Monday, 11 March 2019

दोवल यांचे काय चुकले??




"मासूद अझरला भारतीय तुरूंगातून बाहेर काढून कंदहारला कोण घेऊन गेले होते? हेच अजित दोवल ना? मोदीजी - जनतेला खरे काय ते कळू द्या!" अशा अर्थाचे ट्वीट काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांनी केले आहे. त्यावरून अर्थातच एकच गहजब झाला आहे.

खरे तर राहुल काय लिहितात वा बोलतात त्याकडे कोणी फारसे गंभीरपणे बघत नसले तरी त्यांच्या अज्ञानाचे आणखी एक उदाहरण तेच स्वतः आपल्या हाती आणून देत असल्याने असे झाले की भाजप फळीमध्ये आनंदाची लहर येत असते. त्यांचे हे नवे ट्वीट त्याला अपवाद नाही.

IC814 विमानाचे अपहरण झाले तेव्हा भारत सरकारने अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करण्यासाठी ज्यांना नेमले होते त्यामध्ये आयबी तर्फे त्यांचे अॕडिशनल डायरेक्टर म्हणून श्री अजित दोवल व आयएफएस मध्ये काम केलेले श्री काटजू यांची नावे होती. या निमित्ताने हे मंडळ कंदहारला गेले होते. अपहरणकर्त्यांच्या मूळ मागणीमध्ये १३५ कैद्यांना भारताने सोडावे अशी अट होती. पण मंडळाने व खास करून दोवल यांनी हा आकडा तीनवर आणला. तरीही त्यांचे स्वतःचे समाधान झाले नव्हते.

या निमित्ताने तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री ब्रजेश मिश्र यांच्याशी दोवल यांची खडाजंगी झाली. कैदी सोडण्याच्या मिश्र यांच्या निर्णयाला दोवल यांनी कडाडून विरोध केला होता. अर्थात निर्णय सरकारला घ्यायचा होता. वाजपेयी सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन आपण काय करणार आहोत हे सर्वांच्या कानी घालून त्यांची मतचाचपणी करून अंतीम निर्णय घेतला होता.

यानंतर सरकारतर्फे अंतीम फेरीसाठी मंडळाचे प्रमुख म्हणून श्री जसवंत सिंगही कंदहार येथे पोहोचले होते. इथे जसवंत सिंग केवळ परराष्ट्र मंत्री म्हणून नव्हे.  सरकारतर्फे Point Man with plenipotentiary powers इतक्या शक्तिशाली स्थानावरून टीमचे नेतृत्व जसवंत सिंग यांच्या वर सोपवण्यात आलेले होते. (point man म्हणजे आपल्या तुकडीचे नेतृत्व करणारा सोल्जर plenipotentiary powers म्हणजे सरकारतर्फे जागीच निर्णय घेण्याची क्षमता ज्याला सरकारने बहाल केली आहे अशी व्यक्ती)

कंदहार प्रसंगी दोवल आयबीचे प्रमुख पदावरही नव्हते. त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला हे म्हणणे हास्यास्पदच आहे. तसेच जो निर्णय सर्वांच्या कानी घालून घेतला गेला होता त्या बैठकीत गांधी यांच्या काँग्रेसने आपली संमती दिली होती किंवा कसे हे प्रथम गांधी यांनी जनतेसमोर येऊ द्यावे. म्हणजे पानी का पानी दूध का दूध होऊनच जाईल.

असो. राहुल गांधी यांचे नेमके दुःख काय आहे?? दोवल नावाचे गळू त्यांना कुठे ठुसठुसते आहे आणि गळूमुळे लागलेल्या  ठणक्याने मेंदू चालत नसल्यासारखे व भ्रमिष्ट झाल्यासारखे ते बोलत आहेत काय?? आता जे गळू गांधींना ठुसठुसते तेच पिंडीला ठुसठुसते हा भाग वगळला तरी मूळ प्रश्न तसाच राहतो.

आजपर्यंत ज्यांनी सत्तेवर असताना स्वहस्तात स्वतःहून बेड्या घालून घेतल्या होत्या, पाकिस्तान कडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायचे सोडून जे Strategic Restraint नावाच्या गोंडस शब्दाआड आपले दौर्बल्य व क्लैब्य झाकायचा प्रयत्न करत होते त्यांना दोवल यांचे Offensive Defence हे तत्त्व गळ्याखाली उतरू नये यात नवल काय??

पंचाईत अशी आहे की निवडणुकीच्या तोंडावर मोदींच्या मर्दानगीला आव्हान दिले तर आपली मते कमी होतील या भीतीने काँग्रेस व पाकिस्तान मोदी यांना लक्ष्य न बनवता दोवल यांच्या वर प्रहार करत आहेत. आणि तसे करताना वस्तुस्थितीला फाटा देत धादांत खोटे आरोप करत आहेत. असे करत असताना देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे मनोधैर्य आपण खच्ची करत आहोत याचीही त्यांना पर्वा नाहीच.

गांधी यांच्या आरोपाने दोवलांचीही गाय मरणार नाही आणि मोदींचीही. या तमाशातून पुढे आले आहे ते एकच नागवे सत्य!!! या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी देशाने गांधी यांच्या वर टाकण्याइतकी पोच व समज त्यांच्या कडे नाही आणि काँग्रेसच्या अन्य जबाबदार व्यक्तींकडेही नाही.

तेव्हा देश सुरक्षित ठेवायचा तर पंतप्रधान मोदीच हवेत.

जयहिंद

#Modifor2019

1 comment: