Sunday, 19 February 2017

चीनचे मायाजाल - भाग १

भारताचे परराष्ट्र धोरण पाकिस्तानकेंद्रित आहे असा समज इथली माध्यमे बघता कोणाचा झाला तरी वस्तुस्थिती तशी नाही. पाकिस्तानला काबूत ठेवणारे धोरण - डावपेच सरकारने अंगिकारावेत अशी एक सरसकट इच्छा लोक व्यक्त करत असतात. त्यामुळे पाकिस्तानला थप्पड बसत नाही तोवर धोरण अपयशी ठरले असे आपल्याला वाटत राहते. सुदैवाने सध्या लोकांचे लक्ष पाकिस्तानकडून चीनकडे वळले आहे. पण ते सुद्धा चीन पाकिस्तानला मदत करतो या रागापोटीच. १९६२ च्या युद्धामध्ये चीनने शस्त्रास्त्राविना राजकारण्यांनी दुर्बल केलेल्या भारतीय सेनेचा पराभव केला आणि अक्साई चीन आणि अरुणाचलचा भाग जिंकून घेतला. ती नामुष्की लोक अजून विसरू शकत नाहीत. पुढे अमेरिका युद्धात पडणार अशी चिन्हे दिसताच चीनने स्वतःहून एकतर्फी युद्धबंदी जाहिर केली आणि अरुणाचलमधून (त्यावेळचा नेफा प्रांत) आपले सैन्य मागे घेतले. हा १९६२ चा थोडक्यात इतिहास असून त्याची रूपरेखा सर्वांना माहिती आहे. असे असले तरीही पाकिस्तानबद्दल लोकांच्या मनात जितका त्वेष आहे तेवढा चीनबद्दल दिसत नाही. कारण भारतीय माध्यमांनी चीनविषयक बाबींबद्दल आपल्याला अंधारात ठेवले आहे. सारांश चीन हा काय प्राणी आहे आणि १९६२ सालचा चीन आ्णि आजचा चीन याच्या स्वरूपाविषयी जनता अनभिज्ञ आहे. म्हणून जेव्हा वाजपेयी सरकारमधले संरक्षणमंत्री श्री जॉर्ज फर्नंडीस यांनी चीनकडून भारताला असलेल्या धोक्याचा उल्लेख करताच इथले पुरोगामी डावे त्यांच्यावर तुटून पडले होते. आणि अचानक फर्नंडिस साहेब चीनबद्दल का बोलतात असा प्रश्न जनतेला पडून डाव्यांचे आक्षेप तिला खरे वाटले होते. अर्थात त्यामुळे परिस्थिती काही बदलली नाही. आज १५ वर्षांनंतर त्या भीषण धोक्याची लोकांना चाहूल लागत आहे पण पदरी माहिती मात्र काहीच नाही असे चित्र दिसते.
चीन आपल्यापेक्षा बलाढ्य आहे - त्याचे सैन्य आणि त्याच्याकडील पैसा - उद्योग व्यवसाय ह्याच्या भारत पासरीलाही पुरणार नाही. असा चीन वारंवार लडाखमध्ये - तवांग मध्ये खुशाल सीमा ओलांडून आत येतो - अक्साई चीन - पाकव्याप्त काश्मिर ह्या भारताच्या प्रदेशातून रस्ते - रेल्वे बांधतो - सीमाप्रश्न उकरून काढतो - भारत पाक विवादामध्ये पाकच्या बाजूने उभा राहतो - आपल्याकडील पोतीभर माल दिडक्या किंमतीला बाजारपेठेत टाकून भारतीय मालाशी स्पर्धा करतो जेणेकरून इथले व्यवसायिक बरबाद होतील आणि कारखाने कायमचे बंद होतील अशा तर्‍हेने डावपेच आखतो असे साधारण चित्र आपल्या समोर आहे. वारंवार कुरापती काढणार्‍या चीनचे करायचे काय असा प्रश्न मात्र आपल्याला सतावतो आणि त्याचे समाधानपूर्वक उत्तर मिळत नाही. म्हणून चीन या महाराक्षसाविषयी अगदी जुजबी माहिती जाणून घेऊ. त्यानंतर या महाराक्षसाचा जीव कोणत्या ’पोपटात” आहे हे स्पष्ट होईल.
चीन ही एक सुपर पॉवर आहे असा शोध लावला तो अमेरिकन "Think Tank - थिंक टॅंक" नी. Think Tank म्हणजे एक प्रकारच्या एनजीओ म्हणायच्या. फक्त त्यांचे अंगिकृत काम हे कोणत्या ना कोणत्या विषयासंदर्भात अभ्यासपूर्वक प्रबंध सादर करणे आणि जमेल तसे सरकारी धोरणावर आपल्या विचाराचा प्रभाव टाकणे असे असते. कधी कधी दृश्य उलट असते. सरकार प्रथम धोरण ठरवते. मग ते कसे बरोबर आहे हे सांगणारे लेख जनतेसमोर Think Tank च्या ’स्वतंत्र’ संस्थांद्वारे माध्यमात येतात. म्हणूनच अनेकदा Think Tank द्वारा येणारे लेख हे चाळून चाळून त्यातील मते बाजूला टाकून केवळ तथ्य स्वीकारण्याचे जिकिरीचे काम करावे लागते. त्या तथ्यावर आधारित निष्कर्ष आपल्याला काढता येतात.
तर चीन महासत्ता असल्याचा डिंडिंम अशाच Think Tank वाल्यानी आपल्या माथी गेली काही दशके मारला आहे. याचे कारण असे की तत्कालीन लाभ उठवण्यासाठी अमेरिकन सरकारलाही चीनशी चुंबाचुंबी करायची होती. तो काळ असा होता की अमेरिका पहिल्या शीत युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाची कोंडी करण्याच्या उद्योगात मग्न होती. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर शीत युद्ध संपले असे वाटते आहे तोवर चिनी ड्रॅगनने फुत्कार सोडायला सुरुवात केली. आणि अमेरिकेच्या बोटचेप्या भूमिकेचा पूर्ण फायदा उठवत स्वतःला एक आर्थिक महासत्ता पदापर्यंत खेचत नेले. असे करत असताना ह्याला लाथ मार त्याला सरळ करीन म्हणून धमक्या दे असे उद्योग चालूच होते. १९६२ चे युद्ध चीनने ’भारताला धडा शिकवण्यासाठी’ छेडले होते. खरे आहे. मोदींच्या हाताखालचे सरकार हे धडे जरूर शिकले आहे. ते शिकले की नाही हे नेमके कधी - कोणत्या स्टेजला - समजून घ्यायचे हे चीनच्या हातात आहे.

No comments:

Post a Comment