५ जून रोजी सौदी अरेबिया - संयुक्त अरब अमिरात - इजिप्त - बाहरिन या देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडले असल्याची घोषणा केली आणि मध्यपूर्वेमधील संकटाने जगाला खडबडून जागे केले. इथून पुढे परिस्थितीमध्ये सुधारणा हवीच असेल तर कतारने काय काय करावे याची एक मोठी यादीच या देशांनी कतारकडे सोपवली. इराणशी संबंध तोडा - हमास आणि मुस्लिम ब्रदरहूड संघटनेच्या सभासदांची हकालपट्टी करा - या सभासदांचे बॅंक अकाऊंटस् गोठवा - त्यांच्याशी सर्व संबंध तोडा - गल्फ कोऑर्डिनेशन कमिटीच्या (GCC) विरोधात ज्या ज्या शक्ती काम करत आहेत त्या सर्वांची हकालपट्टी करा - दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचे धोरण बदला - इजिप्तच्या कारभारामध्ये ढवळाढवळ करू नका - अल् जझीरा वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण बंद करा - अल् जझीरा मुळे आखाती देशांना झालेल्या नुकसानाबद्दल माफी मागा - GCC च्या धोरणाशी विसंगत वर्तन करणार नाही अशी हमी द्या - अशा मागण्या जाहीर रीत्या नाही तरी अनौपचारिक रीत्या कतारला कळवण्यात आल्याचे सूचित होत आहे. कतारच्या निमित्ताने मध्य पूर्वेमध्ये निर्माण झालेल्या वादळाची व्याप्ती किती मोठी आहे आणि त्याची पाळेमुळे कशी खोलवर गेली आहेत त्याची जाणीव होते.
Rome was not built in one day असे म्हणतात. संघर्षाचेही तसेच असते. त्याची पाळेमुळे खूप खोलवर गेलेली असतात. मक्का आणि मदिना ज्या भूमीवर आहेत त्यावर स्वामित्व गाजवणार्या सौदी अरेबियाच्या राज्यकर्त्यांचा ठाम समज आहे की संपूर्ण मुस्लिम आणि खास करुन अरब जगताचे नेतृत्व आपल्याकडे आलेले आहे. राजघराण्याने अंगिकारलेला वहाबी इस्लाम सर्व मुस्लिमांनी स्वीकारावा आणि जगभर त्याचाच प्रसार व्हावा अशी त्याची भूमिका आहे. इस्लामी जगताच्या नेतृत्वाचे वरकरणी पांघरूण पसरून प्रत्यक्षात सौदी अरेबियाने स्वतःच्या सत्तेच्या रक्षणासाठी आणि आपले सत्तेचे खेळ खेळण्यासाठी गैर अरब मुस्लिम प्रजेचा आजवर वापर केला आहे. त्याच्या राजकारणासाठी त्यानेच दहशतवादी संघटनांचे समर्थन केले - त्यांना सर्व मदत केली आणि त्यामध्ये अरबी कमी पण गैर-अरबी मुस्लिम जनतेला ओढून घेतले आहे. म्हणजेच दार उल इस्लामचे जे स्वप्न सौदी अरेबियाने जगभरच्या मुस्लिमांना विकले आहे ते प्रत्यक्षात अरब नॅशनॅलिझमचे त्यांचे स्वतःचे स्वप्न आहे ज्याचे शिपाई म्हणून जगभरचे मुस्लिमांना त्याने कामाला लावले आहे. (पाकिस्तान आपला गुलाम आहे असे सौदी म्हणतो त्याची मुळे अशी स्पष्ट होतात.) सौदीच्या ह्या भूमिकेला साजेशी तेलाची अपार संपत्ती ईश्वराने त्या भूमीमध्ये दिली आहे. त्यामुळे अरब जगताचे नेतृत्व सौदीकडे निसर्गतःच गेले आहे. पण असे वर्चस्व न मानणारा एक मोठा वर्ग अरबस्तानात आहे. उदा. इराकच्या सद्दाम हुसेनने सौदी राजघराण्याच्या ह्या सत्तेला आव्हान दिले होते. कुवेट गिळंकृत केल्यावर सद्दाम आपले सैन्य सौदीकडे वळवेल अशी साधार भीती सौदीला होती. खरे तर दोघेही सुन्नी आणि दोघेही अरबच होते. सौदीला ज्याचे अस्तित्व खुपत होते असा दुसरा नेता म्हणजे लिबियाचा गडाफी. ह्या दोघांचाही काटा काढलाच पाहिजे असा लकडा सौदीनेच अमेरिकेकडे लावला होता. "सद्दामने सौदीवर आक्रमण केले तर?" ह्या भीतीने राजघराण्याची सत्ता टिकवण्यासाठी सौदीने आपल्या भूमीवरती अमेरिकन सैन्य तैनात केले होते हे विसरता येत नाही. पण ह्याच घटनेमुळे राजघराण्याचा लाडका ओसामा बिन लादेन आणि राजघराणे यांच्यात दुरावा निर्माण झाला. ह्या भूमीचे संरक्षण आम्ही करतो तुम्ही अमेरिकन सैन्य इथे बोलावू नका असे ओसामाचे ठाम म्हणणे होते. राजघराण्याने ते झिडकारले इतकेच नव्हे तर ओसामाला सौदी सोडून सुदानमध्ये आश्रय घ्यावा लागण्याची पाळी आली. सौदीच्या वर्चस्वाला आव्हान देणारा दुसरा देश म्हणजे कतार. सौदी इतकाच कर्मठ इस्लामी देश. कतारने अगदी सुरुवातीपासून इस्लामी जगतामध्ये अनेक प्रश्नांबाबत आपली स्वतंत्र भूमिका ठेवली आहे. इतकेच नव्हे तर सौदीला शह म्हणून हाकलून दिलेल्या ओसामा बिन लादेनलाही वेगळ्या प्रकारे मदत कतार करत होता. असे म्हणतात की कतारच्या राजघराण्याने ओसामाचा साथीदार आयमान अल् जवाहिरीसकट अन्य दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर आश्रय दिला होता. ही मंडळी वेगळ्या नावाने तिथे राहत होती. अगदी सरकारी नोकर म्हणून काहींची नोंदही होती. कतारच्या राजघराण्याचे त्यांना संरक्षण नसते तर अमेरिकेच्या कचाट्यातून ते सुटू शकले नसते.
सौदीच्या राजाचे आणि ओसामाचे इतके बिनसले होते की ओसामा राजाची सत्ताच उलथवून टाकायला निघाला होता. अशा ओसामाला अर्थातच कतारकडून संरक्षण मिळावे ह्यात आश्चर्य नाही. केवळ ओसामाच नाही तर राजाची सद्दी संपवायला निघालेल्या कोणालाही कतार कडून मदत मिळत असते. फार कशाला कतारच्या राजपुत्राने स्वतः लक्ष घालून जी वृत्तवाहिनी चालवली आहे आणि जिचा डंका सर्वत्र पिटला जातो त्या अल् जझीरा वाहिनीच्या प्रक्षेपणावरती सौदी अरेबियामध्ये बंदी आहे. बीबीसीवरची टिम सेबेस्तियन संचालित दोहा डिबेटस ही सुप्रसिद्ध मालिका आपल्या लक्षात असेल. इथे आवर्जून इस्लामी जगतामधले सुधारणावादी मतप्रवाह बघायला मिळत. असे मुक्त वाद सौदीमध्ये औषधालाही पाहायला मिळायचे नाहीत. तेव्हा कर्मठ सुन्नी असूनही सौदी आणि कतारमध्ये वैमनस्यच जास्त आहे.
तसे पाहिले तर आर्थिक व्हीजनचा विचार केला तर कतार अधिक पुढारलेला देश आहे. तेलावर अवलंबून रहता येणार नाही हे अनुमान सौदीने आता आता काढले आहे. तेलाव्यतिरिक्त इतरही उद्योगधंदे देशात असावेत ह्या दृष्टीने सौदी हल्लीहल्ली पावले टाकू लागला आहे. पण कतारने मात्र ह्यामध्ये काही वर्षांपासून काम सुरु केले आहे. पुढारलेल्या अमेरिकन युनिव्हर्सिटीज, बांधकाम व्यवसाय - पर्यटन - बॅंकिंग - इस्लामिक बॅंकिंग - ट्रान्सपोर्ट - आदि क्षेत्रामध्ये कतारने पसारा वाढवला आहे.
पण दहशतवादी संघटनांना कतारकडून मिळणारा पाठिंबा लपून राहण्यासारखा नाही. अफगाणिस्तानमधून अल् कायदाला रामराम ठोकावा लागला तेव्हा त्यांचे अधिकृत ऑफिस दोहामधूनच चालत होते. हमास - अल् कायदाचे जुळे भावंड अल् नुसरा - अल् कायदा इन् साउथ अशिया (AQSA) - येमेनमध्ये घुसवलेले अल हूदी यांना पाठिंबा - ’अरब स्प्रिंग’ ह्या विविध अरबी देशांमध्ये झालेल्या उठावाच्या वेळी कतारने मुस्लिम ब्रदरहूडला केलेली मदत - ह्या सर्वांमुळे कतारच्या भूमिकेबाबत असलेले आक्षेप वाढतच होते. त्यातून इराणमध्ये रूहानी पुनश्च निवडून आले तेव्हा कतारच्या राजपुत्राने त्यांना अभिनंदनपर फोन केला तसेच इस्राएलबद्दल चार शब्द त्यांच्या गोटातून आले तेव्हा कतारच्या उद्दिष्टांबद्दल सौदीचा संशय दृढ झाला.
खुद्द कतारमध्ये जवळजवळ १०००० अमेरिकन सैन्य हजर आहे. कतारच्या विमानतळांचा वापर अमेरिका इराक आणि सिरियामधील इसिस् विरोधामधल्या लढाईसाठी करते. त्यामुळे ट्रम्प साहेबांचा सौदीला पाठिंबा असला तरी अमेरिका दोन्ही पक्ष सांभाळेल असे दिसते. भारताबद्दल काय सांगावे? दोवल साहेबांचे संबंध कतारशी चांगलेच आहेत. असे म्हणतात कतारचे आणि इसिसचे चांगले संबंध वापरूनच भारताने तिथे अडकलेल्या नर्सेसची सुटका केली. एकंदरित भारताचे आणि सौदी - इराण कतार - सिरिया सर्वांमधले चांगले संबंध बघता कधी ना कधी ह्यांच्यामधला मध्यस्थ म्हणून भारत भूमिका निभावेल अशी भविष्यात शक्यता असू शकते.
No comments:
Post a Comment