Saturday 5 January 2019

ऑगस्टा वेस्टलॅंड भाग ३


Image result for mirage dassault india


मनी लॉंडरिंग करणार्‍या (काळ्याचे पांढरे पैसे करणार्‍या) दलालांना आपले व्यवहार लपवण्यासाठी अनेक "शेल कंपन्या" (बनावट - केवळ कागदोपत्री नावापुरती कंपनी - नोटाबंदी नंतर अशाच सुमारे एक लाख कंपन्या आता गायब आहेत.) लागतात. ह्या कंपन्या वापरून पैसे फिरवले जातात. वोल्फगॅंग काय वा ख्रिश्चियन् मिशेल काय दोघांनी जन्माला घातलेल्या कंपन्यांचे जाळे डोके चक्रावून टाकणरे आहे. अंतीमतः ह्या कंपन्या आपली बॅंक खाती स्विट्झरलंड - केमान आयलंड - पनामा - लिश्टेनस्टाइन - मोनॅको अशा सारख्या ठिकाणी ठेवतात जिथे पैशाच्या व्यवहारांचा थांगपत्ता लागू शकत नाही. वोल्फगॅंग ह्यांची केसर इनकॉर्पोरेटेड कंपनीची कथा अशीच आहे. १९९५ साली ही कंपनी त्यांनी पनामामध्ये स्थापित केली तेव्हा तिचा पत्ता म्हणून त्यांनी तेम्स नदीजवळच्या चेल्सीमधल्या घराचा पत्ता टाकला होता.  त्यामध्ये भागिदार म्हणून नवी दिल्ली येथील विक्रम सिंग असे नावही आहे परंतु सिंग ह्यांचा पूर्ण पत्ता नोंदवलेला नाही. केसर कंपनीद्वारे वोल्फगॅंग शस्त्रास्त्रव्यवहारामध्ये मिळालेला पैसा अन्यत्र फिरवत होते असे दिसते. १९९७ मध्ये कंपनीची सूत्रे ख्रिश्चन मिशेलकडे देण्यात आल्याचे दिसते. 

ख्रिश्चन मिशेल म्हणूनच असा बेचक्यामधला माणूस आहे की जो राफाल आणि आगुस्ता दोन्ही कंपन्यांच्या भारत विषयक व्यवहारांमधला सामाईक दुवा आहे असे मानण्य़ास जागा आहे.  म्हणूनच मोदी सरकारने आगुस्ताचे नाव सांगत मिशेलला दुबईमधून येथपर्यंत आणले असले तरी ही व्यक्ती गेल्या चार दशकामधली कॉंग्रेसची पापे चव्हाट्यावर आणण्याची शक्यता असल्यामुळेच संसदेमध्ये महाभारत घडताना दिसत आहे. असो तर केसरच्या सोबत मिडिया एक्झिम नामक एक मिशेलशी संबंधित कंपनी सीबीआयला अशीच बुचकळ्यात टाकत आहे. मिडिया एक्झिम कंपनीचा मालक आर. के. नंदा एक ट्रॅव्हल कंपनी चालवतो तसेच एक ज्वेलरी आणि एक म्युझिक कंपनीही चालवतो. कंपनीतर्फे दागिन्यांच्या आणि म्युझिक सीडी निर्यात करण्याचे जुजबी व्यवहार केले जात असले तरी प्रत्यक्षात ही एक "शेल" कंपनी असावी असा अंदाज आहे. नंदाने ही कंपनी २००५ साली काढली आणि मिशेलचे पैसे बॅंकेत जमा करण्याची "सोय" करून ठेवली. मिशेलने नंदाला चार प्रॉपर्टीज घ्यायला सांगितल्या तसे खरेदी व्यवहार करून नंदाने त्या पुन्हा विकूनही टाकल्या आहेत. नंदाला मिशेलकडून तब्बल १९ कोटी रुपये मिळाले असे दिसते. यातले साडे सहा कोटी रुपये मिशेलच्या दुबईमधील Global Services FZE ह्या कंपनीकडून २००५ ते २००७ च्या दरम्यान दिले गेले. मिशेल जेव्हा जेव्हा भारतमध्ये येत असे तेव्हा नंदाची कंपनी सुप्रिम एयरवेज त्याच्या प्रवासाची व्यवस्था करत होती. त्याबदल्यात मिशेलने नंदाला १२ कोटी रुपये दिले आहेत.

मिशेल जेव्हा स्वतःसाठी कंपन्या काढतो तेव्हा वकील आणि करसल्लागार ह्यांना डायरेक्टर म्हणून बोर्डावर घेतो. कंपनीचा पत्ता म्हणून वकिलाच्या ऑफिसचा पत्ता दिला जातो. ह्या पत्त्यावर प्रत्यक्षात कंपनीचे कामकाज चालताना दिसत नाही केवळ कागदोपत्री व्हायच्या नोंदी एव्हढाच निष्कर्ष निघू शकतो. ही निष्णात मंडळी देखील ठराविकच आहेत. खास करून सिम्स कुटुंबीय! चार्ल्स विक्टर सिम्स हे कुटुंब प्रमुख असावेत - सोबत डेव्हिड निगेल जॉन सिम्स - जॅक सिम्स - थॉमस सिम्स - अलिसन सिम्स - पामेला सिम्स आणि कॅथरिन सिम्स! हीच नावे आलटून पालटून येतात. सिम्स नावाविषयी प्रश्नचिन्ह उठले ते एका न्यायालयीन प्रकरणामुळे. १९९८ पर्यंत वोल्फगॅंग ह्यांच्याकडे राफाल बनवणार्‍या दासो कंपनीशी भारताला मिराज विमाने विकण्यासाठी कन्सल्टंट म्हणून (दलालीचा) करार होता. ह्या कराराची मुदत दोन वेळा वाढवण्यात आली होती. तरी १९९८ नंतर करार अस्तित्वात नव्हता असे दिसते. भारताने जेव्हा १० मिराज फायटर विमाने ३४ कोटी ६० लाख युरो किंमतीस २००० साली विकत घेतली तेव्हा मिशेलने आपली दलाली मागितली. परंतु दासो कंपनीने ठरलेली रक्कम दलाली म्हणून दिली नाही. म्हणून मिशेलने दासो कंपनीवरती पॅरिसमधील कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. ह्या खटल्यामध्ये कंपनीने असा दावा केला की मिशेल व केसर कंपनीने आपली दिशाभूल केली आहे. आपल्याशी व्यवहार करताना मिशेलने आपले नाव श्री मिशेल सिम्स आणि श्रीयुत केसर असे लावले होते असे दासो कंपनीने न्यायालयास सांगितले. दलालीचा करार तब्बल दोन वर्षे आधीच संपला असल्याने पॅरिसच्या कोर्टाने मिशेलचा दावा फेटाळून लावला. परंतु वृत्तपत्रामधून आलेल्या बातम्यांनुसार दासो कंपनी व मिशेल ह्यांनी कोर्टाबाहेर मध्यस्थी करून प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवले आहे. सिम्स नावाने असलेल्या सगळ्या कंपन्यांचे वास्तव काय हे शोधून काढावे लागणार आहे. सीबीआय असो वा अन्य तपास यंत्रणा - मिशेलसारख्या केसेसमध्ये तपासाला इतका वेळ का लागतो हे समजण्यासाठी हे एकच उदाहरण  पुरेसे आहे. मुळात तपास इतका किचकट आणि त्यापुढे भारतीय न्यायव्यवस्थेशी होणारा पोलिस यंत्रणेचा झगडा!! गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी व्यवस्था अगदी तत्पर असल्याचे आपल्याला सेच जाणवत   असते पण त्यांच्याही खर्‍याखुर्‍या अडचणी आहेतच.

मिशेलची अशीच बुचकळ्यात टाकणारी दुसरी कंपनी म्हणजे त्याने बिटनमधून हाकलून लावल्यावर दुबई येथे स्थापन केलेली Global Services FZE. हिच्याकडे बीटल नट होम लिमिटेड नामक ब्रिटनमध्ये स्थापित करण्यात आलेल्या कंपनीचे ५०% शेयर्स आहेत. बीटल नट होम लिमिटेड  कंपनीने दिल्ली व मुबई मध्ये किमान दोन ऐषारामाची दुकाने काढली होती अशी माहिती सीबीआयला मिळाली. साहिल प्रकाश मेहरा आणि सोनिया मेहरा ह्या दोन ब्रिटिश नागरिकांकडे अन्य ३०% शेयर्स आहेत तर ख्रिस्टिन ब्रेडो स्प्लिड ह्या डेन्मार्कच्या महिलेकडे उर्वरित २०% शेयर्स आहेत. साहिल मेहराच्या नावे यूके शेक्स आणि व्हायकिंग कॅपिटल ह्या अन्य दोन कंपन्या आहेत. त्यामध्ये त्याचे भागीदार आहेत ब्रिटिश नागरिक प्रवीर असोमल आणि करण कृपलानी. आगुस्ता वेस्टलॅंड कराराचे काम भारतामध्ये चालू होते तेव्हा ख्रिस्टिन ब्रेडो स्प्लिड भारतामध्ये आली होती असे दिसते. तिच्या नावे असलेल्या आणखी दोन कंपन्या म्हणजे Croprotein Ltd आणि French Crystal. एव्हढी नावे वाचता वाचता आपले डोके दुखायला लागते. तर त्यांच्यामधले आर्थिक व्यवहार पकडण्याचे कठिण काम तर सोडूनच द्या.

4 comments:

  1. खुपच किचकट आहे हे सगळं. तरीही उत्कंठा वर्धक आहे. पुढील भाग ची वाट बघतो.

    ReplyDelete
  2. भाऊ मध्यमवर्गीय माणसाच्या कल्पनेबाहेरचे जग आहे हे पण गूढ आणि उत्कंठावर्धक आणि रहस्यमय. पुढील भागाची वाट पाहत आहे

    ReplyDelete