Wednesday 29 November 2017

सिंजोना भाग ६

कार्लो कानेसी ह्यांनी ज्या चुरचुरीत तरुणाच्या मदतीने बांका अँब्रोशियानोचा विस्तार केला त्याचे नाव रॉबर्टो काल्व्ही. काल्व्ही आणि सिंजोना एकाच वयाचे होते. काल्व्हीचा जन्म एप्रिल १९२० मध्ये इटलीच्या मिलान शहरामध्ये एका सुस्थितीतील कुटुंबात झाला होता.  त्याचे वडील बांका कमर्शियाले इटालीयाना मध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते. पुढे ते या बँकेमध्ये को-डायरेक्टर पदापर्यंत पोहोचले. रॉबर्टोला इतर तीन भावंडे होती.  त्या काळामध्ये गरीबाघरची मुले चर्चने चालवलेल्या शाळेमध्ये शिक्षण घेत. पण सुस्थितीतील रॉबर्टोचे शिक्षण एका खाजगी शाळेमध्ये झाले. खाजगी शाळेमध्ये अतिश्रीमंतांची मुले जात असत. त्यांच्या मानाने रॉबर्टो गरीबच होता. ह्यामुळे एक प्रकारचा न्यूनगंड त्याच्या मनामध्ये होता. तो इतर मुलांपासून अलिप्त राहायला शिकला आणि थोडासा अबोल आणि लाजाळूही बनला. . 

शालेय शिक्षणानंतर त्याच्या परिस्थितीमधील मुले कॉलेजला जाण्याकडे कल दाखवत. वयाच्या अठराव्या वर्षी त्यानेही बोकोनी युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स ह्या विद्यापीठात प्रवेश घेतला. तसेच विद्यापीठातील मिलानीज फासिस्ट ग्रुप संस्थेचा तो सभासद झाला. त्याकाळामध्ये इटलीमध्ये फासिस्ट गट समाजात लोकप्रिय होते. त्यांच्या देशाविषयक भूमिकेकडे अनेक तरुण आकर्षित होत होते. ह्या गटामध्ये काम करणे प्रतिष्ठेचे समजले जाई. मग कुटुंब श्रीमंत असले तरी त्याला घरातून विरोध झालाच नसता. रॉबर्टो काही केवळ सभासद होऊन समाधानी नव्हता. त्याला संस्थेसाठी भरीव काम करावेसे वाटत होते.  ह्या गटातर्फे "बुक अँड मस्केट" नामक पुस्तिका प्रकाशित करायची होती. तिचा कच्चा मसुदा रॉबर्टोने बनवला. शिवाय तिच्या प्रचाराच्या कामामध्येही त्याने स्वतःला झोकून दिले होते.  

१९४० मध्ये त्याला सैन्यामध्ये भरती होण्याची संधी मिळाली. अनेक श्रीमंतांची मुले त्यातून आपली सुटका करून घेत. पण फासिस्ट विचाराने भारलेला रॉबर्टो आनंदाने युद्धभूमीवरती गेला. खरे तर सांपत्तिक दृष्ट्या त्याला तसे करण्याची अजिबात गरज नव्हती. पण त्याने योग्य मार्ग निवडला होता. कारण सैन्यातील आयुष्यामध्ये जे शिकायला मिळाले ते नागरी जीवनामध्ये अनुभवता आले नसते. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याने दोन वर्षे त्यात घालवली. त्याच्या सैन्यातील कामगिरीवरती खुश होऊन केवळ इटालियन सरकारने नव्हे तर जर्मन सरकारनेही त्याला गौरवास्पद मेडल दिले होते. 

दुसर्‍या महायुद्धामध्ये त्याला रशियन आघाडीवरती पाठवले होते. तिथल्या बोचर्‍या थंडीमध्ये त्याने आपल्या तुकडीकरवी भरीव कामगिरी करून दाखवली. सैन्यामध्ये १९४५ पर्यंत राहण्याची संधी होती खरी. पण १९४३ मध्ये तो मिलानला परतला. परतल्यानंतर त्याने वडिलांच्याच बँकेमध्ये नोकरी पत्करली. सुरुवातीला सहा महिने मिलानमधल्या बँकेच्या मुख्यालयात काढल्यावर पुढचे एक वर्ष बँकेच्या कोमो ह्या शाखेत काम करायला मिळाले. नंतर त्याची नेमणूक इटलीच्या दक्षिणेकडील लेच्छे शहरातील शाखेमध्ये झाली. रॉबर्टोने तिथे काही काळ काम केले. त्याचे उत्तम काम बघून १९४५ मध्ये बँकेने त्याची नोकरी पक्की केल्याचे कळवले. खरे तर बांका कमर्शियाले इटालियाना ही एक सरकारी - प्रस्थापित - प्रतिष्ठित आणि बडी बँक होती. त्याच्यासारख्या महत्वाकांक्षी तरुणाला तिथे प्रगतीसाठी बराच वाव मिळाला असता. पण रॉबर्टोने तिथे काम करण्यापेक्षा मिलानमध्ये परत येऊन बांका अँब्रोशियानोमध्ये काम करणे पसंत केले. अनुभवाचा विचार करता पहिली नोकरीच योग्य म्हणता आली असती. अँब्रोशियानोमधले खातेदार सगळे पॅरिशर्स होते. पण रॉबर्तो खुश होता. १९४६ मध्ये अँब्रोशियानो मध्ये त्याने कार्लो कानेसी ह्यांचा मदतनीस म्हणून कामाला सुरुवात केली.  (ह्याच वर्षी सिंजोनाही मिलानमध्ये पोहोचला होता.) कानेसी तेव्हा उच्च पदावरती होते. स्वभावाने कानेसी एककल्ली आणि हेकेखोर होता. पण कालव्हीने त्यांच्याशी उत्तम रीत्या स्वतःला जुळवून घेतले. इटालियन समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरती वरदहस्त ठेवणारी कोणीतरी बडी व्यक्ती उभी असण्याला फार महत्व होते. वर्षानुवर्षे पारतंत्र्यात काढल्यामुळे आयुष्यात वर यायचे तर कोणाचे तरी बोट धरून शिडी चढायला हवी ही एक मनोवृत्तीच बनून गेली होती. काल्व्हीला कानेसी यांच्या विश्वासातील व्यक्ती म्हणून एक स्थान मिळवले आणि त्याला त्याचा बराच फायदा झाला. अवघ्या ९-१० वर्षात कारकून पदावरून तो मॅनेजर पदावर पोहोचला. त्याचे भाग्य असे की ह्याच दरम्यान स्वतः कानेसी देखील बँकेचे सर्वेसर्वा झाले. 

"धर्मगुरूंच्या बँके" म्हणून ख्याती असल्यामुळे कोणत्याही क्षणी इटालीच्या ’सेक्यूलर’ सरकारची कुऱ्हाड अंगावरती पडू शकते याची अम्ब्रोशियानो बॅंकेतील लोकांना कल्पना होती. बॅंकेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे तर असे संकट कोसळण्याआधी आपले हितसंबंध गोत्यात जाणार नाहीत हे बघण्याला ते प्राधान्य देत होते. शिवाय बँक फ्रीमेसन्सच्या हाती जाऊ नये म्हणूनही दक्षता घ्यावी लागे. हे करत असतानाच बँकेचा उत्कर्षही साधायचा होता. कानेसीने त्यासाठी काही योजना आखल्या होत्या. त्यांचा विश्वासू म्हणून काल्व्हीला हे काम अगदी जवळून पाहायला आणि हाताळायलाही मिळाले. 

काल्व्ही बँकेच्या परदेश व्यवहार खात्यामध्येच काम करत होता. कालौघामध्ये त्याने इंग्लिश जर्मन आणि फ्रेंच भाषा आत्मसात केल्या होत्या. हे व्यवहार सांभाळण्यासाठी परदेशाच्या वाऱ्या देखील तोच करत होता. त्यामधले पहिले डील झाले ते लिश्टेनस्टाईनमधले लव्हलॉक कंपनी स्थापन करण्याचे. त्यानंतर बँक ऑफ गॉट हार्ड - बँकेची स्वित्झर्लंड मध्ये स्थापना. लंडनमधील हाम्ब्रोस बँक ऑफ लंडन बरोबर सहकार्याचा करार. एका मागोमाग एक होल्डिंग कंपन्या परदेशामध्ये स्थपित करण्याचा हा मामला पुढे चालूच राहिला. ह्या कंपन्यांचे मूळ मालक कोण आहेत - नेमके कोणी त्यामध्ये पैसे गुंतवले आहेत ही गुपिते तर सर्व साधने हाताशी असलेल्या सरकारी शोधपथकांना सुद्धा लागणे दुरापास्त झाले होते. तेव्हा शेल कंपन्यांचे हे जाळे किती चातुर्याने विणले गेले होते हे बघून मती गुंग होते. मग अशा सर्व व्यवहारांचा ते हिशेब तरी कसा ठेवत होते कोण जाणे. ८०० खिडक्या नऊशे दारे असलेल्या ह्या वाड्याच्या आडाने व्हॅटिकनचा पैसा जसा फिरवला जात होता तसाच माफियांचा आणि काही देशांच्या गुप्तहेर संस्थांचा सुद्धा. संपूर्ण गुप्तता पाळणार्‍या बॅंका केवळ स्विट्झरर्लंडमध्ये होत्या असे नाही - जगभरात अशा अनेक जागा - अनेक देश आहेत आणि त्या सर्वांचा वापर ही मंडळी करत होती हे उघड आहे. रॉबर्टो काल्व्ही ह्या बाबी कार्लो कानेसी ह्यांच्या परवानगीने करत होता. तरीही प्रचंड मेहनत आणि बुद्धिमत्ता ह्या जोरावरती हे काम तो यशस्वी करून दाखवत होता. त्यामध्ये त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

अशा व्यवहारांमधला धोका त्याला माहिती नव्हता का? आपण कायदा मोडतो ह्याचे त्याला भान नव्हते का? हे कळण्याइतकी बुद्धी त्याच्याकडे जरूर होती. मग कशाचा मोह झाल्यामुळे तो ह्या चक्रामध्ये फसत गेला होता? तसे पाहिले तर एका प्रतिष्ठित कुटुंबातून आलेला हा तरूण - त्याचा कल गुन्हेगारीकडे नक्कीच नव्हता. पण आपल्या बॅंकेमध्ये सर्वोच्च स्थान मिळवण्याच्या महत्वाकांक्षेने त्याला झपाटले असावे. आणि असे स्थान मिळवायचे तर इटालीच्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार ’योग्य’ जागी असलेले उत्तम संबंध हेच अशा कामी उपयोगात येतात. पण त्याची किंमत काय द्यावी लागेल ह्याचा मात्र त्याने विचार केला नसावा. भरभराटीचे दिवस आहेत तोवर सगळे काही अभूतपूर्व वाटत असते. कायदा मोडण्याचीही सवय लागून जाते. कायद्याचा धाक हळूहळू संपून जातो. कधी चुचकारून तर कधी धमक्या देऊन लोकांना गप्प बसवता येते ह्यावर श्रद्धा बसू लागते. आणि अशीच अधोगती सुरू होते. सिंजोना काय अथवा कानेसी काय - अशा प्रकारच्या व्यक्तींपासून लांब राहून आयुष्य काढणे कठिण नसते पण तीच एक नशा बनून जाते. इतरांना अडकवण्यासाठी जे जाळे विणले जाते त्यात आपणच कधी आणि केव्हा फसतो हे लक्षातही येत नाही. 

सिंजोना - कानेसी - रॉबर्टो काल्व्ही - मॉंतिनी - मार्सिंकस आणि अन्य लोकांच्या गटाने जे चक्र पुढचे दोन शतके घुमवले त्याची मनोरंजक कहाणी तर आता चालू होते आहे. 

1 comment: