Sunday 19 February 2017

तिबेट १

२० जानेवारी रोजी श्री डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. यानंतर आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. कारण खुद्द ट्रम्प यांनीच तसे संकेत दिले आहेत. हे बदल समजून घ्यायचे तर आपले सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवणे गरजेचे असते. नाही तर डोळ्यासमोर असूनही आपल्याला अनेक गोष्टींचे अर्थ लागणे मुश्किल होते. त्यातून मराठी पत्रकारितेमधील आणि विचारवंतांच्या फौजेतील मध्यम वर्गीयांचा भरणा आपल्या डाव्या झापडांमधून जागतिक राजकारणाकडे बघत आला आहे. आणि मराठी वाचकाच्या जाणिवांना त्याच्या मर्यादा पडल्या आहेत.
सुमारे २५-३० वर्षांपूर्वी अमेरिका आणि रशिया यांच्यामधले शीत युद्ध संपले तरीही आमच्याकडे परराष्ट्र संबंधाचे मोजमाप अजूनही उजव्या डाव्या पाट्या टाकून केले जाते.आजच्या घडीला अमेरिका असो कि रशिया दोघांमधले एकेकाळचे तात्विक मतभेद आणि भूमिका उरल्या नसून दोघेही बळी तो कान पिळी या जंगल कायद्याने जगात वावरत आहेत. त्यांच्या जोडीला आज चिनी ड्रॅगन सावजावर झेप घ्यायला उत्सुक दिसतो आहे. पण आमच्या विचारवंतांना आणि पत्रकारांना याची गंधवार्ता नाही.
त्यांच्यासाठी इंदिराजींनी रशियाशी मैत्री केली म्हणून आजही रशिया हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे आणि असावा. तसे मोदी सरकारने केले नाही तर तो भीषण राष्ट्रद्रोह ह्या डाव्या पत्रकारांच्या विचारवंतांच्या दृष्टीने असतो. दोन व्यक्तीमध्ये मित्रत्वाचे संबंध आहेत असे आपण म्हणतो तेव्हा त्या दोन व्यक्ती एकमेकांशी कशा वागतात त्यांनी कसे वागावे याचे निकष आपणा मध्यम वर्गीयांच्या डोक्यात स्पष्ट असतात. पण दोन राष्ट्रे एकमेकांची मित्र आहेत ही संकल्पना दोन व्यक्तीमधील मैत्री पेक्षा कशी आणि का वेगळी असते याचा त्यांना थांगपत्ता नसतो.
गेल्या ८०-९० वर्षांमध्ये जगामध्ये सर्वात जास्त टिकलेली मैत्री कोणाची असे विचारले तर अमेरिका ब्रिटन यांच्याकडे बघता येईल. पण तरी सुद्धा एक काळ होता जेव्हा अमेरिका आयर्लंडच्या बंडखोरांना चिथावणी देत असे आणि त्यांना आर्थिक व अन्य मदत पुरवत असे असे अहवाल ब्रिटन सरकारकडे होतेच. भारताच्या बाबतीत देखील अशी उदाहरणे दाखवता येतील.
भारतीय गुप्तहेर खात्याचे अॕडिशनल सेक्रेटरी श्री बी. रमण यांनी आपल्या एका लेखात लिहिले आहे की इंदिराजींच्या कारकिर्दीमध्ये अमेरिका आणि पाकिस्तान मिळून भारताविरुद्ध कारस्थाने करत असत. काश्मिरातील विभाजनवादी शक्ती तसेच खलिस्तानी अतिरेकी यामागे याच दोघांचे सहाय्य होते हे उघड आहे.
पण एक चमत्कारिक परिस्थिती उद्भवली. कम्युनिस्ट चीन विरोधात युनान प्रांतामध्ये लढणाऱ्या कुमिनटांग तुकड्या म्यानमारच्या उत्तर भागातील कचीन आणि शान प्रदेशात येऊन स्थिरावल्या होत्या. ह्या तुकड्या तिथे राहतात तोवर आपल्याला धोका असल्याचे जाणून चीनने उत्तर म्यानमारच्या प्रांतामध्ये छुप्या मार्गाने आपले सैन्य घुसवले होते. म्यानमारचे सरकार दुबळे होते. चीन त्यांच्यावर दडपण आणून कुमिनटांग तुकड्याना हाकलून द्या म्हणून आग्रह करत होता. कमकुवत म्यानमार सरकारचा फायदा घेऊन चीन हे प्रांत बळकवणार तर नाही ना अशी भीती निर्माण झाली होती. ही भीती केवळ भारताला नव्हती तर अमेरिकेलाही होती. अशा प्रकारे चीनच्या विरोधात भारत व अमेरिका यांच्या मध्ये एक सहमती निर्माण झाली होती. यातूनच भारताची R&AW आणि अमेरिकेची सी आय ए यांच्या संयुक्त विद्यमाने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक मोहीम चालवली गेली. श्री रमण लिहितात कि एका बाजूला सी आय ए पाकिस्तान शी हात मिळवणी करत भारतावर आघात करत होती तर दुसरीकडे चीन विरोधात त्याच भारताच्या सहकार्याने मोहीम राबवत होती असे एक अपूर्व दृश्य उभे राहिले होते.
ही उदाहरणे अशासाठी दिली आहेत की परराष्ट्र संबंध हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. त्याची सूत्रे नियम हे दोन व्यक्तींच्या संबंधासारखे ठरत नाहीत. त्यातून आजच्या जगामध्ये शीत युद्धानंतर कोणत्याही तत्वप्रणालीशी बांधिलकी नसलेले परराष्ट्रसंबंध उदयाला आले आहेत. अमेरिका तर प्रथम पासूनच परराष्ट्र संबंध ठेवताना प्रत्येक व्यवहाराकडे स्वतंत्र रीत्या पाहते आणि त्या व्यवहारापुरते नियम बनवते. (transactional relations) म्हणूनच आपले मध्यमवर्गीय आडाखे अशा खेळींना लागू होत नाहीत.
आजच्या घडीला चीन- भारत, रशिया- भारत, पाकिस्तान- भारत, इराण- भारत, अमेरिका भारत अशा विविध खेळाडूंशी वेगवेगळ्या पातळीवर आणि परिमाणामध्ये मैत्रीपूर्ण संबंध साधायचे असताना आपल्या डोळ्यावरची झापडे दूर करावी लागतात. जग बदलले आहे. एक काळ अफगाणिस्तानातून रशियाला हाकलायचे म्हणून अमेरिका आणि पाकिस्तानचे सूत जमले होते. तर आज अमेरिकेपासून मनाने दूर गेलेला पाकिस्तान अफगाणिस्तानवर वर्चस्व ठेवण्यासाठी रशिया आणि इराणशी चुंबाचुंबी करत अमेरिकेला अफगाणिस्तानातून हाकलायचे आयोजन करतो आहे. ज्या व्हिएतनामसाठी रशियाने सर्वस्व पणाला लावले तो व्हिएत नाम आता रशियाचा शत्रू आणि अमेरिकेचा मित्र झाला आहे. भारताने अणुस्फोट केला तेव्हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आशियामध्ये आपल्याला भारत स्पर्धक ठरेल की काय अशा भीतीमधून भारतावर सर्वात जास्त विखारी टीका करणारा जपान आज चीनच्या बंदोबस्तासाठी भारताकडे सहकार्याचा हात पुढे करत आहे - भारतावर हल्ला झाला तर आम्ही त्याच्या मदतीला उतरू म्हणून इशारा देत आहे. ह्या बदलत्या परिस्थितीचे आकलन शीत युद्धाच्या काळातील निकष लावून काढणे अशक्य आहे.
म्हणूनच म्हणते एकदा पाटी कोरी करा आणि मग बघा आज घडणाऱ्या घटनांकडे. तर तुम्हाला भारताचे आणि मोदींचे यश समजू शकेल. ट्रम्प यांची कारकीर्द २० जानेवारी रोजी सुरु झाली कि अनेक संदर्भ बदलतील. ट्रम्प यांनी मध्यपूर्व आशिया कडून आपले लक्ष चीन कडे वळवण्याची तयारी केली असावी याचे संकेत तर मिळत आहेत. ते अधिक स्पष्ट होतील तेव्हा डोईजड झालेल्या चीनला घेरण्यासाठी कशी व्यूहरचना आखली जाईल ते आपल्याला बघता येईल.
तोपर्यंत अशा व्यूहरचनेमध्ये तिबेटचे नेमके काय स्थान असेल ते आपण क्रमशः बघू.

No comments:

Post a Comment