Thursday 23 March 2017

उत्तर प्रदेशचा रंग - सेक्यूलरांचा बेरंग - भाग २

उत्तर प्रदेशचा रंग - सेक्यूलरांचा बेरंग - भाग २

मुस्लिम मतदार आपल्या हातून निसटला आहे ही जाणीव सेक्यूलरांना किती भयभीत करून सोडत असेल याची कल्पनाही करवत नाही. ही अवस्था एका रात्रीमध्ये निर्माण झालेली नाही. एका बाजूला संघ संघ म्हणून शंख करत सेक्यूलर आपल्याला त्यांची भीती घालतात आणि आपली मते घेऊ पाहतात तर दुसरीकडे सर्वसामान्य हिंदूंच्या रोषाला फक्त आपणच सामोरे जातो तेव्हा मात्र वाचवायला कोणीच पुढे येत नाही हा भारतामधल्या सामान्य मुस्लिमांचा स्वानुभव आहे. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य हिंदू इतके होऊनही आपला द्वेष करत नाहीत हेही त्यांना कळून चुकले आहे. हिंदूंसोबत एकत्र राहायचे तर मूठभर पुढारी सांगतात त्या मार्गाने जाणे शक्य नाही म्हणजेच आपल्याला सुखाने जीवन जगता येणार नाही हेही त्यांना कळून चुकले आहे. पण धर्माची मगरमिठी सोपी नाही त्यांच्यासाठी. त्यातून सुटणे कसे अवघड आहे हे त्यांना माहिती आहे.

जेव्हा एखादा गॅंगस्टर आपली टोळी चालवतो तेव्हा टोळीचे नियम मोडले तर काय होईल याची दह्शत आधी टोळीच्या सभासदांवरच घातली जाते. टोळीमध्ये आत येण्याचा मार्ग खुला असतो पण एकदा आत आलात की बाहेर पडणे आणि सन्मानाने जगणे दुरापास्त होते. म्हणून दुसर्‍यांना दहशत दाखवण्या्आधी आतल्यांनाच दमात घेतलेले असते, नाही का?

१९७९ च्या अफगाण युद्धानंतर वहाबी तत्वज्ञानाने जो जगभर धुमाकूळ घातला त्यातून भारतही सुटला नाही. सौदी पैसा ओतत होता आणि भारताच्या  खेडोपाडी तो पोहोचवला जात होता. कशासाठी येत होता हा पैसा? आकडे बघितले तर आपल्याला चक्कर यावी. त्या पैशामधून  विधायक कामे हाती घेतली असती तर एव्हाना सामान्य मुस्लिमाच्या आयुष्यामध्ये फरक पडलेला दिसून आला असता. पण हा पैसा त्यासाठी नव्हताच. खेडोपाडी जुन्या मशिदींचे पुनरुज्जीवन करायचे मग त्यांच्या देखभालीसाठी बाहेरून धर्मगुरु आणायचे. स्थानिक मुस्लिम धर्मगुरुंच्या बदली तेच मशिदीचा ताबा घेतात. हे चित्र बघायला मिळते. गोध्रा दंगलीच्या साधारण अडीच महिने आधी टाईम्सने एक वृत्त छापले होते. त्यामध्ये गोध्रा जवळच्या एका खेड्यामध्ये मशिदीच्या स्थानिक धर्मगुरुने ’वहाबींना ह्या मशिदीमध्ये प्रवेश नाही’ अ्सा फलक लावला होता. ह्यानंतर तिथे जी धुमश्चक्री झाली त्याची ही बातमी होती. म्हणजेच प्रत्यक्ष दंगल झाली त्याच्या अडीच महिने आधी गोध्रा जवळ कोणी परकीय धर्मगुरु म्हणा किंवा भारतीय पण वहाबी धर्मगुरु दाखल झाले होते आणि ह्या संघर्षामधून तिथे बातमी छापून येण्याइतकी खळबळ माजली होती हे दिसून येते. ह्या संदर्भात मुंबईमध्येही काय परिस्थिती आहे ते जाणकार मंडळी सांगू शकतील. स्थानिक मुस्लिम आणि वहाबी यांच्यामधल्या संघर्षाने आता एक टप्पा ओलांडला आहे. इथल्या देवबंदी आणि बरेलवी मुस्लिमांच्या ज्या संस्था आहेत त्या तरी आपल्या हाती राह्तील का नाही असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे. ह्यातूनच स्थानिक विरुद्ध वहाबी अशा संघर्षाची बीजे रोवली गेली आहेत.

ह्या खळबळजनक परिस्थितीमध्ये इथला स्थानिक मुस्लिम भरडून निघाला आहे. गेली २७ वर्षे आपण जात्यंध शक्तींशी लढतो आहोत असा त्याचा समज होता पण आपण हा कसला लढा देत आहोत ज्यातून इथल्या हिंदुत्ववादी शक्तीच अधिक प्रबळ होत गेल्या आहेत हे त्या सामान्य मुस्लिमासाठी एक कोडे होते. त्याने ह्या देशामधले सेक्यूलर आणि आपले पुढारी यांच्यावर डोळे मिटून विश्वास टाकल होता. हाती काय लागले ते आपण बघतोच आहोत. किंबहुना वहाबी सांगतात त्यांच्या नादी लागून आपले काय नुकसान झाले आहे ह्यावर अगदी सामान्य - अशिक्षित मुसलमानही विचार करू लागला आहे.

धर्माच्या नावावरती आपल्याला उल्लू बनवणारे दुसरे तिसरे कोणी नसून ज्यांना आपण आपले पुढारी समजत होतो तेच आहेत हे आता त्यांच्यापासून लपून राहिलेले नाही. २०१४ मधला मोदींचा विजय आणि आताचा उत्तर प्रदेशमधला दुसरा विजय मुस्लिम मनामध्ये होणार्‍या खळबळीविषयी आपल्याला बरेच काही सांगून जातो. ही जगामधली एक अभूतपूर्व घटना मानली पाहिजे. कोणत्याही पुढार्‍याने न सांगता किंबहुना पुढारी सांगतात ते धाब्यावर बसवून त्यांना न विचारता मुस्लिम मतदान करतो आपल्या बुद्धीने करतो ही अभूतपूर्व घटना मानली पाहिजे. त्याची पूर्वपीठिका बघायची तर मुसलमानांना त्यांचे पुढारी काय करायला सांगतात आणि त्यांना कोणत्या मार्गाने नेऊ पाहतात हे आपण जाणतो. पण त्यांचे विचारवंत बदलत्या परिस्थितीमध्ये काय म्हणतात तेही बघणे उपयुक्त ठरेल त्यासाठी मी तुमचे लक्ष राज्यसभेतील खासदार मोहम्मद अदीब काय म्हणतात त्याकडे लक्षवेधू इच्छिते.

श्री अदीब यांनी लखनौ मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या माजी आजी विद्यार्थ्यांसमोर बोलताना काही नवे विचार मांडले ते उद् बोधक आहेत. हे भाषण उत्तर प्रदेश निवडणुकांच्या चार महिने आधी केलेले आहे. श्री अदीब म्हणतात - होता होईल तोवर भारतामधल्या मुस्लिमांनी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहावे. आपल्या मतांवरती राजकारणी निवडून येतात हे चित्रच मुस्लिमांसाठी धोकादायक बनले आहे. मुसलमान जर निवडणुकीच्या राजकारणामध्ये सक्रिय राहिले तर हिंदूंची मते त्यांच्या विरुद्ध दिशेला झुकत आहेत. आपल्याला मुस्लिम राष्ट्र नको म्हणून आपण पाकिस्तानात गेलो नाही. आता पाळी हिंदूंची आहे - हा देश हिंदू राष्ट्र करायचे की नाही हे त्यांच्यावर सोपवा. आजच्या घडीला सेक्योलॅरिझमचे गाडे ओढण्याचे काम २०% मुस्लिमांनी स्वतःहून स्वीकारले आहे. पण हे ओझे खरे तर हिंदूंना वाहू द्यात. ७०% हिंदू सेक्यूलर आहेत. तुमच्यामुळे ते भाजपकडे झुकत चालले आहेत. याच कारणासाठी मुस्लिमांनी आपणहून ह्या राजकारणामधून बाजूला व्हावे. आजच्या घडीला मुस्लिम समाजाने शिक्षण घेण्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे." अदीब यांचेच विचार सामान्य मुस्लिमही बोलून दाखवतात. भारतामध्ये पारसी समाज जसा राहतो तसे मुस्लिमांनी राहावे हेच इष्ट आहे.

उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये २०१२ साली ६९ मुस्लिम आमदार निवडून येतात ही बाब हिंदूंना निश्चित सलणारी आहे. इतकेच नाही तर उत्तर प्रदेशामधल्या ग्रामपंचायतीमध्ये तीनामधला एक सभासद मुस्लिम आहे. ही बाब तर खेडोपाडी लोकांना टोचत होती. ज्या प्रकारे भ्रष्टाचाराचे साम्राज्य तिथे पसरले होते त्यावरून कल्पना करा की एक तृतीयांश सदस्यांचे पैसे खाणेही लोकांच्या डोळ्यावर येत होते. थोडक्यात काय तर मुस्लिम म्हणून आपली वेगळी ओळख जपण्याची सुरुवात जी वहाबी तत्वज्ञानाने इथे केली तिच्यामधून निर्माण झालेले आव्हान आता पेलण्यापलिकडे गेले आहे याची जाणीव होऊ लागली आहे. मुस्लिमांचे हे वागणे अशा सर्व हिंदूंच्या डोळ्यामध्ये सलते आहे जे उत्तर प्रदेशामध्ये सपा आणि बसपाच्या राजकारणामध्ये भरडून निघाले आहेत.

काळाच्या ओघामध्ये बहुजन समाजाचे नेतृत्व करू इच्छिणार्‍या मायावतींनी आपला पक्ष म्हणजे जातवांचा पक्ष बनवून टाकला तर मुलायम सिंघ यांनी सपाला यादवांचा पक्ष बनवून टाकले. म्हणूनच मागास जमातींचा पक्ष म्हणून सुरुवातीला जवळ आलेल्या इतर जाती मायावतींच्या पंखाखालून बाहेर पडत आहेत तर यादव वगळता अन्य ओबीसी जाती मुलायम यांना दुरावत आहेत. ह्या सर्वांसाठी पर्याय म्हणून भाजप हाच पक्ष उरला आहे. मुस्लिमांच्या मतांमुळे एखादा पक्ष जिंकतो याचा सलही थोडा कमीच म्हणायचा पण तोच एक ब्लॅंक चेक समजून
सपा बसपा यांच्या भ्रष्टाचाराकडे देखील मुस्लिमांनी दुर्लक्ष केले हे हिंदूंना बोचते आहे. पाणी नाही वीज नाही रस्ते नाहीत राज्यकारभारामध्ये भ्रष्टाचार माजला आहे. अशा परिस्थितीमध्ये आंदोलन झाले तर मुस्लिम बाजूला राहतात आणि भ्रष्ट नेत्यांना अभय देतात ही बाब हिंदूंना बोचते, म्हणजेच आपल्या मतांवर हे राक्षस केवळ निवडून येतात असे नाही तर भ्रष्टाचाराच वरवंटाही आपल्याच पाठिंब्यावर फिरवतात ही गोष्ट हिंदू आता सहन करू शकत नाहीत हे मुस्लिमांच्या नेत्यांना उमगले नाही तरी सामान्य मुस्लिमाला उमगले आहे.

म्हणूनच उत्तर प्रदेशामध्ये मुस्लिम भाजप बरोबर गेले ते आपणही सर्व सामान्य भारतीयाप्रमाणे जातीधर्माला प्राधान्य न देता देशाच्या हिताला प्राधान्य देतो हे दाखवून देण्यासाठीच - जणू दिसून ये ईल असे मतदान करून आले आहेत. मुस्लिम समाजामधली ही स्पंदने आपल्याला ओळखता आली पाहिजेत. ह्या कामामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठा पुढाकार घऊन मुस्लिम राष्ट्रीय मंच ह्या संस्थेची स्थापना करून देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये जे मुसलमान सामिल होऊ इच्छितात त्यांच्यासाठी एक वेगळे व्यासपीठ आणि मंच आज उपलब्ध करून दिला आहे ही फार मोठी बाब आहे. मुरामं च्या व्यतिरिक्त इंटरनेटने मुस्लिम समाजामध्ये मतपरिवर्तन घडवून आणण्याच्या कामी मोठे काम केले आहे असे दिसते. कधी नव्हे ते केवळ आपल्याच धर्माचे नव्हे तर इतरही लोकांचे विचार काय आहेत हे निर्भेळपणे त्यांना वाचता येत आहेत. चांगले काय आणि वाईट काय ह्याचा निर्णय मुसलमानांनी आजपर्यंत आपल्या मुल्लामौलवींवर सोपवलेला होता. आज ह्यामध्ये बदल झालेला दिसतो.

आपले भले कशामध्ये आहे याचा निर्णय मुसलमान स्वतः घेऊ इच्छितात ही अत्यंत मोलाची बाब आहे. वर्षानुवर्षाच्या गुलामीमधून सुटण्यासाठी धडपड करणार्‍या सामान्य मुस्लिमाला मदतीच्या हाताची अपेक्षा आहे. आणि ती मदत सूज्ञ हिंदूंनी द्यावी अशी अपेक्षा आहे. कट्टरपंथी इस्लामला प्रत्युत्तर देण्याचे काम आणि मुस्लिमही सगळ्या प्रजेमध्ये मिळून मिसळून राहू शकतात ह्याचे उदाहरण घालून देण्याच्या कामी नेतृत्वाचा दिवा भारतीय मुसलमानच हाती घेतील याची मला नेहमीच खात्री वाटत आली आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक हे त्या दिशेने पडलेले एक मोठे पाउल आहे असे मला वाटते.

1 comment:

  1. फ़तह का फ़तवा सारख्या कार्यक्रमांनी पण मदत केली असणार

    ReplyDelete