Sunday, 19 February 2017

तिबेट १३




आपले महाशक्ती बनायचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी चीन प्रयत्नांची कसूर सोडणार नाही हे उघड आहे. खरे तर चीन महाशक्ती बनू शकतो का हाच एक मोठा सवाल असून त्याचे उत्तर आपण पुढील भागात पाहू. पण त्याअगोदर भारताची कोंडी करण्याच्या काय उठाठेवी तो करत आहे तेही पाहायला हवे.
समर्थ भारत हेच चीन साठी मोठे आव्हान असल्यामुळे तो भारताला आतून तसेच बाहेरून घेरण्याचे डावपेच आखत असतो. देशांतर्गत नक्षलवादी चळवळी - ईशान्य भारतातील राज्यांमधल्या फुटीरतावादी चळवळी ह्यांना चीन पैसे, शस्त्रास्त्रे आणि अन्य मदत पाठवत असतो. शिवाय ह्या लढ्याच्या मागे जनमत उभे व्हावे म्हणून त्याने आपल्यामध्ये पुरोगाम्यांची फौज सोडली आहे. ही फौज आंदोलनाकर्त्यांच्या बाजूने जनतेची आणि न्यायालयांची सहानुभूती वळवण्याचे काम करत असते. शिवाय भारत सरकार म्हणजे जणू काही सद्दाम हुसेन सारखी अत्याचारी राजवट असल्याचे चित्र ही फौज उभे करते. भारतामध्ये पोलीसराज - दमनशाही चालू असल्याचा हे पुरोगामी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर गवगवा करतात. त्यांच्याशी लढता लढता आपली अर्धी शक्ती वाया जावी अशी ही चीनची योजना आहे. पण तेवढ्यावर चूप बसेल तर चीन कसला?
भारताला खाली खेचण्यासाठी पाकिस्तान हे खेळणे चीन ने अनेक वर्षांपासून वापरले आहे. चीन पाकिस्तान मैत्री - अण्वस्त्रे तयार करण्यासाठी चीनने दिलेले सहकार्य - चीनकडून पाकला मिळालेली क्षेपणास्त्रे - भारत विरोधी सर्व कारवायात पाठिंबा - न्यूक्लियर सप्लायर गटात भारताला प्रवेश देण्याला केलेला विरोध - युनोच्या सुरक्षा समितीमध्ये भारताला सदस्यत्व देण्यास विरोध - CPEC - या आणि अशाच गोष्टी तुम्हाला तोंडपाठ आहेत. त्यामुळे ह्या विषयावर जास्त लिहीत नाही. चीन याही पलीकडे जाऊन भारताची कोंडी कशी करू पाहतो ते आता बघू.
स्वतःसाठी सुपर पॉवर बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने चीनला पछाडले आहे. आपल्या परराष्ट्र नीतीची सगळी व्यूहरचना तो त्याच पद्धतीने करत असतो. पहिल्या शीत युद्धाचा जन्म दुसऱ्या महायुद्धाच्या अंती झाला कारण त्या युद्धातून खरोखरच दोन ध्रुव जन्माला आले होते. एका अर्थाने ती एक सहज प्रक्रिया होती. अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीत युद्धाचा अंत झाल्यानंतर चीनने नव्या शीत युद्धाला अकारण आरंभ केला आहे. हे शीत युद्ध अर्थातच अमेरिकेच्या विरोधात आहे. त्याची पहिली पायरी म्हणून चीनने आशिया पॅसिफिक या प्रदेशात एक नंबरचे स्थान मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. याचाच दुसरा अर्थ असा की आज ज्या स्थानावर अमेरिका विराजमान आहे त्या स्थानावरून तिला हुसकावून लावून ते स्थान पटकावण्याचा चीन प्रयत्न करत आहे.
खरे तर आशिया पॅसिफिक मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया तर गेली दोन दशके केवळ अमेरिकेचे वर्चस्व राहिले आहे. पण महासत्ता म्हणून उदयास यायचे तर सर्व प्रथम स्वतःच्या प्रदेशात एक नंबरवर असावे लागते. अमेरिकेला हुसकावून लावेपर्यंत हे स्थान आपल्याला मिळणार नाही हे चीन ओळखून आहे.
मुळात चीन इतका बलवान कसा झाला हे आपल्याला आठवत असेल. पहिल्या शीत युद्धामध्ये रशियाला पेच म्हणून अमेरिकेने चीनला पुढे आणायचे ठरवले. निक्सन किसिंजर जोडीने अमेरिकेतून पैशाच्या राशी चीनमध्ये ओतल्या. एवढ्या प्रमाणावर परकीय भांडवल मिळाल्यावर डोके शांत ठेवून चीन ने व्यूहरचना आखली. अमेरिकेने सुरु केलेला हा डाव पुरेपूर वापरून चीनने अफाट धनसंपदा आपल्याकडे खेचून घेतली. तिचा उत्तम वापर करत आपले आर्थिक साम्राज्य आणि पर्यायाने लष्करी सामर्थ्य वाढवले आणि लष्कराचे आधुनिकीकरण केले. चीनच्या राक्षसी महत्वाकांक्षेला वेळोवेळी वेसण घालण्याचे पर्याय अमेरिकेकडे उपलब्ध होते पण त्याकडे अमेरिकेने तत्कालीन राजकारणाच्या फायद्यासाठी नजरेआड केले.
लष्कराचे आधुनिकीकरण करताना त्याची व्याप्ती केवळ देशरक्षण ही न ठेवता आक्रमणे करता येतील एवढ्या प्रमाणावर चीनने लष्कर सामर्थ्यवान बनवले. पण तरीही चीन आजही इतकाही मोठा नाही की त्याने अमेरिकेला आशियामध्ये शड्डू ठोकून दाखवावा. तेव्हा लष्करी दृष्ट्या अमेरिकेला आव्हान वाटेल अशा गोष्टी तो वरकरणी आणि थेट करत नाही.आपण महासत्ता असो नसो पण सध्या तरी चीन हीच आशियामधली महासत्ता आहे ह्या गोष्टीवर त्याला अमेरिकेचा 'शिक्का' हवा आहे. म्हणजेच अमेरिकेने स्वतः हून हे स्थान आपल्यासाठी सोडावे यासाठी चीन प्रयत्नशील आहे. इतकेच नव्हे तर आशियाची सुरक्षा अमेरिकेने आपल्या हाती सोपवावी अशी त्याची इच्छा आहे. ही दोन मोठी पावले अमेरिकेने उचलावीत म्हणून चीन अतिशय गुंतागुंतीचे सायकॉलॉजिकल गेम्स खेळत असतो.
चीनचे पसरलेले आर्थिक साम्राज्य आणि त्याचा महासत्ता होण्याच्या मार्गावरील उदय ही काही सामान्य घटना नाही आशिया पॅसिफिक प्रदेशासाठी तो एक ताकदवान भूकंप आहे. अमेरिकेची सद्दी आशियामधून उखडून टाकण्याचे काम पहिल्या शीत युद्धामध्ये रशियालाही जमले नाही. अशा अवघड कामाला चीन आता हात घालू बघत आहे. अमेरिकेचे वर्चस्व उखडून टाकण्याच्या स्वप्नाने रशियालाही एक काळ पछाडले होते. आणि तसे करत असतानाच रशियाने स्वतःचे विघटन आणि पर्यायाने सर्वनाश ओढवून घेतला. आपल्या लक्षात असेल की रशियाच्या विघटनाला सुरुवात झाली तेव्हा रशियाचे आर्थिक साम्राज्य खिळखिळे झाले नव्हते. पण तरीही सुदृढ अवस्थेतील आर्थिक साम्राज्य रशियाचे विघटन थांबवू शकले नाही.
चीनची आजची अवस्था तीच आहे. नव्याने हाती आलेली ताकद त्याला स्वस्थ बसू देत नाही. शिवशिवणाऱ्या हातानी चीन आपले आर्थिक नव्हे तर राजकीय साम्राज्य उभारू पाहत आहे. इथे सांगण्याचा मुद्दा हा आहे की रशियाचे विघटन झाले ते साम्राज्यवादाचा अतिरेक करण्यातून आणि हाती असलेल्या सत्तेचा अवाजवी वापर करण्यातून.
तेव्हा ज्या पुरोगामी महाभागांना असे वाटते की चीनकडे एवढे आर्थिक महाबळ असताना त्याचा विलय होईलच कसा त्यांच्यासाठी ह्याचे स्मरण करून देत आहे. चीनच्या उदयातून निर्माण झालेल्या भूकंपाने आशियामधल्या अनेक देशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सहकार्याच्या वाटा चाचपल्या जाऊ लागल्या आहेत. त्यातूनच चीनसाठी आव्हान कसे निर्माण करता येईल हेदेखील स्पष्ट होऊ लागले आहे. ह्याविषयी माहिती पुढील भागामध्ये बघू या.


1 comment: