Saturday 18 November 2017

सिंजोना भाग १


Image result for michele sindona marcinkus

नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदींनी नोटबंदी जाहीर केली आणि बँका आणि त्यांचे व्यवहार याविषयी सामान्य लोकांमध्ये एक जागरूकता आली. काळा पैसा म्हणून आपण ज्याविषयी नेहमी बोलतो तो पांढरा कसा केला जातो हे आपल्याला एक कोडे वाटत असते. ज्या पैशाची जमाखर्चाच्या वहीत नोंद नाही तो काळा पैसा. नोंद नसलेला पैसा कर न भरता पुढे कागदोपत्री आणायचा कसा याचे अनेक मार्ग डोकेबाजांनी शोधून काढले आहेत. ही कामे अर्थातच बँकांच्या 'सहयोगाने' होतात ह्याचा साक्षात्कार सामान्य माणसाला नोटबंदीच्या काळामध्ये जे पाहिले त्यामुळे झाला. सर्वसामान्य माणूस मोठ्या विश्वासाने आपला पैसा बँकेमध्ये ठेवत असतो. जमा केलेल्या पैशावर बँक आपल्याला व्याजही देते.  आपल्याला हवा तेव्हा आपला पैसा बँकेतून काढता यावा एवढीच सामान्य माणसाची अपेक्षा असते. बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर तर बॅंकांमधले व्यवहार सुरक्षित असतात असे आपण समजत होतो. अधेमधे कधीतरी एखादी सहकारी बँक बुडाल्याच्या बातम्या येत. पण निदान राष्ट्रीयीकृत बँकांबाबत आपण अगदी निर्धास्त होतो असे वातावरण होते. पण नोटबंदीच्या काळामध्ये राष्ट्रीयीकृत असोत की खाजगी की परदेशी - सर्व प्रकारच्या बँकांनी अथवा त्यांच्या भ्रष्ट कर्मचारी - अधिकारी वर्गाने ज्यावर कर भरला गेला नाही असा पैसा खात्यात भरण्यासाठी आणि काही प्रमाणात तो खात्यातून काढून घेण्यासाठी लुटारूंना मदत केली हे जसजसे पुढे आले तसे लोक अचंबित झाले. ह्याच्या जोडीला बँकांकडच्या थकीत कर्जाच्या "खोला"तल्या बातम्या येऊ लागल्या. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी मरगळ झटकून सक्रिय होण्यास आणि बँकांच्या पैशाची वसुली करण्यास आज सरकारने बँकांना भाग पाडले आहे. ह्याचेही तपशील आज बाहेर येत आहेत.

एकंदरीतच ह्या वातावरणामध्ये बँका गैरव्यवहार कसे करतात - काळ्या पैशाचा पांढरा पैसा बनवण्यास कशी मदत करतात ह्यावरच्या भारतीय कथा अजून बाहेर यायच्या आहेत पण असे व्यवहार काही केवळ भारतात होतात असे नाही. ते तर सर्व जगभर होत असतात. २०१५ साली त्याच कथांचा मागोवा घेता घेता एक प्रकारची खाणच माझ्या हाती लागली.

शीत युद्ध - अमेरिकन आणि जागतिक माफिया गॅंगस्टर्स - जागतिक बॅंका - ओपस दाय - प्रोपोगंडा दुए - फ्रीमेसन्स आणि त्यांच्या विविध रूपात कार्यरत असलेल्या संस्था - खास करून ख्रिश्चनांच्या गुप्त संस्था आणि त्यांची कार्यपद्धती - व्हॅटिकन आणि त्यांचे अर्थव्यवहार सांभाळणारी बॅंक - पाश्चात्य देशांच्या सुरक्षा संघटना आणि गुप्तहेर संस्था - नेटो देशांचे लागेबांधे - पूर्वाश्रमीचे ’नाझी’ आणि त्यांचा आजच्या काळात झालेला वापर हे सर्व विषय जोडले गेले आहेत असे मी म्हटले तर कोणी मला वेड्यात काढेल. आणि ह्या सर्वांचा भारतीय राजकारणावरही आमूलाग्र बदलावे इतका प्रभाव होता व आहे असे म्हटले तर मग काय म्हणाल? गुंतागुंतीच्या या विषयाची सुरुवात बॅंकांपासून करावी हे तर्कशुद्ध ठरेल. ह्या विषयामध्ये उडी घ्याल तर हजारो संदर्भ - कित्येक पुस्तके - लेख - आणि अन्य लिखाण यांचा डोंगर आपल्यासमोर उभा राहतो. म्हणून एक प्रातिनिधिक उदाहरण घेतले तर विषय समजणे सोपे जाईल असे माझ्या लक्षात आले. ह्यासाठी मी इटालियन घोटाळेबाज सिंजोना ह्या पात्राची निवड करण्याचे ठरवले आहे. सिंजोना हे पात्र काल्पनिक नव्हे - ते एक वास्तवातले पात्र आहे. त्याच्या कहाणीला इतकी उपकथानके आहेत की महाभारत सुद्धा छोटे वाटावे. तरीदेखील जमेल तेवढे मूळ कथानक आणि आवश्यक तेवढे उपकथानक अशी सांगड घालत आपण पुढे सरकलो तर वरती दिलेल्या अनेक बाबी कशा एकमेकात जुळलेल्या आहेत ह्याची निदान अस्पष्ट का होईना पण कल्पना येते. 

मिकेले सिंजोना ही व्यक्ती जन्माने इटालियन - खरे तर सिसिलियन. इटली आणि खास करून सिसिली म्हटले की माफिया गॅंगस्टर्स कथेपासून सहसा फारसे लांब नसतात. इटली म्हटले की व्हटिकन आणि ख्रिश्चियानिटी कथेमध्ये डोकावतेच. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इटलीमध्ये हिटलरचा मित्र मुसोलिनीचे राज्य होते. मुसोलिनी देखील हिटलर सारखाच नाझी होता. त्य दिवसांमध्ये गॅरिबाल्डी आणि मॅत्सिनीच्या कथांवर जोपासल्या गेलेल्या इटालियन पिढीला राष्ट्रवादी मुसोलिनी अर्थातच जवळचा होता. गॅरिबाल्डी आणि मॅत्सिनी यांनी माणसाच्या जीवनातले चर्चचे स्थान कधी नाकारले नव्हतेच. तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये मुसोलिनीने व्हॅटिकनवरती विविध निर्बंध जरी घातले तरी सुद्धा इतिहासाचे दडपण असे होते की चर्चला मुसोलिनीच्या अनुयायांना जवळ घेणे भाग पडलें होते. हिटलर आणि मुसोलिनीचा पाडाव झाल्यानंतर अमेरिका आणि पाश्चात्यांचा सर्वात मोठा शत्रू होता तो रशिया. आणि हिटलर आणि मुसोलिनीचे खांदे समर्थक कम्युनिझमचे कट्टर शत्रू होते. साहजिकच नव्या परिस्थितीमध्ये जर्मनीमधले आणि इटालीमधले नाझी चर्चला आणि अमेरिकेला प्यारे ठरले. दुसऱ्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यामध्ये व्हॅटिकनने आणि अमेरिकेने जर्मनीमधल्या आणि इटलीमधल्या अनेक नाझीना तिथून पळण्यास मदत केली. इतकेच नव्हे तर नवी ओळखपत्रे देऊन त्यांची सोय दक्षिण अमेरिकन देशांमध्ये लावण्यात आली. कधी ना कधी रशियाविरुद्ध लढण्यासाठी ह्याच नाझींचा आपल्याला उपयोग होइल असा आराखडा त्यांच्या मनात होता. ज्यू वरच्या अत्याचारांमध्ये व्हॅटिकनचा सहभाग होता का - त्यांची मदत होती का आणि असल्यास कितपत होती यावरती नेहमी वाद चालतो. अशा तर्‍हेने इतक्या टोकाच्या शक्ती एकमेकांना का मदत करत होत्या - कशा करत होत्या - त्यांनी संयुक्तपणे काय कारवाया केल्या का - त्यांचे तपशील काय असे प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी उपयुक्त होईल असे हे सिंजोना व्यक्तिमत्व आहे. एवढ्या मोठ्या कॅनवासवरची कथा सांगण्याचे कसब माझ्याकडे आहे का? कोणास ठाऊक. पण प्रयत्नच केला नाही तर ही कथा तुम्हाला समजणार कशी? म्हणून माझ्या मर्यादा स्वीकारत प्रयत्न करणार आहे. 

सिंजोनाच्या कथेमध्ये काय नाही? त्यात माफियांची गोष्ट आहे - त्यांची गुन्हेगारी आहे - आर्थिक घोटाळे आहेत - इटलीमध्ये राजकारण आणि गुन्हेगारी कशी हातात हात घालून प्रवास करत होते त्याची कथा आहे - घातपात आहेत - बॉम्ब स्फोट आहेत - दंगली आहेत - खून आहेत - विषप्रयोग आहेत - न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार आहे - पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचार आहे - दोन नंबरचे आर्थिक साम्राज्य आहे - ते उभे करण्यासाठी मदत करणारे आहेत - त्यामधला लाभ घेणारे आहेत - अमेरिकेसारख्या आणि अन्य देशांच्या सुरक्षा यंत्रणा आहेत - गुप्तहेर संस्था आहेत - खुद्द अमेरिकन भूमीवर केले गेलेले आर्थिक गैरव्यवहार आहेत. क्वात्रोकी ज्या स्नॅम प्रोगेटी कंपनीचा प्रतिनिधी होता तिची मुख्य कंपनी आणि तिचे आर्थिक व्यवहार याची कथा आहे - इटालीमधला सत्तापालट आहे - एका माजी पंतप्रधानाचे अपहरण आहे आणि खूनही आहे - एका पोपचा आकस्मिक गूढ "मृत्यू" आहे - ज्याच्या समोर भ्रष्टाचाराचा खटला चालवला जात आहे अशा न्यायाधीशाचा खून आहे - तपास करणाऱ्या पोलीस सुपरिंटेंडेंटचा खून आहे!!

तुरुंगात टाकलेल्या सिंजोनाने एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीमध्ये आरोप केला की व्हॅटिकनने आपला "दूत" भारतामध्ये पेरलेला आहे. ह्यानंतर खुद्द सिंजोनाला विष घालून इटलीच्या तुरुंगात मारण्यात आले. सिंजोनाच्या कथेचे अनेक धागेदोरे मिळवताना माझी दमछाक तर झालीच पण तपशील बघता बघता भीतीने अंग शहारून जात होते. मी तर एक सामान्य व्यक्ती आहे. त्या मर्यादेत राहूनच शक्य तितके अप्रिय संदर्भ टाळत पुढच्या भागांमध्ये मी ही कथा लिहिणार आहे. पण इतके जरूर लिहीन की तुम्हाला एक अधिक एक दोन आहेत हे कळावे. 

2 comments: