#तिबेटस्वाती १६ #TibetSwati 16
चीनचे अध्यक्ष शी जीन पिंग यांचा जन्मच चीनच्या एका सुप्रसिद्ध क्रांतिकारी कमांडरच्या पोटी झाला आहे. माओ म्हणत - “The Party commands the gun.” - बंदुकीवर नियंत्रण पक्षाचे. अर्थातच त्यांचा ह्या वचनावर तंतोतंत विश्वास आहे. सत्तेवर येताच चीनच्या सैन्यात आमूलाग्र बदल करण्याचा निश्चय करूनच त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. १९५० नंतर होणाऱ्या ह्या पहिल्या बदलाची व्याप्ती अशी आहे की अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी त्याची चिंता करावी. २०३० पर्यंत चीनचे सैन्य अमेरिकेला प्रत्यक्ष लढाईत आणि त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानात तुल्यबळ ठरावे ह्या उद्देशाने सैन्याची संपूर्ण फेररचना केली जात आहे. चीनचे परदेशातील हितसंबंध जपण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची विशेष जबाबदारी प्रथमच ह्या सैन्यावर टाकण्यात आली आहे. आजवर चीनच्या संरक्षणाच्या उद्दिष्टाने पीपल्स लिबरेशन आर्मी काम करत असे. याआधी सुद्धा PLAने पॅसिफिक समुद्र हिंदी महासागर येथे युद्धनौका - पाणबुड्या उभ्या केल्या आहेत. दक्षिण चीन समुद्रामध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या बेटावरही लष्करी तळ बनवला गेला आहे. चिनी लष्करी दले अमेरिकन नौकांना तिथून जाताना हटकतात. दक्षिण आफ्रिकेच्या जिबुती बंदरामध्ये आज चीनचा अधिकृत तळ आहे. त्याचा वापर करून चीन आफ्रिकेमध्ये लष्करी कारवाई करू शकेल इतके सामर्थ्य आणि व्यवस्था जिबुती इथे उपलब्ध आहे. पण या सर्वांपेक्षा खूप मोठे उद्दिष्ट आता PLAला देण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जग जिंकण्याच्या ईर्ष्येने चीन देशाबाहेर पाऊल टाकण्याची योजना आखत आहे. एखाद्या महासत्तेने आपली जहाजे - त्यांचे येण्याजाण्याची मार्ग - आपल्याकडे येणारा माल - आपल्याला होणार तेलाचा पुरवठा यांच्या संरक्षणासाठी ज्या उपाय योजना कराव्यात त्या त्या सर्व योजना करण्याचे आदेश चिनी सैन्याला मिळाले आहेत.
सत्तेवर येताच काही महिन्यात शी यांनी PLA मधल्या बदलाची घोषणा केली. सैन्याच्या मुख्य कमिटीचे प्रमुख म्हणून सर्व सूत्रे शी यांनी स्वतःकडे घेतली आहेत. त्यानंतर वर्तमानपत्रामध्ये शी ह्यांचे बिरुद Commander in Chief असल्याचे अधिकृतरीत्या छापून आले. याअगोदर अशी सूत्रे पायदळातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे असत. लष्कराच्या सर्व खात्याची सूत्रे मुख्य कमिटीकडे असतील. लष्कराचा गुरुत्वमध्य आजपर्यंत पायदळाकडे होता. तो सरकून वायुदल आणि नाविक दलाकडे झुकवण्यात आला. शिवाय मिसाईल डिव्हिजन नव्याने स्थापन करण्यात आली. ही रचना बघता हे उघडच आहे की इथून पुढे लष्कराची मुख्य जबाबदारी वायुदल आणि नाविक दलाला सांभाळायची आहे. जागतिक पातळीवर चिनी हितसंबंधांचे संरक्षण करायचे म्हटले तर साहजिकच तो भार वायुदल आणि नाविक दलाला उचलावा लागणार हे जाणून त्यांना यथायोग्य स्थान दिले गेले आहे.
शिवाय इथून पुढच्या काळामध्ये वायुदल आणि नाविक दलाच्या सैनिक संख्येमध्ये वाढ करावी लागेल गृहीत धरून पायदळामधून बराचसा कर्मचारी वर्ग कमी करण्याची योजना आखली गेली आहे. एकूण तीन लाख सैनिकांची नोकरी जाणार असून त्यातले बरेचसे पायदळामधले आहेत. चीनचे एकूण सात प्रांत मानले तर या सात प्रांतांमध्ये सैन्याचे सात विभाग काम करत. ते एकप्रकारे समांतर सरकार चालवत होते. स्वतःच्या शाळा स्वतःची वर्तमानपत्रे स्वतःची हॉस्पिटल्स असा कारभार होता. भविष्यामध्ये प्रत्यक्ष लढाईमध्ये भाग न घेणाऱ्या लष्करी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी केल्या जातील असे जाहीर झाल्यानंतर वर्तमानपत्रे बंद केली गेली. लष्कराच्या ऍक्रोबॅटीक - ऑपेरेशन - थिएटर - बँड आदी तुकड्या PLA ने प्रचारासाठी मुळात स्थापन केल्या होत्या. आणि त्या विभागवार काम करत असत. ह्या तुकड्या विभागवार न राहता केंद्रीय केल्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट करणे शक्य झाले. ह्याशिवाय लॉजिस्टिकस - जनरल स्टाफ - पोलिटिकल वर्क्स युनिट आणि आर्मामेंट्स ही खाती कमी करण्यात आली. त्यांचे काम अन्य प्रकारे वाटले गेले आहे. पण जी खाती कमी केली गेली त्याच खात्यांची लष्करामध्ये मातब्बरी होती. हे चार विभाग म्हणजे लश्कराचे आधाराचे चार खांब मानले जात. हे सात विभाग आणि चार जनरल खाती यांच्यावर कुऱ्हाड चालवल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे तर शक्य झालेच पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये लाच रूपाने जाणाऱ्या पैशाला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. ह्या विभाग आणि खात्या ऐवजी ११ नव्या एजन्सीज स्थापित करण्यात आल्या असून त्याची सूत्रे केंद्रीय कमिटीकडे गेली आहेत. इथून पुढे पायदळाकडे फक्त पायदळाचेच काम सोपवले जाईल. मिसाईल्स - स्पेस - सायबर - इलेकट्रोनिक वॉर फेयर - स्ट्रॅटेजिक फोर्स - यांची सूत्रे आता पायदळाकडे नसतील. त्यांना स्वतंत्र नियंत्रण व्यवस्था मिळाली आहे.
हे बदल बघता एक गोष्ट लक्षात येते की ज्या डिव्हिजन्स च्या जोरावर चिनी लष्कर देशांमधल्या नागरी शासनाला डच्चू देऊन सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेऊ शकले असते (Military Coup) त्याचेच नियंत्रण त्यांच्या हातून काढून घेतले गेले आहे. स्पेस - सायबर आणि इलेक्ट्रॉनिक वॉर फेयर हि तर आजच्या काळामधली सर्वाधिक महत्वाची खाती मानली पाहिजेत. त्यांचे नियंत्रण नसलेले पायदळ एक प्रकारे पंगू झाले आहे.
लष्करी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे अजिबात सोपे नाही. चिनी अर्थव्यवस्था आज फार चांगल्या परिस्थितीत नाही. अशा वेळी तेवीस लाखामधले तीन लाख कर्मचाऱ्यांची नोकरी जाणे ही मोठी घटनाच म्हटली पाहिजे. यावर उपाय म्हणून सरकारी कंपन्यांमध्ये लष्करातून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ५% राखीव जागा ठेवण्याचे आदेश आहेत. शिवाय सरकार २०१५ च्या तुलनेत १३% जास्त पैसा - ४००० कोटी युआन एवढा पैसे त्यांच्यासाठी राखून ठेवणार आहे. पण त्याने काय होणार? सगळ्या तीन लाख लोकांना नोकरी मिळणे अशक्य आहे. त्यांना पोसायचे तर लश्कराच्या खर्चात १०% वाढ करावी लागेल पण पत्यक्षात ७ ते ७.५% वाढ करण्यात आली आहे. या आधीच सुमारे ६० लाख निवृत्त चिनी लश्करी कर्मचारी आंदोलन करतच होते. त्यासंख्येत आता तीन लाखांची भर पडली आहे.
शी यांनी केलेल्या या बदलांना तरुण अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळतो आहे कारण लष्करातील भ्रष्टाचाराला ते कंटाळले होते. पण ज्या जनरल्स कडे अमर्याद अधिकार होते ते मात्र नाराज आहेत. शी यांनी हे बदल जाहीर केल्यानंतर PLA च्या वर्तमानपत्रामध्ये एक लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये असे म्हटले होते की हे बदल घिसाडघाईने अथवा अर्धवट केले गेले तर एकूणच लश्कराच्या स्थैर्यावर आणि समाजाच्या शांततेवर विपरित परिणाम होईल. हा लेख नंतर मागे घेण्यात आला. पण त्यातून लश्करी वर्तुळामध्ये किती खळबळ माजली आहे त्याची झलक मिळते. जे जनरल्स मोठमोठ्या डिव्हिजन्स सांभाळत होते त्यांच्या हाताखाली आता छोटी छोटी खाती तेवढी उरली आहेत. ज्येष्ठ अधिकार्यांना पूर्वीप्रमाणे गाडीभत्ता मिळत नाही. मिळेल त्या पगारावर त्यांचे भागत नाही कारण वरून मिळणार्या पैशाची ऊबही गेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारी माध्यमांमधून लश्करी कर्मचार्यांनी पक्षाशी एकनिष्ठा दाखवणे कसे गरजेचे आहे अशा अर्थाचे लेख सतत प्रसिद्ध होत असतात. त्यातूनच आपण अंदाज बांधू शकतो की लश्करामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणावर उलथापालथ आणि चलबिचल चालू आहे.
इतका मोठा बदल हाताळणे अर्थातच सोपे नाही. त्यामध्ये अपयश देखील येऊ शकते. पण शी एकप्रकारचा जुगारच खेळत आहेत हे मानावे लागेल. त्यांनी जी बाजी लावली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाच वेळी कुतूहल आणि चिंता असे वातावरण आहे. भ्रष्टाचार आणि लश्कराला नियंत्रणात ठेवणे ह्या दोन कारवायांमुळे चीनमध्ये देशप्रेमाची एकच लाट उसळली असून शी जिन पिंग अर्थातच तिच्या शीर्षस्थानी आहेत.
(सोबत फोटो लष्करी वेशामधले शी जिन पिंग)
No comments:
Post a Comment