Monday 12 August 2019

पाकिस्तान अमेरिका सलगी टिकणार का? भाग ६


View image on Twitter



एकदा का अफगाणिस्तान हाताशी आला की मुजाहिदीनांची फौज काश्मिरात घुसवण्याचा बेत कोण आखू शकते? खुद्द तालिबान आणि पाकिस्तान. दुसरे कोण? येता जाता भारताला डोस पाजणार्‍या चीननेही त्याकडे होता होईतो दुर्लक्षच केले असते. मग सगळ्या महाशक्ती पुन्हा एकदा तालिबानांना हाताशी धरून भारतासाठी १९९०च्या दशकातली परिस्थिती आमच्या परसदारामध्ये उत्पन्न करत असतील तर स्वसंरक्षणासाठी त्याला अटकाव करणे भारतासाठी क्रमप्राप्त ठरते.  आणि हा जो आक्षेप घ्यायचा तो आताच म्हणजे अमेरिकन सैन्य माघारी जाण्याअगोदर आणि अफगाणिस्तानची सूत्रे तालिबानांच्या हाती जाण्याअगोदरच करणे क्रमप्राप्त होते. हे केल्यामुळे आज भारताची बाजू जड झाली आहे. इतर कोणापेक्षाही हे तालिबानांना जास्त चांगले समजते. अमेरिकन सैन्य जोवर माघारी परतत नाही तोवर ह्या प्रदेशामध्ये त्यांचा शब्द अंतीम शब्द मानला जाणार नाही. 

अफगाणिस्तानमध्ये सत्ता जर तालिबानांच्या हातीच सुपूर्द करायची होती तर अमेरिकेने इथे गेली वीस वर्षे नेमके केले काय हा प्रश्न पडतो. वर्तमान अफगाण सरकार सामर्थ्यवान का होऊ शकले नाही ह्याचे स्पष्ट आणि प्रामाणिक उत्तर अमेरिकनांना ऐकायची सवय नाही. पण म्हणून सत्य काही लपत नाही. अमेरिकेचे अफगाणिस्तान धोरण चुकले आहे. गाळात फसले आहे. अब्जावधी डॉलर्सचा चुराडा करून सुद्धा दाखवण्यासारखी कामगिरी हाती आली नाही. ह्याच्या कारणांची मीमांसा कशी करायची? यूएस एड सारखे कार्यक्रम हाती घेऊन काहीही हाती लागले नाही. अमेरिकनांनी अफगाणिस्तानमध्ये पैसा ओतला - आणि काही पायाभूत सोयीही निर्माण केल्या. पण कोणत्या? ज्यांची अमेरिकन सैन्याला गरज होती तेच रस्ते आणि अन्य सोयी तिथे उभ्या केल्या गेल्या. त्यामध्ये अफगाणी जनतेचे हित आहे की नाही ह्याचे उत्तर काढावे असे मात्र त्यांना कधी वाटले नाही. (किंबहुना जिथे जिथे अमेरिकन धोरण फसले आहे तिथे तिथे हीच अवस्था तुम्हाला दिसेल.) जर  पायाभूत  सोयी उभारताना अफगाण लोकांना काय हवे हे ते विचारत नसतील तर संरक्षणाच्या बाबतीत तरी ते असा विचार कसा करतील? अमेरिकेचे अफगाण धोरण काय असावे हे आता आता पर्यंत ठरवण्याचा ठेका रॉबिन राफाएल ह्या बाईसाहेबांकडे होता. त्यांच्या वरती मी एक स्वतंत्र लेख लिहिला होता. तो जरूर वाचा. मोदी सत्तेमध्ये आल्यानंतर काही महिन्यांतच राफाएल बाईंवर एक कारवाई तिथल्या सरकारला करावी लागली. बाईंच्या हाती असलेली अमेरिकन गुपिते अमेरिकेच्या "शत्रूच्या" हाती पडत होती काय - आणि यूएस एडसारख्या कार्यक्रमामधून बाईसाहेबांनी तिथल्या पैशावर डल्ला मारला काय ह्या आरोपांची चौकशी करावी लागली. ह्यानंतर बराच काळ बाईसाहेबांना अफगाण प्रक्रियेमधून बाजूला करण्यात आले होते.  पण अमेरिकेमध्ये अजूनही पाकिस्तानची कड धरून ठेवणारी लॉबी बळकट आहे. कुठून कशा चाव्या फिरवल्या गेल्या सांगता येत नाही पण कोर्टामध्ये कोणतेही आरोप न ठेवता बाईसाहेबांची बाइज्जत सुटका झाली. ह्यानंतर बाईसाहेबांना अफगाण प्रश्नामध्ये लुडबुड करायला मोकळ्या करण्यात आले. त्यांचा भारतद्वेष इतका पराकोटीचा आहे की त्यांच्या आगमनासोबतच भारतासाठी अडचणींचे डोंगर पुन्हा उभे राहू लागले. आज दोहामध्ये अमेरिका तालिबान चर्चांमध्ये बाईसाहेब मुख्य सूत्रधार आहेत. परिणाम तुम्हाला दिसत आहेत. बाईंखेरीज दुसरे पात्र आहे झाल्मे खलिलजादे. अफगाण वंशीय अमेरिकन नागरिक - अफगाणिस्तान प्रश्नासाठी त्यांची विशेष दूत म्हणून नेमणूक झाली आहे. 

झालमे काही वरचेवर भारतामध्ये येत नाहीत पण धारा ३७० रद्दबातल झाली त्याच्या लाटा दोह्यापर्यंत गाजत पोहोचल्या आणि ६ ऑगस्ट रोजी साहेब दिल्लीमध्ये अवतरले. अमेरिका - तालिबान चर्चा शेवटच्या टप्प्यामध्ये असून तिच्यामध्ये विघ्न येईल अशी कोणतीही घटना आता टाळली पाहिजे असे झाल्मे ह्यांचे मत आहे. विघ्न म्हणजे पाकिस्तानचे लक्ष करारावरून उडून अन्य ठिकाणी जाऊ नये म्हणून झाल्मे आग्रही आहेत. करार जर तालिबान आणि अमेरिका ह्यांच्यामध्ये होत असेल तर पाकिस्तानला विघ्न आले आणि त्याचे लक्ष दुसरीकडे कुठे वळले तर झाल्मे साहेबांना त्यात काय आक्षेप आहे बरे? दुसर्‍या शब्दात सांगायचे तर वाटाघाटीच्या टेबलवर तालिबानांना आणले पाकिस्तानने - कारण तेच त्यांचे खंदे पुरस्कर्ते आणि समर्थक आहेत. किंबहुना नाव तालिबानांचे आणि सत्ता पाकिस्तानची हे ढळढळीत सत्य आहे. ते लपवण्यासाठी आजवर चांगले तालिबानी आणि वाईट तालिबानी वगैरे भाषणबाजी करून झाली आहे. पण त्यामुळे त्यांचे खरे स्वरूप लपणे शक्य नाही. तालिबान हे असेच आहेत - त्यांनी कितीही आश्वासने दिली की १९९६ प्रमाणे आपण स्त्रियांवरती बंधने घालणार नाही - शरिया लावणार नाही तरी अमेरिकन सैनिकांची पाठ वळली की तिथे काय होणार हे जगजाहीर आहे. यासाठीच अस्सल राष्ट्रप्रेमी अफगाणींना तालिबान राज्य नको आणि हा करारही नको आहे. आजवर तालिबानांशी चर्चा करायचे नाकारणारा भारत अशा मंडळींना प्रिय आहे. ट्रम्प ह्यांनी भारताच्या मदतीची कितीही खिल्ली उडवली तरीदेखील अफगाणींना जो विकास हवा होता त्याच सोयी आणि त्यांच्या आवडीच्या सोयी भारताने तिथे उभारल्या आहेत म्हणून अफगाणी लोक कृतज्ञ आहेत. आजदेखील ३७० च्या निमित्ताने भारताने जे दमदार पाऊल उचलले आहे त्यामुळे तालिबानांच्या विरोधातील अफगाणी गट भारताकडे आकर्षित होणार ह्यामध्ये शंका नाही.

भारताच्या आव्हानाला उत्तर देण्याची उबळ पाकिस्तानला दाबता आली नाही तर भारत जे उत्तर देईल त्यातून एखादे लहान प्रमाणावरचे लघु मुदतीचे युद्ध तर छेडले जाणार नाही ह्या शंकेने तालिबान व्याकूळ झाले आहेत. अफगाणिस्तानची सत्ता करारान्वये हाती येईपर्यंत त्यांना जराही विघ्न विलंब परवडणारा नाही. कारण युद्ध छेडले गेलेच तर सीमावर्ती भागातील पश्तुन प्रजा पाकिस्तानच्या बाजूने युद्धात उतरण्याची चिन्हे नाहीत. भारतामध्ये येण्यापूर्वी झाल्मे आधीच्या आठवड्यामध्ये पाकिस्तानात गेले होते. त्यावेळी भारताने अमरनाथ यात्र रद्द करून राज्यामधल्या बाहेरून आलेल्या विद्यार्थी व प्रवाश्यांना एकजात राज्याबाहेर पडण्याचे आदेश दिले होते. तसेच प्रचंड प्रमाणावर तिथे निमलष्करी आणि लष्करी सैनिकांची रवानगी करण्यात आली होती. ह्यातून अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने आपले आक्षेप झाल्मे ह्यांच्या कानी घातले होते. भारताने काश्मिरात काही गडबड केलीच तर त्याचा अफगाण शांतता प्रक्रियेवर गंभीर परिणाम होईल अशी ताकीद पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी ह्यांनी झाल्मे ह्यांना दिली होती. मोदी सरकारच्या निर्णयानंतर हीच धमकी कुरेशी ह्यांनी जाहीररीत्या दिली आहे. 

अमेरिकेला वारंवार चिमटीत पकडण्याची पाकिस्तानची ही कला जगाला चांगलीच माहिती आहे. हेच तंत्र वापरून आजवर आपली पाठ वाचवली आहे. म्हणूनच अमेरिकेचे अफगाण धोरण आजवर फसले आहे. कारण त्यांचे पाकिस्तान धोरण फसले आहे. आजच्या निर्णायक क्षणी अमेरिका पाकिस्तान धोरण बदलणार का हा कळीचा प्रश्न आहे. ते सुधारले तर अफगाण धोरण यशस्वी होऊ शकते. पाकिस्तानला कशाचीच काळजी नाही. भारताला दंड थोपटून दाखवण्याचे त्याने ठरवलेच तर अमेरिकेचे काय होईल ह्याचा विचार पाकिस्तानल करण्याची गरजच पडत नाही कारण आजवर कशीही चूक केली तरी पदरात घेणारे अमेरिकन अध्यक्ष सत्तेमध्ये होते. आता ट्रम्प साहेब ह्या सांडाला वेसण घालणार का हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. 

ना चीन ना रशिया ना अमेरिका पाठिंब्यासाठी उभी पण तरीही भारताने असे शिंग फुंकलेच कसे अशी रास्त शंका तालिबानांना आली आहे. पाकिस्तान भारताला डिवचण्याची चूक करेल म्हणून भारत देव पाण्यात तर घालून बसलेला नाही अशी शंका कोणाच्याही मनात येऊ शकते. पण प्रश्न असाही आहे की झाल्मे साहेब आणि रॉबिन राफाएल बाईसाहेबांना एकीकडे बोलण्यांमध्ये गुंतवून दुसरीकडे अमेरिकेने भारताशी संधान तर बांधले नाही ना? त्यांचा काही गुप्त समझौता तर नाही? ह्याचा अंदाज येत नाही. अंदाज येत नाही तोवर त्यांना पुढची पावले टाकणे जिकिरीचे झाले आहे. 

ही जर अवस्था "चिरकुट" तालिबानांची असेल तर बलाढ्य चीनचे काय झाले आहे?

No comments:

Post a Comment