सोव्हिएत रशियाची शकले उडाल्यानंतर शीतयुद्ध थांबले म्हणून अमेरिकन्स गाजरे खात होते तोवर चीनने त्यांना दुसऱ्या शीतयुद्धामध्ये ढकलले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरी जेते म्हणून अमेरिका आ्णि रशिया हे देश जगाच्या पाठीवरती मान्यता पावले होते. दोघेही तुल्यबळ मानले जात होते आणि दोघेही स्वतःच्या प्रभावक्षेत्रामध्ये धृव म्हणून मानले गेले होते. दोन धृवांमध्ये जग विभागले जाणे ही एक क्रमप्राप्त घटना म्हणून त्याकडे सगळेच पाहत होते. दुसऱ्या शीत युद्धाची कथा अशी नाही. चीन कधीच अमेरिकेचा तुल्यबळ देश म्हणून मानला गेलेला नाही. शिवाय पहिल्या शीत युद्धाला जी राजकीय तत्वज्ञानाची बैठक होती - चौकट होती तीही या दुसऱ्या युद्धामध्ये दिसत नाही. रशिया आणि अमेरिका परस्परांचे प्रभावक्षेत्र काय ते जाणत होते आणि त्यात ढवळाढवळ करत नव्हते. एक मध्यपूर्वेचा भाग सोडला तर दोन्ही महासत्ता बदलत्या नियमांचे गेम्स खेळत नव्हत्या. दोन्ही आण्विक महासत्ता असूनही जगाला धडकी भरत नव्हती. एकमेकांचा मान राखत कुरघोडी करण्यापर्यंत शीतयुद्धाच्या मर्यादा होत्या. दुसऱ्या शीत युद्धामध्ये अमेरिकेची सद्दी संपवण्याचा - तिची सत्त उखडून टकण्याच्या जिद्दीने चीन त्यामध्ये उतरला आहे. ज्या प्रदेशांमध्ये अमेरिकेने गेली ४-५ दशके वर्चस्व गाजवले त्या पायालाच घातला गेला तर साहजिकच हे शीत युद्ध अधिकाधिक तीव्र होणार यात शंका नाही. खास करून तैवान आणि चीनच्या दक्षिणेकडील समुद्राच्या वादामध्ये अमेरिकेला ओढून घेण्याचे प्रयत्न चीन सोडणार नाही कारण तीच आपण महासत्ता आहोत दाखवायची त्याल मिळालेली संधी आहे. (मध्यपूर्वेतून अमेरिकेचे लक्ष चीनच्या दक्षिण समुद्राकडे वळले तर ते रशियाला हवेच आहे. हेतू वेगळे असूनही डावपेच एकच कसे असू शकतात त्याचे हे उदाहरण आहे. रशियाच्या भूमिकेविषयी स्वतंत्र लेखमाले मध्ये अधिक माहिती मिळेल). ह्या सामाईक डावपेचामुळे ह्या विभागामधला संघर्षाला वेगळी धार मिळणार आहे. त्याच बरोबर अमेरिका ह्या सगळ्या हालचाली कितपत गंभीरपणे घेते ह्यावरही बरीचशी उत्तरे अवलंबून असतील.
सेनककू बेटाबद्दल भूमिका जाहिर करताना अमेरिकेने आढेवेढे घेतले हे मी लिहिले. पण त्याचाच दुसरा अर्थ असा होतो की २१व्या शतकामध्ये आशियामधले आपले वर्चस्व टिकवण्यासाठी आपल्याला चीनशी सामना करावा लागणार आहे हे सत्य उमगले तरी तोंडाने कबूल करायला अमेरिका तयार नाही. कदाचित १९५० चे कोरियन युद्ध ते विसरले असावेत. जपानवर अणु बॉंम्ब टाकणारी सत्ता म्हणून अमेरिकेची दहशत होती त्या काळामध्ये. पण त्याही काळात ह्याच प्रदेशामध्ये आजच्या पेक्षा कितीतरी कमी लष्करी क्षमता असूनही चीनने अमेरिकेला ललकारले होते - कडेलोटापर्यंत. वेळ अशी आली होती की येलू नदी चीनने पार करू नये म्हणून अमेरिकेने पुन्हा एकदा अणु बॉम्ब टाकायचा निर्णयही घेतला होता. असा चीन आज असा संघर्ष निर्माण करू शकला आणि त्याला आव्हान मिळाले नाही तर जगातील प्रत्येक देशाच्या गृहीतकांमध्ये तो सुपर पॉवर झाल्याचा आभास सत्य म्हणून बिंबले जाईल. सत्तेमध्ये तशी पोकळी निर्माण होऊ न देणे अमेरिकेच्या हातामध्ये आहे. युरोपामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर नेटो आणि वॉर्सा करार यांनी जोडलेले देश होते. एकमेकावर परचक्र आले तर युद्धात उतरण्याची हमी घेतली गेली होती. आज आशियाच्या देशांना बांधून घेणारी संरक्षण विषयक सामाईक करार नाहीत. परस्पर एकेक देश काय करार करतील तेच. म्हणजेच चीनचे आक्रमण परतून लावायचे तर अमेरिकेला आशियामध्ये दोस्तांची गरज आहे. प्रभावी ठरू शकतील अशी जपान - ऑस्ट्रेलिया - भारत ही तीन राष्ट्रे आहेत. व्हिएतनाम - दक्षिण कोरिया - लाओस - मंगोलिया - कंबोडिया - थायलंड आदि राष्ट्र बरोबर येण्यास उत्सुक आहेत. फिलिप्पाईन्स मात्र तळ्यात मळ्यात करतो आहे. जपान आणि ऑस्ट्रेलियाचे भौगोलिक स्थान पाहता त्या दोघांपेक्षाही ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी भारत हाच अधिक उपयुक्त आणि भरवशाचा दोस्त असू शकतो. चीनला आवर घालण्याच्या धोरणाने नव्हे तर अरे ला का रे असे दुप्पट जोरात म्हणण्याची क्षमता निर्माण करण्यामधून पायबंद बसू शकतो.
चीन हाच भारतासाठी सर्वात गंभीर धोका आहे हे सत्य मोदी सरकरने स्वीकारले (जे आधीचे मनमोहन सरकार स्वीकारण्याची टाळाटाळ करत बसले) इथून परिस्थितीला वळण मिळाले आहे. ओबामा यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सरकारने देखील सत्य स्वीकारत मुरडे घेत का होईना पवित्रा बदलला. एका आठवड्यात अमेरिकेच्या अध्य़क्षपदी डोनाल्ड ट्रम्प असतील की हिलरी क्लिंटन हे समोर ये ईल. ट्रम्प आले तर भारताचे काम सुकर होण्यास मदत होईल. हिलरी आल्या तर त्यांचे लक्ष रशियाला नमवण्याकडे म्हणजेच मध्य पूर्वेकडे आणि युरोपात लागेल - पर्यायाने आशियाकडे नसेल व चीनला मोकाट रान मिळण्याची शक्यता बळावेल. नोंद घ्यायची ती ही की जर भारत हाच अमेरिकेसाठी चीन विरोधाचा प्रमुख अक्ष बनणार असेल तर रणभूमी तिबेटच्या स्वातंत्र्याकडे वळू शकते. त्याविषयी पुन्हा कधी तरी.
No comments:
Post a Comment