Saturday 24 June 2017

अफगाणिस्तानच्या शांततेचे स्वप्न


Image result for qcg ashraf ghani sharif

पाकिस्तानचे पंतप्रधान श्री नवाझ शरीफ यांना सध्या खडतर दिवस चालू आहेत. देशांतर्गत व्यवहारामध्ये पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आय हव्या तशा टपल्या शरीफ यांना मारत असतात. भरीस भर म्हणून कधी अमेरिका ठोसे लगावते तर कधी सौदी त्यांना आमचे गुलाम म्हणून हिणवते. शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीला शरीफ हजर होते. यजमान शी जिन् पिंग यांनी रशिया भारत अफगाणिस्तानच्या नेतृत्वाशी बोलणी केली पण बलुचिस्तानमध्ये मारल्या गेलेल्या चिनी अधिकार्‍यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शरीफ यांच्याशी बोलणेही टाळले. त्यामुळे जनतेला आपण काही तरी करून दाखवू शकतो - करतो असे दाखवायला शरीफ यांच्या गाठी फार काही उरतच नाही.

याच पार्श्वभूमीवर नाही म्हणायला SCO च्या बैठकीच्या निमित्ताने तिथे आलेल्या अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष श्री अशरफ घनी यांच्याशी शरीफ यांची चर्चा होऊ शकली. क्वाड्रिलॅटरल कोऑर्डिनेशन ग्रुप (QCG) च्या माध्यमातून दहशतवादाविरोधात दमदार पावले उचलण्याच्या दिशेने चर्चा झाली असा डिंडिंम पाकिस्तानची माध्यमे पिटत आहेत. अफगाणिस्तानमध्ये १९७९ पासून जी युद्धमय परिस्थिती आहे ती संपून तिथे शांतता नांदावी यासाठी २०१५ साली अफगाणिस्तान ज्या हार्ट ऑफ एशिया परिषदेचे यजमानपद भूषवतो त्या परिषदेच्या निमित्ताने आलेल्या प्रतिनिधींनी QCG ची स्थापना केली. या गटामध्ये अफगाणिस्तान - पाकिस्तान - चीन व अमेरिका हे सदस्य म्हणून सामिल झाले. अफगाणिस्तानमधील शांतता पण त्यामध्ये भारताला कोणी बोलावले नाही ही एक मोठीच त्रुटी होती. पण जाणून बुजून गटाच्या कामाला गती देण्याचे प्रयत्न सफल झाले नाहीत. आजपर्यंत चार पाच बैठका होऊनही विषयात प्रगती झालेली नाही. तर अशा मृतवत् पडलेल्या गटातर्फे काहीतरी करण्याची चर्चा कशी निष्फळ असू शकेल याची तुम्ही कल्पना करू शकता. तरीसुद्धा पाकिस्तानी माध्यमांनी मात्र हा पाकिस्ताऩच्या कूटनीतीचा
मोठाच विजय असल्याचे चित्र रंगवले आहे.त्याची कारणे काय आहेत हे पाहिले पाहिजे.

शांतता प्रक्रियेमध्ये अफगाणी तालिबानांना समाविष्ट करण्याच्या उद्देशाने अशरफ घनी यांनी गेल्या वर्षी काबूलचा कर्दनकाळ गुलबुद्दीन हिकमतयार याला इराणमधून बोलावून घेतले. हिकमतयारकडे स्वतःचा गट आज अस्तित्वात नसला तरीही त्याचे पाकिस्तानी व्यवस्थेशी असलेले जुने संबंध आणि लागेबांधे तसेच आजच्या तालिबानी गटांमध्ये असलेले वजन याचा वापर शांततेसाठी करण्याच्या हेतूने त्याला देशात परत प्रवेश मिळाला आहे.

एकमेकांच्या हिताच्या बरोबर विरोधात कारवाया करणारे देश एकाच मेजावर बसून सहकार्याच्या गप्पा कशा मरू शकतात हे एक कोडेच आहे. अफगाणिस्तानमध्ये यातील प्रत्येकाला शांतता हवी आहे पण प्रत्येकाची शांततेची व्याख्या वेगळी असावी. अफगाणिस्तानमध्ये लोकशाहीवादी शक्ती सतत निर्बल राहाव्यात - त्याने भारताच्या मुठीत जाऊ नये आणि हा देश आपला बटिक असावा हे पाकिस्तानचे धोरण आहे. ते यशस्वी होण्याचा जोकाही फॉर्म्युला असेल तो पाकिस्तानला मान्य होईल. चीनसाठी मध्य आशिय मध्ये जाण्याच्या खुष्कीचा मार्ग उपलब्ध हो ऊन तो मालाच्या ने आणीसाठी निर्वेधपणे वापरता येण्याची हमी हा शांतता शब्दाचा अर्थ आहे. अमेरिकेला आणि चीनला अफगाणिस्तानमधील अपार खनिज संपत्तीवरती आपला पहिला हक्क हवा आहे. तो मिळत असेल तर ती त्यांच्या दृष्टीने शांतता ठरेल. याखेरीज अमेरिकेला अफगाणिस्तान आपल्या अंगठ्याखाली हवा आहे कारण तसे असले तरच तो रशिया आणि चीनच्या मध्य आशियातील ’घुसखोरी’ वरती नियंत्रण थेवू शकेल. याच कारणासाठी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून कधीच माघारी जाऊ शकणार नाही अशी चिन्हे आहेत.

या पार्श्वभूमीवरती अफगाणी तालिबान गटांमध्ये देशप्रेमासाठी लढा देण्याचे आवाहन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तसे झाले तरच ते गट पाकिस्तान पुरस्कृत तालिबानांशी टक्कर देऊ शकतील हे उघड आहे. ह्या परिस्थितीमध्ये QCG च्या यशाला काय मर्यादा आहेत हे स्पष्ट होईल. त्यातच तालिबानांचे राजकारण एखाद्या पुढच्या लेखामध्ये मी लिहिले की अफगाणिस्तानविषयक चित्र स्पष्ट होऊ शकेल.

No comments:

Post a Comment