Sunday, 19 February 2017

चीनचे मायाजाल - भाग ३

एक काळ रशियाने जे स्थान मिळवले होते ते दुसर्‍या धृवाचे स्थान पहिली पायरी म्हणून चीनला आज मिळवायचे आहे. पण त्यावर त्याचे समाधान होईल हा पाश्चात्यांचा आणि आपलाही भ्रम आहे. मग अंतीम पायरी काय असेल? चीनला दुसर्‍या धृवाचे स्थान हवे असे नसून त्याला जग एकधृवीय बनवायचे आहे ज्याच्या धृवस्थानी तो स्वतः असेल - जगामध्ये कोणी काय करावे याचे नियम त्याने आखावेत आणि जगाने पाळावे ही अपेक्षा - महत्वाकांक्षा आहे. साहजिकच अमेरिकेला धृव म्हणून वावरता येऊ नये - त्याला ह्या स्थानावरून डच्चू देऊन आपण ते बळकावायचे आहे असे त्याचे दीर्घकालीन स्पष्ट उद्दिष्ट आहे. नजिकच्या भविष्यात चीनकडे अशी सत्ता असल्याचे नाटक वठले तरी त्याचे काम हो्ऊ शकते. परंतु जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने असा भास उभा करणे - करू देणे देखील धोक्याचे ठरेल. असा आभास निर्माण करण्याचे काम Think Tank उत्तमरीत्या करू शकतात - करत आल्या आहेत. आपल्या अनुमानाचा वापर चीन कसा करून घेतो हे समजून घेण्याचा विवेक त्यांना दाखवता आलेला नाही. महासत्ता म्हणून बिरूद देण्याची कोणतीही यंत्रणा जगात अस्तित्वात नाही - हा एक आभासच म्हणायचा. पण तसे विरूद तज्ञांनी चीनला देण्यापूर्वी या महाराक्षसाचे वर्तन एक विश्वासार्ह - जबाबदार - परिणामकारक सत्ताकेंद्रम्हणून असल्याचे दिसत नाही तोवर असे पद त्याला मिळता कामा नये हा विचार काही या संस्था करत नाहीत. असो. चीन काही आपले प्रयत्न सोडणार नाही. असेच ध्येय असलेल्या सोव्हिएत युनियनची ते गाठण्यापूर्वी शकले उडाली हे तो सोयीस्कररीत्या विसरला असावा.
मुळात ज्या आर्थिक स्थैर्याच्या जोरावर चीनने हे स्थान मिळवले ते अमेरिकेच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. पहिल्या शीतयुद्धाच्या काळामध्ये रशियाला पायबंद घालण्याच्या भूमिकेमधून अमेरिकेने चीनचे हात बळकट करायची संधी दिली आणि कोणतीही चूक न करता चीनने तिचा पु्रेपूर वापर करून घेतला हे उघड आहे. आर्थिक व्यासपीठावर चीनला मोकळीक देत असतानाच त्याच्या अन्य Strategic महत्वाकांक्षांना वेळीच आवर घालण्यात अमेरिका अपयशी ठरला कारण मुळात त्याने आपले डावपेच त्या उद्देशाने आखलेच नव्हते. त्यामुळे Strategic व्यासपीठावरही चीनला मोकळे रान मिळत गेले. त्यातूनच ह्या ड्रॅगनची गुरगुर आता वाढली असून तो अमेरिकेवरच गुरकावत असल्याचे दृश्य दिसत आहे.
हा एक धोकादायक जुगार चीन खेळत असून त्यामुळे केवळ अमेरिकाच नव्हे तर आशियामध्ये सगळ्या राजधान्या हादरल्या आहेत. कारण हा जुगार धोकादायक असा आहे की चीन अमेरिकेच्या समनशीलतेची मर्यादेची कसोटी घेत आहे. आजपर्यंत आशियामधील सुरक्षेवर अमेरिकन वर्चस्व होते. पण अमेरिकेची ख्याती आणि विश्वासार्हता पणाला लागेल अशा प्रकारच्या खेळी चीनने आपल्या पूर्वेकडील आणि दक्षि्णेकडील समुद्राच्या परिसरात खेळल्या आहेत.

No comments:

Post a Comment