Sunday, 24 March 2019

संरक्षणमंत्री म्हणून पर्रिकरांची कारकीर्द

Rafale deal: Manohar Parrikar meets French Defence Minister

(फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांसोबत श्री पर्रिकर)


श्री. मनोहर पर्रिकर ह्यांच्या दुःखद निधनाने त्यांचे चाहते पोळून निघाले आहेत. अशा वेळी सांत्वन म्हणून त्यांच्या कर्तृत्वाच्या कथनाने आपल्याला थोडा दिलासा मिळतो. राष्ट्रीय पातळीवरती पर्रिकरांच्या कर्तृत्वाचा डंका वाजू लागला तो त्यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये संरक्षणमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्यावरती. लवकरच संपूर्ण देशाच्या लक्षात आले की आपल्याला एक असा संरक्षणमंत्री मिळाला आहे की आता देशाच्या संरक्षणाची चिंता करायचे काम नाही तसेच या पदग्रहणातून मोदींच्या खांद्यावरील भारही कमी झाला आहे. पण ही कीर्ती इथेच थांबायची नव्हती कारण पर्रिकरांच्या कर्तृत्वाची चुणूक तर परदेशामध्येही अशी पसरली की त्यांचा विलक्षण दबदबा निर्माण झाला. 

थोडे मागे जाऊन विचार केला तर असे दिसून येईल की पर्रिकरांच्या जागी यूपीए २ च्या काळामध्ये संरक्षणमंत्री म्हणून काम करत होते ते श्री. ए. के. अन्थनी. संरक्षणमंत्रीपदावरती अन्थनी आणि पंतप्रधानपदी श्री. मनमोहन सिंग ह्यांनी आपल्या निर्णयांमधून देशासमोर हेच चित्र उभे केले होते की देशाच्या संरक्षणासाठी जे तातडीने करायचे आहे जे जे आवश्यक आहे ते ते निर्णय घेण्याचे लांबणीवर टाकले जात आहेत. अशा धरसोडपणामधूनच देशाची युद्धक्षमता केवळ चार दिवसांवर येऊन पोहोचली होती. हे कटु सत्यही जनतेच्या गळ्याखाली उतरत नव्हते. त्यातच ऑगस्टा वेस्ट लॅंडसारख्या भ्रष्टाचाराच्या मामल्यांना प्रसिद्धी मिळत होती. एकूणच स्वतः संरक्षणमंत्री तसेच त्यांचे खाते पूर्णतः हतबल असल्याचे दिसत होते. पाकिस्तानने कधीही यावे आणि चार थपडा मारून जावे आणि आमच्या सरकारने धोरणात्मक संयम Strategic Restraint ह्या गोंडस नावाखाली हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसावे ह्याचा जनतेला तिटकारा आलेला होता. अशावेळी श्री पर्रिकरांचे ह्या पदावरती येणे म्हणजे संत्रस्त भारतीय मनावरती गुलाबपाणी शिंपडल्यासारखे सुखावह होते. जनतेचा इतका प्रचंड विश्वास पर्रिकरांनी आपल्या गोव्यातील यशस्वी कारकीर्दीमधून कमावला होता. आणि जनतेच्या अपेक्षांना साजेसे असे कर्तृत्व त्यांनी दिल्लीमध्येही गाजवून दाखवलेच.

त्यांच्या स्वभावानुसार संरक्षणखात्यामधील समस्यांच्या मुळापर्यंत जाऊन काय करणे आवश्यक आहे - त्यातले काय तातडीने करायचे आहे - काय लांबणीवर टाकले तरी चालेल आणि मुख्य म्हणजे त्यासाठी पैसा उभा राहू शकतो का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हाती आल्याशिवाय योग्य निर्णय होत नसतो ह्याची अतिशय गंभीर जाणीव त्यांना होती.  त्यांच्या निश्चयी स्वभावाची प्रचिती देशाला लवकरच पाहायला मिळाली. १५ जानेवारी २०१५ रोजी म्हणजे अवघ्या दोनच महिन्यात पर्रिकरांनी डीआरडीओ ह्या संरक्षण अनुसंधान केंद्राच्या प्रमुखपदी असलेल्या श्री अविनाश चंदर ह्यांना पदावरून हटवले. डीआरडीओ द्वारा अनेक महत्वाच्या प्रकल्पावरती ठराविक मुदतीमध्ये काम पूर्ण न होत असल्याने संरक्षणखात्यामधल्या अनेक बाबी ठप्प झाल्या होत्या. पैसा नाही - परवडत नाही म्हणून परदेशामधून सामग्री घेता येत नाही त्याऐवजी ह्याची निर्मिती डीआरडीओवरती सोपवा अशी सुटसुटीत पळवाट यूपीएने शोधून काढली होती. मुख्य म्हणजे आपल्याला "रस" असलेल्या त्या सामग्रीची आयात त्यांनी थांबवली नव्हती.  पण संरक्षणदलांना जे हवे ते मात्र बेमुदत लांबणीवर पडल्यात जमा होते. अशाच निर्णयांमधून युद्धक्षमता चार दिवसावर येऊन ठेपली होती. डीआरडीओ प्रमुखास हटवून पर्रिकर ह्यांनी एकंदरच खात्याला एक महत्वाचा संदेश दिला की इथून पुढे अकार्यक्षमता खपवून घेतली जाणार नाही. यानंतर रखडलेला एलसीए हा प्रकल्प अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात देशाला यश आले. आज एलसीए विमाने आपण अन्य देशांना निर्यात करण्याचे प्रयत्न करत आहोत ही एक हनुमान उडीच म्हटली पाहिजे. जो दृष्टिकोन त्यांनी डीआरडीओसाठी ठेवला तोच ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या कामाबाबतही ठेवला म्हणूनच अशाही आस्थापनांमध्ये सुधारणांचे एक नवे युग अवतरले. 

ह्याच जोडीने दुसरे तातडीचे काम करायचे होते ते संरक्षणदलाचे मनोधैर्य उंचावण्याचे. २०१४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने निवृत्त सैन्यदलातील सर्व पदावरील मनुष्यबळाच्या वन रॅंक वन पेन्शन ह्या मागणीवरती सहानुभूतीने विचार करू म्हणून आश्वासन दिले होते. पर्रिकरांनी ह्या समस्येमध्ये बुडी घेऊन तिच्या मुळाशी जात नेमके काय करणे शक्य आहे ह्याचा विचार केला. ही मागणी का पुढे आली ह्याचा थोडा विचार करू. जवान म्हणून जे लष्करामध्ये रूजू होतात त्यांना वयाच्या ३५ व्या वर्षी सक्तीने निवृत्त केले जाते. ह्या वयानंतर त्यांना उपजीविकेसाठी दुसरा मार्ग धुंडाळणे आवश्यक बनते. अशा वेळी वयाच्या ३५व्या वर्षी जे पेन्शन बसते तेच पेन्शन त्यांना आयुष्याच्या शेवटापर्यंत मिळत असे. (त्यातील सर्वसाधारण वाढ पे कमिशनप्रमाणे मिळत असे) ही रक्कम अर्थातच कमी होती. अधिकार्‍यांच्या बाबतीमध्ये लष्करात व्यक्तीला बढत्या फार कमी मिळतात. कारण वरिष्ठ पदेच कमी असतात. उदा. सुमारे ८०० कर्नल पदाच्या मागे केवळ ७-८ बढतीवरील पदे उपलब्ध असतात. साहजिकच बर्‍याचशा अधिकार्‍यांचा पगारही अशाच प्रकारे कुंठित झालेला असतो त्यामुळे त्यांचे निवृत्तीवय साठ असूनही त्यांना पेन्शन कमीच बसते. वन रॅंक वन पेन्शन हा त्यावरचा एक उपाय म्हणून सुचवला गेला होता. पर्रिकरांचे कौतुक असे की सुमारे चाळीस वर्षे भिजत घोंगडे पडलेल्या ह्या समस्येवर त्यांनी निदान बव्हंशी समाधान होईल असे उत्तर शोधून तर काढलेच शिवाय अर्थखात्याकडून त्यावर मंजूरी मिळवून ते लागूही करून घेतले. ह्यातून कित्येकांच्या सदिच्छा त्यांनी मिळवल्या. 

सैन्यदलाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी जशी ह्या समस्येवर उपाय काढण्याची गरज होती तसेच त्यांच्या दैनंदिन कामामध्ये भेडसावणार्‍याही समस्याही सोडवायच्या होत्या. ह्यामध्ये योग्य दर्जाचे बूट - बुलेट प्रुफ जॅकेट - नाईट गॉगल्स सारख्या अगदी प्राथमिक गोष्टींची पूर्तताही आधीच्या सरकारने केली नव्हती. पर्रिकरांनी ह्या गोष्टींची खरेदी मार्गी तर लावलीच शिवाय त्यामधील काहींची आयात थांबवली कारण असे लक्षात आले की सैन्य ज्या परदेशी पुरवठादाराकडून ह्यातील काही गोष्टी घेत होते त्याच मुळात भारतामधून प्रथम निर्यात होऊन परदेशी जात आणि मग सैन्य त्या आयात करत होते. ह्यातून सरकारचा अवाढव्य पैसा वाचवण्यात त्यांना यश आले. जेव्हा पैसा कमी असतो तेव्हा तो जपून वापरावा हे साधे तत्व त्यांनी अंमलात आणले आणि संरक्षण खरेदी व्यवस्थेला दाखवून दिले की शोधलेत तर इथेच ह्याच देशात तुम्हाला सामग्री स्वस्तात मिळू शकते. अशाच शोधाच्या प्रयत्नात असताना एक गोष्ट उघडकीला आली ती देशाची ३०० कोटी डॉलर्स इतकी अवाढव्य रक्कम अमेरिकेच्या बॅंकेमध्ये नुसतीच पडून होती आणि मुख्य म्हणजे अशी काही रक्कम तिथे पडीक आहे ह्याची इथे कोणाला दाद फिर्यादही नव्हती. अमेरिकन बॅंका आपल्या कडील ठेवीवरती व्याज (अत्यल्प .२% वगैरे देतात) देत नाहीत. त्यामुळे रकमेमध्ये वाढ झाली नव्हती पण इतक्या वर्षांनंतर रुपया आणि डॉलर ह्यांच्या विनिमयाच्या दरातील फरकामुळे देशाचे सुमारे ७० ते ८० कोटी डॉलर्स ह्यातून वाचले. विविध पुरवठादारांशी बोलणी करून त्यांना देणे असलेल्या पैशाच्या अटी (Staged Payment Clauses) बदलून देशाने जवळजवळ ३००० कोटी रुपये वाचवले ते पर्रिकरांच्या प्रयत्नांमधून. रशियाकडून जेव्हा S400 ही यंत्रणा घ्यायचे ठरले तेव्हा ही यंत्रणा घेतली तर सुमारे ४९५०० कोटी रुपयाची अन्य विमाने व इतर सामग्री लागणार नाही असे सिद्ध करून यंत्रणेचा खर्च कमी करण्यात त्यांना यश आले. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण विचारपद्धतीमुळे पर्रिकरांबद्दल लष्करी आस्थापने आणि संरक्षण खात्यामधले बाबू लोक  ह्यांना सुद्धा मनोमन आदर वाटू लागला. 


मेक एन इंडिया ही मोदी सरकारची एक महत्वाची घोषणा होती. ह्यावरती बोलताना एका मुलाखतीमध्ये श्री . पर्रिकर ह्यांनी सांगितले होते की ही योजना खरे तर संरक्षणविषयक सामग्रीलाच अधिक लागू होते. इतर सर्व क्षेत्रांमध्ये ह्या ना त्या मार्गाने परदेशी कंपन्या येतात आणि इथे निर्मिती करत असतात इतकेच नव्हे तर निर्यातही करतात. पण संरक्षण सामग्रीबाबत आजपर्यंत चित्र स्पष्ट नव्हते. किंबहुना भारतामधले लायसन्स राज श्री नरसिंह राव सरकारने ९० च्या दशकामध्ये संपवले असे आपण म्हणत आलो असलो तरी संरक्षण सामग्रीबाबत आजवरती लायसन्स राजच चालू होते. अर्थात संरक्षण सामग्रीबाबत धोरणात्मक निर्णयाची गरज होती कारण हे एक अगदी वेगळे क्षेत्र होते. उदा. जी परदेशी कंपनी इथे असे उत्पादन करू बघेल तिला गिर्‍हाईक म्हणून फक्त ह्या देशाचे सरकारच असेल की तिला निर्यातीची परवानगी मिळेल - जर केवळ भारत सरकारसाठी कंपनीचे उत्पादन वापरायचे असेल तर सरकार दीर्घ मुदतीचा खरेदी करार करायला तयार आहे का - उत्पादनाची किंमत काय पडेल - त्यामध्ये आवश्यक असलेली १००% गुंतवणूक अशा परदेशी कंपनीने करावी की त्यामध्ये सरकारचा हिस्सा असेल - असलाच तर किती टक्के असावा - येणारी कंपनी भारताला त्याचे तंत्रज्ञान देणार की नाही आणि त्याची काय किंमत लावली जाईल असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न त्यामध्ये होते. ह्यांची उत्तरे मिळाल्याशिवाय संरक्षण सामग्रीबाबत मेक एन इंडिया यशस्वी होऊ शकले नसते. जी काही उत्तरे खात्याने शोधली असतील त्यांचा समावेश संरक्षण सामग्रीच्या खरेदीबाबत लागू असलेल्या डीपीपी डिफेन्स परचेस प्रोसिजर मध्ये हे बदल समाविष्ट करणे गरजेचे होते. आणि एकदा हा प्रकल्प हाती घेतला की डीपीपीमधील अन्य त्रुटीही दुरुस्त करून ती अधिक सुटसुटीत करण्याकडे लक्ष देणे गरजेचे होते. पर्रिकरांनी ह्यावर काम सुरू केले. ही प्रक्रिया किचकट असल्यामुळे ती पूर्ण झाली असे म्हणता आले नाही तरी निदान ती मार्गी लावण्याचे मोठे काम त्यांच्या हातून पार पडले. ह्याखेरीज एकंदरच संरक्षण खात्याच्या गरजेनुसार कोणती सामग्री आधी घेतली जावी त्यामध्ये प्राथमिकता कशाला द्यावी इथपासून ते लष्खरी आस्थापनांचा सुयोग्य वापर आणि त्यातील अनावश्यक खर्च टाळण्याकडे लक्ष वेधण्यासाठी जनरल शेकटकर कमिटीची स्थापना करण्यात आली होती. 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे यूपीएच्या काळामध्ये परदेशी पुरवठादार आणि त्यांचे दलाल ह्यांचा देशामध्ये सुळसुळाट झालेला होता. पर्रिकर मंत्री झाल्यापासून एकाही दलालाची डाळ शिजू शकली नाही. इतके की त्यांच्या संपर्कामधली माणसेही अशा दलालांना चार हात लांब ठेवू लागली. कोणीही यावे आणि भारतामधल्या राजकीय यंत्रणेला पैसा चारून आपली सामग्री विकावी हा काही दशकांचा खाक्या बनून गेला होता. ह्या वॉटरटाईट व्यवस्थेला पर्रिकरांनी धक्का दिला असे नाही तर सुरुंगच लावला. स्वच्छ प्रतिमेच्या ह्या माणसाची कीर्ती दिगंतात पसरली. इतकी की अमेरिकेशी जेव्हा लेमोआ सिस्मोआ सारखे संरक्षण विषयक करार करण्याचे प्रसंग आले तेव्हा भारत देशहितापलिकडचे निर्णय घेणार नाही आणि अयोग्य कलमे खपवून घेतली जाणार नाहीत ह्याची अमेरिकेला आणि अशाच अन्य कराराप्रसंगी इतर देशांनाही खात्री पटली होती. चार दिवसीय युद्धक्षमतेच्या अवस्थेवरून भारताला संपूर्ण हिंदी महासागर आणि दक्षिण चीन सागरामधला एक महत्वाची भूमिका बजावू शकणारा देश म्हणून भारताने स्थान मिळवता आले त्यामागे त्यांचे प्रयत्न आणि योगदान अतिशय महत्वाचे होते. 

एक सक्षम संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी काय मिळवले ह्याची छोटीशी झलक देशाने सर्जिकल स्ट्राईकच्या निमित्ताने बघितले. काश्मिरमध्ये सैन्यावरती अन्याय होणार नाही अशाप्रकारे त्यांच्या हक्कांचे संरक्षण ते करत होते. दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच संरक्षण व्यवस्थेवरती कोणा राजकारण्याने सैन्यातील मनुष्यबळाची धर्मवार जातीवार आकडे प्रसिद्ध करा - त्यामध्ये अल्पसंख्यंकांना आरक्षण द्या म्हणून धोशा लावला नाही तसेच अन्य राजकीय दडपणांना तोंड द्यावे लागले अशी परिस्थिती सैन्यदलावरती आली नाही हाच एक मोठा फरक पडला होता. हा बदल मनोबळ वाढवणारा होता. आजवर नियंत्रणरेषा ओलांडून सैन्य गेलेही असेल पण ह्यावेळी ह्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी - म्हणजे कारवाई फसली तरीही - राजकीय नेतृत्वाने घेतली होती हा फरक जनतेने बघितला. म्हणूनच कॉंग्रेस व अन्य विरोधकांनी कितीही कोल्हेकुई केली तरी जनतेचा त्यांच्यावर कधीच विश्वास बसला नाही. यातूनही सैन्याचे मनोबळ वाढले. आणि एक वेगळा आत्मविश्वास वाटू लागला. राफाल खरेदीमध्येही पर्रिकरांसारखा संरक्षणमंत्री आणि मोदी ह्यांच्यासारखे पंतप्रधान असताना भ्रष्टाचार होणार नाही ही जनतेला खात्री आहे म्हणूनच राफाल प्रकरणीही कॉंग्रेसला अपप्रचाराची किंमत मोजावी लागत असल्याचे मतचाचण्यांमधून आज स्पष्ट दिसत आहे. 

त्यांची संरक्षणमंत्री म्हणून अशाप्रकारे कारकीर्द गाजत असतानाच त्यांनी आपल्या गोवाप्रेमामधून स्वतःच्या राज्यामध्ये परतण्याचा निर्णय मार्च २०१७ मध्ये घेतला तेव्हा अनेक जण हळहळले. परंतु त्यांच्या वैयक्तिक इच्छेला मान देऊन भाजपनेही त्यांना त्यांच्या आवडत्या गोव्यामध्ये परतू दिले हे विशेष. कर्तृत्वाची अनेक शिखरे ते आपल्या हयातीमध्ये गाठतील असा विश्वास सगळ्यांच्या मनामध्ये होता पण देवाच्या मनामध्ये मात्र तसे नसावे. त्यांच्या निधनाने भारतामधल्या प्रत्येक देशप्रेमी कुटुंबाला आपला माणूस गेल्याचे दुःख झालेले आपण पाहिले. ही पुण्याई किती मोठी आहे ह्याची कल्पना सहजासहजी येऊ शकत नाही. पण देशावर येणार्‍या भावी संकटाच्या वेळी पर्रिकरांनी घेतलेल्या ह्या निर्णयाचा फायदा कसा झाला त्या निर्णयाचा फायदा कसा झाला ह्याच्या कहाण्या पुढील पिढ्यांना अनुभवाला येतील तसतशी त्यांची कीर्तीही वृद्धिंगत राहील. 



Friday, 15 March 2019

सेनानेतृत्वासाठी कसोटीचा काळ


स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत तथाकथित फेक्यूलर विद्वान पत्रकार बुद्धिजीवी लेखक कलाकार राजकीय नेते आदि मंडळींशी निकराचा सामना करावा लागला होता.

या फेक्यूलर लिब्बूंनी महाराष्ट्रासाठी जो "अजेंडा" ठरवला होता त्यातला एकमेव एकमेव अडसर बाळासाहेब आणि त्यांची शिवसेना व एकनिष्ठ शिवसैनिक हाच होता.

जेव्हा बाळासाहेब केवळ मराठीचा प्रश्न घेऊन राजकारण करत होते तेव्हाही त्यांना ह्यांच्या "हिंस्र" टीकेला सामोरे जावे लागत होते. आणि १९८५ च्या शहाबानो खटल्यानंतर यापुढचे राजकारण हिंदू म्हणून करेन असे जाहीर केल्यावर तर लिब्बू चेकाळलेच होते.

दैनिक सामना चा शुभारंभ होईपर्यंत शिवसेनेविषयी चार चांगले शब्द छापणारे एकही वृत्तपत्र महाराष्ट्रात नव्हते. आयुष्याच्या अखेरपर्यंत साहेबांनी जहरी टीकेचे घोट गिळले. कधी कधी पोलिसी कारवायांनाही त्यांनी तोंड दिले.

या त्यांच्या खडतर प्रवासाची आज आठवण काढण्याचे कारण काय?? तुलनेने विचार करता त्यांचे सुपुत्र उद्धवजींना इतक्या जहरी वातावरणाला आजवर तोंड द्यावे लागलेले नाही.  परंतु २०१९ च्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याचा निर्णय उद्धवजींनी घेतल्यामुळे ही परिस्थिती हळूहळू पालटताना दिसू लागेल.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर भाजप सेना युती तुटण्याचा जो कटु प्रसंग पहायला मिळाला त्यानंतर हळूहळू सेना मनाने भाजपपासून दूर होऊ लागली. इतकी की तिला मोदींच्या विरोधात गुजराथमध्ये आरक्षणाची मागणी घेऊन लढणारे हार्दिक पटेल - जिग्नेश मेवानी आणि लाल बावटा कन्हैय्या जवळचे वाटू लागले. ही गोष्ट अलाहिदा की बाळासाहेबांनी आयुष्यभर आरक्षणाला विरोध केला होता आणि मुंबईतून लाल बावट्याची सद्दी संपवून कामगारांना अन्य संघटना करण्यास वाव प्राप्त करून दिला होता. कानावर येणाऱ्या गोष्टींनुसार उद्धवजींचा आणि काँग्रेसचाही संवाद होतो की काय असे वाटू लागले होते. अशा तऱ्हेने एक प्रकारे सेनेचा लंबक भाजपपासून दुसऱ्या टोकाकडे गेलेला दिसत होता.

ह्याचा उल्लेख अशासाठी करते की बाॕलीवुड रिअल इस्टेट हवाला एनजीओ क्रिकेट या पायावर काँग्रेसचा डोलारा उभा होता. काँग्रेसच्या जवळ जाणे म्हणजेच या पापचक्राच्या जवळ जाण्यासारखे होते. हे चक्र असे आहे की या सिंहाच्या गुहेत आत जाणारी पावले दिसतात पण बाहेर येणारी पावले मात्र दिसत नाहीत. उद्धवजी एक प्रकारे गुहेच्या आत तर गेले शिवाय बाहेर येण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.

दोनचार दिवसांपूर्वी टीव्हीवर श्री संजय राऊत यांची एक छोटी मुलाखत दाखवण्यात आली होती. त्यामध्ये बोलताना श्री राऊत म्हणाले की अगदी दोन दिवस आधी सुद्धा महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याचा आमचा निर्णय ठरलेला होता. पण अचानक दोन दिवसात काय बदलले हे मलाही माहिती नाही. अर्थातच उद्धवजींनी एक कठिण निर्णय स्वतःच्या हिंमतीवर घेतला आहे हे स्पष्ट होते. यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

म्हणजे महाराष्ट्रात युती हवी म्हणून उद्धवजींच्या निर्णयाचे स्वागत हे एक कारण आहे पण ते थोडे गौण म्हटले पाहिजे. कठिण परिस्थितीत त्यांनी कठोर निर्णय घेताना स्वयंपूर्णता दाखवली आहे. ह्याची त्यांना नजिकच्या भविष्यात वारंवार गरज पडणार आहे. गरज अशासाठी म्हटले की दुसऱ्या टोकाला लंबक गेला असता उद्धवजींनी ज्यांना जवळ घेतले ते आता सूडबुद्धीने वागण्याची शक्यता वाढत चालली आहे. अशामुळेच ज्या प्रखर विरोधाच्या विषारी वातावरणाला बाळासाहेबांना सामोरे जावे लागले त्याची पुनरावृत्ती उद्धव यांच्या बाबत आता होऊ शकते. यात नवे काही नाही. हा तर काँग्रेसचा इतिहासच आहे. म्हणूनच सल्लागार काय म्हणतात ते ऐकले तरी कठिण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याचे कसब त्यांना दाखवावे लागणार आहे,

सीएसटी पुलाच्या दुर्घटनेनंतर याची प्रचीती येऊ लागेल अशी चिन्हे आहेत. यामध्ये पूल महापालिकेच्या अखत्यारीतला असल्याने  सोशल मीडियामध्ये काही जणांना सेनेवर टीका करण्याचा मोह आवरत नाही असे दिसत आहे.  महाराष्ट्रात युतीला बदनाम करण्याचे षड्यंत्र राबवले जाणार आणि काँग्रेसचे डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट आपली करामत दाखवणार का यापेक्षा कधी दाखवणार असा प्रश्न मनात येतो आहे. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया कशा असाव्यात याचा सुज्ञांनी विचार करायचा आहे.

पुन्हा एकदा म्हणते At Any Cost हा शब्दप्रयोग निदान निवडणूक संपेपर्यंत मी विसरू शकत नाही. खास करून उद्धवजींना nerves of steel ची गरज भासत राहील आणि ते या कसोटीस उतरतील यात मला अशासाठी शंका नाही कारण एक तर उद्धवजींनी आपली निर्णयक्षमता दाखवली आहे आणि दुसरे म्हणजे  निष्ठावान शिवसैनिक पक्षाशी बांधला गेला आहे आणि असे प्रसंग वास्तवात उद्धव यांच्या वर आलेच तर बाळासाहेबांवर आलेल्या अशाच कटु प्रसंगांच्या आठवणीने तो अधिक कट्टर होत राहील.







बालाकोट का झोंबले?

Image result for balakot


मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा हल्ला झालाच नाही असे पाकिस्तान जोर लावून सांगत होते आणि इथे कॉंग्रेसवाले त्याची री ओढत होते. आता पुलवामानंतरच्या एयरस्ट्राईकवर "झालाच नाही हो" म्हणायला जागाच नसल्यामुळे हल्ला झाला पण कुचकामी होता. दूर कुठे तरी पहाडावर बॉम्ब पडले - त्यात कोणीच मेले नाही - बालाकोटमधील इमारती तर अजूनही सुरक्षित तशाच उभ्या आहेत - म्हणजेच २०० मेले ३०० मेले वगैरे दावे म्हणजे मोदी सरकारच्या वल्गना आहेत अशा प्रकारचा प्रचार पाकिस्तानातून होत आहे आणि त्याचा प्रतिध्वनी असल्याप्रमाणे कॉंग्रेसही तेच बोलत आहे. आश्चर्य म्हणजे भारतामधले मोदीसमर्थकसुद्धा ह्या प्रचाराला प्रतिसाद देत ’बॉम्ब पडले हो आणि माणसे मेली हो, ती कशी?" ह्याचे जमतील तेव्हढे पुरावे देण्यात मग्न आहेत. थोडक्यात काय तर एयरस्ट्राईकच्या निमित्ताने आपण कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची हे पाकिस्तान ठरवत आहे आणि आपण तसेच चर्चा करत आहोत आणि जो त्यांचा अजेंडा आहे त्याला प्रतिसाद देत आपण स्वतःहून सापळ्यात शिरत आहोत. हे काही नवे नाही. असे घडवून आणायची पाकिस्तानला भरपूर प्रॅक्टीस आहे आणि आपल्यालाही सापळ्यात शिरायची जुनी हौस आहे. आजकाल केंब्रिज अनालिटिकाचे नाव सगळ्यांना तोंडपाठ झाले आहे. अमेरिकन मतदाराने विचार कसा करावा असे जे रशियाला वाटत होते तसेच घडवून आणण्यासाठी आणि पर्यायाने अमेरिकन निवडणुकांमध्ये कोणता उमेदवार जिंकावा ह्याची सोय केंब्रिज अनालिटिका कंपनीने विकसित केलेल्या तंत्रामधून करण्यात आली होती. पण जेव्हा केंब्रिज अनालिटिका आणि इंटरनेटचा जन्मही झाला नव्हता तेव्हादेखील आपल्याला हव्या त्या दिशेने जनमत वळवण्याचे तंत्र अवगत होते आणि वापरले जातही होते. त्यालाचा युद्धशास्त्रामध्ये सायकॉलॉजिकल वॉर PSYWAR असे म्हटले जात असे. War is deception - शत्रूची दिशाभूल म्हणजे युद्ध असल्यामुळे युद्धात सर्व - म्हणजे खोटे बोलणे सुद्धा - क्षम्य असते असे म्हणण्याचा प्रघात पडला होता. बालाकोटच्या निमित्ताने छेडली गेलेली छोटीशी लढाई ह्याला अपवाद नाही. म्हणूनच पाकिस्तानला हव्या त्याच मुद्द्यांचा काथ्याकूट करत आपण वेळ घालवत आहोत खरे पण बालाकोट झोंबले का ह्याचे उत्तर त्यामुळे कोणी शोधत नाही आणि ह्या मूळ मुद्याला बगल मिळावी - त्याचा शोध घेतला जाऊच नये अशी शत्रूची मनीषा आहे. तेव्हा हे जे काही फुटकळ मुद्दे पाकिस्तानने शोधून काढले आहेत त्यापलिकडे जाऊन बालाकोट हल्ल्याचा विचार केला जायला हवा.

ह्या निमित्ताने युनोच्या सुरक्षा समितीमध्ये जैश ए महंमद संघटनेला आणि मासूद अझरला दहशतवादी म्हणून घोषित करा असा प्रस्ताव भारताने नव्हे तर फ्रान्सने आणला आणि त्याला ब्रिटन आणि अमेरिकेने जोड प्रस्तावक म्हणून मान्यता दिली - तेव्हा १५ पैकी १४ सदस्यांनी प्रस्तावाला पाठिंबा दिला. चौथ्यांदा विरोध करणारे राष्ट एकच. चीन. चीनने भारताच्या बाजूने मतदान केले नाही म्हणून मोदी ह्यांची शी जिन पिंग ह्यांच्यासोबत झालेली वुहान रिसेट बैठक कशी फोल ठरली आहे ह्याचे ढोल बडवले जात आहेत. अर्थातच हाही मुद्दा पाकिस्तानला हवा तसाच भारतामध्ये मांडला जात आहे हे सांगायला नको. मासूद अझर निमित्ताने चीनच्या कृत्याविषयी भारतीय जनतेच्या मनामध्ये असलेली चीड स्वाभाविक असून तिचा दुरुपयोग करून मोदी ह्यांच्यावर शरसंधान साधले जात आहे हे विशेष. पण चीनने जो निर्णय घेतला आहे - किंबहुना अन्य १४ सदस्यांनी पाठिंबा देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला केवळ पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर बघण्याची चूक इथले लिब्बू तर करत आहेतच पण राजकीय पक्ष सुद्धा ह्याच मताची री ओढत आहेत. या संदर्भात भारतीय उपखंडातील परिस्थिती मात्र दुसर्‍याच बाबींकडे अंगूलीनिर्देश करत आहे असे दिसते. 

पहिली गोष्ट म्हणजे भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या असून पंतप्रधान म्हणून मोदी ह्यांची निवड पुन्हा होण्याने अनेक गणिते समीकरणे बदलणार आहेत. त्यातील महत्वाचे समीकरण आहे ते अफगाणिस्तान पार्श्वभूमीचे. अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयावर अमेरिकन अध्यक्ष श्री डॉनल्ड ट्रम्प ठाम असून पुढील वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या अगोदर ही प्रक्रिया पूर्ण व्हावी ह्यावर त्यांचा भर असणार आहे. १९७९ पासून अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये ढवळाढवळ केली आहे तसेच २००१ नंतर गेली १८-१९ वर्षे त्यांचे सैन्य तिथे ठाण मांडून बसले आहे. आता हे सैन्य बाहेर पडले तर तिथे जे अनेक छोटे मोठे सशस्त्र गट आहेत ते तिथे अंदाधुंदीचे आणि अराजकाचे वातवरण तयार करून सत्ता ताब्यात घेऊ पाहतील. असेही संपूर्ण अफगाणिस्तानवर एकछत्री अंमल आताही नाही. वेगवेगळ्या भूभागामध्ये अशा गटांचे साम्राज्य आहे तरीदेखील अमेरिकन सैन्याचा धाकही आहे. म्हणून आपण काढता पाय घेतला तर जी पोकळी निर्माण होईल त्यातून मार्ग काढण्यासाठी अमेरिका कतार येथील तालिबानांच्या अड्ड्यातून त्यांच्याशी बोलण्यांच्या फेर्‍यावरफेर्‍या घेत आहे. अर्थातच तसे करत असताना अमेरिकेने पाकिस्तानची मदत घेतली आहे कारण हे तालिबान पाकिस्तानच्य कह्यात आहेत ही वस्तुस्थिती त्यांना मान्य करावी लागत आहे. 

ह्या बोलण्यांच्या घोळामध्ये रशिया कुठे आहे? १९७९ मध्ये अफगाणिस्तानवरील रशियन आक्रमणाविरोधात अमेरिका पुरस्कृत छेडण्यात आलेला जिहाद रशियाला अजूनही झोंबत असून त्यामुळेच रशियाला आपले सैन्य अखेर बाहेर काढावे लागले ही झोंबरी वस्तुस्थिती रशिया अजूनही विसरलेले नाही. तेव्हा अमेरिकेचे तेथून उच्चाटन करण्यात रशियाला रस असून पुन्हा एकदा अफगाणिस्तान आपल्या पिट्ट्य़ांच्या ताब्यात ठेवण्याचे मनसुबे रशिया आखत आहे. हेच तालिबान गरज पडली तर अमेरिका पुनश्च आपल्या विरोधात वापरेल काय ही साधार भीती अर्थातच रशियाला आहे. म्हणून रशिया अजूनही पूर्णपणे पाकिस्तानकडे झुकलेला नाही. पण रशिया आणि भारत ह्यांचे अफगाणिस्तान विषयावरती आज मतभेद आहेत ही गोष्ट मान्य करणे भाग आहे तसेच ह्यामध्ये रशियाचे अफगाणिस्तानमधील अध्यक्षीय दूत श्री झमीर काबुलोव्ह ह्यांची काय भूमिका आहे हा तर स्वतंत्र लेखाचाच विषय होईल.

उपखंडातील एक प्रभावशाली राष्ट्र म्हणून चीनचेही ह्या संघर्षामधले म्हणणे ऐकले जात आहे. अफगाणिस्तानमधील भविष्यातील सत्ताधार्‍यावरती आपला काय प्रभाव असेल ह्या प्रश्नामध्ये चीनलाही रस आहेच. महत्वाचे म्हणजे चीनच्या उइघूर आणि शिनज्यांग प्रांतामध्ये इस्लामी दहशतवादाच्या झळा त्याला बसत असून तिथूनच चीनमधील विघटनवादी शक्तींना बळ मिळत असते. अफगाणिस्तानमध्ये तालिबान शिरजोर झाले तर त्याच्या झळा चीनला बसल्याशिवाय राहणार नाहीत. शिवाय चीनला जो महत्वाचा वाटतो तो सीपेक प्रकल्प देखील तालिबानांशी संबंध ठीक ठेवण्यावरच अवलंबून आहे हे चीनला कळते. 

थोडक्यात काय तर अमेरिका, चीन आणि रशिया ह्यांच्यापैकी कोणताही देश आज तालिबानांच्या हाती अफगाणिस्तानची सत्ता जावी ह्या पाकिस्तानने मांडलेल्या प्रस्तावाला विरोध करण्याच्या मनःस्थितीमध्ये नाही. राष्ट्रप्रेमी अफगाणांना पाकिस्तानच्या तालावर नाचणारे तालिबान नको असले तरी त्यांच्याशी सर्वंकष लढाई छेडण्यापलिकडे त्यांच्यासमोर आज पर्याय नसल्याचे जाणवते. अशा परिस्थितीमध्ये अफगाणिस्तानच्या मदतीला जर कोणी जाऊ शकत असेल तर तो फक्त भारत आहे - ते देखील मोदी पंतप्रधानपदी असतील तर - जर इथे पुनश्च कॉंग्रेसप्रणित यूपीए सरकार आले तर तीही शक्यता मावळते.  

इतकी किचकट समीकरणे समोर असल्यामुळे मोदी ह्यांनी गेल्यावर्षी चीनमधील वुहान आणि रशियामधील सोची येथील बैठका लागोपाठ पार पाडून काही वातावरण निर्मिती करण्याचा आणि भूमिकेमध्ये किमान समान पाया मिळतो का ह्याची चाचपणी केली होती. त्यामध्ये प्रत्येकवेळी यश येतेच असे नाही. म्हणून प्रयत्नच करू नयेत असेही नसते. अर्थातच प्रत्येक देश आपापल्या हितानुसार निर्णय घेत असतो. तेव्हा आजच्या घडीला तरी तालिबानांचे आणि पर्यायाने पाकिस्तानचे पारडे भारतीय उपखंडामध्ये जड असल्याचे निर्देश मिळत आहेत. परिस्थिती अशी आहे म्हणूनच मोदी सरकारही केवळ लष्करी पर्यायावर अवलंबून न राहता राजकीय आणि राजनैतिक पावलेही उचलत आहे. ह्या पार्श्वभूमीवरती मासूदला दहशतवादी ठरवण्याच्या निर्णयावर शिक्का न उठवण्याचा चीनचा निर्णय हा त्यांच्या दीर्घकालीन धोरणाशी संबंधित असून त्याचा व्यक्तिगतरीत्या मासूदशी संबंध जोडणे अथवा दहशतवादाविरुद्धच्या लढाईशी जोडणे योग्य होणार नाही.  

दहशतवादाच्या कारवाया आणि तालिबानांच्या हाती अफगाणिस्तानची सत्ता देण्याच्या निर्णयाने पाकिस्तानने प्रोत्साहित होऊन भारताला दबवण्याचे आणि काश्मिर हातून हिसकावून घेण्याचे मनसुबे रचले तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. काश्मिरमध्ये तातडीने कलम ३७० तसेच ३५ए रद्द केले जावे म्हणून सोशल मीडीयावरती अनेक जण पोस्ट टाकत असले आणि येथले जनमत त्याच दिशेने झुकले असले तरीदेखील असे करणे मोदी सरकारला का अवघड जात आहे ह्याची कल्पना हा लेख वाचून येऊ शकेल. तसेच पुरेशा तयारीशिवाय पाकिस्तानविरोधात सर्वंकष लढाई छेडण्याचा पर्यायही कसा आत्मघातकी ठरेल हेही स्पष्ट होईल.  तेव्हा पाकिस्तानने काही साहस करू नये - भारताच्या हातून काश्मिर हिसकावण्याचे मनसुबे रचू नयेत म्हणून बालाकोट हल्ल्याचे महत्व आहे. तसे झालेच तर पाकिस्तानला शरण न जाता सार्वभौमत्व जपण्यासाठी मोदी सरकार कशी दमदार पावले उचलेल ह्याची चुणूक आता पाकिस्तानला मिळाली आहे. म्हणूनच बालाकोट हल्ला हा पाकिस्तानला देण्यात आलेला एक गंभीर इशारा हा केवळ भारतामध्ये दह्शतवादी हल्ले घडवण्याविरोधात दिलेला इशारा नाही तर उपखंडातील व्यापक लढाईमध्ये मोदी ह्यांनी निर्भीडपणे घेतलेल्या भूमिकेचा द्योतक आहे. म्हणूनच त्याचा डंका जगभर वाजला. दहशतवाद्यांच्या वहाबी तत्वज्ञानाची पीठ असलेल्या बालाकोटवरील हा हल्ला पाकिस्तानला झोंबला आहे. चांगलाच झोंबला आहे. 

Monday, 11 March 2019

बालाकोटचे पुरावे

हल्ल्यानंतर बालाकोटची नव्याने रंगरंगोटी होईपर्यंत कोणी पुरावे मागत नव्हते.

रंगरंगोटी पुरी झाल्याझाल्या पिंडीच्या भारतातल्या  पोपटांना कंठ फुटला आहे.

सैन्याकडे असलेले पुरावे जगासमोर आले तर भारतीय सैन्याची अनेक गुपिते पाकिस्तानला कळतील. हीच परिस्थिती सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी होती. पाकिस्तानने पुरावे मागून भारताला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करावा हे तर समजण्यासारखे आहे. पण जेव्हा इथले पोपट पिंडीला हवे तेच प्रश्न सरकारला विचारून सरकारची कोंडी करतात तेव्हा देशाच्या शत्रूला मदत करण्याची त्यांची सुप्त इच्छा लपून राहूच शकत नाही.

जे दावे सपशेल खोटे आहेत ते परत परत का केले जातात??

सर्जिकल स्ट्राईकच्या निमित्ताने अशीच धूळवड झाली.  आता काही वर्षांनंतर त्याबद्दल जनतेच्या मनात जराही संदेह नाही म्हटल्यावर हे आक्षेप बंद झाले आहेत.

आणखी काही महिन्यात बालाकोटबद्दलचे आक्षेप असेच हवेत विरतील.

असे आक्षेप फेक्यूलरांनी घेतल्याने भारतीय जनता सैन्यावर व पर्यायाने मोदींवर अधिकाधिक विश्वास टाकत आहे, विसंबू लागली आहे हे ही स्पष्ट असूनसुद्धा या घरभेद्यांना जाग का येत नाही असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल. पाकिस्तानच्या तालावर नाचत हे फेक्यूलर पाकिस्तानला सती का जातात हे कोणालाही कोडेच वाटेल.

त्याचे उत्तर सोपे आहे. भारतीय जनतेचा आपल्या सैन्यावर १००% भरवसा असला तरी पाकिस्तानच्या जनतेचा त्यांच्या सैन्यावर काडीइतका विश्वास उरलेला नाही.

एकीकडे पिछाडीला पडलेले सैन्य तोंडाने हवाबाण हरडे सोडते हा पाकिस्तानी जनतेचा अनुभव आहे. त्यांचा पार्श्वभाग अबटाबाद धाडीच्या वेळी उघडा पडला नव्हता काय?? आताही हीच शंका त्यांच्या मनात आहे.

तेव्हा तिकडे पाकिस्तान मध्ये तेथील सैन्याने आणि राजकीय पक्षांनी भारताच्या पराक्रमाचे दावे नाकारायचे आणि इकडे भारतात मोदींचे विरोधक देखील हे दावे जाहीररीत्या नाकारत आहेत असे चित्र आपल्या जनतेसमोर रंगवायचे अशी ही व्यूहरचना आहे. हे नाटक कसे उत्तम रीतीने वठवले जाते हे आपण पाहत आहोत. असे नाटक वठवणे ही पाकिस्तानी राजकीय पक्षांची आणि सैन्याची मजबूरी आहे.

जनता आपल्या मागे नसेल तर आपण राज्य तर करू शकणार नाहीच शिवाय आपली डरपोकगिरी बघून जनता आपल्या विरोधात बंड करून उठेल अशी भीती पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या मनात घर करून बसली आहे. अशा तऱ्हेने पाकिस्तानी जनताच त्यांच्या सैन्याविरोधात बंड करून उठणे हे आपल्या पथ्यावर पडणारी बाब आहे.

म्हणून यांचे हे कारस्थान हाणून पाडायचे तर सरकारने काय करायचे ते करायला मोदी सक्षम आहेत पण सामान्य जनतेने काय हाताची घडी घालून गप्प बसणे योग्य आहे?? आपल्याला काय करावे लागेल??

सैन्यावर शंका घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राजकीय धोबीपछाड द्या. त्यांच्या मागे जो जो उभा राहतो - मग भले तो तुमच्या माझ्या सारखा सामान्य नागरिक जरी असला तरी त्याचेही विमान जमिनीवर उतरवा.

करणार का एवढे काम तुम्ही??


राम मंदिर आणि ओवेसी

अयोध्येतील राममंदिर खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थ नेमून तोडगा निघतो का याची चाचपणी करण्याचे ठरवले आहे.

या मध्यस्थांमध्ये श्री श्री रविशंकर यांचे नाव कोर्टाने मुक्रर केल्यामुळे MIM चे प्रमुख श्री असद उद दीन ओवेसी संतापले असून रविशंकर यांच्या नेमणुकीवर ते पक्षपाती असल्याचा आरोप करत ओवेसी यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे.

राममंदिर प्रकरणी सर्वसहमतीने निर्णय झाला नाही तर देशातील - एक तर हिंदू नाही तर मुस्लीम - बिथरतील. त्यातून जी सामाजिक अस्थिरता निर्माण होईल त्यामुळे सिरियाप्रमाणे  स्फोटक परिस्थिती भारतात निर्माण होईल असे यापूर्वी रविशंकर यांनी म्हटल्यामुळे ते पक्षपाती असल्याचे उघड होते असे ओवेसी म्हणतात.

याचाच अर्थ स्पष्ट आहे की जी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाला निःपक्षपाती वाटते ती ओवेसींना पक्षपाती वाटत असून ते तेवढयावर न थांंबता आज जाहीर आक्षेप घेताना दिसतात. उद्या याचे पर्यवसान कशात होईल हे कोणी सांगू शकते काय??

अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दुसऱ्यांदा अविश्वास दाखवला जात आहे. हा अविश्वास शाहबानो खटल्यानंतर दाखवल्या गेलेल्या अविश्वासाइतकाच गंभीर आणि खळबळजनक असूनही त्यावर कालपर्यंत कोणीही आक्षेप नोंदवलेला नाही.

न्यायालयाने नेमलेल्या मध्यस्थ मंडळींवर हिंदूंचाही १००% विश्वास असेल असे नाही पण त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवून आणि होणाऱ्या विलंबाचे दुःख सहन करून मध्यस्थांच्या नेमणुकीवर अविश्वास दाखवण्याचा अगोचरपणा केलेला नाही.

हे ओवेसी साहेब सदानकदा आपण भारतीय घटना सर्वोच्च मानतो म्हणून ग्वाही देतात. मग न्यायालयाच्या निर्णयावर अयोग्य टीका करणे भलेही या कायदेतज्ञासाठी कायदेशीर असले तरी त्यातून हिंदूंच्या सहनशक्तीची अवमानना होते याकडे त्यांचे भान उरलेले नाही.

शाहबानो खटल्यानंतरच या देशातील हिंदू जागृत झाले आणि देशातील मुस्लीम जनता सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा जुमानत नाही व आपला निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरते असे चित्र उभे राहिले. त्यातून प्रक्षुब्ध हिंदू मानसाने राजकीय पटांगणावर आपला प्रभाव दाखवत भाजपला खासदार संख्या दोन वरून आज देशाच्या एकहाती सत्तेपर्यंत पोचवले आहे.

ओवेसींच्या भूमिकेमुळे कोट्यवधी हिंदूंचा हा मूळचा  समज अधिकच दृढ होणार आहे. ओवेसींना जे हिंदू राष्ट्र अस्तित्वात यायला नको आहे त्याचा विस्तृत पाया ते आपल्या बोलण्यातून घालत आहेत.

शाहबानोच्या वेळी मुस्लीम - समाजापेक्षा - नेत्यांना समजवायच्या प्रयत्नात तत्कालीन केंद्रीय मंत्री श्री आरीफ मोहमद खान  यांनी राजीनामा दिला होता. पण ते या नेत्यांना समजावू शकले नाहीत. आजतर असे प्रयत्न करू बघणारा एखादा आरीफ नजरेतही दिसत नाही. उलटपक्षी बहुतांशी मुस्लीम जनतेला अयोध्येत राममंदिर व्हावे असे वाटत असून आपल्या मतपेटीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांची किळस येऊ लागली आहे.

भविष्यकाळ बिकट आहे. तयारीत रहा.

दोवल यांचे काय चुकले??




"मासूद अझरला भारतीय तुरूंगातून बाहेर काढून कंदहारला कोण घेऊन गेले होते? हेच अजित दोवल ना? मोदीजी - जनतेला खरे काय ते कळू द्या!" अशा अर्थाचे ट्वीट काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांनी केले आहे. त्यावरून अर्थातच एकच गहजब झाला आहे.

खरे तर राहुल काय लिहितात वा बोलतात त्याकडे कोणी फारसे गंभीरपणे बघत नसले तरी त्यांच्या अज्ञानाचे आणखी एक उदाहरण तेच स्वतः आपल्या हाती आणून देत असल्याने असे झाले की भाजप फळीमध्ये आनंदाची लहर येत असते. त्यांचे हे नवे ट्वीट त्याला अपवाद नाही.

IC814 विमानाचे अपहरण झाले तेव्हा भारत सरकारने अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करण्यासाठी ज्यांना नेमले होते त्यामध्ये आयबी तर्फे त्यांचे अॕडिशनल डायरेक्टर म्हणून श्री अजित दोवल व आयएफएस मध्ये काम केलेले श्री काटजू यांची नावे होती. या निमित्ताने हे मंडळ कंदहारला गेले होते. अपहरणकर्त्यांच्या मूळ मागणीमध्ये १३५ कैद्यांना भारताने सोडावे अशी अट होती. पण मंडळाने व खास करून दोवल यांनी हा आकडा तीनवर आणला. तरीही त्यांचे स्वतःचे समाधान झाले नव्हते.

या निमित्ताने तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री ब्रजेश मिश्र यांच्याशी दोवल यांची खडाजंगी झाली. कैदी सोडण्याच्या मिश्र यांच्या निर्णयाला दोवल यांनी कडाडून विरोध केला होता. अर्थात निर्णय सरकारला घ्यायचा होता. वाजपेयी सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन आपण काय करणार आहोत हे सर्वांच्या कानी घालून त्यांची मतचाचपणी करून अंतीम निर्णय घेतला होता.

यानंतर सरकारतर्फे अंतीम फेरीसाठी मंडळाचे प्रमुख म्हणून श्री जसवंत सिंगही कंदहार येथे पोहोचले होते. इथे जसवंत सिंग केवळ परराष्ट्र मंत्री म्हणून नव्हे.  सरकारतर्फे Point Man with plenipotentiary powers इतक्या शक्तिशाली स्थानावरून टीमचे नेतृत्व जसवंत सिंग यांच्या वर सोपवण्यात आलेले होते. (point man म्हणजे आपल्या तुकडीचे नेतृत्व करणारा सोल्जर plenipotentiary powers म्हणजे सरकारतर्फे जागीच निर्णय घेण्याची क्षमता ज्याला सरकारने बहाल केली आहे अशी व्यक्ती)

कंदहार प्रसंगी दोवल आयबीचे प्रमुख पदावरही नव्हते. त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला हे म्हणणे हास्यास्पदच आहे. तसेच जो निर्णय सर्वांच्या कानी घालून घेतला गेला होता त्या बैठकीत गांधी यांच्या काँग्रेसने आपली संमती दिली होती किंवा कसे हे प्रथम गांधी यांनी जनतेसमोर येऊ द्यावे. म्हणजे पानी का पानी दूध का दूध होऊनच जाईल.

असो. राहुल गांधी यांचे नेमके दुःख काय आहे?? दोवल नावाचे गळू त्यांना कुठे ठुसठुसते आहे आणि गळूमुळे लागलेल्या  ठणक्याने मेंदू चालत नसल्यासारखे व भ्रमिष्ट झाल्यासारखे ते बोलत आहेत काय?? आता जे गळू गांधींना ठुसठुसते तेच पिंडीला ठुसठुसते हा भाग वगळला तरी मूळ प्रश्न तसाच राहतो.

आजपर्यंत ज्यांनी सत्तेवर असताना स्वहस्तात स्वतःहून बेड्या घालून घेतल्या होत्या, पाकिस्तान कडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायचे सोडून जे Strategic Restraint नावाच्या गोंडस शब्दाआड आपले दौर्बल्य व क्लैब्य झाकायचा प्रयत्न करत होते त्यांना दोवल यांचे Offensive Defence हे तत्त्व गळ्याखाली उतरू नये यात नवल काय??

पंचाईत अशी आहे की निवडणुकीच्या तोंडावर मोदींच्या मर्दानगीला आव्हान दिले तर आपली मते कमी होतील या भीतीने काँग्रेस व पाकिस्तान मोदी यांना लक्ष्य न बनवता दोवल यांच्या वर प्रहार करत आहेत. आणि तसे करताना वस्तुस्थितीला फाटा देत धादांत खोटे आरोप करत आहेत. असे करत असताना देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे मनोधैर्य आपण खच्ची करत आहोत याचीही त्यांना पर्वा नाहीच.

गांधी यांच्या आरोपाने दोवलांचीही गाय मरणार नाही आणि मोदींचीही. या तमाशातून पुढे आले आहे ते एकच नागवे सत्य!!! या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी देशाने गांधी यांच्या वर टाकण्याइतकी पोच व समज त्यांच्या कडे नाही आणि काँग्रेसच्या अन्य जबाबदार व्यक्तींकडेही नाही.

तेव्हा देश सुरक्षित ठेवायचा तर पंतप्रधान मोदीच हवेत.

जयहिंद

#Modifor2019

Saturday, 2 March 2019

किडन्या आणि पाकडे

Image result for ajit doval



पाकड्यांचे आणि किडनीचे काही तरी गहिरे संबंध आहेत असे नाही तुम्हाला वाटत?आठवून बघा. जेव्हा हे तुळतुळीत हनुवटीचे - वर्दीमधले जिहादी - ओसामा बिन लादेनला वाचवायचा शर्थीचा प्रयत्न करत होते तेव्हा देखील ओसामा बिन लादेन कसा किडनीच्या आजाराने वैफल्यग्रस्त झाला आहे आणि त्याच्यावर त्यासाठी इलाज चालू आहेत अशा बातम्या पसरवल्या जात होत्या. कधीतरी तर असेही वाचले होते की ओसामावरती पेशावरमधल्या पाकिस्तानी सैनिकी इस्पितळात इलाज चालू आहेत. ओसामा बिन लादेनला सुरक्षित ठेवण्यासाठी पाकिस्तानी संस्था त्याला आपल्या ताब्यात ठेवत होत्या असेही वाचल्याचे आठवते. अशा प्रकारे किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेला ओसामा बिन लादेन लांबचा प्रवास देखील करू शकत नाही आणि एक दिवसा आड त्याला डायलिसिसची गरज भासत आहे असे रिपोर्टस् वृत्तपत्रे छापत होती. असल्या बातम्यांच्या ढीगामधून खरे काय ते शोधणे कठिण होते काय? सामान्य वाचकासाठी ते नक्कीच कठिण होते. पण बारकाईने बघितले तर ज्या व्यक्तीला एक दिवसा आड डायलिसिसची गरज आहे तो डॉक्टर आणि आधुनिक इस्पितळापासून लांब राहू शकतो का? त्याच्या इस्पितळात जायच्या यायच्या हालचाली लपून राहू शकतात काय? अगदी हेही खरे मानले की त्याच्यावर पाकिस्तानी सैनिकी इस्पितळामध्ये उपचार केले जात आहेत तरी देखील अशा बाबी गुप्त ठेवणे अवघड असते. आणि हेच खरे असेल तर ओसामा बिन लादेन अफगाणिस्तानच्या डॊंगरदर्‍यांमध्ये कुठेतरी लपून बसला आहे आणि त्याचा ठाव ठिकाणा पाकिस्तानी गुप्तहेर संस्थांना लागत नाही हे जे सांगितले जात होते ते तरी खरे कसे मानायचे? 

असो. बातम्या जरी अशा पसरवल्या जात होत्या तरीदेखील प्रत्यक्षात परिस्थिती काय होती हे आता पुढे आलेच आहे. ओसामा बिन लादेनची सर्वात तरूण पत्नी स्वतःच डॉक्टर होती आणि त्याच्यावरती जुजबी इलाज घरीच करण्याइतपत सक्षम होती. अबटाबादच्या घरापासून पाकिस्तानी सैन्याचे प्रशिक्षण केंद्र दोन किलोमीटरच्या आतच होते. तो राहत असलेल्या इमारतीमध्ये बाहेरचा कोणीही येत नव्हता. आणि घरामधला कचराही बाहेर फेकला जात नव्हता. त्याच्या नोकरवर्गापैकी पुरुष मंडळी तेव्हढीच जरूरीचे सामान आणण्यापुरती बाहेर पडत होती. त्याचे निरोप घेऊन बाहेर पडणारा आणि त्याच्यासाठी बाहेरच्या जगाचे निरोप आणणारा त्याचा नोकर घरामध्ये शिरण्यापूर्वी सेलफोनच्या बॅटरी फोनमधून काढून ठेवत होता आणि बाहेर पडल्यानंतर १००-१५० किमी दूर जाईपर्यंत फोन चालू करत नव्हता. इतकेच काय त्या घरात ओसामाच राहतो की नाही याची तपासणी करण्यासाठी अमेरिकनांना लस टोचण्याचे नाटक करून बाहेरच्या डॉक्टरची मदत घ्यावी लागली होती.

आजारपणाची नाटके इतरांच्या बाबतीतही बघायला मिळाली आहेतच. सर्जिकल स्ट्राईकनंतर अचानक हाफीझ सईद आजारी पडला होता. आणि कित्येक महिने सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नव्हता. त्याच्या नावाने प्रसृत केल्या जाणार्‍या व्हिडियो क्लिपस् जुन्याच होत्या आणि ते सिद्ध करणेही सोपे होते. सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हाच मुजाहिदीनांना प्रोत्साहन देण्यासाठी हाफिझ घटनास्थळी हजर होता आणि हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला अशा बातम्या होत्या. पुढे एका चॅनेलने तर भारतीय सुरक्षा संस्थांनी टेप केलेले संभाषणही ऐकवले होते. त्यामध्ये गाझी - गाझी - गाझी को लग गया है - असे तंबूतील एक व्यक्ती आपल्या केंद्रात कळवत असल्याचे ऐकवले गेले होते. हा गाझी नेमका कोण होता? 

तर मित्रांनो, ह्या किडनीच्या आजाराचे वैशिष्ट्य काय असते मला तर काही ठाऊक नाही. म्हणजे तो कितपत लपवता येतो वा लपवायला बरा पडतो याची माहिती नाही.  पण ज्या अर्थी पाकडे हीच "इस्टोरी" वारंवार वापरत आहेत त्या अर्थी त्यांची ह्या प्रकरणी चांगलीच रंगीत तालीम यापूर्वी झालेली दिसते. एकदा तोंडपाठ केलेले डायलॉग परत वापरले जात आहेत. कष्ट कमी!! म्हणून आज जेव्हा अचानक मासूद अझरच्या बाबतीत हेच सगळे वर्णन वाचायला मिळाले आहे तेव्हा मात्र प्रत्यक्षात काय अवस्था असेल ती असो पण पाकडे सांगतात तशी नक्कीच नसेल याची खात्री पटते. 

हं - आता तर तुम्ही असेही वाचले असेल की ओसामा बिन लादेनला अमेरिकनांनी उचलून नेले तेव्हा पाकड्यांच्या सैन्यामधील निदान काही जणांनी - अगदी वरिष्ठ वर्तुळातील काही जणांनी - अमेरिकेला मदत केली असावी. तसे नसते तर अमेरिकेची विमाने पाकिस्तानच्या हद्दीमध्ये शिरूनही प्रतिकार का झाला नसावा? आणि ही विमाने कुठे अहिर्‍या गहिर्‍या गावाकडे गेली नव्हती भर अबटाबादमध्ये जाऊन चक्क उतरली होती. आणि तिथे चांगली पाऊण तास थांबली होती. तरीसुद्धा त्यांना कोणी हटकले नाही? आजूबाजूचे गावकरी जमा झाले आणि त्यांनी गोर्‍यांना हटकायला सुरूवात केल्यावर बंदूक दाखवून त्यांना थांबवावे लागले नाही काय? आणि हा आरोप खरा असेलच तर कोणत्या पाकिस्तानी अधिकार्‍यावर कारवाई झाल्याचे तुम्ही वाचले काय? फक्त एकाच इसमावर कारवाई झाली - तो डॉक्टर ज्याने त्या घरात जाऊन डी एन ए मिळवायचा प्रयत्न केला. 

अशीच मदतगार मंडळी पाकिस्तानी सैन्यामध्ये आजही असू शकतात - नाही का? ही मंडळी काय एक एकटी आपले काम चुपचाप पार पाडतात? की त्यांचाही एक गट आहे बरे? असलाच तर कुठे आहे? सैन्यात की आय एस आय मध्ये? की दोन्ही कडे? आणि अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प म्हणतात की India is trying something very big!!!

तुम्ही ज्याला दोवल नीती म्हणून ऐकता वाचता स्वतः त्यावर लिहिता त्या दोवल नीतीचा "साम दाम दंड भेद" मधल्या भेदनीतीवर भर असतो हे त्यांच्या पूर्वायुष्यातील कथा ऐकून समजू शकते. काश्मिरात काम करत असताना दोवल ह्यांनीच कूका परे ह्या एक् काळ विघटनवादी तरूणाला प्फोडले होते. हा कूका परे गुप्त रेडियो स्टेशनवरून आपले संदेश रात्री काश्मिर घाटीमध्ये देत असे. पण प्रत्यक्षात तो भारताचा दोस्त बनला होता. मिझोरममध्ये दोवलांनी लाल डेंगाच्या सहापैकी चार साथीदारांना फोडून स्वतःच्या घरामध्ये दोन चार महिने लपवून ठेवले होते. आणि फार काय डी गॅंगच्या बंदोबस्तासाठी त्यांच्याच प्रतिस्पर्धी गॅंगचा वापर करण्याची शक्कलही त्यांचीच होती. भेदनीतीतज्ञ असे आपण दोवल ह्यांचे वर्णन करू शकतो. त्यांनी पाकिस्तानामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये काय काय करून ठेवले आहे कोण जाणे!

आज आपल्याला मासूद अझरची कहाणी ऐकवली जात आहे. तिच्यामध्ये सुद्धा असेच अधांतरी धागे दोरे नाहीत काय? एकीकडे भर टीव्हीवरच्या कार्यक्रमामध्ये वित्तमंत्री श्री अरूण जेटली म्हणतात की "जेव्हा ओसामा बिन लादेनला अमेरिकेने पाकिस्तानमधून उचलून नेले तेव्हा आम्ही फक्त विचार करत होतो की असे करणे आपल्याला जमेल काय? आज मी म्हणतो हे आम्ही देखील करू शकतो". 

तर मग मित्रांनो, हल्ले संपलेले नाहीत. पुलवामा प्रकरणाला टाळा आणि ताळा लागलेला नाही. जोवर संपूर्ण नाट्य उलगडत नाही तोवर प्रतीक्षा करा. जागते रहो. 

Friday, 1 March 2019

अब्दुल हमीद ते अभिनंदन वर्तमान

08abdul-hamid1
Image result for abhinandan varthaman



पाकिस्तानच्या तावडीतून काल विंग कमांडर अभिनंदन वर्तमान सुखरूप परतला ह्या बातमीने करोडो भारतीयांच्या जीवाला दिलासा मिळाला आहे. माणुसकीचा एक भाग सोडला तर त्याच्याविषयी जे अपार कौतुक जनतेमध्ये आहे त्याला कारण आहे त्याने छेडलेली आणि जिंकलेली विषम लढाई. समोर एफ १६ सारखे अत्याधुनिक विमान असूनही आपल्या हाती असलेल्या मिग २१ विमानाने त्याच्याशी टक्कर देण्याची जिगर अभिनंदनने दाखवली इतकेच नव्हे तर ते अत्याधुनिक एफ १६ विमान त्याने पाडून दाखवले त्यासाठी भारतीय पिढ्यानुपिढ्या त्याचे नाव कधी विसरू शकणार नाहीत. इतके झाल्यानंतर अभिनंदनच्या जुनाट मिग २१ विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे त्याला विमानातून खाली उडी मारावी लागली. मिग २१ कोसळले पण अभिनंदन सुखरूप धरतीवर उतरला. वार्‍याच्या दिशेमुळे तो नियंत्रण रेषेपलिकडील पाकव्याप्त काश्मिरच्या भूमीवरती उतरल्यानंतर प्रसंगावधान राखून त्याने आपल्याकडचे संवेदनशील कागदपत्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि काही कागदपत्रे तर गिळूनही टाकली असे समजते. यानंतर एक भारतीय वैमानिक आपल्या हद्दीमध्ये उतरला आहे हे जाणून पाकिस्तानने जवळच्या गावकर्‍यांना बोलावून त्याला यथेच्छ चोप देण्यास उत्तेजन दिले आणि नंतर सोळभोकपणे आपण त्याला कसे वाचवले याची फिल्मही काढली. अभिनंदनचे नशीब जोरावर होते. कारण इथे केंद्रात हात पाय आणि थोबाड बांधून बसलेल्या कोणा १० जनपथच्या सरदाराचे राज्य नव्हते तर ५६ इंच छाती असलेल्या मोदी सरकारचे राज्य होते. पाकिस्तानला हग्या दम भरल्यानंतरच अभिनंदनला जिनिव्हा कराराच्या तरतूदींनुसार सोडण्याची पाळी त्याच्यावर आली. त्यातही वदंता अशी आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ह्यांनी आय एस आय किंवा सैन्य अथवा दोघांच्या संमतीशिवाय त्याला सोडण्याची एकतर्फी घोषणा आपल्या संसदेमध्ये केली. अभिनंदनला सुखासुखी सोडायला ही मंडळी किती नाखुष असतील ह्याची कल्पना काल त्याच्या सुटका नाट्य़ामध्ये आपल्याला पहायला मिळाली नाही काय? एक तर दिवस सुरू झाला तेव्हापासूनच विलंबाला सुरूवात करण्यात आली. मग वाघा सीमेपर्यंत आणून त्याला पुनश्च मागे नेण्यात आले. कागदपत्रे तयार ठेवण्यात आलेली नव्हती. जर सोडण्याचा निर्णय झालेला होता तर ह्या बाबींना इतका वेळ का लागावा बरे? दुपारी दोन वाजल्यापासून त्याच्या आगमनाच्या बातम्या येत होत्या पण जेव्हा रात्री नऊ उलटून गेले तरी तो पाकिस्तानच्याच ताब्यात आहे हे टीव्हीवरून सांगितले गेले तेव्हा हृदयाचे ठोके चुकले. याच जोडीने इथले फेकू लिब्बू इम्रान खानच्या औदार्याच्या कथा भारतीयांच्या मनावर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. मित्रहो हे सगळे नाट्य घडत होते तेव्हाही सीमेवरती शांतता नव्हती. शत्रूच्या तोफा धडधडतच होत्या. आणि आमचे जवान डोळ्यात तेल घालून सीमेच्या रक्षणामध्ये गुंतले होते. इतकेच नव्हे तर कालच्या घुसखोरीमध्ये काही जवानांना प्राणही गमवावे लागले. तेव्हा इम्रान खान ह्यांच्या औदार्याच्या बाता ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये कोणीही भारतीय नाही हे लिब्बूंनी आपल्या ठसाठस भरलेल्या डोक्यामधील अडगळ बाहेर फेकून देऊन नवी जागा तयार करून भरवून घ्यावे. 

अभिनंदन जीवंत आहे, सुखरूप आहे. विमानातून उडी मारणार्‍या वैमानिकाला पाठीच्या कण्याच्या आजाराला सामोरे जावे लागते सर्वश्रुत आहेत. निदान काल तरी तो ताठ उभा आहे असे दिसले तरी उजवा पाय ओढत चालत असल्यासारखे वाटले. त्याची यथायोग्य वैद्यकीय चाचणी तर होईलच आणि त्यावर इलाजही होतील पण हा पराक्रमी विंग कमांडर इथून पुढे भर युद्धात भाग घेऊ शकेल का ह्यावरच्या प्रश्नचिन्हाला अजून उत्तर मिळालेले नाही. अर्थात त्याने जो पराक्रम केला आहे त्याने तर तो भारतीयांच्या हृदयामध्ये कायमचे स्थान मिळवून जीवंतपणी अजरामर झाला आहे. ह्यासाठी त्याचे किती कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. 

अभिनंदनची कथा ऐकून आठवण येते ती १९६५ च्या युद्धाची आणि त्यामध्ये लढलेल्या एका हवालदाराची ज्याचे नाव होते अब्दुल हमीद. १९६५ च्या युद्धामध्ये पंजाबमधील खेम करण युद्धक्षेत्रामध्ये पाकिस्तान्यांना घुसू न देण्याचे आदेश होते. इथे पाकडे आपले अत्याधुनिक अमेरिकन पॅटन रणगाडे घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत होते. १९६५ सालच्या युद्धामध्ये रणगाडा हे एक नाविन्याचे वाहन होते. आम्ही भारतीयांनी त्याविषयी पहिल्यांदाच काही ऐकले होते. पाण्यातून आणि जमिनीवरून - रस्ता असो वा नसो - कशाही खडबडीत वाटेवरून रणगाडा नेता येतो आणि त्याच्या डोक्यावरती बसवलेल्या तोफा वापरून समोरच्या शत्रूला भुईसपाट करता येते हे त्यांचे वर्णन अद्भुत वाटत असे. रणगाड्याचा मुकाबला करायचा तर आपल्याकडेही रणगाडाच हवा अशी केवळ आमचीच नाही तर जगाची समजूत होती. मित्रांनो ते दिवस असे होते की पाकिस्तान हे अमेरिकेचे आवडते तट्टू होते पण भारताच्या मागे कोणी एक बलाढ्य शक्ती होती असे नाही. दिल्लीच्या तख्तावरती गैर नेहरू कुटुंबातील शास्त्रीजी विराजमान होते. संपूर्ण जगामधून भारतासाठी साधी सहानुभूती सुद्धा नव्हती. मग भारताकडे आधुनिक शस्त्रास्त्रे कुठून असणार? 

खेमकरण जवळ अब्दुल हमीदला आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्याच्याकडे होती रिकॉईललेस बंदूक. समोरून येणार्‍या रणगाड्यांचा मुकाबला करायचा तर एंटी टॅंक डिटॅचमेंट कमांडर नियुक्त केला जातो. पण अब्दुल हमीदच्या तुकडीमध्ये असा कोणी अधिकारी नव्हता आणि कोणी पाठवला जाण्याची शक्यताही नव्हती. तेव्हा तूच हे काम हाती घे असा आदेश देण्यात आला. समोरून येणारे रणगाडे आग ओकत होते आणि त्यांनी डागलेले गोळे यार्डायार्डावर पडत होते. हिंमत न हारता अब्दुलने आपल्या हाती असलेल्या आरसीएल गनने रणगाड्यांवर हल्ला चढवला. आणि दोन रणगाड्यात स्फोट होऊन ते निकामी झाले. हेच तंत्र वापरून अब्दुलने दुसर्‍या दिवशीही  आणखी दोन रणगाडे उडवले. अमेरिका जे पॅटन रणगाडे टॉप ऑफ द लाईन हत्यार म्हणून मिरवत होती तेच रणगाडे साध्या आरसीएल गनने कसे उडवता येतात हे अब्दुलने दाखवून दिले. त्याचा अतुलनीय पराक्रम चालूच राहिला. अखेर शत्रू रणगाडे सोडून पळाल्यावरती अब्दुलने त्यांनी सोडलेले रणगाडेही आपल्या ताब्यात घेतले. तिसर्‍या दिवशीच्या युद्धामध्ये अब्दुल हमीद कामी आला ते देखील शत्रूचे आणखी दोन रणगाडे उडवयानंतरच. एकूण आठ रणगाडे उडवणार्‍या ह्या वीराकडे संपूर्ण जगाचे लक्ष तेव्हा लागले होते. सैन्याने त्याचा परम वीरचक्र देऊन यथोचित सन्मान केला. 

मित्रांनो अब्दुल हमीदच्या कथेने त्यादिवसात आम्ही असेच हेलावून गेलो होतो जसे आज तुम्ही अभिनंदनच्या पराक्रमाने सद्गदित झाला आहात. अभिनंदनच्या हाती काय होते? मिग २१? हे म्हणजे १९८० च्या दशकातील मारूती ८०० ने आजच्या बी एम डब्ल्यूला शर्यतीमध्ये हरवण्यासारखे आहे. अभिनंदनच्या शौर्याने आणि त्याने दाखवलेल्या अतुलनीय यांत्रिकी कौशल्याने सगळे जग स्तिमित झाले आहे. मिग २१ बनवणार्‍या रशियाची छाती आज गर्वाने फुगली असेल. आणि एफ १६ बनवणार्‍या अम्रिकेचे इंजिनियर विचारात पडले असतील. त्या एफ १६ वरती सज्ज होती अत्याधुनिक मिसाईल्स तर अभिनंदनच्या हाती होते आर ७३ ज्याची रेंज अगदी कमी असते. म्हणून एफ १६ च्या निकट जाऊन त्याला आर ७३ सोडावे लागले. पण ते काम त्याने इतके अचूक केले की शत्रूचे एफ १६ कोसळले. भारतीय वायुदलाच्या प्रशिक्षण व्यवस्थेविषयी आज जगामध्ये एकच औत्सुक्याची लाट आली आहे. इतके अचूक प्रशिक्षण भारतीय वायुदल कसे देऊ शकते आणि त्यासाठी नेमके काय केले जाते तसेच भारतीय वैमानिकांचे आधुनिक शस्त्रास्त्रे हाताळण्याचे कौशल्य हे विषय आता सैनिकी दुनियेमध्ये पुढील काही दशके चर्चिले जातील. 

ह्या घटनेचे पडसाद कानठळ्या बसण्याएव्हढे मोठे आहेत आणि त्याचा गाजावाजा होत आहे तो शस्त्रास्त्र निर्मिती करणार्‍या कंपन्यांच्या भविष्यकालीन धोरणाबाबत. खास करून भारताला लढाऊ विमाने विकण्यास उत्सुक असलेल्या कंपन्या ह्या घटनेच्या पार्श्वभूमीला स्पर्श केल्याशिवाय आपले म्हणणे आणि उत्पादन भारतीय वायुदलाला "विकू" शकणार नाहीत. म्हणूनच त्यादिवशीच्या लढाईमध्ये नेमके काय घडले ह्याचे तपशील जाणून घेण्यास जगभरचे सुरक्षा तज्ञ  उत्सुक आहेत. म्हणून एक नव्हे तर अनेक अर्थांनी अभिनंदन आज अजरामर झाला आहे असे मी म्हटले.

२०१७ साली जेव्हा चीनने दोकलाममध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा इथले लिब्बू फारच शेफारले होते. बलाढ्य चीनसमोर "५६ इंच छातीच्या वल्गना करणारे" मोदी यूं गुडघे टेकतील आणि त्यांची फटफजिती होईल अशा गमजा चालल्या होत्या. चीनच्या सुरक्षा सज्जतेविषयीच्या कथा ऐकवल्या जात होत्या. भारताकडे कशी जुनाट शस्त्रास्त्रे आहेत आणि चीनकडे मात्र कित्येक पटीने जास्त असलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत ह्याच्या तपशीलाने लिब्बू लोक इथल्या जनतेला मनाने गारद करण्याच्या कामाला लागले होते. हे सायकॉलॉजिकल युद्ध - मनोवैज्ञानिक दबाव तंत्र - अगदी प्रभावीरीत्या काम करताना दिसत होते. चीनकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि भारताकडे मात्र जुनाट शस्त्रास्त्रे ही पाळी भारतावर आणली कोणी हा प्रश्न मात्र कोणी विचारताना दिसत होते काय? त्या नेहरू घराण्यातील राजपुत्रांबद्दल मात्र कोणी काही टीका करायची नाही असा त्यांचा अलिखित नियम होता. सामान्य माणसाची छाती दडपेल अशीच तफावत भारत आणि चीन ह्यांच्या शस्त्रसज्जतेमध्ये आहे हे आंधळाही कबूल करेल. पण ज्या भारतीय पिढीने अब्दुल हमीद पाहिला नव्हता ते तर लिब्बूंच्या ह्या प्रचारामुळे अधिकच गर्भगळीत झाले नव्हते काय?

पण आम्ही आणि आमच्या पिढीने तर अब्दुल हमीद पाहिला होता. हाती काय शस्त्र आहे ह्याचा विचार न करता जीवावर उदार होऊन त्याने खेमकरणची लढाई लढली आणि त्यामध्ये तो भीष्म पराक्रम करून गेला. हाती विळे कोयते घेऊन मोंगलांच्या सुसज्ज सैन्याविरुद्ध लढणारे मावळे आमचेच शिवप्रेमी लोक विसरून गेले होते. हाती शस्त्र काय ह्याला महत्व नसते असे नाही पण त्यामागची लढण्याची जिगर बाजी मारून जाऊ शकते हा अभिनंदनच्या लढाईचा संदेश आहे. आणि त्याचे पडसाद येणार्‍या पिढीलाही विसरता येणार नाहीत.

अर्थात ह्याचा अर्थ असा नव्हे की आम्ही सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष करावे. ह्याच अभिनंदनच्या हाती अत्याधुनिक राफालसारखे विमान आले तर भारत कोणत्या स्थानावर जाऊन बसू शकतो ह्याची कल्पना करा. आणि हेच आपले कर्मदत्त स्थान असले पाहिजे. हा उद्देश ज्याच्या मनामध्ये सुस्पष्ट आहे असा एक पंतप्रधान आज दिल्लीच्या तख्तावर विराजमान आहे ही गोष्ट आभिमानास्पद आहे.  २०१९ च्या निवडणुकीमध्येही मोदीच पुन्हा निर्विवाद जिंकतील ह्याची दक्षता तुम्ही आम्ही का घ्यायची आहे ह्यावर प्रकाशझोत टाकणारी अभिनंदनची कहाणी आपल्याला कायम स्फूर्तीदायक वाटो ही इच्छा.