Saturday, 24 June 2017

श्रीमती मीरा कुमार यांच्या निमित्ताने


Image result for jagjivan ram




सोनियाजींच्या कॉंग्रेसने ’आपले’ माजी ज्येष्ठ नेते श्री जगजीवन राम यांची सुकन्या - पूर्वाश्रमीच्या आय ए एस अधिकारी - लोकसभेचे सभापतीपद भूषवणार्‍या श्रीमती मीरा कुमार यांची आपल्या पक्षातर्फे राष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून निवड केली आहे. या निमित्ताने जातीविशिष्ठ राजकारण आणि शेरेबाजीला ऊत आला आहे. जगजीवन राम यांना पंतप्रधानकी मिळू शकली नाही त्याची भरपाई अशा तर्‍हेने केली जात असल्याचेही वाचण्यात आले. यावरून हा जुना इतिहास आठवला म्हणून लिहिते.

श्री जगजीवन राम यांनी कॉंग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. १९४६ पासून ते जवळजवळ १९७८ पर्यंत ते केंद्रात मंत्री होते. घटनासमितीचे सभासद होते. १९६९ मध्ये कॉंग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि सिंडिकेट आणि इंडिकेट असे दोन घटक वेगळे झाले तेव्हा ते इंदिराजींसोबत होते व त्यांच्या कोंग्रेसचे अध्यक्षही होते. जून १९७५ मध्ये इंदिराजींनी देशावर आणिबाणी लादली तेव्हाही ते केंद्रात मंत्री होते. पण जानेवारी १९७७ मध्ये इंदिराजींनी देशामध्ये निवडणुकांची घोषणा केली तेव्हा बाबूंनी मंत्रीमंडळ सोडले आणि ते सर्व विरोधी पक्ष एकत्रित विसर्जित करण्यात आले त्या जनता पक्षामध्ये दाखल झाले. इंदिराजींचा एक महत्वाचा मोहरा जनता पक्षाकडे आला होता. हा बाईंना एक जबर धक्का होता. पण त्या सावध होत्या. जनता पक्ष म्हणजे संत्रे आहे - साल काढले की आतल्या सर्व फोडी वेगळ्या होतील अशी टिप्पणी त्या निवडणूक प्रचारामध्ये करत होत्या. 

जून १९७५ मध्ये बाईंनी मध्यरात्री राष्ट्रपतींची सही अंतर्गत आणिबाणीच्या वटहुकूमावरती घेतली पण तसा ठराव करणारी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक दुसर्‍या दिवशी सकाळी घेण्यात आली होती असा गौप्य स्फोट बाबूजींनी केला आणि आणिबाणीच्या कायदेशीर वैधतेवर आणि इंदिराजींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. ह्याच वातावरणामध्ये कॉंग्रेस निवडणुकीमध्ये भुईसपाट झाली. जे १५०+ खासदार निवडून आले ते दक्षिणेकडील राज्यांनी दिलेल्या हातामुळे. 

देशामध्ये प्रथमच गैरकॉंग्रेसी विरोधी पक्षाचे सरकार येत होते. त्यामुळे जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. संपूर्ण क्रांतीचा नारा देणार्‍या जयप्रकाशजींचे नेतृत्व मान्य करण्याच्या अटीवरती सर्व पक्ष विलीन झाले होते. जगजीवन राम यांना आणि इतर अनेकांना पंतप्रधानकीचे स्वप्न पडले होते. पण निवडीचा अधिकार सोपवण्यात आला होता जेपींकडे. जयप्रकाशजींनी श्री मोरारजी देसाई यांचे नाव सुचवले त्यामुळे मान्य करावेच लागले. पण गुरगुर करणार्‍या चरण सिंग आणि जगजीवन राम यांना उपपंतप्रधान म्हणून घोषित करावे लागले. जेपींसमोर काही चालणार नाही हे ओळखून जगजीवन राम चूप बसले.

पुढे जनता सरकार संजय गांधींना अटक करणार अशा हालचाली दिसू लागताच बाईंनी सरकार कोसळवण्याच्या हालचाली सुरु केल्या. जनता पक्ष म्हणजे संत्रे आहे ह्या आपल्या विधानावर बाईंचा पूर्ण विश्वास होता. म्हणूनच चरण सिंग यांच्या पंतप्रधान होण्याच्या महत्वाकांक्षेला फुंकर घालत त्यांनी फाटाफूट घडवणार्‍या हालचाली सुरु केल्या. ह्या दरम्यान स्वतःला चरणसिंग यांचा चेला म्हणवणारे आणि रायबरेलीमध्ये इंदिराजींना १९७७ च्या निवडणुकीमध्ये ५५ हजार मतांनी हरवणारे श्री राजनारायण गुप्त रीत्या संजय गांधी यांना भेटत होते. अखेर कट ठरला - एके काळी बाईंच्या पंतप्रधानकीला सिंडिकेट कॉंग्रेसतर्फे आव्हान देणार्‍या मोरारजींच्या खुर्चीखालची सतरंजीच ओढण्याची तयारी बाईंनी केली. बाहेर पडलात तर कॉंग्रेस तुमच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देईल असे आश्वासन बाईंनी राजनारायण - चरणसिंग दुकलीला दिले. त्यानुसार हे दोघे नेते सरकारमधून बाहेर पडले. त्याकाळी पक्षांतरविरोधी कायदा नव्हता. त्यामुळे पक्षात फूट पाडणे सोपे होते. खरोखरच बाईंनी संत्र्याचे साल सोलून जनता पक्षाच्या फोडी करून देशाला दाखवल्या. ’आम्ही सगळ्या गांधीजींच्या बोडक्या म्हातार्‍या आहोत. देशाचे भले व्हायचे असेल तर आम्हा म्हातार्‍यांना हटवून तरूण पिढीने सूत्रे हाती घ्यावीत’ अशी भाषणे राजनारायण तेव्हा जनता पक्षाच्या सदस्यांसमोर करत असत आणि तरूण नेतृत्व म्हणून संजयची स्तुतीही करत - क्वचित कधी तरी!!

अर्थात फूट पडली म्हणून चरणसिंग पंतप्रधान झालेच असे म्हणता येत नव्हते. बाबूजीही गळ टाकून बसले होतेच. त्यांनाही कॉंग्रेसचा म्हणजे इंदिराजींचा पाठिंबा चालला असता. ह्याच दरम्यान बाबूजींच्या मुलासंदर्भात काही सनसनाटी वृत्तांत आणि सेक्स स्कॅंडल काही वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केले. ही छायाचित्रे घेणारी व्यक्ती आज जदयु’मध्ये आहे पण त्याकाळी ते राजनारायण यांच्या गटात होते. ते प्रसिद्ध करण्यात संजय गांधी यांची पत्नी आणि इंदिराजींची सून मनेका गांधी यांच्या संपादकत्वाखाली निघणार्‍या ’सूर्य’ साप्ताहिकाने पुढाकार घेतला होता. अशा रीतीने कॉंग्रेस - राजनारायण - चरणसिंग युतीने बाबूजींच्या पंतप्रधानकीच्या दाव्यातील हवा काढून घेतली.  त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले बाबूजी म्हणाले - इस कंबख्त मुल्क में चमार कभी प्राईम मिनिस्टर नहीं बन सकता! आणि त्यांची ही संधी घालवणार्‍यांच्या नावाने टिळा लावणारे त्यांचे वारसदार श्रीमती मीरा कुमार ह्या दलित उमेदवार असल्याचे ठासून सांगत आहेत. सिंबॉलिझमच्या मागे धावणार्‍या आजच्या कॉंग्रेसवाल्यांची त्यामागची गणिते वेगळीच आहेत. 

आहे ना Poetic Justice? असो. मोरारजींचे सरकार अशा विश्वासघाताने पाडले म्हणून उद्विग्न झालेल्या सामान्य जनतेपैकीच मीही एक होते. यानंतर १९७८च्या शेवटाला निवडणुका झाल्या तेव्हा इंदिराजी प्रचारादरम्यान आवर्जून ह्या सरकारच्या परराष्ट्र धोरणावर खरपूस टीका करत होत्या. आपण दिलेल्या मार्गाने न जाता धोक्याच्या नव्या वाटा धुंडाळल्या गेल्या म्हणून जाहीर तक्रार करत होत्या. जी वाट ठरवली त्यावर आम्ही वारंवार ठेचकाळून पडलो पण पुन्हा पुन्हा उठून त्याच रस्त्याने मार्गक्रमण करत राहिलो ही त्यांची वाक्ये टीव्हीवरील भाषणात ऐकलेली मला स्पष्ट आठवतात. १९७१ साली रशियासोबत दीर्घकालीन २५ वर्षांचा करार करणार्‍या इंदिराजींचे ’ते ’ धोरण मला भिववून टाकीत होते हे खरे आहे. पण १९७९ च्या डिसेंबरमध्ये रशियन फौजा अफगाणिस्तानमध्ये घुसल्याच्या बातम्या आल्या तेव्हा देशात खंबीर नेतृत्वच हवे असेही वाटू लागले होते. ह्या घटनेनंतर भारताच्या परसदारामध्ये महासत्तांचा शिरकाव झाला आणि देशांतर्गत राजकारणही बदलून गेले. मोरारजीभाईंनी अमेरिकेकडे झुकण्याच्या नादात आणि आणिबाणीमध्ये रॉ ने दिलेल्या त्रासाच्या त्राग्याने ’रॉ ’ची गुपिते चक्क जनरल झिया यांच्याकडे उघड केली हे कालांतराने वाचले तेव्हा १९७८ साली बाई खरे बोलत होत्या त्याची साक्ष मिळाली. मोरारजीभाईंना निशान ए पाकिस्तान किताब का मिळाला त्याचा उलगडा कित्येक वर्षांनी झाला. अमेरिकन लेखक सेमूर हर्ष यांनी मोरारजी भाई सी आय एचे एजंट असल्याचा लेख लिहिला होता. एका माजी पंतप्रधानावरील आरोप म्हणून त्याला भारत सरकारने अधिकृतरीत्या हरकत घ्यावी अशी मोरारजींची इच्छा होती. पण बाई ठाम होत्या - त्यांनी दाद दिली नाही. शेवटी मोरारजींनी वैयक्तिक दावा गुदरला. त्याचे संदर्भ असे गुंतागुंतीचे होते. आज मीरा कुमार यांचे प्रतिस्पर्धी असलेले श्री रामनाथ कोविंद यांनी (पंतप्रधान होण्यापूर्वी) मोरारजीभाईंचे OSD - Officer on Special Duty - म्हणून काम केले होते हा एक वेगळाच संदर्भ ठरावा. 

काळाच्या उदरामध्ये अशीच गुपिते दडलेली असतात. सुभाषबाबूंचे काय झाले असेल हे देशाला समजायला किती वर्षे जावी लागली? पुढची पिढी अशा कथा वाचेल तेव्हा आजच्या राजकारणाचे आणि व्यक्तींचे मूल्यमापन बदलून जाईल खरे. 

No comments:

Post a Comment