Saturday, 18 November 2017

नोटा छपाईची कथा भाग २



लिबियाच्या नोटा छपाईची कथा डोळ्यामध्ये अंजन घालणारी आहे. एखाद्या देशाला कमरेत वाकवायचे असले रामबाण पाश्चात्यांनी आपल्या हाती ठेवले आहेत. पण देशादेशामधले वैर आणि स्पर्धा कोणत्या पातळीवर जातात हे पहायचे तर चेचन्याच्या उदाहरणाकडे बघावे लागेल.

सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर अनेक देश संघराज्यामधून बाहेर पडले. असाच प्रयत्न करणार्‍यांमध्ये चेचन्या होता. त्या दिवसात चेचन्यामध्ये कायद्याचे राज्य अस्तित्वात नव्हते म्हटले तरी चालेल. अशातच काही जण  Ruling Council नावाने देशाची सूत्रे आपल्याकडे असल्यासारखे निर्णय घेत होते. त्या कौन्सिलमध्ये रुसलान डेप्यूटी चेअरमन म्हणून काम करत असे. १९९२ मध्ये चेचन्यातील डमी सरकारमध्ये स्वतःला पंतप्रधान म्हणवून घेणारा रुसलान उत्सिव लंडनमध्ये आला. त्याच्याबरोबर त्याचा भाऊ नझरबेग सुद्धा होता. नझरबेग मार्शल आर्ट्स मध्ये तरबेज होता. आणि मारामार्‍या करण्यासाठी पैशाच्या बोलीवर कोणाच्याही बाजूने उतरायची त्याची तयारी असे. कदाचित रुसलान जे काम घेऊन लंडनमध्ये आला होता त्यासाठी नझरबेग हा उत्तम अंगरक्षक त्याने आणला होता असे दिसते.

नवोदित चेचेन सरकारने रुसलानवर दोन कामे सोपवली होती. एक म्हणजे नव्या देशासाठी चलनी नोटा व पासपोर्ट छापून घेणे. दुसरे म्हणजे देशातील तेलासाठी युरोपियन कंपन्यांशी व्यवहार ठरवणे. लंडनमध्ये पोहोचल्यावर रुसलानने शेरलॉक होम्स फेम २२१बी बेकर स्ट्रीट च्या परिसरात एक फ्लॅट सात लाख पौंड देऊन राहण्यासाठी निवडला. त्यानंतर त्याला एका दुभाष्याची गरज होती. चेचन्यामध्ये असताना अलिसन पॉंन्टिंग नामक BBC मध्ये रिपोर्टर म्हणून काम करणार्‍या ब्रिटिश महिलेने त्याची मुलाखत घेतली होती. रुसलानने तिलाच फोन करून आपल्यासाठी एक दुभाषा बघण्यास सांगितले. अलिसनने तिच्या नवर्‍याचे नाव सुचवले. टेर ओगानिस्यान हा मूळचा आर्मेनियन होता. पण टेरचे व्यवहार सरळ नव्हते. तो एक छुपा तस्कर तर होताच शिवाय अनेक बोगस कंपन्या स्थापन करून काळ्याचा पांढरा पैसा करण्यासाठी तो ’सेवा’ देत असे. त्याचे आणि उत्सिव बंधूंचे मेतकूट बर्‍यापैकी जमले. सुरुवातीला ह्या त्रिकूटाने आलिशान पार्ट्या देऊन बड्याबड्यांना आमंत्रणे देऊन आपले पाय रोवले. तेल व्यापारासाठी रुसलान मोठ्या कंपन्यांच्या अधिकार्‍यांना भेटत होता. व्यवहारामध्ये एक अट अर्थातच ’कॅश’ पैसे किती व कसे देणार याची घातली जात होती. रुसलानकडे पैसा भरपूर असावा. हॉटेलमध्ये गेल्यावर तो वेटरला टिप्स म्हणून २००० पौंड देखील देत असे. बाकी बाई बाटली मजा चालूच होती आ्णि टेरही त्यात सामिल होता.  पुढे रुसलान चलनी नोटांची छपाई - पासपोर्ट छपाई - तेल व्यवहार यापलिकडे धोकादायक क्षेत्रातले व्यवहार साधता येतात का पाहू लागला. त्याने जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी २०००  स्टिंगर मिसाईल्स खरेदी करण्याचे प्रयत्न सुरु केले. हे मिसाईल्स तो अझरबैजानला पाठवणार होता आणि त्यांचा वापर आर्मेनियाविरुद्ध व्हायचा होता. ते पाहून टेरचे डोळे उघडले. रुसलानचे खरे स्वरूप त्याच्या पुढे आले. शेवटी तो आर्मेनियन होता. रुसलान आणि त्याच्या चेचन्यातील गटाच्या हातात असे स्टिंगर मिसाईल पडणे आपल्या हिताचे नाही हे दिसताच त्याने त्वरित दोन वरिष्ठ आर्मेनियन अधिकार्‍यांना भेटला. एकाचे नाव होते मार्तिरोस्यान - आपण KGB अधिकारी आहोत असे त्याने पुढे पोलिसांना सांगितले. दुसरा होता अशोत सार्किस्यान असोत स्वतःला आर्मेनियन चेंबर ऑफ कॉमर्सचा चेअरमन म्हणवून घेत असे. परंतु तो एक आर्मेनियन जनरल होता असे पोलिस म्हणत. ह्या दोघांचे लक्ष टेरने रुसलानच्या हालचालींकडे वेधले. दोघांनी रुसलानची भेट घेऊन त्याला हा उद्योग थांबवावा असा इशारा दिला. पण रुस्सलानने त्याकडे दुर्लक्ष केले. दोघा आर्मेनियनांनी त्याच्या खुनाची सुपारी लॉस एंजेलिस इथल्या एका आर्मेनियनाला दिली. डेटमेंडझियन २० फेब्रु. रोजी लंडनमध्ये दाखल झाला तेव्हा त्याच्यासाठी राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. सहाच दिवसात म्हणजे २६ फ़ेब्रुवारी ९३ रोजी नझरबेग सायनस ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये गेला असता म्हणजे रुसलानचा अंगरक्षक नसताना सुवर्णसंधी साधण्याचे ठरले. रुसलानला तीन गोळ्या घातल्या गेल्या. थोड्याच दिवसात नझरबेगलाही गोळ्या घालून ठार मारण्यात आले. डेटमेंडझियन आणि मार्तिरोस्यान दोघांनाही अटक झाली. मार्तिरोस्यानला भेटण्यासाठी सार्किस्यान बेलमार्श या अतिसुरक्षित तुरुंगात गेला. त्या भेटीनंतर मार्तिरोस्यानक्डे सापाचे विष असलेली एक छोटी पिशवी मिळाली. गरज पडलीच तर गुपिते न फोडता KGB ह्या हस्तकाला आत्महत्या करता यावी याची सोय सार्किस्यानने केली असावी. अशीच एक विषाची पिशवी टेरच्या घरी धाडण्यात आली होती पण ती पोलिसांनी जप्त केली. चेचेन अध्यक्षांनी अलिसन पॉन्टिंगला मारण्यासाठी सुपारीबाज नेमकरी पाठवले. त्यांनी चुकून तिच्या बहिणीला गोळ्या घातल्या.

या कहाणीमध्ये KGB हस्तक किती सराईतपणे पाश्चात्य देशात वावरत होते हे तर पुढे येतेच चलनी नोटा - पासपोर्ट छपाई साठी जगात काय काय गुन्हे केले जातात हे पाहून मन स्तब्ध होते.

सबब येत्या काही दिवसात भारतीय नोटा छापण्यासाठी यूपी ए सरकारचे व्यवहार - मोदी सरकारचे व्यवहार यावर राळ उठणार आहे. तेव्हा दिसते तसे हे जग आणि व्यवहार नसतात हे लक्षात ठेवले आणि चटकन येणार्‍या बातमीवर विश्वास ठेवला नाही तर आपल्याला खरे काय त्याचा शोध घेता येईल.

(जाता जाता - विष घालून ठार मारणे हे कोणाचे वैशिष्ट्य असावे - रशियाचे अनेक शत्रू असे मारले गेले असे दिसते. सुनंदा पुष्करलाही ’रशियन’ विष घालून मारण्यात आले असे डॉ. स्वामी म्हणतात तेव्हा गूढता वाढते आणि मतीच गुंग होते.)

No comments:

Post a Comment