Wednesday 22 November 2017

सिंजोना भाग ४


Image result for battista montini


मॉन्तिनी यांचा जन्म १८९७ मध्ये उत्तर इटालीच्या लोम्बार्डी प्रांतातील कॉन्सेशियो (तालुका ब्रेशिया) गावामध्ये झाला. मॉन्तिनी कुटुंब मूळचे ज्यू असावे पण सुमारे शंभर वर्षे आधी त्यांनी कॅथॉलिक धर्म स्वीकारला असावा असे दिसते. त्यांचे वडिल जॉर्जी मोन्तिनी ख्रिश्चन डेमोक्रॅट होते. (आणि कदाचित एखाद्या भूमिगत गुप्त ख्रिश्चन गटाचे सदस्यही असावेत अशी शंका व्यक्त केली जाते. असे गट व्हॅटिकनच्या नियंत्रणाच्या विरोधात काम करत.) जॉर्जी यांनी कायद्याची पदवी घेतल्यावरती इल सिटाडिनो द ब्रेशिया ह्या कॅथॉलिक वर्तमानपत्राचे अधिकार हाती घेतले. तिथे ते डायरेक्टर म्हणून काम करू लागले. अनेक वेळा इटालियन संसदेवरती ते निवडून गेले होते. निवडून गेलेले प्रतिनिधी आणि अंगिकारलेल्या समाजसेवेचा एक भाग म्हणून त्यांनी गरीबांना स्वस्तात अन्न मिळण्याची सोय व्हावी म्हणून खास अन्नदान केंद्र स्थापन केली होती. बेवारस मुलांसाठी - त्यांना राहता यावे अशी एक डॉर्मिटरी देखील काढली होती. तिचे नाव सेंट व्हिंसेंट. तसेच शेतकरी आणि कामगार या गरीब समाज घटकाला कायदेविषयक सल्ला मोफत मिळावा म्हणून पीपल्स सेक्रेटरियट संस्थेची स्थापना केली होती.

अशा वातावरणामध्ये मॉन्तिनी यांचे लहानपण गेले. घरामध्ये राजकारणाचे आणि सामाजिक बांधिलकीचे वारे अगदी सहजच वाहत होते. अगदी लहानपणापासून त्यांनी चर्चमध्ये सेवेसाठी जाण्याची इच्छा दर्शवली होती. नाजूक प्रकृतीमुळे सेमिनरीमध्ये शिक्षण न घेता घरीच शिक्षण घेण्याची सोय करावी लागली होती. ह्यामुळे घरामध्ये मिळणार्‍या अन्य विचारांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहांमध्ये आणि व्यक्तींमध्ये ते मुक्तपणे मिसळू शकले. ह्यामुळे एक सर्वांगी व्यक्तिमत्व तयार होण्यास ह्या वातावरणाची मदत झाली. सेमिनरीमध्ये शिक्षण घेण्यार्‍या मुलांना इतर विचारांच्या समूहांमध्ये मिसळण्याचे संधी प्राप्त होणे कठिण. मग सेमिनरीमध्ये शिकून चर्चमध्ये काम करू इच्छिणार्‍या एखाद्या व्यक्तीला अशी मोकळीक कशी मिळणार? अशी एका वेगळी पार्श्वभूमी लाभलेले मॉन्तिनी यांना वयाच्या विसाव्या वर्षी धर्मगुरु - प्रिस्ट म्हणून मान्यता मिळाली. यानंतर सांता मरिया देले ग्राझी ह्या चर्चच्या पॅरिशमध्ये काम करण्याऐवजी त्यांनी पुढील शिक्षणासाठी रोमला जावे असे त्यांचे बिशप गाग्गी यांनी ठरवले.

रोममध्ये त्यांनी दोन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला - जेसुईट पद्धतीचे ग्रेगॉरियन विद्यापीठ तसेच सरकारी ’सेक्यूलर’ विद्यापीठ सेपिएन्झा. शिवाय ल फ़िओंदा ह्या वर्तमानपत्रासाठी ते बातम्या लिहिण्याचे काम करत आणि वडिलांना निवडणुकीच्या कामामध्येही मदत करत. १९२० मध्ये पहिल्यांदा इटालीच्या संसदेवरती ३६ फॅसिस्ट सदस्य निवडले गेले. इथे १९२१ मध्ये मॉन्तिनी ह्यांना बिशप पिझार्दो ह्यांनी अकादमी ऑफ एक्लेसियास्टिकल नोबिलिटी ह्या अतिप्रतिष्ठित संस्थेमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास सुचवले. ह्या अकादमीमध्ये विद्यार्थ्यांना व्हॅटिकनसाठी राजदूत होण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. दोन वर्षांच्या जर्मनी आणि ऑस्ट्रियामधील प्रवासानंतर मॉन्तिनी ह्यांना कॅनॉनिकल लॉ विषयामध्ये डॉक्टरेट मिळाली. ह्यानंतर रोममध्ये युनिव्हर्सिटी चॅपलेन म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांच्यावरील डाव्या विचारांचा प्रभाव ठळक होता पण ते तेव्हढ्याच सहजपणे रोमच्या कर्मठ वातावरणामध्ये मिसळून काम करू शकत होते. व्हॅटिकनमध्येच स्टेट अंडरसेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्तीही झाली. जॅक्स मार्टेन ह्या तत्ववेत्त्याच्या एकात्म मानवता ह्या संकल्पनेचा त्यांच्यावरती प्रभाव होता. ह्या संकल्पनेमध्ये एकाधिकारशाही मार्गाने जाण्यापेक्षा ख्रिश्चन नसलेल्या इतर धर्मियांनाही एकत्र घेऊन मार्गक्रमणा करण्याचे विचार त्यांना आवडत होते. केवळ चर्च सांगते त्याच मार्गाने जाऊन जागतिक ऐक्य स्थापन करण्याचा विचार एकेकाळी कदाचित ठीक असेलही पण आता मात्र आपल्याभोवतालच्या सामाजिक आणि आर्थिक स्पंदनांचा विचार दूर ठेवून चालणार नाही असे मार्टेनचे म्हणणे होते. एक वेळ चर्चचा घंटानाद ऐकला नाही तरी चालेल पण कारखान्याचे भोंगे मात्र ऐकता आले पाहिजेत. जिथे आधुनिक मानवाच्या आयुष्याला नवी दिशा मिळते त्या तंत्रज्ञानाच्या नव्या विद्यापीठांकडे चर्चचे लक्ष हवे असे हे विचार होते. इटालीमधील कर्मठ कॅथॉलिक वातावरणामध्ये तर ते क्रांतीकारकच म्हटले पाहिजेत.

अशा वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या मॉन्तिनी ह्यांची रोममधील कामगिरी भरीव होती. त्यांच्या पार्श्वभूमीमुळेच १९४४ मध्ये इटालियन कम्युनिस्ट नेते पामिरो तोग्लियाती यांनी मॉन्तिनी यांची भेट घेतली. तोग्लियाती इटालीच्या मंत्रीमंडळामध्ये बिनखात्याचे मंत्री होते. तोग्लियाती यांनी रशियामध्ये स्टॅलिन धर्मस्वातंत्र्य देण्यास तयार असल्याचे मॉन्तिनी यांना सांगितले. यानंतर ख्रिश्चन डेमोक्रॅट - सोशियलिस्ट आणि कम्युनिस्ट यांच्यामध्ये ’राजकीय युती’ होऊ शकते असा पर्याय उभा राहिला. अशी युती अस्तित्वात आलीच तर कोणत्याही राजकीय घडामोडींना चपखल प्रत्युत्तर देण्याची शक्यता निर्माण झाली. चर्चच्या कम्युनिस्ट विरोधी धोरणाकडे संशयाने पाहू नये असे मॉन्तिनी यांनी तोग्लियाती यांना सुचवले. कम्युनिस्ट आणि व्हॅटिकन यांच्यामधला सामंजस्याचा हा पहिला प्रयत्न होता असे म्हणता येईल.

दुसरे महायुद्ध संपण्याच्या प्रचंड घडामोडींच्या काळामध्ये स्टेट अंडरसेक्रेटरी म्हणून मॉन्तिनी ह्यांना अतिशय समृद्ध अनुभव मिळाला असे म्हणता येईल. या काळामध्ये अनेक ठिकाणाहून निर्वासित येत असत. त्यांची सोय लावण्याचे मोठे काम व्हॅटिकन करत असे. ह्यातून त्यांचे संपर्क सुद्धा वाढले. पण तोग्लियाती ह्यांच्याबरोबरची बोलणी तत्कालीन पोप ह्यांना पसंत पडली नाहीत. १९५४ मध्ये त्यांनी मॉन्तिनी ह्यांची नेमणूक मिलान शहरामध्ये केली. ही नेमणूक होईपर्यंत मिलान शहराला केवळ कार्डिनलचे पद मिळत असे. तिथे आर्चबिशपचे काम काय? एक प्रकारे ही पदावनतीच असावी. पण मॉन्तिनी आपल्या कामामध्ये गर्क राहिले.

तर अशा प्रकारे मॉन्तिनी ह्या बड्या प्रस्थासाठी पात्तीच्या बिशपकडून शिफारस घेऊन आलेल्या सिंजोनाला मिलान शहरामध्ये भरभराटीचे दिवस येणे स्वाभाविक होते. आपल्या स्वभावानुसार सिंजोनाने तिथे मित्र जमवले. मॉन्तिनी ह्यांना एक वृद्धाश्रम चालवायचा होता. त्यांना पैशाची गरज आहे असे दिसताच सिंजोनाने लगबगीने हालचाली करून एका दिवसात चोवीस लाख डॉलर्स उभे केले. कासा दिल्ला मॅडोन्निनाच्या उद् घाटन समारंभामध्ये मॉन्तिनींच्या बाजूलाच सिंजोना बसला होता. हे मानाचे स्थान त्याने खटपटीतून मिळवले होते. सिंजोनाने इतके पैसे कुठून आणले हे मॉन्तिनी यांनी विचारले सुद्धा नाही. चोवीस लाखामधला एक हिस्सा आला होता माफियांकडून. आणि दुसरा सीआयए कडून. माजी सीआयए अधिकारी व्हिक्टर मर्चेती म्हणतो की त्याकाळामध्ये कॅथॉलिक चर्चच्या वृद्धाश्रमासारख्या अनेक बाबींसाठी अमेरिकन सरकार सीआयएच्या माध्यमामधून कोट्यवधी डॉलर्स ओतत होते.

इथे कथेमध्ये आणखी एका संस्थेचा प्रवेश होत आहे. ती म्हणजे बांका अम्ब्रोसियानो आणि तिचा प्रमुख रॉबर्टो काल्व्ही! मॉन्तिनी यांच्या चर्चचे बॅंक खाते मिलानच्या बॅंका अम्ब्रोसियानोमध्ये होते. सेंट अम्ब्रोसियानो यांच्या नावे चालवण्यात येणार्‍या बॅंकेची ख्याती आणि सिंजोना ह्यांचा अर्थातच घनिष्ठ संबंध आहे. त्यविषयी पुढील भागामध्ये माहिती घेऊ.



1 comment:

  1. Apala blog sunder aahe ..pan follow kase karave...kahi option nahi ki ...

    ReplyDelete