Friday, 19 October 2018

शबरीमला - व्हॅटिकनचा "एल्गार" - भाग १

Image result for sabarimala

१९९६ - ९७ साल असेल. रा. स्व. संघाचे वरिष्ठ तत्वचिंतक श्री. एस. गुरूमूर्ती ह्यांच्याशी बोलण्याचा योग आला. ते सांगत होते की "माझ्या तरूणपणी तामिळनाडूमध्ये अशी परिस्थिती होती की कपाळाला गंध लावून बाहेर पडायला हिंदू घाबरत असत. शबरीमलाच्या यात्रेला लोक भीत भीत जात असत. आज त्याच शबरीमलाला लाखो भक्तांची गर्दी लोटत आहे". पन्नास साठ वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये द्रविड चळवळीचा प्रभाव इतका होता की हिंदू धर्म पाळणे म्हणजे उत्तरेचे वर्चस्व गुलामी मान्य करण्यासारखे असल्याचा जोरात प्रचार चालू असल्याने उघड उघड कपाळाला गंध लावून फिरणे कठिण असावे याची कल्पना मला होती. पण गुरूमूर्तींकडून ही माहिती ऐकताना शबरीमलाच्या तेथील जनमानसातील सामर्थ्याची मला कल्पना नव्हती. त्यामुळे गुरूमूर्ती सांगत होते त्यातील विलक्षणता मला समजली नाही. आज शबरीमला येथे सर्व वयाच्या स्त्रियांना जाण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या निमित्ताने जो जनक्षोभ बघायला मिळत आहे त्यातून शबरीमलाबद्दल माहिती गोळा करत गेले आणि आश्चर्याचे धक्के बसत गेले. ही माहिती मराठीमध्ये उपलब्ध नसल्याचे जाणवले म्हणून हा लेख आवर्जून लिहित आहे.

२००४ साली भाजपने सत्ता गमावली त्याची किती भीषण किंमत आपण मोजली आहे ह्याच्या कहाण्या अजून बाहेर येत नाहीत. ह्याच काळामध्ये भारतामध्ये हिंदूंचे "घाऊक" ख्रिस्तीकरण करण्याची प्रचंड मोहिम राबवली गेली. ह्यासाठी पाश्चात्य देशांनी करोडो रुपये उपलब्ध करून दिले. १९९२ च्या बाबरी घटनेनंतर व्हॅटिकन प्रणित शक्तींनी भारतामध्ये हिंदुत्वाशी नाते जोडणार्‍या नव्या शक्तीच्या उदयाने धास्ती घेतली आणि येथील माध्यमांसकट सर्व व्यवस्थेवर आपला कब्जा स्थापन करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. आणि त्यामध्ये त्यांना नेत्रदीपक यश मिळाले आहे हे लपून राहिलेले नाही. २००४ पासून २०१४ पर्यंत ह्या शक्तींना भारतामध्ये आपल्या कारवाया करण्यासाठी केंद्रसरकारच्या आशिर्वादाने मोकळे रान मिळाले हेही उघड आहे. इतके की आता सत्ता हाती नाही तरी दहा वर्षे उपभोगलेल्या अनिर्बंध सत्तेची झिंग अजून उतरत नाही असे दिसते. 

२०१९ मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पुनश्च मोदी सरकार येऊ नये म्हणून जमेल त्या त्या पातळीवरती प्रयत्न चालू असून शबरीमला येथील त्यांचा हस्तक्षेप हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे. जसे महाराष्ट्रामध्ये धर्मांतर करायचे तर टारगेटेड "सावज" जनता बुवाबाजीच्या आहारी गेलेली असल्यामुळे तिचा ख्रिस्ताच्या चमत्कारांवरती विश्वास बसवणे शक्य नाही हे लक्षात येताच इथे बुवाबाजीला अंधश्रद्धा ठरवण्यात आले. हेही ठीक आहे असे येथील सुशिक्षित जनता म्हणत होती. पण असे प्रतिपादन करत त्या जनतेच्या जीवनामध्ये जी श्रद्धात्मक पोकळी निर्माण झाली तिच्या भावनिक गरजांचा गैरवापर करत तिच्या माथी ख्रिस्ताचे चमत्कार मारले गेले. ते ख्रिस्ताचे चमत्कार असल्यामुळे बुवाबाजीला आव्हान घेणार्‍यांची  - त्यांच्यावर आक्षेप घेणार्‍यांची तोंडे इथे कशी चुपचाप बसली होती हा आपला अनुभव आहे. (बुवा तुरूंगात जाईपर्यंत आंदोलन आणि थयथयाट तर चर्चच्या विरोधात केवळ घोषणाबाजी असा व्यवहार महाराष्ट्राने बघितला आहे.) थोड्याफार फरकाने असेच प्रयोग संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक ठिकाणचे वैशिष्ट्य सांभाळत धर्मांतर टोळीने पार पाडल्याचे दिसते. उदा. अमरनाथ येथे दैवी शक्तीने दरवर्षी बर्फाचे शिवलिंग बनते अशी भाविकांची श्रद्धा आहे. काही वर्षांपूर्वी हे शिवलिंग कोणत्याही दैवी शक्तीने बनत नसून पुजारीच ते बनवतात अशा बातम्या देण्यात आल्या होत्या हे तुमच्या लक्षात असेल. अशाच पार्श्वभूमीवरती दक्षिणेतील धर्मांतराला "अडचणी"चे ठरतील अशा देवस्थानांची टिपणे व्हॅटिकन प्रणित शक्तींनी तयार केली असून शबरीमलाचा त्यामध्ये खूप वरचा नंबर लागतो हे तेथे लोटणार्‍या गर्दीतून आपल्याला समजू शकते. प्रश्न ह्या श्रद्धा बरोबर आहेत की चुकीच्या आणि त्या वापरून गरीब जनतेची पिळवणूक होत होती काय इथपर्यंत मर्यादित नसून ती श्रद्धा उडाल्यानंतर धर्मांतरासाठी त्या भोळ्या जनतेची मनोभूमिका तयार करून घेण्यात आली हे बोचरे सत्य आहे. ज्या सुधारणांच्या आड लपून आपले राजकीय हेतू पुढे रेटण्यात आले त्या षड् यंत्राच्या विराट स्वरूपाची आपण माहिती करून घेणे महत्वाचे आहे. अगदी तत्वासाठी हेही मान्य केले की कोणी कोणता धर्म पाळावा हा वैयक्तिक प्रश्न आहे तरी धर्मांतरित प्रजेला हाताशी धरून ईशान्य भारतामध्ये विघटनवादी शक्तींनी गेली काही दशके उच्छाद मांडला आहे हे कोण विसरू शकते? धर्मांतराचे शस्त्र वापरत पाश्चात्यांनी आजवर आफ्रिकन जनतेला कसे आर्थिक दृष्ट्या लुबाडले आहे हे उदाहरण आपल्यासमोर नाही काय?

शबरीमला हे अहिंदूंचे लक्ष्य आता आता बनले अशी आपली समजूत असेल. परंतु हे खरे नाही हे सांगण्यासाठी मला थोडक्यात इतिहास इथे द्यावा लागत आहे. १९०२ साली पडक्या छपराचे लाकडी देऊळ असे स्वरूप असलेल्या शबरीमला देवळाला आग लागली. जीवाची पर्वा न करता मुख्य पुजार्‍याने धगधगत्या आगीत शिरून मूर्ती उराशी कवटाळून बाहेर आणली. दुसर्‍या दिवशी तिथे पोचलेल्या भक्तांना पाण्यामध्ये पडलेला पुजारी आणि मूर्ती मिळाली. पाणी कुठून आले - मूर्ती कशी वाचली ह्यातील दैवी संकेत पाहून भक्तगण भारावून गेले. त्रावणकोर राजाने स्वतः ५३ दिवस व्रत ठेवून मंदिराच्या पुनर्बांधणीचा संकल्प सोडला. त्रावणकोर साम्राज्याने हैदर - टिपू तसेच नायर राजा कुंजीकुट्टी पिल्लई ह्यांना हरवले होते हा त्याचा पराक्रम ब्रिटिश विसरले नव्हते. संस्थानाचे सर्व उत्पन्न ब्रिटिश लाटत होते त्यामुळे खजिना रिकामाच असे, अशा परिस्थितीमध्ये मंदिराच्या पुनर्बांधणीचे अवघड काम पूर्ण कसे व्हायचे? शेवटी तिथे येणार्‍या भक्तांना आवाहन करण्याचे ठरल्यावर त्याला प्रचंड प्रतिसाद देणार्‍या भक्तांनी दिलेल्या कणिक्क देणग्यांमधून एका वर्षात नियोजित रक्कम जमा झाली. हे पाहून ब्रिटिशांनी आजूबाजूच्या जंगलाची काही जमीन शेतीवापराकरिता खुली करून ती अहिंदू बांधवांना दिली आणि तिथे नगदी पिके (गांजासकट) घेण्याची प्रथा सुरू केली. पण देवळामध्ये येणार्‍या यात्रेकरूंमुळे त्यांना आपली पिके घेणे कठिण होऊ लागले. म्हणून १९४९ नंतर पुन्हा तेथील अहिंदू प्रजेने देऊळ नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. जून १९५० मध्ये पुनश्च मंदिराला आग लावण्यात आली. ह्यावेळी मूर्तीवरती कुर्‍हाडीने प्रहार केल्याचे दिसून आले. ह्या घटनेच्या चौकशीचा अहवाल संदिग्धच होता आणि कोणत्याचा आरोपीवरती अंगूलीनिर्देश करण्यात आला नाही असे दिसते. पण १९५० ते १९५५ च्या दरम्यान एकूण तीन वेळा असे प्रयत्न झाले. जेव्हा द्रविड चळवळीने हिंदू समाज हतप्रभ झाला होता तेव्हा झालेल्या ह्या हल्ल्यांसाठी प्रतिकार करणे किती अवघड झाले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. शबरीमलाच्या रस्त्यावरती असलेले निलक्कल गाव आज बातम्यांमध्ये झळकते आहे. पण १९५० साली तिथे ख्रिश्चनांनी यात्रेकरूंच्या मार्गामध्येच एक क्रूझ मिळाला आणि जमिनीमध्ये गाडला गेलेला हा क्रूझ उकरून काढण्यात आला. २००० वर्षांपूर्वी सेंट थॉमसने तो उभारल्याच्या थापा मारत भारतामध्ये ख्रिश्चॅनिटी तितकीच जुनी असल्याचा पुरावा मॅन्युफॅक्चर करण्याचा बनाव करण्यात आला. केरळच्या दमट हवेमध्ये २००० जुने लाकूड जमिनीखाली तसेच्या तसे राहिले तर कसोटीला उतरले पाहिजे. तसे न झाल्यामुळे हा बनाव खोटा असल्याचे पुढे आले. सेंट थॉमस ह्यांना एका ब्राह्मणाने मारल्याच्या दंतकथाही पसरवण्यात आल्या होत्या. १३ नोव्हेंबर १९५२ मध्ये खुद्द पोपने सेंट थॉमस केरळच्या कुदुंगलूर येथे कधीच गेले नव्हते आणि त्यांचा दफनविधी इटालीमध्ये ओर्टॊना गावी करण्यात आला होता असे लिहून दिले तरीही हा विवाद अजूनही चालवण्यात येतो. १९८३ मध्ये क्रूझचा वाद पुन्हा उकरून काढण्यात आला आणि क्रूझ मिळाला तिथेच (म्हणजे निलक्कलमधील महादेव मंदिराच्या अगदी जवळ) चर्च बांधणार मग आम्हाला प्राणाची आहुती द्यावी लागली तरी आम्ही मागे हटणार नाही असे ख्रिश्चन म्हणू लागले.  निलक्कल भूमीवरील ख्रिश्चनांचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी आजही ह्या क्रूझच्या बुडत्या काडीचा आधार घेतला जातो. 

देवप्रश्नम असा एक विधी शबरीमला इथे केला जातो त्यामध्ये देवतेच्या मनात काय आहे ह्याचा शोध घेतात. हा प्रयत्न १९९५ - २००२ आणि २००६ मध्ये केला गेला होता. त्यामध्ये एका स्त्रीचा स्पर्श देवतेला झाला असल्याचे पुढे आले. यानंतर एक महिन्याने म्हणजे जुलै २००६ मध्ये मुख्य पुजारी श्री कांतारू मोहनारु ह्यांचे अपहरण करण्यात आले. दोन वाहनामधून आलेल्या दहा जणांनी त्यांना पकडून कोची येथील श्रीमती शोभा जॉन ह्यांच्या घरात नेले आणि त्यांच्याजवळील सोने तसेच मोबाईल फोन काढून घेण्यात आला. अपहरणकर्त्यांनी मला बळजबरीने नग्न स्त्रियांसोबत बसवून फोटो काढले अशी तक्रार मोहनारू ह्यांनी पोलिसात दिली. पुढे असेही पुढे आले की श्रीमती शोभा ह्या वेश्याव्यवसायात काम करत होत्या. ह्या प्रकरणामध्ये बिजी पीटर्स तसेच दाउदचा हस्तक बेचू रहमान सामिल होते असे म्हटले जाते. केरळ पोलिस मात्र सांगत होते की पुजारी गेले वर्षभर श्रीमती शोभा ह्यांच्या घरी येत होते आणि सोसायटीच्या नोंदवहीमध्ये त्यांच्या गाडीची नोंद मिळते. ह्या प्रकरणातील सत्यासत्य काय ह्याचे मूल्यमापन स्वतंत्रपणे करावे लागेल. २०१० मध्ये कन्नड नटी जयमालाने एका मुलाखतीमध्ये म्हटले की २७ वर्षाची असताना मी शबरीमला येथे गेले होते आणि मूर्तीला स्पर्श करून मी ती भ्रष्ट केली आहे. जयमाला विवाहाने एका ख्रिश्चनाशी बांधलेली आहे हे विशेष. २०१६ साली समीरा एरुकुलांगर ह्या कन्येने आपल्याला शबरीमलासमोर आपल्या मित्रासोबत शय्यासोबत करयची आहे असे विधान केले होते तेही तुम्हाला आठवत असेल. आज शबरीमलाला जाण्यासाठी उतावीळ असणार्‍या आणि ज्यांना माध्यमे पाठीशी घालत आहेत त्या महिला आहेत रेहाना फातिमा (किस ऑफ लव्ह मोहिमेतील प्रमुख आकर्षण) - आंध्रच्या मोहो टीव्हीची पत्रकार कविता कोशी - आणि मेरी स्वीटी. हा देखील योगायोग आहे असे मानता येईल काय?  

12 comments:

  1. १ अॉक्टोबर नंतरच्या ब्लॉगला १९ तारीख का उजाडावी लागली. आम्ही नियमित ब्लॉगची अपेक्षा करतो.
    शबरीमलैचं वास्तव समोर आणण्यासाठी धन्यवाद. देवळांमध्ये श्रद्धेने दिलेलं दान सरकार श्रद्धाविरोधी कामांसाठी वापरतं. तेव्हा न्यायालयात जाऊन एक नवीन व्यवस्था मागावी असं वाटतं. देवळात दोन दानपात्र असावेत, त्यामधील एक सरकारच्या वापरासाठी व दुसरं देवस्थानाद्वारे उपयोगासाठी, तसेच दानपात्रावर व बाजूला मोठ्या अक्षरांत कोणतं दानपात्र कशासाठी आहे ही माहिती स्पष्टपणे लिहिलेली असावी. ईश्वरचरणी श्रद्धेने केलेले दान कशाप्रकारे वापरले जावे हे ठरवण्याचा अधिकार दात्या व्यक्तीला असायलाच हवा.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर दोन पेट्या पाहिजे,दान देण्याराचा अधिकार महत्त्ववाचा आहे.

      Delete
    2. बरोबरच आहे

      Delete
    3. आॕफिसचे रोजचे आठ दहा तासाचे काम सांभाळत लिखाण करते. रोज ब्लाॕग लिहिणे होत नाही. पण फेबु पेजवर पोस्ट तरी असते. ती बघावी ही विनंती

      Delete
    4. Agree तुम्ही ऑफिस कामा मध्ये busy असता पण खरेतर तुमच्यासारखे अभ्यासपूर्ण लेख लिहणारे दुर्मिळ आणि दर्जेदार वाचनाची आवड असणारे आमच्यासारखे वाचक कमी होत असताना दोन्ही गोष्टींना जतंन करणे हे आपले काम आहे :-) त्यामुळे आम्हाला इतका वेळ वाट पाहायला लावू नका ही विनंती

      Delete
  2. Tai kal tikde jaun alo. Aplyala sampark kasa karta yeil? Please send me some thread to contact you

    ReplyDelete
  3. खरं म्हणजे जर अंधश्रद्धा नष्ट करायच्या असतील, स्रिपुरुष भेद घालवायचे असतील तर सर्व धर्म, पंथ यांच्या चालीरिती तपासून बघाव्या. त्या कशा आल्या व त्यांचा समाजावर काय परिणाम होतो हे अभ्यासावे. आणि मग कायदे करावेत. फक्त हिंदू धर्म टार्गेट करु नये ! अन्यथा असे संघर्ष वाढतच रहातील !!

    ReplyDelete
  4. I want to send this to my mom Marathi friends. Where can I get English version.

    ReplyDelete