Thursday, 30 November 2017

सिंजोना भाग ७

मिलानच्या आकाशामध्ये असे तारे चमकत होते. सिंजोनाही स्वतःसाठी ह्या उच्च वर्तुळामध्ये एक स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होता. इटालीच्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये मान्यवरांकडून शिफारस मिळणे ह्यासारखे मोठे "पारपत्र" नव्हते. सिंजोनाची मामेबहिण ऍन्ना रोझा हिचा विवाह रेव्हरंड अम्लेतो तोंदिनी ह्यांच्या धाकट्या भावाशी झाला होता. सिंजोनासाठी ही एक मोठीच शिडी होती. स्वतः तोंदिनी लॅटिन भाषेचे तज्ञ मानले जात. पोपच्या सर्व निवेदनांचे लॅटिन भाषेमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी असलेल्या खात्याचे ते प्रमुख होते. अर्थातच तोंदिनी ह्यांचे व्हॅटिकनमध्ये अनेक उच्च पदस्थांशी उत्तम संबंध होते. सिंजोना आणि तोंदिनी ह्यांची भेट १९५० मध्ये झाली. सिंजोनाचेही लॅटिन भाषेवरती प्रभुत्व होते. हा एक दुवा आणि त्याचा मैत्री करण्याचा स्वभाव ह्यातून त्याने तोंदिनी ह्यांच्यावर चांगलीच छाप पाडली. सिंजोनाला त्याच्या व्यवसायामध्ये मदत करण्याच्या हेतूने तोंदिनी ह्यांनी सुचवले की त्याने व्हॅटिकनसाठी काम करावे. सिंजोना लगेच तयार झाला. मासिमो स्पादा ह्यांना तोंदिनी ओळखत होते. स्पादा ह्यांना पोपने प्रिन्स अशी उपाधी दिली होती तर १९४४ मध्ये त्यांची नेमणूक माल्टामध्ये सरदारपदी झाली होती. १९४२ मध्ये पोप ह्यांनी आय ओ आर उर्फ व्हॅटिकन बॅंकेची स्थापना केली होती. तिथे स्पादा उच्च पदावरती काम करत. बर्नार्डिनो नोगारा ह्या व्हॅटिकन बॅंकेच्या प्रमुखांनी ज्या गुंतवणुकी केल्या होत्या त्यांच्या बाबतीमधले सर्व व्यवहार स्पादा बघत. स्पादा हे एक बडे प्रस्थ होते. ते इटालीच्या एका बड्या बॅंकेचे - बांको दि रोमा - चे व्हाईस प्रेसिडेंट होते. सोसियाटा इटालियाना पर इल गॅस ह्या कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावरती होते. त्रिएस्त शहरामधील रियुनियन ऍड्रियाटिका दि सिकुर्टा इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पदांची यादी एक दोन पाने लिहावी लागेल. इतक्या मोठ्या व्यक्तीला भेटण्यासाठी सिंजोनाला तोंदिनी ह्यांच्याकडून शिफारस मिळाली हे सिंजोनाचे भाग्यच म्हटले पाहिजे. तुमचे काही कायदेविषयक काम मिलानमध्ये असेल तर आपला "नातेवाईक" सिंजोना ह्याला द्यावे अशी विनंती तोंदिनी ह्यांनी केली होती. 

स्पादा ह्यांना एका भेटीमध्येच सिंजोना आवडला. संभाषण चातुर्य त्याने आत्मसात केले होते. त्याची छाप अशी पडली की स्पादा ह्यांनी व्हॅटिकन बॅंकेची गुंतवणूक ज्या उद्योगांमध्ये होती त्या कंपन्यांच्या प्रमुखांना भेटीस बोलावले. इटालीच्या सर्वात मोठ्या  टेक्सटाईल व्यवसायाचे प्रमुख तसेच एका बड्या इलेक्ट्रिकल कंपनीचे प्रमुख ह्यांना त्यांनी सिंजोनाला काही काम द्यावे असे सुचवले. उत्पन्नाच्या दृष्टीने ही कामे फार मोठी नव्हती. पण सिंजोनाने चिकाटी सोडली नाही. तो वारंवार रोम येथे जाऊन स्पादा आणि अन्य अधिकार्‍यांना भेटत असे. १९५४ मध्ये पोप पायस ह्यांनी मॉंतिनी ह्यांची मिलान शहराचे आर्चबिशप म्हणून नेमणूक केली तेव्हा सिंजोनाचे भाग्यच जणू उदयाला आले. 

तोंदिनी अर्थातच मॉन्तिनी ह्यांनाही ओळखत होता. शिवाय सिंजोनाकडे पात्ती येथून तिथल्या आर्च बिशपने दिलेले पत्रही होतेच. मॉन्तिनी आणि सिंजोना ह्यांचे सूत जमायला वेळ लागला नाही. त्याकाळी मिलान शहराअमध्ये उद्योगधंद्यांची भरभराट होत होती. कित्येक कारखाने निघाले होते. इथे काम करणार्‍या कामगार वर्गावरती चर्चचा अजिबात प्रभाव नव्हता. इथे लाल कम्युनिस्टांची चलती होती. मिलान शहरामध्ये चौद लाख नागरिकांनी कम्युनिस्ट म्हणून आपली नोंद केली होती. १९४८च्या निवडणुकीत मिलानची जागा कम्युनिस्टांना मिळाली होती. मॉन्तिनी ह्यांनी ह्या परिस्थितीमध्ये बदल करण्याचे ठरवले. सिंजोना अर्थात त्यांच्या मदतीला उभा राहिला. मुळात सिंजोना हा सिसिलियन माफियांचा प्रतिनिधी. पण कम्युनिस्टांना शह देण्याच्या कामी मॉन्तिनी ह्यांच्याशी त्याचे एकमत होते. त्या दोघांनी मिळून कामगार वस्तीमध्ये सभा घेण्याचे आणि तिथे प्रार्थना सभा आयोजित करण्याचे ठरवले. प्रत्येक कारखान्याला भेट देऊन तिथे सभा घेऊन मॉन्तिनी ह्यांनी कामगार वर्गामध्ये काम सुरु केले. कारखान्याच्या हद्दीमध्ये प्रार्थना सभा घेण्याला कम्युनिस्ट नेता पिएत्रो विरोध करत होता. पण मॉन्तिनी ह्यांनी त्याला जुमानले नाही. सिंजोनाकडे शहरातल्या बड्या बड्या उद्योगपतींनी कामे सोपवली होती. त्यामुळे सिंजोनाला त्यांच्या कारखान्यामध्ये प्रवेश सहज मिळत असे. तुमचे भाग्य हे कम्युनिझम मुळे उजळणार नाही तुम्ही देवावरती विश्वास ठेवा आणि  भांडवलशहांच्या बरोबरीने उभे राहा असे आवाहन मॉंन्तिनी करीत. पुढच्याच वर्षी निवडणुकीमध्ये पिएत्रो हरले आणि युनियनची सूत्रे एका ख्रिश्चन डेमोक्रॅट उमेदवाराकडे गेली. सिंजोनाच्या मदतीशिवाय हे घडले नसते हे मॉन्तिनी जाणत होते. सिंजोनाचे स्थान त्यामुळे उंचावले. सिंजोनाक्डे गुंतागुंतीची कामे येऊ लागली. चर्चच्या परदेशी व्यवहारांसाठी एक कायदेशीर जाळे उभे करण्याचे काम त्याने हाती घेतले. एकंदरीत सिंजोनाकडील कामांचा ओघ वाढला. तसेच आता स्पादा ह्यांनीही त्याच्या पदरी दोन भरघोस कामे टाकली. सोसियाता जनराले इम्मोबिलियरे आणि स्निया विस्कोसा ह्या कंपन्या सिंजोनाला मिळाल्या. 

सिसिलीपासून दूर वरती रोम आणि मिलान शहरांमध्ये आपली कर्मभूमी निर्माण करणार्‍या सिंजोनाचे पाय मात्र सिसिलियन माफियांमध्ये घट्ट रुतलेले होते. २ नोव्हेंबर १९५७ मध्ये पालेर्मो ह्या सिसिलियन शहरामध्ये ग्रॅंड हॉटेल देस पामे इथे माफियांची एक महत्वाची सभा झाली. त्यामध्ये सिंजोनाला आमंत्रण होते. एव्हाना सिंजोनाचे व्हिटो जिनोव्हीज - जो अडोनिस - कार्लो गॅंबिनो - इंझरिलो ह्या सर्व गॅंगस्टर टोळ्यांशी उत्तम संबंध होते. अमेरिकेमधून परतलेला बॉस ऑफ द बॉसेस चार्ली लकी लुचान्या सिसिलीमधून अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापाराचे जाळे उभे करत होता. तर अमेरिकेमध्ये "कॅल्क्युलेटर ऑफ द माफिया" म्हणून प्रसिद्ध असलेला मायर लान्स्की खोर्‍याने कमावलेला पैसा परदेशी कसा पाठवायचा ह्याचे मार्ग शोधत होता. त्या सर्वांसाठी सिंजोनाचे डोके वापरणे गरजेचे बनले होते. कमावलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय जाळे उभे करण्याचा निर्णय ह्या मीटींगमध्ये घेण्यात आला. त्याची सूत्रे अर्थातच सिंजोनाकडे सोपवण्यात आली. ह्यानंतर अवघ्या सतरा महिन्यांमध्ये सिंजोनाने आपली पहिली बॅंक खरेदी केली. चो६याच करायच्या तर स्वतःची बॅंक हवी हे त्याने चाणाक्षपणे ओळखले होते. 

जितक्या सहजपणे सिंजोना माफिया गॅंगस्टर्समध्ये मिसळू शकत होता तितक्याच सहजपणे तो व्हॅटिकनच्या अधिकार्‍यांशीही मिळून मिसळून वागत होता. १९५९च्या शेवटाला व्हॅटिकन बॅंकेचे प्रमुख बर्नार्दिनो नोगारा ह्यांची आणि सिंजोना ह्यांचीही भेट झाली होती. नोगारांना देखील सिंजोना आवडला होता. ह्या भेटीनंतर काही महिन्यांनंतर नोगारा ह्यांचे निधन झाले. त्यानंतर मॉन्तिनी ह्यांनी एक दिवस सिंजोनाला रोममध्ये बोलावून घेतले. त्यांना दोन लाख डोलर्सची गरज होती. कासा मॅदोनिना हा वृद्धाश्रम चालू करण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला होता. मी तुमच्या पाठीशी उभा आहे असे आश्वासन सिंजोनाने त्यांना दिले. आणि खरेच सिंजोनाने हे पैसे तातडीने उभे करून दाखवले. असे म्हणतात ह्यामधले काही पैसे त्याने माफियांकडून आणवले तर काही हिस्सा अमेरिकन सी आय ए ने त्याच्याकडे सुपूर्द केला होता. कम्युनिस्टांच्या पाडावाकरिता सीआय ए तेव्हा व्हॅटिकनला भरघोस मदत करत होती. 

सीआयए - व्हॅटिकन - माफिया अशा टोकाच्या संस्थांना हवाहवासा वाटणार्‍या सिंजोनाच्या अजब बुद्धिमत्तेचे कौतुक वाटल्याखेरीज राहत नाही. दुर्दैव एव्हढेच की ती वाईट मार्गाच्या फायद्यासाठी राबत होती. इथून पुढे सिंजोनाने जे आर्थिक साम्राज्य उभे केले त्याची कहाणी बघू. 

5 comments:

  1. I am not keeping good health, will resume the series as early as possible

    ReplyDelete
  2. Take care madam
    Thanks for such good articles series

    ReplyDelete
  3. Please take care and wish you a good health :-)

    ReplyDelete
  4. आपली तब्येत चांगली होऊ द्या मग जोरदार लिखाण करा, काळजी घ्या.

    ReplyDelete