Sunday, 19 February 2017

काश्मीर घाटीत चीनचे झेंडे




१६ ऑक्टोबर 2016 रोजी पुतिन आणि मोदी यांनी कोणत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपले काम सुरु केले आणि त्यामध्ये काय पावले उचलली यातील साम्याविषयी तुलना करेन म्हटले होते. पण या विषयाला हात घालण्यापूर्वीच काश्मिरातून महत्वाच्या बातम्या हाती आल्या आहेत. गोवा येथे ब्रिक्स संमेलनाच्या निमित्ताने चीन रशिया आणि भारत यांचे सर्वोच्च नेतृत्व आपापले डावपेच खेळत असतानाच १४ ऑक्टोबर रोजी शुक्रवारच्या नमाझानंतर जमाते इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या झेंड्याला शिवलेले चिनी झेंडे फडकावले. ही घटना सर्वांनाच चकित करून गेली. यानंतर बारामुल्ला जिल्ह्यामध्ये पोलिसांनी त्वरेने हालचाली करत काझी हमाम, गनई हमाम, तौहिद गुंज जामिया आणि अन्य ठिकाणांवर घातलेल्या छाप्यांमध्ये स्फोटक सामग्री, पेट्रोल बॉंम्ब, पाकिस्तानी आणि चिनी झेंडे, लष्कर ए तोयबा आणि जैश ए महंमद यांची लेटर हेड - अनधिकृत मोबाईल वगैरे गोष्टी लपवून ठेवलेले मिळाले. पोलिसांनी केवळ बारा तासामध्ये ७०० हून अधिक घरांची झडती घेऊन ४४ जणांना ताब्यात घेतले. अशा तर्हेने काश्मिरच्या रंगभूमीवरती चीनच्या झेंड्यांनी हजेरी दाखवल्यामुळे हा प्रश्न कसा आणखी जटील बनला आहे हे सत्य पुढे आले. काश्मिरच्या जमिनीवर इतकी नाट्यपूर्ण घटना घडूनही भारतीय प्रमुख माध्यमांनी त्याची पुरेशी दखल घेतली नाही की त्यावर व्यापक चर्चा झाल्याचे दिसून आले नाही.


ईशान्य भारतीय राज्यांमध्ये फुटीरतावादी चळवळी चीनच्या पुढाकाराने फोफावल्या असल्याचे इथल्या लहानग्या पोरालाही माहिती आहे. ह्या चळवळींचे नेते नियमितपणे प्रशिक्षणासाठी चीनच्या हद्दीमध्ये जा ये करतात - शस्त्रास्त्रे खरेदीचे व्यवहार करतात - लहान लहान गटांना चीन मदत करत नाही पण सदस्य संख्या लक्षणीय झाली की पैशाचा ओघही सुरु होतोच. ह्या उचापती करून चीनने गेली काही दशके भारताच्या मागे ह्या कटकटी लावून देऊन सुरक्षा दलांपुढे मोठेच आव्हान उभे केले होते तसेच ईशान्य प्रदेशाचा विकास होऊच द्यायचा नाही अशा पद्धतीने लोक आंदोलने उभारण्यात आली होती. वेगाने विकास करू इच्छिणाऱ्या भारताच्या मार्गामध्ये असे अडथळे उभे करून त्याचे खच्चीकरण करण्याचे डावपेच चीन करत आला आहे. ईशान्येकडील फुटीरतावादी चळवळींसोबतच देशाच्या अन्य राज्यांमध्ये नक्षलवादी चळवळींनाही चीनने सतत पाठिंबा दिला आहे. ह्या नक्षलींच्या प्रशिक्षणासाठी ईशान्येचे फुटीर गट कार्यरत होते हेही दिसून आले होते.


असे असले तरीसुद्धा काश्मिर घाटीमध्ये मात्र चीनचे अस्तित्व वरकरणी का होई ना आढळले नव्हते. चहूबाजूंनी कोंडी झालेले काश्मिरी गट आता आपल्या लढ्यासाठी चीनवर अवलंबून राहण्यासाठी तयार असल्याचे दृश्य काय दाखवते?आजवरच्या तथाकथित काश्मीर मुक्ती लढ्याचे स्वरूप कसे होते? हल्लेखोरांना पाकिस्तानने पाठीशी घालायचे - इथल्या पुरोगाम्यांनी त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून सरकारला धारेवर धरायचे - न्यायालयाने शिक्षा दिली तरी फाशी होणार नाही यासाठी राळ उठवायची - एवढ्याच मर्यादेमध्ये ही आंदोलने चालवली जात होती.  खरे तर आपल्या अंगात काश्मीर मुक्त करण्याचे सामर्थ्य नाही हे पाकिस्तानने वारंवार दाखवून दिले आहे. भारताविरुद्ध थेट लष्करी कारवाई करण्याची कुवत नाही - पूर्वापार पद्धतीचे युद्ध लढत येत नाही - अणुयुद्धाची भीती तर दाखवायची पण स्ट्रॅटेजिक सोडाच टॅक्टिकल अण्वस्त्र वापरण्याचीही कुवत नाही अशी पाकिस्तानची परिस्थिती आहे. मग मार्ग एवढाच उरतो कि काही तरी फुसकट हल्ले घडवून आणायचे - आणि त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर अवाच्या सवा प्रसिद्धी मिळाली की आपण भारताची कशी कोंडी केली म्हणून शेखी मिरवायची ही होती पाकिस्तानची काश्मीर विषयक मोडस ऑपरेंडी. युपी ए च्या काळात पाक धार्जिणे सरकार केंद्रात असल्यामुळे ह्या शक्तींनी काश्मिरात धुडगूस घातला होता आणि भारत सिया चेन तसेच काश्मीर वरील ताबा सोडायला तयार असल्याचे दृश्य जागतिक पातळीवर तयार झाले होते. आता मोदी सरकार आल्यानंतर अनेकदा रंगपटावर रानगावलेले हे नाटक काही रंगात नाही हे पाकच्या लक्षात आले आहे. भारत सरकार पाकिस्तानला धूप घालत नाही ही सामान्य अवस्था काश्मिरी जनतेच्या मनात रुजत आहे. 


ऑक्टोबर 2016 मध्ये पुन्हा एकदा काश्मीरमध्ये आपणच निर्णायक सत्ता आहोत हे दाखवायची गरज पाकिस्तानवर आली आहे. आपल्या धाकाने मोदी बाधत नाहीत तर चीनच्या नावाने तरी घाबरतात का ह्याची चाचपणी जणू करण्यासाठी नव्याने प्रयत्न केले गेले असावेत अशी शंका होती. काही स्थानिक नेत्यांच्या उत्साहामुळे प्रथमच चीनचे झेंडे दाखवले गेले अशा बातम्या सुरुवातील आल्या. त्या चुकीच्या असल्याचे लवकरच उघड झाले. 



व्यापक प्रमाणावर हे झेंडे लपवून ठेवल्याचे आढळले ते पाहता ही योजनापूर्वक करण्यात आलेली बाब आहे हे उघड होते. काश्मिर स्वतंत्र करायचा तर इथून पुढे पाकिस्तानचा पाठिंबा कुचकामी आहे - आपण त्यांच्या जीवावरती लढा चालवू शकत नाही याचीच जणू कबूली काश्मिरी गटांनी दिली नाही का? आपल्या संरक्षणार्थ चीनला साकडे घालायची पाळी यांच्यावरती मोदी सरकारच्या ठाम भूमिकेमुळे आली आहे हे मान्य करावे लागेल. पण तेवढ्यावर खूश रहावे अशी परिस्थिती अजिबात नाही. कारण कितीही झाले तरी पाकिस्तानची शक्ती भारताच्या कित्येक पटीने कमी आहे हे आपण जाणतो पण चीनचे तसे नाही. चीन बलाढ्य आहे - तो आपल्या समोर उभा राहिला आणि त्याने भारताच्या हातातून काश्मिर हिसकावून घ्यायचे ठरवले तर आपण पुरे पडू का ही भीती सामान्य नागरिक म्हणून आपल्याला वाटणे स्वाभाविक ठरेल. पण भीती बाळगून उपयोग नसतो. आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे मनामध्ये कोणतेही हेतू न ठेवता मूल्यमापन केले तरच उत्तरे समोर येउ शकतात. चिन्यांची लाल पावले काश्मीर घाटीत उमटली हि बाब चिंतनीय आहे. इथून पुढे चीन उघड उघड ह्या समस्येत नाक खुपसू शकतो ह्याची चुणूक आपल्याला मिळाली आहे. काश्मीर विषयक पावले उचलताना इथून पुढे हा घटक आपल्याला डोळ्याआड करता येणार नाही हे निश्चित. 

No comments:

Post a Comment