मारियो पुझो यांची गॉड फादर ह्या प्रसिद्ध कादंबरीमध्ये कॉर्लिऑन घराण्याची धंद्यामध्ये मदत मागण्यासाठी तत्तालिया (Tattaglia) घराणे येते. डॉन कॉर्लिऑनने आयुष्यभर मेहनतीने जतन केलेले राजकीय हितसंबंध तत्तालिया घराण्याला हवे असतात. त्यांना ड्रगचा चोरटा व्यवसाय उभारायचा असतो आणि हे काम राजकीय contacts शिवाय अशक्य असल्याचे ते मानत होते. केवळ कॉर्लिऑन घराण्याकडे असे कॉन्टॅक्टस् असल्यामुळे त्यांनी ते द्यावेत आणि आपण त्यांना धंद्यामधला हिस्सा देऊ असा सौदा घेऊन हे घराणे बैठकीला आले होते. डॉनला प्रस्ताव मान्य नव्हता - त्याला ड्रगमध्ये पडायचे नव्हते. पण बैठकीला बसलेल्या कॉर्लिऑन घराण्याच्या सरदारांबरोबर डॉनचा मुलगा सॉनी देखील होता. अनवधानाने त्याने विचारले - हिस्सा किती मिळेल - सारवासारव करत डॉनने प्रस्ताव फेटाळला आणि बैठक संपली. माघारी गेलेल्या तत्तालिया घराण्याला नकार पचला नाही. विरोध डॉनचा आहे - सॉनीचा नाही. ही गोष्ट सॉनीच्या एका प्रश्नातून त्यांनी टिपली होती. डॉनला ठार मारले तर घराण्याची सूत्रे सॉनीकडे जातील आणि आपला मार्ग सुकर होईल हे लक्षात घेऊन डॉनवर हल्ला करण्याचे ठरते आणि तसे घडते सुद्धा.
हा प्रसंग अशासाठी आठवला की काल मी सेनककू बेटांविषयी लिहिले. चीन कशा प्रकारचे Mind Games खेळतो हे दाखवणारा हा प्रसंग आहे. सेनककू बेटावरती हा आमचा प्रदेश आहे असा दावा चीनने केला तेव्हा त्याला लढाई छेडायची होती असेही नसेल पण त्याने कांगावा असा केला - चित्र असे उभे केले की आता लढाई अटळ आहे अशी प्रतिपक्षाची खात्री व्हावी. भविष्यामध्ये लढाईचा प्रसंग आलाच तर जपान लढाईमध्ये उतरेल की बोलणी करून प्रदेश आपल्या स्वाधीन करेल? अमेरिका त्याचा मदतीला उतरेल का? तशी जाहिर भूमिका घेईल का? घेतलीच तर स्वखुशीने की जपानच्या दबावाखाली? ह्या प्रश्नांची उत्तरे त्याला नक्कीच मिळाली आहेत. परिस्थिती कडेलोटाला न्यायची आणि तुमच्या सहनशीलतेची खरीच मर्यादा काय आहे - Thus far and no further - ह्याचे नेमके ज्ञान असणे कोणाही सेनापतीसाठी आवश्यक असते.
हा झाला Mind Games चा एक प्रकार. दुसरा प्रकार बघायला मिळाला तो भारताच्या बाबतीत. १९६२ साली चीनने युद्धात पादाक्रांत केलेला अक्साई चीनचा प्रदेश स्वतःकडे ठेवला पण अरुणाचलमधून एकतर्फी युद्धबंदीची घोषणा करून सैन्य मागे घेतले. भारत चीन यांच्यामध्ये मॅकमोहन रेषेवरून वाद आहेत. ही रेषा चीनला मान्य नाही. मॅकमोहन यांनी १९१४ साली ही रेषा ठरवली तेव्हा लॅंड सर्व्हे साठी जुजबी उपकरणे उपलब्ध होती. आज त्यापेक्षा कितीतरी अचूक सर्व्हे करता येतात. शिवाय कागदावरती कितीही पातळ रेषा काढली तरी जमिनीवर ते अंतर काही मीटर्सचे असते - १९१४ साली तर नक्कीच होते. ह्या मर्यादा लक्षात घेऊन रेषेमध्ये दुरुस्ती करण्यास भारताने वेळोवेळी सहमती दर्शवली आहे. (ह्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला कॅबिनेट सेक्रेटरी श्री बी.जी.देशमुख यांच्या अरुणाचलवरील पुस्तकात मिळते) पण चीनची खाखा त्याला गप्प बसू देत नाही. एके काळी सीमाप्रश्न वाद असे स्वरूप ह्या समस्येचे होते. पुढच्या काळात चीन अरुणाचलवरही आपला दावा सांगू लागला. १८६० मध्ये तिबेटी लामा ग्याम्त्सो याने तवांग येथे मठ बांधला. तिबेटी बौद्धांसाठी तवांगचा मठ म्हणजे जणू रामेश्वरची यात्रा करण्यासारखे पवित्र स्थान आहे. ह्या एका दुव्यावरती चीन म्हणतो अरुणाचल म्हणजे दक्षिण तिबेट असून तो सांस्कृतिक आणि धार्मिक रीत्या तिबेटशी जवळीक राखतो म्हणून हा तिबेटचा म्हणजे आमचा भाग आहे. अशा तऱ्हेने सीमावादाचे रूपांतर प्रादेशिक वादामध्ये करण्यात आले.
कमरेखाली वार करण्याची असभ्यता दाखवण्यात चीन कमी पडत नाही. नुकत्याच चीनमध्ये झालेल्या G-20 बैठकीच्या वेळी ओबामा आले असता चीनने त्यांच्यासाठी लाल गालिचे अंथरले नाहीत की विमानाला ब्रिजही जोडला नाही. मोदींनाही अशीच दुजाभावाची वागणूक मिळाली. त्याची परतफेड भारताने गोव्यामध्ये केली. चीनी पंतप्रधानाच्या आगमनाचे वृत्त भारतीय टीव्हीवर २४ तास दिसलेच नाही. आणि उतरले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी तिबेटी निदर्शक चीन मुर्दाबादचे नारे सुमंगल संगीत म्हणून ऐकवत होते.
बोलणी करण्यासाठी अधिकारी वर्ग बसतो - तो अगोदर ठरवलेल्या अजेंडानुसार तयारी करून आलेला असतो. प्रत्येक मुद्द्यावर भारताची काय भूमिका आहे हे मंत्र्याशी चर्चा करून ठरवले गेले असते. अशा प्रकारे चर्चेमध्ये जेव्हा अचानक नवीन मागण्या केल्या जातात - बेसावध अधिकारी नकळत काही बोलण्याची शक्यता असते. पूर्व तयारी नसताना नवे मुद्दे आले तर त्यावर चर्चा हो ऊ शकत नाहीच पण कुशल अधिकारी वर्ग सुद्धा Off Balance हो ऊन जातो. बोलण्यांमध्ये सतत अस्थिरता ठेवायची - चर्चा अमुक मुद्द्यावर स्थिरावते आहे वाटले की अख्खा पटच उधळून लावून नवा गेम सुरु करायचा ह्या गोष्टी वारंवार घडतात. सध्या चीन हा हेका धरून बसले आहे की अक्साई चीन परत देतो त्याच्या बदल्यात अरुणाचल आमचा आहे हे मान्य करा. थोडक्यात चीनला चर्चांमध्ये काहीही स्वारस्य नाही. त्याला प्रश्न लोंबकळत ठेवण्यामध्ये रस आहे. कारण तसे केले तरच भारताच्या बोकांडी अशांत उत्तर सीमा आणि चीनी आक्रमणाची टांगती तलवार कायम ठेवता येते. आमच्या कडे काही भोळी माणसे आहेत ज्यांना वाटते की हे प्रश्न वाटाघाटी करून संपवता येतील आणि मोदींना त्यात अपयश येत आहे. पण तोडगा काढण्याच्या मनोवस्थेमध्ये दोन्ही पक्ष असतील तेव्हाच असा तोडगा निघू शकतो एक आणि दुसरे म्हणजे आपल्या स्वाभिमानाला नख लावून कोणताही भारतीय पंतप्रधान असले समझोते चीनबरोबर करू शकणार नाही.
बांग्लदेशबरोबर हल्लीच मोदी सरकारने केवळ वाटाघाटीमधून सीमा प्रश्न प्रदेशाची देवाण घेवाण करून कायमचा सोडवला आहे त्याचे श्रेय दोन्ही बाजूंकडे जाते. तसेच असे प्रश्न शांततापूर्वक मार्गाने वाटाघाटीतून देवाणघेवाणीमधून सोडवण्याची सरकरची तयारी आणि मानसिकता आहे पण हीच बाब जर चीनविषयात परिणामकारक ठरत नसेल तर दोष अर्थातच चीनकडे जातो.
असो. हा भाग Mind Games म्हणजे काय आणि चीन ते केवळ भारताच्या बाबतीत नव्हे तर इतरही देशांसाठी कसे वापरतो हे समजावण्यासाठी खास लिहिला आहे.
No comments:
Post a Comment