Thursday 23 November 2017

सिंजोना भाग ५

बांको अम्ब्रोशियानो - अम्ब्रोशिया बॅंक म्हणजे सिंजोनाच्या कथेमधले एक अविभाज्य पात्र आहे. अर्थातच त्याबद्दल महिती करून घेणे अगत्याचे ठरते. १८४० साली ब्रेशिया येथे जन्मलेल्या जूजेफे तोविनी ह्यांनी १९ व्या शतकाच्या अखेरीला ही बॅंक सुरू केली तेव्हा त्यांचे उद्देश वेगळेच होते. ख्रिश्चियानिटी आणि त्यांच्यामधले पंथभेद - व्हॅटिकन चर्चचा वरचष्मा आणि वरवंटा - त्याला कंटाळून वेगळे होऊ पाहणारी मंडळी - ज्यांना ख्रिश्चन राहायचे आहे पण चर्चची मक्तेदारी आपल्या आयुष्यात नको असे वाटणारे गट इतिहासकालापासून अस्तित्वात आहेत. हे गट चर्चच्या जाचापासून मुक्ती मिळावी म्हणून अत्यंत गुप्तरीत्या आपले व्यवहार करतात असे सांगितले जाते. एखादी व्यक्ती अशा गुप्त संस्थेची सदस्य आहे हे सहजासहजी संस्थेबाहेरच्या व्यक्तीला समजत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत बाळबोध दिसणाऱ्या बाबींपासून सामान्य माणसाला त्यांच्या कार्यामध्ये ओढले जाते. जसजसा विश्वास वाढतो तसतसे त्याला संस्थेच्या स्वरूपाची प्रथम थोडक्यात आणि नंतर विस्तृत माहिती होऊ लागते. एका सभासदाने दुसऱ्या सभासदाविरोधात सरकार दरबारी ब्र ही न काढण्याची शपथ दिली जाते. काही संस्था तर सदस्याला त्याच्या चुकीकरिता ठार मारण्याचा संस्थेचा अधिकारही सदस्याकडूनच मान्य करून घेतात. केवळ परस्परांच्या विश्वासावरती चालणाऱ्या ह्या संस्थांबद्दल भारतात आपल्याकडे पुसटशी कल्पनाही नसल्यामुळे ही माहिती लिहित आहे. अशा संस्थांमधलीच फ़्री मेसन्स ही एक प्रमुख संस्था आहे आणि तिच्याविषयी अगदी विपुल माहिती इंटरनेटवरती उपलब्ध आहे.. खरे तर ह्या बाबींचा मी उल्लेख करण्याचे काहीही कारण नाही. कारण ह्या संस्था केवळ काल्पनिक असून प्रत्यक्षात असे काही नसतेच असे युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. पण सिंजोनाच्या कथेमध्ये अशाच एका गुप्त संस्थेचे वाभाडे अगदी कोर्टदरबारी कागदोपत्री पुराव्यासकट निघाले असल्यामुळेच अगदी निर्धास्तपणे ही माहिती मी लिहित आहे.

तर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला अशा संस्थांचे आणि व्हॅटिकनचे संबंध ताणलेले असणार हे उघड आहे. समाजाच्या प्रत्येक अंगामध्ये त्या काळामध्ये फ्रीमेसन्सचा शिरकाव झालेला होता. ही बाब काही श्रद्धाळु ख्रिश्चनांना बिलकुल आवडत नसे. जितके फ्रीमेसन्स कडवे होते तेव्हढेच कॅथॉलिकही कडवेच होते. जूजेफे तोविनी एक श्रद्धाळु ख्रिश्चन होता. आपल्या आसपास असलेले प्रबळ फ्री मेसन्स बघून तो अस्वस्थ होत असे. पण तो स्वस्थ बसणाऱ्यामधला नव्हता. अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने आपले ध्येय पूर्ण करण्याच्या मागे तो झपाटल्यासारखे काम करत असे. तोविनी एक राजकारणी होता आणि उद्योगपतीही. ब्रेशिया नगरपालिकेचा तो बराच काळपर्यंत एक सदस्य होता. तोविनीने ब्रेशियामध्ये प्रथम एक कॅथोलिक वर्तमानपत्र स्थापित केले. आपले राजकीय सामाजिक आणि उद्योगव्यवसायातील वजन वापरून तो चर्चसाठी धर्मादाय कार्य करत होता आणि खास करून गरीबांना लाभ पोहोचेल अशी कामे हाती घेत असे. तोविनीच्या दृष्टीने व्हॅटिकनवरती कोणत्याही सरकारचा वरचष्मा असता कामा नये कारण ते ख्रिश्चनांचे सर्वोच्च व्यासपीठ आहे आणि त्याला कोणत्याही सरकारसमोर झुकावे लागू नये अशी त्याची इच्छा होती. इटालीमध्ये चर्चला उर्जितावस्था हवी असेल आणि चर्चला आर्थिक स्वायत्तता हवी असेल तसेच पुनश्च चर्चचे राज्य स्थापित करायचे असेल तर चर्चचे आर्थिक व्यवहार समकालीन सरकारच्या अखत्यारीत असता कामा नयेत म्हणजेच चर्चसाठी एक उत्तम बॅंक असावी असे त्याचे ठाम मत होते. खरे तर १६०५ मध्ये पाचवे पोप पॉल यांनी अशाच उद्देशाने बॅंक ऑफ होली स्पिरिट अशा एका बॅंकेची स्थापना केली होती. पण ही बॅंक इटालीच्या सरकारच्या हाती गेल्यापासून चर्चला हवे तसे व्यवहार तिच्यामार्फत करता येईनात. ह्या व्यतिरिक्त व्हॅटिकनकडे इन्स्टिट्यूट फॉर रिलिजियस वर्क नामक बॅंक होती आणि आजही ती कार्यरत आहे. पण त्याव्यतिरिक्त इटालीमधील अन्य बॅंका एक तर फ्रीमेसन्सच्या ताब्यात होत्या नाही तर सरकारच्या - म्हणजेच त्या ’सेक्यूलर’ बॅंका होत्या. तेव्हा चर्चसाठी एका बॅंकेची स्थापना करायचीच असे स्वप्न घेऊनच तोविनी काम करत होता. त्याने १८८८ मध्ये बांका सान पाओलोची ब्रेशिया शहरामध्ये स्थापना केली. पुढे १८९६ मध्ये ही बॅंक त्याने मिलान शहरामध्ये हलवली. मिलान शहराचे ’पॅट्रन सेंट" आणि चौथ्या शतकातले मिलान शहराचे आर्चबिशप सेंट अम्ब्रोस यांचे नाव असावे म्हणून बॅंकेचे नाव बांका अम्ब्रोशियानो असे करण्यात आले.

बॅंकेच्या सभासदत्वाचे नियम अत्यंत कडक होते. त्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला बॅप्टिस्मा घेतल्याचे पत्र तर द्यावे लागेच पण शिवाय तो ज्या पॅरिशच्या हद्दीमध्ये राहत असे त्या पॅरिशच्या फादरकडून तो निष्ठावंत कॅथॉलिक असल्याचे पत्रही द्यावे लागे. कुठूनही बॅंकेमध्ये फ्रीमेसन्स घुसू नयेत म्हणून काळजी घेतली जात असे. तोविनीने १५० श्रद्धाळु श्रीमंत कॅथॉलिकांना एकत्र आणले होते. ह्यांनी काही दशलक्ष लिरा जमा करून बॅंक सुरू केली होती. पोप पायस ११ यांचा भाचा फ्रॅन्को रात्ती बॅंकेचा सेक्रेटरी म्हणून काम करत होता.  कडक आचारसंहिता पाळूनच बॅंकेकडून कर्ज दिले जावे ह्यावर स्वतः तोविनी भर देत असे. साहजिकच मिलानच्या आसपासचे सर्व पॅरिश बॅंकेशी जोडले गेले होते आणि आपले सर्व व्यवहार ते बॅंकेमार्फत करत असत. म्हणूनच बॅंकेचे नाव 'la banca dei preti' - धर्मगुरुंची बॅंक असे पडले होते. १८९७ मध्ये वयाच्या ५७ वाव्या वर्षी तोविनी यांचे निधन झाले. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन पोप पॉल ६ यांनी १९७७ मध्ये बीटीफ़िकेशन समारोह केला. तदनंतर तोविनी यांना संतपद मिळावे म्हणून मार्ग खुला झाला. तोविनी ह्यांनी तळमळीने पूर्ण केलेल्या कामातून बांका अम्ब्रोसियानो ही इटालीमधील दोन नंबरची खाजगी बॅंक म्हणून उदयाला आली. पण दैवगती अशी की व्हॅटिकन चर्चवरती इटालियन सरकारच्या किंवा फ्रीमेसन्सच्या हातचे बाहुले बनायची वेळ येऊ नये म्हणून तोविनीने घेतलेल्या कष्टावरती हळूहळू कसा बोळा फिरवण्यात आला ते पाहून खुद्द तोविनीसुद्धा आपल्याच थडग्यामध्ये अस्वस्थ होऊन गेला असेल. बॅंकेची ही उतरती कळा नेमकी कशी सुरू झाली आणि व्हॅटिकनच्या रक्षणासाठी स्थापन केलेल्या बॅंकेच्या कपटामुळे चर्चवरती नामुष्कीची पाळी झाली ही दुःखद कथा समजून घ्यायची तर बॅंकेची पुढची वाटचाल कशी झाली ते पहावे लागेल.

तोविनी यांच्या पश्चात बॅंकेचे काम विस्तारत होते. पण इटालीमधली परिस्थिती हळूहळू बदलत होती. तिचे भान ठेवून बॅंकेच्या व्यवहारांमध्ये काही फरक करणे गरजेचे होते. ते काम कार्लो कानेसी यांनी सुरु केले. कार्लो कानेसी हे बॅंकेमध्ये उच्च पदावरती होते. १९३६ साली इटालियन सरकारने एक कायदा केला होता. त्यानुसार कोणत्याही एका व्यक्तीला अथवा एका कंपनीला कोणत्याही इटालियन बॅंकेचे ५% पेक्षा जास्त शेयर्स घेण्यास बंदी घालण्यात आली होती. बॅंकेकडे जमा होणाऱ्या पैशाचा कोणी गैरवापर करू नये आणि तसे करण्यातून बॅंकेमध्ये मोठ्या विश्वासाने आपले स्वकष्टार्जित धन ठेवणाऱ्या सामान्य नागरिकांचे नुकसान हो ऊ नये ह्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले होते. ह्या नियमाची व्हॅटिकनला भीती वाटत असे. कारण कोणत्याही एका शेयर होल्डरकडे ५% हून अधिक शेयर्स नसले तर सरकारला बॅंक स्वतःच्या ताब्यात घेणे सोपे होऊन गेले होते. तेव्हा सरकारने बॅंक हाती घेऊ नये म्हणून काही प्रतिबंध घालण्याच्या हेतूने काही सुपीक डोक्याच्या व्यक्तींनी शकला लढवल्या. आणि निदान वरकरणी तरी कायदेशीर वाटावे अशा मार्गाने बॅंकेवरती आपले वर्चस्व कायम राहावे म्हणून ह्यातून पळवाटा शोधण्यात आल्या. ह्यासाठी कानेसींना मदत झाली ती रॉबर्टो काल्व्ही ह्या तरूणाची. पण एकदा का ह्या पळवाटांची चटक लागली की माणसाला थांबावे कुठे ते कळेनासे होते. त्यातूनच जन्माला आली ती बांका अम्ब्रोसियनोची दिवाळखोरी.  त्याची कहाणी पुढील भागामध्ये पाहू. 

2 comments: