मिकेले सिंजोनाचे आयुष्य म्हणजे एक हिंदी सिनेमा आहे की काय असे तुम्हाला वाटेल. सिसिलीच्या पात्ती या खेड्यामध्ये १९२० साली एका गरीब कुटुंबात जन्म घेतलेला मुलगा. त्याचा जन्म झाला त्यावेळी पहिले महायुद्ध नुकतेच संपलेले होते. पण युरोप अशांतच होता. खरे तर त्याचे आजोबा नामवंत होते - श्रीमंत होते. पण वडिलांनी मात्र सर्व मिळकत जुगारामध्ये गमावली. मिळकत जुगारामध्ये गमावल्यानंतर वडिल पुढे फुलांच्या सजावटीचा व्यवसाय करत असत - खास करुन थडगी आणि शवपेटिकेच्या सजावटीचा. पण नियमित पैसा हाती येत नव्हता. आई आजाराने अंथरुणाला खिळलेली असे. अशा परिस्थितीमध्ये आजीने नातवंडे वाढवली. घरामध्ये जेसुईट पंथाचे वातावरण होते. सिसिली हे एक वैशिष्ट्यपूर्ण बेट आहे. एरव्ही आपण आर्किमिडीजसाठी सिसिलीबद्दल वाचतो. पण आजच्या युगामध्ये सिसिलीची ख्याती आहे ती माफिया गॅंगस्टर्स आणि त्यांच्या आपापसातील सशस्त्र रक्तरंजित मारामार्यांसाठी. इतिहासात बराच काळपर्यंत सिसिलीवर परकीयांचे राज्य होते. परकीयांचा वरवंटा आपल्या डोक्यावरती फिरू नये म्हणून आपापसातील भांडणे कधी परकीय पोलिसाकडे न्यायची नाहीत हा तिथला अलिखित नियम बनून गेला आहे. त्यालाच लॉ ऑफ ओमेर्टा म्हटले जाते. पुढे हा हेतू मागे पडला आणि ओमेर्टाचा गैरवापर सुरू झाला. ओमेर्टाच्या पडद्याआड राहून किरकोळ गुन्हेगारच नव्हे तर गुंडांच्या टोळ्या - गॅंगस्टर्स - हेही त्याचा गैरफायदा घेऊ लागले. सिसिलीमध्ये अनिर्बंध गुन्हेगारी चालत असे आणि इकडचा शब्द तिकडे होत नसे. सूड घेतले जात पण पोलिसांना गुन्हेगार मिळत नसत - जणू काही पोलिसाकडे जाऊन अथवा न्यायालयामध्ये जाऊन न्याय मिळवणे सिसिलीचे नागरिक विसरून गेले होते. सिसिलीमध्ये जन्मलेल्या मुलाला असे "माफियोसी" आसपास सहज बघायला मिळत. त्यांचा रुबाब त्यांच्याकडील अफाट संपत्ती भुरळ घालणारी असे.
गरीबीमध्ये दिवस काढणार्या सिंजोनाला संपत्तीचे आकर्षण वाटले तर नवल नाही. शाळेमध्ये तो कधी फारसा चमकला नाही. पण त्याची बुद्धिमत्ता स्वस्थ बसत नव्हती. त्याच्या डोक्यामध्ये सतत विचार चालत. शाळा संपल्यानंतर त्याने कायदा विषयाचा अभ्यास करून पदवी घेण्याचे ठरवले. यासाठी तो मसिना विद्यापीठामध्ये दाखल झाला. त्याला लॅटिन भाषेमध्ये रस आणि गती होती. व्हर्जिल आणि सिसेरो सारख्या लेखकांची पुस्तके तो वाचत होता. आपल्या इटालियन भाषेच्या ज्ञानाचा फायदा केवळ संभाषणासाठी न करता तो डांटे आणि मॅकीवेली समजून घेण्यासाठी करत होता. खास करुन मॅकीवेली हा त्याचा अभ्यासाचा विषय होता आणि त्यावरच त्याने आपल्या पदवीसाठी एक प्रबंध लिहिला होता. नीत्से - ऍडम स्मिथ - पास्कल हेही त्याचे आवडते लेखक होते पण मॅकीवेली सर्वात आवडता. मसिना विद्यापीठात शिक्षण पूर्ण करून त्याने कायदा विषयातील पदवी घेतली. ख्रिश्चन धर्माचे मुख्य शहर रोम इथे त्याच्या शिक्षणाला किंमत होती. व्हॅटिकनच्या दृष्टीने लॅटिन ही एक जिवंत भाषा आहे आणि सिंजोनाचे त्यातील प्रभुत्व भविष्यात व्हॅटिकन मधील अनेकांच्या जवळ जाण्याचे एक साधन ठरले.
सिंजोनाचे शिक्षण पूर्ण होत आले तोवर दुसर्या महायुद्धाचे ढग जमा होत होते. मुसोलिनीने आपल्या राजवटीमध्ये माफिया गॅंगस्टर्स विरोधात आघाडीच उघडली होती. त्यामुळे ते दबलेले होते. काही तर परागंदा होऊन अमेरिकेत पोहोचले होते. पण दोस्त राष्ट्रांनी जेव्हा सिसिलीवर हल्ला चढवला आणि मुसोलिनीचा पराभव होऊ लागला तेव्हा माफियांनी पुन्हा डोके वर काढले. सिसिलीमध्ये दडलेल्या जर्मन सैनिकांच्या बातम्या अमेरिकन सैन्याला हव्या असत. त्यांना अनेक वस्तूंची रसदही लागत असे. ती पुरवण्याचे काम माफियांवर ’सोपवले’ गेले होते. अशा तर्हेने अमेरिकन सैन्याच्या पाठिंब्यावर आणि त्यांच्या आशिर्वादाने सिसिलीमधल्या माफियांना पुनश्च चांगले दिवस आले. सरकार नावाची चीज अस्तित्वात नसलेल्या सिसिलीमध्ये जे पिकवले जात होते त्यावर माफियांचे नियंत्रण होते. (म्हणजे शेतकर्याने ते कोणाला व किती भावात विकावे हे माफियाच ठरवत.) शेतकर्याला अन्य गुंडांकडून ’संरक्षण’ मिळवण्यासाठी स्थानिक माफियांना दुखावून चालत नसे. माफियांच्या टोळ्यांमध्ये आपसात संघर्ष चालत. पण माफियांनी मान डोलावेपर्यंत गावामध्ये इकडची काडी तिकडे होत नसे. नागरिकांना हे व्यवहार इतके अंगवळणी पडले होते की त्यामध्ये त्यांना काही वावगे वाटेनासे झाले होते.
शेतकर्याचा शेतमाल माफिया विकत शिवाय अमेरिकन सैन्याच्या गोदामातून चोरलेल्या वस्तू गावातल्या लोकांना चढ्या दराने विकत असत. सिंजोनाही ही कामे करु लागला. त्याने एक ट्रक विकत घेतला. आणि अमेरिकन सैनिकांसाठी छोट्य़ा मोठ्या वस्तूंची ने आण करण्याची कामे तो करु लागला. अर्थात माफियांच्या आशिर्वादाशिवाय हे करणे शक्य नव्हते. कारण सीमेवरील रखवालदाराला जे कागद द्यायचे ते फक्त माफियाच पुरवू शकत होते. माफियांच्या उद्योगांमध्ये गावातले चर्च देखील सामिल असे. सिंजोनाच्या तारुण्यामध्ये युद्धकालीन परिस्थितीमध्ये सैन्यात भरती अनिवार्य होती. पण पात्तीच्या बिशपने त्याची त्यातून सुटका केली. सिंजोना बुसुरगी नामक कंपनीमध्ये शिक्षण चालू असतानाच काम करत असे. ही कंपनी सिट्रस फळांचा अर्क काढण्याच्या उद्योगात होती. तिला सिट्रस फळे पुरवण्याचे काम सिंजोनाने करावे असे बिशपने सुचवले आणि त्याच्या मार्गातील अडथळे "दूर" केले. माफिया बॉस व्हिटो जिनोव्हीजशी (ज्याच्यावर मारियो पुझोने गॉडफादर कादंबरी बेतली आहे असे म्हटले जाते तो गॅंगस्टर) संपर्क साधून सिंजोनाला मदत करा म्हणून बिशपनेच सांगितले. सिंजोनाने व्हिटोला आपल्या नफ्यामधला हिस्सा द्यावा आणि बदल्यात अन्य माफियांपासून व्हिटोने त्याला संरक्षण द्यावे अशी ही व्यवस्था होती. अशा प्रकारे ही कामे करत असताना सिंजोना बड्याबड्या माफिया गॅंगस्टर्सच्या संपर्कात आला होता.
सिंजोनाने प्रचंड मेहनत घेतली. काही दिवस त्याने एका वकिलाच्या ऑफिस मध्ये काम केले. तो दिवसाचे १५ तास काम करत असे आणि आठवड्याची रजाही घेत नव्हता. धंद्यामुळे सिंजोनाच्या हातात पैसा खेळू लागला होता. बरकतीचे दिवस होते. काळ्या बाजाराचे ’नियम’ आणि ’रीतीभात” सिंजोनाने स्वानुभवाने जाणून घेतले होते. माफियांच्या कामावर खुश झालेले अमेरिकन सैनिक त्यांनीच भेट म्हणून दिलेल्या किमती गाड्या फिरवत. काळ्या बाजाराच्या व्यवहारांमध्ये गुंतलेला सिंजोना सवड मिळेल तसे जर्मन तत्ववेत्ता नीत्सेचे तत्वज्ञान वाचत असे. याखेरीज अर्थव्यवस्था आणि आर्थिक व्यवहारांची बारकाईने माहिती घेऊन त्यात त्याने प्राविण्य मिळवले होते. सिंजोनाचे डोके भन्नाट आहे हे व्हिटोने बघितले होते. तसेच मसिनाचा बिशपही त्याला ओळखू लागला होता. युद्ध संपता संपता म्हणजे १९४५ च्या सुमारास सिंजोनाने दक्षिण इटाली सोडून उत्तरेकडे जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याच्याकडे व्हिटो जिनोव्हीजचे आशीर्वाद
आणि मसिनाचे आर्चबिशप अशी मातबरांची शिफारस पत्रे होती. अशा शिफारसी हाती घेउन तो इटालीच्या मिलानमध्ये पोहोचला तेव्हा आयुष्यातील एक मोठी संधी त्याच्यासाठी जणू वाट पहात होती. (बोफोर्स प्रकरणातील ओताव्हियो क्वात्रोकी १९३८ साली सिसिलीच्या मस्काली गावामध्ये जन्मला होता. हे गाव सिंजोनाच्या पात्तीपासून पायी चालत अवघ्या ६६ किलोमीटरवरती आहे. क्वात्रोकीदेखील पुढे मिलान शहरामध्येच पोहोचला.)
आणि मसिनाचे आर्चबिशप अशी मातबरांची शिफारस पत्रे होती. अशा शिफारसी हाती घेउन तो इटालीच्या मिलानमध्ये पोहोचला तेव्हा आयुष्यातील एक मोठी संधी त्याच्यासाठी जणू वाट पहात होती. (बोफोर्स प्रकरणातील ओताव्हियो क्वात्रोकी १९३८ साली सिसिलीच्या मस्काली गावामध्ये जन्मला होता. हे गाव सिंजोनाच्या पात्तीपासून पायी चालत अवघ्या ६६ किलोमीटरवरती आहे. क्वात्रोकीदेखील पुढे मिलान शहरामध्येच पोहोचला.)
एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीपासून सिसिलीमधले अनेक गुंड अमेरिकेमध्ये जात होते. अमेरिकेमध्ये पोहोचल्यावरही तिथल्या इटालियन समुहांमध्ये ओमेर्टा कसोशीने पाळला जाई. त्या दिवसांमध्ये न्यू यॉर्क सारख्या शहरांमध्ये निर्वासितांच्या मोठ्या वसाहती होत्या. अंगामध्ये फारसे कौशल्य नसलेली ही माणसे तिथे गेल्यावरही आपले गुन्हेगारी व्यवसाय करत असत. आणि तिथे देखील इटालीप्रमाणेच आपापल्या टॊळ्या बनवून निर्वेधपणे व्यवहार करत असत. ओमेर्टामुळे हुशार अमेरिकन पोलिसांना देखील गुन्हेगारांचा छडा लागत नसे. शिवाय त्याकाळामध्ये अमेरिकन पोलिसातही भ्रष्टाचाराचे साम्राज्य होते. ह्या सर्व परिस्थितीमध्ये माफिया गुंडांची फावले नसते तरच नवल होते. एक काळ असा होता की न्यूयॉर्क शहरामध्ये विकल्या जाणार्या प्रत्येक पावावरही माफियांना त्यांचा हिस्सा मिळत होता आणि पोलिसांना सुद्धा. तिथले राजकरणीही त्यामध्ये सामिल होते. त्याकाळामध्ये न्यूयॉर्कच्या टॅमनी हॉलवरती माफियांचा वरचष्मा होता. असे म्हणतात की पुढच्या काळापर्यंत अगदी खुद्द केनेडीच नव्हे तर निक्सन यांच्या निवडीमागे माफियांचाच पैसा होता असे म्हटले जाते. ह्या काळामधल्या माफियांच्या कहण्या न संपणार्या आहेत आणि पावलोपावली भारतीय परिस्थितीची आठवण करून देणार्या आहेत.
दुसरे महायुद्ध चालू झाले तसे याच माफियांचा अमेरिकन राजकरण्यांनी खुबीने वापर करून घेतलेला दिसतो. राजकारणामध्ये अतर्क्य शक्ती एकमेकांना साथ देताना दिसतात. व्यवसायाने वकील - आणि सरकारी प्रॉसिक्यूटर असलेले थॉमस ड्युई यांनी न्यूयॉर्क शहरामधल्या माफियांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. (हेच ड्युई पुढे न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर म्हणून काम करत होते आणि १९४४ साली रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा होते.) कापो दि तुत्ती कापो - बॉस ऑफ द बॉसेस् म्हणून प्रसिद्ध असलेला गॅंगस्टर म्हणजे चार्ली लकी लुचान्या. १९४२ मध्ये ड्युईने अमेरिकेतील ह्या इटालियन माफिया गॅंगस्टरला वेश्याव्यवसाय चालवण्याच्या आरोपाखाली जेरबंद केले आणि कोर्टामध्ये गुन्हा सिद्धही करून घेतला. पण दिवस महायौद्धाचे होते. न्यूयॉर्कच्या आसपासच्या समुद्रकिनार्याजवळ शत्रू सैन्याच्या हालचाली हो ऊ लागल्या होत्या. त्यांची पक्की खबर देण्याचे जाळे फक्त माफिया गॅंगस्टर्स कडेच होते. अशा खबरी बॉस ऑफ द बॉसेस चार्ली लकी लुचान्याने आपल्या टोळ्या वापरून आरमाराला द्याव्यात आणि बदल्यात त्याला तुरुंगवास माफ करून आणि सिसिलीमध्ये परत पाठवण्याचा निर्णय घेतला गेला होता. चार्लीसाठी हा सौदा ठीकच होता कारण तुरुंगात सडत राहण्यापेक्षा जीवंतपणी त्याला - सिसिलीमध्ये का होई ना - स्वातंत्र्य उपभोगण्याचा रस्ता खुला होत होता. प्रत्यक्षात अमेरिकनांना दुसराही लाभ उठवायचा होता. त्यांना लुचान्यासारखे गॅंगस्टर्स आता सिसिलीमध्ये हवे होते.
सिस्लीमध्ये राजकीय परिस्थिती बदलत होती. राजकारणी - माफिया आणि चर्च यांच्या संगनमताने चालणार्या कारभारापेक्षा जनतेला कम्युनिस्ट जवळचे वाटू लागले होते. १९४७ मध्ये सिसिलीतील निवडणुकांमध्ये कम्युनिस्टांचे बहुमत बघून व्हॅटिकन चर्चचेही धाबे दणाणले. त्यांनी ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाला मदत करायचा निर्णय घेतला. सिसिलीमधून कम्युनिस्टांना हाकलण्यासाठी ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाने माफियांची मदत घ्यायचे ठरवले. अशा तर्हेने चर्चला गुन्हेगारीचे वावडे नव्हते हे सिद्ध झाले. चर्चखेरीज अमेरिकनांनाही कम्युनिस्ट नकोच होते. त्यामुळे त्यांनीही माफियांवर भिस्त ठेवली होती. पक्षाचे नेते म्हणून माफियांना मान्यता द्यावी आणि त्याबदल्यात माफियांनी कम्युनिस्टांना सिसिलीमधून हाकलावे असे ठरले. मग माफियांनी साल्वातोर ज्युलियानो ह्याला नेता म्हणून जाहिर केले. त्याचा सख्खा मामे भाऊ गॅस्पारी पिसोत्ता आणि ज्युलियानो एकत्र काम करत. १ मे १९४७ रोजी कामगार दिन साजरा करण्यासाठी प्याना देल्ली अल्बानेसी या पालेर्मो जवळच्या गावात आसपासचे गरीब शेतकरी व अन्य लोक जमले होते. त्यांचा कम्युनिस्ट नेता निकोला बार्बातो भाषण करणार होता. मुसोलिनीच्या फासिस्ट राजवटीत कम्युनिस्टांवर बंदी होती. ती उठताच निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. निवडणुकीचे निकाल जाहिर हो ऊन नुकतेच बारा दिवस झाले होते. बार्बातोचे भाषण ऐकण्यासाठी लोक उत्सुक होते. एवढ्यात साल्वातोर - पिसोत्ता आणि अन्य साथीदार तेथे पोहोचले आणि त्यांनी सभास्थानी बेछूट गोळीबार केला. अकरा जण मरण पावले तर २७ जखमी झाले. ह्या शिरकाणानंतर लोकांनी "घ्यायचा" तो धडा घेतला - माफियांना कम्युनिस्ट नको आहेत हे पुढे येताच घाबरलेल्या जनतेने जीव वाचवण्यासाठी आपल्या मर्यादेत राहणे पसंत केले. . नव्याने घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये कम्युनिस्टांचा पराभव झाला आणि ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाच्या तिकिटावर माफिया गॅंगस्टर निवडून आले. ही गोष्ट अशासाठी उद् धृत केली आहे की इटालीमधील राजकारणाचे वारे कसे वाहत होते याची कल्पना यावी.
No comments:
Post a Comment