Sunday 24 December 2017

कारस्थानांचे आरोप - गुजरात निवडणूक २०१७

कारस्थानांचे आरोप भाग १


कार्यकर्त्यांना उद्देशून केलेले भाषण

२०१४ मध्ये मी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यातील भाजप नेतृत्वाला मानसिक दृष्ट्या नामोहरम करण्याचे डाव खेळले गेले आहेत. या निवडणुकीत राज्य सरकारला पूर्णतः घेरण्यात आले आणि जाणूनबुजून खोट्या माहितीचा भडिमार करून वादळ निर्माण करण्यात आले. समोर केवळ काँग्रेस दिसत असली तरी अनेक शक्ती कार्यरत होत्या. त्यांचे लक्ष्य एकच होते - एकदा मोदींना खाली खेचा. अनेक कारस्थाने रचली गेली.

Modi, who was the chief minister of Gujarat from 2001 before he became the prime minister in May, 2014, said attempts were made to "demoralise" the state BJP leadership after he moved to the Centre.

Referring to the just-concluded Gujarat poll, he said the state government was attacked from all sides and there was a "storm of disinformation".

"The Congress might be visible on the ground but there were many forces at work beside it. 'Bring down the BJP once'. All sorts of conspiracies were hatched," Modi said.



कारस्थानांचे आरोप - भाग २


९ तारखेच्या मतदानानंतर १० डिसेंबर रोजी मोदींनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवत म्हटले की पाकिस्तानी आयएसआयचे डायरेक्टर जनरल अर्शद रफिक म्हणतात की अहमद पटेल गुजरातचे मुख्यमंत्री होतील. ह्या रफिकना गुजरातमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यात काय रस आहे??

मामला एवढ्यावर आटोपला नव्हता. पटेल व राहुल यांचे फोटो असलेली पोस्टर्स आधल्याच आठवड्यात  मतदारसंघात झळकली होती. ह्यामध्येही पटेल यांना वझिर ए आलम बनवण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले होते.

खरे तर मुख्यमंत्री पदाला वझिर ए आला म्हटले जाते तर वझिर ए आझम म्हणजे पंतप्रधान!! मग आलम (दुनिया) हा शब्द का बरे योजला गेला होता?? ही पोस्टर्स जितक्या वेगाने लावली गेली तेवढयाच वेगाने वादळ सुरू होण्याच्या आत उतरवली गेली. आपल्याला मुख्यमंत्रीपदात रस नाही असे पटेलांनी सांगून सुद्धा असे कसे घडले??

कोणासाठी होता हा इशारा?? काँग्रेस निवडणूक जिंकलीच तर पटेलांनी पद स्वीकारले असते का हा प्रश्न बरोबर नाही ते पद त्यांनी हिसकावूनही घेतले असते. हा पेच भाजपसमोरच होता असे नाही तर राहुल गटासमोरही होताच.

पटेल मुख्यमंत्री व्हावेत असे पाकिस्तानला का वाटत होते?? वारंवार सद् गदित होणाऱ्या मोदींना कसली भीती भेडसावत होती?? हा विजय मोठा आहे असे आज आवर्जून सांगणाऱ्या मोदींना कोणते कारस्थान दिसत होते?? कसल्या भीषण संकटातून आपण वाचलो याची आठवण त्यांच्या डोळ्यात पाणी आणते आहे??

देशप्रेमी सहृदय माणसाचे मन हेलावून गेल्याखेरीज राहत नाही.


कारस्थानांचे आरोप भाग 3

गुजरात निवडणूक प्रचाराच्या दरम्यान श्री मोदी यांनी आणखी एका मुद्द्याला हात घातला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की काँग्रेसला हे पक्के माहीत होते की अमित शहा गया तो मोदी गया! ही गोष्ट अर्थातच 2002 ते 2006 च्या काळामधली मोदी सांगत होते. याचाच अर्थ असा होता की काँग्रेसला गुजरातमध्ये राजकारणाच्या मार्गाने मोदींना हरवणे अशक्य झाले होते. म्हणूनच कारस्थानांचा सहारा घ्यावा लागला होता.

मोदी अजिंक्य होते कारण त्यांच्या मागे अमित शहांसारखा कसलेला सेनापती पूर्ण निष्ठेने उभा होता. त्यांची सर्व मदार अमित शहांवरच होती. कुठल्याही संकटात हाक मारली तर येणारा हा जिवाभावाचा मित्र होता. मोदींना हरवायचे तर शहांचा "बंदोबस्त" काँग्रेस  करता अत्यावश्यक झाला होता  असे मोदी सांगत होते.

याच अगतिकतेमधून इशरत जहाँच्या केस संदर्भाने श्री अमित शहा यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले आणि त्यांना गुजरातच्या न्यायालयासमोर खेचण्यात आले. यामागचे नाट्य आपण आजही विसरलेलो नाही.

फार काय जाहिरा शेख यांची केस तरी आपण कुठे विसरलो आहोत?  या केसमध्ये गुजरातच्या न्यायालयाकडून खरा न्याय मिळू शकणार नाही असा युक्तिवाद करत खटला महाराष्ट्राच्या न्यायालयासमोर आणला गेला. हाच युक्तिवाद मग अमित शहा यांच्या खटल्याला लावून तोही खटला महाराष्ट्राच्या न्यायालयांसमोर आणण्यात आला. श्री अमित शहा यांना काही काळ तुरुंगवासही झाला. परंतु शहा आणि मोदी यांनी दिलेल्या नेटाच्या लढतीमुळे शहांची यातून सुटका झाली. दुसऱ्या बाजूला मोदींना सुद्धा सीबीआय समोर नऊ तास चौकशीला सामोरे जावे लागले.

मोदी - शहा हे तर गुजरातचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. पण तरीही हा नरकवास त्यांना भोगावा लागला. अशा या नरकवासाच्या आठवणी निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मोदी का काढत होते हे स्पष्ट आहे.

संकटांचे डोंगर त्यांनी एकमेकांच्या सोबतीनेच पार पाडले ही  आठवण ते कसे विसरू शकतात?? आतासुद्धा २०१७ साली गुजरातची सत्ता काँग्रेसच्या हातात गेली असती तर हेच खटले वा नवे खटले टाकून भाजप अध्यक्ष असलेले शहा व पंतप्रधान मोदी यांचे छळनाट्य नव्याने सुरू झाले असते यात शंका नाही.

आपल्यासमोर काय काय वाढून ठेवले आहे याची स्पष्ट कल्पना मोदींच्या डोळ्यासमोर तरळत असावी. मग गुजरात मध्ये विजय प्राप्त करून सुद्धा दुःखाचे कढ येतच राहिले, खरे ना??

गुजरात जिंकला आता तुम्ही निर्धास्त झाला असाल. मोदी नाहीत. मित्रहो प्रश्न आहे तो केवळ आठ आमदारांचा. केवळ आठ आमदार फोडले तर गुजरातची सत्ता जाऊ शकेल. कदाचित २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसोबत गुजरातमध्ये नव्या विधानसभा निवडणुकीचा घाटही घातला जाऊ शकतो.

म्हणूनच धोका संपला नाही. कारस्थानेही संपली नाहीत. वारंवार गदगदून रडणारे मोदी कसल्या कसोटीतून जात आहेत ह्या विचाराने अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

शहा गया तो मोदी गया - हेच सूत्र राहील भविष्यातील काँग्रेसी कारस्थानांचे!!

स्वाती तोरसेकर

Thursday 30 November 2017

सिंजोना भाग ७

मिलानच्या आकाशामध्ये असे तारे चमकत होते. सिंजोनाही स्वतःसाठी ह्या उच्च वर्तुळामध्ये एक स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होता. इटालीच्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये मान्यवरांकडून शिफारस मिळणे ह्यासारखे मोठे "पारपत्र" नव्हते. सिंजोनाची मामेबहिण ऍन्ना रोझा हिचा विवाह रेव्हरंड अम्लेतो तोंदिनी ह्यांच्या धाकट्या भावाशी झाला होता. सिंजोनासाठी ही एक मोठीच शिडी होती. स्वतः तोंदिनी लॅटिन भाषेचे तज्ञ मानले जात. पोपच्या सर्व निवेदनांचे लॅटिन भाषेमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी असलेल्या खात्याचे ते प्रमुख होते. अर्थातच तोंदिनी ह्यांचे व्हॅटिकनमध्ये अनेक उच्च पदस्थांशी उत्तम संबंध होते. सिंजोना आणि तोंदिनी ह्यांची भेट १९५० मध्ये झाली. सिंजोनाचेही लॅटिन भाषेवरती प्रभुत्व होते. हा एक दुवा आणि त्याचा मैत्री करण्याचा स्वभाव ह्यातून त्याने तोंदिनी ह्यांच्यावर चांगलीच छाप पाडली. सिंजोनाला त्याच्या व्यवसायामध्ये मदत करण्याच्या हेतूने तोंदिनी ह्यांनी सुचवले की त्याने व्हॅटिकनसाठी काम करावे. सिंजोना लगेच तयार झाला. मासिमो स्पादा ह्यांना तोंदिनी ओळखत होते. स्पादा ह्यांना पोपने प्रिन्स अशी उपाधी दिली होती तर १९४४ मध्ये त्यांची नेमणूक माल्टामध्ये सरदारपदी झाली होती. १९४२ मध्ये पोप ह्यांनी आय ओ आर उर्फ व्हॅटिकन बॅंकेची स्थापना केली होती. तिथे स्पादा उच्च पदावरती काम करत. बर्नार्डिनो नोगारा ह्या व्हॅटिकन बॅंकेच्या प्रमुखांनी ज्या गुंतवणुकी केल्या होत्या त्यांच्या बाबतीमधले सर्व व्यवहार स्पादा बघत. स्पादा हे एक बडे प्रस्थ होते. ते इटालीच्या एका बड्या बॅंकेचे - बांको दि रोमा - चे व्हाईस प्रेसिडेंट होते. सोसियाटा इटालियाना पर इल गॅस ह्या कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावरती होते. त्रिएस्त शहरामधील रियुनियन ऍड्रियाटिका दि सिकुर्टा इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पदांची यादी एक दोन पाने लिहावी लागेल. इतक्या मोठ्या व्यक्तीला भेटण्यासाठी सिंजोनाला तोंदिनी ह्यांच्याकडून शिफारस मिळाली हे सिंजोनाचे भाग्यच म्हटले पाहिजे. तुमचे काही कायदेविषयक काम मिलानमध्ये असेल तर आपला "नातेवाईक" सिंजोना ह्याला द्यावे अशी विनंती तोंदिनी ह्यांनी केली होती. 

स्पादा ह्यांना एका भेटीमध्येच सिंजोना आवडला. संभाषण चातुर्य त्याने आत्मसात केले होते. त्याची छाप अशी पडली की स्पादा ह्यांनी व्हॅटिकन बॅंकेची गुंतवणूक ज्या उद्योगांमध्ये होती त्या कंपन्यांच्या प्रमुखांना भेटीस बोलावले. इटालीच्या सर्वात मोठ्या  टेक्सटाईल व्यवसायाचे प्रमुख तसेच एका बड्या इलेक्ट्रिकल कंपनीचे प्रमुख ह्यांना त्यांनी सिंजोनाला काही काम द्यावे असे सुचवले. उत्पन्नाच्या दृष्टीने ही कामे फार मोठी नव्हती. पण सिंजोनाने चिकाटी सोडली नाही. तो वारंवार रोम येथे जाऊन स्पादा आणि अन्य अधिकार्‍यांना भेटत असे. १९५४ मध्ये पोप पायस ह्यांनी मॉंतिनी ह्यांची मिलान शहराचे आर्चबिशप म्हणून नेमणूक केली तेव्हा सिंजोनाचे भाग्यच जणू उदयाला आले. 

तोंदिनी अर्थातच मॉन्तिनी ह्यांनाही ओळखत होता. शिवाय सिंजोनाकडे पात्ती येथून तिथल्या आर्च बिशपने दिलेले पत्रही होतेच. मॉन्तिनी आणि सिंजोना ह्यांचे सूत जमायला वेळ लागला नाही. त्याकाळी मिलान शहराअमध्ये उद्योगधंद्यांची भरभराट होत होती. कित्येक कारखाने निघाले होते. इथे काम करणार्‍या कामगार वर्गावरती चर्चचा अजिबात प्रभाव नव्हता. इथे लाल कम्युनिस्टांची चलती होती. मिलान शहरामध्ये चौद लाख नागरिकांनी कम्युनिस्ट म्हणून आपली नोंद केली होती. १९४८च्या निवडणुकीत मिलानची जागा कम्युनिस्टांना मिळाली होती. मॉन्तिनी ह्यांनी ह्या परिस्थितीमध्ये बदल करण्याचे ठरवले. सिंजोना अर्थात त्यांच्या मदतीला उभा राहिला. मुळात सिंजोना हा सिसिलियन माफियांचा प्रतिनिधी. पण कम्युनिस्टांना शह देण्याच्या कामी मॉन्तिनी ह्यांच्याशी त्याचे एकमत होते. त्या दोघांनी मिळून कामगार वस्तीमध्ये सभा घेण्याचे आणि तिथे प्रार्थना सभा आयोजित करण्याचे ठरवले. प्रत्येक कारखान्याला भेट देऊन तिथे सभा घेऊन मॉन्तिनी ह्यांनी कामगार वर्गामध्ये काम सुरु केले. कारखान्याच्या हद्दीमध्ये प्रार्थना सभा घेण्याला कम्युनिस्ट नेता पिएत्रो विरोध करत होता. पण मॉन्तिनी ह्यांनी त्याला जुमानले नाही. सिंजोनाकडे शहरातल्या बड्या बड्या उद्योगपतींनी कामे सोपवली होती. त्यामुळे सिंजोनाला त्यांच्या कारखान्यामध्ये प्रवेश सहज मिळत असे. तुमचे भाग्य हे कम्युनिझम मुळे उजळणार नाही तुम्ही देवावरती विश्वास ठेवा आणि  भांडवलशहांच्या बरोबरीने उभे राहा असे आवाहन मॉंन्तिनी करीत. पुढच्याच वर्षी निवडणुकीमध्ये पिएत्रो हरले आणि युनियनची सूत्रे एका ख्रिश्चन डेमोक्रॅट उमेदवाराकडे गेली. सिंजोनाच्या मदतीशिवाय हे घडले नसते हे मॉन्तिनी जाणत होते. सिंजोनाचे स्थान त्यामुळे उंचावले. सिंजोनाक्डे गुंतागुंतीची कामे येऊ लागली. चर्चच्या परदेशी व्यवहारांसाठी एक कायदेशीर जाळे उभे करण्याचे काम त्याने हाती घेतले. एकंदरीत सिंजोनाकडील कामांचा ओघ वाढला. तसेच आता स्पादा ह्यांनीही त्याच्या पदरी दोन भरघोस कामे टाकली. सोसियाता जनराले इम्मोबिलियरे आणि स्निया विस्कोसा ह्या कंपन्या सिंजोनाला मिळाल्या. 

सिसिलीपासून दूर वरती रोम आणि मिलान शहरांमध्ये आपली कर्मभूमी निर्माण करणार्‍या सिंजोनाचे पाय मात्र सिसिलियन माफियांमध्ये घट्ट रुतलेले होते. २ नोव्हेंबर १९५७ मध्ये पालेर्मो ह्या सिसिलियन शहरामध्ये ग्रॅंड हॉटेल देस पामे इथे माफियांची एक महत्वाची सभा झाली. त्यामध्ये सिंजोनाला आमंत्रण होते. एव्हाना सिंजोनाचे व्हिटो जिनोव्हीज - जो अडोनिस - कार्लो गॅंबिनो - इंझरिलो ह्या सर्व गॅंगस्टर टोळ्यांशी उत्तम संबंध होते. अमेरिकेमधून परतलेला बॉस ऑफ द बॉसेस चार्ली लकी लुचान्या सिसिलीमधून अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापाराचे जाळे उभे करत होता. तर अमेरिकेमध्ये "कॅल्क्युलेटर ऑफ द माफिया" म्हणून प्रसिद्ध असलेला मायर लान्स्की खोर्‍याने कमावलेला पैसा परदेशी कसा पाठवायचा ह्याचे मार्ग शोधत होता. त्या सर्वांसाठी सिंजोनाचे डोके वापरणे गरजेचे बनले होते. कमावलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय जाळे उभे करण्याचा निर्णय ह्या मीटींगमध्ये घेण्यात आला. त्याची सूत्रे अर्थातच सिंजोनाकडे सोपवण्यात आली. ह्यानंतर अवघ्या सतरा महिन्यांमध्ये सिंजोनाने आपली पहिली बॅंक खरेदी केली. चो६याच करायच्या तर स्वतःची बॅंक हवी हे त्याने चाणाक्षपणे ओळखले होते. 

जितक्या सहजपणे सिंजोना माफिया गॅंगस्टर्समध्ये मिसळू शकत होता तितक्याच सहजपणे तो व्हॅटिकनच्या अधिकार्‍यांशीही मिळून मिसळून वागत होता. १९५९च्या शेवटाला व्हॅटिकन बॅंकेचे प्रमुख बर्नार्दिनो नोगारा ह्यांची आणि सिंजोना ह्यांचीही भेट झाली होती. नोगारांना देखील सिंजोना आवडला होता. ह्या भेटीनंतर काही महिन्यांनंतर नोगारा ह्यांचे निधन झाले. त्यानंतर मॉन्तिनी ह्यांनी एक दिवस सिंजोनाला रोममध्ये बोलावून घेतले. त्यांना दोन लाख डोलर्सची गरज होती. कासा मॅदोनिना हा वृद्धाश्रम चालू करण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला होता. मी तुमच्या पाठीशी उभा आहे असे आश्वासन सिंजोनाने त्यांना दिले. आणि खरेच सिंजोनाने हे पैसे तातडीने उभे करून दाखवले. असे म्हणतात ह्यामधले काही पैसे त्याने माफियांकडून आणवले तर काही हिस्सा अमेरिकन सी आय ए ने त्याच्याकडे सुपूर्द केला होता. कम्युनिस्टांच्या पाडावाकरिता सीआय ए तेव्हा व्हॅटिकनला भरघोस मदत करत होती. 

सीआयए - व्हॅटिकन - माफिया अशा टोकाच्या संस्थांना हवाहवासा वाटणार्‍या सिंजोनाच्या अजब बुद्धिमत्तेचे कौतुक वाटल्याखेरीज राहत नाही. दुर्दैव एव्हढेच की ती वाईट मार्गाच्या फायद्यासाठी राबत होती. इथून पुढे सिंजोनाने जे आर्थिक साम्राज्य उभे केले त्याची कहाणी बघू. 

Wednesday 29 November 2017

सिंजोना भाग ६

कार्लो कानेसी ह्यांनी ज्या चुरचुरीत तरुणाच्या मदतीने बांका अँब्रोशियानोचा विस्तार केला त्याचे नाव रॉबर्टो काल्व्ही. काल्व्ही आणि सिंजोना एकाच वयाचे होते. काल्व्हीचा जन्म एप्रिल १९२० मध्ये इटलीच्या मिलान शहरामध्ये एका सुस्थितीतील कुटुंबात झाला होता.  त्याचे वडील बांका कमर्शियाले इटालीयाना मध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते. पुढे ते या बँकेमध्ये को-डायरेक्टर पदापर्यंत पोहोचले. रॉबर्टोला इतर तीन भावंडे होती.  त्या काळामध्ये गरीबाघरची मुले चर्चने चालवलेल्या शाळेमध्ये शिक्षण घेत. पण सुस्थितीतील रॉबर्टोचे शिक्षण एका खाजगी शाळेमध्ये झाले. खाजगी शाळेमध्ये अतिश्रीमंतांची मुले जात असत. त्यांच्या मानाने रॉबर्टो गरीबच होता. ह्यामुळे एक प्रकारचा न्यूनगंड त्याच्या मनामध्ये होता. तो इतर मुलांपासून अलिप्त राहायला शिकला आणि थोडासा अबोल आणि लाजाळूही बनला. . 

शालेय शिक्षणानंतर त्याच्या परिस्थितीमधील मुले कॉलेजला जाण्याकडे कल दाखवत. वयाच्या अठराव्या वर्षी त्यानेही बोकोनी युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स ह्या विद्यापीठात प्रवेश घेतला. तसेच विद्यापीठातील मिलानीज फासिस्ट ग्रुप संस्थेचा तो सभासद झाला. त्याकाळामध्ये इटलीमध्ये फासिस्ट गट समाजात लोकप्रिय होते. त्यांच्या देशाविषयक भूमिकेकडे अनेक तरुण आकर्षित होत होते. ह्या गटामध्ये काम करणे प्रतिष्ठेचे समजले जाई. मग कुटुंब श्रीमंत असले तरी त्याला घरातून विरोध झालाच नसता. रॉबर्टो काही केवळ सभासद होऊन समाधानी नव्हता. त्याला संस्थेसाठी भरीव काम करावेसे वाटत होते.  ह्या गटातर्फे "बुक अँड मस्केट" नामक पुस्तिका प्रकाशित करायची होती. तिचा कच्चा मसुदा रॉबर्टोने बनवला. शिवाय तिच्या प्रचाराच्या कामामध्येही त्याने स्वतःला झोकून दिले होते.  

१९४० मध्ये त्याला सैन्यामध्ये भरती होण्याची संधी मिळाली. अनेक श्रीमंतांची मुले त्यातून आपली सुटका करून घेत. पण फासिस्ट विचाराने भारलेला रॉबर्टो आनंदाने युद्धभूमीवरती गेला. खरे तर सांपत्तिक दृष्ट्या त्याला तसे करण्याची अजिबात गरज नव्हती. पण त्याने योग्य मार्ग निवडला होता. कारण सैन्यातील आयुष्यामध्ये जे शिकायला मिळाले ते नागरी जीवनामध्ये अनुभवता आले नसते. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याने दोन वर्षे त्यात घालवली. त्याच्या सैन्यातील कामगिरीवरती खुश होऊन केवळ इटालियन सरकारने नव्हे तर जर्मन सरकारनेही त्याला गौरवास्पद मेडल दिले होते. 

दुसर्‍या महायुद्धामध्ये त्याला रशियन आघाडीवरती पाठवले होते. तिथल्या बोचर्‍या थंडीमध्ये त्याने आपल्या तुकडीकरवी भरीव कामगिरी करून दाखवली. सैन्यामध्ये १९४५ पर्यंत राहण्याची संधी होती खरी. पण १९४३ मध्ये तो मिलानला परतला. परतल्यानंतर त्याने वडिलांच्याच बँकेमध्ये नोकरी पत्करली. सुरुवातीला सहा महिने मिलानमधल्या बँकेच्या मुख्यालयात काढल्यावर पुढचे एक वर्ष बँकेच्या कोमो ह्या शाखेत काम करायला मिळाले. नंतर त्याची नेमणूक इटलीच्या दक्षिणेकडील लेच्छे शहरातील शाखेमध्ये झाली. रॉबर्टोने तिथे काही काळ काम केले. त्याचे उत्तम काम बघून १९४५ मध्ये बँकेने त्याची नोकरी पक्की केल्याचे कळवले. खरे तर बांका कमर्शियाले इटालियाना ही एक सरकारी - प्रस्थापित - प्रतिष्ठित आणि बडी बँक होती. त्याच्यासारख्या महत्वाकांक्षी तरुणाला तिथे प्रगतीसाठी बराच वाव मिळाला असता. पण रॉबर्टोने तिथे काम करण्यापेक्षा मिलानमध्ये परत येऊन बांका अँब्रोशियानोमध्ये काम करणे पसंत केले. अनुभवाचा विचार करता पहिली नोकरीच योग्य म्हणता आली असती. अँब्रोशियानोमधले खातेदार सगळे पॅरिशर्स होते. पण रॉबर्तो खुश होता. १९४६ मध्ये अँब्रोशियानो मध्ये त्याने कार्लो कानेसी ह्यांचा मदतनीस म्हणून कामाला सुरुवात केली.  (ह्याच वर्षी सिंजोनाही मिलानमध्ये पोहोचला होता.) कानेसी तेव्हा उच्च पदावरती होते. स्वभावाने कानेसी एककल्ली आणि हेकेखोर होता. पण कालव्हीने त्यांच्याशी उत्तम रीत्या स्वतःला जुळवून घेतले. इटालियन समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरती वरदहस्त ठेवणारी कोणीतरी बडी व्यक्ती उभी असण्याला फार महत्व होते. वर्षानुवर्षे पारतंत्र्यात काढल्यामुळे आयुष्यात वर यायचे तर कोणाचे तरी बोट धरून शिडी चढायला हवी ही एक मनोवृत्तीच बनून गेली होती. काल्व्हीला कानेसी यांच्या विश्वासातील व्यक्ती म्हणून एक स्थान मिळवले आणि त्याला त्याचा बराच फायदा झाला. अवघ्या ९-१० वर्षात कारकून पदावरून तो मॅनेजर पदावर पोहोचला. त्याचे भाग्य असे की ह्याच दरम्यान स्वतः कानेसी देखील बँकेचे सर्वेसर्वा झाले. 

"धर्मगुरूंच्या बँके" म्हणून ख्याती असल्यामुळे कोणत्याही क्षणी इटालीच्या ’सेक्यूलर’ सरकारची कुऱ्हाड अंगावरती पडू शकते याची अम्ब्रोशियानो बॅंकेतील लोकांना कल्पना होती. बॅंकेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे तर असे संकट कोसळण्याआधी आपले हितसंबंध गोत्यात जाणार नाहीत हे बघण्याला ते प्राधान्य देत होते. शिवाय बँक फ्रीमेसन्सच्या हाती जाऊ नये म्हणूनही दक्षता घ्यावी लागे. हे करत असतानाच बँकेचा उत्कर्षही साधायचा होता. कानेसीने त्यासाठी काही योजना आखल्या होत्या. त्यांचा विश्वासू म्हणून काल्व्हीला हे काम अगदी जवळून पाहायला आणि हाताळायलाही मिळाले. 

काल्व्ही बँकेच्या परदेश व्यवहार खात्यामध्येच काम करत होता. कालौघामध्ये त्याने इंग्लिश जर्मन आणि फ्रेंच भाषा आत्मसात केल्या होत्या. हे व्यवहार सांभाळण्यासाठी परदेशाच्या वाऱ्या देखील तोच करत होता. त्यामधले पहिले डील झाले ते लिश्टेनस्टाईनमधले लव्हलॉक कंपनी स्थापन करण्याचे. त्यानंतर बँक ऑफ गॉट हार्ड - बँकेची स्वित्झर्लंड मध्ये स्थापना. लंडनमधील हाम्ब्रोस बँक ऑफ लंडन बरोबर सहकार्याचा करार. एका मागोमाग एक होल्डिंग कंपन्या परदेशामध्ये स्थपित करण्याचा हा मामला पुढे चालूच राहिला. ह्या कंपन्यांचे मूळ मालक कोण आहेत - नेमके कोणी त्यामध्ये पैसे गुंतवले आहेत ही गुपिते तर सर्व साधने हाताशी असलेल्या सरकारी शोधपथकांना सुद्धा लागणे दुरापास्त झाले होते. तेव्हा शेल कंपन्यांचे हे जाळे किती चातुर्याने विणले गेले होते हे बघून मती गुंग होते. मग अशा सर्व व्यवहारांचा ते हिशेब तरी कसा ठेवत होते कोण जाणे. ८०० खिडक्या नऊशे दारे असलेल्या ह्या वाड्याच्या आडाने व्हॅटिकनचा पैसा जसा फिरवला जात होता तसाच माफियांचा आणि काही देशांच्या गुप्तहेर संस्थांचा सुद्धा. संपूर्ण गुप्तता पाळणार्‍या बॅंका केवळ स्विट्झरर्लंडमध्ये होत्या असे नाही - जगभरात अशा अनेक जागा - अनेक देश आहेत आणि त्या सर्वांचा वापर ही मंडळी करत होती हे उघड आहे. रॉबर्टो काल्व्ही ह्या बाबी कार्लो कानेसी ह्यांच्या परवानगीने करत होता. तरीही प्रचंड मेहनत आणि बुद्धिमत्ता ह्या जोरावरती हे काम तो यशस्वी करून दाखवत होता. त्यामध्ये त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

अशा व्यवहारांमधला धोका त्याला माहिती नव्हता का? आपण कायदा मोडतो ह्याचे त्याला भान नव्हते का? हे कळण्याइतकी बुद्धी त्याच्याकडे जरूर होती. मग कशाचा मोह झाल्यामुळे तो ह्या चक्रामध्ये फसत गेला होता? तसे पाहिले तर एका प्रतिष्ठित कुटुंबातून आलेला हा तरूण - त्याचा कल गुन्हेगारीकडे नक्कीच नव्हता. पण आपल्या बॅंकेमध्ये सर्वोच्च स्थान मिळवण्याच्या महत्वाकांक्षेने त्याला झपाटले असावे. आणि असे स्थान मिळवायचे तर इटालीच्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार ’योग्य’ जागी असलेले उत्तम संबंध हेच अशा कामी उपयोगात येतात. पण त्याची किंमत काय द्यावी लागेल ह्याचा मात्र त्याने विचार केला नसावा. भरभराटीचे दिवस आहेत तोवर सगळे काही अभूतपूर्व वाटत असते. कायदा मोडण्याचीही सवय लागून जाते. कायद्याचा धाक हळूहळू संपून जातो. कधी चुचकारून तर कधी धमक्या देऊन लोकांना गप्प बसवता येते ह्यावर श्रद्धा बसू लागते. आणि अशीच अधोगती सुरू होते. सिंजोना काय अथवा कानेसी काय - अशा प्रकारच्या व्यक्तींपासून लांब राहून आयुष्य काढणे कठिण नसते पण तीच एक नशा बनून जाते. इतरांना अडकवण्यासाठी जे जाळे विणले जाते त्यात आपणच कधी आणि केव्हा फसतो हे लक्षातही येत नाही. 

सिंजोना - कानेसी - रॉबर्टो काल्व्ही - मॉंतिनी - मार्सिंकस आणि अन्य लोकांच्या गटाने जे चक्र पुढचे दोन शतके घुमवले त्याची मनोरंजक कहाणी तर आता चालू होते आहे. 

Thursday 23 November 2017

सिंजोना भाग ५

बांको अम्ब्रोशियानो - अम्ब्रोशिया बॅंक म्हणजे सिंजोनाच्या कथेमधले एक अविभाज्य पात्र आहे. अर्थातच त्याबद्दल महिती करून घेणे अगत्याचे ठरते. १८४० साली ब्रेशिया येथे जन्मलेल्या जूजेफे तोविनी ह्यांनी १९ व्या शतकाच्या अखेरीला ही बॅंक सुरू केली तेव्हा त्यांचे उद्देश वेगळेच होते. ख्रिश्चियानिटी आणि त्यांच्यामधले पंथभेद - व्हॅटिकन चर्चचा वरचष्मा आणि वरवंटा - त्याला कंटाळून वेगळे होऊ पाहणारी मंडळी - ज्यांना ख्रिश्चन राहायचे आहे पण चर्चची मक्तेदारी आपल्या आयुष्यात नको असे वाटणारे गट इतिहासकालापासून अस्तित्वात आहेत. हे गट चर्चच्या जाचापासून मुक्ती मिळावी म्हणून अत्यंत गुप्तरीत्या आपले व्यवहार करतात असे सांगितले जाते. एखादी व्यक्ती अशा गुप्त संस्थेची सदस्य आहे हे सहजासहजी संस्थेबाहेरच्या व्यक्तीला समजत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत बाळबोध दिसणाऱ्या बाबींपासून सामान्य माणसाला त्यांच्या कार्यामध्ये ओढले जाते. जसजसा विश्वास वाढतो तसतसे त्याला संस्थेच्या स्वरूपाची प्रथम थोडक्यात आणि नंतर विस्तृत माहिती होऊ लागते. एका सभासदाने दुसऱ्या सभासदाविरोधात सरकार दरबारी ब्र ही न काढण्याची शपथ दिली जाते. काही संस्था तर सदस्याला त्याच्या चुकीकरिता ठार मारण्याचा संस्थेचा अधिकारही सदस्याकडूनच मान्य करून घेतात. केवळ परस्परांच्या विश्वासावरती चालणाऱ्या ह्या संस्थांबद्दल भारतात आपल्याकडे पुसटशी कल्पनाही नसल्यामुळे ही माहिती लिहित आहे. अशा संस्थांमधलीच फ़्री मेसन्स ही एक प्रमुख संस्था आहे आणि तिच्याविषयी अगदी विपुल माहिती इंटरनेटवरती उपलब्ध आहे.. खरे तर ह्या बाबींचा मी उल्लेख करण्याचे काहीही कारण नाही. कारण ह्या संस्था केवळ काल्पनिक असून प्रत्यक्षात असे काही नसतेच असे युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. पण सिंजोनाच्या कथेमध्ये अशाच एका गुप्त संस्थेचे वाभाडे अगदी कोर्टदरबारी कागदोपत्री पुराव्यासकट निघाले असल्यामुळेच अगदी निर्धास्तपणे ही माहिती मी लिहित आहे.

तर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला अशा संस्थांचे आणि व्हॅटिकनचे संबंध ताणलेले असणार हे उघड आहे. समाजाच्या प्रत्येक अंगामध्ये त्या काळामध्ये फ्रीमेसन्सचा शिरकाव झालेला होता. ही बाब काही श्रद्धाळु ख्रिश्चनांना बिलकुल आवडत नसे. जितके फ्रीमेसन्स कडवे होते तेव्हढेच कॅथॉलिकही कडवेच होते. जूजेफे तोविनी एक श्रद्धाळु ख्रिश्चन होता. आपल्या आसपास असलेले प्रबळ फ्री मेसन्स बघून तो अस्वस्थ होत असे. पण तो स्वस्थ बसणाऱ्यामधला नव्हता. अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने आपले ध्येय पूर्ण करण्याच्या मागे तो झपाटल्यासारखे काम करत असे. तोविनी एक राजकारणी होता आणि उद्योगपतीही. ब्रेशिया नगरपालिकेचा तो बराच काळपर्यंत एक सदस्य होता. तोविनीने ब्रेशियामध्ये प्रथम एक कॅथोलिक वर्तमानपत्र स्थापित केले. आपले राजकीय सामाजिक आणि उद्योगव्यवसायातील वजन वापरून तो चर्चसाठी धर्मादाय कार्य करत होता आणि खास करून गरीबांना लाभ पोहोचेल अशी कामे हाती घेत असे. तोविनीच्या दृष्टीने व्हॅटिकनवरती कोणत्याही सरकारचा वरचष्मा असता कामा नये कारण ते ख्रिश्चनांचे सर्वोच्च व्यासपीठ आहे आणि त्याला कोणत्याही सरकारसमोर झुकावे लागू नये अशी त्याची इच्छा होती. इटालीमध्ये चर्चला उर्जितावस्था हवी असेल आणि चर्चला आर्थिक स्वायत्तता हवी असेल तसेच पुनश्च चर्चचे राज्य स्थापित करायचे असेल तर चर्चचे आर्थिक व्यवहार समकालीन सरकारच्या अखत्यारीत असता कामा नयेत म्हणजेच चर्चसाठी एक उत्तम बॅंक असावी असे त्याचे ठाम मत होते. खरे तर १६०५ मध्ये पाचवे पोप पॉल यांनी अशाच उद्देशाने बॅंक ऑफ होली स्पिरिट अशा एका बॅंकेची स्थापना केली होती. पण ही बॅंक इटालीच्या सरकारच्या हाती गेल्यापासून चर्चला हवे तसे व्यवहार तिच्यामार्फत करता येईनात. ह्या व्यतिरिक्त व्हॅटिकनकडे इन्स्टिट्यूट फॉर रिलिजियस वर्क नामक बॅंक होती आणि आजही ती कार्यरत आहे. पण त्याव्यतिरिक्त इटालीमधील अन्य बॅंका एक तर फ्रीमेसन्सच्या ताब्यात होत्या नाही तर सरकारच्या - म्हणजेच त्या ’सेक्यूलर’ बॅंका होत्या. तेव्हा चर्चसाठी एका बॅंकेची स्थापना करायचीच असे स्वप्न घेऊनच तोविनी काम करत होता. त्याने १८८८ मध्ये बांका सान पाओलोची ब्रेशिया शहरामध्ये स्थापना केली. पुढे १८९६ मध्ये ही बॅंक त्याने मिलान शहरामध्ये हलवली. मिलान शहराचे ’पॅट्रन सेंट" आणि चौथ्या शतकातले मिलान शहराचे आर्चबिशप सेंट अम्ब्रोस यांचे नाव असावे म्हणून बॅंकेचे नाव बांका अम्ब्रोशियानो असे करण्यात आले.

बॅंकेच्या सभासदत्वाचे नियम अत्यंत कडक होते. त्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला बॅप्टिस्मा घेतल्याचे पत्र तर द्यावे लागेच पण शिवाय तो ज्या पॅरिशच्या हद्दीमध्ये राहत असे त्या पॅरिशच्या फादरकडून तो निष्ठावंत कॅथॉलिक असल्याचे पत्रही द्यावे लागे. कुठूनही बॅंकेमध्ये फ्रीमेसन्स घुसू नयेत म्हणून काळजी घेतली जात असे. तोविनीने १५० श्रद्धाळु श्रीमंत कॅथॉलिकांना एकत्र आणले होते. ह्यांनी काही दशलक्ष लिरा जमा करून बॅंक सुरू केली होती. पोप पायस ११ यांचा भाचा फ्रॅन्को रात्ती बॅंकेचा सेक्रेटरी म्हणून काम करत होता.  कडक आचारसंहिता पाळूनच बॅंकेकडून कर्ज दिले जावे ह्यावर स्वतः तोविनी भर देत असे. साहजिकच मिलानच्या आसपासचे सर्व पॅरिश बॅंकेशी जोडले गेले होते आणि आपले सर्व व्यवहार ते बॅंकेमार्फत करत असत. म्हणूनच बॅंकेचे नाव 'la banca dei preti' - धर्मगुरुंची बॅंक असे पडले होते. १८९७ मध्ये वयाच्या ५७ वाव्या वर्षी तोविनी यांचे निधन झाले. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन पोप पॉल ६ यांनी १९७७ मध्ये बीटीफ़िकेशन समारोह केला. तदनंतर तोविनी यांना संतपद मिळावे म्हणून मार्ग खुला झाला. तोविनी ह्यांनी तळमळीने पूर्ण केलेल्या कामातून बांका अम्ब्रोसियानो ही इटालीमधील दोन नंबरची खाजगी बॅंक म्हणून उदयाला आली. पण दैवगती अशी की व्हॅटिकन चर्चवरती इटालियन सरकारच्या किंवा फ्रीमेसन्सच्या हातचे बाहुले बनायची वेळ येऊ नये म्हणून तोविनीने घेतलेल्या कष्टावरती हळूहळू कसा बोळा फिरवण्यात आला ते पाहून खुद्द तोविनीसुद्धा आपल्याच थडग्यामध्ये अस्वस्थ होऊन गेला असेल. बॅंकेची ही उतरती कळा नेमकी कशी सुरू झाली आणि व्हॅटिकनच्या रक्षणासाठी स्थापन केलेल्या बॅंकेच्या कपटामुळे चर्चवरती नामुष्कीची पाळी झाली ही दुःखद कथा समजून घ्यायची तर बॅंकेची पुढची वाटचाल कशी झाली ते पहावे लागेल.

तोविनी यांच्या पश्चात बॅंकेचे काम विस्तारत होते. पण इटालीमधली परिस्थिती हळूहळू बदलत होती. तिचे भान ठेवून बॅंकेच्या व्यवहारांमध्ये काही फरक करणे गरजेचे होते. ते काम कार्लो कानेसी यांनी सुरु केले. कार्लो कानेसी हे बॅंकेमध्ये उच्च पदावरती होते. १९३६ साली इटालियन सरकारने एक कायदा केला होता. त्यानुसार कोणत्याही एका व्यक्तीला अथवा एका कंपनीला कोणत्याही इटालियन बॅंकेचे ५% पेक्षा जास्त शेयर्स घेण्यास बंदी घालण्यात आली होती. बॅंकेकडे जमा होणाऱ्या पैशाचा कोणी गैरवापर करू नये आणि तसे करण्यातून बॅंकेमध्ये मोठ्या विश्वासाने आपले स्वकष्टार्जित धन ठेवणाऱ्या सामान्य नागरिकांचे नुकसान हो ऊ नये ह्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले होते. ह्या नियमाची व्हॅटिकनला भीती वाटत असे. कारण कोणत्याही एका शेयर होल्डरकडे ५% हून अधिक शेयर्स नसले तर सरकारला बॅंक स्वतःच्या ताब्यात घेणे सोपे होऊन गेले होते. तेव्हा सरकारने बॅंक हाती घेऊ नये म्हणून काही प्रतिबंध घालण्याच्या हेतूने काही सुपीक डोक्याच्या व्यक्तींनी शकला लढवल्या. आणि निदान वरकरणी तरी कायदेशीर वाटावे अशा मार्गाने बॅंकेवरती आपले वर्चस्व कायम राहावे म्हणून ह्यातून पळवाटा शोधण्यात आल्या. ह्यासाठी कानेसींना मदत झाली ती रॉबर्टो काल्व्ही ह्या तरूणाची. पण एकदा का ह्या पळवाटांची चटक लागली की माणसाला थांबावे कुठे ते कळेनासे होते. त्यातूनच जन्माला आली ती बांका अम्ब्रोसियनोची दिवाळखोरी.  त्याची कहाणी पुढील भागामध्ये पाहू. 

Wednesday 22 November 2017

सिंजोना भाग ४


Image result for battista montini


मॉन्तिनी यांचा जन्म १८९७ मध्ये उत्तर इटालीच्या लोम्बार्डी प्रांतातील कॉन्सेशियो (तालुका ब्रेशिया) गावामध्ये झाला. मॉन्तिनी कुटुंब मूळचे ज्यू असावे पण सुमारे शंभर वर्षे आधी त्यांनी कॅथॉलिक धर्म स्वीकारला असावा असे दिसते. त्यांचे वडिल जॉर्जी मोन्तिनी ख्रिश्चन डेमोक्रॅट होते. (आणि कदाचित एखाद्या भूमिगत गुप्त ख्रिश्चन गटाचे सदस्यही असावेत अशी शंका व्यक्त केली जाते. असे गट व्हॅटिकनच्या नियंत्रणाच्या विरोधात काम करत.) जॉर्जी यांनी कायद्याची पदवी घेतल्यावरती इल सिटाडिनो द ब्रेशिया ह्या कॅथॉलिक वर्तमानपत्राचे अधिकार हाती घेतले. तिथे ते डायरेक्टर म्हणून काम करू लागले. अनेक वेळा इटालियन संसदेवरती ते निवडून गेले होते. निवडून गेलेले प्रतिनिधी आणि अंगिकारलेल्या समाजसेवेचा एक भाग म्हणून त्यांनी गरीबांना स्वस्तात अन्न मिळण्याची सोय व्हावी म्हणून खास अन्नदान केंद्र स्थापन केली होती. बेवारस मुलांसाठी - त्यांना राहता यावे अशी एक डॉर्मिटरी देखील काढली होती. तिचे नाव सेंट व्हिंसेंट. तसेच शेतकरी आणि कामगार या गरीब समाज घटकाला कायदेविषयक सल्ला मोफत मिळावा म्हणून पीपल्स सेक्रेटरियट संस्थेची स्थापना केली होती.

अशा वातावरणामध्ये मॉन्तिनी यांचे लहानपण गेले. घरामध्ये राजकारणाचे आणि सामाजिक बांधिलकीचे वारे अगदी सहजच वाहत होते. अगदी लहानपणापासून त्यांनी चर्चमध्ये सेवेसाठी जाण्याची इच्छा दर्शवली होती. नाजूक प्रकृतीमुळे सेमिनरीमध्ये शिक्षण न घेता घरीच शिक्षण घेण्याची सोय करावी लागली होती. ह्यामुळे घरामध्ये मिळणार्‍या अन्य विचारांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहांमध्ये आणि व्यक्तींमध्ये ते मुक्तपणे मिसळू शकले. ह्यामुळे एक सर्वांगी व्यक्तिमत्व तयार होण्यास ह्या वातावरणाची मदत झाली. सेमिनरीमध्ये शिक्षण घेण्यार्‍या मुलांना इतर विचारांच्या समूहांमध्ये मिसळण्याचे संधी प्राप्त होणे कठिण. मग सेमिनरीमध्ये शिकून चर्चमध्ये काम करू इच्छिणार्‍या एखाद्या व्यक्तीला अशी मोकळीक कशी मिळणार? अशी एका वेगळी पार्श्वभूमी लाभलेले मॉन्तिनी यांना वयाच्या विसाव्या वर्षी धर्मगुरु - प्रिस्ट म्हणून मान्यता मिळाली. यानंतर सांता मरिया देले ग्राझी ह्या चर्चच्या पॅरिशमध्ये काम करण्याऐवजी त्यांनी पुढील शिक्षणासाठी रोमला जावे असे त्यांचे बिशप गाग्गी यांनी ठरवले.

रोममध्ये त्यांनी दोन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला - जेसुईट पद्धतीचे ग्रेगॉरियन विद्यापीठ तसेच सरकारी ’सेक्यूलर’ विद्यापीठ सेपिएन्झा. शिवाय ल फ़िओंदा ह्या वर्तमानपत्रासाठी ते बातम्या लिहिण्याचे काम करत आणि वडिलांना निवडणुकीच्या कामामध्येही मदत करत. १९२० मध्ये पहिल्यांदा इटालीच्या संसदेवरती ३६ फॅसिस्ट सदस्य निवडले गेले. इथे १९२१ मध्ये मॉन्तिनी ह्यांना बिशप पिझार्दो ह्यांनी अकादमी ऑफ एक्लेसियास्टिकल नोबिलिटी ह्या अतिप्रतिष्ठित संस्थेमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास सुचवले. ह्या अकादमीमध्ये विद्यार्थ्यांना व्हॅटिकनसाठी राजदूत होण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. दोन वर्षांच्या जर्मनी आणि ऑस्ट्रियामधील प्रवासानंतर मॉन्तिनी ह्यांना कॅनॉनिकल लॉ विषयामध्ये डॉक्टरेट मिळाली. ह्यानंतर रोममध्ये युनिव्हर्सिटी चॅपलेन म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांच्यावरील डाव्या विचारांचा प्रभाव ठळक होता पण ते तेव्हढ्याच सहजपणे रोमच्या कर्मठ वातावरणामध्ये मिसळून काम करू शकत होते. व्हॅटिकनमध्येच स्टेट अंडरसेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्तीही झाली. जॅक्स मार्टेन ह्या तत्ववेत्त्याच्या एकात्म मानवता ह्या संकल्पनेचा त्यांच्यावरती प्रभाव होता. ह्या संकल्पनेमध्ये एकाधिकारशाही मार्गाने जाण्यापेक्षा ख्रिश्चन नसलेल्या इतर धर्मियांनाही एकत्र घेऊन मार्गक्रमणा करण्याचे विचार त्यांना आवडत होते. केवळ चर्च सांगते त्याच मार्गाने जाऊन जागतिक ऐक्य स्थापन करण्याचा विचार एकेकाळी कदाचित ठीक असेलही पण आता मात्र आपल्याभोवतालच्या सामाजिक आणि आर्थिक स्पंदनांचा विचार दूर ठेवून चालणार नाही असे मार्टेनचे म्हणणे होते. एक वेळ चर्चचा घंटानाद ऐकला नाही तरी चालेल पण कारखान्याचे भोंगे मात्र ऐकता आले पाहिजेत. जिथे आधुनिक मानवाच्या आयुष्याला नवी दिशा मिळते त्या तंत्रज्ञानाच्या नव्या विद्यापीठांकडे चर्चचे लक्ष हवे असे हे विचार होते. इटालीमधील कर्मठ कॅथॉलिक वातावरणामध्ये तर ते क्रांतीकारकच म्हटले पाहिजेत.

अशा वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या मॉन्तिनी ह्यांची रोममधील कामगिरी भरीव होती. त्यांच्या पार्श्वभूमीमुळेच १९४४ मध्ये इटालियन कम्युनिस्ट नेते पामिरो तोग्लियाती यांनी मॉन्तिनी यांची भेट घेतली. तोग्लियाती इटालीच्या मंत्रीमंडळामध्ये बिनखात्याचे मंत्री होते. तोग्लियाती यांनी रशियामध्ये स्टॅलिन धर्मस्वातंत्र्य देण्यास तयार असल्याचे मॉन्तिनी यांना सांगितले. यानंतर ख्रिश्चन डेमोक्रॅट - सोशियलिस्ट आणि कम्युनिस्ट यांच्यामध्ये ’राजकीय युती’ होऊ शकते असा पर्याय उभा राहिला. अशी युती अस्तित्वात आलीच तर कोणत्याही राजकीय घडामोडींना चपखल प्रत्युत्तर देण्याची शक्यता निर्माण झाली. चर्चच्या कम्युनिस्ट विरोधी धोरणाकडे संशयाने पाहू नये असे मॉन्तिनी यांनी तोग्लियाती यांना सुचवले. कम्युनिस्ट आणि व्हॅटिकन यांच्यामधला सामंजस्याचा हा पहिला प्रयत्न होता असे म्हणता येईल.

दुसरे महायुद्ध संपण्याच्या प्रचंड घडामोडींच्या काळामध्ये स्टेट अंडरसेक्रेटरी म्हणून मॉन्तिनी ह्यांना अतिशय समृद्ध अनुभव मिळाला असे म्हणता येईल. या काळामध्ये अनेक ठिकाणाहून निर्वासित येत असत. त्यांची सोय लावण्याचे मोठे काम व्हॅटिकन करत असे. ह्यातून त्यांचे संपर्क सुद्धा वाढले. पण तोग्लियाती ह्यांच्याबरोबरची बोलणी तत्कालीन पोप ह्यांना पसंत पडली नाहीत. १९५४ मध्ये त्यांनी मॉन्तिनी ह्यांची नेमणूक मिलान शहरामध्ये केली. ही नेमणूक होईपर्यंत मिलान शहराला केवळ कार्डिनलचे पद मिळत असे. तिथे आर्चबिशपचे काम काय? एक प्रकारे ही पदावनतीच असावी. पण मॉन्तिनी आपल्या कामामध्ये गर्क राहिले.

तर अशा प्रकारे मॉन्तिनी ह्या बड्या प्रस्थासाठी पात्तीच्या बिशपकडून शिफारस घेऊन आलेल्या सिंजोनाला मिलान शहरामध्ये भरभराटीचे दिवस येणे स्वाभाविक होते. आपल्या स्वभावानुसार सिंजोनाने तिथे मित्र जमवले. मॉन्तिनी ह्यांना एक वृद्धाश्रम चालवायचा होता. त्यांना पैशाची गरज आहे असे दिसताच सिंजोनाने लगबगीने हालचाली करून एका दिवसात चोवीस लाख डॉलर्स उभे केले. कासा दिल्ला मॅडोन्निनाच्या उद् घाटन समारंभामध्ये मॉन्तिनींच्या बाजूलाच सिंजोना बसला होता. हे मानाचे स्थान त्याने खटपटीतून मिळवले होते. सिंजोनाने इतके पैसे कुठून आणले हे मॉन्तिनी यांनी विचारले सुद्धा नाही. चोवीस लाखामधला एक हिस्सा आला होता माफियांकडून. आणि दुसरा सीआयए कडून. माजी सीआयए अधिकारी व्हिक्टर मर्चेती म्हणतो की त्याकाळामध्ये कॅथॉलिक चर्चच्या वृद्धाश्रमासारख्या अनेक बाबींसाठी अमेरिकन सरकार सीआयएच्या माध्यमामधून कोट्यवधी डॉलर्स ओतत होते.

इथे कथेमध्ये आणखी एका संस्थेचा प्रवेश होत आहे. ती म्हणजे बांका अम्ब्रोसियानो आणि तिचा प्रमुख रॉबर्टो काल्व्ही! मॉन्तिनी यांच्या चर्चचे बॅंक खाते मिलानच्या बॅंका अम्ब्रोसियानोमध्ये होते. सेंट अम्ब्रोसियानो यांच्या नावे चालवण्यात येणार्‍या बॅंकेची ख्याती आणि सिंजोना ह्यांचा अर्थातच घनिष्ठ संबंध आहे. त्यविषयी पुढील भागामध्ये माहिती घेऊ.



Tuesday 21 November 2017

सिंजोना भाग ३

अमेरिकन सामाजिक आणि राजकीय जीवनावरती आपली पकड कायम ठेवणार्‍या माफियांबद्दल नवा विचार सुरू झाला होता. दुसरे महायुद्ध चालू झाले तसे याच माफियांचा अमेरिकन राजकरण्यांनी खुबीने वापर करून घेतलेला दिसतो. राजकारणामध्ये अतर्क्य शक्ती एकमेकांना साथ देताना दिसतात. व्यवसायाने वकील - आणि सरकारी प्रॉसिक्यूटर असलेले थॉमस ड्युई यांनी न्यूयॉर्क शहरामधल्या माफियांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. (हेच ड्युई पुढे न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर म्हणून काम करत होते आणि १९४४ साली रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा होते.) कापो दि तुत्ती कापो - बॉस ऑफ द बॉसेस् म्हणून प्रसिद्ध असलेला गॅंगस्टर म्हणजे चार्ली लकी लुचान्या.  १९४२ मध्ये ड्युईने अमेरिकेतील ह्या इटालियन माफिया गॅंगस्टरला वेश्याव्यवसाय चालवण्याच्या आरोपाखाली जेरबंद केले आणि कोर्टामध्ये गुन्हा सिद्धही करून घेतला. पण दिवस महायुद्धाचे होते. न्यूयॉर्कच्या आसपासच्या समुद्रकिनार्‍याजवळ शत्रू सैन्याच्या हालचाली हो्ऊ लागल्या होत्या. त्यांची पक्की खबर देण्याचे जाळे फक्त माफिया गॅंगस्टर्स कडेच होते. अशा खबरी बॉस ऑफ द बॉसेस चार्ली लकी लुचान्याने आपल्या टोळ्या वापरून आरमाराला द्याव्यात आणि बदल्यात त्याला तुरुंगवास माफ करून आणि सिसिलीमध्ये परत पाठवावे असा निर्णय ड्युईने घेतला होता. चार्ली साठी हा सौदा ठीकच होता कारण सौद केला नाही तर तुरुंगात सडत राहावे लागले असते, अमेरिकेतील स्वच्छंद आयुष्य काही उपभोगता आले नसते. असे राहण्यापेक्षा जीवंतपणी त्याला - सिसिलीमध्ये का होई ना - स्वातंत्र्य उपभोगण्याचा रस्ता खुला होत होता. प्रत्यक्षात अमेरिकनांना दुसराही लाभ उठवायचा होता. त्यांना लुचान्यासारखे गॅंगस्टर्स आता सिसिलीमध्ये हवे होते. सिसिलीमध्ये राजकीय परिस्थिती बदलत होती. राजकारणी - माफिया आणि चर्च यांच्या संगनमताने चालणार्‍या कारभारापेक्षा जनतेला कम्युनिस्ट जवळचे वाटू लागले होते. जनमतातील बदलाचा प्रत्यय १९४७ मध्ये सिसिलीतील निवडणुकांमध्ये आला. निवडणुकीत कम्युनिस्टांचे बहुमत बघून व्हॅटिकन चर्चचेही धाबे दणाणले. त्यांनी ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाला मदत करायचा निर्णय घेतला. सिसिलीमधून कम्युनिस्टांना हाकलण्यासाठी ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाने माफियांची मदत घ्यायचे ठरवले. अशा तर्‍हेने चर्चला गुन्हेगारीचे वावडे नव्हते हे सिद्ध झाले. चर्चला कम्युनिस्ट नको होतेच पण अमेरिकनांनाही कम्युनिस्ट नकोच होते. कम्युनिस्ट पक्षावरती मात करायची तर लोक ज्यांना घाबरतात त्या माफियांची मदत अनिवार्य होती.  त्यामुळे त्यांनीही माफियांवर भिस्त ठेवली होती. पक्षाचे नेते म्हणून माफियांना मान्यता द्यावी आणि त्याबदल्यात माफियांनी कम्युनिस्टांना सिसिलीमधून हाकलावे असे ठरले. मग माफियांनी साल्वातोर ज्युलियानो ह्याला नेता म्हणून जाहिर केले. त्याचा सख्खा मामे भाऊ गॅस्पारी पिसोत्ता आणि ज्युलियानो एकत्र काम करत. १ मे १९४७ रोजी कामगार दिन साजरा करण्यासाठी प्याना देल्ली अल्बानेसी या पालेर्मो जवळच्या गावात आसपासचे गरीब शेतकरी व अन्य लोक जमले होते. सभेमध्ये त्यांचा कम्युनिस्ट नेता निकोला बार्बातो भाषण करणार होता. मुसोलिनीच्या फासिस्ट राजवटीत कम्युनिस्टांवर बंदी होती. ती उठताच निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. निवडणुकीचे निकाल जाहिर होऊन नुकतेच बारा दिवस झाले होते.  बार्बातोचे भाषण ऐकण्यासाठी लोक उत्सुक होते. एवढ्यात साल्वातोर - पिसोत्ता आणि अन्य साथीदार तेथे पोहोचले आणि त्यांनी सभास्थानी बेछूट गोळीबार केला. अकरा जण मरण पावले तर २७ जखमी झाले. ह्या शिरकाणानंतर लोकांनी "घ्यायचा" तो धडा घेतला - माफियांना कम्युनिस्ट नको आहेत हे स्पष्ट होताच घाबरलेल्या जनतेने जीव वाचवण्यासाठी आपल्या मर्यादेत राहणे पसंत केले. . नव्याने घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये कम्युनिस्टांचा पराभव झाला आणि ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाच्या तिकिटावर माफिया गॅंगस्टर निवडून आले. ही गोष्ट अशासाठी उद् धृत केली आहे की इटालीमधील राजकारणाचे वारे कसे वाहत होते याची कल्पना यावी. 

अशाच वातावरणामध्ये सिंजोना मिलान शहरामध्ये पोहोचला होता. तेथे आपल्या कायदा विषयातील पदवीचा उपयोग करत त्याने टॅक्स कन्सल्टंट म्हणून कामाला सुरुवात केली. (Società Generale Immobiliare,  Snia Viscosa) ह्या कंपनीमध्ये त्याने Accountancy कामाला सुरुवात केली. ह्या कंपनीची स्थापना ट्युरीन शहरातली! (याच शहराच्या जवळच्या ऑर्बासानो गावामध्ये श्रीमती सोनिया गांधी यांचे शालेय जीवन व्यतीत झाले. आणि त्यांचे पिताश्री स्टिफेनो मेनो हे कर्मठ कॅथॉलिक - मुसोलिनीचे समर्थक - युद्धामध्ये भाग घेतलेले आणि युद्धानंतरच्या आयुष्यामध्ये बांधकाम व्यवसायामध्येच होते). द जनरल कंपनीकडे इटालीमधली बिल्डिंग व्यवसायामधली मोठाली प्रॉजेक्टस् होती. व्हॅटिकनने कंपनीमध्ये पैसा गुंतवला होता. आणि रोमच्या आसपासची जमीन कंपनीच्या ताब्यात होती. (ह्या कंपनीचा उल्लेख The Godfather Part 3 ह्या कादंबरीत केलेला आढळतो. सिंजोनाने जी बॅंक बुडवली त्या घोटाळ्यामध्येही कंपनीचा सहभाग होताच!) दुसरी कंपनी होती स्निया. ह्या कंपनीमध्ये ट्युरीन शहरातील रिकार्डो जुलिनो यांनी गुंतवणूक केली होती. आणि तिचे दुसरे भागीदार होते ट्युरीनमधील सुप्रसिद्ध फियाट कंपनीचे उपाध्यक्ष जूवानी अग्निलो. (ह्याच फियाट कंपनीमध्ये सोनियाजींच्या बहिणीचा पती वॉल्टर व्हिंची इंजिनियर म्हणून काम करत असे. सुरक्षेच्या कारणास्तव शिक्षणासाठी केलेल्या परदेशी वास्तव्यामध्ये श्री राहुल गांधी आपले नाव राऊल व्हिंची असे लावत असल्याचे सांगितले जाते.) कंपनीतर्फे रासायनिक उत्पादने तसेच संरक्षण विषयक उत्पादने (रॉकेट सिस्टीम) बनवली जात. 

ह्या अनुभवानंतर कर कसा बुडवावा यामध्ये सिंजोनाचे सुपीक डोके करामती करु लागले. सिसिलीतील माफिया मिलानमध्येही काम करत. सिंजोनाने त्यांच्याशी संधान बांधले. व्हिटो जिनोव्हीजसारख्या बड्या माफियाशी उत्तम संबंध असल्यामुळे त्याने लवकरच मिलानमध्ये आपले बस्तान बसवले. इतकेच नव्हे तर कम्युनिस्टांचा पाडाव करण्याच्या समान भूमिकेमुळे चर्चही माफियांच्या जवळ आलेले होतेच. मसिनाच्या आर्चबिशपने सिंजोनाला मिलानमधील आर्चबिशप मॉन्तिनी यांच्या नावे शिफारसपत्र दिले होते. मॉन्तिनी यांचे शिक्षणही एका जेसुईट शाळेमध्ये झाले होते.  सिंजोनाने आपल्या स्वभावानुसार त्यांच्याशी सूत जमवले. त्यांचे संपूर्ण नाव होते जूवानी बात्तिस्ता मॉन्तिनी. सिंजोनाच्या उत्कर्षामध्ये मॉन्तिनी यांचा मोठा वाटा असल्यामुळे त्यांच्याविषयी थोडी माहिती पुढील भागामध्ये घेऊ.

Sunday 19 November 2017

सिंजोना भाग २

मिकेले सिंजोनाचे आयुष्य म्हणजे एक हिंदी सिनेमा आहे की काय असे तुम्हाला वाटेल. सिसिलीच्या पात्ती या खेड्यामध्ये १९२० साली एका गरीब कुटुंबात जन्म घेतलेला मुलगा. त्याचा जन्म झाला त्यावेळी पहिले महायुद्ध नुकतेच संपलेले होते. पण युरोप अशांतच होता. खरे तर त्याचे आजोबा नामवंत होते - श्रीमंत होते. पण वडिलांनी मात्र सर्व मिळकत जुगारामध्ये गमावली. मिळकत जुगारामध्ये गमावल्यानंतर वडिल पुढे फुलांच्या सजावटीचा व्यवसाय करत असत - खास करुन थडगी आणि शवपेटिकेच्या सजावटीचा. पण नियमित पैसा हाती येत नव्हता. आई आजाराने अंथरुणाला खिळलेली असे. अशा परिस्थितीमध्ये आजीने नातवंडे वाढवली. घरामध्ये जेसुईट पंथाचे वातावरण होते. सिसिली हे एक वैशिष्ट्यपूर्ण बेट आहे. एरव्ही आपण आर्किमिडीजसाठी सिसिलीबद्दल वाचतो. पण आजच्या युगामध्ये सिसिलीची ख्याती आहे ती माफिया गॅंगस्टर्स आणि त्यांच्या आपापसातील सशस्त्र रक्तरंजित मारामार्‍यांसाठी. इतिहासात बराच काळपर्यंत सिसिलीवर परकीयांचे राज्य होते. परकीयांचा वरवंटा आपल्या डोक्यावरती फिरू नये म्हणून आपापसातील भांडणे कधी परकीय पोलिसाकडे न्यायची नाहीत हा तिथला अलिखित नियम बनून गेला आहे. त्यालाच लॉ ऑफ ओमेर्टा म्हटले जाते. पुढे हा हेतू मागे पडला आणि ओमेर्टाचा गैरवापर सुरू झाला. ओमेर्टाच्या पडद्याआड राहून किरकोळ गुन्हेगारच नव्हे तर गुंडांच्या टोळ्या - गॅंगस्टर्स - हेही त्याचा गैरफायदा घेऊ लागले. सिसिलीमध्ये अनिर्बंध गुन्हेगारी चालत असे आणि इकडचा शब्द तिकडे होत नसे. सूड घेतले जात पण पोलिसांना गुन्हेगार मिळत नसत - जणू काही पोलिसाकडे जाऊन अथवा न्यायालयामध्ये जाऊन न्याय मिळवणे सिसिलीचे नागरिक विसरून गेले होते. सिसिलीमध्ये जन्मलेल्या मुलाला असे "माफियोसी" आसपास सहज बघायला मिळत. त्यांचा रुबाब त्यांच्याकडील अफाट संपत्ती भुरळ घालणारी असे. 

गरीबीमध्ये दिवस काढणार्‍या सिंजोनाला संपत्तीचे आकर्षण वाटले तर नवल नाही. शाळेमध्ये तो कधी फारसा चमकला नाही. पण त्याची बुद्धिमत्ता स्वस्थ बसत नव्हती. त्याच्या डोक्यामध्ये सतत विचार चालत. शाळा संपल्यानंतर त्याने कायदा विषयाचा अभ्यास करून पदवी घेण्याचे ठरवले. यासाठी तो मसिना विद्यापीठामध्ये दाखल झाला. त्याला लॅटिन भाषेमध्ये रस आणि गती होती. व्हर्जिल आणि सिसेरो सारख्या लेखकांची पुस्तके तो वाचत होता. आपल्या इटालियन भाषेच्या ज्ञानाचा फायदा केवळ संभाषणासाठी न करता तो डांटे आणि मॅकीवेली समजून घेण्यासाठी करत होता. खास करुन मॅकीवेली हा त्याचा अभ्यासाचा विषय होता आणि त्यावरच त्याने आपल्या पदवीसाठी एक प्रबंध लिहिला होता. नीत्से - ऍडम स्मिथ - पास्कल हेही त्याचे आवडते लेखक होते पण मॅकीवेली सर्वात आवडता. मसिना विद्यापीठात शिक्षण पूर्ण करून त्याने कायदा विषयातील पदवी घेतली. ख्रिश्चन धर्माचे मुख्य शहर रोम इथे त्याच्या शिक्षणाला किंमत होती. व्हॅटिकनच्या दृष्टीने लॅटिन ही एक जिवंत भाषा आहे आणि सिंजोनाचे त्यातील प्रभुत्व भविष्यात व्हॅटिकन मधील अनेकांच्या जवळ जाण्याचे एक साधन ठरले. 

सिंजोनाचे शिक्षण पूर्ण होत आले तोवर दुसर्‍या महायुद्धाचे ढग जमा होत होते. मुसोलिनीने आपल्या राजवटीमध्ये माफिया गॅंगस्टर्स विरोधात आघाडीच उघडली होती. त्यामुळे ते दबलेले होते. काही तर परागंदा होऊन अमेरिकेत पोहोचले होते. पण दोस्त राष्ट्रांनी जेव्हा सिसिलीवर हल्ला चढवला आणि मुसोलिनीचा पराभव होऊ लागला तेव्हा माफियांनी पुन्हा डोके वर काढले. सिसिलीमध्ये दडलेल्या जर्मन सैनिकांच्या बातम्या अमेरिकन सैन्याला हव्या असत. त्यांना अनेक वस्तूंची रसदही लागत असे. ती पुरवण्याचे काम माफियांवर ’सोपवले’ गेले होते. अशा तर्‍हेने अमेरिकन सैन्याच्या पाठिंब्यावर आणि त्यांच्या आशिर्वादाने सिसिलीमधल्या माफियांना पुनश्च चांगले दिवस आले. सरकार नावाची चीज अस्तित्वात नसलेल्या सिसिलीमध्ये जे पिकवले जात होते त्यावर माफियांचे नियंत्रण होते. (म्हणजे शेतकर्‍याने ते कोणाला व किती भावात विकावे हे माफियाच ठरवत.) शेतकर्‍याला अन्य गुंडांकडून ’संरक्षण’ मिळवण्यासाठी स्थानिक माफियांना दुखावून चालत नसे. माफियांच्या टोळ्यांमध्ये आपसात संघर्ष चालत. पण माफियांनी मान डोलावेपर्यंत गावामध्ये इकडची काडी तिकडे होत नसे. नागरिकांना हे व्यवहार इतके अंगवळणी पडले होते की त्यामध्ये त्यांना काही वावगे वाटेनासे झाले होते. 

शेतकर्‍याचा शेतमाल माफिया विकत शिवाय अमेरिकन सैन्याच्या गोदामातून चोरलेल्या वस्तू गावातल्या लोकांना चढ्या दराने विकत असत. सिंजोनाही ही कामे करु लागला. त्याने एक ट्रक विकत घेतला. आणि अमेरिकन सैनिकांसाठी छोट्य़ा मोठ्या वस्तूंची ने आण करण्याची कामे तो करु लागला. अर्थात माफियांच्या आशिर्वादाशिवाय हे करणे शक्य नव्हते. कारण सीमेवरील रखवालदाराला जे कागद द्यायचे ते फक्त माफियाच पुरवू शकत होते. माफियांच्या उद्योगांमध्ये गावातले चर्च देखील सामिल असे. सिंजोनाच्या तारुण्यामध्ये युद्धकालीन परिस्थितीमध्ये सैन्यात भरती अनिवार्य होती. पण पात्तीच्या बिशपने त्याची त्यातून सुटका केली. सिंजोना बुसुरगी नामक कंपनीमध्ये शिक्षण चालू असतानाच काम करत असे. ही कंपनी सिट्रस फळांचा अर्क काढण्याच्या उद्योगात होती. तिला सिट्रस फळे पुरवण्याचे काम सिंजोनाने करावे असे बिशपने सुचवले आणि त्याच्या मार्गातील अडथळे "दूर" केले. माफिया बॉस व्हिटो जिनोव्हीजशी (ज्याच्यावर मारियो पुझोने गॉडफादर कादंबरी बेतली आहे असे म्हटले जाते तो गॅंगस्टर) संपर्क साधून सिंजोनाला मदत करा म्हणून बिशपनेच सांगितले. सिंजोनाने व्हिटोला आपल्या नफ्यामधला हिस्सा द्यावा आणि बदल्यात अन्य माफियांपासून व्हिटोने त्याला संरक्षण द्यावे अशी ही व्यवस्था होती. अशा प्रकारे ही कामे करत असताना सिंजोना बड्याबड्या माफिया गॅंगस्टर्सच्या संपर्कात आला होता. 

सिंजोनाने प्रचंड मेहनत घेतली. काही दिवस त्याने एका वकिलाच्या ऑफिस मध्ये काम केले. तो दिवसाचे १५ तास काम करत असे आणि आठवड्याची रजाही घेत नव्हता. धंद्यामुळे सिंजोनाच्या हातात पैसा खेळू लागला होता. बरकतीचे दिवस होते. काळ्या बाजाराचे ’नियम’ आणि ’रीतीभात” सिंजोनाने स्वानुभवाने जाणून घेतले होते. माफियांच्या कामावर खुश झालेले अमेरिकन सैनिक त्यांनीच भेट म्हणून दिलेल्या किमती गाड्या फिरवत. काळ्या बाजाराच्या व्यवहारांमध्ये गुंतलेला सिंजोना सवड मिळेल तसे जर्मन तत्ववेत्ता नीत्सेचे तत्वज्ञान वाचत असे. याखेरीज अर्थव्यवस्था आणि आर्थिक व्यवहारांची बारकाईने माहिती घेऊन त्यात त्याने प्राविण्य मिळवले होते. सिंजोनाचे डोके भन्नाट आहे हे व्हिटोने बघितले होते. तसेच मसिनाचा बिशपही त्याला ओळखू लागला होता. युद्ध संपता संपता म्हणजे १९४५ च्या सुमारास सिंजोनाने दक्षिण इटाली सोडून उत्तरेकडे जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याच्याकडे व्हिटो जिनोव्हीजचे आशीर्वाद
आणि मसिनाचे आर्चबिशप अशी मातबरांची शिफारस पत्रे होती. अशा शिफारसी हाती घेउन तो इटालीच्या मिलानमध्ये पोहोचला तेव्हा आयुष्यातील एक मोठी संधी त्याच्यासाठी जणू वाट पहात होती. (बोफोर्स प्रकरणातील ओताव्हियो क्वात्रोकी १९३८ साली सिसिलीच्या मस्काली गावामध्ये जन्मला होता. हे गाव सिंजोनाच्या पात्तीपासून पायी चालत अवघ्या ६६ किलोमीटरवरती आहे. क्वात्रोकीदेखील पुढे मिलान शहरामध्येच पोहोचला.) 

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीपासून सिसिलीमधले अनेक गुंड अमेरिकेमध्ये जात होते. अमेरिकेमध्ये पोहोचल्यावरही तिथल्या इटालियन समुहांमध्ये ओमेर्टा कसोशीने पाळला जाई. त्या दिवसांमध्ये न्यू यॉर्क सारख्या शहरांमध्ये निर्वासितांच्या मोठ्या वसाहती होत्या. अंगामध्ये फारसे कौशल्य नसलेली ही माणसे तिथे गेल्यावरही आपले गुन्हेगारी व्यवसाय करत असत. आणि तिथे देखील इटालीप्रमाणेच आपापल्या टॊळ्या बनवून निर्वेधपणे व्यवहार करत असत. ओमेर्टामुळे हुशार अमेरिकन पोलिसांना देखील गुन्हेगारांचा छडा लागत नसे. शिवाय त्याकाळामध्ये अमेरिकन पोलिसातही भ्रष्टाचाराचे साम्राज्य होते. ह्या सर्व परिस्थितीमध्ये माफिया गुंडांची फावले नसते तरच नवल होते. एक काळ असा होता की न्यूयॉर्क शहरामध्ये विकल्या जाणार्‍या प्रत्येक पावावरही माफियांना त्यांचा हिस्सा मिळत होता आणि पोलिसांना सुद्धा. तिथले राजकरणीही त्यामध्ये सामिल होते. त्याकाळामध्ये न्यूयॉर्कच्या टॅमनी हॉलवरती माफियांचा वरचष्मा होता. असे म्हणतात की पुढच्या काळापर्यंत अगदी खुद्द केनेडीच नव्हे तर निक्सन यांच्या निवडीमागे माफियांचाच पैसा होता असे म्हटले जाते. ह्या काळामधल्या माफियांच्या कहण्या न संपणार्‍या आहेत आणि पावलोपावली भारतीय परिस्थितीची आठवण करून देणार्‍या आहेत. 


दुसरे महायुद्ध चालू झाले तसे याच माफियांचा अमेरिकन राजकरण्यांनी खुबीने वापर करून घेतलेला दिसतो. राजकारणामध्ये अतर्क्य शक्ती एकमेकांना साथ देताना दिसतात. व्यवसायाने वकील - आणि सरकारी प्रॉसिक्यूटर असलेले थॉमस ड्युई यांनी न्यूयॉर्क शहरामधल्या माफियांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. (हेच ड्युई पुढे न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर म्हणून काम करत होते आणि १९४४ साली रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा होते.) कापो दि तुत्ती कापो - बॉस ऑफ द बॉसेस् म्हणून प्रसिद्ध असलेला गॅंगस्टर म्हणजे चार्ली लकी लुचान्या.  १९४२ मध्ये ड्युईने अमेरिकेतील ह्या इटालियन माफिया गॅंगस्टरला वेश्याव्यवसाय चालवण्याच्या आरोपाखाली जेरबंद केले आणि कोर्टामध्ये गुन्हा सिद्धही करून घेतला. पण दिवस महायौद्धाचे होते. न्यूयॉर्कच्या आसपासच्या समुद्रकिनार्‍याजवळ शत्रू सैन्याच्या हालचाली हो ऊ लागल्या होत्या. त्यांची पक्की खबर देण्याचे जाळे फक्त माफिया गॅंगस्टर्स कडेच होते. अशा खबरी बॉस ऑफ द बॉसेस चार्ली लकी लुचान्याने आपल्या टोळ्या वापरून आरमाराला द्याव्यात आणि बदल्यात त्याला तुरुंगवास माफ करून आणि सिसिलीमध्ये परत पाठवण्याचा निर्णय घेतला गेला होता. चार्लीसाठी हा सौदा ठीकच होता कारण तुरुंगात सडत राहण्यापेक्षा जीवंतपणी त्याला - सिसिलीमध्ये का होई ना - स्वातंत्र्य उपभोगण्याचा रस्ता खुला होत होता. प्रत्यक्षात अमेरिकनांना दुसराही लाभ उठवायचा होता. त्यांना लुचान्यासारखे गॅंगस्टर्स आता सिसिलीमध्ये हवे होते. 

सिस्लीमध्ये राजकीय परिस्थिती बदलत होती. राजकारणी - माफिया आणि चर्च यांच्या संगनमताने चालणार्‍या कारभारापेक्षा जनतेला कम्युनिस्ट जवळचे वाटू लागले होते. १९४७ मध्ये सिसिलीतील निवडणुकांमध्ये कम्युनिस्टांचे बहुमत बघून व्हॅटिकन चर्चचेही धाबे दणाणले. त्यांनी ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाला मदत करायचा निर्णय घेतला. सिसिलीमधून कम्युनिस्टांना हाकलण्यासाठी ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाने माफियांची मदत घ्यायचे ठरवले. अशा तर्‍हेने चर्चला गुन्हेगारीचे वावडे नव्हते हे सिद्ध झाले. चर्चखेरीज अमेरिकनांनाही कम्युनिस्ट नकोच होते. त्यामुळे त्यांनीही माफियांवर भिस्त ठेवली होती. पक्षाचे नेते म्हणून माफियांना मान्यता द्यावी आणि त्याबदल्यात माफियांनी कम्युनिस्टांना सिसिलीमधून हाकलावे असे ठरले. मग माफियांनी साल्वातोर ज्युलियानो ह्याला नेता म्हणून जाहिर केले. त्याचा सख्खा मामे भाऊ गॅस्पारी पिसोत्ता आणि ज्युलियानो एकत्र काम करत. १ मे १९४७ रोजी कामगार दिन साजरा करण्यासाठी प्याना देल्ली अल्बानेसी या पालेर्मो जवळच्या गावात आसपासचे गरीब शेतकरी व अन्य लोक जमले होते. त्यांचा कम्युनिस्ट नेता निकोला बार्बातो भाषण करणार होता. मुसोलिनीच्या फासिस्ट राजवटीत कम्युनिस्टांवर बंदी होती. ती उठताच निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. निवडणुकीचे निकाल जाहिर हो ऊन नुकतेच बारा दिवस झाले होते.  बार्बातोचे भाषण ऐकण्यासाठी लोक उत्सुक होते. एवढ्यात साल्वातोर - पिसोत्ता आणि अन्य साथीदार तेथे पोहोचले आणि त्यांनी सभास्थानी बेछूट गोळीबार केला. अकरा जण मरण पावले तर २७ जखमी झाले. ह्या शिरकाणानंतर लोकांनी "घ्यायचा" तो धडा घेतला - माफियांना कम्युनिस्ट नको आहेत हे पुढे येताच घाबरलेल्या जनतेने जीव वाचवण्यासाठी आपल्या मर्यादेत राहणे पसंत केले. . नव्याने घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये कम्युनिस्टांचा पराभव झाला आणि ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाच्या तिकिटावर माफिया गॅंगस्टर निवडून आले. ही गोष्ट अशासाठी उद् धृत केली आहे की इटालीमधील राजकारणाचे वारे कसे वाहत होते याची कल्पना यावी. 



Saturday 18 November 2017

नोटा छपाईची कथा भाग २



लिबियाच्या नोटा छपाईची कथा डोळ्यामध्ये अंजन घालणारी आहे. एखाद्या देशाला कमरेत वाकवायचे असले रामबाण पाश्चात्यांनी आपल्या हाती ठेवले आहेत. पण देशादेशामधले वैर आणि स्पर्धा कोणत्या पातळीवर जातात हे पहायचे तर चेचन्याच्या उदाहरणाकडे बघावे लागेल.

सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर अनेक देश संघराज्यामधून बाहेर पडले. असाच प्रयत्न करणार्‍यांमध्ये चेचन्या होता. त्या दिवसात चेचन्यामध्ये कायद्याचे राज्य अस्तित्वात नव्हते म्हटले तरी चालेल. अशातच काही जण  Ruling Council नावाने देशाची सूत्रे आपल्याकडे असल्यासारखे निर्णय घेत होते. त्या कौन्सिलमध्ये रुसलान डेप्यूटी चेअरमन म्हणून काम करत असे. १९९२ मध्ये चेचन्यातील डमी सरकारमध्ये स्वतःला पंतप्रधान म्हणवून घेणारा रुसलान उत्सिव लंडनमध्ये आला. त्याच्याबरोबर त्याचा भाऊ नझरबेग सुद्धा होता. नझरबेग मार्शल आर्ट्स मध्ये तरबेज होता. आणि मारामार्‍या करण्यासाठी पैशाच्या बोलीवर कोणाच्याही बाजूने उतरायची त्याची तयारी असे. कदाचित रुसलान जे काम घेऊन लंडनमध्ये आला होता त्यासाठी नझरबेग हा उत्तम अंगरक्षक त्याने आणला होता असे दिसते.

नवोदित चेचेन सरकारने रुसलानवर दोन कामे सोपवली होती. एक म्हणजे नव्या देशासाठी चलनी नोटा व पासपोर्ट छापून घेणे. दुसरे म्हणजे देशातील तेलासाठी युरोपियन कंपन्यांशी व्यवहार ठरवणे. लंडनमध्ये पोहोचल्यावर रुसलानने शेरलॉक होम्स फेम २२१बी बेकर स्ट्रीट च्या परिसरात एक फ्लॅट सात लाख पौंड देऊन राहण्यासाठी निवडला. त्यानंतर त्याला एका दुभाष्याची गरज होती. चेचन्यामध्ये असताना अलिसन पॉंन्टिंग नामक BBC मध्ये रिपोर्टर म्हणून काम करणार्‍या ब्रिटिश महिलेने त्याची मुलाखत घेतली होती. रुसलानने तिलाच फोन करून आपल्यासाठी एक दुभाषा बघण्यास सांगितले. अलिसनने तिच्या नवर्‍याचे नाव सुचवले. टेर ओगानिस्यान हा मूळचा आर्मेनियन होता. पण टेरचे व्यवहार सरळ नव्हते. तो एक छुपा तस्कर तर होताच शिवाय अनेक बोगस कंपन्या स्थापन करून काळ्याचा पांढरा पैसा करण्यासाठी तो ’सेवा’ देत असे. त्याचे आणि उत्सिव बंधूंचे मेतकूट बर्‍यापैकी जमले. सुरुवातीला ह्या त्रिकूटाने आलिशान पार्ट्या देऊन बड्याबड्यांना आमंत्रणे देऊन आपले पाय रोवले. तेल व्यापारासाठी रुसलान मोठ्या कंपन्यांच्या अधिकार्‍यांना भेटत होता. व्यवहारामध्ये एक अट अर्थातच ’कॅश’ पैसे किती व कसे देणार याची घातली जात होती. रुसलानकडे पैसा भरपूर असावा. हॉटेलमध्ये गेल्यावर तो वेटरला टिप्स म्हणून २००० पौंड देखील देत असे. बाकी बाई बाटली मजा चालूच होती आ्णि टेरही त्यात सामिल होता.  पुढे रुसलान चलनी नोटांची छपाई - पासपोर्ट छपाई - तेल व्यवहार यापलिकडे धोकादायक क्षेत्रातले व्यवहार साधता येतात का पाहू लागला. त्याने जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी २०००  स्टिंगर मिसाईल्स खरेदी करण्याचे प्रयत्न सुरु केले. हे मिसाईल्स तो अझरबैजानला पाठवणार होता आणि त्यांचा वापर आर्मेनियाविरुद्ध व्हायचा होता. ते पाहून टेरचे डोळे उघडले. रुसलानचे खरे स्वरूप त्याच्या पुढे आले. शेवटी तो आर्मेनियन होता. रुसलान आणि त्याच्या चेचन्यातील गटाच्या हातात असे स्टिंगर मिसाईल पडणे आपल्या हिताचे नाही हे दिसताच त्याने त्वरित दोन वरिष्ठ आर्मेनियन अधिकार्‍यांना भेटला. एकाचे नाव होते मार्तिरोस्यान - आपण KGB अधिकारी आहोत असे त्याने पुढे पोलिसांना सांगितले. दुसरा होता अशोत सार्किस्यान असोत स्वतःला आर्मेनियन चेंबर ऑफ कॉमर्सचा चेअरमन म्हणवून घेत असे. परंतु तो एक आर्मेनियन जनरल होता असे पोलिस म्हणत. ह्या दोघांचे लक्ष टेरने रुसलानच्या हालचालींकडे वेधले. दोघांनी रुसलानची भेट घेऊन त्याला हा उद्योग थांबवावा असा इशारा दिला. पण रुस्सलानने त्याकडे दुर्लक्ष केले. दोघा आर्मेनियनांनी त्याच्या खुनाची सुपारी लॉस एंजेलिस इथल्या एका आर्मेनियनाला दिली. डेटमेंडझियन २० फेब्रु. रोजी लंडनमध्ये दाखल झाला तेव्हा त्याच्यासाठी राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. सहाच दिवसात म्हणजे २६ फ़ेब्रुवारी ९३ रोजी नझरबेग सायनस ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये गेला असता म्हणजे रुसलानचा अंगरक्षक नसताना सुवर्णसंधी साधण्याचे ठरले. रुसलानला तीन गोळ्या घातल्या गेल्या. थोड्याच दिवसात नझरबेगलाही गोळ्या घालून ठार मारण्यात आले. डेटमेंडझियन आणि मार्तिरोस्यान दोघांनाही अटक झाली. मार्तिरोस्यानला भेटण्यासाठी सार्किस्यान बेलमार्श या अतिसुरक्षित तुरुंगात गेला. त्या भेटीनंतर मार्तिरोस्यानक्डे सापाचे विष असलेली एक छोटी पिशवी मिळाली. गरज पडलीच तर गुपिते न फोडता KGB ह्या हस्तकाला आत्महत्या करता यावी याची सोय सार्किस्यानने केली असावी. अशीच एक विषाची पिशवी टेरच्या घरी धाडण्यात आली होती पण ती पोलिसांनी जप्त केली. चेचेन अध्यक्षांनी अलिसन पॉन्टिंगला मारण्यासाठी सुपारीबाज नेमकरी पाठवले. त्यांनी चुकून तिच्या बहिणीला गोळ्या घातल्या.

या कहाणीमध्ये KGB हस्तक किती सराईतपणे पाश्चात्य देशात वावरत होते हे तर पुढे येतेच चलनी नोटा - पासपोर्ट छपाई साठी जगात काय काय गुन्हे केले जातात हे पाहून मन स्तब्ध होते.

सबब येत्या काही दिवसात भारतीय नोटा छापण्यासाठी यूपी ए सरकारचे व्यवहार - मोदी सरकारचे व्यवहार यावर राळ उठणार आहे. तेव्हा दिसते तसे हे जग आणि व्यवहार नसतात हे लक्षात ठेवले आणि चटकन येणार्‍या बातमीवर विश्वास ठेवला नाही तर आपल्याला खरे काय त्याचा शोध घेता येईल.

(जाता जाता - विष घालून ठार मारणे हे कोणाचे वैशिष्ट्य असावे - रशियाचे अनेक शत्रू असे मारले गेले असे दिसते. सुनंदा पुष्करलाही ’रशियन’ विष घालून मारण्यात आले असे डॉ. स्वामी म्हणतात तेव्हा गूढता वाढते आणि मतीच गुंग होते.)

सिंजोना भाग १


Image result for michele sindona marcinkus

नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदींनी नोटबंदी जाहीर केली आणि बँका आणि त्यांचे व्यवहार याविषयी सामान्य लोकांमध्ये एक जागरूकता आली. काळा पैसा म्हणून आपण ज्याविषयी नेहमी बोलतो तो पांढरा कसा केला जातो हे आपल्याला एक कोडे वाटत असते. ज्या पैशाची जमाखर्चाच्या वहीत नोंद नाही तो काळा पैसा. नोंद नसलेला पैसा कर न भरता पुढे कागदोपत्री आणायचा कसा याचे अनेक मार्ग डोकेबाजांनी शोधून काढले आहेत. ही कामे अर्थातच बँकांच्या 'सहयोगाने' होतात ह्याचा साक्षात्कार सामान्य माणसाला नोटबंदीच्या काळामध्ये जे पाहिले त्यामुळे झाला. सर्वसामान्य माणूस मोठ्या विश्वासाने आपला पैसा बँकेमध्ये ठेवत असतो. जमा केलेल्या पैशावर बँक आपल्याला व्याजही देते.  आपल्याला हवा तेव्हा आपला पैसा बँकेतून काढता यावा एवढीच सामान्य माणसाची अपेक्षा असते. बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर तर बॅंकांमधले व्यवहार सुरक्षित असतात असे आपण समजत होतो. अधेमधे कधीतरी एखादी सहकारी बँक बुडाल्याच्या बातम्या येत. पण निदान राष्ट्रीयीकृत बँकांबाबत आपण अगदी निर्धास्त होतो असे वातावरण होते. पण नोटबंदीच्या काळामध्ये राष्ट्रीयीकृत असोत की खाजगी की परदेशी - सर्व प्रकारच्या बँकांनी अथवा त्यांच्या भ्रष्ट कर्मचारी - अधिकारी वर्गाने ज्यावर कर भरला गेला नाही असा पैसा खात्यात भरण्यासाठी आणि काही प्रमाणात तो खात्यातून काढून घेण्यासाठी लुटारूंना मदत केली हे जसजसे पुढे आले तसे लोक अचंबित झाले. ह्याच्या जोडीला बँकांकडच्या थकीत कर्जाच्या "खोला"तल्या बातम्या येऊ लागल्या. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी मरगळ झटकून सक्रिय होण्यास आणि बँकांच्या पैशाची वसुली करण्यास आज सरकारने बँकांना भाग पाडले आहे. ह्याचेही तपशील आज बाहेर येत आहेत.

एकंदरीतच ह्या वातावरणामध्ये बँका गैरव्यवहार कसे करतात - काळ्या पैशाचा पांढरा पैसा बनवण्यास कशी मदत करतात ह्यावरच्या भारतीय कथा अजून बाहेर यायच्या आहेत पण असे व्यवहार काही केवळ भारतात होतात असे नाही. ते तर सर्व जगभर होत असतात. २०१५ साली त्याच कथांचा मागोवा घेता घेता एक प्रकारची खाणच माझ्या हाती लागली.

शीत युद्ध - अमेरिकन आणि जागतिक माफिया गॅंगस्टर्स - जागतिक बॅंका - ओपस दाय - प्रोपोगंडा दुए - फ्रीमेसन्स आणि त्यांच्या विविध रूपात कार्यरत असलेल्या संस्था - खास करून ख्रिश्चनांच्या गुप्त संस्था आणि त्यांची कार्यपद्धती - व्हॅटिकन आणि त्यांचे अर्थव्यवहार सांभाळणारी बॅंक - पाश्चात्य देशांच्या सुरक्षा संघटना आणि गुप्तहेर संस्था - नेटो देशांचे लागेबांधे - पूर्वाश्रमीचे ’नाझी’ आणि त्यांचा आजच्या काळात झालेला वापर हे सर्व विषय जोडले गेले आहेत असे मी म्हटले तर कोणी मला वेड्यात काढेल. आणि ह्या सर्वांचा भारतीय राजकारणावरही आमूलाग्र बदलावे इतका प्रभाव होता व आहे असे म्हटले तर मग काय म्हणाल? गुंतागुंतीच्या या विषयाची सुरुवात बॅंकांपासून करावी हे तर्कशुद्ध ठरेल. ह्या विषयामध्ये उडी घ्याल तर हजारो संदर्भ - कित्येक पुस्तके - लेख - आणि अन्य लिखाण यांचा डोंगर आपल्यासमोर उभा राहतो. म्हणून एक प्रातिनिधिक उदाहरण घेतले तर विषय समजणे सोपे जाईल असे माझ्या लक्षात आले. ह्यासाठी मी इटालियन घोटाळेबाज सिंजोना ह्या पात्राची निवड करण्याचे ठरवले आहे. सिंजोना हे पात्र काल्पनिक नव्हे - ते एक वास्तवातले पात्र आहे. त्याच्या कहाणीला इतकी उपकथानके आहेत की महाभारत सुद्धा छोटे वाटावे. तरीदेखील जमेल तेवढे मूळ कथानक आणि आवश्यक तेवढे उपकथानक अशी सांगड घालत आपण पुढे सरकलो तर वरती दिलेल्या अनेक बाबी कशा एकमेकात जुळलेल्या आहेत ह्याची निदान अस्पष्ट का होईना पण कल्पना येते. 

मिकेले सिंजोना ही व्यक्ती जन्माने इटालियन - खरे तर सिसिलियन. इटली आणि खास करून सिसिली म्हटले की माफिया गॅंगस्टर्स कथेपासून सहसा फारसे लांब नसतात. इटली म्हटले की व्हटिकन आणि ख्रिश्चियानिटी कथेमध्ये डोकावतेच. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इटलीमध्ये हिटलरचा मित्र मुसोलिनीचे राज्य होते. मुसोलिनी देखील हिटलर सारखाच नाझी होता. त्य दिवसांमध्ये गॅरिबाल्डी आणि मॅत्सिनीच्या कथांवर जोपासल्या गेलेल्या इटालियन पिढीला राष्ट्रवादी मुसोलिनी अर्थातच जवळचा होता. गॅरिबाल्डी आणि मॅत्सिनी यांनी माणसाच्या जीवनातले चर्चचे स्थान कधी नाकारले नव्हतेच. तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये मुसोलिनीने व्हॅटिकनवरती विविध निर्बंध जरी घातले तरी सुद्धा इतिहासाचे दडपण असे होते की चर्चला मुसोलिनीच्या अनुयायांना जवळ घेणे भाग पडलें होते. हिटलर आणि मुसोलिनीचा पाडाव झाल्यानंतर अमेरिका आणि पाश्चात्यांचा सर्वात मोठा शत्रू होता तो रशिया. आणि हिटलर आणि मुसोलिनीचे खांदे समर्थक कम्युनिझमचे कट्टर शत्रू होते. साहजिकच नव्या परिस्थितीमध्ये जर्मनीमधले आणि इटालीमधले नाझी चर्चला आणि अमेरिकेला प्यारे ठरले. दुसऱ्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यामध्ये व्हॅटिकनने आणि अमेरिकेने जर्मनीमधल्या आणि इटलीमधल्या अनेक नाझीना तिथून पळण्यास मदत केली. इतकेच नव्हे तर नवी ओळखपत्रे देऊन त्यांची सोय दक्षिण अमेरिकन देशांमध्ये लावण्यात आली. कधी ना कधी रशियाविरुद्ध लढण्यासाठी ह्याच नाझींचा आपल्याला उपयोग होइल असा आराखडा त्यांच्या मनात होता. ज्यू वरच्या अत्याचारांमध्ये व्हॅटिकनचा सहभाग होता का - त्यांची मदत होती का आणि असल्यास कितपत होती यावरती नेहमी वाद चालतो. अशा तर्‍हेने इतक्या टोकाच्या शक्ती एकमेकांना का मदत करत होत्या - कशा करत होत्या - त्यांनी संयुक्तपणे काय कारवाया केल्या का - त्यांचे तपशील काय असे प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी उपयुक्त होईल असे हे सिंजोना व्यक्तिमत्व आहे. एवढ्या मोठ्या कॅनवासवरची कथा सांगण्याचे कसब माझ्याकडे आहे का? कोणास ठाऊक. पण प्रयत्नच केला नाही तर ही कथा तुम्हाला समजणार कशी? म्हणून माझ्या मर्यादा स्वीकारत प्रयत्न करणार आहे. 

सिंजोनाच्या कथेमध्ये काय नाही? त्यात माफियांची गोष्ट आहे - त्यांची गुन्हेगारी आहे - आर्थिक घोटाळे आहेत - इटलीमध्ये राजकारण आणि गुन्हेगारी कशी हातात हात घालून प्रवास करत होते त्याची कथा आहे - घातपात आहेत - बॉम्ब स्फोट आहेत - दंगली आहेत - खून आहेत - विषप्रयोग आहेत - न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार आहे - पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचार आहे - दोन नंबरचे आर्थिक साम्राज्य आहे - ते उभे करण्यासाठी मदत करणारे आहेत - त्यामधला लाभ घेणारे आहेत - अमेरिकेसारख्या आणि अन्य देशांच्या सुरक्षा यंत्रणा आहेत - गुप्तहेर संस्था आहेत - खुद्द अमेरिकन भूमीवर केले गेलेले आर्थिक गैरव्यवहार आहेत. क्वात्रोकी ज्या स्नॅम प्रोगेटी कंपनीचा प्रतिनिधी होता तिची मुख्य कंपनी आणि तिचे आर्थिक व्यवहार याची कथा आहे - इटालीमधला सत्तापालट आहे - एका माजी पंतप्रधानाचे अपहरण आहे आणि खूनही आहे - एका पोपचा आकस्मिक गूढ "मृत्यू" आहे - ज्याच्या समोर भ्रष्टाचाराचा खटला चालवला जात आहे अशा न्यायाधीशाचा खून आहे - तपास करणाऱ्या पोलीस सुपरिंटेंडेंटचा खून आहे!!

तुरुंगात टाकलेल्या सिंजोनाने एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीमध्ये आरोप केला की व्हॅटिकनने आपला "दूत" भारतामध्ये पेरलेला आहे. ह्यानंतर खुद्द सिंजोनाला विष घालून इटलीच्या तुरुंगात मारण्यात आले. सिंजोनाच्या कथेचे अनेक धागेदोरे मिळवताना माझी दमछाक तर झालीच पण तपशील बघता बघता भीतीने अंग शहारून जात होते. मी तर एक सामान्य व्यक्ती आहे. त्या मर्यादेत राहूनच शक्य तितके अप्रिय संदर्भ टाळत पुढच्या भागांमध्ये मी ही कथा लिहिणार आहे. पण इतके जरूर लिहीन की तुम्हाला एक अधिक एक दोन आहेत हे कळावे. 

Thursday 16 November 2017

नोटा छपाईची कथा भाग १

नोटा छपाईची कथा भाग १

५०० व १००० रुपयाच्या नोटा मागे घेऊन त्याबदल्यात नव्या नोटा देण्याचा निर्णय श्री मोदी यांनी ८ नोव्हेम्बर रोजी जाहिर केल्यानंतर या निर्णयामुळे ज्याच्या आयुष्याला स्पर्शही झाला नाही अशी व्यक्ती देशामध्ये मिळणे दुरापास्त झाली आहे. त्यातच नोटांच्या छपाईवरून उलटसुलट बातम्या येऊ लागल्या आहेत. संसदेच्या चालू अधिवेशनामध्ये ह्यावर गदारोळ होणार हे उघड आहे. मोदी सरकारवरती टीका करण्याची छोटीशी संधी देखील न दवडणारे या विषयासंदर्भाने नागरिकांना गोंधळात टाकणारे आरोप सरकारवर करणार हे गृहित धरून या विषयाच्या पार्श्वभूमीवर रोचक ठरतील अशा दोन कहाण्या मी इथे देत आहे.

२०११ मध्ये लिबियाचा सर्वेसर्वा कर्नल गडाफी याची उचलबांगडी करायचा निर्णय नेटोने घेतल्यानंतर लिबियाची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती. देशाकडे चलनी नोटांचा तुटवडा होता. सरकारी कर्मचारी - आरोग्यसेवा देणारा कर्मचारी वर्ग इतकेच नव्हे तर आपले सैनिक यांचा अनेक महिन्यांचा पगार थकला होता. तो देण्यासाठी सुद्धा गडाफी राजवटीकडे पैसा नव्हता. नोटांचा तुटवडा लक्षात घेऊन ज्या नागरिकांकडे तुटपुंज्या का होईना नोटा होत्या ते आपल्याकडील पैसा जपून वापरत होते. आणि बॅंकिंग व्यवस्थेवरील विश्वास उडाल्यामुळे चुकूनही बॅंकेमध्ये टाकत नव्हते.

पैसा नव्हता तरी नोटा छापायचे काम तर गडाफीला करता आले असते असा विचार आपल्या मनात येतो. पण लिबियासारख्या छोट्या देशांकडे अशी आधुनिक व्यवस्था नाही. त्यांना ह्या कामासाठी विदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते. लिबियाच्या नोटा छापणारी कंपनी द ला रू ही ब्रिटिश मालकीची. हिला दिडशे कोटी डॉलर्स एवढ्या किंमतीच्या लिबियन नोटा छापण्याची ऑर्डर गडाफीने एक वर्ष आधी दिली होती. कंपनीने नोटा छापल्यासुद्धा. परंतु तोवर परिस्थिती बदलली. आता युनोने लिबियावर आर्थिक निर्बंध लागू केले होते. या निर्णयानुसार  नेटोच्या सैन्याने त्या देशावर हवाई हल्ले चालू केले होते. ह्या परिस्थितीमध्ये युनोच्या निर्णयानुसार ब्रिटनमध्येच नोटा जप्त करण्यात आल्या. नोटा व्यवहारातून गायब झाल्यामुळे लिबियाच्या घशाला जणू कोरड पडली. चलनी नाणे असे गोत्यात आल्यावर लिबिया हवालदिल होऊन गेला. पण नेटोला त्याची क्षिती नव्हती. अखेर गडाफी विरुद्ध लढणारे बंडखोर जेव्हा त्रिपोलीला पोहोचले आणि गडाफीची राजवट त्यांनी उधळून लावली त्यानंतर नोटा लिब्यात पाठवण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला. १५० कोटी पैकी अवघ्या २८ कोटी डॉलर्स किंमतीच्या नोटा तिथे पाठवायचे मान्य केले. ब्रिटनच्या एअर फोर्सच्या विमानाने ४० टन वजनाच्या नोटा लिबियात पोह्चल्या पण तोवर त्या देशामध्ये काय हाहाःकार झाला असेल याची कल्पना तशाच प्रकारच्या संकटातून जाणारे आपण आज करू शकतो.

अवघड आहे काम. म्हणजे लहान देशांचे सार्वभौमत्व आपण म्हणतो खरे पण ते किती तकलादू असू शकते हे विदित करणारी ही कहाणी आहे. सोबत लिबियाच्या बॅंकेमध्ये पैसे काढण्यासाठी नागरिकांची उडालेली तुंबळ गर्दी.

Wednesday 15 November 2017

अमन की आशा चे विसर्जन

मोदी सरकारने दिनेश्वर शर्मा यांची काश्मीर प्रश्नी आपले प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. दिनेश्वर शर्मा २००३ ते २००५ मध्ये आयबी मध्ये इस्लामी दहशतवादाचा विभाग सांभाळत असत. मोदी सरकारने त्यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांनी ९ नोव्हेंबर पासून तीन दिवस सलग अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. यामध्ये जम्मू काश्मीरचे राज्यपाल - मुख्यमंत्री याखेरीज जवळजवळ ३० अन्य शिष्टमंडळे त्यांना येऊन भेटली आहेत शिवाय कित्येकांना आपल्याशीही त्यांनी बोलायला हवे होते असे वाटत आहे. शर्मा यांनी फारूक अब्दुल्ला यांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली.

त्यानंतर वेगवेगळी वादग्रस्त विधाने आपण ऐकतो आहोत. एकीकडे फारूक अब्दुल्ला म्हणतात की शर्मा यांचा रिपोर्ट लोकसभेच्या पटलावरती मांडला जाणार नसेल तर त्यामध्ये काही अर्थ उरणार नाही. ते पुढे असेही म्हणाले की जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे तसाच पाक व्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा हिस्सा आहे काश्मीरने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणे ही धोरणात्मक चूक होती. कारण तीन अण्वस्त्रधारी देशांच्या कचाट्यात काश्मीर असून त्याला स्वातंत्र्याची भाषा व्यवहार्य नाही कळणे हे जरुरीचे आहे. अब्दुल्ला यांच्या विधानांना अभिनेते ऋषी कपूर यांनी संमती दर्शवली आहे. अशा प्रकाराने दिनेश्वर शर्मा यांच्या काश्मीरमधील मुख्य धारेतील शक्तींचे मन जाणून घेण्याच्या प्रयत्नाने वातावरण ढवळून निघाले आहे हे खरे.

 "नवजीवन इंडिया "च्या बातमीमध्ये असे म्हटले आहे की श्री. दिनेश्वर शर्मा म्हणाले - काश्मिरमधील हिंसेचे वातावरण संपुष्टात आणण्यासाठी जो कोणी शांतता प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छितो त्या सर्वाना मला चर्चेमध्ये समाविष्ट करायचे आहे. मग अशी व्यक्ती म्हणजे एखादा विद्यार्थी असो तरूण असो छोटा दुकानदार असो की रिक्षावाला - मला त्या सर्वाना भेटायला आवडेल. काश्मीरमध्ये समाज अनेक गटात विभागला गेला आहे. तिथल्या तरूण पिढीच्या भविष्याची मला काळजी वाटते. हे तरूण हिंसावादी संघटनांच्या जाळ्यात नैराश्यापोटी ओढले जाऊ शकतात. त्यांना त्यापासून परावृत्त केले पाहिजे. तुमच्याही आयुष्यात शांततेचे पर्व येऊ शकते हा विश्वास निर्माण व्हायला हवा. आजची तरूण पिढी या दहशतवादी कटात ओढली जाता कामा नये ही गोष्ट सर्वाधिक महत्वाची आहे. आज काश्मिरी समाज एकसंध नाही. ही एक गंभीर समस्या आहे. त्याकडे आज लक्ष दिले नाही तर इथेदेखील येमेन लिबिया वा सिरियासारखी परिस्थिती उद् भवेल. समाजातील विविध गट एकमेकांविरोधात उभे ठाकले तर यादवी होईल."

दिनेश्वरजींचे हे कथन काळजी वाढवणारे आहे. फारूक अब्दुल्लांची विधाने दाखवणारा मीडीया शर्मांची ही भूमिका का दडवून ठेवतो हे कोडे नाही.  दिनेश्वर शर्मा आणि अब्दुल्ला ही दोन टोके आहेत. ह्या दोन टोकांमधले अब्दुल्ला एव्हढेच टोक मीडियाला आवडत असावे. एकीकडे शर्मा सर्व काश्मीर समाजाच्या जखमांवर फुंकर घालू इच्छितात तर अब्दुल्ला मात्र पाक व्याप्त काश्मीर ला हात लावू नका सांगतात इथेच मोदी सरकार आणि फारूक अब्दुल्ला यांच्या भूमिकांमधला फरक स्पष्ट होतो.

सामंजस्याचा वार्ता आज करणारे वाजपेयींच्या काळामध्ये काय बोलत होते हे बघण्यासारखे आहे. जम्मू काश्मीर भारताचा तर पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानचा आहे म्हणणारे फारूक अब्दुल्ला थोडक्यात काय सांगत आहेत? नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाकिस्तान आहे आणि अलीकडे भारत आहे हे ते अशा सांगण्यातून मान्य करत नाहीत का? मग वाजपेयी दुसरे काय म्हणत होते? नियंत्रण रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा मानून तडजोड करू असा प्रस्ताव वाजपेयींनी ज. मुशर्रफना दिला होता. पण तेव्हा पाकिस्तान धार्जिण्या शक्तीना स्फुरण चढले होते. हातात मिळत आहे ते माझे आणि तुझे तेही माझे हीच वृत्ती तेव्हा प्रश्न मिटवताना आड आली आणि आजही ह्या शक्तींचा विचार करता तिच्यात बदल झालेला दिसत नाही. पण आता काश्मीर मधले जनमत बदलत आहे. आता मोदी पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याचा विचार करतात - ३७० कलमाने तुमचे खरेच भले झाले का असा प्रश्न विचारून त्यांना विचार करायला भाग पाडत आहेत. फुटीरतावाद्यांच्या लक्षात आले आहे की जम्मू काश्मीर तर हाताचा गेलाच आहे निदान पाकव्याप्त काश्मीर तरी भारताच्या हातात जाणार नाही याची चिंता आता मोठी झालेली दिसते. तेव्हा आता PoK वाचवायची केविलवाणी धडपड चालू आहे.

भाषणबाजी आणि अस्वस्थता या बाजूलाच होते आहे असे नाही. तिकडे पाकिस्तानच्या पोटातही गोळा आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांनी गेल्या आठवड्यात म्हटले आहे की नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला स्वातंत्र्य चळवळ नाही.  जसे दिनेश्वर शर्मा काय म्हणतात हे आपल्या माध्यमांनी दाखविले नाही तसेच अब्बासी काय म्हणतात यातली मेख जाणून घ्यावी असे काही कोणाला वाटले नाही.

एका पाकिस्तानी पंतप्रधानाने जम्मू काश्मीरात स्वातंत्र्याची चळवळ अस्तित्वात नाही म्हणणे ही  अनेकांना क्रांती वाटेल. पाकिस्तानने जम्म् काश्मीर वरील आपला दावा सोडला की काय असे वाटू शकेल. काश्मीर मध्ये जे चालले आहे तो पैशाचा तमाशा आहे हे भारताचे म्हणणे मान्यच केले असेही मानता येईल. काश्मीर हाच वादग्रस्त मुद्दा असून तोच कळीचा प्रश्न उभय देशात असल्याची टिमकी वाजवली जात होती ती कशी पोकळ आहे हेही उघड झाले आहे. पण अब्बासी यांनी केलेल्या विधानाला दुसरीही बाजू आहे.

नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला चळवळ अस्तित्वात नाही असे सांगणाऱ्या अब्बासींचा रोख जम्मू काश्मीर कडे नसून तो आहे पाकव्याप्त काश्मिराकडे. आक्रमक मोदींसमोर आपण आपले चार दशके राबवलेले काश्मीर धोरण पुढे रेटण्यास असमर्थ आहोत याची ही जाहीर आणि असहाय्य कबूली तर आहेच पण निदान आमच्या ताब्यातला काश्मीर तरी आमच्या कडे राहू द्या असे जाहीरपणे सांगावे लागण्याची नामुष्की आली आहे. पाकव्याप्त काश्मीरात फुटीरतावादी चळवळ नाही असा इशारा अब्बासी देत आहेत. तेव्हा त्याला चळवळीचे निमित्त पुढे करून हात लावू नका असे ते मोदींना सांगत आहेत.

वाजपेयींच्या फॉर्म्युलाची आज महती पटली आहे पण वेळ हातची गेली आहे. आता हे ब्रह्मज्ञान होण्याचे कारण एकच आहे. पाकिस्तानने आपली विश्वासार्हता जागतिक पातळीवर गमावली आहे. ओसामा बिन लादेन आयमान जवाहिरी हाफिझ सईद हे आमचे हिरो होते पण आज त्यांना निपटावे लागेल अशी भूमिका खुद्द मुशर्रफ मांडू लागले आहेत कारण इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. पाकिस्तानच्या सीमा ज्यांना चिकटल्या आहेत ते इराण व अफगाणिस्तान भारताला झुकते माप देणार हे स्पष्ट दिसत आहे. चीनदेखील पाकिस्तान करता भारताशो किती वैर घेईल याला मर्यादा आहेत. ट्रंप यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका रंग बदलत आहे. दुसरी कडे आर्थिक अडचणी आ वासून उभ्या आहेत. अशा अवस्थेत अर्धम् त्यजति पंडितः या न्यायाने पाकिस्तान एकसंध ठेवण्याची मजबूरी आली आहे.

हे सुवर्णक्षण आपण आज बघत आहोत ते मोदींच्या धोरणाचे यश आहे. नाहीतर अमन की भाषा करत चमन के फूल दाखवायची सहल गेली दहा वर्षे  यूपीएने काढली होती.

 आता मात्र पुढचे भविष्य लिहिण्याची गरजही उरलेली नाही.


 (https://www.navjivanindia.com/india/challenge-is-to-stop-kashmir-becoming-syria-says-interlocutor-dineshwar-sharma)





Sunday 29 October 2017

पाकिस्तानला तीन तलाक - ट्रम्प यांची भेट

जानेवारी २०१७ मध्ये अमेरिकेचे अध्यक्षपद श्री डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडे गेले तेव्हाच अमेरिकन परराष्ट्र धोरणामध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित होते. त्या अपेक्षेनुसार ट्रम्प यांनी आपले मध्यपूर्व - इराण - ग्लोबल वॉर्मिंग - चीन - भारत यांच्या संदर्भातले धोरण बदलल्याचे गेल्या काही महिन्यामध्ये ठळकपणे दिसले आहे. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची पाळी आहे. २२ ऑगस्ट रोजी व्हर्जिनिया - फोर्ट मायर येथून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये श्री ट्रम्प यांनी सडेतोड निरीक्षणे नोंदवली. श्री ट्रम्प म्हणाले की - अमेरिकेने आजपर्यंत पाकिस्तानमध्ये करोडो डॉलर्स ओतले आहेत. पाकिस्तानने दहशतवाद्यांचा बंदोबस्त करावा म्हणून आम्ही ही मदत देत होतो. पण असे दिसून येते की त्याच पाकिस्तानच्या भूमीवरती दहशतवाद्यांना आसरा दिला जात आहे. ज्यांच्याशी आम्हाला लढायचे आहे त्या दहशतवाद्यांना पाकिस्तान पोसत असल्याचे दुःख ट्रम्प यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणे दिसले. अमेरिकन सैनिक हक्कानी गटाच्या हल्ल्यांमध्ये शिकार होत असताना पाकिस्तान मात्र हक्कानी गटाचा बंदोबस्त करायचे सोडा त्यांना आणखी पोसताना दिसते. ट्रम्प यांनी जे बोलून दाखवले ती खरे तर सर्व सामान्य अमेरिकनाची वेदना आहे. गेल्या दीड दशकामधले अमेरिका-युरोपातले असोत की आशियामधले -  सर्व दहशतवादी हल्ल्याचे मूळ शोधावे लागले आहे ते पाकिस्तानपर्यंत जाऊनच. पण आजवरचा कोणताही अमेरिकन अध्यक्ष ही वस्तुस्थिती जाहीरपणे सोडाच पण खाजगीमध्येही मान्य करायला तयार नव्हता. हे अवघड काम ट्रम्प यांनी अवघ्या आठ महिन्यांमध्ये केले आहे. आपल्या भाषणामध्ये त्यांनी पाकिस्तानची आर्थिक मदत थांबवण्याचे जाहीर केले नाही एव्हढेच एक समाधान पाकिस्तानला त्यात मिळू शकेल. पण वस्तुस्थिती इतकीही सोपी नाही. एव्हढ्यावर असते तर निगरगट्ट पाकिस्तान निर्लज्जपणे ते सहन करू शकला असता. पण ट्रम्प यांनी त्यांना जिव्हारी झोंबेल असे पुढचे वक्तव्यही केले आहे. ट्रम्प म्हणाले की अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने आम्हाला मदत करावी. गेल्या १७ वर्षांमध्ये  काही ना काही क्लृप्त्या लढवून पाकिस्तानने भारताला अफगाणिस्तानच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामध्ये त्याला यशही मिळाले होते. इतके की ओबामा यांच्या कारकीर्दीमध्ये जेव्हा अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य अंतीमतः माघारी बोलावण्याचा निर्णय झाला आणि त्यानुसार अमेरिका पावले उचलू लागली तेव्हा अफगाणिस्तानमधील शांतता राखण्याचे काम पाकिस्तानवरती सोपवण्याचा निर्णयही झाला होता. तसेच या प्रक्रियेमध्ये अमेरिका - चीन - रशिया आणि पाकिस्तान अशा बैठका होत होत्या, त्यामधून भारताला वगळण्यात आले होते. जणू काही अफगाणिस्तानच्या शांततेमध्ये भारताला काहीच स्वारस्य नव्हते की काही म्हणणे नव्हते अशा पद्धतीने कारभार चालला होता. ह्या भूमिकेवरती अमेरिकेने घुमजाव करत भारताला प्रधान भूमिका दिल्याचे स्पष्ट झाले तेव्हा पाकिस्तानच्या नाकाला मिरच्या झोंबल्या तर नवल नाही. ज्या मिरच्या पाकिस्तानच्या नाकाला झोंबतात त्या - पाकिस्तान हा चीनचा मांडलिक देश असल्यामुळे - चीनलाही झोंबतात. 

ट्रम्प यांच्या ह्या वक्तव्याचे दूरगामी परिणाम आहेत आणि ते समजून घेणे आवश्यक आहे. चीन आणि अमेरिका असे दोन नवरे पाकिस्तान आजपर्यंत गेली काही दशके अगदी चापलूसी करून सांभाळत होता. आणि दोघांकडून फायदे उकळत होता. अमेरिकनांना उल्लू कसे बनवता येते ह्याचे एक शास्त्रच पाकिस्तानमध्ये बनून गेले होते. १९७९ मध्ये रशियाने जेव्हा अफगाणिस्तानमध्ये आपले सैन्य घुसवले तेव्हा त्यांच्या प्रतिकारासाठी अमेरिकेने पाकिस्तानवरती मोलाची कामगिरी टाकली होती. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी पाकिस्तानने आपल्या देशामध्ये वहाबी - मुस्लिम ब्रदरहूड आदि जहालपंथियांची चूड स्वहस्ताने आणली. जगामधल्या कोणत्याही जहालपंथी - दहशतवादी गटासाठी पाकिस्तानची द्वारे खुली करण्यात आली. ह्या आपल्या कृतीचे समर्थन कुराणाच्या आधारे करण्यासाठी तत्कालीन राज्यकर्ते जनरल झिया यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. कुरानिक कॉन्सेप्ट ऑफ वॉर ह्या आपल्या पुस्तकामध्ये ब्रिगेडियर एस के  मलिक यांनी कुराणाच्या आधारावरती दहशतवादी कार्यपद्धतीचेही समर्थन केले. पुस्तकाला जनरल झिया यांनी प्रस्तावना लिहिली होती. हे पुस्तक पाकिस्तानच्या सर्व सैनिकांना आत्मसात करण्याची सक्ती होती. "What is more important in history? Defeat of Soviet Russia or a few angry muslim youth?" असा स्फोटक प्रश्न ८० च्या दशकामध्ये अमेरिकेचे विल्यम केसी उघड उघड विचारत. अशा ध्येयाने प्रेरित झालेल्या आणि रशियाच्या पराभवासाठी आंधळ्या झालेल्या अमेरिकेला आपल्या परराष्ट्र नीतीची चढ्या भावाने किंमत मोजावी लागली आहे. आता हा इतिहास दुरुस्त करण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी सुरु केल्यानंतर पाकिस्तानसमोर उभ्या ठाकलेल्या समस्येची आपण कल्पना करू शकतो. 

अट्टाहासाने भारताला अफगाणिस्तानमधून दूर ठेवण्यामागे पाकिस्तानचा काय हेतू आहे असा प्रश्न आपल्या मनामध्ये येईल. अमेरिकेचे अफगाणिस्तान धोरण चुकले आहे कारण त्याचे पाकिस्तान धोरण चुकले आहे याची जाणीव अध्यक्ष बुश यांना होती आणि ते तसे सूचितही करत. पण त्यामध्ये बदल करण्यासारखी राजकीय परिस्थितीही तेव्हा नव्हती आणि अमेरिकेकडून तसे करवून घेणारे सामर्थ्यवान भारत सरकारही सत्तेमध्ये नव्हते. आपल्या तरूण वयामध्ये पाकिस्तानला भेट देणार्‍या ओबामा यांच्याकडून ती अपेक्षाही नव्हती. म्हणून ह्या सर्व कालखंडामध्ये भारताला व त्याचे हित डावलणारे धोरण अफगाणिस्तानच्या बाबतीत आखले गेले आणि राबवले गेले आहे. आजच्या घडीला पाकिस्तान एकसंध ठेवायचा तर अफगाणिस्तान त्याची बटिक असला पाहिजे हे सत्य आहे. कारण पाकिस्तानच्या विघटनाची बीजे अफगाणिस्तानमधूनच पेरली जातील. तालिबानांचे जे असंख्य गट कार्यरत आहेत त्यापैकी पाकिस्तानशी इमानदार असलेले गट अफगाणिस्तानमध्ये धुमाकूळ घालतात. तिथे हल्ले घडवून आणतात. १९९५ नंतर अफगाणिस्तानवरती जे तालिबान राज्य करत होते ते अफगाणी नव्हते. त्यामुळे तिथल्या जनतेला ते कधीच आपले वाटले नाहीत. अफगाणिस्तानमधील शिया प्रजेने आणि खास करून हजारा जमातीने ह्या तालिबानांच्या भीषण अमानवी छळाला तोंड दिले आहे. पाकप्रणित तालिबानांनी त्यांची मझार ए शरीफ शहरामध्ये वंशहत्याच केली. हजारांची प्रेते कित्येक आठवडे रस्त्यात पडून होती कारण त्यांची विल्हेवाट लावण्याची परवानगी तालिबानांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली नाही. इतक्या भीषण छळाला इतरही शिया गटांना सामोरे जावे लागले. आज अफगाणिस्तानचे अध्यक्ष अब्द्ल घनी यांनी देशप्रेमाची हाक देत सर्व गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. अफगाणिस्तानवर राज्य असेल तर ते एखाद्या अफगाणी गटाचे असावे - शक्य तेव्हढे सरकारमध्ये अन्य गट सामिल करून घ्यावे असे विचार दिसतात. 

अफगाणिस्तानमध्ये पख्तून टोळ्या प्रबळ आहेत. आणि त्यांना तेथील सत्ता हवी आहे. पख्तून सत्तेमध्ये आले तर पाकिस्तानच्या NWFP आणि FATA ह्या प्रांतामधल्या आपल्या पख्तून भाईबंदांना पाकिस्तानच्या जाचामधून सोडवण्याचे प्रयत्न करतील. ह्या कामामध्ये शिया बहुल इराणही त्यांना मदत करत असतो. कारण इराणला पाकिस्तानमधील शिया बलुच लोकांच्या स्वातंत्र्यामध्ये रस आहे. आज अफगाणी सेना देश पाकिस्तानच्या हातून मुक्त करण्यासाठी भारावलेली आहे. प्रोत्साहित आहे. अशा परिस्थितीमध्ये बना बनाया खेल पाकिस्तानच्या मुठीमधून निसटतो आहे. 

अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका रशिया चीन आणि पाकिस्तान यांच्या बैठका होत होत्या असे मी वरती म्हटले आहे. ह्यापैकी कोणत्याही देशाला खुद्द अफगाणी लोकांच्या हितामध्ये काडीमात्र रस नाही हे अफगाणी जनता जाणते. अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावरती खनिजे आहेत. त्या खनिजांवरती आपले वर्चस्व ठेवण्यामध्ये चीन आणि रशियाला रस आहे. उलट भारताने कायमच अफगाणी लोकांना हवे असलेले प्रकल्प तिथे हाती घेतले आणि पूर्ण केले आहेत. त्यामध्ये अफगाणी लोकांचे खास स्थान ठेवले आहे. त्यांना लुटण्याच्या भूमिकेमधून हे प्रकल्प हाती घेतले गेले नव्हते. त्यामुळे भारताची तिथली प्रतिमा उजळ आहे. अध्यक्ष ट्रम्प जेव्हा भारताने अफगाणिस्तानमध्ये आम्हाला मदत करावी म्हणतात तेव्हा अमेरिका अफगाणिस्तानची मोजकी सूत्रे भारताच्या हाती देण्यास तयार झाली असावी असा कयास वरील चौकडीने बांधला आहे. तसे झाले तर भारतीय उपखांडामध्ये असलेले पाकिस्तानचे उपद्रवमूल्य शून्य होऊन जाईल. किंबहुना पाकिस्तान एक देश म्हणून तरी अस्तित्व टिकवू शकेल का याची शंका येते. म्हणूनच ट्रम्प साहेबांनी पाकिस्तानला अखेर तीन तलाक दिला आहे का असे वाटत आहे. पण गोष्टी इतक्या थरापर्य्ंत आणण्याची जबाबदारी अर्थात पाकिस्तानवरतीच आहे. 

अफगाणिस्तानमध्ये महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी अमेरिका भारताला आर्थिक सहाय्य देईल यात शंका नाही. अमेरिकन धोरणामध्ये हा बदल घडवून आणणार्‍या मोदी सरकारचे याबाबतीत अभिनंदन करत असतानाच ह्यामध्ये एक कठिण जबाबदारी भारतावरती येऊ शकते. ट्रम्प यांनी अमेरिकेचे सैन्य वाढवले जाईल असे सूचित केलेले असले तरीदेखील तिथे पुरेसे सैनिक पुरवण्याची जबाबदारी भारतावरती पडेल का ह्या प्रश्नाचे उत्तर सध्या स्पष्ट नाही. पाकिस्तानला खड्यासारखे तिथून बाहेर काढलेच तर पाकप्रणित तालिबान तिथे आपल्या कारवाया अधिक जोमाने वाढवतील आणि त्यांच्या बंदोबस्ताचे काम भारतावरती आले तर भारतीय सैन्य तिथे तैनात करावे लागणार का हा प्रश्न उपस्थित हो्ऊ शकतो.  असा निर्णय घेण्याची पाळी सरकारवरती आलीच तर त्यामागे जनमत उभे करण्याचे आव्हान मोदी यांच्यासमोर असेल. आजतागायत केवळ श्रीलंकेमध्ये अशा तर्‍हेने भारतीय सैन्य गेले होते आणि जनतेच्या मनामध्ये त्याबद्दलच्या आठवणी कटु आहेत. पुढे अफगाणिस्तानमध्ये आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घ्यावा लागलाच तर त्यासाठी आवश्यक त्या अधिकार कक्षेच्या आणि अन्य बाबी स्पष्ट करून घेतल्या जातीलच. गेल्या दहा वर्षांमध्ये यूपीए सरकारने पाकिस्तान आणि चीनसमोर लोटांगण घालण्याचे जे धोरण अवलंबले होते त्यातून प्रश्न चिघळत गेले आहेत. आणि त्याचे पर्यवसान अशा प्रकारे नव्या आघाड्या बांधण्यात झाले आहे. १९७९ नंतर पहिल्यांदाच अफगाणिस्तान प्रश्नाची नवी व्याख्या केली जात आहे. ह्यामध्ये भारत किती शिताफीने आपली भूमिका निभावतो हे बघायचे आहे. दोकलामच्या तिढ्यामध्ये ठामपणे उभे राहत मोदी सरकारने आपल्या चारित्र्याची चुणूक दाखवली आहे. इथून पुढे गेली सत्तर वर्षे भारताला छळणार्‍या समस्या आटोपत्या घेतल्या जातील का ह्याकडे जनतेचे डोळे लागले आहेत. आणि सरकार तसे करू इच्छित आहे असे दिसले तर जनता झीज सोसूनही सरकारच्या मागे उभी राहताना दिसेल. 

Thursday 26 October 2017

रशियाविरुद्ध आर्थिक निर्बंध - भाग 3

९८ वि. २ आणि ४१९ वि ३अशा प्रचंड मताधिक्याने अमेरिकन डेमोक्रॅटिक तसेच रिपब्लिकन 'खासदारांनी' (त्यांना तिथे सिनेटर्स व रेप्रेझेन्टेटिव्हस  म्हणतात) रशियावरती आर्थिक निर्बंध लावण्याची टोकाची भूमिका का घेतली असेल याचे समाधानकारक उत्तर कुठे मिळेल? ज्याने अमेरिकन गुपिते फोडली तो स्नोडेन असो की ज्युलियन असांजी - दोघांना थेट अथवा परभारे आश्रय दिला तो रशियाने - प्रसंगी खोट्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसृत करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हिलरी क्लिंटन यांचा अध्यक्षीय निवडणुकीत पराभव अटळ होईल असा प्रचाराचा धुमधडाका लावला रशियाने - पाश्चात्यांचे सीरिया विषयक बेत ओम फस केले रशियाने - पाश्चात्यांना नको असलेल्या इराणच्या अणू कार्यक्रमाला संपूर्ण पाठिंबा दिला रशियाने - युक्रेनमधून रशियाकडे झुकणाऱ्या नेत्याला  पदच्युत करून पाश्चात्यांना हवा तसा नेता तिथे बसवून युक्रेन ह्या तरफेच्या वापर पाश्चात्य करू बघत होते तेव्हा त्यांचा बेत उधळून लावला (क्रिमिया मध्ये सैन्य घुसवणाऱ्या) रशियाने - खोडरकोवस्की व अशाच अन्य पाश्चात्यांच्या पिट्ट्यानां कर बुडवेगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले रशियाने - एन जी ओ व अन्य मार्गाने धुडगूस घालत फिरणाऱ्या पाश्चात्यांच्या दलालांवरती रशियातून पलायन करून लंडनमध्ये आसरा घेण्याची पाळी आणली रशियाने - असे हे रशियाचे 'उपद व्याप' पाश्चात्यांना बघवेनासे झाले आहेत. ट्रम्प ह्यांच्या विजयामुळे एक प्रकारे ह्या पाश्चात्यांचे डोळे उघडले आहेत. आणि रशियाकडून किंबहुना पुतीन ह्यांच्याकडून आपल्याला नेमका काय धोका आहे ह्याचा शोध घेणे त्यांच्यासाठी ट्रम्प ह्यांच्या विजयामुळे अनिवार्य झाले आहे.  इथपर्यंत पुतीन ह्यांच्याकडून अमेरिकेला असलेल्या धोक्याबद्दल लोक अनभिज्ञ होते म्हणा किंवा ह्या धोक्याबद्दल ते जागरूक नव्हते असे म्हणता येईल. जसे ९/११ च्या हल्ल्यामुळे अमेरिकेचा दहशतवादी मुस्लिम जगताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तसे ट्रम्प ह्यांच्या विजयामुळे पुतीन आणि कोणते उत्पात घडवू शकतात ह्या भयाने सर्व पाश्चात्यांना एकत्र आणले आहे. भरीस भर म्हणून आता पुतीन याना त्यांचा समर्थक असलेला अमेरिकन राष्ट्रपती मिळाला आहे. ज्याच्यामागे अमेरिकेची सत्ता उभी आहे तो जगातला सर्वात जास्त शक्तिमान नेता बनू शकतो ना? पुतीन आणि ट्रम्प ह्यांच्या सहकार्यामधून पुतीन आपल्या अटींवरती ट्रम्प यांच्याकडून काही बाबी पूर्ण करून घेऊ शकतात ह्या विचाराने हे पाश्चात्य अस्वस्थ झाले आहेत. कारण त्यांच्या हातातली 'आजवरची' निर्वेध सत्ता अशा सहकार्यातून धोक्यात येऊ शकते.

"रशियाच्या ह्या सर्व दुष्कृत्यांमुळे ट्रम्प सत्तेवर आले म्हणून पाश्चात्यांचे काम ठप्प झाले आहे. त्याची शिक्षा पुतीन याना मिळणे आवश्यक आहे." असा विचार करणारे मान्यवर सध्या एकवटले आहेत. काम ठप्प झाल्यामुळे  ते अस्वस्थ आहेत खरे. पण स्नोडेन असो व ज्युलियन असांजी ह्यांच्या माध्यमातून पाश्चात्य सार्वजनिक जीवनातील व्यक्तींचे खळबळजनक तपशील मोक्याच्या प्रसंगी चव्हाट्यावर आणले जातात. सायबर सुरक्षेमध्ये छेद निर्माण करत अनेक रहस्यांपर्यंत रशियाने आपली बोटे घुसवल्यामुळे प्रत्यक्षात नेमके किती नुकसान झाले आहे अथवा होउ शकते ह्याचा अंदाज त्यांना येत नाही. पाश्चात्य राजकीय जीवनामध्ये अशाप्रकारे प्रसिद्धी मिळाली  म्हणजे एखाद्याच्या राजकीय जीवनाचा अंतच होऊन जातो.

अशा प्रकारे राजकीय जीवनाला आव्हान मिळालेले लोक आपल्या हातामधले म्हणा किंवा नसलेले शस्त्र दुसऱ्यांच्या हातून  खिसकावून घेऊन पुतीन यांच्या विरुद्ध वापरण्यास उद्युक्त झाले आहेत. जितक्या त्वेषाने आणि उभारीने  पुतीन यांनी रशियाला पुन्हा एकदा वेगाने गतवैभवाच्या आठवणींमधून उत्कर्षाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे त्याने ही मंडळी घाबरली असावीत. खरे तर ते पुतीन याना "आपल्यामध्ये" सामावून घेण्यासही तयार असतील पण पुतीन यांनी रशियन राष्ट्राचे हित डावलून त्यांच्या "कहाणी"मध्ये बसण्यास उत्सुकता दाखवलेली नाही. राष्ट्रप्रेमाची हाक देऊन रशियन जनतेला गेल्या तीन राजवटीत त्यांनी आपल्या सोबत घेतले आहे. पण लिबरल्सचे आणि देशभक्तीचे वावडेच असते. किंबहुना लिबरल्सच्या कोणत्याही तथाकथित तत्वांना मूठमाती देण्याचा उत्तम उपाय देशभक्तीची हाक देऊन लोकांना त्याविरोधात जागे करणे हा असल्यामुळे लिबरल्स देशभक्तांचा तिरस्कार करतात. 

ज्या सहकाऱ्यांच्या मदतीने पुतीन हे अवघड काम करत आहेत ते भ्रष्ट आहेत - असू शकतात - कदाचित कोणतेही तथ्य नसलेली प्रकरणे त्यांच्या अंगावर शेकवलीही जाऊ शकतात. त्यांच्यातलेच काही जण बदनामीच्या शक्यतेला घाबरून लिबरल्सच्या वाटेल जायला नको म्हणून एक तर सार्वजनिक जीवनातून माघार घेऊ शकतात किंवा 'दल बदल' करू शकतात. तेव्हा अमेरिकन कायदेमंडळाच्या हे बिल पास करून पुतीन ह्यांच्यासमोर एक आव्हान उभे केले आहे. पुतीन जर आपल्या सहकाऱ्यांना सांभाळू शकले तर ह्या संकटामधून ते यशस्वीरीत्या बाहेर पडू शकतील अशी चिन्हे आहेत. पण त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना या ना त्या मार्गाने दगा दिला तर मात्र रशियामध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण होईल.

अमेरिकन राजकीय जीवनामध्ये इतके बदल ट्रम्प ह्यांच्या निवडीनंतर घडले आणि वातावरण रशियाच्या दुसऱ्या टोकाला गेले आहे ह्याची कितपत नोंद रशियाने घेतली आहे? निष्ठावंत सहकारी हा जसा पुतीन ह्यांचा एक कळीचा मुद्दा बनू शकतो तसेच त्यांच्या परराष्ट्र धोरणामुळे अन्य काही कमकुवत दुवे देखील कळीचे बनू शकतात. आजच्या घडीला युक्रेन - इराण - सीरिया - चेचन्या आदी मुद्दे रशियासाठी अतिमहत्त्वाचे आहेत.  अमेरिकन 'खासदारांनी' आर्थिक निर्बंधांचा जो दबाव निर्माण केला आहे त्याचा परिणाम ह्या सर्व क्षेत्रांमध्ये पडणार आहे. युक्रेनच्या बाबतीत पुतीन अतिशय आक्रमक होते. रशियाला जवळचा असलेला तिथला सत्ताधारी कपटाने पदावरून हटवण्यात आला अशी पुतीन ह्यांची भावना झाली आहे. रशियाला शाह देण्यासाठी युक्रेन च्या भूमीचा वापर करण्याचे घाटत होते. म्हणून पुतीन ह्यांनी क्रिमियामध्ये सैन्य घुसवून आपल्या शत्रुंना इशाराच दिला होता – Thus far and no further!

दोन ऑगस्ट रोजी कायद्याला संमती मिळताच गेल्या सतरा वर्षांमध्ये पहिल्यांदाच पुतीन ह्यांनी नमते घेतले असे वाटण्याजोगी घोषणा रशियाकडून ऐकायला मिळाली. दोनबास येथे शांतता पथक पाठवण्याचा निर्णय जाहीर केला गेला. हा त्यांचा निर्णय आजवरच्या युक्रेन धोरणापेक्षा वेगळा आहे. त्यासाठी त्यांनी ज्या अटी जाहीर केल्या त्या मात्र युक्रेनला अथवा पाश्चात्यांना मान्य होण्यासारख्या नव्हत्या त्यामुळे त्या घोषणेचा प्रत्यक्षात काहीच फायदा झाला नाही. 

आर्थिक निर्बंधाच्या पवित्र्यामुळे निर्माण झालेल्या संकटाने गडबडून जाऊन पुतीन सैरभैर होतील किंवा त्यांचा तोल ढळेल असे गृहीत धरता येत नाही. त्यांच्या सहकार्यांमधल्या काही जणांना तर हा संघर्ष अधिक पेटवायचा आहे. तेव्हा पुतीन ह्यांच्या आस्थापनाला एकदम टोकाला नेऊनही चालणार नाही. युक्रेनच्या निमित्ताने जेव्हा पाश्चात्यांनी तिथल्या सीमेवरती अण्वस्त्रे उभी करण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा त्याला जशास तसे तोंड दिले जाईल असे पुतीन म्हणाले खरे पण प्रत्यक्षात ते तसे करू शकले नाहीत. भ्रष्ट सहकाऱ्यांखेरीज त्यांच्याच चमूमधील काही मतभेदही त्यांच्यासाठी काळजीचे ठरतील. उदा. चेचन्या आणि त्यांचा नेता कादिरो ह्यांच्या बाबत पुतीन जी भूमिका घेतात ती त्यांच्या काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मान्य नाही.  

अशा प्रकारच्या मतभेदांमधून अथवा कायदेशीर कारवाईला घाबरुन किंवा स्वतः चा पैसा वाचवण्याच्या चिंतेतून पुतीन यांची टीम आपल्याला फोडता येईल अशी अमेरिकन लिबरल्सना खात्री आहे. ह्यामधले काही जण आताही संपर्क साधण्याचे जीव तोडून प्रयत्न करत आहेत. रशियामधील पुतीन ह्यांची सत्ता पलटवण्याची कृती केवळ रशिया व त्याच्या सहकार्यानेच नव्हे तर ट्रम्प ह्यांना सुद्धा धक्का देऊन जाईल. अशा तऱ्हेने जगामध्ये एक विलक्षण पेच प्रसंग निर्माण झाला असून आपल्या म्हणण्यानुसार लिबरल्स देशादेशाच्या सीमांपलीकडे जाऊन राजकारण करताना दिसत आहेत.

पण सध्या तरी सर्वशक्तिमान रॉथसचील्ड आणि त्यांच्या बँकांना रशियामध्ये वरचढ होऊ न देणारे पुतीन स्वतःच ह्या संकटावर कशी मात करतील हे बघण्यासारखे ठरेल. रशियामध्ये पुतीन ह्यांची सत्ता राहते कि जाते ह्याने भारताने अस्वस्थ व्हावे का? ह्या पेच प्रसंगाचे आपल्यावर काय परिणाम होतील हे बघितले तर ह्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.




Wednesday 25 October 2017

रशियाविरुद्ध आर्थिक निर्बंध - भाग २

काउंटरिंग अमेरिकाज अडवर्सरीज थ्रू संक्शन्स ऍक्ट ह्या अमेरिकन हाऊस आणि सिनेटने पास केलेल्या कायद्याला मंजुरी देताना ट्रम्प यांनी जे निवेदन प्रसृत केले त्यातील एक परिच्छेद अति महत्वाचा आहे. 

Further, certain provisions, such as sections 254 and 257, purport to direct my subordinates in the executive branch to undertake certain diplomatic initiatives, in contravention of the President's exclusive constitutional authority to determine the time, scope, and objectives of international negotiations. And other provisions, such as sections 104, 107, 222, 224, 227, 228, and 234, would require me to deny certain individuals entry into the United States, without an exception for the President's responsibility to receive ambassadors under Article II, section 3 of the Constitution. My Administration will give careful and respectful consideration to the preferences expressed by the Congress in these various provisions and will implement them in a manner consistent with the President's constitutional authority to conduct foreign relations.

Finally, my Administration particularly expects the Congress to refrain from using this flawed bill to hinder our important work with European allies to resolve the conflict in Ukraine, and from using it to hinder our efforts to address any unintended consequences it may have for American businesses, our friends, or our allies.

ट्रम्प म्हणतात की नव्या कायद्यातील कलम २५४ आणि २५७ च्या तरतुदीनुसार राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना काही राजनैतिक पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे असे दिसते. असे करत असताना परराष्ट्र धोरण ठरवण्याचे आणि त्यासाठी कोणती पावली कधी कुठे उचलावीत हे ठरवण्याचे राष्ट्राध्यक्षांचे अधिकार धुडकावले गेले आहेत. तर अन्य काही कलमांद्वारे राष्ट्राध्यक्षांनी कोणत्या राजनैतिक व्यक्तीना अमेरिकेत येऊच देऊ नये आणि त्यांना भेटू नये हेही सांगितले जात आहे. घटनेच्या धारा २ भाग ३ नुसार नेमके हे ठरवण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षांना देण्यात आले आहेत. 

ट्रम्प यांच्या निवेदनातील वरील परिच्छेद अत्यंत गंभीर आहेत. अमेरिकन राज्यव्यवस्थेमध्ये कायदे करण्याचे अधिकार कायदेमंडळाकडे - ते राबवण्याचे अधिकार अध्यक्षांकडे आहेत. परंतु सरकारची धोरणे ठरवण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले आहेत. नव्या कायद्यानुसार तेथील कायदेमंडळ हे अधिकार स्वतः कडे हिसकावून घेत आहे. तसेच अध्यक्षांच्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट कामे सांगण्याचा नवा पायंडा पाडला जात आहे. ह्या इतक्या कोलांटी उड्या का माराव्या लागत आहेत बरे? क्रिमियाच्या स्वातंत्र्याला अथवा युक्रेनच्या अन्य प्रदेशाच्या स्वातंत्र्याला राष्ट्राध्यक्षांनी रीतसर मान्यता देऊ नये ह्यासाठी केलेले हे प्रयत्न आहेत हे अगदी स्पष्ट आहे. ट्रम्प याना तसे करण्यापासून रोखण्यासाठी त्यांचे सर्वच विरोधक एकवटले आहेत हे उघड आहे. क्रिमियाला स्वातंत्र्य मिळाले तर ह्या विरोधकांचे काय बिघडणार आहे? पुतीन यांच्याशी सामंजस्य प्रस्थापित केले तर त्यांचे काय बिघडणार आहे? असे प्रश्न मनात येतात. आणि त्यांची उत्तरे सोपी नाहीत.

कोणत्याही मार्गाने - कोणत्याही प्रकारे ट्रम्प यांना अडवण्याचा त्यांच्या विरोधकांनी चंग बांधला आहे असे दिसत आहे. आपल्याला पसंत नाही म्हणून अध्यक्षांना त्यांच्या घटनेने दिलेल्या अधिकारानुसार काम करण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे हे प्रयत्न बुचकळ्यात टाकणारे आहेत. शिवाय लोकशाहीच्या नावाने जे बोंबाबोंब करतात त्यांचाच लोकशाही प्रक्रियावरती अजिबात विश्वास नाही असे यातून लक्षात येते. लक्षात घ्या. हे किती भीषण आयोजन (कारस्थान??) असू शकते. 

भारतामध्ये निवडून आलेले सदस्य पंतप्रधान कोणी व्हायचे ते ठरवतात. बहुमत असलेल्या पक्षाचे पंतप्रधान आज सत्तेमध्ये आहेत. शिवाय इथे पक्षांतर विरोधी कायद्यामुळे निर्वाचित सदस्य पक्ष सांगेल त्यानुसार मतदान करण्यास बांधील आहेत. हे अडसर नसते तर इथे मोदींनाही अमेरिकन मार्गाने अडवण्याचे प्रयत्न झाले नसते असे आपण ठामपणे म्हणू शकतो का? भारतामध्ये विरोधकांना जे मार्ग खुले आहेत त्यामध्ये - आपणच बढत्या नेमणूक केलेल्या भ्रष्ट मिंध्या बाबू लोकांना हाताशी धरून मोदींचे पाय बांधून ठेवणे - दिरंगाई करणे - प्रचलित न्यायव्यवस्था वापरून असे अडसर निर्माण करणे - हिंसक आंदोलने उभी करणे आणि अन्य काही मार्ग यांचा समावेश होतो आणि त्यांचा प्रच्छन्न वापर केला जात असल्याचे आपण बघत आहोत. 

कोणत्याही सत्ताधाऱ्याला राजकीय विरोधक असतातच. त्यांनी पुनश्च सत्तेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत हेही स्वाभाविक आहे हे आपण मान्यच करतो. पण ज्या थराला जाऊन अमेरिकेमध्ये हे प्रयत्न होत आहेत ते भयावह आहेत. आणि त्यांचा अर्थ स्पष्ट आहे. गेली कित्येक वर्षे अमेरिकेमध्ये कोणत्याही पक्षाचे राज्य असले तरी निर्णय घेणाऱ्या आणि त्या करणाऱ्या व्यक्ती मात्र सरकार बाहेर होत्या आणि त्यांच्या 'मर्जीनुसार' सरकारचे महत्वाचे निर्णय घेतले जात होते. आज ह्या चांडाळ चौकडीला आपले निर्णय राबविता येत नाहीत ही अडचण आहे. आणि त्यामुळे ते चवताळले आहेत. कारण त्यांच्या अस्तित्वालाच आव्हान उभे राहत आहे. मोठ्या कष्टाने जुळवून आणलेल्या ह्या सत्ताबाह्य केंद्राला हादरे बसत आहेत. म्हणूनच ट्रम्प यांच्यावरती महाभियोग खटला चालवून त्यांना सत्तेमधून दूर करण्याच्या घोषणा  वारंवार केल्या जाताना दिसतात. 

रशियाला चुचकारून आपल्या बाजूला वळवून घेऊन चीनला एकटे पडायचे आणि त्याच्यावरती लगाम लावून अमेरिकेचे होणारे आर्थिक नुकसान भरून काढायचे - अमेरिकन जनतेला पुनश्च रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असतील तर चीनला वेसण घालणे अत्यावश्यक झाले आहे ह्या धोरणाने ट्रम्प पुढे जात आहेत पण त्यांच्या ह्या आखणीमुळे भोंदू लिबरल्सचा 'बना बनाया खेल' काय आहे ते गावाच्या वेशीवर टांगले जात आहे आणि तीच त्यांची पोटदुखी आहे.  

निवेदनाच्या पुढच्या परिच्छेदात ट्रम्प म्हणतात की "युक्रेन प्रकरणी कलह थांबवण्यासाठी माझ्या सरकारने युरोपियन मित्र देशांना सोबत घेऊन जे प्रयत्न चालवले आहेत त्यात मोडता घालण्यासाठी काँग्रेसने ह्या कायद्याचा वापर करू नये. त्यांच्या अशा कारवायांमुळे अमेरिकन उद्योगधंद्यांना - अमेरिकेच्या दोस्त राष्ट्रांना आणि सहकाऱ्यांना विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात ते टाळले जावेत." एका बाजूला ट्रम्प असा इशारा देत आहेत तर त्यांच्याकडे ढुंकूनही लक्ष न देणाऱ्या काँग्रेसने आपण पास केलेला कायदा राबवण्यासाठी काय तयारी चालवली आहे ते बघू. 

आंद्रे पायांटकोस्की हे नामवंत लेखक आहेत. पुतीन ह्यांची राजकीय परिस्थिती कशी नाजूक आहे हे विदित करताना आंद्रे ह्यांनी ह्या कायद्याच्या कलम २४१ कडे लक्ष वेधलेआहे. आंद्रे लिहितात की "या कलमानुसार अमेरिकन ट्रेझरीने रशियामधील कोणत्या व्यक्तींची किती संपदा अमेरिकेमध्ये आहे त्याची यादी १८० दिवसात काँग्रेसला द्यायची आहे. ही यादी वापरून ह्या व्यक्तींची संपत्ती गोठवण्यात येणार आहे. खरे तर ही यादी सर्वज्ञात आहे. रशियामधून काळ्याचा पांढरा पैसे करणारे आणि त्यांची संपत्ती याची इत्यंभूत माहिती सरकारकडे असून नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च यांच्याकडे अशा व्यक्तींचे सुमारे एक लाख वीस हजार कोटी डॉलर्स अमेरिकेच्या बँकांमध्ये असल्याची माहिती आताही उपलब्ध आहे. पण एकदा का ह्या यादीमध्ये नावे समाविष्ट झाली की त्यांच्यावरील कारवाई कोणालाही थांबवता येणार नाही. हे वेगळे लिहायला नको की अशा यादीमध्ये स्वतः पुतीन आणि त्यांचे जवळचे विश्वासू सहकारी आहेत." 

इथे आपल्याला आठवत असेल की पुतीन यांचे नाव पनामा पेपर्स प्रकरणी आले होते आणि त्यांच्या नावे २०० कोटी डॉलर्स असल्याचा दावा करण्यात आला होता. 

पुन्हा एकदा लक्षात घ्या की वरिष्ठ रशियन वर्तुळातील व्यक्ती ह्या जाळ्यामध्ये फसल्या आहेत हे मान्य केले तर त्यांना ब्लॅकमेल करणे किती सोपे आहे हे उघड होते. जर रशियाची ही परिस्थिती असेल तर भारतीय वरिष्ठ वर्तुळाचे काय असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा ब्लॅकमेल करणाऱ्यांची कार्यपद्धती काय असते हे विचारात घ्या - मी सांगतो म्हणून हे एवढे कर नाही तर .... अशा पवित्र्यामध्ये ते असतात. तेव्हा अमेरिकन भोंदू लिबरल्स ना हवे म्हणून आपणही काश्मीरला स्वायत्तता द्यायला तयार झालो नव्हतो का? हे प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती अमेरिकेत राहूनच ह्याचे आयोजन करत होत्या ना? 

भ्रष्टाचार हा लोकशाहीचा शत्रू आहे आणि मोदी भ्रष्टाचाराविरुद्धची महत्वाची लढाई लढत आहेत असे त्यांचे कौतुक ट्रम्प यांनी जून २०१७ मध्ये केले होते. त्या विधानामागची कारणमीमांसा आपल्या लक्षात येईल.

अशा प्रकारे रशियावर कधी अमेरिका आर्थिक निर्बंध घालेल अशी मी स्वतः कल्पनाही केली नव्हती. रशिया हे एक मोठे राष्ट्र आहे. उण्यापुऱ्या अडीच दशकापर्यंत ते जगातले दोन नंबरचे राष्ट्र होते. आज रशियाचे आर्थिक बळ पूर्वी इतके नसले किंवा त्याची राजकीय ताकत पूर्वीच्या सोविएत रशियासारखी नसली तरी रशियावरती आर्थिक निर्बंध घालणे हे एक खूपच मोठे पाऊल आहे. पण चिरडीला आलेले विरोधक ह्या पातळीवरती जाऊ इच्छितात हे स्पष्ट आहे. रशियाची लुडबुड नसती तर हिलरीच निवडून आल्या असत्या आणि रशियामुळेच आपला प्रतिनिधी अमेरिकन सत्ता स्थानावरती इतिहासात जवळ पास पहिल्यांदाच बसू शकला नाही ह्याची चीड चीड ह्या नव्या कायद्यामध्ये दिसत आहे. आपल्या निर्णयांमुळे जगामध्ये जी काही परिस्थिती निर्माण होईल तिच्यातून आपण मार्ग काढू शकू याची विरोधकांना खात्री असावी. 

खरे तर ट्रम्प कसे आहेत - ते अमेरिकेला उपकारक आहेत का - त्यांनी पुतीन यांच्याशी ठरवल्याप्रमाणे करार करावा का - तो अमेरिकन हिताचा आहे का - पुतीन म्हणजे कोणी संत प्रवृत्ती माणूस आहे का - भ्रष्ट असेल तर त्याचे ट्रम्प यांनी का ऐकावे - जागतिक चांडाळ चौकडीचे साम्राज्य मोडून काढण्यात ट्रम्प आणि पुतीन यांना यश येईल का वगैरे अनेक प्रश्न आपल्याला भंडावून सोडतात. ह्या सगळ्यावर मी काय भूमिका घेणार? ह्या परिस्थितीमधून भारताला काय हाती लागणार एवढीच चिंता आपण करू शकतो.