Wednesday, 15 November 2017

अमन की आशा चे विसर्जन

मोदी सरकारने दिनेश्वर शर्मा यांची काश्मीर प्रश्नी आपले प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. दिनेश्वर शर्मा २००३ ते २००५ मध्ये आयबी मध्ये इस्लामी दहशतवादाचा विभाग सांभाळत असत. मोदी सरकारने त्यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांनी ९ नोव्हेंबर पासून तीन दिवस सलग अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. यामध्ये जम्मू काश्मीरचे राज्यपाल - मुख्यमंत्री याखेरीज जवळजवळ ३० अन्य शिष्टमंडळे त्यांना येऊन भेटली आहेत शिवाय कित्येकांना आपल्याशीही त्यांनी बोलायला हवे होते असे वाटत आहे. शर्मा यांनी फारूक अब्दुल्ला यांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली.

त्यानंतर वेगवेगळी वादग्रस्त विधाने आपण ऐकतो आहोत. एकीकडे फारूक अब्दुल्ला म्हणतात की शर्मा यांचा रिपोर्ट लोकसभेच्या पटलावरती मांडला जाणार नसेल तर त्यामध्ये काही अर्थ उरणार नाही. ते पुढे असेही म्हणाले की जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे तसाच पाक व्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा हिस्सा आहे काश्मीरने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणे ही धोरणात्मक चूक होती. कारण तीन अण्वस्त्रधारी देशांच्या कचाट्यात काश्मीर असून त्याला स्वातंत्र्याची भाषा व्यवहार्य नाही कळणे हे जरुरीचे आहे. अब्दुल्ला यांच्या विधानांना अभिनेते ऋषी कपूर यांनी संमती दर्शवली आहे. अशा प्रकाराने दिनेश्वर शर्मा यांच्या काश्मीरमधील मुख्य धारेतील शक्तींचे मन जाणून घेण्याच्या प्रयत्नाने वातावरण ढवळून निघाले आहे हे खरे.

 "नवजीवन इंडिया "च्या बातमीमध्ये असे म्हटले आहे की श्री. दिनेश्वर शर्मा म्हणाले - काश्मिरमधील हिंसेचे वातावरण संपुष्टात आणण्यासाठी जो कोणी शांतता प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छितो त्या सर्वाना मला चर्चेमध्ये समाविष्ट करायचे आहे. मग अशी व्यक्ती म्हणजे एखादा विद्यार्थी असो तरूण असो छोटा दुकानदार असो की रिक्षावाला - मला त्या सर्वाना भेटायला आवडेल. काश्मीरमध्ये समाज अनेक गटात विभागला गेला आहे. तिथल्या तरूण पिढीच्या भविष्याची मला काळजी वाटते. हे तरूण हिंसावादी संघटनांच्या जाळ्यात नैराश्यापोटी ओढले जाऊ शकतात. त्यांना त्यापासून परावृत्त केले पाहिजे. तुमच्याही आयुष्यात शांततेचे पर्व येऊ शकते हा विश्वास निर्माण व्हायला हवा. आजची तरूण पिढी या दहशतवादी कटात ओढली जाता कामा नये ही गोष्ट सर्वाधिक महत्वाची आहे. आज काश्मिरी समाज एकसंध नाही. ही एक गंभीर समस्या आहे. त्याकडे आज लक्ष दिले नाही तर इथेदेखील येमेन लिबिया वा सिरियासारखी परिस्थिती उद् भवेल. समाजातील विविध गट एकमेकांविरोधात उभे ठाकले तर यादवी होईल."

दिनेश्वरजींचे हे कथन काळजी वाढवणारे आहे. फारूक अब्दुल्लांची विधाने दाखवणारा मीडीया शर्मांची ही भूमिका का दडवून ठेवतो हे कोडे नाही.  दिनेश्वर शर्मा आणि अब्दुल्ला ही दोन टोके आहेत. ह्या दोन टोकांमधले अब्दुल्ला एव्हढेच टोक मीडियाला आवडत असावे. एकीकडे शर्मा सर्व काश्मीर समाजाच्या जखमांवर फुंकर घालू इच्छितात तर अब्दुल्ला मात्र पाक व्याप्त काश्मीर ला हात लावू नका सांगतात इथेच मोदी सरकार आणि फारूक अब्दुल्ला यांच्या भूमिकांमधला फरक स्पष्ट होतो.

सामंजस्याचा वार्ता आज करणारे वाजपेयींच्या काळामध्ये काय बोलत होते हे बघण्यासारखे आहे. जम्मू काश्मीर भारताचा तर पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानचा आहे म्हणणारे फारूक अब्दुल्ला थोडक्यात काय सांगत आहेत? नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाकिस्तान आहे आणि अलीकडे भारत आहे हे ते अशा सांगण्यातून मान्य करत नाहीत का? मग वाजपेयी दुसरे काय म्हणत होते? नियंत्रण रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा मानून तडजोड करू असा प्रस्ताव वाजपेयींनी ज. मुशर्रफना दिला होता. पण तेव्हा पाकिस्तान धार्जिण्या शक्तीना स्फुरण चढले होते. हातात मिळत आहे ते माझे आणि तुझे तेही माझे हीच वृत्ती तेव्हा प्रश्न मिटवताना आड आली आणि आजही ह्या शक्तींचा विचार करता तिच्यात बदल झालेला दिसत नाही. पण आता काश्मीर मधले जनमत बदलत आहे. आता मोदी पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याचा विचार करतात - ३७० कलमाने तुमचे खरेच भले झाले का असा प्रश्न विचारून त्यांना विचार करायला भाग पाडत आहेत. फुटीरतावाद्यांच्या लक्षात आले आहे की जम्मू काश्मीर तर हाताचा गेलाच आहे निदान पाकव्याप्त काश्मीर तरी भारताच्या हातात जाणार नाही याची चिंता आता मोठी झालेली दिसते. तेव्हा आता PoK वाचवायची केविलवाणी धडपड चालू आहे.

भाषणबाजी आणि अस्वस्थता या बाजूलाच होते आहे असे नाही. तिकडे पाकिस्तानच्या पोटातही गोळा आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांनी गेल्या आठवड्यात म्हटले आहे की नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला स्वातंत्र्य चळवळ नाही.  जसे दिनेश्वर शर्मा काय म्हणतात हे आपल्या माध्यमांनी दाखविले नाही तसेच अब्बासी काय म्हणतात यातली मेख जाणून घ्यावी असे काही कोणाला वाटले नाही.

एका पाकिस्तानी पंतप्रधानाने जम्मू काश्मीरात स्वातंत्र्याची चळवळ अस्तित्वात नाही म्हणणे ही  अनेकांना क्रांती वाटेल. पाकिस्तानने जम्म् काश्मीर वरील आपला दावा सोडला की काय असे वाटू शकेल. काश्मीर मध्ये जे चालले आहे तो पैशाचा तमाशा आहे हे भारताचे म्हणणे मान्यच केले असेही मानता येईल. काश्मीर हाच वादग्रस्त मुद्दा असून तोच कळीचा प्रश्न उभय देशात असल्याची टिमकी वाजवली जात होती ती कशी पोकळ आहे हेही उघड झाले आहे. पण अब्बासी यांनी केलेल्या विधानाला दुसरीही बाजू आहे.

नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला चळवळ अस्तित्वात नाही असे सांगणाऱ्या अब्बासींचा रोख जम्मू काश्मीर कडे नसून तो आहे पाकव्याप्त काश्मिराकडे. आक्रमक मोदींसमोर आपण आपले चार दशके राबवलेले काश्मीर धोरण पुढे रेटण्यास असमर्थ आहोत याची ही जाहीर आणि असहाय्य कबूली तर आहेच पण निदान आमच्या ताब्यातला काश्मीर तरी आमच्या कडे राहू द्या असे जाहीरपणे सांगावे लागण्याची नामुष्की आली आहे. पाकव्याप्त काश्मीरात फुटीरतावादी चळवळ नाही असा इशारा अब्बासी देत आहेत. तेव्हा त्याला चळवळीचे निमित्त पुढे करून हात लावू नका असे ते मोदींना सांगत आहेत.

वाजपेयींच्या फॉर्म्युलाची आज महती पटली आहे पण वेळ हातची गेली आहे. आता हे ब्रह्मज्ञान होण्याचे कारण एकच आहे. पाकिस्तानने आपली विश्वासार्हता जागतिक पातळीवर गमावली आहे. ओसामा बिन लादेन आयमान जवाहिरी हाफिझ सईद हे आमचे हिरो होते पण आज त्यांना निपटावे लागेल अशी भूमिका खुद्द मुशर्रफ मांडू लागले आहेत कारण इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. पाकिस्तानच्या सीमा ज्यांना चिकटल्या आहेत ते इराण व अफगाणिस्तान भारताला झुकते माप देणार हे स्पष्ट दिसत आहे. चीनदेखील पाकिस्तान करता भारताशो किती वैर घेईल याला मर्यादा आहेत. ट्रंप यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका रंग बदलत आहे. दुसरी कडे आर्थिक अडचणी आ वासून उभ्या आहेत. अशा अवस्थेत अर्धम् त्यजति पंडितः या न्यायाने पाकिस्तान एकसंध ठेवण्याची मजबूरी आली आहे.

हे सुवर्णक्षण आपण आज बघत आहोत ते मोदींच्या धोरणाचे यश आहे. नाहीतर अमन की भाषा करत चमन के फूल दाखवायची सहल गेली दहा वर्षे  यूपीएने काढली होती.

 आता मात्र पुढचे भविष्य लिहिण्याची गरजही उरलेली नाही.


 (https://www.navjivanindia.com/india/challenge-is-to-stop-kashmir-becoming-syria-says-interlocutor-dineshwar-sharma)





2 comments:

  1. Tai tumhi bhau sarkhe roj lihit ja...aturtene wat pahat asto amhi navin posts chi..khupach abhyaspoorn

    ReplyDelete