सोबत फोटो कोबड गांधी आणि . विनायक सेन
War is deception - deception हे हत्यार आहे हे खरे आहे पण ते दोन्ही बाजूना वापरता येते. आज चीन हे हत्यार आपल्या विरुद्ध किती प्रभावीपणे वापरत आहे हे स्पष्ट दिसते आहे. १९७० च्या दशकामध्ये भारतामध्ये डाव्या विचारांचा समाजावर मोठा प्रभाव होता. त्याच काळामध्ये भारत आणि सोविएत रशिया यांचा २५ वर्षांचा मैत्री करार झाला होता. त्याचे डिंडिम वर्तमान पत्रामधून वाजवले जात होते. सोविएत रशियाच्या विघटनानंतर सुमारे दहा वर्षांनंतर Vasili Mitrokhin यांनी लिहिलेल्या notes वर आधारित पुस्तकामध्ये सोविएत रशियाने अलिप्त देशांमध्ये आपले हेर कसे पेरले होते याचे सविस्तर वर्णन दिले आहे. त्यामध्ये भारतामधले कित्येक पत्रकार राजकारणी बुद्धीमंत यांची नोंद आहे. हे सर्व रशियाचे 'पेड एजंट' होते. आणि रशियाला जी भूमिका सोयीस्कर असेल तीच भूमिका वर्तमानपत्रे - बातम्या - लेख - पुस्तके - नाटके - सिनेमा - लोककला यांच्या माध्यमामधून लोकांच्या मनावर ठसवत होते. हे सगळे इतके बेमालूम चालले होते की अशी भूमिका जाहीर पणे मांडणाऱ्या व्यक्तींविषयी समाजाच्या मनामध्ये कोणताही संदेह नव्हता.
अर्थात ते दिवस होते आंदोलनांचे. सर्वहारा वर्ग आंदोलने करतो आणि जुलमी सरकारला आपले म्हणणे ऐकायला लावतो अशी जनतेची प्रामाणिक समजूत होती . त्या सर्वहारा वर्गविषयी मध्यमवर्गीय जनतेच्या मनात सहानुभूती रशिया प्रणित पत्रकार लेखक बुद्धीमंत आदींनी तयार केली होती. तेव्हा त्या वर्गविषयी सहानुभूतीचे लेख ओसंडून वाचायला मिळत. आंदोलने यशस्वी होताना जनता बघत होती. त्यातली काही आंदोलने म्हणजे नाटक होते तर काही खरी होती. आंदोलनाकर्तेही भाषा बोलत ती समाजवादाची आणि सत्तारूढ झालेल्या इंदिराजी सुद्धा भाषा बोलत त्याच समाजवादाची. तरीही ते एकमेकांचे राजकीय विरोधक होते. बाईंचा समाजवाद खोटा आहे असे डावे म्हणत. पण सर्वसामान्य जनतेला मात्र इंदिराजी सांगत तोच समाजवाद हवासा वाटत होता आणि राज्यकर्त्या म्हणून त्यांची विश्वासार्हता डाव्यांपेक्षा मोठी होती.
इंदिराजींच्या मृत्यूनंतर ह्या पोपटपंचीने एक नवे वळण घेतले. कारण केवळ सहा महिन्यातच भारतीय राजकारणाची दिशा बदलणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो खटल्यामध्ये दिला आणि देशामध्ये हिंदुत्ववादी राजकीय शक्तींच्या उदयाची वाट खुली झाली. इथून पुढे पोपटपंची करणाऱ्यांना आधीची वाट सोडून नवी वाट धरणे भाग पडले.
पुढे सोविएत रशियाच्या विघटनानंतर ही आंदोलने - आंदोलनाभोवतीचे वलय संपुष्टात आले. आंदोलनातला फोलपणा पुढे आला. पण त्या काळामध्ये डाव्या विचारांचा पगडा सुशिक्षितांवर बसला होता. त्याचेच प्रतिबिंब आजदेखील त्या पिढीतल्या नागरिकांमध्ये दिसते.
आज रशिया प्रणित पत्रकार - लेखक - कवी - कलाकार - बुद्धिवंत आदींची जागा यांनी घेतली आहे Left Liberals - पुरोगाम्यांनी. प्रसिद्धी माध्यमांमधून त्यांचीच हवा वाहताना दिसते. ८० च्या दशकापर्यंतचा रशियाप्रणित गणिते मांडण्याचा प्रघात आता थोडा बदलला आहे. नवी पोपटपंची करणाऱ्या गँग्स आता आपल्यासमोर दिसतात. यूपीए च्या राजवटीत त्यांचे पेव फुटले होते. सरकारने सर्वहारा समाजाच्या हिताची बात करावी आणि ह्या भाषणाबाजांनी एक ना दोन कारणे दाखवत विकासाचे प्रकल्प बंद पाडावेत असा उद्योग चालू होता. यूपीए च्या काळामध्येच नक्षलवादाने भीषण स्वरूप धारण केले. एकीकडे सशस्त्र नक्षलवादी सुरक्षायंत्रणेवर निर्घृण हल्ले चढवत होते तर दुसरीकडे केंद्र सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी नेमलेल्या National Advisory Committee चे सदस्य त्याच नक्षलवाद्यांच्या नेत्यांना फूस लावत होते आणि त्यांच्यातल्या गुन्हेगारांना पाठीशी घालत होते. नक्षलवाद्यांचे समर्थन करणारे बुद्धिवंत कोण आहेत हे आपल्याला चांगलेच माहिती आहे. त्याच्यावरती मी माझ्या पुस्तकामध्ये एक स्वतंत्र प्रकरण लिहिले होते. त्यामधला काही भाग इथे आवर्जून देत आहे.
"२००७ साली जेव्हा डॉ. बिनायक सेन यांना अटक झाली तेव्हादेखील अशाचप्रकारची निवेदने पहायला मिळाली. डॉ. बिनायक सेन यांच्याबाबतीत तर परिस्थिती या "उदारमतवाद्यांसाठी" "बिकट" होती. कारण गौतम नवलखा आणि जस्टीस सच्चर यांच्या पीयूसीएलचे बिनायक सेन हे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि छत्तीसगड राज्य शाखेचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम करत असत. जोनाथन मान पुरस्कार आणि ग्वांगजू पुरस्कार विभूषित पीयूसीएलचा हा वरिष्ठ पदाधिकारी माओवाद्यांचा कूरियर म्हणून काम करतो असा त्याच्यावर पोलिसांनी आरोप केला होता. त्याने ही भोंदू सेक्यूलर मंडळी गडबडून गेली होती. व्यवसायाने बालरोगतज्ञ असलेले सेन आपली पत्नी इलिना हिच्या सोबत छत्तीसगडमध्ये राहत. त्यांची पत्नी इलिना "रूपांतर" नामक एक एनजीओ संस्था चालवत होती. बिनायक सेन आणि इलिना या दोघांनीही छत्तीसगड मुक्ती मोर्चा या संस्थेतर्फे तेथे शाहीद हॉस्पिटल स्थापन करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. याखेरीज जन स्वास्थ्य सहयोग नामक संस्थेलाही ते मदत करत. माओवाद्यांच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगड मध्ये सलवा जुदूम नामक चळवळ चालवली जात होती त्याला बिनायक सेन कडवा विरोध करत होते.
आपल्या सामाजिक कार्याच्या बुरख्याआड सेन यांचे काय उद्योग चालू होते ते पाहणे नवलाचे ठरेल. इलिनाच्या रूपांतर संस्थेमध्ये काम करणारे शंकर सिंग आणि मालती हे माओवादी कार्यकर्ते होते. बिनायक सेन यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांची आता माहिती करून घेउ. २००५ साली बिनायक सेन यांच्या सांगण्यावरून दीपक चौबे याने रायपूरमधील डांगिया गावातील आपल्या सासर्यांचे घर नारायण सान्याल नामक व्यक्तीला भाडेपट्टीने दिले. हे नारायण सान्याल माओवाद्यांच्या पॉलिटब्यूरोचे सदस्य होते. त्या घरामध्ये त्यांच्यासोबत अमिता श्रीवास्तव ही माओवादी महिला देखील राहात असे. अमिताला शिक्षकाची नोकरी मिळवून देण्यास रूपांतर संस्थेने मदत केली होती. जानेवारी २००६ मध्ये दीपक त्यांच्याकडून भाडे घेण्यासाठी गेला तेव्हा सान्याल तेथे नव्हते. शेजार्यांनी सांगितले की त्यांना आंध्र प्रदेशचे पोलिसांनी पकडून नेले आहे. ५ जानेवारी रोजी आंध्र पोलिसांनी जाहीर केले की सान्याल उर्फ एन. प्रसाद उर्फ विजय यास खम्माम जिल्ह्यातील भद्राचलम एसटी स्टॅंड वर अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्याकडे ९एमएमचे पिस्तूल आणि सहा जीवंत काडतूसे मिळाली. पुढे मार्चमध्ये त्यांना सोडून देण्यात आले. लगेचच भद्राचलम पासून ७० कि.मी. अंतरावरील छत्तीसगड मधल्या दांतेवाडा जिल्ह्यातील कोंटा गावी त्यांना अटक करण्यात आली व त्यांच्यावर हुंगाराम मरकम याचा खून करण्याचा आरोप ठेवण्यात आला. ह्या खटल्यातील सरकारपक्षाचे सर्व साक्षीदार उलटले. नारायण सान्याल तुरुंगात असताना बिनायक सेन त्यांना भेटण्यासाठी तुरुंगामध्ये जात असत. आपल्या ३३ भेटींसाठी सेन यांनी पोलिसांची रीतसर परवानगी घेतली होती. त्यापैकी काही वेळा सेन यांनी आपण सान्याल यांचे नातेवाईक असल्याची नोंद तुरुंगाच्या रजिस्टरमध्ये केली आहे.
सान्याल यांच्या भेटीस जाण्याच्या बहाण्याने सेन प्रत्यक्षामध्ये माओवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांची पत्रे त्यांना देत तर सान्याल यांनी लिहिलेली पत्रे ते पियुष गुहा नामक कोलकतामधील एका व्यावसायिकाला देत. हा गुहा ती पत्रे माओवादी नेत्यांना देत असे पोलिसांना आढळून आले. अनिल कुमार नामक कापड व्यापार्याने कोर्टासमोर दिलेल्या साक्षीमध्ये असे सांगितले की "पियुषकडून पत्रे जप्त करण्यात आली तेव्हा मी उपस्थित होतो आणि ही पत्रे आपल्याला बिनायक सेन यांनी नारायण सान्याल यांच्याकडून घेउन दिली असे पियुषने पोलिसांना सांगितल्याचे आपण ऐकले". जप्त केलेली पत्रे सान्याल यांच्याच हस्ताक्षरातील होती अशी साक्ष ह्स्ताक्षरतज्ञाने कोर्टापुढे दिली. अनिलच्या जबानीवर बिनायक सेन आणि सान्याल यांच्यावरील आरोप सिद्ध करता आले. अशा तर्हेने सान्याल या पॉलिटब्यूरोच्या सदस्याला मदत केल्याच्या आरोपावरून व उठावाच्या आरोपावरून बिनायक सेन दोषी ठरले. रायपूर सेशन्स कोर्टाने सान्याल, सेन आणि पियुष या तिघांनाही दोषी ठरवले. पीयूसीएलचे जस्टीस सच्चर यांनी न्यायालयाचा हा निर्णय हास्यास्पद असल्याचे म्हटले. परंतु २०११ मध्ये श्री राम जेठमलानी यांच्या युक्तीवादानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. (याप्रसंगी युरोपियन युनियन मधून आठ जणांचे शिष्टमंडळ कोर्टामध्ये उपस्थित होते. शिवाय जगभरच्या २२ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी भारत सरकारला सेन यांना सोडून देण्याचे आवाहन केले होते. भारतविरोधी कारवाया करणारी पीयूसीएल आणि डॉ. बिनायक सेन हे जगभरच्या या मंडळींसाठी किती "महत्वाचे" होते हे दिसून येइल) पुढे २०१२ मध्ये सुप्रीम कोर्टाने ७८ वर्षांच्या सान्याल यांची जन्मठेपेची शिक्षा माफ करून त्यांना एक लाख रुपये जामीनावर सोडून दिले. ह्या कथा पाहिल्यानंतर ही मंडळी ही माओवाद्यांचे समर्थक आहेत की नागरी कामाच्या बुरख्याआड ते पक्षाचेच काम करतात असा संभ्रम मनात निर्माण होतो."
डॉ विनायक सेन त्यांच्यासारखीच अतिश्रीमंत घरात जन्मलेल्या - London School of Economics सारख्या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेत पदवी घेतलेल्या - माओवादाच्या मागे गेलेल्या कोबड गांधी यांची कहाणी आहे. हेही सद् गृहस्थ माओवाद्यांचे सक्रिय कार्य करत होते. डॉ. विनायक सेन असोत की कोबड गांधी - त्यांच्या कथा आमच्या मध्यमवर्गीयांना प्रेरित करत होत्या. आमच्या मध्यमवर्गाला उच्च शिक्षितांचे अवास्तव कौतुक आहे. त्यातून अशा माणसाची पदवी जर अमेरिका व इंग्लंड मधल्या नामवंत विद्यापीठाची असेल तर मग बघायलाच नको. मध्यमवर्गीयांची सहानुभूती अशा उच्च शिक्षितांच्या मागेच जाते. तो काय करतो - देशाच्या हिताच्या विरोधात कारवाया करतो याचे आम्हाला जरा सुद्धा भान नसते. त्यांच्या देशद्रोहाच्या गुन्ह्याकडेही आम्ही कानाडोळा करायला तयार असतो.
(आज अनेक मध्यमवर्गीय घरामधली मुले अमेरिका व ब्रिटन मध्ये शिक्षण घेऊन तिथे स्थाईक झाली आहेत. त्यांच्या हातात भारतातील पगाराच्या मानाने किती तरी पट अधिक पैसे खेळत आहे. त्यामुळेही कदाचित असेल पण कोबड गांधींवर शंका घ्यायची म्हणजे जणू आपल्याच पोरावर शंका घेतल्याची भावना ह्या मध्यमवर्गीयांना होते की काय कोणास ठाऊक. की आपल्या पोरांचे असे केल्याने American DREAM खालसा होईल अशी भीती आहे कोणास ठाऊक. पण परदेशी शिक्षण घेतलेला इसम आजही आमच्यासाठी देवाच्या रूपात असतो.)
फार लांब जाण्याची गरज नाही. काही महिन्यांपूर्वीच देशविघातक निर्णय घेणाऱ्या रघुराम राजन यांचा सेवाकरार केंद्राने वाढवला नाही आणि त्यांना परत जावे लागले यासाठी पुरोगाम्यांनी वादळ उठवले आणि आमच्याकडचे माध्यम वर्गीय त्याला बळी पडले. इतके की प्रत्यक्ष मोदीना मुलाखत देऊन सारवासारव करावी लागली. ह्या स्मृती आपल्या मनात ताज्या आहेत. देशाच्या हातावर आघात करणारे हे उच्चशिक्षित भोंदू लोक समाजातील त्यांच्या बद्दल असलेल्या सहानुभूतीचा गैरफायदा उठवत आले आहेत. आणि रघुराम राजन यांच्या निमित्ताने इथल्या पुरोगाम्यांनी ते पुन्हा दाखवून दिले आहे.
देशाला सतावणाऱ्या नक्षलवादाच्या चळवळीमागे चीनने कसा रेटा लावला आहे हे सर्वविदित आहे. (ह्याची तपशील माझ्या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल) तेव्हा आमच्याच देशांमधले बुद्धिवंत समाजाचा बुद्धिभेद करतात आणि समाज त्यांच्यामागे फरफटतो ही वस्तुस्थिती आहे. अशा हस्तकांना हाताशी धरून त्यांच्या उद्योगांमधून चीनने आपले समाज जीवन पोखरून टाकले आहे. आरोग्याला घातक वस्तू पाठवल्या म्हणून चीनच्या आयातीवर इथे सरकारने निर्बंध घालायचे म्हटले तर हे कोणाची बाजू घेतील याचा विचार करा. चिनी मालावर बंदी घालण्यामध्ये आपलेच नुकसान आहे सांगणारे अवघ्या दोन महिन्यापूर्वी आपल्यात कसे वावरत होते ते आपण बघितले आहे. उद्या निकराची वेळ आली आणि प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली तर हे कोणाच्या मागे उभे राहतील मोदी सरकारच्या की चीनच्या हे उघड आहे. १९६२ साली चीनने आक्रमण केले तेव्हा क्रांती आपल्या दारात आली असे समजून नाचणारे महामूर्ख डावे त्या पिढीतल्या वाचकांना जरूर आठवतील. आजदेखील मोदींच्या साम्राज्यशाहीमधून आपली मुक्तता करण्यासाठी चीनने सैन्य भारतामध्ये उतरवले आहे असे सांगायला हे कमी करणार नाहीत.
सर्वहारा समाजाचे आपणच तारक आहोत ह्या प्रतिमेचा वापर करत ही मंडळी एक फसवे चित्र (Deception) उभे करत असतात. युद्धप्रसंगी तेच उपयोगी पडते. सैन्यदलाचे मनोबल हा युद्ध जिंकण्यामधला महत्वाचा घटक असतो. जनता आपल्या मागे आहे हा विचार सैन्याला प्रेरित करतो आणि निकराचे युद्ध लढण्यास मदत करतो. जनता जेव्हा ,पुरोगाम्यांनी उभ्या केलेल्या फसव्या चित्राच्या मागे उभी राहते तेव्हा तीं सैन्याच्या मनोबलावर विपरीत परिणाम करते. मायावी रूपात उभ्या ठाकलेल्या रावणाला ओळखले नाही म्हणून तर सीतेचे अपहरण झाले आणि पुढचे रामायण घडले. आपल्यामधले हे रावण ओळखणे ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे.
No comments:
Post a Comment