सोबत फोटो ज. नियाझींना अर्ध्या तासात शरणागती लिहून द्या म्हणून सांगणारे जनरल जे एफ आर जेकब
चीन भारताला नमवून आपला कार्यभाग साधू बघतोय हे बुद्धीला पटले तरी मनातून वाचक अस्वस्थ असणार हे मला समजते. आणि त्याचे मूळ कारण असे की किती झाले तरी महासत्ता होण्याच्या मार्गावर असलेल्या चीनशी आपण टक्कर देणार तरी कसे? हा विचार आपल्याला छळतो. आणि झालेच असे युद्ध तर चिनी सैन्याच्या सामर्थ्यासमोर आपण कितपत टिकून राहणार असे विचार मनात येऊन आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या मनात पाल चुकचुकायचीच. साहजिक आहे. भारत जिंकावा असे वाटते त्यांना सद् हेतूने या शंका मनात येतात. पुरोगाम्यांचे काय ते नंतर बघू. तेव्हा सदिच्छा असणाऱ्यांना दिलासा म्हणून काही माहिती इथे देते.
युद्ध केवळ ताकदीवर लढले जात नसते. ते युक्तीनेही लढावे लागते. समोर बलाढ्य शत्रू असल्याच्या चिंतेने आपण आपलाच इतिहास विसरतो म्हणून त्याची आठवण करून द्यावी लागते. War is DECEPTION ही म्हण तर प्रसिद्धच आहे. ह्याचा पुरेपूर वापर भारताने १९७१ च्या बांगला युद्धात कसा केला त्याची एक दोन उदाहरणे बघू.
युद्ध सुरु होण्या अगोदरच्या ५-६ महिन्यांमध्ये भारताने परदेशी वृत्तपत्रांमध्ये असे वातावरण निर्माण केले होते की भारताने पूर्व पाकिस्तानात सैन्य घुसवले तरी एखादा छोटासा जिल्हा वा आजूबाजूचा प्रदेश 'मुक्त' करून तो मुक्ती वाहिनीच्या हाती देण्या इतपतच लष्करी कारवाई मर्यादित ठेवली जाईल. संपूर्ण पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करण्याचा आपला हेतू आहे अशी शंका येऊ नये म्हणून परदेशी वृत्तपत्रांना आपल्याला हव्या तशा मजकुराचे लेख छापून आणले गेले. डाक्क्याजवळच्या टांगाईल इथे पॅरा ट्रूपर्स वापरून सैनिक उतरवायचे ठरले होते. प्रत्यक्षात फक्त ३००० च्या आसपास सैनिक उतरवले होते. पण त्यांच्या जोडीला वाळूने भरलेली अनेक पिंपे सोडून देण्यात आली. जेणे करून भारताने किमान दहा हजार तरी सैन्य उतरवले आहे असा आभास निर्माण व्हावा.
१२ डिसेम्बरला सैन्य उतरवल्यानंतर ह्या वृत्ताला अधिकाधिक प्रसिद्धी द्या असे जनरल मानिकशा यांच्या कार्यालयातून सांगितले गेले. त्यानुसार हे वृत्त सर्व जागतिक वृत्तपत्रांकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यास पूर्व कमांड च्या प्रसिद्धी अधिकाऱ्यास सांगितले गेले. पण त्याला फोटो काही मिळाला नाही. ह्या बातमीचे खरे महत्व मानिकशा यांचा प्रसिद्धी प्रमुख जाणून होता. फोटो नसेल तर बातमीची विश्वासार्हता राहणार नाही हे त्याला कळत होते.
प्रसंगाचे भान राखून मानिकशा यांच्या प्रसिद्धी अधिकाऱ्याने आर्काईव्ह मधून साधारण तसेच दिसणारे फोटो प्रसिद्धीसाठी पाठवले. लंडन टाईम्स सारख्या वृत्तपत्रानेही तो फोटो छापला. ह्याची एक कॉपी खुद्द नियाझी याना मिळाली होती. खरे तर त्यांच्याकडे २६००० हुन अधिक सैनिक होते. पण लंडन टाइम्स मधील बातमी आणि पिंपासकट उतरवले गेलेले भारतीय सैनिकांची 'फुगवलेली' संख्या ह्यांच्यामुळे नियाझी यांची फसगत झाली. आपली शक्ती फारच कमी असल्याची त्यांची खात्री 'पटवली' गेली होती. ह्या नाटकाला नियाझी फसले आणि शरणागत येण्यास तयार झाले.
पुढे या प्रसिद्धी अधिकाऱ्याला खोटा फोटो का पाठवला म्हणून वरिष्ठांनी जाब विचारला. पण R&AW चे प्रमुख आर् एन् काव यांना त्याच्या चलाखीची कल्पना होती. त्या अधिकाऱ्याची बदली R&AW मध्ये झाली.
नुकत्याच झालेल्या ऊरी हल्ल्यानंतर भारत काय करणार हे जाणून घेण्यात पाकिस्तानला रस होता. त्याकाळात NDTV वरच्या प्रत्येक चर्चेमध्ये - So military option is not on table - असे बरखा दत्त विचारत होती आणि चर्चेसाठी आलेले जनरल्स असा पर्याय आपल्या समोर नसल्याचे ठासून सांगत होते. सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा NDTV चा चेहरा पडलेला दिसत होता.
Misinformation - Disinformation - Deception ही युद्धात मोठी हत्यारे होऊन बसतात. अशा कित्येक कथा सांगता येतील.
ह्या कथा एवढ्यासाठी लिहायच्या की युद्धामध्ये तुमच्या हाती काय आहे यापेक्षा आहे त्या पेक्षा ते कसे भरमसाठ आहे असा शत्रूचा समज करून देण्याचे कौशल्य वापरले जाते. हत्यार कोणते आणि ते भेदक आहे की नाही यापेक्षा हाती असलेले हत्यार वापरण्याने जमीनदोस्त होऊ ह्या समजाने शत्रूची गाळण उडवता येते. ह्यालाच इंग्रजीत Psy War सायकॉलॉजिकल वॉर असे म्हणतात.
कोणतेही युद्ध एकचएक डावपेच लढवून खेळले जात नाही. भारतासारखा देश मुळात युद्ध टाळतो तर चीनसारखा देश युद्ध लादायचा प्रयत्न करतो. विनाकारण शत्रूत्व धरणा-या चीनशी सामना टाळता तर येत नाही. शिवाय जे काही करायचे ते स्वतःच्या बळावर.
आपल्या मदतीला कोण येईल - अमेरिका की रशिया असे हिशेब मांडून देशाचे संरक्षण करता येत नाही. कोणताही देश आपल्या साठी सदावर्त घालत नाही. एक दिवस रशिया जवळ आला म्हणून अत्यानंद होणारे फेबुजन दुसऱ्या दिवशी त्याने पाकिस्तान बरोबर संयुक्त कवायत केली म्हणून हिरमुसतात. दुसऱ्यावर विसंबून आपले संरक्षण आपण करू शकत नाही. म्हणून आपल्याला झेपेल तेवढाच विरोध करत अंगी बळ साठवत ही अवघड वाट चालायची आहे. आपल्या सरकारला साथ देण्याची आणि त्याचा उत्साह वाढवायची आपली जबाबदारी आपण पार पाडायची आहे.
No comments:
Post a Comment