Thursday 26 October 2017

रशियाविरुद्ध आर्थिक निर्बंध - भाग 3

९८ वि. २ आणि ४१९ वि ३अशा प्रचंड मताधिक्याने अमेरिकन डेमोक्रॅटिक तसेच रिपब्लिकन 'खासदारांनी' (त्यांना तिथे सिनेटर्स व रेप्रेझेन्टेटिव्हस  म्हणतात) रशियावरती आर्थिक निर्बंध लावण्याची टोकाची भूमिका का घेतली असेल याचे समाधानकारक उत्तर कुठे मिळेल? ज्याने अमेरिकन गुपिते फोडली तो स्नोडेन असो की ज्युलियन असांजी - दोघांना थेट अथवा परभारे आश्रय दिला तो रशियाने - प्रसंगी खोट्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसृत करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हिलरी क्लिंटन यांचा अध्यक्षीय निवडणुकीत पराभव अटळ होईल असा प्रचाराचा धुमधडाका लावला रशियाने - पाश्चात्यांचे सीरिया विषयक बेत ओम फस केले रशियाने - पाश्चात्यांना नको असलेल्या इराणच्या अणू कार्यक्रमाला संपूर्ण पाठिंबा दिला रशियाने - युक्रेनमधून रशियाकडे झुकणाऱ्या नेत्याला  पदच्युत करून पाश्चात्यांना हवा तसा नेता तिथे बसवून युक्रेन ह्या तरफेच्या वापर पाश्चात्य करू बघत होते तेव्हा त्यांचा बेत उधळून लावला (क्रिमिया मध्ये सैन्य घुसवणाऱ्या) रशियाने - खोडरकोवस्की व अशाच अन्य पाश्चात्यांच्या पिट्ट्यानां कर बुडवेगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले रशियाने - एन जी ओ व अन्य मार्गाने धुडगूस घालत फिरणाऱ्या पाश्चात्यांच्या दलालांवरती रशियातून पलायन करून लंडनमध्ये आसरा घेण्याची पाळी आणली रशियाने - असे हे रशियाचे 'उपद व्याप' पाश्चात्यांना बघवेनासे झाले आहेत. ट्रम्प ह्यांच्या विजयामुळे एक प्रकारे ह्या पाश्चात्यांचे डोळे उघडले आहेत. आणि रशियाकडून किंबहुना पुतीन ह्यांच्याकडून आपल्याला नेमका काय धोका आहे ह्याचा शोध घेणे त्यांच्यासाठी ट्रम्प ह्यांच्या विजयामुळे अनिवार्य झाले आहे.  इथपर्यंत पुतीन ह्यांच्याकडून अमेरिकेला असलेल्या धोक्याबद्दल लोक अनभिज्ञ होते म्हणा किंवा ह्या धोक्याबद्दल ते जागरूक नव्हते असे म्हणता येईल. जसे ९/११ च्या हल्ल्यामुळे अमेरिकेचा दहशतवादी मुस्लिम जगताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तसे ट्रम्प ह्यांच्या विजयामुळे पुतीन आणि कोणते उत्पात घडवू शकतात ह्या भयाने सर्व पाश्चात्यांना एकत्र आणले आहे. भरीस भर म्हणून आता पुतीन याना त्यांचा समर्थक असलेला अमेरिकन राष्ट्रपती मिळाला आहे. ज्याच्यामागे अमेरिकेची सत्ता उभी आहे तो जगातला सर्वात जास्त शक्तिमान नेता बनू शकतो ना? पुतीन आणि ट्रम्प ह्यांच्या सहकार्यामधून पुतीन आपल्या अटींवरती ट्रम्प यांच्याकडून काही बाबी पूर्ण करून घेऊ शकतात ह्या विचाराने हे पाश्चात्य अस्वस्थ झाले आहेत. कारण त्यांच्या हातातली 'आजवरची' निर्वेध सत्ता अशा सहकार्यातून धोक्यात येऊ शकते.

"रशियाच्या ह्या सर्व दुष्कृत्यांमुळे ट्रम्प सत्तेवर आले म्हणून पाश्चात्यांचे काम ठप्प झाले आहे. त्याची शिक्षा पुतीन याना मिळणे आवश्यक आहे." असा विचार करणारे मान्यवर सध्या एकवटले आहेत. काम ठप्प झाल्यामुळे  ते अस्वस्थ आहेत खरे. पण स्नोडेन असो व ज्युलियन असांजी ह्यांच्या माध्यमातून पाश्चात्य सार्वजनिक जीवनातील व्यक्तींचे खळबळजनक तपशील मोक्याच्या प्रसंगी चव्हाट्यावर आणले जातात. सायबर सुरक्षेमध्ये छेद निर्माण करत अनेक रहस्यांपर्यंत रशियाने आपली बोटे घुसवल्यामुळे प्रत्यक्षात नेमके किती नुकसान झाले आहे अथवा होउ शकते ह्याचा अंदाज त्यांना येत नाही. पाश्चात्य राजकीय जीवनामध्ये अशाप्रकारे प्रसिद्धी मिळाली  म्हणजे एखाद्याच्या राजकीय जीवनाचा अंतच होऊन जातो.

अशा प्रकारे राजकीय जीवनाला आव्हान मिळालेले लोक आपल्या हातामधले म्हणा किंवा नसलेले शस्त्र दुसऱ्यांच्या हातून  खिसकावून घेऊन पुतीन यांच्या विरुद्ध वापरण्यास उद्युक्त झाले आहेत. जितक्या त्वेषाने आणि उभारीने  पुतीन यांनी रशियाला पुन्हा एकदा वेगाने गतवैभवाच्या आठवणींमधून उत्कर्षाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे त्याने ही मंडळी घाबरली असावीत. खरे तर ते पुतीन याना "आपल्यामध्ये" सामावून घेण्यासही तयार असतील पण पुतीन यांनी रशियन राष्ट्राचे हित डावलून त्यांच्या "कहाणी"मध्ये बसण्यास उत्सुकता दाखवलेली नाही. राष्ट्रप्रेमाची हाक देऊन रशियन जनतेला गेल्या तीन राजवटीत त्यांनी आपल्या सोबत घेतले आहे. पण लिबरल्सचे आणि देशभक्तीचे वावडेच असते. किंबहुना लिबरल्सच्या कोणत्याही तथाकथित तत्वांना मूठमाती देण्याचा उत्तम उपाय देशभक्तीची हाक देऊन लोकांना त्याविरोधात जागे करणे हा असल्यामुळे लिबरल्स देशभक्तांचा तिरस्कार करतात. 

ज्या सहकाऱ्यांच्या मदतीने पुतीन हे अवघड काम करत आहेत ते भ्रष्ट आहेत - असू शकतात - कदाचित कोणतेही तथ्य नसलेली प्रकरणे त्यांच्या अंगावर शेकवलीही जाऊ शकतात. त्यांच्यातलेच काही जण बदनामीच्या शक्यतेला घाबरून लिबरल्सच्या वाटेल जायला नको म्हणून एक तर सार्वजनिक जीवनातून माघार घेऊ शकतात किंवा 'दल बदल' करू शकतात. तेव्हा अमेरिकन कायदेमंडळाच्या हे बिल पास करून पुतीन ह्यांच्यासमोर एक आव्हान उभे केले आहे. पुतीन जर आपल्या सहकाऱ्यांना सांभाळू शकले तर ह्या संकटामधून ते यशस्वीरीत्या बाहेर पडू शकतील अशी चिन्हे आहेत. पण त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना या ना त्या मार्गाने दगा दिला तर मात्र रशियामध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण होईल.

अमेरिकन राजकीय जीवनामध्ये इतके बदल ट्रम्प ह्यांच्या निवडीनंतर घडले आणि वातावरण रशियाच्या दुसऱ्या टोकाला गेले आहे ह्याची कितपत नोंद रशियाने घेतली आहे? निष्ठावंत सहकारी हा जसा पुतीन ह्यांचा एक कळीचा मुद्दा बनू शकतो तसेच त्यांच्या परराष्ट्र धोरणामुळे अन्य काही कमकुवत दुवे देखील कळीचे बनू शकतात. आजच्या घडीला युक्रेन - इराण - सीरिया - चेचन्या आदी मुद्दे रशियासाठी अतिमहत्त्वाचे आहेत.  अमेरिकन 'खासदारांनी' आर्थिक निर्बंधांचा जो दबाव निर्माण केला आहे त्याचा परिणाम ह्या सर्व क्षेत्रांमध्ये पडणार आहे. युक्रेनच्या बाबतीत पुतीन अतिशय आक्रमक होते. रशियाला जवळचा असलेला तिथला सत्ताधारी कपटाने पदावरून हटवण्यात आला अशी पुतीन ह्यांची भावना झाली आहे. रशियाला शाह देण्यासाठी युक्रेन च्या भूमीचा वापर करण्याचे घाटत होते. म्हणून पुतीन ह्यांनी क्रिमियामध्ये सैन्य घुसवून आपल्या शत्रुंना इशाराच दिला होता – Thus far and no further!

दोन ऑगस्ट रोजी कायद्याला संमती मिळताच गेल्या सतरा वर्षांमध्ये पहिल्यांदाच पुतीन ह्यांनी नमते घेतले असे वाटण्याजोगी घोषणा रशियाकडून ऐकायला मिळाली. दोनबास येथे शांतता पथक पाठवण्याचा निर्णय जाहीर केला गेला. हा त्यांचा निर्णय आजवरच्या युक्रेन धोरणापेक्षा वेगळा आहे. त्यासाठी त्यांनी ज्या अटी जाहीर केल्या त्या मात्र युक्रेनला अथवा पाश्चात्यांना मान्य होण्यासारख्या नव्हत्या त्यामुळे त्या घोषणेचा प्रत्यक्षात काहीच फायदा झाला नाही. 

आर्थिक निर्बंधाच्या पवित्र्यामुळे निर्माण झालेल्या संकटाने गडबडून जाऊन पुतीन सैरभैर होतील किंवा त्यांचा तोल ढळेल असे गृहीत धरता येत नाही. त्यांच्या सहकार्यांमधल्या काही जणांना तर हा संघर्ष अधिक पेटवायचा आहे. तेव्हा पुतीन ह्यांच्या आस्थापनाला एकदम टोकाला नेऊनही चालणार नाही. युक्रेनच्या निमित्ताने जेव्हा पाश्चात्यांनी तिथल्या सीमेवरती अण्वस्त्रे उभी करण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा त्याला जशास तसे तोंड दिले जाईल असे पुतीन म्हणाले खरे पण प्रत्यक्षात ते तसे करू शकले नाहीत. भ्रष्ट सहकाऱ्यांखेरीज त्यांच्याच चमूमधील काही मतभेदही त्यांच्यासाठी काळजीचे ठरतील. उदा. चेचन्या आणि त्यांचा नेता कादिरो ह्यांच्या बाबत पुतीन जी भूमिका घेतात ती त्यांच्या काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मान्य नाही.  

अशा प्रकारच्या मतभेदांमधून अथवा कायदेशीर कारवाईला घाबरुन किंवा स्वतः चा पैसा वाचवण्याच्या चिंतेतून पुतीन यांची टीम आपल्याला फोडता येईल अशी अमेरिकन लिबरल्सना खात्री आहे. ह्यामधले काही जण आताही संपर्क साधण्याचे जीव तोडून प्रयत्न करत आहेत. रशियामधील पुतीन ह्यांची सत्ता पलटवण्याची कृती केवळ रशिया व त्याच्या सहकार्यानेच नव्हे तर ट्रम्प ह्यांना सुद्धा धक्का देऊन जाईल. अशा तऱ्हेने जगामध्ये एक विलक्षण पेच प्रसंग निर्माण झाला असून आपल्या म्हणण्यानुसार लिबरल्स देशादेशाच्या सीमांपलीकडे जाऊन राजकारण करताना दिसत आहेत.

पण सध्या तरी सर्वशक्तिमान रॉथसचील्ड आणि त्यांच्या बँकांना रशियामध्ये वरचढ होऊ न देणारे पुतीन स्वतःच ह्या संकटावर कशी मात करतील हे बघण्यासारखे ठरेल. रशियामध्ये पुतीन ह्यांची सत्ता राहते कि जाते ह्याने भारताने अस्वस्थ व्हावे का? ह्या पेच प्रसंगाचे आपल्यावर काय परिणाम होतील हे बघितले तर ह्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.




No comments:

Post a Comment