कोणतेही लष्करी आव्हान समोर नसूनही चीनने तिबेटमध्ये अतिरेकी सैन्यबळ उभे केले आहे. ही स्वसंरक्षणासाठी केलेली जमवाजमव नाही तर आक्रमणासाठी केलेली व्यूहरचना आहे हे लगेच लक्षात येते. स्थानिक जनतेच्या भावना मोडून पादाक्रांत केलेला तिबेट सोडण्याचा विचारही चीनच्या मनाला शिवलेला नाही. उलट तिबेटच्या भूमीचा वापर युद्ध छेडण्यासाठी आणि शेजारी देशांना भयभीत करण्यासाठी तो करतो आहे. सीमाप्रश्न सोडवण्याच्या बैठकांमध्ये नवनवे मुद्दे काढून तो लोंबकळत ठेवत युद्धाची टांगती तलवार मात्र डोक्यावर ठेवायची आहे.
तिबेटमध्ये चीनने कोणते लष्करी सामर्थ्य वापरले नाही? तिथे त्यांचे सशस्त्र पायदळ आहे हवाई तळ आहेत शत्रूच्या प्रदेशावर टेहळणी करण्यासाठी योग्य अशी यंत्रणा आहे अत्याधुनिक इलेकट्रोनिक वॉरफेर साठी आवश्यक यंत्रणा आहे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत आणि अण्वस्त्रेही तैनात आहेत. ह्या शस्त्रास्त्रांच्या पल्ल्यामध्ये युरोपीय देशही येतात. खरे तर जगाची झोप उडायला हवी असा हा शस्त्रसाठा आहे. शस्त्रास्त्रांचा हा पसारा बघता चीनला केवळ भारताशी नव्हे पण गरज पडली तर तिबेटच्या मुद्द्यावरून कोणत्याही महासत्तेशी युद्धाची वेळ आली तर त्याची पूर्ण तयारी त्याने ठेवली आहे. थोडक्यात तिबेटावरील आधिपत्य हा चीनसाठी गहन मुद्दा आहे.
तिबेटच्या भारत सीमेपासून ते चीनच्या मध्यवर्ती प्रदेशापर्यंत आज नद्यांवर धरणे - वीज पुरवठा - लांब रुंद रस्ते आणि रेल्वे या मूलभूत सोयी चीनने विकसित केल्या आहेत. त्याचे उद्दिष्ट तिबेटचा विकास आणि तिथल्या जनतेची सोय हा नाही. पादाक्रांत करून सुद्धा तिबेटचा उपयोग चीनला स्वतःसाठी एक बफर स्टेट म्हणून करायचा आहे. तिथल्या नैसर्गिक संपत्तीचा वापर मध्यवर्ती प्रदेशातील चिनी नागरिकांसाठी करायचा आहे. आणि १३७ कोटी चिनी जनतेला मध्यवर्ती प्रांत व त्याची जमीन पुरत नाही म्हणून चिनी जनतेला वससण्यासाठी नवा प्रदेश (Lebensraum)म्हणून तिबेटचा वापर केला जात आहे. ही अत्यंत दुःखदायक परिस्थिती आहे. जे काही उद्योग व्यवसाय तिबेटमध्ये सुरु केले गेले तिथले श्रमाची कामे तिबेटींना आणि प्रतिष्ठेची कामे हान वंशीय पूर्व किनाऱ्यावरील चिन्यांना वाटले गेले आहेत.
तिबेटची ही अवस्था जगाला माहिती आहे. पण राजकीय सोयीसाठी गेली ७७ वर्षे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. जवळ जवळ सर्वच देशांनी तिबेट हा चीनचा भाग असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे चीन फुशारला आहे. तिबेटमधील ही चिनी घुसखोरी आजवर कोणाला जाचक वाटली नाही असे नाही. सुरुवातीला म्हणजे १९७० पर्यंत अमेरिका तिबेटावरील आक्रमणाकडे गंभीररीत्या बघत होती. पण निक्सन किसिंजर जोडगोळीने समीकरणे बदलली. रशियाची कोंडी करणे ह्या एका उद्देशाच्या भोवती त्यांनी आपली रणनीती उभी केली. म्हणून रशियाचा प्रभाव तिबेटवर पडू नये या हेतूने १९७२ पासून निक्सन किसिंजर जोडगोळीने त्याकडे काणाडोळा केला होता.
आता मात्र परिस्थिती डोईजड होऊ लागली आहे. चीनने तिबेटच्या भूमीवर अशी क्षेपणास्त्रे बसवली आहेत की संबंध युरोप त्यांच्या माऱ्यात येऊ शकतो. यामध्ये अण्वस्त्रांचाही समावेश आहे. तिबेटमध्ये हातपाय पसरून चीनचे समाधान झालेले नाही. त्याने आता आपली नजर जपानजवळच्या बेटाकडे वळवली आहे. शिवाय दक्षिणेकडील समुद्रावर केवळ आपलाच हक्क असल्याचे त्याचे मत आहे. त्यानुसार तो अन्य देशांना तिथून येण्याजाण्यास आडकाठी करतो. त्या समुद्रामध्ये चीनने कृत्रिम बेटे तयार करून त्यावर लष्करी तळ उभारले आहेत. आपल्या संरक्षणावर चीन वारेमाप खर्च करतो आहे. ९००० कोटी पौंड म्हणजे किमान ७ लाख २० हजार कोटी रुपये. ही रक्कम इतकी मोठी आहे की ब्रिटन जर्मनी आणि फ्रान्स यांचा संरक्षण खर्चाची बेरीज देखील त्यापेक्षा कमी आहे.
चीनच्या धटिंगणपणामुळे दक्षिण चिनी समुद्राच्या टापूमधले सगळे देश चिंताग्रस्त आहेत. २०१५ साली फिलिपाईन्सचे अध्यक्ष श्री बेनिनो अक्विनो जपान भेटीमध्ये जपानच्या संसदेसमोर भाषण करताना म्हणाले - "दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीन हिटलरप्रमाणे वागतो आहे. आमची अवस्था 1938 मधल्या झेकोस्लोव्हाकियासारखी आहे. हिटलरने झ्यूडटन (Suedeten) प्रदेशावर हक्क सांगितला. त्यापायी १९३८ मध्ये त्याने झेकोस्लोव्हाकियाचा लचका तोडला. ब्रिटनचे पंतप्रधान नेव्हिल चेम्बरलेन याना त्याने आश्वासन दिले की मला उर्वरित झेकोस्लोव्हाकिया नको आहे. मी त्यावर आक्रमण करणार नाही. चेम्बरलेन गप्प बसले. १९३९ मध्ये हिटलरने उर्वरित झेकोस्लोव्हाकियावर आक्रमण करून तो देश घशात घातला. चेंबरलेन जर १९३८ मध्ये गप्प बसले नसते तर कदाचित दुसरे महायुद्ध टळले असते."
अक्वीनो यांनी जपानच्या संसदेसमोर केलेले भाषण जगाला उद्देशून केले आहे. चीनकडे जे दुर्लक्ष करत आहेत ते तिसरे महायुद्ध ओढवून घेत आहेत असे त्यांना सुचवायचे आहे. आम्ही जात्यात आहोत तर तुम्ही सुपात हे ते कळकळून सांगत होते.
हा इशारा देणारे अक्वीनो एकटेच नाहीत. आज फिलीपाईन्सने टोपी फिरवली आहे. पण चीनबद्दल इतर आशियाई देश काय म्हणतात तेही पुढच्या भागात बघू.
No comments:
Post a Comment