Wednesday 14 February 2018

हेरांची अदलाबदल - प्यूसेवरील पुलावरती


१० फेब्रुवारी रोजी रशिया आणि इस्टोनिया ह्यांनी आपापल्या हेरांची "अदलाबदल" केली असे वृत्त होते त्याचे तपशील काय आहेत म्हणून काही जण विचारत होते. पुतीन ह्यांच्या राजवटीमध्ये रशियाने पुन्हा एकदा आपल्या सोविएत काळामधले महत्वाचे स्थान मिळवण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. ज्याला आपण पूर्व यूरोपातील देश म्हणतो ते फुटून निघालेल्या देशांमुळे रशियाची ताकद खच्ची झाली. आज त्यामधले बहुतेक सर्व देश नेटो ह्या अमेरिकाप्रणित संरक्षण आघाडीचे सभासद झाले आहेत. आणि त्यांच्या संरक्षणासाठी आता खुद्द अमेरिका पुढाकार घेऊ शकते अशी परिस्थिती आहे. युक्रेनमधील संघर्षाची तुम्हाला कल्पना आहेच. ज्याला जगाचे गव्हाचे कोठार म्हटले जाई तो युक्रेन आपल्या हातून गेल्याची रशियाची चुटपुट कशी असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. युक्रेनमध्ये पुतीनना व रशियाला रस तर आहेच पण युक्रेनचा एक प्रांत क्रिमिया ह्यामध्ये रशियाने अधिक रस दाखवला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाने क्रिमियामधल्या मुस्लिम प्रजेला सरसकट पुनर्वसनाच्या नावे अन्य ठिकाणी हलवले होते. व त्यांच्या जागी रीतसर रशियन प्रजा आणून वसवली होती. असा क्रिमिया आपल्याच अधिपत्याखाली असला पाहिजे असा पुतीन ह्यांचा आग्रह होता. आणि साहजिकच तेथे नेऊन वसवलेली रशियन प्रजाही त्याच मताची होती. त्यानुसार वेळ साधून रशियाने क्रिमियामध्ये रणगाडे नेऊन उभे केले व युक्रेनची तेथील सद्दी संपुष्टात आणली. काळ्या समुद्राच्या तटावरील क्रिमियाचे भूराजकीय महत्व काय ते केवळ नकाशामधले त्याचे स्थान पाहूनच आपल्याला समजते. तर अशा कडव्या संघर्षाच्या वातावरणामध्ये रशियन हेर पूर्व युरोपातील देशामध्ये आता सर्रास फिरत हेरगिरी करून महत्वाची माहिती मायदेशी पाठवत असतात. 

१० फेब्रुवारी रोजी हेरांची अदलाबदल झाली असे म्हटले गेले तरी इस्टोनियाचे म्हणणे असे आहे की रशियाने त्यांच्या एका निरपराध सामान्य नागरिकाला धूर्तपणे अटक केली आणि त्याच्यावरती बादरायण संबंधही नसलेले हेरगिरीच्या आरोप करून ते त्यांच्या कोर्टात सिद्ध करून घेतले. दोन्ही देशांच्या सीमा लागून असल्याने अनेक इस्टोनियन नागरिक रशियामध्ये आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने जात असतात. रायावो सुसाय हा असाच एक सामान्य इस्टोनियन नागरिक रशियामध्ये कामानिमित्त गेला होता. ही काही त्याची रशियामधली पहिली फेरी नव्हती. अशा प्रकारे तो गेली दहा वर्षे आपला व्यवसाय करत होता. फेब्रीवरी २०१६ मध्ये मॉस्कोच्या  विमानतळावरील ट्रान्सीट एरियामध्ये तो ताजिकिस्तानाला जाण्यासाठी आपल्या विमानाची वाट पाहत थांबला होता. तिथे त्याला रशियन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याच्यावरील हेरगिरीच्या आरोप सिद्ध करून घेऊन त्याला १२ वर्षांची शिक्षा ठोठावून घेतली. 

सुसायच्या उदाहरणामुळे अनेक इस्टोनियन व्यावसायिकांनी रशियामध्ये धंद्यासाठी जाण्याचा धसका घेतला आहे. केवळ रशियाच नव्हे तर बेलारूस व कझाकस्तानाला जाण्याची पण आम्हाला भीती वाटते असे हे व्यावसायिक म्हणू लागले आहेत. इस्टोनियामध्ये जे काही रशियन हेर आहेत त्यांच्यापैकी कोणालाही अटक झाली तर रशिया आमच्या निरपराध माणसाला ताब्यात घेऊन त्याच्यावरती हेरागिरीचा खोटा आरोप करते आणि त्याला अटकेत टाकते असे इस्टोनिया म्हणते. मग सोळभोकपणे आपल्या खऱ्या हेराबरोबर त्याची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव टाकते असे दिसत आहे. रायावो सुसायची खरी कहाणी कधी बाहेर येईल ती येवो. पण त्याची अदलाबदली ज्यांच्यासोबत झाली त्या आर्टेम झिंचेन्कोची कहाणी तरी काय आहे? 

आर्टेम झिंचेन्कोचे पणजोबा ग्रेगरी गुटनीकोव दुसऱ्या महायुद्धामध्ये सोविएत फौजेच्या काउंटर इंटेलिजन्स युनिट  Smersh मध्ये काम करत होते. वडील इगोरदेखील फौजेत होते. आजोबा अल्बर्ट सिद्ध फौजेतच होते. पण आर्टेम वरती पणजोबांचा प्रभाव जास्त होता. आपल्या पणजोबांच्या शौर्याच्या कथांनी लहानपणापासून आर्टेम भारून गेला होता. गुटनिकोव्ह पहिल्यांदा फौजेमध्ये ट्रक ड्राइवर म्हणून काम करत. नंतर त्यांना काउंटर इंटेलिजन्स युनिटमध्ये घेतले तेव्हा त्यांचे काम शत्रूचे हेर ओळखून त्यांना पकडण्याचे होते. अशी माणसे वरकरणी पोलीस म्हणून काम करत. पण प्रत्यक्षात त्यांचे रिपोर्टींग हेरगिरीच्या युनिटकडे असायचे. ग्रेगोरी ह्यांना स्टालिनग्राडच्या संरक्षणासाठी ऑर्डर ऑफ रेड स्टार हा किताब मिळाला - नंतर बर्लिनवरील विजयात एक पदक मिळाले आणि तिसरे पदक मिळाले ते दुसरे महायुद्ध (ज्याला रशिया ग्रेट पॅट्रिऑटिक वॉर म्हणते) जिंकले म्हणून. 

दुसऱ्या महायुद्धाच्या अंतानंतर ग्रेगरी ह्यांच्या युनिटमधील अनेकांच्या कथांवरती रशियामध्ये चित्रपट काढले गेले. जर्मन हेरांपेक्षा ते कसे चतुर आणि चाणाक्ष होते हे बिंबवणारे सिनेमे काढले जात असत. आणि त्यांना एखाद्या हिरोचा सन्मान जनता देत असे. आता सोविएत रशियाच्या विघटनानंतर ही लाट पुन्हा उसळलेली दिसते. युनिटच्या शौर्याच्या कथांवरती पुन्हा नव्याने कलाकृती निर्माण होऊ लागल्या आहेत. 

आर्टेमचे आजोबा अल्बर्ट ह्यांची १९६६ मध्ये प्रथम इस्टोनियामध्ये नेमणूक झाली. १९६७ मध्ये Talinn शहरामध्ये घर मिळाल्यानंतर त्याचे कुटुंब तिथे राहायला आले. अल्बर्टच्या बदल्या ह्यानंतर व्हिएतनाम व पूर्व जर्मनीमध्ये झाल्या तरी कुटुंब मात्र एकाच जागी स्थिरावले. १९९१ मध्ये रशियाचे विघटन झाले तेव्हा अल्बर्ट लेफ्टनंट कर्नल म्हणून सेवानिवृत्त झाले होते. अल्बर्टसारखे आणखी जवळजवळ १५००० रशियन सैनिक इस्टोनियामध्ये होते. इस्टोनियायन सरकारने त्यांना तेथील नागरिकत्व हवे असेल तर अर्ज करण्याची मुभा दिली. ती संधी साधून अल्बर्ट ह्यांनी इस्टोनियाचे नागरिकत्व स्वीकारले. अल्बर्टसारखेच अन्य कित्येक सैनिक अन्य पूर्व युरोपच्या देशांमध्ये राहत होते आणि आता त्यांनी नव्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. ही सर्व माणसे आज रशियाची हेरगिरी करू शकतात का ह्याचे मूल्यमापन करून वापरली जातात. आर्टेमचे वडील इगोर देखील रशियन लष्करात होते. ते रशियामध्येच राहिले. आणि २००६ मध्ये सैन्यामधून त्यांच्या टॅंक निर्मिती कारखान्याचे प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले होते. आर्टेम आपल्या वडिलांसोबत रशियामध्ये राहेत होता. पण उन्हाळ्याच्या सुटीमध्ये तो आजोबाना भेटायला इस्टोनियामध्ये जात असे. त्याला रशिया आवडत नसे - तो इस्टोनियामध्ये रमत होता असे आजोबांचे शेजारी सांगतात. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्याला रशियाने हेर म्हणून काम करण्याची संधी दिली. 

तेव्हा २००९ मध्ये जेव्हा रशियाने विचारले तेव्हा साहजिकच ह्या कामासाठी त्याची मनोभूमी तयारच होती. हेर बनवण्यासाठी योग्य माणूस कोणता हे हेरण्याची ही पद्धत किती परिणामकारक आहे बघा. गेल्या नऊ वर्षांमध्ये इस्टोनियाने पकडलेला आणि ज्याच्यावर हेरगिरीचा गुन्हा सिद्ध झाला आहे असा रशियाचा झिंचेन्को हा दहावा हेर आहे. झिंचेन्कोची निवड त्याचे पणजोबा रशियन फौजेत होते ह्या कसोटीवर तर झालीच पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे त्याच्या कुटुंबाचे लागेबांधे पूर्वकालीन सोविएत छत्राखालील देश  इस्टोनियाशी राहिले म्हणून झाली असावी. 

आर्टेमने रशियाचा हेर म्हणून काम करण्याचे मान्य केल्यावरती आपल्या आजोबांशी नाते सांगत इस्टोनियामध्ये कायम वास्तव्यासाठी अर्ज केला. तसेच तिथे एक कंपनी सुरु केली. व्यवसायात त्याने एक भागीदार घेतला होता. लहान मुलांच्या ढकल गाड्या आणि तत्सम वस्तू विकण्याचा हा धंदा नावापुरता नव्हता. तो खरोखरच हा धंदा करत होता. आणि त्यानिमित्ताने रशिया इस्टोनिया अशा फेऱ्या मारत होता. धंद्याचे कव्हर वापरून त्याचे हेरगिरीचे  उद्योग बिनबोभाट चालू होते. इस्टोनियामधून तो खास करून सैन्याविषयक आणि देशाच्या infrastructure बद्दलची माहिती गोळा करत होता. सैन्य कोणती सामग्री वापरते आणि त्यांच्या तुकड्यांच्या हालचाली ह्या विषयाची माहिती रशियाला त्याच्याकडून मिळत होती. आर्टेम पकडला गेला तेव्हा त्याच्याकडून एक लॅपटॉप - चार मोबाइल फोन - एक हार्ड ड्राईव्ह आणि एक पॅड एवढ्या वस्तू जप्त केल्या गेल्या होत्या. आर्टेम केवळ इस्टोनियामध्ये रशियाची हेरगिरी करत नव्हता. पण अन्य कोणत्या देशात त्याच्या वाऱ्या होत होत्या हे अजून गुलदस्तात आहे. किंबहुना आर्टेम विषयातील बरीचशी माहिती अजूनही गुप्त ठेवण्यात आली असल्यामुळे त्याच्याभोवती एक रहस्यमय वलय तसेच राहिले आहे. 

रायव्हो सुसाय आणि आर्टेम झिंचेन्को आज आपापल्या घरी परतले आहेत पण इस्टोनिया आणि रशिया ह्यांच्यामधला हा सिलसिला न संपणारा आहे. इस्टोनियायच्या संरक्षणासाठी ब्रिटन ने दोन दिवसापूर्वीच रणगाडे पाठवले आहेत. त्यावरून दोन्ही देशांमधल्या संघर्षमय वातावरणाची आपल्याला कल्पना येऊ शकते. ही कथा वाचून आपणाला कुलभूषण जाधव ह्यांची केस न आठवली तरच नवल. खरे सांगायचे तर पाकिस्तान जेव्हढे आकांडतांडव करत आहे आणि बलुचिस्तानमध्ये भारत दहशतवादी कारवाया घडवून आणते हा आरोप सिद्ध करण्यासाठी ज्या कोलांट्या उड्या मारत आहे त्यावरूनच हे सिद्ध होते की कुलभूषण केसचा वापर आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताला बदनाम करण्यासाठी चालला आहे. कुलभूषण हा खराखुरा हेर असता तर अळीमिळी गुपचिळी न्यायाने त्याची केस गुप्त राखून पाकिस्तानने अनेक फायदे उकळण्याची संधी अजिबात सोडली नसती. आणि असे आहे म्हणूनच भारताने सुरुवातीपासूनच कुलभूषण हा भारतीय आहे आणि तो नौदलात काम करत होता व तेथून सेवानिवृत्ती पत्करून स्वतःचा व्यवसाय करत होता हे उघडपणे मान्य केले.  कुलभूषणच्या बाबतीतही पुढे काय घडते ह्याकडे सगळ्या देशाचे डोळे लागले आहेत.

निर्दय राजकारणाचे हे हेर प्यादे होऊन जातात असेच सांगणाऱ्या अनेक कथा वाचायला मिळतात. असे असले तरी हेरगिरीच्या रहस्यमय जगामधल्या अशा कथा आपल्या थरारून सोडतात आणि ह्या अज्ञात जगविषयीचे आकर्षण ताजे ठेवत असतात.



1 comment: