Friday 1 March 2019

अब्दुल हमीद ते अभिनंदन वर्तमान

08abdul-hamid1
Image result for abhinandan varthaman



पाकिस्तानच्या तावडीतून काल विंग कमांडर अभिनंदन वर्तमान सुखरूप परतला ह्या बातमीने करोडो भारतीयांच्या जीवाला दिलासा मिळाला आहे. माणुसकीचा एक भाग सोडला तर त्याच्याविषयी जे अपार कौतुक जनतेमध्ये आहे त्याला कारण आहे त्याने छेडलेली आणि जिंकलेली विषम लढाई. समोर एफ १६ सारखे अत्याधुनिक विमान असूनही आपल्या हाती असलेल्या मिग २१ विमानाने त्याच्याशी टक्कर देण्याची जिगर अभिनंदनने दाखवली इतकेच नव्हे तर ते अत्याधुनिक एफ १६ विमान त्याने पाडून दाखवले त्यासाठी भारतीय पिढ्यानुपिढ्या त्याचे नाव कधी विसरू शकणार नाहीत. इतके झाल्यानंतर अभिनंदनच्या जुनाट मिग २१ विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे त्याला विमानातून खाली उडी मारावी लागली. मिग २१ कोसळले पण अभिनंदन सुखरूप धरतीवर उतरला. वार्‍याच्या दिशेमुळे तो नियंत्रण रेषेपलिकडील पाकव्याप्त काश्मिरच्या भूमीवरती उतरल्यानंतर प्रसंगावधान राखून त्याने आपल्याकडचे संवेदनशील कागदपत्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि काही कागदपत्रे तर गिळूनही टाकली असे समजते. यानंतर एक भारतीय वैमानिक आपल्या हद्दीमध्ये उतरला आहे हे जाणून पाकिस्तानने जवळच्या गावकर्‍यांना बोलावून त्याला यथेच्छ चोप देण्यास उत्तेजन दिले आणि नंतर सोळभोकपणे आपण त्याला कसे वाचवले याची फिल्मही काढली. अभिनंदनचे नशीब जोरावर होते. कारण इथे केंद्रात हात पाय आणि थोबाड बांधून बसलेल्या कोणा १० जनपथच्या सरदाराचे राज्य नव्हते तर ५६ इंच छाती असलेल्या मोदी सरकारचे राज्य होते. पाकिस्तानला हग्या दम भरल्यानंतरच अभिनंदनला जिनिव्हा कराराच्या तरतूदींनुसार सोडण्याची पाळी त्याच्यावर आली. त्यातही वदंता अशी आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ह्यांनी आय एस आय किंवा सैन्य अथवा दोघांच्या संमतीशिवाय त्याला सोडण्याची एकतर्फी घोषणा आपल्या संसदेमध्ये केली. अभिनंदनला सुखासुखी सोडायला ही मंडळी किती नाखुष असतील ह्याची कल्पना काल त्याच्या सुटका नाट्य़ामध्ये आपल्याला पहायला मिळाली नाही काय? एक तर दिवस सुरू झाला तेव्हापासूनच विलंबाला सुरूवात करण्यात आली. मग वाघा सीमेपर्यंत आणून त्याला पुनश्च मागे नेण्यात आले. कागदपत्रे तयार ठेवण्यात आलेली नव्हती. जर सोडण्याचा निर्णय झालेला होता तर ह्या बाबींना इतका वेळ का लागावा बरे? दुपारी दोन वाजल्यापासून त्याच्या आगमनाच्या बातम्या येत होत्या पण जेव्हा रात्री नऊ उलटून गेले तरी तो पाकिस्तानच्याच ताब्यात आहे हे टीव्हीवरून सांगितले गेले तेव्हा हृदयाचे ठोके चुकले. याच जोडीने इथले फेकू लिब्बू इम्रान खानच्या औदार्याच्या कथा भारतीयांच्या मनावर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. मित्रहो हे सगळे नाट्य घडत होते तेव्हाही सीमेवरती शांतता नव्हती. शत्रूच्या तोफा धडधडतच होत्या. आणि आमचे जवान डोळ्यात तेल घालून सीमेच्या रक्षणामध्ये गुंतले होते. इतकेच नव्हे तर कालच्या घुसखोरीमध्ये काही जवानांना प्राणही गमवावे लागले. तेव्हा इम्रान खान ह्यांच्या औदार्याच्या बाता ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये कोणीही भारतीय नाही हे लिब्बूंनी आपल्या ठसाठस भरलेल्या डोक्यामधील अडगळ बाहेर फेकून देऊन नवी जागा तयार करून भरवून घ्यावे. 

अभिनंदन जीवंत आहे, सुखरूप आहे. विमानातून उडी मारणार्‍या वैमानिकाला पाठीच्या कण्याच्या आजाराला सामोरे जावे लागते सर्वश्रुत आहेत. निदान काल तरी तो ताठ उभा आहे असे दिसले तरी उजवा पाय ओढत चालत असल्यासारखे वाटले. त्याची यथायोग्य वैद्यकीय चाचणी तर होईलच आणि त्यावर इलाजही होतील पण हा पराक्रमी विंग कमांडर इथून पुढे भर युद्धात भाग घेऊ शकेल का ह्यावरच्या प्रश्नचिन्हाला अजून उत्तर मिळालेले नाही. अर्थात त्याने जो पराक्रम केला आहे त्याने तर तो भारतीयांच्या हृदयामध्ये कायमचे स्थान मिळवून जीवंतपणी अजरामर झाला आहे. ह्यासाठी त्याचे किती कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. 

अभिनंदनची कथा ऐकून आठवण येते ती १९६५ च्या युद्धाची आणि त्यामध्ये लढलेल्या एका हवालदाराची ज्याचे नाव होते अब्दुल हमीद. १९६५ च्या युद्धामध्ये पंजाबमधील खेम करण युद्धक्षेत्रामध्ये पाकिस्तान्यांना घुसू न देण्याचे आदेश होते. इथे पाकडे आपले अत्याधुनिक अमेरिकन पॅटन रणगाडे घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत होते. १९६५ सालच्या युद्धामध्ये रणगाडा हे एक नाविन्याचे वाहन होते. आम्ही भारतीयांनी त्याविषयी पहिल्यांदाच काही ऐकले होते. पाण्यातून आणि जमिनीवरून - रस्ता असो वा नसो - कशाही खडबडीत वाटेवरून रणगाडा नेता येतो आणि त्याच्या डोक्यावरती बसवलेल्या तोफा वापरून समोरच्या शत्रूला भुईसपाट करता येते हे त्यांचे वर्णन अद्भुत वाटत असे. रणगाड्याचा मुकाबला करायचा तर आपल्याकडेही रणगाडाच हवा अशी केवळ आमचीच नाही तर जगाची समजूत होती. मित्रांनो ते दिवस असे होते की पाकिस्तान हे अमेरिकेचे आवडते तट्टू होते पण भारताच्या मागे कोणी एक बलाढ्य शक्ती होती असे नाही. दिल्लीच्या तख्तावरती गैर नेहरू कुटुंबातील शास्त्रीजी विराजमान होते. संपूर्ण जगामधून भारतासाठी साधी सहानुभूती सुद्धा नव्हती. मग भारताकडे आधुनिक शस्त्रास्त्रे कुठून असणार? 

खेमकरण जवळ अब्दुल हमीदला आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्याच्याकडे होती रिकॉईललेस बंदूक. समोरून येणार्‍या रणगाड्यांचा मुकाबला करायचा तर एंटी टॅंक डिटॅचमेंट कमांडर नियुक्त केला जातो. पण अब्दुल हमीदच्या तुकडीमध्ये असा कोणी अधिकारी नव्हता आणि कोणी पाठवला जाण्याची शक्यताही नव्हती. तेव्हा तूच हे काम हाती घे असा आदेश देण्यात आला. समोरून येणारे रणगाडे आग ओकत होते आणि त्यांनी डागलेले गोळे यार्डायार्डावर पडत होते. हिंमत न हारता अब्दुलने आपल्या हाती असलेल्या आरसीएल गनने रणगाड्यांवर हल्ला चढवला. आणि दोन रणगाड्यात स्फोट होऊन ते निकामी झाले. हेच तंत्र वापरून अब्दुलने दुसर्‍या दिवशीही  आणखी दोन रणगाडे उडवले. अमेरिका जे पॅटन रणगाडे टॉप ऑफ द लाईन हत्यार म्हणून मिरवत होती तेच रणगाडे साध्या आरसीएल गनने कसे उडवता येतात हे अब्दुलने दाखवून दिले. त्याचा अतुलनीय पराक्रम चालूच राहिला. अखेर शत्रू रणगाडे सोडून पळाल्यावरती अब्दुलने त्यांनी सोडलेले रणगाडेही आपल्या ताब्यात घेतले. तिसर्‍या दिवशीच्या युद्धामध्ये अब्दुल हमीद कामी आला ते देखील शत्रूचे आणखी दोन रणगाडे उडवयानंतरच. एकूण आठ रणगाडे उडवणार्‍या ह्या वीराकडे संपूर्ण जगाचे लक्ष तेव्हा लागले होते. सैन्याने त्याचा परम वीरचक्र देऊन यथोचित सन्मान केला. 

मित्रांनो अब्दुल हमीदच्या कथेने त्यादिवसात आम्ही असेच हेलावून गेलो होतो जसे आज तुम्ही अभिनंदनच्या पराक्रमाने सद्गदित झाला आहात. अभिनंदनच्या हाती काय होते? मिग २१? हे म्हणजे १९८० च्या दशकातील मारूती ८०० ने आजच्या बी एम डब्ल्यूला शर्यतीमध्ये हरवण्यासारखे आहे. अभिनंदनच्या शौर्याने आणि त्याने दाखवलेल्या अतुलनीय यांत्रिकी कौशल्याने सगळे जग स्तिमित झाले आहे. मिग २१ बनवणार्‍या रशियाची छाती आज गर्वाने फुगली असेल. आणि एफ १६ बनवणार्‍या अम्रिकेचे इंजिनियर विचारात पडले असतील. त्या एफ १६ वरती सज्ज होती अत्याधुनिक मिसाईल्स तर अभिनंदनच्या हाती होते आर ७३ ज्याची रेंज अगदी कमी असते. म्हणून एफ १६ च्या निकट जाऊन त्याला आर ७३ सोडावे लागले. पण ते काम त्याने इतके अचूक केले की शत्रूचे एफ १६ कोसळले. भारतीय वायुदलाच्या प्रशिक्षण व्यवस्थेविषयी आज जगामध्ये एकच औत्सुक्याची लाट आली आहे. इतके अचूक प्रशिक्षण भारतीय वायुदल कसे देऊ शकते आणि त्यासाठी नेमके काय केले जाते तसेच भारतीय वैमानिकांचे आधुनिक शस्त्रास्त्रे हाताळण्याचे कौशल्य हे विषय आता सैनिकी दुनियेमध्ये पुढील काही दशके चर्चिले जातील. 

ह्या घटनेचे पडसाद कानठळ्या बसण्याएव्हढे मोठे आहेत आणि त्याचा गाजावाजा होत आहे तो शस्त्रास्त्र निर्मिती करणार्‍या कंपन्यांच्या भविष्यकालीन धोरणाबाबत. खास करून भारताला लढाऊ विमाने विकण्यास उत्सुक असलेल्या कंपन्या ह्या घटनेच्या पार्श्वभूमीला स्पर्श केल्याशिवाय आपले म्हणणे आणि उत्पादन भारतीय वायुदलाला "विकू" शकणार नाहीत. म्हणूनच त्यादिवशीच्या लढाईमध्ये नेमके काय घडले ह्याचे तपशील जाणून घेण्यास जगभरचे सुरक्षा तज्ञ  उत्सुक आहेत. म्हणून एक नव्हे तर अनेक अर्थांनी अभिनंदन आज अजरामर झाला आहे असे मी म्हटले.

२०१७ साली जेव्हा चीनने दोकलाममध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा इथले लिब्बू फारच शेफारले होते. बलाढ्य चीनसमोर "५६ इंच छातीच्या वल्गना करणारे" मोदी यूं गुडघे टेकतील आणि त्यांची फटफजिती होईल अशा गमजा चालल्या होत्या. चीनच्या सुरक्षा सज्जतेविषयीच्या कथा ऐकवल्या जात होत्या. भारताकडे कशी जुनाट शस्त्रास्त्रे आहेत आणि चीनकडे मात्र कित्येक पटीने जास्त असलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत ह्याच्या तपशीलाने लिब्बू लोक इथल्या जनतेला मनाने गारद करण्याच्या कामाला लागले होते. हे सायकॉलॉजिकल युद्ध - मनोवैज्ञानिक दबाव तंत्र - अगदी प्रभावीरीत्या काम करताना दिसत होते. चीनकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि भारताकडे मात्र जुनाट शस्त्रास्त्रे ही पाळी भारतावर आणली कोणी हा प्रश्न मात्र कोणी विचारताना दिसत होते काय? त्या नेहरू घराण्यातील राजपुत्रांबद्दल मात्र कोणी काही टीका करायची नाही असा त्यांचा अलिखित नियम होता. सामान्य माणसाची छाती दडपेल अशीच तफावत भारत आणि चीन ह्यांच्या शस्त्रसज्जतेमध्ये आहे हे आंधळाही कबूल करेल. पण ज्या भारतीय पिढीने अब्दुल हमीद पाहिला नव्हता ते तर लिब्बूंच्या ह्या प्रचारामुळे अधिकच गर्भगळीत झाले नव्हते काय?

पण आम्ही आणि आमच्या पिढीने तर अब्दुल हमीद पाहिला होता. हाती काय शस्त्र आहे ह्याचा विचार न करता जीवावर उदार होऊन त्याने खेमकरणची लढाई लढली आणि त्यामध्ये तो भीष्म पराक्रम करून गेला. हाती विळे कोयते घेऊन मोंगलांच्या सुसज्ज सैन्याविरुद्ध लढणारे मावळे आमचेच शिवप्रेमी लोक विसरून गेले होते. हाती शस्त्र काय ह्याला महत्व नसते असे नाही पण त्यामागची लढण्याची जिगर बाजी मारून जाऊ शकते हा अभिनंदनच्या लढाईचा संदेश आहे. आणि त्याचे पडसाद येणार्‍या पिढीलाही विसरता येणार नाहीत.

अर्थात ह्याचा अर्थ असा नव्हे की आम्ही सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष करावे. ह्याच अभिनंदनच्या हाती अत्याधुनिक राफालसारखे विमान आले तर भारत कोणत्या स्थानावर जाऊन बसू शकतो ह्याची कल्पना करा. आणि हेच आपले कर्मदत्त स्थान असले पाहिजे. हा उद्देश ज्याच्या मनामध्ये सुस्पष्ट आहे असा एक पंतप्रधान आज दिल्लीच्या तख्तावर विराजमान आहे ही गोष्ट आभिमानास्पद आहे.  २०१९ च्या निवडणुकीमध्येही मोदीच पुन्हा निर्विवाद जिंकतील ह्याची दक्षता तुम्ही आम्ही का घ्यायची आहे ह्यावर प्रकाशझोत टाकणारी अभिनंदनची कहाणी आपल्याला कायम स्फूर्तीदायक वाटो ही इच्छा.

10 comments:

  1. जिगरबाज, जिगरबाज। आमच्या सैन्यदलात जिगरबाज बाझ आहेत। पिल्ले नाहीत

    ReplyDelete
  2. Absolutely inspiring to young generation. Always waiting for your blogs.

    ReplyDelete
  3. उथळपनाचा बिल्कुल ही स्पर्श नहीं. अतिशय उत्तम लेख

    ReplyDelete
  4. याच बरोबर पाक सैन्य युध्दाचे तंत्र कौशल्य विसरले आहे, हे ही जगाला कळले.

    ReplyDelete
  5. Very inspiring lekh... 👏👏🇮🇳

    ReplyDelete
  6. खूपच छान लेख भारतीय टायगर ला साजेश्या कामगिरीचा,सॅल्युट अभिनंदन ला🙏🙏

    ReplyDelete
  7. हे "लिब्बू" काय आहे?

    ReplyDelete