Wednesday, 23 January 2019

प्रियंकाजी आएँ, उनका स्वागत है

Image result for priyanka indira


२७ ऑक्टोबर १९८४. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरावरील कारवाईनंतर जीवनाच्या अंतीम क्षणांची जणू चाहूल लागलेल्या इंदिराजी त्यांच्या आवडत्या चिनार वृक्षाच्या पानगळीचा ऋतू अनुभवण्यासाठी काश्मिरमध्ये गेल्या होत्या. अचानक आपले राजकीय सचीव श्री माखनलाल फोतेदार  ह्यांच्याशी निर्वाणीचे बोलणे करत त्या म्हणाल्या - "फोतेदारजी, माझे फार आयुष्य उरले आहे असे वाटत नाही. पण तिची - प्रियंकाची - काळजी तुम्हाला घ्यायची आहे." फोतेदार म्हणाले - "पण मी तरी इतका जगेन असे वाटते तुम्हाला?" इंदिराजी पूर्ण विश्वासाने म्हणाल्या - " नक्की. राष्ट्रीय क्षितीजावरती तिचा उदय होईल आणि ती कर्तृत्व गाजवेल तोपर्यंत तुम्ही असाल. लोकांना तिच्यामध्ये मी दिसेन आणि तिला पाहून त्यांना माझी आठवण येईल. पुढच्या शतकावर प्रियंकाचा प्रभाव असेल. ते झाले की लोक मला विसरतील." इंदिराजींच्या मृत्यूच्या जेमतेम तीन दिवस आधी घडलेला हा प्रसंग पुढे फोतेदार ह्यांनी राजीव गांधी ह्यांच्या कानी घातला. "अच्छा - ममीला प्रियंकाबद्दल असे वाटत होते काय?" असे म्हणून राजीव ह्यांनी विषय तिथेच सोडून दिला. इंदिराजीची अंतीम इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्याजवळ त्यांनी व्यक्त केलेली इच्छा योग्य माणसापर्यंत पोचावी म्हणून फोतेदार जागरूक होते. नेहरू घराण्याशी ते इमानदार होते आणि व्यक्तीशः इंदिराजींशी. राजीवजींच्या हयातीमध्ये वारसदाराचा प्रश्न उद भवला नाही खरे. पण पुढे सोनियाजींनी राजकारणामध्ये प्रवेश केल्यावर पुन्हा एकदा फोतेदार ह्यांनी आपल्यावर इंदिराजींनी टाकलेल्या जबाबदारीशी प्रामाणिक राहत विषय सोनियाजींकडे काढला. 

१९९९ मध्ये सोनियाजींनी अमेठीमधून निवडणूक जिंकली होती. २००४ च्या निवडणुकीत आपण रायबरेलीमध्ये जाण्याचा आणि राहुलला अमेठीमध्ये आणण्याचा विचार त्या जुलै २००३ नंतर करत होत्या. राहुलला राजकारणामध्ये आणण्याबाबत त्यांनी फोतेदार ह्यांना सल्ला विचारला. फोतेदार लिहितात - इंदिराजींनी तोंडी सांगितलेली आणि मी लिहून घेतलेली त्यांची अंतीम इच्छा काय होती ते मी अखेर सोनियाजींच्या कानावर घातली. घराण्याची परंपरा प्रियंकावर सोपवण्याची त्यांची इच्छा ऐकून सोनियाजी उदास झाल्या. त्यांनी तुटकपणे मला विचारले, "इंदिराजींची खरेच ही अंतीम इच्छा होती काय?" मी होकारार्थी मान डोलावली आणि सर्व घटना विदित केली. "हेच कथन मी राजीवजींनाही सांगितले होते आणि त्यांनी मला हा कागद जपून ठेव म्हणून सांगितले होते" असेही फोतेदार सोनियाजींना म्हणाले. "हे ऐकताच सोनियाजींना आपला अपमान झाल्यासारखे वाटले. त्याच तिडिकीत त्या उठून दुसर्‍या खोलीत निघून गेल्या. इंदिराजींची अंतीम इच्छा मी सांगितली त्याबद्दल त्यांनी मला मनापासून कधी माफ केले नाही."

असा अनुभव आलेले माखनलाल फोतेदार हे एकमेव कॉंग्रेसी नेते नव्हेत. गेल्या पंधरा वर्षात अनेक वेळा वाव असूनही आईनेच कन्येला राजकारणाच्या वारसाहक्कापासून वंचित ठेवले होते. आज जेव्हा आपला सुपुत्र नैय्या पार लावेल की नाही अशी अनिश्चितता निर्माण झाली आहे तेव्हा बाईसाहेबांनी बहुधा काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला असावा. असो ३५ वर्षांनंतर का होईना पण इंदिराजींची अंतीम इच्छा निदान मार्गस्थ झाली आहे असे आज म्हणता येईल. 

स्वतः सोनियाजींनी राजीव ह्यांच्या हत्येनंतर सात वर्षांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा उदार मनाच्या अटलजींनी - सोनियाजी आएँ, उनका स्वागत है अशा शब्दात त्यांच्या राजकारण पदार्पणाला आपण कसे सामोरे जाणार ह्याची चुणूक दिली होती. प्रियंका गांधी वाड्रा राजकारणामध्ये यशस्वी होतील का आणि आपल्या बंधुराजांपेक्षा अधिक चमकतील का हाच एक प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात घोळत आहे हे स्वाभाविक आहे. अर्थात ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी प्रियंकाजींची थोडी तरी माहिती आपल्या जवळ हवी, नाही का?

कॉंग्रेसची सर्व सूत्रे आपल्या आईच्या हाती आहेत आणि तीच आपल्या राजकारण प्रवेशाच्या सपशेल विरोधात आहे ही वस्तुस्थिती प्रियंकाने ज्या धीराने गिळली आहे ते पाहता ह्या मुलीची झेप खूप मोठी आहे हे सहज समजते. गेल्या पंधरा वर्षात असे अनेक प्रसंग उभे राहिले असतील जेव्हा प्रत्यक्ष आईविरोधात प्रियंकाला बंड करावे असे वाटले असेल. पण तिच्या संयमाचे कौतुक केले पाहिजे. प्रियंकाजींनी राजकारणामध्ये यावे ही इच्छा अनेक कॉंग्रेसजन २०१४ नंतर उघड बोलून दाखवत होते. ह्या वारंवार उठणार्‍या आवाजाला प्रियंकाने कधीही - अगदी खाजगीत सुद्धा - प्रतिसाद देण्याची चूक केली नाही. तिच्या व्यक्तिमत्वाचा कणखरपणा आणि राजकीय समज कशी प्रखर आहे हे समजण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे.

२०१४ नंतर प्रियंकाच्या मागे उभे राहणार्‍या कॉंग्रेसी गटामध्ये खास करून श्री. अहमद पटेल ह्यांना मानणार्‍या व्यक्ती असाव्यात असे मी मानते. सोनियाजींनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद अधिकृतपणे सोडल्यानंतर श्री पटेल ह्यांचे पक्षात नेमके काय स्थान असेल ह्याविषयी तर्कवितर्क वाचायला मिळत होते. राहुलजींचे स्वतःचे एक वर्तुळ आहे आणि त्यातील व्यक्तींचे आणि सोनियाजींच्या आतील वर्तुळातील व्यक्तींचे फार काही पटत नाही हे उघड सत्य आहे. आज निदान प्रथमदर्शनी सर्व सूत्रे राहुलच्या हाती असताना पटेल ह्यांचे भवितव्य दोलायमानच होते. मात्र प्रियंकाच्या राजकारण प्रवेशानंतर पटेल गटाला एक आशास्थान मिळाले असे म्हणता येईल. ही बाब देशाच्या हिताच्या दृष्टीने कितपत साधकबाधक आहे हे मी सांगायची गरज नाही. 

आजही प्रियंकाला चंचूप्रवेशच मिळाला आहे. त्यांची नेमणूक राष्ट्रीय स्तरावर नव्हे तर पूर्व उत्तर प्रदेशच्या जनरल सेक्रेटरी म्हणून करण्यात आली आहे. हे क्षेत्र सीमित आहेच. पण राजकारणामध्ये आपली छाप उठवण्यासाठी प्रियंकासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. पूर्व उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत प्रियंका यशस्वी ठरली नाही तर तिचा परस्पर काटा निघू शकतो असा डाव तिचे बंधुराज खेळत असावेत. 

कधी नव्हे ते माणसाच्या तोंडून खरे काय ते निघते म्हणतात त्याची प्रचिती आज श्री राजदीप सरदेसाई ह्यांनी दिली. २०१९च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने एकूण १२० जागांचे लक्ष्य ठेवले आहे आणि ते गाठण्यासाठी प्रियंकाच्या राजकारण प्रवेशाची गरज कॉंग्रेसला भासल्याचे ते म्हणाले. तेव्हा निवडणुकीत १२० च्या वर आपण जात नाही हे कॉंग्रेसने मनानेच मान्य केले आहे असे दिसते. ह्याच्या सोबत उत्तर प्रदेशामध्ये भाजपच्या जितक्या जागा कमी होऊ शकतील तितके व्यक्तीशः मोदी ह्यांचे पंख छाटले जातील आणि मित्र पक्षांवर अवलंबित सरकार बनवताना त्यांना अन्य कोणा नेत्याची निवड करावी लागेल ही रणनीती आहे हे ह्या निमित्ताने राजदीप ह्यांनी कबूलच केले हे विशेष.

अशा परिस्थितीमध्ये प्रियंका ह्यांनी राजकारण प्रवेश केला असला तरी त्यांच्या गळ्यामध्ये रॉबर्ट नावाचा एक धोंडा आहे आणि तोच त्यांना बुडवायला पुरेसा आहे हे काय त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना माहिती नाही काय? तेव्हा प्रियंकाला हरवायचे तर रॉबर्ट जीवित राहणे हे भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे. प्ण म्हणूनच इशारा द्यावासा वाटतो की ह्या रॉबर्ट बाबाला सांभाळा! निदान निवडणुका होईपर्यंत तरी!!


3 comments:

  1. मिशेल मामा च्या जोडीला आणून ठेवा

    ReplyDelete
  2. Priyanka's entry was well expected. Its seems advantage to BJP as division of votes bound to happened. SP+BSP+congress votes share may give bjp sleepless night.Congress president should give uncondtional support to SP+BSP alliance but power hungry congress won't do that...hope BJP will retain their seats in UP.

    ReplyDelete
  3. फिरोज खान
    राजीव नेहरू- गांधी - खान
    आता
    रॉबर्ट वाड्रा .......?
    खतरनाक खेळ
    खरेच त्याला SPG संरक्षण द्या.
    नाहक बळी जाऊन हुतात्मा होण्यापासून रोखा

    ReplyDelete