Sunday 19 February 2017

चीनचे मायाजाल - भाग ४

चीनची जी महत्वाकांक्ष आहे तिला पूरक असे त्याचे भौगोलिक स्थान नाही - म्हणजे त्या प्रदेशामध्ये त्याला भारत आणि जपान या देशांशी सामना केल्याशिवाय आणि त्यांना पराभूत केल्याशिवाय हे उद्दिष्ट गाठता येणार नाही. असे ध्येय बाळगण्याबाबत चीनला कोणी दोष देऊ शकत नाही कारण तसे करण्याची अंतीम इच्छा प्रत्येक देश बाळगून असतो. परंतु ह्या महत्वाकांक्षेमुळे जगामध्ये नव्या आघाड्या - नवे मैत्रीसंबंध त्याने जन्माला घातले आहेत. चीन हे पक्के जाणून आहे की अमेरिकेशी सामना करण्यापूर्वी त्याला जपान आणी भारताबरोबर सामना करावा लागणार आहे आणी त्यामुळे त्याची चरफड वाढली आहे. यामधल्या जपान बरोबर अमेरिकेचा संरक्षण करार १९४५ पासून आहे आणि दोन्ही देश त्याचा सन्मान ठेवून आहेत. राहिला प्रश्न तो भारताचा. भारताने अमेरिकेच्या जवळ जाऊ नये हा चीनचा डावपेच आहे. त्यासाठी तो भारताला अनेक लॉलीपॉप देऊ करेल. पण ज्या गोष्टींमधून भारताला लघु किंवा दीर्घ पल्ल्याचे वास्तव फायदे हो ऊ शकतील अशी कोणतीही गोष्ट तो मान्य करणार नाही. किंबहुना डोळ्यासमोर गाजर लोंबकळत ठेवून बेसावध करणे आणि वेळ मारून नेणे यापलिकडे चीनच्या प्रयत्नांमध्ये कोणताही प्रामाणिकपणा दिसत नाही. थोडक्यात काय तर तहाची बोलणी करत झुलवत ठेवून आपला कार्यभाग साधून घेण्याची ही चाल आहे.
पण भारताशी असले अफझल मिठीत घेऊन पाठीत खंजीर खुपसण्याचे खेळ चीन करतो आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक फसवे डावपेच तो अमेरिकेबरोबर खेळतो आहे. अमेरिकेशी थेट लढाई करण्याच्या परिस्थितीत चीन नाही. म्हणून आपली जी प्रतिमा अमेरिकन एनजीओंनी तयार केली आहे तिचा बागुलबुवा दाखवून तो अमेरिकेला टरकावण्याचे खेळ खेळत आहे. आशियामध्ये अमेरिकेने आपले एक नंबरचे स्थान मान्य करावे जेणे करून आपण आणि अमेरिका एकाच लेव्हलवर दिसावेत ही चीनची इच्छा आहे. एक काळ होता की अमेरिकेच्या अध्यक्षाने चीनपुढे प्रस्ताव मांडला होता की आपला भागिदार म्हणून आशियाच्या सुरक्षेची जबाबदारी चीनने घ्यावी. तेव्हा चीनने हा प्रस्ताव नाकारला होता. पण आता चीनच असा प्रस्ताव अमेरिकेसमोर मांडत आहे. आता अमेरिका त्यासाठी तयार नाही. आशियामध्ये जपान आणि भारताला कोणतेही स्थान मिळू नये ह्या उद्देशाने चीना आता हा प्रस्ताव मांडत असला तरी जपान आणी भारताचा पत्ता कट् करणे आता शक्य नाही. जपानबरोबर तर अमेरिकेचा जुना करार आहे. आणि आशिया मधल्या सुरक्षेचे आयोजन करताना जपान हा अमेरिकेचा आजवर मजबूत अक्ष राहिला आहे. हल्लीच्या काळामध्ये चीनने जपानच्या सेनकाकू बेटावर आपला हक्क सांगितला तेव्हा जपानने १९४५ च्या करारा अंतर्गत युद्ध झालेच तर आपण जपानच्या बाजूने त्यात उतरू असे अमेरिकेला जाहिर करणे भाग पाडले. सुरुवातीला अमेरिका तसे करायला टाळाटाळ करत होता. पण ह्या निवेदनानंतर चीनने जपान हे कसे भयंकर राष्ट्र आहे हे सांगणारी बदनामीची मोहिमच सुरु केली. गंमत अशी की त्याची आशियामधल्या कोणत्याही देशाने दखल सुद्धा घेतली नाही. ह्याने चीन आणखी खवळला आहे.
अमेरिकेशी भारताने जवळीक साधू नये म्हणून आर्थिक फायद्यांची जणू आपण बरसात करत आहोत असे नाटक चीन रंगवतो आहे. चीनकडून येणारी परकीय गंगाजळी म्हणजे केवळ मृगजळ आहे. हेच अस्त्र वापरून चीन भारताच्या सीमेलगतचे शेजारी देश नेपाळ भूतान म्यानमार बांग्ला देश श्रीलंका यांना झुलवू पाहतो.

No comments:

Post a Comment