स्रोत: तरुण भारत, पुणे 20-Aug-2016
चीनच्या बलुचीस्तानातील ग्वदर बंदराला दिलेला जबरदस्त शह म्हणजे भारत व इराण यांच्यामधील सहकार्याच्या करारानुसार बांधण्यात येणारे ग्वदरजवळचेच चाह् बहार बंदर - भारत आणि अमेरिका यांच्यामधील वाढते लष्करी सहकार्य - सौदी अरेबिया इराण, अफगाणिस्तान या देशांना भारताने आपल्या जवळ ओढून घेणे या सर्व घटनांमुळे आपल्या सुरक्षेला निर्माण झालेला धोका लक्षात घेता बिथरलेला पाकिस्तान काय करेल - काय करू शकेल याचे अंदाज तज्ञमंडळी गेले दोन तीन महिने घेत आहेत.
माजी ब्रिगेडियर डॉ. सुभाष कपिला यांनी दि. ६ जून रोजी आपल्या लेखामध्ये म्हटले होते की, "In terms of implications for India of Pakistan being strategically and geopolitically cornered by India’s dynamic policy formulations under Prime Minister Modi, these are obvious. Pakistan is likely to resort to a heightened recourse of asymmetrical responses of increased proxy war in the Kashmir Valley, suicide bombers attacks on India’s military bases in repeat of the Pathankot Air Force Base attacks and sabotage attacks on vital installations all over India, and which may now extend to India’s nuclear installations and missile testing sites."
ब्रिगेडियर डॉ. कपिला यांचा लेख अर्थातच मोदींनी बलुचीस्तानला निःसंदिग्ध पाठिंबा जाहिर करण्यापूर्वी लिहिला गेला असल्यामुळे त्याला जास्त महत्व आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये पाकिस्तानने चीन बरोबर केवळ तोंडी आश्वासनांवर अवलंबून राहू नये तर त्या देशाशी लिखित संरक्षण करार असावेत असे मत पाकिस्तानमधील लष्करी तज्ञ गेले काही महिने मांडत आहेत. पाकिस्तानचे गेल्या दोन महिन्यातील वर्तन बघता कपिला यांनी काश्मिरमधील वाढत्या घातपाती कारवायांचा इशारा कसा चपखल होता ते दिसून येते. शिवाय भारताच्या लष्करी तसेच अणुकेंद्रांनाही घातपाती कारवायांचा धोका पोहोचू शकतो असा गंभीर इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या या लेखामध्ये ’प्रमाणाबाहेर तीव्रतेने’ (disproportionate response) पाकिस्तान कारवाई करण्याची शक्यता आजच्या घडीला वाढली आहे. याखेरीज अन्य तज्ञ तर आजच्या परिस्थितीमध्ये चीनच्या दबावाखाली पाकिस्तानला भारताशी एखादे छोटे युद्ध छेडण्याची पाळी येऊ शकते असे उघडच लिहित आहेत.
युद्ध हे शेवटी युद्धच असते. छोटे असले तरीही परिस्थिती कधी हाताबहेर जाईल याची शक्यता दोन्हीकडच्या प्रत्युत्तरावर अवलंबून असल्यामुळेच ही परिस्थिती कशी हाताळावी याचे अंदाज आज घडीला भारत सरकार - त्याचे परराष्ट्र खाते इतकेच नव्हे तर संरक्षण खाते आणि लष्कर हे सतत नव्याने लावत असतात. असे युद्ध छेडायला लावण्यामागे चीनचा हेतू भारताच्या आर्थिक घोडदौडीला अपशकुन करणे हाच आहे. इथे युद्धमय परिस्थिती निर्माण झाली तर परकीय गुंतवणूकदारांचा उत्साह कमी होईल असा चीनचा होरा दिसतो.
भारताच्या कित्येक पटीने पुढारलेली अर्थव्यवस्था असूनही चीन भारताचे आव्हान इतक्या गांभीर्याने का घेतो असा प्रश्न साहजिकच पडतो. जगाचे बॅक ऑफिस म्हणून भारताने आय टी क्षेत्राच्या बळावर नाव कमावले तेव्हाच चीनने जगाची बॅक डोअर फॅक्टरी म्हणून नाव कमावले होते. श्री मोदी यांच्या ’मेक इन इंडिया’ या अतिमहत्वाच्या पुढाकारामुळे भारत आपले हे स्थान हिरावून घेईल अशी भीती चीनला वाटते. केवळ भांडवलदारांचा विचार केला तर त्यांना लोकशाही रुजलेला भारत हा कम्युनिस्ट चीनपेक्षा अधिक जवळचा वाटणार हे स्पष्ट आहे. आज मेक इन इंडिया या पुढाकाराची गती धीमी वाटली तरी भविष्यामध्ये हे चीनसमोर एक मोठे आव्हान म्हणून उभे राहणार आहे.
पण, माझ्या मते आर्थिक आघाडीवरील भारताच्या या घोडदौडीला चीन इतकाही घाबरत नाही जितका तो भारताच्या जगावरील ’सांस्कृतिक’ ’आक्रमणाला’ घाबरतो. पैसा आज असतो, उद्या नसतो. संस्कृतीचे तसे नाही. एकदा स्वीकारली गेली की ती आपली पाळेमुळी घट्ट रोवून उभी राहते. योगविद्या - आयुर्वेद - आणि आश्चर्याने तुमच्या भिवया उंचावतील पण - कौटुंबिक सौहार्द व त्याचे महत्व प्रेक्षकांच्या मनावर ठसवणारे बॉलीवुड - हे तीन घटक आज भारताचे ’सॉफ्ट अम्बॅसेडर’ म्हणून काम करत आहेत. ही भारतीय संस्कृती स्वीकारण्यासाठी जगामधल्या कोणाही नागरिकाला तुझा धर्म सोड आणि हे अंगिकार असे सांगावे लागत नाही हा मौलिक फरक आहे. शिवाय हे सांस्कृतिक ’आक्रमण’ भारत सरकारच्या पुढाकाराने अथवा जाणीवपूर्वक बनवलेल्या योजनेनुसार म्हणून होते असे नाही तर त्याचे ब्रॅंड अम्बॅसेडर म्हणून वावरणार्या व्यक्ती स्वतंत्ररीत्या आपापल्या पुढाकाराने हे कार्य पुढे रेटत आहेत. म्हणूनच हे सांस्कृतिक आक्रमण सोपे ठरण्याची शक्यता व भीती चीनच्या लेखी वाढते. आजच्या घडीला दुबई आणि अगदी सौदी अरेबियामधले जनमान्य लोकही श्री श्री रविशंकरजी अथवा तत्सम कार्यक्रमामध्ये सामिल होतात आणि योगविद्या शिकतात किंवा बॉलीवुडची वाढती लोकप्रियता - अलोपॅथिक औषध प्रणालीपेक्षा हर्बल औषधे वापरण्याकडे कल आणि ह्या क्षेत्रामध्ये शास्त्रशुद्ध विचार करणारा स्थान आयुर्वेद - ह्या सर्वांचा धक्का म्हणूनच आपल्याला बसता नये. मानवी आयुष्याच्या सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या ह्या तीन बाबी आहेत. त्यांच्या आडून इथली संस्कृती जगातील प्रत्येक घराचे दार आज ठोठावत आहे. ही भारताची जी Soft Power आहे तिला चीन घाबरतो. कारण भारताएवढीच प्राचीन असूनही असे सर्वसमावेशक तत्वज्ञान ठरू शकेल असा सांस्कृतिक वारसा चीनकडे नाही ही त्याची पोटदुखी आहे.
ह्या परिस्थितीमध्ये मोदी सरकारने घेतलेल्या पुढाकाराला जोड होईल अशा प्रकारचे कार्यक्रम ’जागतिक पातळीवर’ हाती घेऊन भारताच्या सांस्कृतिक प्रसाराला हातभार लावणे ही इतिहासाने संघ परिवारावर टाकलेली जबाबदारी ठरेल आणि लक्ष या प्रचंड कामाकडे लावणे ही आज काळाची गरज ठरणार आहे. या कसोटीला आपण कसे उतरतो यावर उज्ज्वल भारताचे भविष्य घडवण्याचे कार्य पार पडू शकेल.
"या गनिमाला नाही कळला अजून हिंदुस्तान - दिसला त्याला तपी बैसला दुरून गिरी हिमवान" ही कवीची उक्ती सार्थ ठरवण्याचे काम केवळ मोदी सरकार त्याचे मंत्रीमंडळ वा लष्कराला करायचे नसून सामान्य नागरिकाने त्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलायचा आहे - पाकिस्तानची नांगी मोडावी म्हणून इच्छा करणे वेगळे आणि तशी परिस्थिती आलीच तर आपल्याला भले खरचटले तरी चालेल अशा मानसिक तयारीला लागणे वेगळे - नाही का? बलुचीस्तान मुक्तीचा लढा छेडला गेला तर भारतामधल्या प्रत्येक गावाच्या रस्त्या रस्त्यात आणि छप्प्या छप्प्यावर नागरी युद्ध लढण्याची तयारी पाकने पूर्ण केलेली आहे. हा धोका तुमच्या माझ्या गल्लीच्या तोंडापर्यंत येऊन पोहोचला आहे. तेव्हा सावधान. पाकला ललकारले म्हणून आनंद व्यक्त करतानाच नागरी युद्धाच्या पाडावाचीही तयारी करा.
http://www.mumbaitarunbharat.in/Encyc/2016/8/20/modinche-parrashtra-dhorna-part-3-
No comments:
Post a Comment