Sunday, 19 February 2017

तिबेट ४

नमनाला घडाभर तेल घालायची मला सवय झाली आहे म्हणा किंवा कसेही पण माझी भूमिका सुरुवातीलाच स्पष्ट केल्याने फायदा आहे असे वाटते म्हणून काही गोष्टी नमूद करते. तिबेटवरील माझी मालिका ही तिबेटच्या स्वातंत्र्याला मोदी सरकार हात घालत आहे अथवा त्याने घालावा अथवा लगेचच घालावा अथवा तिबेटमधील परिस्थिती अशा प्रकारच्या उठावासाठी अनुकूल असून त्या चळवळ्यांना भारताने पाठिंबा द्यायचीच खोटी की चीनची शकले झालीच म्हणून समजा असे प्रतिपादन करण्यासाठी लिहिलेली नाही. चीन हा भारताचा शत्रू असल्याप्रमाणे वर्तणूक करतो आणि भारताशी आर्थिक व्यवहार व्यापार उदीम् असूनही त्याचे भारताला खाली खेचण्याचे उद्योग संपलेले नाहीत ही वस्तुस्थिती ज्यांना मान्य आहे त्यांच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न येत असतात. त्याची उत्तरे मिळू शकतात का ह्याचा शोध घेण्यासाठी ही मालिका लिहिलेली आहे.
चीनसारख्या बलाढ्य सत्तेसमोर आपण टिकणार का - की चिरडले जाऊ - भारताला जागतिक व्यवस्थेमध्ये स्वतःचे उज्ज्वल स्थान निर्माण करता येईल का - भारताच्या या प्रयत्नांमध्ये चीन खोडा का घालतो - त्याला वठणीवर आणण्यासाठी आपल्याकडे काहीच मार्ग नाहीत का - चिरकूट पाकिस्तानने तुम्हाला चार दशके नाडले तिथे चीनसारख्या राक्षसाने भारताशी शकले उडवायची ठरवली तर आपले काय होणार - आर्थिक महासत्ता बनलेल्या चीनसमोर बलाढ्य अमेरिका - रशिया हे देश नांगी का टाकतात - भारताच्या सर्व शेजारी देशांवर पैशाची उधळपट्टी करणारा चीन त्या राष्ट्रांवरील भारताचा प्रभाव नष्ट करण्यात यशस्वी होईल का असे प्रश्न आपल्या मनात घोंगावत राहतात याचे कारण असे की समाजाच्या ध्यानी मनी नसताना आणि भारतीय राजकीय नेतृत्व हिंदी चिनी भाई भाई म्हणून घोषणा देत होते तेव्हा म्हणजे कोणतेही लश्करी आव्हान भारतातर्फे समोर नसतानाही केवळ ’भारताला धडा शिकवायचा" म्हणून १९६२ चे युद्ध चीन छेडले आणि भारताच्या ताब्यातील प्रदेश हिसकावून घेतले आणि आपण चुपचाप मान खाली घालून ही अवहेलना सोसली त्या अपमानाच्या स्मृती समाजमनामधून जात नाहीत.
अपमानाच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आजचा सेक्यूलर मीडिया - बुद्धिवंत - पत्रकार - विचारवंत साहित्यिक देताना दिसत नाहीत. कारण आपल्यासारख्या सामान्य माणसांना चीन हा भारताचे शत्रूत्व पुढे रेटतो आहे हे सत्य दिसते तसे अशा सेक्यूलरांना दिसत नाही. त्यांच्या पाळण्यामधील दिवसात चीन लाल क्रांतीचे स्फूर्ती स्थान होता - मध्यंतरीच्या काळामध्ये तिथे रिव्हिजनिस्ट सरकार आले आहे आणि त्याने माओ यांचे सिद्धांत मोडीत काढून स्वतंत्र मार्ग स्वीकारला आहे - ही बदललेली वस्तुस्थिती त्यांच्या डोळ्यांना दिसली तरी मेंदूमध्ये घुसत नाही. त्यामुळे तात्विक दृष्ट्याभारतीय हितापेक्षा चीन त्यांना अधिक जवळचा वाटतो.
अशाच दीडशहाण्यांनी China's Threat Perception असे संबोधणार्‍या तत्कालीन संरक्षणमंत्री श्री जॉर्ज फर्नंडीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यूपी ए सरकारने सुरुवातीच्या दिवसात चिनी कंपन्यांनी भारतीय नागरिकांना सेवेमध्ये घ्यावे आणि चिनी नागरिकांना वर्क परमिटवर येथे आणू नये म्हणून नियम करताच याच सेक्यूलरांचे अध्वर्यू त्यांनी पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये चीनची रदबदली करत असा परवाना चिनी कंपन्यांना मिळावा म्हणून धडपडत होते हे वास्तव आहे.
पूर्वीच्या काळी कोणत्याही राक्षसाला हरवायचे तर मोठे कठिण काम असे. मग त्याचे पंचप्राण कशामध्ये आहेत ते शोधून तो पोपट म्हणा मांजर म्हणा ह्या प्राणापर्यंत पोहोचायचे आणि त्याला पराक्रमाची पराकाष्ठा करत मारायचे अशा गोष्टी आपण वाचत होतो. दुरान्वयाने का होई ना पण चीन या आर्थिक महासत्ता बनायच्या मार्गावर असलेल्या - आसुरी लश्करी ताकद असलेल्या आणि भारताची शकले उडवून त्याला आपल्या पंजामध्ये बंदिस्त करायला उत्सुक असलेल्या ज्याच्याशी आपली हजारो किमी सीमा जोडलेली आहे अशा शेजार्‍याचा मुकाबला करायचा तर त्याचे पंचप्राण कशामध्ये आहेत हे समजून घेतले तर काम सोपे होऊ शकते.
दोन राष्ट्रांमधील विवाद मिटवताना युद्ध टाळावे म्हणून साम दाम दंड भेद या मार्गाचा वापर राजाने करावा असे चाणक्याने लिहिले आहे. हे तत्व वा नियम आपल्या डोक्यामध्ये फिट्ट बसला आहे. म्हणून कोणत्याही राज्यकर्त्याने एखादा विवादाला सामोरे जाताना ह्या उपायांचा वापर केला नाही तर तो राज्यकर्ता कर्तव्याला चुकला - शिरजोर असल्यामुळे त्याच राजधर्मापासून स्खलन झाले आहे असाच समज सर्वसामान्य भारतीयाचा झालेला आहे. कोणत्याही मार्गाने ऐकलेच नाही आणि समोरची व्यक्ती अन्याय करतच राहिली तर मात्र युद्धाला पर्याय नसतो असे भगवद् गीताच सांगते. किंबहुना असे युद्ध हेच धर्मयुद्ध म्हटले गेले आहे.
सुईच्या अग्रावर राहील एवढीही जमीन दुर्योधनाने नाकारली तेव्हा महाभारत घडले. ते नाकारणारा दुर्योधन अन्यायी आणि त्याचा सामना करणारे पांडव नीतीमान ठरले. तेव्हा शस्त्र उगारणे हा अंतीम पर्याय असतो - असावा ही आपली केवळ नीतीमत्ता वा धर्म नाही तर रोजच्या जगण्यातली श्रद्धा आहे. कोणत्याही प्रश्नाकडे बघताना आपण आपल्याच श्रद्धेमधून बघत असतो आणि आपला प्रतिसाद आणि त्याच्या परिसीमा ही श्रद्धाच आखून देते. भारतीय लोक इथेच तोकडे पडतात.
चीन या विषयाचे तज्ञ, भारताचे तेथील एकेकाळचे राजदूत आणि नंतरच्या काळामध्ये भारताचे परराष्ट्रसचीव व पुढे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केलेले श्री श्याम सरण म्हणतात - भारत आणि चीन यांच्यामध्ये गैरसमजाचे वातावरण आहे. त्याचे बव्हंशी कारण हेच की आपण चिन्यांची विचारप्रक्रिया समजून घेतलेली नाही. चिनी कसे विचार करतात - आपल्या खेळीला ते प्रतिसाद कसे देतात ह्याचे ज्ञान असल्याशिवाय आणि ते अंमलात आणल्याशिवाय ह्या कामी आपल्याला यश मिळू शकत नाही.... जेव्हा स्वतःच्या हिताची बाब असते तेव्हा चिन्यांचा हा आग्रह असतो की त्या हिताशी संबंधित बाबींचे तंतोतंत वर्णन उपलब्ध असावे. पण इतरांच्या हिताच्या बाबतीमध्ये ते जाणीवपूर्वक संदिग्धता ठेवतात आणि विषय न संपवता लोंबकळत ठेवतात."
उदाहरणार्थ तिबेट हा चीनचा अविभाज्य भाग आहे हे भारताने निर्विवादपणे मान्य करावे आणि तशी जाहीर भूमिका घ्यावी असा चीनचा आग्रह असतो. पण जम्मू काश्मिरच्या बाबतीत तो भारताच्या सार्वभौमत्वाविषयी मात्र तशी भूमिका घेण्य़ाचे टाळतो. श्री श्याम सरण पुढे म्हणतात की, "बळाचा वापर हे अखेरचे शस्त्र आहे असे भारतीय मानतात. पण राष्ट्रहितासाठी बळाचा वापर करणे हे शस्त्र न टाळता येणार्‍या डावपेचाचा अविभाज्य भाग आहेत असे चिनी मानतात. युद्ध टाळण्यामध्ये त्यांना अजिबात पुरुषार्थ वाटत नाही". किंबहुना तसे करणे म्हणजे त्यांना नेभळटपणा वाटत असावा.
म्हणून भारताविरुद्ध युद्ध छेडणे आणि त्याच्यामागे आपल्या नागरिकांची शक्ती उभी करणे चिनी राज्यकर्त्याला कसे सोपे आहे हे लक्षात येईल. पण पराकोटीचा अन्याय झाल्यानंतरही आपल्या राज्यकर्त्याने साम दाम दंड भेद नीतीनेच चालावे असा आग्रह करणार्‍या समाजाला युद्धासाठी तयार करण्याचे काम भारतीय पंतप्रधानासाठी किती अवघड आहे हेही आपल्याला कळेल. आणि चीनविरोधात आपण कोणतेही पाऊल उचलणे म्हणजे कसा मूर्खपणा आहे हे समजावणारे सेक्यूलर ह्याच मानसिकतेचा वापर करून आपला बुद्धिभेद करताना दिसतात. रासवट मोंगलांचा पराभव करण्याचा भीष्म पराक्रम करणार्‍या शिवाजीच्या हयातीतच ’ठकासि असावे ठक’ सांगणारा आणि जनतेची मनोभूमिका त्या लढ्यासाठी तयार करणारा रामदासही जन्माला आला होता हा आपला इतिहास आहे.
ह्यानंतर आपण आज बुद्धिबळाचा पट कसा आहे हे समजवून घेऊ शकतो.
स्वाती तोरसेकर
सोबत: शान्शी प्रांतामधील चीनचा पहिला सम्राट किन शी हुआंग ह्याच्या समाधीस्थानी उत्खननामध्ये मिळालेल्या २००० सैनिकांच्या मातीच्या पुतळ्याचे अवलोकन करताना श्री मोदी

No comments:

Post a Comment