Monday 19 November 2018

भारताविरुद्धचे चर्चिलचे छुपे युद्ध

Image result for bengal famine Image result for bengal famine

मध्यंतरी कुलाबा ते पवई मार्गे नवीन फ्री वे असा प्रवास सलग दोन वर्षे करत होते. उभे आयुष्य इथे घालवून सुद्धा पहिल्यांदाच मुंबईच्या पूर्व किनार्‍याशी असा रोजचा परिचय होऊ लागला. उद्योगधंद्यांना जाग येण्याअगोदरचा सकाळचा शांत परिसर - ब्रिटिशकालीन बांधकाम - एक बंदर म्हणून विकसित केलेली व्यवस्था. मुंबईच्या संरक्षणाचा कणा असलेला मोठा लष्करी तळ कुलाबा इथून सुरु होऊन क्रमाक्रमाने जाणार्‍या रस्त्यावरचे ससून डॉक - अपोलो बंदर - गेट वे लायन गेट - एलेफंट गेट - १७६२ मध्ये बांधलेले जुने अडमिरल्टी हाऊस - ओल्ड कस्टम्स हाऊस - टाऊन हॉल - समोरच्या देखण्या इमारती जिथे एकेकाळी म्हणे राहण्याची हॉटेल्स होती - १८२९ ची टांकसाळ - यलो गेट - ब्लू गेट - व्हीटी सारखा रेल्वेचा प्रचंड व्याप - टांकसाळ ते व्हीटी स्टेशनपर्यंत जाणारा ११२ वर्षे जुना गुप्त भुयारी मार्ग - - विक्टोरिया डॉक - प्रिंसेस डॉक - इंदिरा डॉक - कर्नाक बंदर - रेती बंदर - लकडी बंदर - कोळसा बंदर - गोद्यांना लागून उभी असलेली प्रचंड मोठी गोदामे - माजगाव डॉक आणि तिथला जहाज बांधणी व्यवसाय - लगेचच पुढे रे रोडची धान्याची कोठारे!! बाप रे! केव्हढे हे इन्फ्रास्ट्रक्चर! आज देखील डोळे विस्फारतील अशी विस्तीर्ण व्यवस्था. आमची लहानपणापासूनची समजूत अशी होती की ब्रिटिशांनी जे जे बांधले ते ते बाकी भव्य विशालच होते. ब्रिटिशांचे सगळेच भव्य दिव्य! त्यांच्यानंतर राज्यावरती आलेल्या भारतीयांना मात्र असे काही भरीव काम करता आले नाही - तेव्हढी दृष्टीच नव्हती - बस - स्वातंत्र्यानंतर  इतक्या वर्षांनीसुद्धा एक मुंबईकर म्हणून माझी इतकीच मर्यादित प्रतिक्रिया होती. आजपर्यंत कधी हा प्रश्न पडला नाही की एव्हढे मोठे बंदर ब्रिटिशांना कशाला हवे होते? त्याला लागून असलेली गोदामे? एवढाले धान्य? कुठून कुठे जात होते? इतके मोठे सैन्य तरी कशाला लागत होते? मुंबईची एक तृतीयांश जमीन लष्कराच्या ताब्यात का होती? देशभर पसरलेल्या सैनिकी कारखान्यांमध्ये काय बनवले जात होते? त्याचे गिर्‍हाईक कोण होते? पैसा कोणाचा होता? उत्पन्न कोणाला मिळत होते? हे प्रश्न कधीच पडले नाहीत कारण ब्रिटिशांनी एक राज्यव्यवस्था तयार केली आणि आपल्या राज्यकर्त्यांना ती साधी तशीच पुढे चालवतादेखील आली नाही अशी आमची समजूत होती. 

अलीकडेच काही लेख आणि पुस्तके वाचायला मिळाली आणि अचानक आपण कसे भोळसट होतो ते धक्कादायक सत्य सामोरे आले. वास्तव वेगळे होते हे कळायला वेळ झाला आहे. आता म्हणावेसे वाटते की ही "ब्रिटिशांची" मुंबई मला आतापावेतो कळलीच नव्हती बहुधा. ब्रिटिशांच्या "टाचे"खालची मुंबई - ज्यांना मी मुंबईचे वैभव समजत होते त्या प्रत्यक्षात ब्रिटिश साम्राज्याच्या दडपशाहीच्या जखमा आहेत हे माहितीच नव्हते. ती स्थळे उभारण्यासाठी - चालवण्यासाठी माझ्या देशाच्या माझ्या रक्तामासाच्या भारतीयांनी घाम गाळला - रक्त ओकले - प्रसंगी प्राणाचे बलिदान केले - आमच्या इतिहासामध्ये हे कधी शिकवलेच गेले नाही! मधुश्री मुखर्जी ह्यांचे "चर्चिल्स सिक्रेट वॉर अगेन्स्ट इंडिया" हे पुस्तक वाचेपर्यंत ह्या सर्वाचा - ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अर्थ कळला नव्हता. पुस्तक वाचून संपवले  आणि मलाच लाज वाटली. ती कहाणी आपल्या सर्वांना माहिती हवी. म्हणून हा लेख.

ब्रिटिशांनी भारतीय संपत्ती लुटून नेल्यामुळे देशामध्ये निर्माण झालेल्या गरीबीकडे दादाभाई नवरोजी ह्यांनी प्रथमच लोकांचे लक्ष वेधले. हा काळ होता १८६७ चा. म्हणजे १८५७ चे स्वातंत्र्यसमर होऊन सुद्धा दहा वर्षे होऊन गेलेली होती. किती उशीर झाला होता हे भारतीयांना समजायला? त्यासाठी थोडे भूतकाळात जायचे तर शंभर वर्षे आधीच्या काळात म्हणजे अगदी १७५७ च्या प्लासीच्या लढाईपर्यंत जावे लागेल. १९४७ साली ब्रिटिशांच्या साम्राज्याचा अंत बंगालच्या दुष्काळाने झाला हे थोडेफार माहिती होते. पण त्यांच्या साम्राज्याची सुरुवात देखील भीषण दुष्काळाने झाली होती हे आपण विसरून गेलो आहोत. प्लासीच्या लढाईनंतर भारतामध्ये व्यापारी बनून आलेले इंग्रज आता राज्यकर्ते बनले होते. बंगालचे राज्य जिंकले त्या रॉबर्ट क्लाईव्हने बंगालचे वर्णन भूतलावरील स्वर्ग असे केले होते. संपूर्ण जगामधला हा सर्वात श्रीमंत प्रांत मानला जात होता. बंगालमध्ये सर्वच वस्तूंची रेलचेल होती - आणि अशा सर्व वस्तू भारतीय लोक स्वतः तिथेच बनवत होते. बंगालमध्ये येणार्‍या परदेशी व्यापार्‍यांकडून स्थानिकांना कोणतीही वस्तू विकत घ्यावी लागत नव्हती. पण बंगालमधून मात्र भरघोस निर्यात होत होती. तांदूळ साखर रेशीम कापूस अफू वार्निश मेण कस्तुरी मसाले टिकाऊ फळे तूप आणि खारवलेले मांस आदि पदार्थांनी भरलेली जहाजे श्रीलंका, मेसोपोटेमिया आणि अरबस्तानापर्यंत जात होती. प्लासीच्या पराभवाने १७५७ मध्ये बंगाल पारतंत्र्यात गेला. सिराज उद दौलाला हरवणे सोपे नव्हते. पण ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा नीती अवलंबत मीर जफ़र ह्या सिराज उद दौलाच्या सेनापतीला फोडून इंग्रजांनी त्याचा पराभव केला होता. आपल्याला सत्तेवर बसवण्याच्या आश्वासनावरती मीर जफरने इस्ट इंडिया कंपनीला २२ लाख पौंड आणि तिच्या अधिकार्‍यांना १२ लाख पौंड देण्याचे वचन दिले होते. सत्ता हाती येताच इंग्रजांना पैसा मिळाला. ह्यामधला एक मोठा हिस्सा क्लाईव्हने स्वतःसाठी लंपास केला होता. त्यानंतर जहाजे भरभरून लुटलेली संपत्ती इंग्लंडला रवाना करण्यात आली. मीर जफर राज्यावर आला खरा पण ब्रिटिशांच्या घशात पैसा ओतून. मग सैन्याला पगार द्यायलाही पैसा हाती उरला नाही. मग मीर जफ़रच्या सैनिकांना पगार न मिळाल्यामुळे त्यांनी बंड केले. जफर अडचणीत आला तसा त्याचा सरदार मीर कासिम पुढे आला. मग जफ़रला काढून मीर कासिमला राज्यावरती बसवण्यासाठी इंग्रजांनी पुनश्च दोन लाख पौंड कासिमकडून घेतले. हा पैसा आणला कुठून? अर्थातच सामान्य जनतेकडून! आता जनतेकडून पैसा लुटण्याला सुरुवात झाली. 

सत्ता हाती आल्यानंतर इंग्लिश व्यापार्‍यांनी तिजोरीमध्ये कर भरण्याचे थांबवले होते. राज्याची तिजोरी भरली जात नव्हती. त्यांच्या व्यापारामुळे स्थानिक व्यापार्‍यांचा धंदा बुडीत होता. कासिमने त्यांचाही कर माफ केला. आता इंग्रज खवळले. कासिम म्हणाला तुम्ही आपले सैन्य बंगालच्या बाहेर नेलेत तर स्थानिक व्यापार्‍यांवरती कर पुन्हा लादतो. ही अट ऐकल्यावरती इंग्रजांनी त्याला काढून पुन्हा जफ़रला सत्तेवरती बसवले आणि त्याच्याकडून वर पाच लाख पौंड वसूल केले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाला सत्तेवर बसवण्यासाठी आणखी अडीच लाख पौंड वसूल करण्यात आले. बंगाल बिहार ओरिसा प्रांताचा कर वसूल करण्याचे काम मुघल राजाने कंपनीला दिले होते. वर्षाला २७२००० पौंड बादशहाला दिले की कंपनीकडे १६ लाख ५० हजार पौंड उरत. ही लूट इतकी प्रचंड होती की पुढच्या केवळ पाच वर्षात बंगाल कंगाल झाला. ब्रिटिश राणीकडे दर वर्षाला एकूण चार लाख पौंड कंपनीला पाठवावे लागत होते. त्यासाठी कंपनीने आपल्या भूभागातील महसूल वसूलीची गणिते बदलली. आतापर्यंत शेतसारा हा येणार्‍या पिकाच्या प्रमाणामध्ये वसूल केला जाई. इथून पुढे सर्व जमीन सरकारी मालकीची समजून पीक येवो वा न येवो - कर चांदीच्या रूपात वसूल केला जाऊ लागला. ह्याने कराची रक्कम तिप्पट झाली. त्यातील अगदी थोडी रक्कम राज्यावरती खर्च करून उर्वरित रक्कम ब्रिटनमध्ये जाऊ लागली. अखेर अवघ्या १२ वर्षात १७६९ पर्यंत बंगालमध्ये सोन्याचांदीचा मागमूसही उरला नाही. ह्याच वर्षी दुष्काळ आला. आता लोकांकडे ना पैसा होता ना धान्य. झाडाची पाने खाऊन - तेही न मिळाले तर शेतात उगवलेले गवत खाऊन लोकांनी गुजराण केली. पोटची पोरे विकण्याची नामुष्की आली. बंगालची एक तृतीयांश जनता भुकेपोटी मृत्यूमुखी पडली. ब्रिटिशांनी जनतेला धान्य पुरवण्याचा जरासुद्धा प्रयत्न केला नाही. हाती लागेल ते धान्य मद्रासमध्ये लढणार्‍या सैन्याकडे पाठवले जात होते. मुर्शिदाबाद ह्या बंगालच्या राजधानीच्या शहरामध्ये मृतांचे ढीग रस्त्यात पडून होते. ते उचलायलाही कोणी उरले नाही. तेव्हा कुत्री आणि गिधाडे प्रेतांवरती घोंगावताना बघण्याचे उर्वरित जनतेच्या नशिबी आले होते. पुढच्या दोन वर्षात पाउस बरा पडला तेव्हा "बुडालेला" कर ब्रिटिशांचे अधिकारी अधिक जोमात वसूल करू लागले. मृत व्यक्तींचा कर त्यांच्या शेजार्‍यांकडून वसूल केला गेला. करवसूलीसाठी येणारे कंपनीचे अधिकारी पैसा मिळाला नाही तर घरच्या स्त्रियांना नग्न करीत - सर्वांदेखत त्यांचे स्तनाग्र बांबूच्या चिमट्यात पकडून उपटून काढत. १७६० ते १८५० पर्यंतच्या काळामध्ये मद्रास प्रांतामध्ये किमान सहा वेळा भीषण दुष्काळाचा सामना प्रजेला करावा लागला. महाराष्ट्रामध्ये आलेल्या माउंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टनने शिवाजी महाराजांची सारा पद्धती बदलली नाही. पण भारताच्या अन्य प्रांतात मात्र ब्रिटिशांनी ही पद्धती बदलल्यामुळे शेतकरी वर्ग इतका नाराज होता की ह्या ९० वर्षांच्या कालावधीमध्ये देशभरच्या शेतकर्‍यांनी किमान चाळीस ठिकाणी बंड उभारले. ती मोडून काढण्यासाठी इंग्रजांना आपले सैन्य धाडावे लागले होते. ह्याच अत्याचारांमधून रसातळाला गेलेला शेतकरी १८५७ च्या युद्धामध्ये सहभागी झाला होता. अनन्वित अत्याचार करणार्‍या ब्रिटिशांच्या विरोधात १८५७ च्या युद्धामध्ये देशामधील शेतकरी वर्ग उतरला होता म्हणूनच हे स्वातंत्रयुद्ध हा हा म्हणता पसरले. शेतकर्‍यांनी बंडात भाग घेतला म्हणून त्यांचा पुरेपूर सूड इंग्रजांनी पुढच्या काळामध्ये मिळेल तेव्हा तेव्हा शेतकर्‍यांवरती घेतला. 

भारताच्या लुटीची ही कहाणी इथेच संपली नाही. भारतामधले दुष्काळ आणि गरीबी हिचे खापर स्वतःच्या अन्यायकारी राजवटीवरती न मारता इंग्लंडमधले विद्वान त्यासाठी हिंदू समाजाला दोषी मानत होते आणि इंग्रजी अंमलाचे समर्थन करत होते. सुसंस्कृत बंगालने इंग्रजांचा जुलूम सहन केला. मृदुभाषी बंगाली पुरुष त्यांना "बायकोडे" वाटत आणि त्यांच्यामध्ये मर्दानगी नाहीच असा समज ब्रिटिशांनी करून घेतला होता. जेम्स मिल हा विचारवंत म्हणत असे की हिजडेगिरी अंगात बाणवलेले हिंदू गुलामाची भूमिका अगदी तंतोतंत वठवायला उत्तम आहेत! भारतामधली शिक्षणपद्धती बदलू पाहणारा आणि येथील नोकरशाहीकरिता भारतीय बाबू तयार करणारे शिक्षण देऊ पाहणारा मेकॉले भारतीयांबद्दल काय म्हणत असे ते सर्वश्रुत आहे. साम्राज्यशाहीची स्वप्ने बघणार्‍या इंग्लंडने पुढील काळात भारतीयांना पायदळी तुडवून जगावरती राज्य केले. ती भीषण कहाणी अंगावरती काटा आणणारी आहे. 

४ ऑगस्ट १९१४ रोजी ब्रिटनने पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचे ठरवले तेव्हा युद्धाचा खर्च म्हणून भारताकडून १० कोटी पौंड रक्कम तिजोरीत भरण्यात आली. शिवाय ६०००० भारतीय ब्रिटिश सैन्यात दाखल झाले ते केवळ मरण आपलेसे करण्यासाठीच. त्यामधले जे वाचले आणि परत आले त्यांनी सोबत स्पॅनिश फ्लू सारखा घातक आजार इथे आणला ज्याची लागण होऊन सुमारे सव्वा कोटी भारतीय मृत्यूमुखी पडले. नगद रक्कम आणि मनुष्यबळ या व्यतिरिक्त युद्धातील सैन्यासाठी लागणारा शिधा म्हणून भारताच्या खेड्याखेड्यामधून धान्य बळजबरीने गोळा करून युद्धभूमीवरती पाठवले जात होते. सरकार नोटा छापत होते. त्यातून धान्याच्या किंमती वाढत होत्या. ब्रिटिशांची ही लूट पाहूनही भारतामधल्या राष्ट्रवादी नेत्यांनी युद्धसमयी ब्रिटिशांना सहकार्य देण्याची भूमिका घेतली जेणेकरून पुढील काळामध्ये काही राजकीय अधिकार आपल्याला बहाल केले जातील असा त्यांचा गैरसमज होता. पण ब्रिटिशांनी त्यांच्या तोंडाला पाने पुसली. पहिले महायुद्ध संपल्यावर अवघ्या दोन दशकामध्ये दुसर्‍या जागतिक महायुद्धाचा आरंभ झाला. ज्यूंच्या द्वेषापोटी आणि जर्मनांच्या सर्वोच्च आर्यवंशाच्या गर्वामधून वंशवादी तत्वज्ञान जन्मले होते. त्यातून ह्या युद्धाचा आरंभ झाला होता. दुसर्‍या महायुद्धाचा कारक हिटलर हा ज्यू द्वेष्टा आणि संहारक म्हणून जगात त्याची छि थू करण्यात आली. ७० लाख निःशस्त्र ज्यूंना गॅस चेम्बरमध्ये घालून मारले म्हणून पृथ्वीतळावरील राक्षस म्हणून त्याचे वर्णन केले जाते. त्याचा फॅसिझम कायमचा गाडण्यासाठी इंग्लंडने लढाई कशी आपल्या शिरावरती ओढून घेतली आणि लोकशाहीच्या रक्षणार्थ ब्रिटिशांनी सर्वंकष बलिदान दिले त्याच्या "रोमहर्षक" कथा आपल्याला ऐकवल्या जातात. पण जितका हिटलर वंशवादी होता आणि ज्यू द्वेष्टा होता त्यापेक्षाही अधिक भारतीयांचा द्वेष ब्रिटिश राज्यकर्ते करत नव्हते का? दुसर्‍या महायुद्धामध्ये इंग्लंडला विजयश्री मिळवून देणार्‍या चर्चिलने भारतीयांवरती पराकोटीचा अन्याय कसा केला -  त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या काही सहकार्‍यांनी घेतलेल्या भूमिकेमधून किती लाख भारतीय मृत्यूच्या दारात ढकलले गेले हा इतिहास सामान्य  भारतीयांपासून का लपवण्यात आला त्याचा हिशेब लावण्याची वेळ आली आहे.

पहिल्या महायुद्धाचा अनुभव लक्षात घेऊन गांधीजींनी १९४२ मध्ये लोकांना आवाहन केले की युद्धाची छाया गडद होत आहे. पहिल्या युद्धाचा अनुभव लक्षात घेता ब्रिटिशा आतादेखील भारतीयांच्या तोंडचा घास हिरावून घेणार हे उघड होते. इथून पुढे सर्वच वस्तूंची टंचाई निर्माण होणार आहे. खाण्यासाठी धान्य मिळण्याची वानवा होईल तेव्हा लोकांनी भोपळा - सुरण - बीट आणि केळी ह्यांचे उत्पादन करावे जेणे करून भुके राहण्याची पाळी येणार नाही. त्यांचे शब्द खरे ठरले. देशामध्ये पिकणार्‍या धान्याच्या प्रत्येक कणावरती जणू - ब्रिटिशांचा पहिला हक्क होता. लोकांकडून बळजबरीने धान्यवसूली केली जाऊ लागली. Famine आणि Drought ह्या दोन्हींना मराठीमध्ये दुष्काळ म्हणण्याची पद्धत आहे. पण दोन्हींच्या अर्थामध्ये फरक आहे. Drought - अवर्षणामुळे निर्माण झालेला दुष्काळ तर Famine अन्नाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेला दुष्काळ! ब्रिटिश राजवटीमध्ये भारतीय जनतेच्या नशिबी दोन्ही दुष्काळ आले. आणि दोन्हीतही ब्रिटिशांनी लोकांना थोडीदेखील मदत करायचे नाकारले. फार काय - एका प्रांतामधल्या दुष्काळासाठी दुसर्‍या प्रांतामध्ये आलेले अमाप पीकही पाठवले गेले नाही. लक्षावधी माणसे मृत्यूमुखी पडली तरी ब्रिटिशांनी पर्वा केली नाही. फ़ेब्रुवारी १९४२ मध्ये बंगालमध्ये केवळ १० टन तांदूळ उरला होता. इथे नेहमी हजारो टन तांदूळ ठेवला जात असे. म्यानमारमध्ये जपानी पोचल्यानंतर तिथून येणार्‍या तांदूळाची आयात देखील थांबली. आसामच्या सीमेवरती पोचलेल्या जपान्यांच्या हाती लागू नये म्हणून बळजबरीने लुटण्यात आलेला तांदूळ भुकेल्या जनतेच्या पोटी घालण्या ऐवजी जाळून टाकण्यात आला. मिर्झा अहमद इस्फहानी ह्या व्यापार्‍याला लोकांकडून तांदूळ गोळा करण्याचे आदेश होते. सवर्ण हिंदूंकडून सक्तीने पीक गोळा करण्यासाठी "इस्फहानी" योग्य माणूस असल्याचे ब्रिटिशांचे मत होते. शेती उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेला भारत हे पूर्वापार चालत आलेले चित्र ब्रिटिशांच्या धोरणामुळे बदलले होते. शेतकर्‍याचे आणि शेतीव्यवसायाचे कंबरडे मोडले होते. भारताला धान्य आयात करावे लागत होते. (अशा पार्श्वभूमीवरती सर्व देशामध्ये शेतकर्‍यांची आंदोलने होत होती आणि तिचा रोष तत्कालीन जमीनदारांकडे वळवण्यात येत होता. हेच उठाव पुढच्या काळातील नक्षल उठावाचे स्रोत होते.)

१९४२ मध्ये गांधीजींनी चले जाव आंदोलन छेडले त्यानंतर ब्रिटिशांनी ९०००० भारतीयांना तुरूंगात डांबले आणि १०००० निदर्शकांना गोळ्या घालण्यात आल्या. आंदोलनाचे स्वरूप इतके तीव्र होते की १८५७ नंतरचे ब्रिटिश साम्राज्यासमोर उभे राहिलेले पहिले मोठे आव्हान असे त्याचे वर्णन करत ब्रिटिश जनरलने लिहिले की - India is an "occupied" and "hostile" country. एका बाजूला हे उग्र आंदोलन चालू होते तर दुसर्‍या बाजूला भारतीय सैन्य जगभरात ब्रिटिशांच्या बाजूने ब्रिटिश साम्राज्याच्या संरक्षणासाठी हिटलरविरोधात लढाई लढत होते. युद्धामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने लढणार्‍या सैनिकांना धान्य - युनिफ़ॉर्म्स - बूट - पॅराशूट - तंबू - स्फोटके आणि अन्य कित्येक वस्तूंचा पुरवठा भारतामधील कारखान्यांमधून केला जात होता. किंबहुना भारतामधली सर्व कारखानदारी युद्धाच्या दिशेने काम करत होती. त्यासाठी लागणारा पैसा कमी पडला की सरकार नोटा छापत होते. त्यातूनच चलन फुगवटा होऊन वस्तूंच्या किंमती भडकल्या होत्या. युद्ध सुरु झाले त्यानंतर म्हणजे १९४० साली भारत जे जे युद्धसाहित्य पुरवेल त्याची किंमत ब्रिटनच्या राजाने द्यावी असे ठरले होते. त्याला स्टर्लिंग कर्ज असे नाव दिले गेले होते. युद्धाच्या काळामध्ये भारतामधून नेण्यात येणार्‍या सामग्रीचा व्याप इतका वाढला की जवळ जवळ १०० वर्षांनंतर - कागदोपत्री का होईना -प्रथमच भारत सावकार झाला आणि ब्रिटन कर्जदार. सुमारे २०० कोटी पौंड एवढ्या किंमतीच्या वस्तू आणि सेवा भारताने युद्धासाठी पुरवल्या. १९४३ मध्ये बंगालला चक्रीवादळाचा फटका बसला. ह्या सर्व काळामध्ये ज्यांना आपण सुसंस्कृत राज्यकर्ते म्हणून समजतो त्यांचे - खास करून चर्चिल आणि त्याचे काही सहकारी यांचे - वर्तन कसे राहिले आहे हे तपशीलामध्ये बघण्याची गरज आहे. 

जवळ जवळ ऐंशी वर्षांनंतर ही कहाणी लिहायची तर तिचे धागेदोरे - संदर्भ शोधायचे कुठे? ब्रिटिशांनी आपल्या अखत्यारीतल्या कागदपत्रांची व्यवस्थित "विल्हेवाट" लावली आहे. दुष्काळाच्या चौकशी समितीसमोर धान्य का पाठवले गेले नाही आणि जहाजे कशी उपलब्ध नव्हती ह्याचे तपशील आले पण जपान्यांच्या भीतीने जाळून टाकण्यात आलेल्या धान्यसाठ्याचा उल्लेखही मिळत नाही. लोकांनी दिलेल्या साक्षी गायब आहेत. त्याची एक कॉपी नानावटी पेपर्स नावाने मिळते. तर सिव्हिल सर्व्हंट पिनेल ह्याने आपल्या नोंदीत म्हटले आहे की सर्व कागदपत्रांची माझी कॉपी माझ्याकडे आहे. पण आज तिचा ठावाठिकाणा माहिती नाही. सिव्हिल सर्व्हंट ओलाफ़ मार्टिननेही आपल्या स्मृती लिहून ठेवल्या होत्या पण त्यामधली काही "पाने" हरवली आहेत असे सांगितले जाते. ह्याच पानांमध्ये त्याने बंगालमध्ये चीफ सेक्रेटरी म्हणून काम करायचे नाकारले होते त्याची कहाणी आहे. वॉर कॅबिनेटमधील चर्चांविषयीच्या चीफ सेक्रेटरीच्या नोंदी तिथे - १९४३ च्या मध्यापासून - थांबतात जिथे चर्चिल चेरवेल लेदर्स आणि ग्रिग ह्यांनी बंगालला उपासमारीत ठेवायचे आणि धान्य न पाठवायचे निर्णय घेतले होते. लॉरेन्स बर्गिस ह्यांनी वॉर कॅबिनेटच्या अनौपचारिक नोंदी ठेवल्या आहेत. त्यामध्ये ४ ऑगस्ट १९४४ ह्या दिनांकाच्या नोंदी आहेत. ह्याच दिवशी चर्चिलने मिटिंग मध्ये जो थयथयाट केला त्यावरून अमेरीने त्याची तुलना हिटलरशी केली होती. लिओ अमेरीच्या थयथयाटीची एव्हढी एक कहाणी आज गायब करण्यात आली आहे. ही बाब वगळता बाकी तपशील त्या कागदपत्रात मिळतात. सुभाषचंद्र बोसांच्या कोणत्याही नोंदी त्यात मिळत नाहीत. एक त्यांना ठार मारण्याची ऑर्डर सोडली तर! हाच संदर्भ दाखवतो की ब्रिटिश राज्यकर्ते सुभाषबाबूंचे आव्हान किती गांभीर्याने घेत होते. 

भारतामधून सिलोनकडे निर्यात केल्या गेलेल्या भाताच्या नोंदी असलेली एक फाईल हरवली आहे. बंगालमधील दुष्काळाच्या बातम्या जगभर झळकल्या त्यानंतर कॅनडाने जे अन्न देऊ केले त्याचीही फाईल आता मिळत नाही. भारतामधून किती तांदूळ १९४३ - ४४ ह्या भीषण दुष्काळाच्या काळात निर्यात झाला त्याच्या नोंदी गायब आहेत. लष्करप्रमुखांच्या मिटींग्सच्या सविस्तर नोंदी ब्रिटिश आर्काईव्हज मध्ये मायक्रोफिल्मवरती उपलब्ध आहेत पण भारतामधून केल्या गेलेल्या आयात निर्यातीचे संदर्भ असलेला भाग कोणाला वाचता येऊ नये म्हणून काळा करण्यात आला आहे.  दुष्काळाच्या चौकशी समितीने धान्याच्या तुटवड्यांमुळे नेमके किती मृत्यू झाले ह्यासाठी स्वतंत्र सर्व्हे घेतला होता. त्याच्या नोंदी मिळत नाहीत. समितीने एव्हढेच म्हटले की आरोग्य खात्याकडे एकूण अठरा लाख त्र्याहत्तर हजार लोक मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे त्यातील नैसर्गिक मृत्यू वजा जाता दुष्काळाचे बळी सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार आहेत असे म्हटले आहे. समितीनेच म्हटले की ह्यामध्ये रस्त्यावरती मरून पडलेले अथवा दूरदूरच्या गावामधून अन्नाच्या शोधात असलेली माणसे मेली त्याच्या नोंदी त्यात मिळवलेल्या नाहीत. अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये हाच आकडा तीस लाख असल्याचे दिसून आले होते. असाच सर्व्हे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे महालानोबिस ह्यांनी केला तेव्हा त्यांनी ३१ लाख लोक उपासमारीने मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले. तरी जिथे कुटुंबेच्या कुटुंबे नष्ट झाली त्यांच्या नोंदी ह्या आकड्यांमध्येही नसाव्यात. तेव्हा हा आकडा - म्हणजे बंगालमधील मृत्यूंचा आकडाच जवळजवळ चोपन्न लाखांपर्यंत पोचतो. तरी ह्यामध्ये ओरिसा आणि मद्रास प्रांतांमधल्या मृत्यूंची बेरीज केलेली नाही. साठ लाख ज्यूंना मारणार्‍या हिटलरच्या किती कहाण्या आणि अवहेलना आपण ऐकतो पण चर्चिल आणि त्याच्या सहकार्‍यांनी आपल्या स्वकीयांची जाणून बुजून केलेली कत्तल आपल्याला माहिती सुद्धा नसते - शिकवलीही जात नाही. 

१९३३ मध्ये चर्चिलने लिहिले होते की "ब्रिटनसाठी एक संघर्षाचा कालावधीचा आरंभ होत असून त्यातून तरायचे असेल तर आपल्या हाती भारताचे स्वामित्व असणे पुरेसे नाही तर अत्यंत कठोर व्यापारी अधिकार राबवणे गरजेचे होणार आहे." १९४० मध्ये जेव्हा वॉर कॅबिनेटमध्ये अशी सूचना केली गेली की युद्धसमयी भारत जी मदत करेल त्याबदल्यात त्यांना स्वायत्तता देण्याचा करार करावा तेव्हा चर्चिलने त्या प्रस्तावाला विरोध करत म्हटले की भारतावरचा हक्क सोडण्याचा प्रश्नच उद् भवत नाही. देश एक झाला तर हिंदू आणि मुस्लिम मिळून ब्रिटिशांना बाहेर काढतील. तेव्हा तिथे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ कशी वाढेल त्याचा विचार केला पाहिजे. हाच चर्चिल १९३१ मध्ये भारतामध्ये झालेल्या धार्मिक दंगलींवरती बोलताना म्हणाला होता की तेथील धर्मवेड्यांपासून जनतेचे रक्षण केवळ ब्रिटिश करू शकतात अन्यथा माणूसकीला काळिमा फासणारी कृत्ये तिथे पहायला मिळतील. स्वायत्ततेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर कॉंग्रेसमध्ये खळबळ माजणे अपेक्षित होते. चर्चिलने भारतामधील व्हाईसरॉयला निरोप पाठवला - गांधींना खाजगीरीत्या कळव की त्यांना हवे असेल तर त्यांनी मरेपर्यंत उपोषणाचा मार्ग स्वीकारावा -  ब्रिटिश त्यांना "अडवणार" नाहीत. 

१९४२ च्या ख्रिसमसला जपानने कलकत्त्यावरती बॉम्बफेक केली. ब्रिटन चक्रावून गेले. भारताला धोका असेल तर तो रशियाकडून असे त्यांनी गृहित धरले होते. त्यामुळे स्फोटकांचे सर्व कारखाने त्यांनी पूर्वेकडे उभारले होते. जपानी आक्रमणामुळे ब्रह्मदेशाकडून येणारा तांदूळाचा पुरवठाही बंद होईल ह्याचे गणित मांडलेले नव्हते. युद्धाची गरज म्हणून बंगालमध्ये ज्यूटचे उत्पादन घ्यावे म्हणून सरकारने प्रयत्न केल्यामुळे तिथे मुळातच लोकांनी भात लावला नव्हता. त्यात चक्रीवादळामुळे उभे पीक वाहून गेले. बंगालखेरीज अन्य प्रांतांमध्ये पिकणारा गहू आदि तर युद्धाची गरज म्हणून निर्यात केले जात होते. दुःस्थितीचा फटका बंगालप्रमाणेच किनार्‍यावरील सर्व प्रांतांना बसत होता. तिथे उपासमारीला लोक सामोरे जात होते. जिथे कमीत कमी सहा लाख टन धान्य मागितले जात होते तिथे जेमतेम चाळीस हजार टन धान्य पाठवले जात होते. 

भारताच्या व्हाईसरॉयने वारंवार सूचना देऊनसुद्धा ब्रिटनने बंगालमधील धान्याच्या प्रचंड तुटवड्याची दखल सुद्धा घेतली नव्हती. मार्च १९४३ मध्ये चर्चिलने म्हटले की अधिक धान्य पुरवठ्यासाठी भारतीय महासागरातील देशांकडून येणार्‍या मागण्यांवरती "कठोर" दृष्टी अवलंबून निर्णय घेतले जात आहेत हे योग्यच आहे.  या काळामध्ये स्टर्लिंग कर्ज दिवसाला १० लाख पौंड ह्या गतीने वाढत होते. युद्ध संपले की हे कर्ज ब्रिटनने भारताला चुकते करण्याचे ठरले होते. ह्यावरती चर्चिल नेहमीच कुरकुर करत असे. सप्टेंबर १९४२ मध्ये अमेरीने नोंद केली "चर्चिल अविरत तक्रारी करतो आहे - एक तर आम्ही ह्यांचे संरक्षण करायचे आणि वरती ह्यांचे कर्जही फेडायचे. हा कुठला हिशेब म्हणायचा?". म्हणजे भारताचेच सैनिक आणि भारताचीच सामग्री घेऊन ब्रिटिश साम्राज्य वाचवण्यासाठी महायुद्ध लढायचे आणि येथील लोकांना उपासमारीने निर्दयपणे मारून टाकायचे - इतकी सारी तयारी तर ब्रिटिशांच्या रक्षणासाठी होती. प्रत्यक्ष भारतावर जपानने हल्ला केलाच तर भारताच्या संरक्षणासाठी काडीचीही सैनिकी तयारी नव्हती - भारताचा पैसा त्याच्या संरक्षणाच्या कामी खर्च होत नव्हता. तरी चर्चिल कुरकुरतच होता की कर्ज परत का करायचे म्हणून. एका वॉर कॅबिनेट मिटींगमध्ये चर्चिल म्हणाला - की हे कर्ज परत करता येणार नाही. एप्रिल १९४० मध्ये केलेला करार बदलून त्यामध्ये भारताने युद्धाचा "अधिक" खर्च उचलावा अशी तरतूद करून घ्या. तसेच ह्या कर्जाच्या बदल्यात ब्रिटनने जी "सेवा" दिली आहे त्याचे बिल भारताला पाठवून द्या." असे काही केले तर त्याचे परिणाम भीषण होतील असा इशारा व्हाईसरॉयने दिला. 

अमेरिकन अध्यक्ष रूझवेल्ट देखील भारताच्या बाजूने असावेत. भारताच्या स्वातंत्र्यावरती त्यांनी चर्चिलकडे विषय काढला. अमेरिकेच्या भूमिकेमुळे चर्चिल चिडला. नोव्हेंबर १९४२ मध्ये संसदेत भाषण करताना त्याने मोठ्या गुर्मीत दर्पोक्ती केली आणि म्हटले - भारतावरील स्वामित्व आम्ही सोडणार नाही. ब्रिटिश साम्राज्य मोडकळीस काढण्यासाठी काही मी ब्रिटिश महाराणीचा सेवक झालेलो नाही." वसाहतीने मार्च १९४२ पर्यंत युद्धासाठी जे पेट्रोल पाठवले त्यावरती आयात शुल्कही टाकले होते. तर खुद्द पेट्रोलचे बिल मात्र इंग्लंडला लावले होते. ह्या दोन्ही चुकांकडे दुर्लक्ष करा असे व्हाईसरॉयने सांगूनही चर्चिलने आपल्या मतलबाचा विचार करत अडीच कोटी पौंड वार्षिक स्टर्लिंग कर्जाची रक्कम पन्नास लाख पौंडावरती आणण्यात आली. इतके करूनसुद्धा उर्वरित कर्ज कसे बुडवायचे त्याचे उपाय चर्चिलचे सहकारी शोधत होते. प्रोफ़ेसर चेर्वेलने शिफारस केली होती की कसेही करून ही कर्जाची रक्कम चुकती करावी लागणार नाही ह्याचे मार्ग शोधून काढा. ह्यामधला एक मार्ग होता विनिमयाचा दर बदलण्याचा. (असे काही होणार ह्या भीतीने व्यापारीवर्ग साठेबाजी करत होता - आपल्याकडचे धान्य पैसे घेऊन विकायला तयार नव्हता - त्यातूनही धान्याचा तुटवडा वाढला होता.) काहीच नाही तर चेरवेलने सुचवले की ब्रह्मदेश आणि मलाया मधील युद्धाचा सर्व खर्च भारतावरती टाकला जावा. भारताच्या बाबतीमध्ये माल्थुस ह्या नामवंत अर्थतज्ञाचे मत चेरवेल मांडत होता. "जेव्हा साधनांपेक्षा कित्येक पटीने जास्त लोकसंख्या असते अशा प्रदेशात त्यातील काही प्रजेचा विनाश होतो (व लोकसंख्या कमी होते)." बुडालेले पीक आणि लोकसंख्या वाढीचा प्रचंड वेग ह्यामुळे भारतावरती दुष्काळाचे संकट कोसळले आहे असे चेरवेल म्हणत असे. त्यावरती चर्चिलने डार्विनवादाची चरचरीत फोडणी घालत म्हटले की युद्धासाठी स्वतःला काहीच तोशीस न लावून घेता (???) "सशांसारखी बेसुमार पैदास करून पोरे जन्माला घालणार्‍या" ह्या भारतीयांना आपण रोजचे १० लाख पौंड कसले देणे लागतो" "ह्याचा परत एकदा विचार करा" असे चर्चिलने लेदर्सला सांगितले. 

केवळ धान्याच्या बाबतीत भारतीयांची हेटाळणी झाली असे नाही. हीच कहाणी युद्धासाठी इथून निर्यात होणार्‍या सर्व प्रकारच्या मालाबाबत होती. युद्धासाठी वर्षाला सहा लाख मैल लांबीचे सुती वस्त्र इथे बनवले जात होते. सैन्यासाठी साडे एकेचाळीस कोटी युनिफॉर्म आणि वीस लाख पॅराशूटस् बनवली जात होती. विमानामधून उड्या टाकणारे सैनिक उतरवण्यासाठी रेशमी पॅराशूटस् लागत. त्यासाठी भारतातील रेशीम वापरले जात होते. एक कोटी सतरा लाख लोकरीचे कपडे आणि पन्नास लाख ब्लॅंकेटस् बनवली जात होती. सुती कापडाबरोबर रेशीम आणि लोकरीचाही तुटवडा होता. तीच गोष्ट चामड्याची. एकूण दोन कोटी दहा लाख बूट बनवले जात होते ते फक्त युद्धासाठी. ब्रिटनमध्ये आधी प्रजा मग युद्ध - आधी नागरिकांना वस्तू मिळतील आणि उर्वरित मालाचा पुरवठा सैन्याला मिळेल अशी व्यवस्था होती. गुलामीत जिणे जगणार्‍या भारतात मात्र आधी सैन्य आणि मग प्रजा असा हिशेब चालला होता. 

धान्य नव्हते असे नाही - पण जिथे जिथे जास्तीचे धान्य उपलब्ध होते ते ते सर्व ब्रिटन जेव्हा "युरोप पादाक्रांत करेल तेव्हा तेथील प्रजेसाठी राखून ठेवा" असे चर्चिलने सांगितल्यामुळे श्रीलंकेच्या कोलंबो बंदरात उभा असलेला तांदूळाचा साठा असो की ऑस्ट्रेलियामधून युद्धासाठी येणारा साठा असो युद्धभूमीवरती तुटवडा नसूनही भारताला देण्यात आला नाही. फ़ेब्रुवारी १९४४ मध्ये चर्चिलने टिपण केले की ब्रिटनमधील आयात कमी करून भारताकडे धान्य वळवणे शक्य नाही. बंगालच्या दुष्काळाच्या हृदयद्रावक कथा जेव्हा पाश्चात्य वर्तमानपत्रात छापल्या गेल्या तेव्हा कॅनडाने एक लाख टन धान्य फुकट देऊ केले. अन्य देशांनीही मदत देण्याची तयारी दाखवली पण ती मदत युद्धसमयी सर्व उपलब्ध जहाजे सामग्री वाहून नेत असल्यामुळे धान्यासाठी जहाजे उपलब्ध नाहीत सांगत भारतामध्ये कधीच पोहोचू दिली नाही. अगदी एखाद्या जहाजावरती १०००० टन वजन पाठवू शकतो एव्हढी क्षमता आहे असे दिसूनही धान्य न पाठवल्यामुळे उपासमारी हेच भविष्य भारतीयांच्या कपाळी होते. असे उपासमारीने गांजलेले लोक बंड करू शकणार नाहीत असा कयास होता आणि काही अंशी ते खरेही झाले. १९४२ ची चले जाव चळवळ थंडावली ती अशीच. 

चर्चिलच्या भारतद्वेषाला काही सीमाच नव्हत्या. भारतीय सैनिकांच्या हाती आधुनिक शस्त्रे देऊन एक महाराक्षस निर्माण केल्यासाठी मे १९४३ मध्ये त्याने जनरक वेव्हेलवरती ठपका ठेवला. १८५७च्या बंडाची आठवण करून देत चर्चिलने "हेच एतद्देशीय सैनिक आपल्या पाठीवर गोळ्या घातील" असा इशारा जून १९४३ मध्ये दिला. वॉर कॅबिनेट मिटींगमध्ये चर्चिलचा भडका उडालेला पाहून वेव्हेलने आपल्या डायरीत लिहिले की भारताचा विषय निघाला की त्यांचा भारतद्वेष लपू शकत नाही. चर्चिल असे चित्र रंगवत होता की फाटकेतुटके कपडे घालणारे गरीब ब्रिटिश कामगार श्रीमंत भारतीय कारखानदारांना पैसा परत करताना "भरडून" निघत आहेत. 

मार्च १९४५ मध्ये रूझवेल्टना याल्टा येथे भेटल्यानंतर चर्चिलने आपल्या सेक्रेटरीला सांगितले की "Hindus were a foul race protected by their mere pullulation from the doom that is their due." (Pullulation means rapid breeding) "हिंदू एक घाणेरडी जमात आहे. हे कधीच नष्ट झाले असते पण ज्या गतीने ते पोरे जन्माला घालतात त्यातून ते आजवर टिकून आहेत." भारताविषयी निर्णय घेण्याच्या समितीमध्ये सूत्रे ऎटलींच्या हाती देण्यात आली होती. खरे वाटणार नाही पण ऎटलीसुद्धा वसाहतवादी विचारसरणीचेच होते. ह्या काळ्या लोकांच्या हाती आपल्याला सत्ता सोपवावी लागेल ह्या विचाराने ते बेचैन होत असत. एक अमेरी सोडले तर भारताबद्दल सहानुभूती असणारे कोणीच तिथे नव्हते. युद्धानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चर्चिलने जी समिती नेमली होती तिचा अहवाल जर्मनीने शरणागती पत्करली त्याच्या तीन दिवस आधी आला. त्यामध्ये सोव्हिएत रशिया हा मुख्य शत्रू म्हणून - तर मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाकडे जाण्याचा मार्ग ज्या भारतामधून जातो तो भारत मात्र ब्रिटिश साम्राज्याच्या सुरक्षिततेसाठी अतिमहत्वाचा असल्याचे निष्कर्ष काढले ह्ते. " It is of paramount importance that India should not secede from the Empire"! जर भारतामधली वसाहत ठेवणे अशक्य असेल तर भारतामध्ये समावेश केला नाही तरी चालेल अशा बलुचिस्तानचे नियंत्रण तरी निदान आपल्याकडे असले पाहिजे असेही म्हटले होते. जुलै १९४५ मध्ये निवडणुकीत चर्चिलचा पराभव झाला तेव्हा भारत आपल्या हातून निसटणार ह्याची जाणीव झालेली होती. वेव्हेल पुनश्च त्यांना भेटायला गेले असता भारताचा थोडा तरी हिस्सा आपल्याकडे असू द्यात ("Keep a bit of India") असे सांगायला चर्चिल विसरले नाहीत. हिंदू तुकडा - मुस्लिम तुकडा ह्याच सोबत मूळची संस्थाने ह्यांना स्वतंत्र अस्तित्व द्यावे असे मानणारा आणि तोच रेटा पुढे ठेवणारा चर्चिल आता निर्णय घेणार्‍या मंडळींमध्ये नव्हता. तरी त्यानेच नेमलेल्या सभासदांची समिती ते काम करत होती. सातत्याने जिन्ना ह्यांना "पाकिस्तानसाठी तुम्ही अडून रहा" म्हणून ब्रिटिशांकडून अनौपचारिक संदेश दिले जात होते. ऑगस्ट १९४६ मध्ये चर्चिलने जिन्नांना एक संदेश पाठवला. त्यात म्हटले होते की "पाकिस्तानने भविष्यात निःशस्त्र भारतावरती आक्रमण करून त्यांना (हिंदूंना) आपल्या टाचेखाली आणावे".

स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर ब्रिटिश सैनिक परतण्यासाठी बोटीवरती चढत असताना गाणे म्हणत जात होते - 

Land of shit and filth and wogs
Gonorrhea, syphilis, clap and pox
Memsahib's paradise, soldier's hell
India, fare thee fucking well.

कटुतेपोटी आणि द्वेषापोटी नरसंहार घडवून आणणारा चर्चिल जेव्हा नेहरूंना १९४९ मध्ये भेटला त्याच्या काही दिवस आधी नेहरूंनी भारत कॉमनवेल्थमध्ये राहील असे जाहीर केले होते. ह्या घोषणेने चर्चिल आश्चर्यचकित झाला. "मी तुमच्यावरती घोर अन्याय केला." हे त्याने कबूल केले. भीती आणि द्वेष ह्या मानवी उणीवांवरती तुम्ही विजय मिळवला आहे - तुमची अशीच ओळख मला अमेरिकेत करून द्यायची आहे असे ही तो म्हणाला. पुढे एलिझाबेथच्या राज्यारोहण प्रसंगी जून १९५३ मध्ये तो इंदिराजींना भेटला. "तुमच्या पिताश्रींना आम्ही असे वागवले म्हणून तुम्ही ब्रिटिशांचा दुस्वास करत असाल असे वाटले होते. पण तुम्ही ही कटुता आणि द्वेष विसरू शकलात हे स्पृहणीय आहे." असे त्याने इंदिराजींना म्हटले. त्या उत्तरल्या, "आम्ही कधीच तुमचा द्वेष करत नव्हतो." "पण मी करत होतो. मी आता मात्र करत नाही" अशी कबूली त्याने इंदिराजींकडेही दिली. ह्यानंतर चर्चिलना एक जोराचा हृदयविकाराचा झटका आला. आपण मरणार असे वाटत असताना त्याने डॉ. मोरान ह्यांना सांगितले - भारताच्या बाबतीत माझे खूपच चुकले. आयुष्याच्या अंतीम क्षणी आपण केलेल्या भीषण अन्यायामुळे लाखो भारतीय उपासमारीने मारले गेले ह्याचे शल्य त्याच्या मनामध्ये रुतून बसले होते हेच खरे.

हा सविस्तर इतिहास खरे तर आम्हा भारतीयांना शालेय पाठयक्रमामधून शिकवला जाणे आवश्यक आहे. सोने की चिडिया असलेला भारत गुलाम कसा झाला आणि सर्वथा लुटला गेला - ब्रिटिशांनी इथे ज्या "सुधारणा" घडवून आणल्या त्या भारतीयांच्या हितासाठी नव्हे तर आपले साम्राज्य टिकवण्यासाठी होत्या - इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या संरक्षणाच्या बाबतीत आपण बेफिकिर राहिलो तर असेच दिवस एका नव्या गुलामीकडे आपल्याला घेऊन जातील. ती परवड टाळायची तर हा इतिहास पुढच्या पिढीला तरी शिकवायला हवा. 

26 comments:

  1. ताई, ह्या लेखाने अंगावर काटा आला. आपले पूर्वज अशा भयानक नरक यातणांमधून गेले आहेत, हे कळताच आज आपण किती सुखी आहोत ह्याची जाणीव झाली. सावरकरांचे सहा सोनेरी पाने पुस्तक वाचताना जी भावना होती तीच आज परत फिरून आली. इंग्रज महान, त्यांनी आपल्याला विज्ञान दिले, इंग्रजांच्या काळात जनता सुखी होती... ह्या आणि अशा बऱ्याच भ्रमातून बाहेर आलोय आता. आता कळते लोकमान्य असे का म्हणायचे की पहिले स्वतंत्रता मग सुधारणा. खोटं नाही बोलणार, डोळ्यात पाणी आले.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच हे सगळं धक्कादायक ,दु:खदायकपण आहे.हेच लोक आजही आपल्याला शहाणपणा शिकवत असतात.

      Delete
  2. गांधी ने इंग्रजांना देशभक्त लोक सापडून देण्यात मदत केली का ? म्हणजे त्याना मारून टाकता येईल आणि इंग्रजांचे विरोधक कमी होतील ***--१९४२ मध्ये गांधीजींनी चले जाव आंदोलन छेडले त्यानंतर ब्रिटिशांनी ९०००० भारतीयांना तुरूंगात डांबले आणि १०००० निदर्शकांना गोळ्या घालण्यात आल्या

    ReplyDelete
  3. मनः पूर्वक धन्यवाद ताई लिहिल्याबद्दल - पंकज जोशी

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेख पण असे लेख सर्वदूर पोहचले पाहिजेत जर तुमची हरकत नसेन तर हे लेख आम्ही whatssapp वर share करू शकतो का?

    ReplyDelete
  5. हा लेख वाचल्यानंतर काय किंवा, स्वा. सावरकरांचे 'भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने' वाचल्यानंतर काय, एकच जाणवत राहते की, आपल्या कडची जन्माधारित जातीव्यवस्था बदलून ती कर्माधारित जातीव्यवस्था करणे हा यावरचा एकमेव तोडगा आहे. आपल्या देशापुढचे सगळेच प्रश्न या मूळ अडचणीशी निगडित आहेत.

    ही कर्माधारित जातीव्यवस्था आपल्या देशात पूर्वी होतीच. म्हणून तर एक जन्माने क्षत्रिय असलेला नंतर कर्माने महर्षी विश्वामित्र हा ब्राम्हण झाला. जन्माने शूद्र असलेला वाल्या कोळी नंतर कर्माने महर्षी वाल्मिकी हा ब्राम्हण झाला. अनेक उपनिषदे ही आधी जन्माने इतर जातींतील, पण नंतर कर्माने ब्राम्हण झालेल्या ऋषींनी रचलेली आहेत.

    मला असे वाटते की, कर्माधारीत जातीव्यवस्थेवरून जेव्हापासून आपण जन्माधारित जातीव्यवस्थेवर आलो, तेव्हा पासून भारतीयांच्या र्हासाला सुरूवात झाली.

    ReplyDelete
    Replies
    1. When we are ashamed of accepting who we are our debacle starts.

      Delete
  6. वरील मत माझे आहे.

    - सुधन्वा घारपुरे, पुणे.

    ReplyDelete
  7. अप्रतिम लिखाण, लेख खूप आवडला, सत्य फार फार भीषण आहे, आपण खूप मोठी चूक करतो आहे, आपला इतिहास आपण अजून 70 वर्ष नंतर सुद्धा नीट नाही समजून घेवू शकलो याचे वाईट वाटते. आपण इतक्या वर्ष नंतर सुदधा काय करतो आहे याची जाणच आपल्याला नाहीये असेच वाटत राहते. आपले कायदे, न्याय साठी होणारा उशीर, एकंदर कार्य प्रणाली आणि पाणी तरी काय वाहावे असा निवडणुकीत वाहणारा पैसा. काय करतो आहे आपण. एक एक तरी प्रणाली नीट सुरू आहे का ? अगदी प्रामाणिक उत्तर आहे नक्कीच नाही. सुधारणा आजता गायत आपलयाला जमलेल्या नाही. इजराईल, जपान, काय आहे हे अजूनही आपल्याला समजले नाही. कुठे चूक होते हे समजायला 70 पेक्षा जास्त वर्ष जावी लागावी काय हे दुर्दैव.

    ReplyDelete
  8. ब्रिटिश राजवटीत भारतीयांची कशी पिळवणूक झाली यासंबंधी शशी थरूर यांचे भाषण ऐकण्या जोगे आहे. दादाभाई नवरोजी यांनी ब्रिटिश भारताची आर्थिक पिळवणूक करत आहेत हे सप्रमाण सिद्ध केले होते. आज तुमचा लेख वाचून परत डोळ्यात पाणी आले.

    ReplyDelete
  9. मनोरमा दांडेकर22 November 2018 at 02:58

    हा इतिहास योग्य मुलांना गोष्टी रूपात सांगणे योग्य होईल कां? आजचे राजकीय नेते देशात नवनवे वाद उपस्थित करून आपसात भांडणे लावून ब्रिटिशांच्याच पध्दतीने जनतेला वेठीस धरत आहेत.

    ReplyDelete
  10. Tai,
    90 years of (much more) of British raj well depicted in your Article.

    Giving link below

    shashi Tharoor raised the topic of reparations to be paid to the Indian government by Britain on the account of exploitation of India's resources for 200 years. At Oxford.

    https://youtu.be/f7CW7S0zxv4

    ReplyDelete
  11. Khup changla Lekh....
    CHARCHIL MALA HERO VATAT HOTA...
    Pan aaj Reality kalali...

    Great...
    Hates of You ..

    ReplyDelete
  12. धन्यवाद स्वातीताई। हे पुस्तक माझ्याकडे epub format मध्ये आहे। कुणाला पाहिजे असल्यास कळवावे।

    ReplyDelete
    Replies
    1. Dr.Abhijit can you please send me d book?

      Delete
    2. My mail id is agavaja@yahoo.co.in

      Delete
    3. Please send me d book on agavaja@yahoo.co.in

      Delete
    4. Pls send me at shrikant303@gmail.com

      Delete
  13. My email id is agavaja@yahoo.co.in

    ReplyDelete
  14. खूप भयंकर आहे हे, अस वाटत की आपण खूप सुरक्षित काळात जन्मलो भाग्य आपलं पण त्यामुळेच आपली नैतिक जबाबदारी वाढते, कारण काळाची पावलं ओळखून आपण अत्ता वागलो नाही तर आपल्या पुढच्या पिढ्या पुन्हा खोल गर्तेत जातील, आणि त्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत, करण अस न होऊ देण्यासाठी आपल्याजवळ संधी आहे

    ReplyDelete
  15. Pls send me the book on satish.2510@gmaol.com or on 09422202950 whats app number.

    ReplyDelete
  16. आपले वय कित ते कळले तर बऱ्याच गोष्टी आपल्याला लवकर-उशीरा कळल्या ते समजेल. ब्रिटिशांना भारताविषयी काडीमात्र ममता, वात्सल्य, आपलेपणा नव्हता, कारणही नव्हते. महायुद्धे झाली नसती तर कदाचित आपण स्वतंत्र झालोच नसतो. त्यांच्या व्यवस्था, इमारती, रेल्वे, रस्ते 100 वर्षे आयुष्याच्या होत्या. म्हणूनच त्या आजही आपण वापरत आहोत. हावडा ब्रीजच्या रंगाची खात्री ५० वर्षांची होती, ICI chemicles ही ब्रिटिश कंपनी होती. आपले साम्राज्य अनंत काळपर्यंत चालावे अश्याच त्यांच्या सर्व योजना होत्या. महायुद्धात त्यांचे खुप नुकसान झाले(तेही योग्यच झाले). अंतू बर्वा म्हणाल्याप्रमाणे भारताची तिजोरी भाकड झाल्यावर इथे थांबणे महाग होते व ब्रिटनमध्ये रहाणे स्वस्त झाले, म्हणून ते मानभावीपणे स्वातंत्र आपल्यावर भिरकावून गेले, आपल्याला वाटले सोन्याची वीट दिली पण ती आपल्या टाळक्यात बसली, असे वाटते. आपण दिलात तो तपशील आहे, तत्व माहीती आहे.

    ReplyDelete