Friday 4 January 2019

ऑगस्टा वेस्टलॅंड भाग २



वोल्फगॅंग मॅक्स रिचर्ड ह्यांच्या तीन कंपन्या होत्या एन्टेरा कॉर्पोरेशन, यूएमसी इंटरनॅशनल ट्रेडिंग लि. आणि फेरो इम्पोर्टस् लि. एन्टेरा कॉर्पोरेशनमध्ये ७५% शेयर्स १९८७ पासून लिश्टेन्स्टाईनमधील एक ऑफशोअर फंड - इस्टर्न ट्रेड आन्स्टाल्ट ह्यांच्याकडे होते. (पताकास्थान). १९८७ ते १९९६ ह्या काळामध्ये त्यांनी भारतीय सौद्यांमधून वीस लाख पौंड कमावले. हे पैसे  कंपनीने इंजिनियरिंग कन्सलटन्सी वा इंडस्ट्रियल कन्सलटन्सी नावाने स्वीकारले होते. वोल्फगॅंग सांगत की ते खुद्द इंदिराजींना १९७० पासून ओळखत होते. त्याकाळी वोल्फगॅंग ज्यूट आणि चामड्याच्या वस्तूंची निर्यात भारतामधून करत होते आणि त्यांची कंपनी या वस्तूंची सर्वात मोठी निर्यातदार कंपनी होती. (राजीव ह्यांच्या लग्नानंतर ही ओळख नेमकी कशी झाली आणि त्यासाठी मध्यस्थी कोणाची होती हे अजून गुलदस्तात आहे.) दिल्लीमध्ये आले की ते क्लॅरिजेस हॉटेलमध्ये वास्तव्य करत. ह्या हॉटेलचे मालक होते सुरेश नंदा. सुरेश नंदा ह्यांचे वडिल म्हणजे एस एम नंदा - भारतीय नौदलाचे प्रमुख एडमिरल! वोल्फगॅंग ह्यांच्यावर कसलेच दडपण नसावे नाही तर ते इतक्या उघडपणे क्लॅरिजेसमध्ये राहिले नसते. त्यांच्याच मध्यस्थीने भारताने WG-30 आणि MK-42 ही हेलिकॉप्टर्स ब्रिटिश कंपन्यांकडून खरेदी केली होती. १९८२-८३ च्या दरम्यान एकदा संसदेमध्ये इंदिराजींनी वोल्फगॅंग हे भारताचे मित्र आहेत असे विधान केले होते असे ख्रिश्चन मिशेलने सीबीआयला आता सांगितले आहे. सीबीआयने ह्याची पडताळणी सुरू केल्याचे सांगितले. १९८४ मध्ये इंदिराजींनी त्रिपोलीला येथे कर्नल गदाफी भेट देऊन एक धक्काच दिला होता. भारत आणि लिबिया ह्यांच्यातील शीत युद्धकालीन संबंध हा एक स्वतंत्र विषय आहे. (त्याकाळामध्ये जोडले गेलेले संबंध भारताला लिबियन युद्धामध्येही उपयोगात आणता आले.) वोल्फगॅंग ह्यांनी ह्या भेटीसाठी आपले कॉन्टॅक्टस् वापरले होते असे खुद्द मिशेलनेच एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. "माझ्या वडिलांना भारतातर्फे लिबियाशी आमची गाठ घालून द्या म्हणून विनंती करण्यात आली होती आणि त्यांनी तसे करून दिले.)

वोल्फगॅंग हे अर्थातच ब्रिटनच्या राजकीय वर्तुळांमध्येही एक बडे प्रस्थ होते. ते ब्रिटनच्या लेबर पार्टीसाठी फंड उभा करून देत असत. हे काम त्यांच्या मृत्यूपर्यंत चालले होते. वोल्फगॅंग ह्यांची कन्या कॅरोलिन (संस्कृत स्कॉलर) हिचा विवाह लेबर पार्टीचे बडे नेते लॉर्ड मॅथ्यू इव्हान्स झाला होता (आता घटस्फोटित). कॅरोलिन स्वतःच साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक गाजलेली व्यक्ती होती तर मॅथ्यू हे फाबर एंड फाबर ह्या प्रकाशन संस्थेचे प्रमुख. २००३ मध्ये मुअम्मर गदाफी सत्तेमध्ये होते तेव्हा युनोने घातलेली आर्थिक बंधने लिबियावरती लागू होती. परंतु ब्रिटनचे लेबर पार्टीचे पंतप्रधान श्री टोनी ब्लेयर ह्यांनी पुढाकार घेऊन गदाफी यांच्याशी एक सामंजस्य घडवून आणले. २००४ साली डील इन द डेझर्ट नावाने सुप्रसिद्ध असलेला करार अस्तित्वात आला. ह्या कराराची कहाणी सांगण्याची ही जागा नव्हे. पण करार घडवताना वोल्फगॅंग ह्यांच्या जाळ्याचा उपयोग झाला असे दिसते. २००३ मध्ये द गार्डियन ह्या ब्रिटिश वृत्तपत्राची मालकी वोल्फगॅंगकडे आली तेव्हापासून त्यांनी लिबियावरील आर्थिक निर्बंध उठवले जावेत म्हणून प्रतिपादन केले होते. तसेच लिबियाशी करार घडवून आणण्यासाठी मध्यस्थीही केली. गदाफीचे आत्मचरित्र ब्रिटनमध्ये छापले जावे म्हणून वोल्फगॅंग प्रयत्न करत होते. तसेच BAE सिस्टिम्स ह्या ब्रिटनमधील कंपनीसाठी त्यांनी लिबियामधून करार मिळवून दिले होते. वोल्फगॅंग ह्यांच्यामार्फत लिबियाचे कर्नल गदाफ अल दाईम ह्यांच्या नातवाने लेबर पार्टीला भरघोस आर्थिक मदत देऊ केली. पण पक्षाने ती नाकारली. लिबियाखेरीज इराण, इराक आणि रशियाशी देखील वोल्फगॅंग शस्त्रास्त्रकरारात दलाली करत होता. साधारणपणे असे म्हणता येईल की तत्कालीन "सोव्हिएत" गटातील देशांमध्ये दलाली करणारे हे बडे प्रस्थ ब्रिटनच्या लेबर पार्टीमध्येही आपले वजन ठेवून होते. २००८ मध्ये इव्हान्स इएफजी इंटरनॅशनल ह्या स्विस बॅंकेच्या ब्रिटनमधील सबसिडियरीमध्ये चेयरमन झाले. तसेच २०११ मध्ये साउथ एशियन लिटरेचर साठी दिल्या जाणार्‍या DSC पारितोषिकाच्या निवडसमितीवरती त्यांनी काम केले. हे पारितोषिक जयपूर लिटरेचर फेस्टीवलमध्ये दिले जाते. (जयपूर लिटमध्ये काय काय हंगामा होतो आपण चांगलेच जाणतो).

१९९६ च्या आसपास वोल्फगॅंग ह्यांना Persona Non Grata जाहीर करण्यात आले - म्हणजे व्यक्तिशः त्यांच्याशी कोणतेही व्यवहार केले जाऊ नयेत असे आदेश संरक्षण मंत्रालयाने काढले होते असे दिसते. ह्यानंतर वडिलांनी मुलाला म्हणजे ख्रिश्चन मिशेल ह्याला आपल्या धंद्यामध्ये आणले. वोल्फगॅंग ह्यांनी शिताफीने आपले कॉन्टॅक्टस् मुलाकडे हस्तांतरित केले व त्याला एन्टेरा कंपनीमध्ये भागिदार करून घेतले. सीबीआयने सुप्रीम कोर्टामध्ये दिलेल्या निवेदनामध्ये मिशेलने असे सांगितल्याचा उल्लेख आला आहे. २००१ पासून त्याची बहिण कॅरोलिन सुद्धा ह्या कंपनीमध्ये भागीदार बनली. ह्याखेरीज जोमर इन्व्हेस्टमेंटस् कंपनीमध्ये देखील ती व तिचा भाऊ भागीदार आहेत. वडिलांकडून धंद्याची सूत्रे त्याने हाती घेतली पण त्याचे आणि वडिलांचे फारसे पटले नाही - त्याने वडिलांना कंपनीच्या कारभारामधून वगळले. व्यथित झालेले वोल्फगॅंग आपल्या मित्रांना सांगत की मी आयुष्यभर जे कमावले ते माझा मुलगा लवकरच बुडवणार आहे. आणि तसेच झाले. २००४ मध्ये एन्टेरा कंपनीला दिवाळखोरी जाहीर करावी लागली. तिच्यावर तेरा लाख पौंडाचे कर्ज चढले होते. कंपनीचे कर्जदार म्हणजे मोठमोठ्या खाजगी तसेच सरकारी कंपन्या व अन्य आस्थापने होती. स्नेक्मा नामक फ्रेंच कंपनीसुद्धा कर्जदार म्हणून नमूद करण्यात आली होती. हीच कंपनी दासो कंपनीला त्यांच्या मिराज विमानांची इंजिने बनवून देते. (दासो कंपनीचा उल्लेख आणखी काही ठिकाणी पण येणार आहे.) त्या कर्जदारामध्ये दोन भारतीय (अथवा वंशाची) नावे दिसतात - पी डी मेनन आणि आर दीक्षित!!


दिवाळखोरीनंतर ख्रिश्चन मिशेलला ब्रिटनमध्ये सात वर्षे धंदा करण्यावर बंदी घालण्यात आली. ब्रिटनमधील नोंदीनुसार मिशेल आठ कंपन्यांमध्ये डायरेक्टर म्हणून काम बघत होता. त्यामधल्या पाच आता बंद पाडल्या आहेत. OMIC Ltd, Aviation News Service Ltd, Loyalrich Ltd, Ferro Import Ltd आणि Entera Corporation. अन्य तीन आहेत Globe Oil Ltd, Global Trade & Commerce Ltd and Fitness First (Curzons) Ltd. 

त्यामुळे त्याला आपला तळ दुबई येथे हलवावा लागला. Globala Services FZE ही कंपनी त्याने दुबई येथून सुरू केली. 

5 comments:

  1. Fantastic । सध्या आठ दिवस फेबु वरून तडीपार करण्यात आलो आहे नाहीतर नक्केच शेयर केलं असतं.

    ReplyDelete
  2. खूपच वेधक माहिती

    ReplyDelete
  3. Thinking about where is we
    Only petrol, onion, etc.

    ReplyDelete
  4. अत्यंत गरजेची व योग्य आशी माहिती.

    ReplyDelete