Friday, 11 January 2019

ऑगस्टा वेस्टलॅंड भाग ५

Image result for gautam khaitan

Photo: Gautam Khaitan arrested

केंद्रीय मंत्री श्री राज्यवर्धन सिंग राठोड ह्यांनी एका टीव्ही मुलाखतीमध्ये म्हटले आहे की सीबीआयच्या ताब्यात असलेला ख्रिश्चियन मिशेल आता पोपटासारखा बोलत आहे. मिशेलचा इतिहास आठवतोय ना? आपल्याच वडिलांशी त्याचे कधी पटले नाही. इतकेच नव्हे तर वडिलांनी त्याच्याकडे सुपूर्द केलेल्या धंद्यामधून त्याने वडिलांचीच उचलबांगडी करवली होती. संजय ब्रागता ह्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मिशेलने म्हटले होते की "शेवटच्या दहा वर्षात माझे व वडिलांचे बिलकुल पटत नव्हते. आम्ही जे काही भेटलो ते कोर्टातच. त्यांनी माझे वारसाहक्क हिरावून घेतले होते." मुलानेच दगा दिल्यामुळे वोल्फगॅंग एकलकोंडे झाले होते. तर सांगायचा मुद्दा हा की ज्याने स्वतःच्याच वडिलांकडून धंद्यामधली गमके शिकून घेऊन आणि त्यांचेच कॉन्टॅक्टस् वापरून उभ्या केलेल्या कंपन्यांमधून त्यांनाच हुसकावून लावून सर्व नियंत्रण आपल्या हाती घेणारा मिशेल स्वतःच्या स्वार्थासाठी "जवळच्या" घराण्याचाही गळा कापायला तयार झाला तर आश्चर्य नको वाटायला. खरे तर हा व्यवसाय चालतो तो पूर्णपणे एकमेकांवरील विश्वासामधून. जिथे सगळे व्यवहार शंकास्पद आणि बेकायदेशीर असतात तिथे एकमेकांच्या भिस्तीशिवाय एक पाऊलही पडत नसते. एक जण ढासळला तर सगळा डोलारा सैल होऊन जातो. पण गुन्ह्यामधले साथीदार विश्वासार्ह असोत की नसोत त्यांच्याच मदतीने पुढे जावे लागते. मिशेलने बनवट कंपन्यांचे जाळे परदेशामध्ये कसे उभारले होते त्याची एक छोटीशी झलक आपण वाचली. पण जसे २६/११ च्या हल्लेखोराना मदत करणारे भारतामध्येही होते असे म्हटले जाते तसेच मिशेलला मदत करणारे केवळ परदेशामध्ये नव्हते ते तर भारतामध्येही होतेच. मिशेलचा मित्र परिवार राजकारणी - पत्रकार आणि सरकारी बाबू ह्यांच्यापुरताच मर्यादित होता का? की आणखीही काही साथीदार इथे त्याला मदत करत होते? हे साथीदार शोधून काढायचे अवघड काम तपासयंत्रणेवर येऊन पडले होते. 


२०१३ मध्ये Livemint ने दिलेल्या बातमीमध्ये सीबीआयने माजी केंद्रीय मंत्री संतोष बागरोदिया ह्यांच्या भावाची म्हणजे सतीश ह्याची चौकही केली असे म्हटले होते. सतीश बागरोदिया हे आय डी एस इन्फोटेक ह्या कंपनीचे चेयरमन आहेत. ते PHD Chamber of Commerce PHDCC चे अध्यक्षही आहेत तसेच त्यांचा मुलगा मनीष देखील आय डी एस इन्फोटेकमध्ये डायरेक्टर आहे. सुमारे १०० कोटी रुपयाची उलाढाल करणार्‍या ह्या कंपनीची मोहाली, चंडीगड आणि नोइडामध्ये ऑफिसेस् आहेत. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून प्रताप अगरवाल काम करत. ते CII ह्या प्रतिष्ठित संस्थेच्या कामामध्ये खूपच रस घेत असत. १९८९ साली स्थापन झालेल्या ह्या कंपनीची मॉरिशस आणि ट्युनिशिया (??) मध्ये ऑफिसेस् आहेत. तसेच कंपनीने ब्रिटनमध्ये एक कंपनी विकत घेतली आहे असे दिसते. आयडीसच्या अमेरिका व नेदरलॅंडस् मध्येही शाखा आहेत. भारत - मॉरिशस - ट्युनिशिया मधील आयडीएस चे एकमेकांशी काय संबंध आहेत ह्याची चौकशी अद्यापही चालूच असावी. पण कंपनीच्या बॅलन्स शीट्मध्ये काही काही संदिग्ध संदर्भ मिळतात. आयडीएस कंपनी पूर्वीच्या काळी आगुस्ता वेस्टलॅंड साठी अथवा तिची पेरेंट कंपनी फ़िनमेकॅनिकासाठी BPO म्हणून काम करत असावी. 

आगुस्ता हेलिकॉप्टर कराराचे काम हाती येणार अशी शक्यता दिसू लागल्यानंतर २००९ मध्ये आयडीसमध्ये काम करणारे काही "कर्मचारी" कंपनीमधून बाहेर पडले आणि त्यांनी एरोमॅट्रिक्स नावाची नवी कंपनी दिल्ली येथे नोंदवली व तिचे ऑफिस चंदीगड येथून सुरू केले. नव्या कंपनीमध्ये परवीन बक्षी ह्यांचे नाव चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर CEO म्हणून दिसते. त्यांच्यासोबत आयडीसमधून अरिहंत जैनही डायरेक्टर म्हणून आले होते. नव्या कंपनीमध्ये ग्विडो हश्की, कार्लो गेरोसा हे दोन परदेशी तर गौतम खेतान हे भारतीय डायरेक्टर आहेत. ह्या कंपनीच्या होल्डींग कंपनीची मॉरिशसमध्ये नोंदणी झालेली आहे - तिचे नाव इन्फो डिझाईन सिस्टीम्स म्हणजेच आयडीएस! एरोमॅट्रिक्सचे ९०% उत्पन्न आगुस्ता वेस्टलॅंडच्या ब्रिटिश शाखेतून येताना दिसते. आगुस्ता वेस्टलॅंड इटालीमधून आयडीएसला मिळालेली काही प्रॉजेक्टस् एरोमॅट्रिक्सच्या नावाने फिरवण्यात आली. प्रॉजेक्टस् वर काम करणारे सगळे कर्मचारीही नव्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाले. अशा तर्‍हेने कंपनीकडे सुमारे ८.५ कोटी रुपयाचे अगदी हातचे उत्पन्न नेहमीच आलेले दिसते. तपासाच्या दरम्यान CEO असूनही बक्षी ह्यांना ह्या प्रॉजेक्टस् चे नेमके स्वरूप काय हे सांगता आले नाही.

(एकंदरीत ही कथा वाचताना भारताने खरोखरच आय टी क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी केली आहे की अशाच बनावट व्यवहारांसाठी हे क्षेत्र वापरले गेले असा प्रश्न समोर उभा राहतो आणि सत्यम सारखे घोटाळे आठवतात.)


हश्की आणि गेरोसा ह्यांनी एरोमॅट्रिक्स सोबत आगुस्ताचा एक बनावट करार बनवला आणि तो वापरून बनावट बिले तयार केली. त्याचे पैसे जे आले ते प्रथम एरोमॅट्रिक्सच्या होल्डींग कंपनीला म्हणजे आयडीस मॉरिशसला पाठवण्यात आले. मग ह्या कंपनीने ते एरोमॅट्रिक्सला दिले. जवळजवळ १४० कोटी रुपये आयडीएस ट्युनिशियाच्या खात्यामधूनही फिरवण्यात आले होते. पुढे लाच देण्यासाठी ते वापरले गेले असा अंदाज आहे. बक्षी म्हणतात की आमची कंपनी इंजिनियरिंगची कामे करते - आमचा आणि लाचलुचपतीचा काही संबंध नाही. लाचलुचपत प्रकरणात नाव येते आहे असे दिसताच आयडीएस कंपनीनेही टोपी फिरवली. एरोमॅट्रिक्सचे अनेक कर्मचारी आमच्याकडे पूर्वी काम करत पण आता त्यांचा कंपनीशी काहीच संबंध उरला नाही असे आयडीएसचे एचआर मॅनेजर ठणकावून सांगतात. परवीन बक्षी म्हणतात की त्यांची होल्डिंग कंपनी आयडीएस मॉरिशस आहे पण तिच्यावर कोणाचे नियंत्रण आहे मला माहिती नाही. ग्विडो आणि गेरोसा ह्यांचा बक्षींवरती फारसा भरवसा नव्हता. बक्षी काही फार मदत करणार नाहीत पण वकील असलेले गौतम खेतान करतील असे त्यांचे मत होते. असे व्यवहार सांभाळण्याचा खेतानला उत्तम अनुभव आहे असे त्यांना वाटत होते. ह्या अर्थाचे त्यांच्यामधील बोलण्याची इटालियन सरकारकडे नोंद असून तिचा संदर्भ आगुस्तावरच्या इटालीमधील खटल्यामध्ये प्रॉसिक्यूटरने दिला आहे. 

कोणत्याही परिस्थितीमध्ये खैतानला जपलेच पाहिजे असे हश्की आणि गेरोसा बोलत असत असे ख्रिश्चन मिशेल ह्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. गौतम खेतान हे एक महत्वाचे नाव ह्या घोटाळ्यामध्ये नक्कीच आहे. लाचेचे पैसे फिरवण्यामागे तल्लख मेंदू खेतानचाच होता असेही मिशेलने सांगितले. त्यानेच सगळी रचना केली बॅंकांमध्ये खाती उघडली आणि पैशाची फिरवाफिरवही तोच करत होता असे मिशेल म्हणतो. साहजिकच हश्की आणि गेरोसा ह्यांना खेतान का भरवशाचा वाटत होता हे इथे स्पष्ट होते. 

मोदी सरकारने जेव्हा गौतम खेतानला २२ सप्टेंबर २०१४ रोजी पकडले तेव्हा ह्या सर्वांची कशी गाळण उडाली असेल ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. 

2 comments: