवून दिले. तसेच बंदरातील नेआणीची व्यवस्था उद्ध्वस्त केली. ह्यानंतर पेट्रोलचा पुरवठा बंद झाल्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवरती मर्यादा आल्या. आजही केवळ पाकिस्तानची नव्हे तर चीनचीही कोंडी होर्मुझमधून केली जाऊ शकते आणि त्यासाठी त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे.

अशा तर्‍हेने अलिप्ततावादाचे जोखड मानेवरून उतरवून आणि चीनचा सामना करण्यासाठी अमेरिकेचे सहकार्य प्रस्थापित केल्यामुळे आज पुन्हा एकदा मध्यपूर्वेची दारे भारतासाठी किलकिली होऊ लागली आहेत. आणि मध्यपूर्वेमध्ये पाऊल टाकायचे तर ओमान हा टेकू होऊ शकतो. ओमानची जी पार्श्वभूमी वरती दिली आहे ती ओमानशी "धोरणात्मक संबंध" स्थापन करण्यासाठी अगदी यथोचित आहे हे स्पष्ट होईल. मोदींच्या देखभालीमध्ये ते संबंध कसे आकाराला येतील हे पाहणे भारतीयांना सुखावह असेल. 

Friday 16 February 2018

मध्यपूर्वेतील भारतीय "झुंजुमंजु" Part 1

Image result for modi middle east



गेला आठवडाभर मोदी ह्यांचा मध्यपूर्व दौरा आणि त्यांनी तिथे केलेले करार ह्यावरती बरेच काही वाचनात आले. हे असे का ह्या प्रश्नाची सोपी उत्तरे शोधलेली बघितली. मोदींकडून मध्यपूर्वेला पैसा मिळणार आहे मग ते का नाही करणार त्यांचे भरघोस स्वागत असेही वाचले. पैसा फेको तमाशा देखो ह्या तत्वावरती परराष्ट्रनीती चालवणारे चालवोत पण मोदी त्यांच्यामधले नाहीत ही खात्री होती पण वाचनात आलेल्या विश्लेषणामध्ये परिस्थितीच्या मुळाला कोणी हात घातल्याचे जाणवले नाही. एखाद्या देशामध्ये आपले पंतप्रधान गेले की ती ऐतिहासिक भेटच नेहमी असते - दोन्ही देशांची मैत्री कशी गाढ आहे - किती नवे करार केले गेले आदि वर्णनांनी पत्रकारांचे आणि विश्लेषकांचे लेख भरून गेलेले दिसतात. पण ही मैत्री नेमकी कोणत्या पायावरती उभी आहे आणि नव्याने केलेल्या कराराचे फायदे काय ह्याची जुजबी माहिती तेव्हढी दिली जाते. - त्यात नवीन काय आहे हे सांगितले जात नाही. 

मध्यपूर्व म्हणजे मुस्लिम देश - शिया सुन्नी संघर्ष - वहाबी तत्वज्ञानाची भुरळ - मुस्लिम ब्रदरहूड - हिजबुल्ला - हमास - पी एल ओ आदि कट्टरपंथी / दहशतवादी संघटना - देशांचे राजे एक तर अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर नाही तर रशियाच्या गोटात - सगळे मिळून पॅलेस्टाईन लढ्याला समर्थन देणार आणि इस्राएलला विरोध करणार - पेट्रोडॉलर्सच्या पुराने आलेली अफाट संपत्ती आणि ऐश्वर्य - पेट्रोलचेच राजकारण - राजाविरोधात अधूनमधून निघणारे विरोधाचे सूर आणि त्याला अमेरिकेने म्हणावे "Arab Spring" असे मोजके संदर्भ बिंदू घेऊन मध्यपूर्वेची कल्पना मांडायचा प्रयत्न केलेला दिसतो. मग त्यात जरा जास्तीचे म्हणून अरब मानसिकता - इस्लामी दहशतवाद्यांचे तत्वज्ञान आदि खोलात जाऊन बघितलेले पदर. अशा ह्या मध्यपूर्वेशी भारताचे सूर कधी जुळणार नाहीत असे गृहित धरले जाते. 

पण जेव्हा मोदींना त्याच मध्यपूर्वेमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतोय असे दिसले तेव्हा इथल्या समीक्षकांना अवाक व्हावे लागले.  मोदींच्या परराष्ट्रधोरणाला अचानक हे यश कसे मिळाले? ज्या मध्यपूर्वेकडून आपल्याला कोणताही "धोरणात्मक" पाठिंबा अपेक्षित नव्हता तिथे असे उत्स्फूर्त स्वागत कसे व्हावे? हे कोडे सोडवणे आवश्यक आहे. अर्थातच पूर्वापार वाहत आलेल्या आणि आता आटलेल्या मध्यपूर्वेमधल्या "वाद्यांमधून" (शेकडो वर्षांपूर्वीच्या वाहत्या नदीचे आजच्या काळामधले सुकलेले पात्र) मोदींनी हा पाण्याचा महापूर आणण्याची करामत करून दाखवली. त्याचे धागे दोरे काय ते आपल्याला लागत नाहीत कारण मध्यपूर्वेचा अगदी अलिकडचा इतिहाससुद्धा आपण विसरलो आहोत. ते इतिहासकलीन धागे घेऊनच मोदी आपले जाळे पुन्हा विणत आहेत हे पाहिले तेव्हा डोळे पाणावले आणि गतवैभव पुनश्च दारी आणण्याचे त्यांचे उपकार भारतवर्ष कधी विसरू शकणार नाही ह्याची जाणीव झाली. 

एक गोष्ट आपल्यासमोर स्पष्ट हवी की हिंदी महासागरावरती आपले प्रभुत्व नसेल तर भारत कधीच महासत्ता - अगदी किमान प्रादेशिक महासत्ताही - बनू शकणार नाही. मध्यपूर्वेच्या सुरक्षिततेच्या नाड्या भौगोलिक स्थानामुळे भारताकडे आहेत आणि असायला हव्यात. ह्या हिंदी महासागराचा एक महत्वाचा हिस्सा आहे तो म्हणजे अरबी समुद्र आणि होरमुझ - आखात. हा समुद्र आपल्याला अपरिचित नाही. ओमानमध्ये भाषण करताना मोदींनी त्या जुन्या काळामधल्या लाकडी गलबतांच उल्लेख नाही का केला? भारताचे व्यापारी अगदी इस्तंबूलपर्यंत जात होते आणि भारतीय मालाच्या दर्जाला जग किंमत देत होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूव्हियन राजकारण्यांनी हे धागेदोरे पुरूनच टाकले.  ते आता मोदींना शोधून काढून आपले काम पुढे रेटावे लागत आहे. 

फार जुना काळ सोडा पण ब्रिटिशांच्या काळातला इतिहास तरी आठवतो का आपल्याला? ब्रिटिशांनी केवळ भारतीय उपखंडावरती राज्य केले असे नव्हे तर मध्यपूर्वेवरती आपले नियंत्रण ठेवले ते ह्या महासागरावरती आपला वचक ठेवून. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लंडन टाईम्सने छापले होते की "Britain's supremacy in India is unquestionably bound up with British supremacy in the Persian Gulf. If we lose control of gulf, we shall not rule long in India" - भारतावरती ब्रिटनचे आधिपत्य आहे कारण आपले आखातावरती आधिपत्य आहे. आणि आखातावरील आपले नियंत्रण हातून गेले तर भारतदेखील आपल्या ताब्यात राहू शकणार नाही. 

लक्षणीय बाब ही आहे की मध्यपूर्वेवरील आधिपत्याचे व्यवस्थापन ब्रिटन भारताच्या भूमीवरून करत होते. एकोणिसाव्या शतकामध्ये ब्रिटनने मध्यपूर्वेतील देशांशी संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध करार (protectorates and protected states ) केले होते. भारतामधल्या राज्ये संस्थाने ह्यांच्याशी ब्रिटनचे जे नाते होते तसेच नाते ह्या करारांमुळे ब्रिटन आणि आखाती देशांशी तयार करण्यात आले होते. (तैनाती फौजेच्या आसपासची कल्पना). अशा प्रकारचे करार ब्रिटिशांनी कुवेट - बाहरीन - संयुक्त अरब अमिरात (त्या काळात त्यांना ट्रूशियल स्टेटस् असे नाव होते) - कतर - झांजिबारसह ओमान - मस्कत - ब्रिटिश सोमालीलॅंड ह्या राज्यांशी केले होते आणि त्यांचे संरक्षण आणि परराष्ट्रविषयक धोरण ब्रिटन सांभाळत होते. एडन आणि त्याचा आसपासचा प्रदेश भारतीय साम्राज्याला जोडलेला होता. संपूर्ण मध्यपूर्वेचा कारभार एक पोलिटिकल रेसिडेंट बुशेर शहरातून पाहत असे. तसेच त्याचे वरिष्ठ होते भारतीय व्हाईसरॉय! ह्या राज्यांच्या कारभारामध्ये थेट लष्करी हस्तक्षेप करणे ब्रिटिशांनी टाळले होते तरी एडन मस्कत बाहरीन इथे भारतीय सैन्य तैनात करण्यात आलेले होते. अरबी समुद्रामध्ये भारतीय बोटी गस्त घालत होत्या. भारताचे मध्यपूर्वेवरती आर्थिक व्यापारी वर्चस्व होते, मुंबईचे व्यापारी मोत्यांचा व्यवसाय करत आणि तो जोरात चालत असे. मध्यपूर्वेमध्ये भारतीय रुपया हेच अधिकृत चलन होते आणि अगदी १९६० पर्यंत हीच परिस्थिती होती. जेव्हा तेलाच्या उत्खननाचा शोध लागला आणि त्या अनुषंगाने मध्यपूर्वेमध्ये त्यांचे स्वतःचे आर्थिक साम्राज्य उभे राहू लागले तोपर्यंत भारतीय मालाचेच पर्चस्व तिथे होते. पहिल्या महायुद्धामध्ये जेव्हा भारतीय सैन्याने तत्कालीन मेसोपोटेमियावरती (आजचा इराक) विजय मिळवला तेव्हा तिथे भारतीय राज्यव्यवस्था प्रस्थापित करणे हे काम अग्रक्रमाचे ठरले. तत्कालीन व्हाईसरॉयचा अंदाज होता की (इराकमध्ये) मेसोपोटेमियामध्ये सुमारे अडीचकोटी भारतीयांचे पुनर्वसन करता ये ईल. परंतु त्या प्रदेशाच्या "भारतीयीकरणाला" लंडनमधून मान्यता मिळाली नाही.  

इथेच एक गोष्ट स्पष्ट होते की ब्रिटिशकालीन भारतीय भूमीचे हे महत्व दुसर्‍या महायुद्धानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अजिबात उरले नाही. मध्यपूर्वेच्या संरक्षणामध्ये आणि परराष्ट्रधोरणामध्ये भारताचे जे स्थान होते ते आपण गमावून बसलो. आणखी झोंबरी बाब म्हणजे हे स्थान पाकिस्तानने हिरावून घेतले. एकीकडे अलिप्ततावादाचे तुणतुणे वाजवत आणि दुसरीकडे सोव्हिएत रशियाच्या गटामध्ये भारताला ढकलून नेहरुव्हियन परराष्ट्रधोरणाने भारताचे कसे नुकसान केले हे बघून उद्विग्नता येते. ह्या धोरणाच्या पाठपुराव्यामुळेच मध्यपूर्वेमधले देश भारतापासून दूर गेले आणि आपल्यामध्ये एक सामाईक व्हिजन तयार हो ऊ शकले नाही. ह्या पोकळीचा पुरेपूर फायदा पाकिस्तानने उठवला. एक मुस्लिम देश म्हणून आपली ओळख सांगत पाकिस्तानने ’सेक्यूलर" भारताला मध्यपूर्वेच्या नजरेत एक हिंदू देश म्हणत marginalize केले. त्यातही पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश बनल्यानंतर त्याचे अनन्यसाधारण महत्व मध्यपूर्वेतील देशांना वाटले नाही तर नवल. हे देश आणि पाकिस्तान अमेरिकन कह्यात असल्यामुळे त्यांच्यात एकवाक्यता होणे सोपे झाले. ह्या पार्श्वभूमीवरती खरे तर भारताची अवस्था केविलवाणी झाली म्हटले पाहिजे. कसे बसे तेल मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या तडजोडी करत तेथील संबंध राखण्याला महत्व मिळत गेले. अगदी १९९० नंतरच्या काळामध्ये म्हणजे सोव्हिएत युनियनच्या अस्तानंतरही (Post Cold War) भारताने बदलत्या परिस्थितीमध्ये आपला ठसा पुनश्च उठवण्याचा प्रयत्न केला नाही. 

तेव्हा हाती असलेल्या मूठभर सामग्रीनिशी मोदींनी ह्या परिस्थितीशी कसा सामना केला आणि आज बाजी पलटवली त्याची कहाणी पुढच्या भागामध्ये पाहू. 

Thursday 15 February 2018

एका ई-मेल ची करामत

Inline images 2

नोव्हेंबर २०१६ च्या निवडणुकीत अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून श्रीमती हिलरी क्लिंटन ह्यांचा पराभव करून डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी निर्णायक विजय मिळवला त्यादिवसापासून डेमोक्रॅट पक्षाचे हितचिंतक तीन वर्षे संपायच्या आत ट्रम्प ह्यांना महाभियोग खटला चालवून अध्यक्षपदावरून हटवण्यात येईल अशा वल्गना करत होते. अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी एका परराष्ट्राची - रशियाची मदत घेतली आणि अमेरिकन हिताच्या विरोधात निर्णय घेण्याचे मान्य करून रशियाशी गुप्त साटेलोटे केले असे आरोप करण्यात येत होते. माझा एफबीआय वरही विश्वास नाही आणि सीआयएवरही नाही असे स्फोटक विधान ट्रम्प ह्यांनी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावरती केले होते.  इतकेच नव्हे तर ट्रम्प ह्यांनी सीआयएकडून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अध्यक्षांना जे रोज सकाळी ब्रिफींग दिले जाते तेही घेण्यास सुरुवातीला नकार दिला होता.  ट्रम्प ह्यांनी रशियाशी जे अनुचित संधान बांधले त्यामागे त्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत की काय याचीही उघड चौकशी एफबीआय ही तपाससंस्था तसेच सीआयए ही गुप्तचर संस्था करू लागली. ह्यामध्ये अनेक अश्लाघ्य आरोप केले गेले. एका विद्यमान अध्यक्षाची अशा प्रकारे जाहीर चौकशी करण्यामागचे तारतम्य अमेरिकेसारखा देश विसरून गेल्याचे विदारक दृश्य बघायला मिळत होते. 

जसजसा चौकशीला वेग येत गेला तसतसे ट्रम्प ह्यांच्या साथीदारांना राजीनामा देऊन बाहेर पडावे लागले असे चित्र होते. इतकेच नव्हे तर ह्या सगळ्या गदारोळामध्ये एक ना एक दिवस ट्रम्प ह्यांनाही एक तर राजीनामा देणे भाग पडेल अन्यथा महाभियोग खटल्याला सामोरे जावे लागेल असे वातावरण निर्माण केले जात होते. पण ट्रम्प शांत होते. त्यांनी आपल्या धोरणाची दिशा अजिबात बदलली नाही. ह्यामुळे डेमोक्रॅट्स अधिकाधिक चिरडीला येऊन प्रचार करण्यात मग्न होते. ट्रम्प ह्यांनी केवळ डेमोक्रॅट्सना शिंगावर घेतले होते असे नाही तर रिपब्लिकन पक्षातील काही असामीही त्यांच्या विरोधात आहेत व त्यांना अडचणीत आणायचे उद्योग करत असतात. अमेरिकेमध्ये पक्षाला आदेश काढून अमुक प्रकारे मतदान करा असे सांगता येत नाही. प्रत्येक निर्वाचित सदस्य आपले मत कोणाला असावे हे ठरवू शकतो. त्यामुळे महाभियोग खटला झालाच तर रिपब्लिकन प्रतिनिधी आहे म्हणून त्याने ट्रम्प ह्यांनाच मत दिले असते असे नाही. अशातच अमेरिकेमधली प्रतिष्ठित वर्तमानपत्रे आणि माध्यमेही ट्रम्प ह्यांच्या विरोधात जोरदार प्रचार करत आहेत. आणि कोणत्याही लहानसहान मुद्द्यावरून अध्यक्षाला घालून पडून बोलणे आणि त्याला निरुत्साही करण्याचे काम करत आहेत. अशा विरोधाच्या परिस्थितीमध्येही डोके शांत ठेवून किंबहुना अधिक उत्साहाने ट्रम्प काम करताना दिसतात. कारण आपल्याला काय साध्य करायचे आहे ह्यावर त्यांची श्रद्धा असावी. शपथ घेतानाच "मी तुम्हा सामान्य अमेरिकनांना आणि तुमच्या हिताला कधीच अंतर देणार नाही" असे आश्वासन त्यांनी दिले होते.

तर एफबीआय असो की सीआयए ह्यांच्याकडून होणाऱ्या चौकशीमध्ये ट्रम्प ह्यांचे मोजके साथीदार हिलरींना मदत करणाऱ्या गटाला आणि अधिकाऱ्यांना उघडे पाडण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. हा लेख लिहिण्याचे निमित्त आहे श्रीमती सुझान राईस ह्यांनी पाठवलेली एक ई-मेल. श्रीमती सुझान राईस ह्या एक महत्वाकांक्षी अमेरिकन सुशिक्षित उच्चाधिकारी आहेत. अमेरिकन सरकारमध्ये त्यांनी मानाची पदे भूषवली आहेत. ब्रुकिंग्स इन्स्टिटयूट ह्या अतिप्रतिष्ठित अमेरिकन थिंकटॅंकच्या त्या फेलो होत्या. बिल क्लिंटन ह्यांच्या काळामध्ये आफ्रिकन देशांच्या असिस्टंट  स्टेट  सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पहिले होते. त्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ऑफिसमध्येही उच्च पदावरती होत्या. ह्यानंतर पुन्हा एकदा डेमोक्रॅट अध्यक्ष ओबामा ह्यांच्या कारकीर्दीत त्यांना युनो येथे अमेरिकेच्या अम्बॅसेडर  म्हणून काम करण्याची संधी मिळाली. खरे तर २०१२ मध्ये हिलरी क्लिंटन स्टेट सेक्रेटरी पदावरून खाली उतरल्यानंतर श्रीमती राईस यांचे नाव त्या पदासाठी घेतले जात होते. पण त्याच दिवसामध्ये लिबियाच्या बेन गाझी शहरामध्ये अमेरिकन अँब्ससडर दहशतवाद्यांच्या हाती लागून निर्घृणपणे मारले गेले. त्या विवाद्य प्रकाराची झळ आपल्याला बसून आपल्या नावाला विरोध होईल हे जाणून त्यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही. तेव्हा कोणत्याही टीकेपासून दर राहून काम करण्याची संधी देणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पद ओबामा ह्यांनी त्यांना देऊ केले व त्यांनी ते स्वीकारले देखील.   इतकी महत्वाची आणि जबाबदारीची पदे भूषवणाऱ्या सुझान राइस आज प्रकाशझोतामध्ये आल्या आहेत त्याचे कारण अगदीच वेगळे आहे. 

खुद्द रिपब्लिकन पक्षांचाही संपूर्ण पाठिंबा नसताना ट्रम्प निवडणूक जिंकले त्यामुळे डेमोक्रॅट्सची चरफड झाली आहे. हिलरी क्लिंटन सत्तेवर आल्या असत्या तर डेमोक्रॅट्सची घडी तशीच्यातशी चालू राहिली असती. त्यांच्या सत्तेमध्ये असण्यामागे ज्या लोकांचे हितसंबंध गुंतले आहेत त्यांना एक गोष्ट माहिती आहे की ट्रम्प सत्तेमध्ये राहिले तर ते आपले "साम्राज्य" उद्ध्वस्त करतील. जसे नरेंद्र मोदी आपले साम्राज्य धुळीस मिळवतील ह्याची युपीएला खात्री आहे तशीच अवस्था अमेरिकेत डेमोक्रॅट्सची आहे. खरे तर डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन दोन्ही पक्षाचे फायदे उकळण्याबाबत साटेलोटेच आहे. तेव्हा सर्वच मंडळी ट्रम्प ह्यांच्यावरती उखडलेली असतात. 

ट्रम्प ह्यांच्या रशियाशी असलेल्या साटेलोट्याच्या आरोपाची चौकशी करणारे एफबीआय प्रमुख म्हणजे जेम्स कोमी. जेम्स कोमी हे रिपब्लिकन आहेत पण त्यांची ह्या पदावरती नेमणूक डेमोक्रॅट ओबामा ह्यांनी केली होती. ट्रम्प ह्यांच्या निवडणुकीनंतर बेनगाझी प्रकरणाची राळ उडू लागली. तेथील अमेरिकन अम्बॅसेडर ख्रिस्टोफर स्टिव्हन्स ह्यांना वारंवार मदत मागूनही दिली गेली नव्हती. अन्सार अल शरिया  ह्या दहशतवादी गटाने त्यांना आणि अन्य अमेरिकन अधिकाऱ्यांना ठार मारले.  ही भीषण बातमी जेव्हा आली तेव्हा अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम जोरात वाजत होते. सत्य काय आहे ते बाहेर आले तर ओबामा ह्यांना दुसरी राजवट मिळणे अशक्य झाले असते म्हणून हिलरी क्लिंटन तसेच अन्य अधिकाऱ्यांनी खोटी माहिती देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. 

ह्या प्रकरणात हिलरी ह्यांनी सरकारी सर्वर वरून ई-मेल न पाठवता खाजगी सर्वर वरून काही गुप्त ई-मेल पाठवल्या. व काय ई-मेल पाठवल्या ते हजर करा म्हटल्यावर आपल्याकडे त्याची कॉपी नाही म्हणून हातही वर केले. इतकेच नव्हे तर त्यांचे म्हणणे योग्य आहे असे प्रतिपादन करत ओबामा ह्यांनीही त्यांचीच तळी उचलून धरली. तेव्हा हिलरी ह्यांनी काय ई-मेल पाठवल्या ते गुलदस्तात राहिले होते. 

ट्रम्प ह्यांच्या विजयानंतर असे लक्षात आले की त्यांच्या खाजगी सर्वरवरील सेटअपमुळे त्यांनी पाठवलेली प्रत्येक ई-मेल अन्यत्र सेव केली जात होती. आणि अशा तऱ्हेने ह्या ई-मेल प्रकाशात आल्या.  ह्या प्रकरणामध्ये तपासाचे काम करणारे जेम्स कोमी अडचणीत आले. ९ मे २०१७ रोजी ट्रम्प ह्यांनी त्यांना पदावरून काढून टाकले. रशियन तपासामध्ये ट्रम्प ह्यांची चौकशी करतात म्हणून कोमी ह्यांना काढून टाकल्याचा प्रचार करण्यात आला. खरे तर ई-मेल प्रकरणात हिलरी ह्यांच्यावर प्रकरण शेकणार नाही अशा प्रकारे तपासात दडपशाही करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबला होता. पदावरून हटवले तर गप्प राहण्याचे सोडून कोमी ह्याची १६ मे रोजी एक निवेदन जाहीर केले. सत्तारूढ झाल्यानंतर फेब्रुवारी १४ रोजी मी ट्रम्प ह्यांना एकटा भेटलो असता ट्रम्प ह्यांनी रशियाशी असलेल्या आपल्या संबंधांची व मायकेल फ्लीन ह्यांची चौकशी थांबवा अशी मला आज्ञा केली होती अशा अर्थाचा एक मेमो कोमी ह्यांनी कागदपत्रात ठेवला होता. हा मेमो त्यांनी प्रसिद्धीस दिला. ह्यामुळे रशियन चौकशीमुळे ट्रम्प अडचणीत येत असून तेच एफबीआय प्रमुखावरती दडपण आणत होते की काय असा संशय निर्माण झाला. कोमी ह्यांनी पुढे काँग्रेशनल साक्षीमध्ये आपले आरोप पुनश्च उद्धृत केल्यानंतर रशियन चौकशीमध्येच ह्याही दडपशाहीचे चौकशी करण्यासाठी त्याची कक्षा वाढवण्यात आली. हे काम माजी सीआयए प्रमुख रॉबर्ट म्युलर ह्यांच्याकडे देण्यात आले होते. 

ह्या सर्व "इतिहासाला" उजाळा मिळण्याचे कारण आहे सुझान राईस ह्यांची नुकतीच प्रकाशात आलेली एक ई-मेल. २० जानेवारी २०१७ रोजी ११ वाजून ४७ मिनिटांनी ट्रम्प ह्यांनी अध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यानंतर व्हाईट हाऊस मधील आपले पद -  कारकीर्द आणि ऑफिस सोडताना १२ वाजून १५ मिनिटांनी राईस ह्यांनी एक ई-मेल सरकारी सर्वरवरून पाठवली. आश्चर्य म्हणजे ही ई-मेल त्यांनी स्वतःलाच म्हणजे स्वतःच्याच आयडीला पाठवली होती. तिचे दुसरे कोणीही रेसिपियन्ट नव्हते. अर्थात तांत्रिक दृष्ट्या ही ई-मेल म्हणजे एक गुप्त रेकॉर्ड होता. ह्याची प्रत राईस वगळता कोणाकडेच नव्हती. समजा राईस ह्यांनी त्या ई-मेल मध्ये जे लिहिले त्या मजकुराचा एक मेमो बनवला असता तर त्यांच्यामागून जी व्यक्ती त्या पदावरती आली असती त्याच्या हाती तो मेमो जाऊ शकला असता. म्हणजेच अशा प्रकारे कोणाच्या हाती हा मजकूर जाऊ नये पण सरकार दप्तरी रेकॉर्ड मात्र तयार व्हावा अशा पद्धतीने ही ई-मेल पाठवली होती हे उघड आहे.

राईस ह्यांनी ह्या ई-मेल मध्ये काय लिहिले होते? ५ जानेवारी २०१७ रोजी म्हणजे अध्यक्षपदाची कारकीर्द संपण्याला अवघे दोन आठवडे उरले असता अध्यक्ष ओबामा ह्यांच्याकडे एक बैठक झाली. त्यामध्ये एफबीआय प्रमुख जेम्स कोमी - ऍटर्नी जनरल सॅली येट्स - उपाध्यक्ष जो बिडेन आणि सुझान राईस इतके जण उपस्थित होते. ह्या बैठकीमध्ये अध्यक्ष ओबामा ह्यांनी रशिया-चौकशी नियमानुसार केली गेली पाहिजे असे ठासून सांगितले. ह्यामध्ये कोणताही बदल पुढच्या दोन आठवड्यात जाहला तर ते माझ्या निर्दशनास आणावे असे त्यांनी कोमी ह्यांना स्पष्टपणे बजावले असे सुझान राईस ह्यांनी ई-मेल मध्ये नमूद केले आहे. ५ जानेवारी रोजी अशी बैठक ओबामा ह्यांनी घेतली ह्याचे कारण दुसऱ्याच दिवशी जेम्स कोमी ह्यांना नवनिर्वाचित अध्यक्षांना भेटायचे आहे हे त्यांच्या मनात असावे. 

राईस ह्यांनी अशा प्रकारे ५ जानेवारी रोजी घडलेल्या बैठकीचा वृत्तांत २० जानेवारी रोजी आपले पद सोडता सोडता अखेरच्या क्षणी रेकॉर्ड करून ठेवला असल्याचे अर्थातच जेम्स कोमी ह्यांना माहिती असणे शक्यच नव्हते कारण त्या ई-मेल चा रेसिपियन्ट स्वतः राईस बाईसाहेबच होत्या. असे असल्यामुळेच कदाचित जेम्स कोमी ह्यांनी काँग्रेससमोर चौकशी दरम्यान असे दडपून सांगितले होते की, "६ जानेवारी रोजी प्रथम नवीन अध्यक्ष ट्रम्प ह्यांना गुप्तचर विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांसोबत भेटलो. आणि रशियाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाबाबत आमच्या कडे जी माहिती होती ती त्यांना सांगितली. बैठकी अखेर अन्य अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगून मी एकटाच ट्रम्प ह्यांच्याकडे बोलण्यासाठी थांबलो. ह्या अवधीत काही खाजगी स्वरूपाची आणि ट्रम्प ह्यांच्याशी संबंधित जी माहिती ब्युरोला मिळाली होती ती मी त्यांच्या कानावर घातली." कोमी ह्यांनी काँग्रेस समोर अशी साक्ष दिली होती की "अध्यक्ष बदलले तरी मी मात्र त्याच जागेवर होतो आणि ही माहिती संवेदनशील होती त्यामुळे आमच्याकडील माहिती यौनसंबंधांविषयीची स्फोटक असूनही आणि ती तपासणी करून खरी असल्याची खात्री करून घेतलेली नसली तरी तिच्या स्वरूपामुळे मी वैयक्तिकरीत्या स्वतः ती नव्या अध्यक्षांच्या कानी घालावी असे राष्ट्रीय इंटेलिजन्स प्रमुखांचे म्हणणे होते." 

राईस ह्यांच्या ई-मेल मुळे कोमी ह्यांच्या साक्षीला भगदाडे पडली आहेत. एकूणच ही चौकशी दुष्ट हेतूने प्रेरित होऊन केली गेल्याचे आता जनतेसमोर येण्याची शक्यता आहे. खास म्हणजे ह्या चौकशीमध्ये मावळत्या अध्यक्षाने इतका रस का घ्यावा हा यक्ष प्रश्न नाही का? 

वास्तव असे आहे की आता ओबामा ह्यांच्या जन्मस्थानावरचा वाद पुन्हा एकदा जिवंत होत आहे तसेच हिलरी ह्यांची कारस्थानेही उघडकीला येण्याच्या अवस्थेत आहेत. त्या स्टेट सेक्रेटरी असताना अमेरिकेचे २०% युरेनियम रशियाला देण्याचा करार का केला गेला असा सवाल असून प्रत्यक्षात ट्रम्प ह्यांचे नव्हे तर डेमोक्रॅट्सचेच रशियाशी घनिष्ट संबंध तर नव्हते ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ट्रम्प ह्यांच्या एकंदर वादळी राजवटीत अशा प्रकरणांची भरच पडत जाणार आहे. ट्रम्प ह्यांना ज्या प्रकारचा विरोध होत आहे त्याच प्रकारचा विरोध मोदी ह्यांनाही सहन करावा लागत असून इथे देखील अशीच काही प्रकरणे तर दडलेली नाहीत ना आणि निवडणुकीच्या तोंडावरती ती बाहेर तर पडणार नाहीत ना असे प्रश्न मनात जरूर आल्याशिवाय राहत नाहीत. 



Wednesday 14 February 2018

हेरांची अदलाबदल - प्यूसेवरील पुलावरती


१० फेब्रुवारी रोजी रशिया आणि इस्टोनिया ह्यांनी आपापल्या हेरांची "अदलाबदल" केली असे वृत्त होते त्याचे तपशील काय आहेत म्हणून काही जण विचारत होते. पुतीन ह्यांच्या राजवटीमध्ये रशियाने पुन्हा एकदा आपल्या सोविएत काळामधले महत्वाचे स्थान मिळवण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. ज्याला आपण पूर्व यूरोपातील देश म्हणतो ते फुटून निघालेल्या देशांमुळे रशियाची ताकद खच्ची झाली. आज त्यामधले बहुतेक सर्व देश नेटो ह्या अमेरिकाप्रणित संरक्षण आघाडीचे सभासद झाले आहेत. आणि त्यांच्या संरक्षणासाठी आता खुद्द अमेरिका पुढाकार घेऊ शकते अशी परिस्थिती आहे. युक्रेनमधील संघर्षाची तुम्हाला कल्पना आहेच. ज्याला जगाचे गव्हाचे कोठार म्हटले जाई तो युक्रेन आपल्या हातून गेल्याची रशियाची चुटपुट कशी असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. युक्रेनमध्ये पुतीनना व रशियाला रस तर आहेच पण युक्रेनचा एक प्रांत क्रिमिया ह्यामध्ये रशियाने अधिक रस दाखवला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाने क्रिमियामधल्या मुस्लिम प्रजेला सरसकट पुनर्वसनाच्या नावे अन्य ठिकाणी हलवले होते. व त्यांच्या जागी रीतसर रशियन प्रजा आणून वसवली होती. असा क्रिमिया आपल्याच अधिपत्याखाली असला पाहिजे असा पुतीन ह्यांचा आग्रह होता. आणि साहजिकच तेथे नेऊन वसवलेली रशियन प्रजाही त्याच मताची होती. त्यानुसार वेळ साधून रशियाने क्रिमियामध्ये रणगाडे नेऊन उभे केले व युक्रेनची तेथील सद्दी संपुष्टात आणली. काळ्या समुद्राच्या तटावरील क्रिमियाचे भूराजकीय महत्व काय ते केवळ नकाशामधले त्याचे स्थान पाहूनच आपल्याला समजते. तर अशा कडव्या संघर्षाच्या वातावरणामध्ये रशियन हेर पूर्व युरोपातील देशामध्ये आता सर्रास फिरत हेरगिरी करून महत्वाची माहिती मायदेशी पाठवत असतात. 

१० फेब्रुवारी रोजी हेरांची अदलाबदल झाली असे म्हटले गेले तरी इस्टोनियाचे म्हणणे असे आहे की रशियाने त्यांच्या एका निरपराध सामान्य नागरिकाला धूर्तपणे अटक केली आणि त्याच्यावरती बादरायण संबंधही नसलेले हेरगिरीच्या आरोप करून ते त्यांच्या कोर्टात सिद्ध करून घेतले. दोन्ही देशांच्या सीमा लागून असल्याने अनेक इस्टोनियन नागरिक रशियामध्ये आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने जात असतात. रायावो सुसाय हा असाच एक सामान्य इस्टोनियन नागरिक रशियामध्ये कामानिमित्त गेला होता. ही काही त्याची रशियामधली पहिली फेरी नव्हती. अशा प्रकारे तो गेली दहा वर्षे आपला व्यवसाय करत होता. फेब्रीवरी २०१६ मध्ये मॉस्कोच्या  विमानतळावरील ट्रान्सीट एरियामध्ये तो ताजिकिस्तानाला जाण्यासाठी आपल्या विमानाची वाट पाहत थांबला होता. तिथे त्याला रशियन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याच्यावरील हेरगिरीच्या आरोप सिद्ध करून घेऊन त्याला १२ वर्षांची शिक्षा ठोठावून घेतली. 

सुसायच्या उदाहरणामुळे अनेक इस्टोनियन व्यावसायिकांनी रशियामध्ये धंद्यासाठी जाण्याचा धसका घेतला आहे. केवळ रशियाच नव्हे तर बेलारूस व कझाकस्तानाला जाण्याची पण आम्हाला भीती वाटते असे हे व्यावसायिक म्हणू लागले आहेत. इस्टोनियामध्ये जे काही रशियन हेर आहेत त्यांच्यापैकी कोणालाही अटक झाली तर रशिया आमच्या निरपराध माणसाला ताब्यात घेऊन त्याच्यावरती हेरागिरीचा खोटा आरोप करते आणि त्याला अटकेत टाकते असे इस्टोनिया म्हणते. मग सोळभोकपणे आपल्या खऱ्या हेराबरोबर त्याची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव टाकते असे दिसत आहे. रायावो सुसायची खरी कहाणी कधी बाहेर येईल ती येवो. पण त्याची अदलाबदली ज्यांच्यासोबत झाली त्या आर्टेम झिंचेन्कोची कहाणी तरी काय आहे? 

आर्टेम झिंचेन्कोचे पणजोबा ग्रेगरी गुटनीकोव दुसऱ्या महायुद्धामध्ये सोविएत फौजेच्या काउंटर इंटेलिजन्स युनिट  Smersh मध्ये काम करत होते. वडील इगोरदेखील फौजेत होते. आजोबा अल्बर्ट सिद्ध फौजेतच होते. पण आर्टेम वरती पणजोबांचा प्रभाव जास्त होता. आपल्या पणजोबांच्या शौर्याच्या कथांनी लहानपणापासून आर्टेम भारून गेला होता. गुटनिकोव्ह पहिल्यांदा फौजेमध्ये ट्रक ड्राइवर म्हणून काम करत. नंतर त्यांना काउंटर इंटेलिजन्स युनिटमध्ये घेतले तेव्हा त्यांचे काम शत्रूचे हेर ओळखून त्यांना पकडण्याचे होते. अशी माणसे वरकरणी पोलीस म्हणून काम करत. पण प्रत्यक्षात त्यांचे रिपोर्टींग हेरगिरीच्या युनिटकडे असायचे. ग्रेगोरी ह्यांना स्टालिनग्राडच्या संरक्षणासाठी ऑर्डर ऑफ रेड स्टार हा किताब मिळाला - नंतर बर्लिनवरील विजयात एक पदक मिळाले आणि तिसरे पदक मिळाले ते दुसरे महायुद्ध (ज्याला रशिया ग्रेट पॅट्रिऑटिक वॉर म्हणते) जिंकले म्हणून. 

दुसऱ्या महायुद्धाच्या अंतानंतर ग्रेगरी ह्यांच्या युनिटमधील अनेकांच्या कथांवरती रशियामध्ये चित्रपट काढले गेले. जर्मन हेरांपेक्षा ते कसे चतुर आणि चाणाक्ष होते हे बिंबवणारे सिनेमे काढले जात असत. आणि त्यांना एखाद्या हिरोचा सन्मान जनता देत असे. आता सोविएत रशियाच्या विघटनानंतर ही लाट पुन्हा उसळलेली दिसते. युनिटच्या शौर्याच्या कथांवरती पुन्हा नव्याने कलाकृती निर्माण होऊ लागल्या आहेत. 

आर्टेमचे आजोबा अल्बर्ट ह्यांची १९६६ मध्ये प्रथम इस्टोनियामध्ये नेमणूक झाली. १९६७ मध्ये Talinn शहरामध्ये घर मिळाल्यानंतर त्याचे कुटुंब तिथे राहायला आले. अल्बर्टच्या बदल्या ह्यानंतर व्हिएतनाम व पूर्व जर्मनीमध्ये झाल्या तरी कुटुंब मात्र एकाच जागी स्थिरावले. १९९१ मध्ये रशियाचे विघटन झाले तेव्हा अल्बर्ट लेफ्टनंट कर्नल म्हणून सेवानिवृत्त झाले होते. अल्बर्टसारखे आणखी जवळजवळ १५००० रशियन सैनिक इस्टोनियामध्ये होते. इस्टोनियायन सरकारने त्यांना तेथील नागरिकत्व हवे असेल तर अर्ज करण्याची मुभा दिली. ती संधी साधून अल्बर्ट ह्यांनी इस्टोनियाचे नागरिकत्व स्वीकारले. अल्बर्टसारखेच अन्य कित्येक सैनिक अन्य पूर्व युरोपच्या देशांमध्ये राहत होते आणि आता त्यांनी नव्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. ही सर्व माणसे आज रशियाची हेरगिरी करू शकतात का ह्याचे मूल्यमापन करून वापरली जातात. आर्टेमचे वडील इगोर देखील रशियन लष्करात होते. ते रशियामध्येच राहिले. आणि २००६ मध्ये सैन्यामधून त्यांच्या टॅंक निर्मिती कारखान्याचे प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले होते. आर्टेम आपल्या वडिलांसोबत रशियामध्ये राहेत होता. पण उन्हाळ्याच्या सुटीमध्ये तो आजोबाना भेटायला इस्टोनियामध्ये जात असे. त्याला रशिया आवडत नसे - तो इस्टोनियामध्ये रमत होता असे आजोबांचे शेजारी सांगतात. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्याला रशियाने हेर म्हणून काम करण्याची संधी दिली. 

तेव्हा २००९ मध्ये जेव्हा रशियाने विचारले तेव्हा साहजिकच ह्या कामासाठी त्याची मनोभूमी तयारच होती. हेर बनवण्यासाठी योग्य माणूस कोणता हे हेरण्याची ही पद्धत किती परिणामकारक आहे बघा. गेल्या नऊ वर्षांमध्ये इस्टोनियाने पकडलेला आणि ज्याच्यावर हेरगिरीचा गुन्हा सिद्ध झाला आहे असा रशियाचा झिंचेन्को हा दहावा हेर आहे. झिंचेन्कोची निवड त्याचे पणजोबा रशियन फौजेत होते ह्या कसोटीवर तर झालीच पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे त्याच्या कुटुंबाचे लागेबांधे पूर्वकालीन सोविएत छत्राखालील देश  इस्टोनियाशी राहिले म्हणून झाली असावी. 

आर्टेमने रशियाचा हेर म्हणून काम करण्याचे मान्य केल्यावरती आपल्या आजोबांशी नाते सांगत इस्टोनियामध्ये कायम वास्तव्यासाठी अर्ज केला. तसेच तिथे एक कंपनी सुरु केली. व्यवसायात त्याने एक भागीदार घेतला होता. लहान मुलांच्या ढकल गाड्या आणि तत्सम वस्तू विकण्याचा हा धंदा नावापुरता नव्हता. तो खरोखरच हा धंदा करत होता. आणि त्यानिमित्ताने रशिया इस्टोनिया अशा फेऱ्या मारत होता. धंद्याचे कव्हर वापरून त्याचे हेरगिरीचे  उद्योग बिनबोभाट चालू होते. इस्टोनियामधून तो खास करून सैन्याविषयक आणि देशाच्या infrastructure बद्दलची माहिती गोळा करत होता. सैन्य कोणती सामग्री वापरते आणि त्यांच्या तुकड्यांच्या हालचाली ह्या विषयाची माहिती रशियाला त्याच्याकडून मिळत होती. आर्टेम पकडला गेला तेव्हा त्याच्याकडून एक लॅपटॉप - चार मोबाइल फोन - एक हार्ड ड्राईव्ह आणि एक पॅड एवढ्या वस्तू जप्त केल्या गेल्या होत्या. आर्टेम केवळ इस्टोनियामध्ये रशियाची हेरगिरी करत नव्हता. पण अन्य कोणत्या देशात त्याच्या वाऱ्या होत होत्या हे अजून गुलदस्तात आहे. किंबहुना आर्टेम विषयातील बरीचशी माहिती अजूनही गुप्त ठेवण्यात आली असल्यामुळे त्याच्याभोवती एक रहस्यमय वलय तसेच राहिले आहे. 

रायव्हो सुसाय आणि आर्टेम झिंचेन्को आज आपापल्या घरी परतले आहेत पण इस्टोनिया आणि रशिया ह्यांच्यामधला हा सिलसिला न संपणारा आहे. इस्टोनियायच्या संरक्षणासाठी ब्रिटन ने दोन दिवसापूर्वीच रणगाडे पाठवले आहेत. त्यावरून दोन्ही देशांमधल्या संघर्षमय वातावरणाची आपल्याला कल्पना येऊ शकते. ही कथा वाचून आपणाला कुलभूषण जाधव ह्यांची केस न आठवली तरच नवल. खरे सांगायचे तर पाकिस्तान जेव्हढे आकांडतांडव करत आहे आणि बलुचिस्तानमध्ये भारत दहशतवादी कारवाया घडवून आणते हा आरोप सिद्ध करण्यासाठी ज्या कोलांट्या उड्या मारत आहे त्यावरूनच हे सिद्ध होते की कुलभूषण केसचा वापर आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताला बदनाम करण्यासाठी चालला आहे. कुलभूषण हा खराखुरा हेर असता तर अळीमिळी गुपचिळी न्यायाने त्याची केस गुप्त राखून पाकिस्तानने अनेक फायदे उकळण्याची संधी अजिबात सोडली नसती. आणि असे आहे म्हणूनच भारताने सुरुवातीपासूनच कुलभूषण हा भारतीय आहे आणि तो नौदलात काम करत होता व तेथून सेवानिवृत्ती पत्करून स्वतःचा व्यवसाय करत होता हे उघडपणे मान्य केले.  कुलभूषणच्या बाबतीतही पुढे काय घडते ह्याकडे सगळ्या देशाचे डोळे लागले आहेत.

निर्दय राजकारणाचे हे हेर प्यादे होऊन जातात असेच सांगणाऱ्या अनेक कथा वाचायला मिळतात. असे असले तरी हेरगिरीच्या रहस्यमय जगामधल्या अशा कथा आपल्या थरारून सोडतात आणि ह्या अज्ञात जगविषयीचे आकर्षण ताजे ठेवत असतात.



Saturday 10 February 2018

मालदीवची चिंता



हिंदी महासागराच्या मध्यावरती आणि भारताच्या छायेमध्ये असलेल्या मालदीव बेटामधून गेल्या काही दिवसातील येणार्‍या बातम्या सर्वांची चिंता वाढवणार्‍या आहेत. एक अभूतपूर्व न्यायालयीन आदेश - आडमुठा लबाड निर्दय आणि भारतविरोधी हुकुमशहा आणि चिडलेली जनता असे एक खळबळजनक रसायन मालदीवमध्ये विस्तवाच्या जवळ आहे. ३० जानेवारी रोजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन ह्यांनी स्वतःच जाहीर केले होते की "मालदीवमधील पोलिस यंत्रणा स्वतंत्र असून राजकीय प्रवाह वा विचारसरणीच्या प्रभावाखाली न येता कायदा आणि सुव्यवस्था पाहण्याचे काम ती करेल. न्यायालयाचे आदेश पोलिस यंत्रणेने पाळले पाहिजेत - त्यावर कारवाई केली पाहिजेच. आणि त्यांनी तसे केले नाही तर त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे हे अध्यक्षाचे घटनात्मक काम आहे." दैवगती अशी होती की हे जाहीर केल्यानंतर दोन दिवस उलटत नाहीत तोवर त्यांना आपले शब्द गिळावे लागले आणि आपण सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळू असे जाहीर विधान करणार्‍या पोलिस कमिशनरलाच डच्चू देण्याची पाळी त्यांच्यावरती आली. 

ही नाट्यपूर्ण घटना घडायचे निमित्त होते १ फेब्रुवारी रोजी मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक अभूतपूर्व निर्णय! माजी अध्यक्ष मोहमद नाशीद - जम्हूरी पार्टीचे नेते कासिम इब्राहिम आणि अदालत पार्टीचे नेते शेख इम्रान अब्दुल्ला ह्या दीर्घ मुदतीची शिक्षा भोगणार्‍या "गुन्हेगारांना" सोडून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आणि मालदीवचे राजकारण फिरले. त्यांच्या जोडीनेच माजी संरक्षण मंत्री - विद्यमान खासदार आणि माजी अध्यक्ष गयूम ममून ह्यांचे सुपुत्र मोहमद नज़ीम - माजी प्रॉसिक्यूटर जनरल मुहताज मुहसिन - चीफ मॅजिस्ट्रेट अहमद निहान आणि हामिद इस्माइल ह्या सर्वांना देखील न्यायालयाने मुक्त केले. राजकीय हेतूने प्रेरित असे हे खटले असून त्यामध्ये प्रॉसिक्यूटर आणि कनिष्ठ न्यायाधीशांवरती अवैध दबाव आणला गेला असल्यामुळे खटले "रिटायर" करत आहोत असे निर्णयामध्ये म्हटले आहे. पुढे सत्ताधारी पक्षाच्या ज्या १२ खासदारांनी विरोधी पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यांना अपात्र ठरवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णयही न्यायालयाने फिरवला. ह्या १२ पैकी तीन खासदारांवरती परवानगीशिवाय संसदेमध्ये घुसण्याबद्दल गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या आज्ञांचे पालन सरकारी यंत्रणेने आणि प्रॉसिक्यूटर जनरल ह्यांनी करावे असेही न्यायालयाने आदेशामध्ये म्हटले होते. आदेशाची अंमलबजावणी करण्याची तयारी करण्या ऐवजी प्रॉसिक्यूटर जनरल - गृहमंत्री - संरक्षण मंत्री - संरक्षण प्रमुख यांनी रात्री उशिरा वार्ताहर परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे की नाही ह्याची छाननी करून निर्णय कायदेशीर आहे की नाही हे ठरवून मग त्यावर कारवाई केली जाईल असे जाहीर केले. 

मुळात अशी वार्ताहर परिषद घेणेच बेकायदेशीर होते. वार्ताहर परिषदेमध्येच न्यायालयाचे पालन करू असे म्हणणार्‍या पोलिस प्रमुखाला बडतर्फ केल्याची घोषणा करण्यात आली.  त्यांच्या जागी त्यांचेच दुय्यम अधिकारी अहमद ह्यांची नियुक्ती झाली पण दोन दिवसात त्यांनाही बडतर्फ करण्यात आले आणि त्याबद्दल काहीही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. न्यायालयीन आदेशानुसार नेत्यांची सुटका न झाल्यामुळे चिडलेली जनता रस्त्यावरती आली. त्यांच्यावर अश्रुधूर सोडण्यात आला - कित्येकांची धरपकड करण्यात आली. त्याअचा काहीही परिणाम अध्यक्षांवर झाला नाही. त्यांनी पंधरा दिवसांसाठी आणिबाणी जाहीर केली आणि घटनेमधील काही कलमे रद्दबातल ठरवली आहेत. ह्यामुळे यामीन ह्यांच्या हाती अमर्याद अधिकार आले आहेत. आणिबाणी जाहीर केल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी न्यायालयाच्या हद्दीमध्ये प्रवेश करून मुख्य न्यायाधीश अब्दुल्ला सईद ह्यांना जमिनीवरून फरफटत नेऊन अटकेत टाकले आहेत. त्यांच्या सोबत न्या. अली हामीद आणि ज्युडिशियल सर्व्हिस अडमिस्ट्रेटर हासन सईद ह्यांनाही अटक करण्यात आली आहे. इतके करून समाधान झाले नाही म्हणून माजी अध्यक्ष अब्दुल गयूम व त्यांचे जावई मोहमद नदीम ह्यांना त्यांच्या राहत्या घरामधून अटक करण्यात आली आहे. प्रमुख न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी असल्याचे त्यांचे वकील सांगत आहेत.

एकंदरीत मालदीवमध्ये कायद्याचे राज्य पूर्णपणे कोलमडून पडले आहे हे उघड आहे. १९८८ मध्ये तत्कालीन अध्यक्ष ममून अब्दुल गयूम ह्यांच्या विनंतीवरून भारताने सैन्य पाठवून तिथे शांतता प्रस्थापित करण्यास मदत केली होती. आतादेखील माजी अध्यक्ष मोहमद नाशीद ह्यांनी भारताने लश्करी हस्तक्षेप करून मालदीवमधील पेच संपुष्टात आणावा असे आवाहन केले आहे. परंतु १९८८ आणि आजची परिस्थिती वेगळी असल्याने घटनाक्रम १९८८ सारखा नसेल अशी चिन्हे आहेत.

२०१३ मध्ये सत्तेमध्ये आल्यापासून यामीन ह्यांनी भारत विरोधातील धोरणे अवलंबली तरी त्याकडे इतकी वर्षे दुर्लक्ष झाल्याचे दुष्परिणाम सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत. खरे तर यामीन निवडणूक जिंकणे अवघड होते. ह्या निवडणुकीमध्ये मोहमद नाशीद ह्यांना जवळपास ५०% पेक्षा किंचित कमी मते मिळाली. म्हणजेच निवडणूक चुरशीची झाली होती हे दिसते. पण माजी अध्यक्ष गयूम ह्यांनी त्यांना मदत केली तसेच मताधिक्यात तिसर्‍या नंबरवर असलेले मालदीवमधील श्रीमंत उद्योगपती गासिम इब्राहिम ह्यांचीही मदत त्यांना मिळवून दिली. ह्या दोघांच्या मदतीने यामीन ह्यांचे पारडे जड होऊन ते २०१३ मध्ये निवडून आले. ( तत्कालीन भारत सरकारने ह्यामध्ये लक्ष घातले नाही.) जनमताच्या कौलाची किंमत यामीन ह्यांनी ठेवली नाही. सत्तेवर येताच त्यांनी गासिम इब्राहिम ह्यांनाच अटक केली. यामीन ह्यांच्या सूडाच्या राजकारणाचे नमुने सांगायचे तर यादी खूपच ओठी होईल. आता मालदीवमध्ये भ्रष्टाचाराचे साम्राज्य असून यामीन ह्यांनी अनेक प्रकारे भारतविरोधी निर्णय घेतलेले दिसतात. त्यांच्याच काळामध्ये मालदीवमध्ये वहाबी तत्वज्ञानाचा प्रसार जोमाने सुरु झाला. सौदी अरेबियाकडून मालदीवमध्ये मशिदी बांधण्यासाठी भरगोस मदत आली आहे. गतवर्षी सौदीने मुस्लिम राष्ट्रांची जी संयुक्त लष्करी आघाडी बनवली त्यामध्ये मालदीव सामिल झाला आहे. मालदीवमधली २७ बेटे सौदीला देण्याचा करारही यामीन ह्यांनी केला आहे. ह्याकरिता बेटावरील ४००० नागरिकांची तेथून उचल बांगडी करण्याचा बेत आहे. ह्या बेटावरती सौदी अरेबिया टूरिझम तसेच सामुद्रिक व्यापार केंद्र विकसित करण्याचा विचार करत आहे व ह्याकरिता ती बेटे त्यांना ९९ वर्षांच्या लीजवर देण्याचा प्रस्ताव आहे. 

यामीन - चीन दोस्तीही भारतासाठी अशीच चिंताजनक आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये शी जिन पिंग ह्यांनी मालदीवशी करार करून भारताच्या विरोधाला न जुमानता त्यांना चीनच्या मॅरिटाईम बेल्ट ऍंड रोड योजनेमध्ये सहभागी करून घेतले आहे. ह्याच्या बदल्यात चीनने हुल्हु माली आणि माली ह्या विमानतळांना जोडणारा शानदार पूल बांधण्याचे कबूल केले. हे काम भारत करत होता. पण भारताशी झालेला करार मोडून यामीन ह्यांनी चीनशी करार केला. ह्याविरोधात भारतीय कंपनीने आंतरराष्ट्रीय लवादाकडे विवाद नेला असता २७ कोटी डॉलर्स भरपाई देऊन मालदीवने हा पश्न मिटवला. हा पैसा चीननेच मालदीवला दिला असावा असा संशय आहे. मालदीवच्या उत्तर बिंदूवरती बंदर बांधण्यासाठी चीनने कर्ज दिले आहे. मालदीवचे माजी अध्यक्ष नाशीद म्हणतात की मालदीवच्या एकूण परकीय कर्जापैकी ७०% रक्कम चीनने दिलेली आहे. तसेच त्या रकमेवरचे व्याजच मालदीवच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या २०% असल्यामुळे हा एक कर्जाचा सापळा बनला आहे. ह्यामुळे चीनचा वरचष्मा तिथल्या राजकीय परिस्थितीवरती आहे असे स्पष्ट होते. मालदीवला अशा तर्‍हेने घट्ट पकडीत घेतल्यानंतर चीनने आपली तीन आरमारी जहाजे मालदीवच्या बंदरामध्ये उभी केली आहेत. यामीन ह्यांनी चीनला तशी परवानगी देऊ नये म्हणून भारताने सांगूनही भारताला डावलण्यात आले आहे. 

अशा परिस्थितीमध्ये प्रकरण नाजूकपणे हाताळणे ही मोदी सरकारची कसोटी ठरणार आहे. भारताच्या भूमिकेला अमेरिका इंग्ल्ंड ऑस्ट्रेलिया आदि देश तसेच युनोने पाठिंबा दिला आहे. यामीन ह्यांनी आपले दूत चीन पाकिस्तान आणी सौदीकडे धाडले आहेत. भारताकडेही पाठवण्याचे त्यांनी घोषित केले परंतु मोदी तसेच सुषमाजी दोघेही उपलब्ध नसल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. आता तर मालदीवने एका भारतीय पत्रकारालाही अटक करून आपण आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांना धूप घालत नाही असे दाखवून दिले आहे. भारतापुढे पेच असा आहे की मालदीवमध्ये लष्करी हस्तक्षेप केला गेला तर सेशेल्स ओमान ब्रुने ई हे सतर्क होतील आणि भारताशी सहकार्य करावे की नाही ह्याबाबत सावधता बाळगू लागतील. थोडक्यात काय तर अशा प्रसंगामध्ये कोणत्या तत्वांच्या आधारावरती मोदी आपली परराष्ट्रनीती चालवतील ह्याच्या "रेड लाईन्स"ची कसोटी घेण्यासाठी हा पेचप्रसंग उभा झाला की काय असे कोणाला वाटेल. निवडणूक वर्षामध्ये मोदी हा नुसताच गर्जणारा सिंह आहे म्हणून बोंबा मारण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेतच. (अशा प्रकारच्या चाचण्या चीन कसा घेतो हे मी माझ्या लेखामध्ये विस्ताराने लिहिले होते.) तेव्हा आततायी प्रतिक्र्या न देता आपला कार्यभाग साधणे उचित ठरेल. श्रीलंका - सिंगापूर - अमेरिका इंग्लंड ह्यांच्या मदतीने आर्थिक निर्बंध घालून मालदीवची कोंडी करणे हे आताचे डावपेच असू शकतात. यामीन ह्यांना "पैसा" प्रिय आहे हे केंद्रस्थानी ठेवून सामदामदंडभेद वापरत मोदी सरकार खमकेपणाने हा संघर्ष हाताळणार ह्यामध्ये शंका नाही.