Sunday 19 February 2017

तिबेट १०




चर्रर्र हाओ ती आन यांच्या भाषणाने आपल्या अंगावर काटे येतात. चिनी सैन्यातील जबाबदार पदावरील एका व्यक्तीचे हे उद्गार आहेत. त्यांच्या भाषणाला श्रोत्यांमध्ये बसलेले वरिष्ठ अधिकारी होकारार्थी प्रतिसाद देतात, चीनचे ८०% युवक म्हणतात स्त्रिया - लहान मुले आणि युद्धकैदी याना मारून टाकण्यासाठी ते तयार आहेत. ही परिस्थिती भयावह आहे.
चर्रर्र यांच्या भाषणातील ह्रदयाला चरका लावणारे मुद्दे कोणते?
पहिला म्हणजे चिनी वंशाचा अभिमान नव्हे अहंकार. केवळ आम्हीच श्रेष्ठ अन्य कोणताही वंश आमच्या प्रसंगाला पुरणार नाही. आम्ही श्रेष्ठ आमची संस्कृती श्रेष्ठ आमचा इतिहास देदीप्यमान आमचे राष्ट्र अमर. गतकाळातील चुका सुधारल्या तर आम्ही पुनश्च जग पादाक्रांत करू शकतो ही आढ्यता. संपूर्ण जगावर राज्य जे आहे ते आम्हीच करू शकतो ह्या उद्दामपणावर श्रद्धा.
सर्व जगाने आमच्यावर अन्याय केला आहे - आमची लोकसंख्या जास्त आणि आमच्याकडे जमीन कमी - पाणी कमी - हवा प्रदूषित तेव्हा जगामध्ये जितकी जमीन आहे तिच्यावर आमचाच हक्क आहे. जगाने आपली जमीन आमच्या ताब्यात द्यावी तेही मुकाट्याने.
अमेरिकेचा शोध पीतवंशीयांनी लावला. गौरवर्णियांनी नव्हे. म्हणून अमेरिकेची जमीन आमची आहे. तिच्यावर फक्त आमचा हक्क आहे.
जे काही आमचे आहे त्यावर आमचे म्हणजे चिनी कम्युनिस्ट पार्टी चे राज्य असलेच पाहिजे. ह्यात दुसरा पर्याय असूच शकत नाही.
जे आमच्या मार्गात येतील त्यांना ठार मारून आमचे ध्येय साध्य करण्याचा आम्हाला हक्क आहे.
आमचे राज्य स्थापन करायचे तर केवळ युद्धातील संहारक हत्यारे वापरून नव्हे तर बायोलॉजिकल तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडवून आणणे अपरिहार्य आहे. त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान चीनने हस्तगत केले आहे.
ह्या सर्व विचारांच्यामागे व्यापक प्रमाणावर चिनी जनता उभी आहे असे दृश्य सीन डॉट कॉम च्या सर्वे मध्ये तरी दिसते. अशाच प्रकारे सर्वसाधारण जर्मन जनता हिटलरच्या मागे उभी होती. अगदी शेवट पर्यंत. बर्लिनची लढाई त्या शहराच्या रस्त्यारस्त्यात लढली गेली आणि दोस्तांच्या सैन्याच्या विरोधात लढणारे सामान्य जर्मन होते.
ह्या विचारात तुम्हाला हिटलरशाही नाही का दिसत? चीनची पावले हिटलरसारखीच पडत आहेत. असे म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते - काही तपशील वगळता. आज काहीसे असेच दृश्य आपल्यासमोर आहे. इथे केवळ हिटलरशाही आहे असे नाही. हिटलरला मोकाट रान देणारे चेंबरलेन जसे तेव्हा होते तसेच आजही आपल्यात चेंबरलेन आहेत आणि ते आधुनिक हिटलरला मोकाट रान देण्याच्या कामी मुंड्या हलवत आहेत.
एक फरक आहे. आणि तो मोठा आहे. आजच्या चीनमध्ये कोणी एक हिटलर उभा नाही. ते काम चीनची कम्युनिस्ट पार्टी च करत आहे. म्हणजे निदान पाच पन्नास हिटलर तिथे वावरत आहेत आणि त्यांच्या मागे त्यांची पार्टी ही साथ देत आहे. चिन्यांचे मुख्य लक्ष्य आहे अमेरिका. पहिली पायरी म्हणून त्यांना आशियामधले अमेरिकेचे वर्चस्व संपवायचे आहे. उखडून टाकायचे आहे.
मला कल्पना आहे की चीनचे हे वर्णन आमच्याकडच्या डाव्यांना - पुरोगाम्यांना अजिबात आवडणार नाही.
ज्यांना चेयरमन माओ हेच स्वतःचे अध्यक्ष वाटतात त्यांच्याकडून बाकी काय अपेक्षा ठेवणार? चीन म्हणजे जणू एक गोंडस बाळ आहे आणि अंगठा चोखत पाळण्यात पहुडले आहे. ते निष्पाप अर्भक काय कोणाचा नायनाट करणार अशा तारेत आमचे पुरोगामी बोलतात. धर्म ही अफूची गोळी आहे म्हणणारे आज लाल क्रांतीच्या अफूची गोळी चढवून बसले आहेत. चीनच्या आशीर्वादाने - त्यांच्या मदतीने भारतात लाल क्रांती होणार असल्याची ते स्वप्ने बघतात. आणि तसेच गोंडस चित्र सामान्य जनतेसमोर उभे करतात.
खरे तर चेयरमन माओ यांच्या निधनाला आता ४० वर्षे होऊन गेली आहेत. त्यांच्या पश्चात चीनमध्ये एक Revisionist सरकार आले आहे. ह्या सरकारचा लाल क्रांतीवर अजिबात विश्वास नाही. त्यांच्यामते लाल क्रांतीचा उपयोग जमीनदारी व्यवस्थेचा बीमोड करणे इतकाच मर्यादित होता. एकदा जमीनदारी व्यवस्था संपुष्टात आली की त्यानंतर हुकूमशाही मार्गाने राज्य करावे आणि आर्थिक विकासासाठी भांडवलशाही आणि साम्राज्यशाहीच्या मार्गाने जावे अशी विचारसरणी आजचा चिनी कम्युनिस्ट पक्ष मानतो. त्यामध्ये नाव केवळ कम्युनिस्ट राहिले आहे. बाकी वाटचाल भांडवलशाहीची आणि साम्राज्यशाहीचीच आहे. खरे तर भांडवलशाहीमध्ये लोकशाही अभिप्रेत असते पण चिन्यांनी नवा प्रयोग केला आहे म्हणावे लागेल. मर्यादित स्वातंत्र्यावर सामान्य जनतेने राबावे आणि त्यांच्यातल्या व्यवहार चतुरांनी इतरांवर राज्य करावे असा खाक्या आहे. मुख्य म्हणजे एक हान वंशीय चिनी सोडले तर बाकी लोक राज्य करायला नालायक आहेत आणि आपले गुलाम आहेत ह्या भावनेने वागणारे चिनी कम्युनिस्ट कसे असू शकतात आणि ते तसे असल्याचे MARKETINGआपले पुरोगामी कसे करतात ह्या गोष्टी बुचकळ्यात पाडणाऱ्या आहेत.
बाकी ह्या सगळ्या नुसत्या फुकाच्या बाता आहेत - शब्दांचे बुडबुडे - व्यवहारात असे कोणी वागत नाही असा काही वाचकांचा भ्रम आहे. तो दूर करण्यासाठी काही उदाहरणे देते.
२००७ साली अमेरिकेने चीनकडून आयात केलेल्या पाळीव प्राण्यांच्या अन्नामध्ये विषारी पदार्थांची भेसळ दिसून आली. गव्हाच्या पिठामध्ये मेलामाईन मिसळण्यात आले होते. ह्यातले काही पीठ जनावरांच्या अन्नासाठी आले होते. तर काही साठे मांजरे व कुत्रे यांचे अन्न म्हणून अमेरिकेत पोहोचले होते. हे अन्न खाल्ल्याने हजारो गुरे मरण पावली तर कित्येक आजारी पडली. ह्या घटनेमुळे हादरलेल्या सरकारने सुमारे १00 ब्रँड चा माल विकण्यावर बंदी घातली. पण बंदी घालून काय होणार? अमेरिकन सरकारचे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन FDA खाते म्हणते की चीनकडून अमेरिकेत रोज २५००० बोटी भरुन माल येतो. आम्ही त्यातला एक टक्का माल तपासणीसाठी घेतो. जरी दोन टक्के माल तपासणीसाठी घ्यायचे म्हटले तरी उर्वरित माल सुरक्षित असल्याची हमी आम्ही देऊ शकत नाही. अशी परिस्थिती तेव्हाच बघायला मिळते जेव्हा पुरवठादाराच्या गुणवत्तेवर आणि त्याहीपेक्षा उत्तम माल देण्याच्या त्याच्या हेतूवर शंका घ्यावी अशी पाळी येते. American FDA चे हे उत्तर हाच आपल्यासारख्यांच्या बोटचेपेपणाचा नमुना आहे. चीन अमेरिकेकडून गोमांस विकत घेतो. जेव्हा असे मांस प्रदूषित असल्याचे लक्षात आले तेव्हा चीनने अमेरिकेकडून गोमांस घेण्यावर बंदी घातली. मग अमेरिका चीनच्या आयातीवर बंदी का घालू शकत नाही? ह्याला इच्छाशक्ती एवढेच उत्तर देता येते.
ही काही एकुलती एक घटना नाही. या आधी पनामा मध्ये चीन विकत असलेल्या टूथपेस्ट मध्ये डाय इथिलिन ग्लायकॉल हे खतरनाक रसायन आढळून आले. डाय इथिलिन ग्लायकॉल हे रसायन गाड्यांच्या कूलंटमध्ये वापरले जाते! हीच टूथपेस्ट चीन डोमिनिक रिपब्लिक मध्ये आणि ऑस्ट्रेलिया मध्ये सुद्धा विकत असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. तर खुद्द अमेरिकेमध्ये चीनने लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या लाळेऱ्यावरती शिशाचे थर चढवल्याचे दिसून आले होते. Lead विषारी असते हे तर सर्वसामान्य माणसालाही कळते मग अशा पदार्थाचा थर बाळाच्या लाळेऱ्यावर येऊच कसा शकतो? लहान मुलांसाठी बनवण्यात आलेल्या काही खेळण्यांवरही अशाच विचित्र गोष्टी मिळाल्या आहेत.
हे घाबरवणारे वास्तव आपण नजरे आड करू शकतो का? भारतामध्येही चीन आपला माल आणून ओतत असतो. देशप्रेमापोटी तो विकत न घेण्याची आवाहने केली की त्याची पुरोगाम्यांकडून खिल्ली उडवली जाते. पण चीनकडून येणाऱ्या तांदुळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ असल्याच्या बातम्या आपण इथेही वाचल्या नाहीत का? इथलेच TV चॅनेलवर प्लास्टिक चा कोबी कसा बनवला जातो आणि इथे विकला जातो त्याच्या विषयी आपण माहिती बघत नाही का?
मग ह्यामागे नेमका काय हेतू आहे अशी शंका आपल्या मनात का येत नाही? शस्त्र देखील न उचलता मोठ्या प्रमाणावर (शत्रूच्या प्रदेशातील) जनतेचा संहार करण्याच्या धमक्या चर्रर्र हाओ ती आन यांनी दिल्या नाही का? मग ह्या आणि अशा घटना ह्याच धमकीचा भाग कशावरून नाहीत?
अत्यंत खतरनाक आणि भेदक डावपेच आखणाऱ्या चीनशी आपली गाठ आहे हे सत्य विसरणे शक्य नाही. भारतीय संस्कृती इतिहास राष्ट्र जीवन पद्धती आणि स्वातंत्र्य याना सर्वात मोठा धोका चीनकडूनच आहे. पर्याय दोनच आहेत. एक तर त्यांच्या डावपेचांना बळी पडायचे आणि जीव गमावण्यास तयार व्हायचे किंवा त्यांचा गुलाम म्हणून जगण्याची तयारी ठेवायची. आपला पर्याय काय आहे हे स्पष्ट आहे आणि तो पुरोगाम्यांना आवडणारा नाही हेही स्पष्ट आहे.

No comments:

Post a Comment