Sunday 19 February 2017

चीनचा साम्राज्यवाद भाग 2




एक काळ रशियाने जे स्थान मिळवले होते ते दुसर्‍या धृवाचे स्थान पहिली पायरी म्हणून चीनला आज मिळवायचे आहे. पण त्यावर त्याचे समाधान होईल हा पाश्चात्यांचा आणि आपलाही भ्रम आहे. मग अंतीम पायरी काय असेल? चीनला दुसर्या धृवाचे स्थान हवे असे नसून त्याला जग एकधृवीय बनवायचे आहे ज्याच्या धृवस्थानी तो स्वतः असेल - जगामध्ये कोणी काय करावे याचे नियम त्याने आखावेत आणि जगाने पाळावे ही अपेक्षा - महत्वाकांक्षा आहे. साहजिकच अमेरिकेला धृव म्हणून वावरता येऊ नये - त्याला ह्या स्थानावरून डच्चू देऊन आपण ते बळकावायचे आहे असे त्याचे दीर्घकालीन स्पष्ट उद्दिष्ट आहे. नजिकच्या भविष्यात चीनकडे अशी सत्ता असल्याचे नाटक वठले तरी त्याचे काम हो्ऊ शकते. परंतु जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने असा भास उभा करणे - करू देणे देखील धोक्याचे ठरेल. असा आभास निर्माण करण्याचे काम Think Tank उत्तमरीत्या करू शकतात - करत आल्या आहेत. आपल्या अनुमानाचा वापर चीन कसा करून घेतो हे समजून घेण्याचा विवेक त्यांना दाखवता आलेला नाही. महासत्ता म्हणून बिरूद देण्याची कोणतीही यंत्रणा जगात अस्तित्वात नाही - हा एक आभासच म्हणायचा. पण तसे विरूद तज्ञांनी चीनला देण्यापूर्वी या महाराक्षसाचे वर्तन एक विश्वासार्ह - जबाबदार - परिणामकारक सत्ताकेंद्रम्हणून असल्याचे दिसत नाही तोवर असे पद त्याला मिळता कामा नये हा विचार काही या संस्था करत नाहीत. असो. चीन काही आपले प्रयत्न सोडणार नाही. असेच ध्येय असलेल्या सोव्हिएत युनियनची ते गाठण्यापूर्वी शकले उडाली हे तो सोयीस्कररीत्या विसरला असावा.


मुळात ज्या आर्थिक स्थैर्याच्या जोरावर चीनने हे स्थान मिळवले ते अमेरिकेच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. पहिल्या शीतयुद्धाच्या काळामध्ये रशियाला पायबंद घालण्याच्या भूमिकेमधून अमेरिकेने चीनचे हात बळकट करायची संधी दिली आणि कोणतीही चूक न करता चीनने तिचा पु्रेपूर वापर करून घेतला हे उघड आहे. आर्थिक व्यासपीठावर चीनला मोकळीक देत असतानाच त्याच्या अन्य Strategic महत्वाकांक्षांना वेळीच आवर घालण्यात अमेरिका अपयशी ठरला कारण मुळात त्याने आपले डावपेच त्या उद्देशाने आखलेच नव्हते. त्यामुळे Strategic व्यासपीठावरही चीनला मोकळे रान मिळत गेले. त्यातूनच ह्या ड्रॅगनची गुरगुर आता वाढली असून तो अमेरिकेवरच गुरकावत असल्याचे दृश्य दिसत आहे.


हा एक धोकादायक जुगार चीन खेळत असून त्यामुळे केवळ अमेरिकाच नव्हे तर आशियामध्ये सगळ्या राजधान्या हादरल्या आहेत. कारण हा जुगार धोकादायक असा आहे की चीन अमेरिकेच्या सहनशीलतेची मर्यादेची कसोटी घेत आहे. आजपर्यंत आशियामधील सुरक्षेवर अमेरिकन वर्चस्व होते. पण अमेरिकेची ख्याती आणि विश्वासार्हता पणाला लागेल अशा प्रकारच्या खेळी चीनने आपल्या पूर्वेकडील आणि दक्षि्णेकडील समुद्राच्या परिसरात खेळल्या आहेत.
चीनची जी महत्वाकांक्ष आहे तिला पूरक असे त्याचे भौगोलिक स्थान नाही - म्हणजे त्या प्रदेशामध्ये त्याला भारत आणि जपान या देशांशी सामना केल्याशिवाय आणि त्यांना पराभूत केल्याशिवाय हे उद्दिष्ट गाठता येणार नाही. असे ध्येय बाळगण्याबाबत चीनला कोणी दोष देऊ शकत नाही कारण तसे करण्याची अंतीम इच्छा प्रत्येक देश बाळगून असतो. परंतु ह्या महत्वाकांक्षेमुळे जगामध्ये नव्या आघाड्या - नवे मैत्रीसंबंध त्याने जन्माला घातले आहेत. चीन हे पक्के जाणून आहे की अमेरिकेशी सामना करण्यापूर्वी त्याला जपान आणी भारताबरोबर सामना करावा लागणार आहे आणी त्यामुळे त्याची चरफड वाढली आहे. यामधल्या जपान बरोबर अमेरिकेचा संरक्षण करार १९४५ पासून आहे आणि दोन्ही देश त्याचा सन्मान ठेवून आहेत. राहिला प्रश्न तो भारताचा. भारताने अमेरिकेच्या जवळ जाऊ नये हा चीनचा डावपेच आहे. त्यासाठी तो भारताला अनेक लॉलीपॉप देऊ करेल. पण ज्या गोष्टींमधून भारताला लघु किंवा दीर्घ पल्ल्याचे वास्तव फायदे हो ऊ शकतील अशी कोणतीही गोष्ट तो मान्य करणार नाही. किंबहुना डोळ्यासमोर गाजर लोंबकळत ठेवून बेसावध करणे आणि वेळ मारून नेणे यापलिकडे चीनच्या प्रयत्नांमध्ये कोणताही प्रामाणिकपणा दिसत नाही. थोडक्यात काय तर तहाची बोलणी करत झुलवत ठेवून आपला कार्यभाग साधून घेण्याची ही चाल आहे.



पण भारताशी असले अफझल मिठीत घेऊन पाठीत खंजीर खुपसण्याचे खेळ चीन करतो आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक फसवे डावपेच तो अमेरिकेबरोबर खेळतो आहे. अमेरिकेशी थेट लढाई करण्याच्या परिस्थितीत चीन नाही. म्हणून आपली जी प्रतिमा अमेरिकन एनजीओंनी तयार केली आहे तिचा बागुलबुवा दाखवून तो अमेरिकेला टरकावण्याचे खेळ खेळत आहे. आशियामध्ये अमेरिकेने आपले एक नंबरचे स्थान मान्य करावे जेणे करून आपण आणि अमेरिका एकाच लेव्हलवर दिसावेत ही चीनची इच्छा आहे. एक काळ होता की अमेरिकेच्या अध्यक्षाने चीनपुढे प्रस्ताव मांडला होता की आपला भागिदार म्हणून आशियाच्या सुरक्षेची जबाबदारी चीनने घ्यावी. तेव्हा चीनने हा प्रस्ताव नाकारला होता. पण आता चीनच असा प्रस्ताव अमेरिकेसमोर मांडत आहे. आता अमेरिका त्यासाठी तयार नाही. आशियामध्ये जपान आणि भारताला कोणतेही स्थान मिळू नये ह्या उद्देशाने चीना आता हा प्रस्ताव मांडत असला तरी जपान आणी भारताचा पत्ता कट् करणे आता शक्य नाही. जपानबरोबर तर अमेरिकेचा जुना करार आहे. आणि आशिया मधल्या सुरक्षेचे आयोजन करताना जपान हा अमेरिकेचा आजवर मजबूत अक्ष राहिला आहे. हल्लीच्या काळामध्ये चीनने जपानच्या सेनकाकू बेटावर आपला हक्क सांगितला तेव्हा जपानने १९४५ च्या करारा अंतर्गत युद्ध झालेच तर आपण जपानच्या बाजूने त्यात उतरू असे अमेरिकेला जाहिर करणे भाग पाडले. सुरुवातीला अमेरिका तसे करायला टाळाटाळ करत होता. पण ह्या निवेदनानंतर चीनने जपान हे कसे भयंकर राष्ट्र आहे हे सांगणारी बदनामीची मोहिमच सुरु केली. गंमत अशी की त्याची आशियामधल्या कोणत्याही देशाने दखल सुद्धा घेतली नाही. ह्याने चीन आणखी खवळला आहे.


अमेरिकेशी भारताने जवळीक साधू नये म्हणून आर्थिक फायद्यांची जणू आपण बरसात करत आहोत असे नाटक चीन रंगवतो आहे. चीनकडून येणारी परकीय गंगाजळी म्हणजे केवळ मृगजळ आहे. हेच अस्त्र वापरून चीन भारताच्या सीमेलगतचे शेजारी देश नेपाळ भूतान म्यानमार बांग्ला देश श्रीलंका यांना झुलवू पाहतो.


No comments:

Post a Comment