गेल्या वर्षी अटलजी गेले तेव्हा मनात आले - अजून जॉर्ज आहे आपल्यासोबत. आता जॉर्जही गेला आहे. जन्मभर घोंगावणारे वादळ खरे तर लोकांसाठी कधीच शमलेले होते. पण त्याच्या चाहत्यांसाठी मात्र जॉर्ज हलता बोलता पाहायला न मिळता सुद्धा शेवटपर्यंत एक वादळच राहिला. आमची विशीमधली कन्या तुमची फॅन आहे ऐकताच चक्रावलेला जॉर्ज २००४ मध्ये भाऊला म्हणाला होता की तिच्या वयामधले भारतीय मला ओळखतात हाच सुखद धक्का आहे. वादळ म्हणायचे ते अशासाठी की त्याची दिशा काय असेल हे त्याच्या चाहत्यांना आणि विरोधकांना माहिती नसायचे. पण असे असले तरी त्याचा खुंटा घट्ट बांधलेला होता एका माणसाजवळ. त्याचे नाव आहे अर्थातच डॉ. लोहिया. आजच्या पिढीला लोहियांचे नाव क्वचित ऐकायला मिळते. लोहियांचे शिष्य म्हणून सामाजिक जीवनामध्ये वावरत आहेत त्यांच्याविषयी न बोललेले चांगले असे वाटू लागले आहे. पण जॉर्ज त्याला अपवाद होता. कामगारांच्या मोर्च्यावर लाठीमार केला म्हणून केरळमधील आपल्याच पक्षाच्या पट्टम थाणू पिल्ले सरकारचा राजीनामा मागणारे डॉ. लोहिया जॉर्जचे राजकारणामधले गुरू होते. इतकी तत्वनिष्ठ माणसे आजकाल राजकारणाला आणि समाजाला सुद्धा सोसेनाशी झाली आहेत. काहीतरी हिणकस असल्याशिवाय नेता म्हणून उदयाला येणारी उदाहरणेच समोर नसतील तर दोष नव्या पिढीला तरी कसा द्यायचा? दादरमध्ये एक स्टॉप अंतरावरच्या दंडवते ह्यांच्या सुस्थितीतील फ्लॅटमध्ये राहायचे टाळून जवळच्या शोभनाथ सिंग ह्यांच्या चाळीसमोरच्या फूटपाथवर चारपाई टाकून झोपणारे लोहिया - बेस्ट कंडक्टर बाबुरामच्या घरी जेवायला गेल्यावर त्याच्या बायकोला "रोज पुरी भाजीचे जेवण नाही ना करत, मग माझ्यासाठी कशाला बनवले म्हणून दटवणारे लोहिया ह्यांचा शिष्य जॉर्ज आणीबाणीच्या काळात व्हीटी स्टेशनच्या बाहेर फूटपाथवर राहत होता आणि एखाद्या इराण्याकडे बनपाव आणि मस्का खाऊन सुखी होता हे सत्य आजच्या पिढीला आणि राजकारण्यांना पचनी पडणे अवघड आहे. पण जॉर्ज असाच होता. वडिलांच्या इच्छेखातर धर्मगुरू बनण्यासाठी मंगळूरहून मुंबईत आला आणि धर्मसंस्थेच्या "कथनी और करनी में फर्क" न रूचल्यामुळे कायमचा दूरही झाला.
"कौन करेगा? हम करेगा - क्या करेगा? - रेल का चक्का जाम करेगा" ही घोषणा देऊन १९७४ मध्ये ती खरी करणारा जॉर्ज एकच. "ऐल ते पैल हजारो मैल - रेल्वे बंद -कशासाठी पोटासाठी" ही दैनिक मराठाची त्यावेळची हेडलाईन आजही आठवते. सर्वसामान्य माणसाने हलाखीमध्ये तीन आठवडे काढले पण जॉर्जच्या संपाबद्दल त्यांच्या मनामध्ये चीड नव्हती. आपल्यासारख्याच सामान्य रेल्वे कामगारासाठी लढा आहे हे जाणून जनता मनापासून पाठिंबा देत होती. रेल्वे संपाचा जबर धक्का केंद्रामधले इंदिरा सरकार पचवू शकले नाही. त्याला पार्श्वभूमी होती ती अर्थातच १९७३ पासून श्री जयप्रकाश नारायण ह्यांनी छेडलेले संपूर्ण क्रांती आंदोलन. त्याचेच छोटे भावंड नवनिर्माण आंदोलन चिमणभाई सरकारविरोधात गुजरातमध्ये पाहायला मिळाले होते. इकडे महाराष्ट्रामध्ये श्रीमती मृणाल गोरे - अहिल्या रांगणेकर आणि प्रभृती महिला आंदोलने चालवत होत्या. जॉर्जची लोकप्रियता वाढती होती. इतकी की ८ मे रोजी सुरू झालेल्या संपाला प्रत्त्युत्तर म्हणून आणि आंदोलनातील हवा काढून घेण्यासाठी - आपणही निर्णायक पावले उचलू शकतो दाखवण्यासाठी बाईंना १८ मे रोजी अणुस्फोट करावा लागला.
रॉ चे माजी प्रमुख श्री विक्रम सूद ह्यांनी लिहिले आहे की कॉंग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम ह्या सीआयए प्रणित संस्थेच्या भारतामधील शाखेचे श्री जयप्रकाश नारायण हे मानद अध्यक्ष होते. ही संस्था आणि तिची पाळेमुळे सीआयएशी जोडलेली आहेत हे भल्याभल्यांना माहिती नव्हते. त्यामुळे ते जयप्रकाशजींनाही कदाचित माहिती नसावे. मिनू मसानी हे त्या संस्थेचे दुसरे नामवंत भारतीय. जयप्रकाश आंदोलनात सहभागी झालेल्यांनाही ह्या गोष्टी माहिती असतीलच असे नाही. तो काळच वेगळा होता. १९७१ च्या युद्धाआधी श्रीमती इंदिरा गांधी ह्यांनी सोव्हिएत रशियाशी दीर्घ मुदतीचा - वीस वर्षीय मैत्री करार केल्यामुळे आमच्यासारखे तरूण बावरलेले होते. एक ना एक दिवस रशिया आपल्यालाही सॅटेलाईट देश बनवणार अशी भीती वाटत होती. बाईंची रशियाशी असलेली जवळीक जनतेला अस्वस्थ करत होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरती जनतेला रशियाची मैत्री हवीहवीशी वाटली तरी देशाच्या अंतर्गत बाबींवरती मात्र त्याचा वरचष्मा नको होता. असेही एकंदरीत गरीबी हटाओ घोषणा देऊन स्थानापन्न झालेल्या इंदिराजींना डाव्या वाटेने जाऊन हा प्रश्न सोडवणे अवघड जात होते. गरीबी महागाई बेकारी अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा काळा पैसा भ्रष्टाचार ह्या समस्यांमध्ये भरडून निघालेली जनता जयप्रकाशजींच्या मागे जात होती. जॉर्जने १९७४ साली केलेल्या संपाला जनतेची मूक संमती होती ती ह्या पार्श्वभूमीवरती.
१९७५ मध्ये अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालानंतर बाईंनी अंतर्गत आणिबाणी घोषित करून सर्व विरोधी नेत्यांना तुरूंगात डांबण्याचे सत्र सुरू केले. जॉर्ज पहिल्या लाटेमध्ये पकडला गेला नाही. नुकतेच झालेले लग्न आणि लहान पोर ह्यांना देशाबाहेर पाठवले आणि तो इथेच लढा देत बसला. जॉर्जची पत्नी लैला आणि मुलगा शॉन ह्यांना जॉर्जच्या युरोपातील समाजवादी मित्रांनी अगदी सुखरूप ठेवले होते. "आम्ही त्यांचा बराच शोध घेतला पण त्याच्या समाजवादी मित्रांनी आम्हाला जराही दुवे मिळू दिले नाहीत" असे फ्रान्समध्ये त्याकाळी कार्यरत असलेले रॉ चे माजी अडिशनल सेक्रेटरी श्री बी रामन ह्यांनी लिहिले आहे. मुलाच्या जन्मानंतर जॉर्ज त्याला भेटला तेव्हा शॉन मोठा झालेला होता. आणिबाणीच्या अक्राळविक्राळ स्वरूपाने जनतेने हताश होऊ नये म्हणून - काही तरी घडतंय - कोणीतरी करतंय विरोध वाटावे म्हणून जे काही त्याने केले त्यातून उभी राहिली ती बडोदा डायनामाईट केस.
आयुष्य त्याने कामगार नेता म्हणून काढले - मुंबई बंद करण्याची क्षमता त्याकाळात जॉर्जकडे होती - आणि "तुम्ही पाटलांना पाडू शकता" अशी आकर्षक घोषणा देत कॉंग्रेसी बडे धेंड स.का.पाटील ह्यांना पाडण्याची त्याची क्षमता होती. जनता पार्टीच्या काळामध्ये जेव्हा त्याच्या कडे उद्योग मंत्रालय सोपवण्यात आले तेव्हा अनेक उद्योगपतींची झोप उडाली असेल. पण जॉर्जने त्या खुर्चीला न्याय देत खाते उत्तम चालवले आणि त्याची पावती उद्योगपतींकडून घेतली. कॉंग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम ह्या सीआयए प्रणित संस्थेशी जयप्रकाशजी जोडलेले असले आणि जॉर्ज त्यांच्याच आंदोलनाची परिणती म्हणून सत्तेवर आलेल्या जनता सरकार मध्ये उद्योग मंत्री असला तरी अमेरिकेबद्दलची त्याची मते ठाम होती आणि ती शेवटपर्यंत तशीच होती हे अगदी स्पष्ट आहे. उद्योगमंत्री म्हणून त्याने घेतलेला एक निर्णय चांगलाच गाजला तो म्हणजे परदेशी कंपन्यांना त्यांच्या भारतीय सबसिडियरीमध्ये ५०% पेक्षा कमी शेयर्स ठेवण्याची सक्ती. ह्या तरतूदीने अनेक परदेशी कंपन्या चांगल्याच तापल्या होत्या. अनेकांनी नाखुशीने का होईना पण आपले भाग भांडवल कमी केले. पण दोन कंपन्यांनी हे करण्याचे नाकारले. कोका कोला आणि आयबीएम ह्यांनी भारतामधून गाशा गुंडाळायचा निर्णय घेतला. गंमत अशी की एकीकडे जनता पार्टीचे पंतप्रधान श्री मोरारजी देसाई अमेरिकेशी संबंध सुधारण्यावर भर देत होते आणि रशियाच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होते तर दुसरीकडे जॉजने कोकाकोलाचा कटू निर्णय सर्व विरोधाला न जुमानता घेऊन दाखवला. कोका कोला इथून गेल्यावर पार्ले कंपनीने थम्स अप नावाचे जवळपास त्याच चवीचे पेय बाजारात आणले आणि लोकप्रिय करू दाखवले होते. परदेशी कंपन्यांवर चाप लावणाऱ्या जाॕर्जने भारतीय उद्योगपतींचा कान पकडून सिमेंट निर्मितीमध्ये उतरवले आणि सिमेंट तुटवड्यावर मात करण्याचा रस्ता मोकळा केला. आज देशात आपण सिमेंट विकण्यासाठी जाहिराती बघतो. कोणा बिर्लाचा करोडो रूपयांचा फायदा करून दिला हो म्हणून हंबरडा फोडणाऱ्या खबरंड्या तेव्हा नव्हत्या. देशहित जाणून राजकारण करणाऱ्या इंदिराजींकडेही सुबुद्धी शाबूत होती.
१९८९ मध्ये जॉर्ज व्ही पी सिंग मंत्रीमंडळात रेल्वे मंत्री बनला - ज्या रेल्वे मध्ये तो कामगार नेता होता त्याच खात्यचे मंत्री त्याला करण्यात आले. जॉर्जने कोंकण रेल्वे मंगलूरमपर्यंत वाढवली आणि तिला आर्थिक दृष्ट्या आकर्षक बनवले. ह्यानंतर तिच्यासाठी पैसा उभारणे शक्य झाले व काम मार्गी लागले.
१९८९ मध्ये जॉर्ज व्ही पी सिंग मंत्रीमंडळात रेल्वे मंत्री बनला - ज्या रेल्वे मध्ये तो कामगार नेता होता त्याच खात्यचे मंत्री त्याला करण्यात आले. जॉर्जने कोंकण रेल्वे मंगलूरमपर्यंत वाढवली आणि तिला आर्थिक दृष्ट्या आकर्षक बनवले. ह्यानंतर तिच्यासाठी पैसा उभारणे शक्य झाले व काम मार्गी लागले.
अणुबॉम्बला डॉ. लोहिया ह्यांचा विरोध होता. पण देवेगौडा सरकारवर एनपीटी करारावर सह्या करा म्हणून आलेले अमेरिकन दडपण पाहून त्याने देशाच्या सुरक्षेसाठी अणुबॉम्बला पाठिंबा दिला. इथेच परिस्थितीनुसार आपल्या गुरूच्या शिकवणीचे सार काय हे जाणून त्यानुसार भूमिका घ्यायचे त्याचे कसब दिसते.
१९८५ नंतर म्हणजे शहाबानो खटल्यानंतर देशाचे राजकारण बदलत होते. दुहेरी सदस्यत्वाचा प्रश्न उपस्थित करून जनता पार्टीमधल्या समाजवाद्यांनी पूर्वाश्रमीच्या जनसंघियांना जीवन असह्य करून सोडले होते त्यातूनच जन्माला आलेल्या भारतीय जनता पार्टीने प्रक्षुब्ध हिंदू मनाचा ठावा घेणारी भूमिका घ्यायला सुरूवात केली. त्यानंतर बाबरी आणि अन्य घटना घडून गेल्या. पूर्वाश्रमीचे भलेभले समाजवादी नेते हलले. आपल्या सेक्यूलॅरिझमच्या भूमिकेमध्ये भाजपशी जुळते मिळते कसे घ्यायचे हे कोडे त्यांना सोडवता आले नाही. पण जॉर्जचे तसे नव्हते. तो एका भूमिकेवर ठाम होता. देशापुढील सर्व समस्यांचे मूळ कॉंग्रेसी संस्कृती आणि तिचे राजकारणच आहे ह्यावर त्याचा आपल्या गुरूंप्रमाणे अढळ विश्वास होता. म्हणूनच कोणतेही द्वंद्व मनामध्ये न ठेवता तो भाजपसोबत जाऊ शकला. महाराष्ट्रामध्ये येथील समाजवाद्यांनी शिवसेनेबरोबर जावे अशी त्याची भूमिका होती पण मृणाल प्रभृती नेत्यांनी ती नाकारली. आज महाराष्ट्रामध्ये समाजवाद्यांचा मागमूस राहिला नाही ह्याचे कारण बदलत्या परिस्थितीमध्ये दिशा न उमगल्याचे आहे. लोहियांचा कॉंग्रेसविरोध वैयक्तिक नव्हता तर सिद्धांतांवर आधारित होता. आणि ते तत्व जॉर्ज कधी विसरला नाही. तत्कालीन भाजपमधल्या अनेक ढुढ्ढाचार्यांपेक्षा तो अधिक प्रामाणिक होता आणि कॉंग्रेसविरोधात असलेला आपला लढा तो ताकद लावून लढत होता. त्याच्या सोबतीची अटलजींना इतरांपेक्षा अधिक खात्री होती. संरक्षणमंत्री म्हणून काम करताना प्रत्येक ख्रिसमस सैनिकांसोबत सीमेवर घालवणारा - सियाचेनच्या जीवघेण्या थंडीमध्ये तिथे १९ फेर्या घालणारा - पाकिस्तान नव्हे चीन हा भारताचा मुख्य शत्रू आहे म्हणून ठाम प्रतिपादन करणारा जॉर्ज अविस्मरणीय आहे. चीनचे थ्रेट परसेप्शन हा त्याचा शब्द प्रयोग येथील मांडलिक डाव्यांना आणि त्यांच्या पत्रकारांना चांगलाच झोंबला. तरीही चीनविरोधात तयारीम्हणून त्याने गॉर्श्कोव्ह युद्धनौका रशियाकडून घेण्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरवला. ह्यामुळेच तर सोनिया प्रणित कॉंग्रेसने त्याला आपले लक्ष्य बनवले आणि त्याच्या वरती टेहलका द्वारा खोटेनाटे आरोप केले आणि त्याला नामोहरम करण्याचे प्रयत्न केले. "केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे" म्हणतात तसा जॉर्ज आपल्या पराक्रमाने तळपतच राहिला.
प्रस्थापितांविरूध्दचे बंड हा गाभा त्याला कधी सोडता आला नाही. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या कोणत्याही अशा आंदोलकांसाठी त्याचे घर खुले होते. असह्य दमनशाही आहे म्हणून जनता रस्त्यावर उतरते हा दृढ विश्वास होता. काश्मीर आंदोलन असो की तिबेटी वा म्यानमारचे -सगळ्यांशी संवाद साधण्याची त्याची उत्कट इच्छा होती. माओवाद्यांचे नेते किशनजी यांना त्याच्या बंगल्यावर अनेकांनी पाहिले असेल.
प्रस्थापितांविरूध्दचे बंड हा गाभा त्याला कधी सोडता आला नाही. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या कोणत्याही अशा आंदोलकांसाठी त्याचे घर खुले होते. असह्य दमनशाही आहे म्हणून जनता रस्त्यावर उतरते हा दृढ विश्वास होता. काश्मीर आंदोलन असो की तिबेटी वा म्यानमारचे -सगळ्यांशी संवाद साधण्याची त्याची उत्कट इच्छा होती. माओवाद्यांचे नेते किशनजी यांना त्याच्या बंगल्यावर अनेकांनी पाहिले असेल.
२००४ मध्ये भाजप निवडणूक हरल्यानंतर त्याने मुलायम आणि काही समाजवादी नेत्यांना पुनश्च लोहियांच्या भूमिकेकडे आणण्याचा प्रयत्न केला खरा पण खूप वेळ होऊन गेला होता. "हर जोर जुर्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है" म्हणणारा जॉर्ज निष्कलंक राहिला असला तरी अन्य समाजवादी नेत्यांचे हात भ्रष्टाचारात माखलेले होते आणि त्यामुळे विधीशून्य कॉंग्रेसच्या ब्लॅकमेलींगला बळी पडलेले होते.
असेही नेते होते आपल्या देशात याची आठवण करून देणार्या यादीत आता जॉर्जही जोडला गेला आहे. जेव्हा केव्हा पुनरावलोकनाची गरज भासेल तेव्हा तेव्हा त्याच्या सारख्या नेत्यांची आठवण इथल्या राजकारण्यांना करावी लागेल हे निश्चित. माझ्यासाठी तरी एक मोठे पर्व संपले आहे. भारतीय राजकारणातील एक सत्यनिष्ठतेचा दुवा निखळला आहे. इथून पुढच्या प्रवासामध्ये जॉर्जचे जीवन एक दीपस्थंभ बनून राहील. दाखवण्यासारखे कोणतेही अनुयायी संख्याबळ पाठीशी नसतानाही आज जॉर्जची दखल माध्यमांना घ्यावी लागत आहे हेच त्याच्या यशस्वी जीवनाचे प्रतीक आहे.