Saturday 3 June 2017

रूहानींची बिकट वाट





रूहानींची बिकट वाट

१९ मे रोजी इराणमध्ये निवडणुका झाल्या - त्याचे निकाल २० मे रोजी जाहीर झाले. ह्या निवडणुकीमध्ये हसन रूहानी पुनश्च अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. याअगोदर २०१३ साली निवडणूक पहिल्यांदा जिंकणार्‍या रूहानी यांची ही दुसरी कारकीर्द असेल. ह्या निवडणुकीचा खास उल्लेख अशासाठी केला आहे की  रूहानींच्या विजयामुळे अत्यानंद झालेले नागरिक - अगदी स्त्रियांसकट - तेहरानच्या रस्त्यांवरती मनामध्ये इस्लामी कायद्याची कोणतीही भीती न ठेवता सैरभैर हो ऊन जल्लोष करायला उतरले. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले तर नाहीच पण स्मितहास्य करत प्रोत्साहनच दिले. १९७९ मध्ये इराणच्या शहाची उचलबांगडी करून जे एक सत्तापर्व सुरु झाले त्यानंतर ह्या जनतेने खूप भोगले आहे. रूहानी यांची निवड करून आता हे इस्लामी कट्टरतेचे पर्व संपवा असा आपल्या मनामधला आक्रोश ही जनता न घाबरता मांडत होती. त्यांचा उत्साह बघून रूहानी यांना स्फूर्ती मिळायला हरकत नाही.

तसेही इराणमध्ये १९८१ पासून प्रत्येक अध्यक्षाला जनतेने दोनदा निवडले आहे. त्यांच्या अगोदरचे अध्यक्ष अहमदीनीजद हे इराणचा अणुकार्यक्रम न सोडण्यासाठी आणि त्यासाठी अमेरिकेचा रोष पत्करण्यासाठी ओळखले गेले. रूहानी त्यामानाने सौम्य आहेत. आपली पहिली कारकीर्दीमध्ये त्यांनी इराणचे आर्थिक प्रश्न सोडवण्याकडे लक्ष घातले. शिवाय इराणवरील आर्थिक संबंध उठवण्याच्या अटीवरती त्यांनी युनोशी (आणि पर्यायाने अमेरिकेशी सुद्धा) करार केला. अहमदीनीजद यांनी अंगिकारलेल्या संघर्षाच्या मार्गाचा त्याग करत कमीत कमी विरोधाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. (Path of Least Resistance) आपल्या पहिल्या कारकीर्दीमध्ये त्यांनी केलेल्या कामाला जनतेने पसंती दिली आहे पण तिची पार्श्वभूमी काय हे उद् बोधक आहे.

अयातोल्ला खोमेनी यांच्या नंतर आलेले इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आता कर्करोगग्रस्त झाले आहेत. त्यांच्या जागी कोणी तरी उत्तराधिकारी असणे गरजेचे आहे. म्हणून खामेनी यांनी इब्राहिम रईसी यांना पुढे आणले ते इराणच्या सर्वात मोठ्या धर्मादाय संस्थेचे प्रमुख म्हणून. त्याअगोदर रईसी इराणी न्यायसंस्थेमध्ये काम करत. तिथे त्यांनी अटॉर्नी जनरल आणि डेप्यूटी चीफ जस्टीस म्हणून पदे भूषवली. रईसी हे अर्थातच इराणमधील कट्टरपंथी इस्लामवादी आहेत आणि ते त्याच गटातर्फे निवडणुकीमध्ये उभे होते. न्यायसंस्थेच्या कामामध्ये ते आपल्या विरोधकांना अत्यंत निर्दय वागणूक देत असत अशी त्यांची ख्याती आहे. खामेनी यांनी कट्टरपंथी गटाची ताकद रईसी यांच्यामागे उभी केली होती. १९७९ पासून इराणमध्ये जो मार्ग अवलंबला गेला त्याच मार्गाने जाण्याचे वचन रईसी देत होते तर त्यांचे विरोधक आणि सत्तारूढ रूहानी मात्र जनतेला प्रिय वाटणारा मार्गाचे उच्च रवाने प्रतिपादन करत होते.

इरानची अर्थव्यवस्था आजही सरकारी कह्यात आहे. रईसी यांना उच्चशिक्षित तंत्रज्ञ व्यवस्थापक म्हणून नको आहेत तर त्यांना धार्मिक गुरुंची वर्णी अशा जागी लावायची आहे. जागतिकीकरणाला विरोध - रशियाकडे आणि पर्यायाने चीनकडे झुकलेली परराष्ट्रनीती - पाश्चात्य विरोधी धोरण - जगामध्ये शिया राजवटींचे समर्थन - सिरियाच्या बश अल् असद यांची सत्ता टिकवण्याला प्राधान्य - लेबॅनॉनमध्ये हिज़्बोल्लाचे समर्थन - मुक्त संस्कृतीला विरोध - स्त्रियांना कमी लेखण्याची प्रवृत्ती हे जे ’पॅके” रईसी जनतेला देऊ पाहत होते ते आवडायचे दिवस आता संपले. एक काळ असा होता की अमेरिकेचा दास बनला म्हणूनकट्टरपंथी इस्लामने इराणचे जीवन व्यापून टाकले होते. आज समाज ती मूल्यव्यवस्था स्वीकारायला तयार नाही.

निवडणुकीमध्ये रूहानी यांना ६०% इतकी मते देऊन जनतेने निर्विवादपणे हे सिद्ध केले की त्यांना कशाप्रकारच्या भविष्याची आस लागली आहे. तेहरानच्या र्स्त्यावरती उतरलेल्या लोकांच्या हाती फलक होते ते बाय बाय रईसी सांगणारे. त्या जमावामध्ये मध्यमवर्गीय इराणी होते तसेच गरीबही. फाटके बूट घालून फिरणारे बेकारीचा सामना करणारे तरूण होते तर काही गाड्या घेऊन फिरत होते. गाड्यांमध्ये मोठ्या आवाजातले संगीत चालू होते. पायी फिरणारे तरूण मुठी उंचावून रूहानी यांचे स्वागत करत होते. बेभान होऊन गात - नाचत होते. डोळ्यावर पाश्चात्य धर्तीचे गॉगल्स - पाश्चात्य धर्तीचे टीशर्ट घातलेले तरूण गर्दीत होते. कुटुंबवत्सल माणसे बाबागाड्यांमध्ये लहानग्यांना घेऊन आले होते. स्त्रिया मुक्तपणे वावरत होत्या - जल्लोषामध्ये सामिल झाल्या होत्या. लोकांचा उत्स्फूर्त जमाव वैशिष्ट्यपूर्ण अशासाठी होता की लोकांना आता स्वातंत्र्य हवे आहे. कधी नव्हे तो कित्येक वर्षांनंतर इराणमध्ये लोक उघड उघड राजकीय घोषणा देत होते. २०११ साली तुरुंगात टाकलेल्या माजी पंतप्रधान मीर हुसेन मुसावी - त्यांची पत्नी जेहरा - माजी लोकसभा अध्यक्ष मेहदी करूबी यांची सुटका करावी अशी मागणी होत होती. इतके होऊनही पोलिस लोकांना अडवत नव्हते. 

कट्टरपंथी इस्लामच्या जोखडाखाली भरडले गेलेले हे लोक आता स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत आहेत. ह्या बदलाचा अर्थ पुन्हा एकदा समजून घ्यावा. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर मुस्लिम समाजामध्ये कट्टरपंथ नाकारण्याची लाट आली आहे आणि भारतीय मुसलमानच जगाला यातून सुटकेचा मार्ग दाखवेल असे मी म्हटले होते. (http://swatidurbin.blogspot.in/2017/03/blog-post_78.html) इराणची निवडणूक हाच संकेत देत आहे. कट्टरपंथीय इस्लामच्या मागे मुस्लिमजनता जायला राजी नाही हा प्रचंड मोठा बदल आहे. तो सहजासहजी पचनी पडणार नाही. जे इराणमध्ये होते ते पाकिस्तानात झाल्याशिवाय राहिल का? मुस्लिम जगतामधला हा भूकंप असा आहे की ज्याची चीन - रशिया आणि अमेरिकेनेही दखल घ्यावी. इराणची जनता हा कौल देत होती आणि स्वातंत्र्याची मागणी करत होती तेव्हाच ट्रम्प साहेब सौदी अरेबियामध्ये इराणविरोधात आघाडी करण्यासाठी पुढाकार घेत होते. इस्राएलला अण्वस्त्राम्च्या धमक्या देणार्‍यांना जनतेने घरात डांबले आहे. ते सहजासहजी आपली सत्ता सोडणार्‍यातले नाहीत. पण अशावेळी उदारमतवादी चेहरा असलेल्या नेत्यांच्या मागे उभे राहण्याची भूमिका बजावता आली तरी परिस्थितीमध्ये फरक पडण्यास हातभार लागेल. रूहानी यांची वाट बिकट आहे. पण आजवरच्या अनुभवामधून जनतेने त्यांच्यावर टाकलेला विश्वासाला ते पात्र ठरतील अशा भविष्याची आपणही अपेक्षा करू या. 


No comments:

Post a Comment