Monday 6 March 2017

अफगाणिस्तानात इसिस


Image result for khorasan

मार्च रोजी देशाचे संरक्षण मंत्री श्री पर्रीकर यांनी एक विधान केले आहे. ते म्हणाले की अफगाणिस्तानातून येणाऱ्या अहवाल आणि त्याबरोबरच फोटो पाहता तेथील स्थानिक जनतेच्या शरीरावर आलेले फोड आणि जखमा स्पष्ट दिसतात. ह्यामागे रासायनिक अस्त्रे वापरली गेली का याचे स्पष्ट अहवाल अजून आले नसले तरी मी असे म्हणेन की भारतीय सैन्याने कोणत्याही प्रकारच्या युद्धकरता सज्ज राहावे. संरक्षण मंत्र्यांचे हे विधान झोप उडवणारे आहे. पर्रीकर असे सूचित करत आहेत की केवळ रासायनिक नव्हे तर छोट्या प्रमाणावरचे डर्टी बॉम्ब अण्वस्त्रे  ह्या रणभूमीवर वापरले जाऊ शकते आणि सैन्याने कोणताही धोका  पत्करता आपली तयारी ठेवावी. भारतीय संरक्षण अनुसंधान केंद्राने रासायनिक - आण्विक आणि जैविक हल्ले झालेच तर तेव्हा वापरावयाची औषधे बनवली असून ती सैन्याकडे सुपूर्द करण्याच्या समारंभात श्री पर्रीकर बोलत होते.

पर्रीकरांचे हे विधान संदर्भाशिवाय कळणे कठीण आहे. अफगाण सीमेवरती आणि त्या देशात नव्या युद्धाचे पडघम वाजू लागले आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये मी अफगाणिस्तानात गुलबुद्दीन हिकमतयार  याची सुटका झाल्यासंदर्भात लेख लिहिला होता. आणि काच्या लेखामध्ये भारताने अफगाणिस्तानात आपले सैन्य उतरवावे अशी अमेरिकेची इच्छा असल्याचे मी लिहिले होते.

अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ज्या बैठक झाल्या तिथे आजवर भारताला बोलावले सुद्धा गेले नव्हते आता मात्र रशियाच्या पुढाकाराने होणाऱ्या परिषदेला भारतीय प्रतिनिधी पहिल्यांदाच हजर असतील ह्याचाही उल्लेख मी केला होता. पण परिस्थिती खरोखरच गंभीर बनली असल्याचे येणाऱ्या  बातम्या सुचवत आहेत. अफगाणिस्तानमध्ये चीनचे सैन्य दिसल्याच्या बातम्या येत असून भारतामध्ये WION या TV चॅनेल ने ही बातमी दाखवली. पुढे अमेरिकन सैन्याचे मुख्य पेंटागॉन कार्यालयाला त्याबद्दल विचारले असता ते तिथे आहेत याची आम्हाला कल्पना आहे असे उत्तर प्रतिनिधींकडून मिळाले. तेव्हा अमेरिकेच्या मूक संमतीनेच चीनचे सैन्य अफगाणिस्तान मध्ये वावरत आहे असे आपण म्हणू शकतो. एकीकडे दक्षिण चीन समुद्रावरून दोन्ही देशांचे कडाक्याचे वाजणार असल्याचे संकेत आले तरीही अफगाण भूमीवरील चीनी सैन्याच्या उपस्थितीला अमेरिकेने विरोध दर्शविलेला दिसत नाही. पुढे जाऊन असेही वृत्त पाहायला मिळते की चीन आणि अफगाण सैन्य यांच्या संयुक्त टेहळणी (गस्तीचे ?) पथकाचे काम छोट्या पामीरच्या पठारावरती चुपचाप चालू आहे. अशा टेहळणीच्या वृत्ताचा अफगाण सरकार इन्कार करत असले तरी चिनी सरकारने मात्र असे कबूल केले आहे की अफगाण सरकारबरोबर झालेल्या समझौत्यानुसार आपले "पोलीस दल" तिथे टेहळणी करत असते. आश्चर्य म्हणजे अफगाणिस्तानात रशियन अथवा इराणी सैन्य घुसू नये म्हणून अमेरिका तीव्र आक्षेप घेत असते. पण चिनी सैन्याच्या टेहळणीला मात्र ते मूक संमती देत आहेत ही बाब लक्षणीय आहे.

टेलिग्राफ या ब्रिटिश वर्तमानपत्राने छापलेल्या बातमीनुसार पाकिस्तानने अमेरिकन जनरल्सना असा इशारा दिला आहे अफगाणिस्तानातील विचका आवरा नाही तर तिथे रशियन सैन्य घुसण्यास तयार आहे. असा इशारा पाकिस्तानने अमेरिकेला द्यावा हा तुम्हाला विनोद वाटेल पण बदलत्या परिस्थितीच्या सर्व खुणा ह्या धमकीमध्ये आपल्याला दिसतात. एक म्हणजे पाकिस्तान ज्या विचक्याबद्दल बोलत आहे तो विचका म्हणजेच अफगाणिस्तानात घुसलेले इसिस. खोरासान मध्ये इसिस उघड उघड वावरत असून ते आणि तालिबान एकत्र आले तर अफगाणिस्तानवरील नियंत्रण हातातून निसटेलअसे पाकिस्तान सुचवत आहे. ही अशी परिस्थिती आहे की अशा निर्नायकीमध्ये इराण प्रमाणेच आपले सैन्य अफगाणिस्तानात घुसवण्याचा मोह रशियाला हो शकतो  असे पाकिस्तानी जनरल अमेरिकन जनरलला सुनावत आहे.

इसिसला सगळेच घाबरतात असा ह्या विधानामुळे तुमचा सोळभोक समज होण्याची शक्यता आहे. पण जिथे पाकिस्तान आहे  तिथे छद्म नाटक नाही असे होऊच शकत नाही. ही गोष्ट खरी आहे की पाकिस्तानात शिया समुदायावर होणारे हल्ले TTP आणि इसिस चे काही गट करत आहेत पण तरीही पाकिस्तान इसिसला घाबरते यावर कोणी विश्वास ठेवू शकेल काय? त्यासाठी इसिसची सुरुवात कशी झाली ते थोडक्यात पाहिले पाहिजे

अमेरिकेने २००३ साली इराकवर हल्ला केला तेव्हा सद्दामने आपल्या सैन्याला पळून जाण्याचे आदेश दिले होते. म्हणूनच प्रत्यक्षात अमेरिकन सैन्य तिथे घुसले तेव्हा त्यांचा प्रतिकार करायला रेगुलर सैनिक तैनात झालेले दिसलेच नाहीत कोणताही विरोध  होताच अमेरिकन सैन्य बगदाद पर्यंत पोचले. यानंतर मोकळे झालेले सद्दामचे सैन्य आणि सद्दामच्या बाथ पार्टी चे सभासद हे प्रथम सीरियामध्ये जाऊन लपले होते. याना पुन्हा एकदा एकत्र करून इसिस नावाने इराकमधील शिया बहुसंख्येच्या सरकारवर हल्ले करून त्याला जेरीस आणण्यासाठी तुर्कस्तान आणि सौदी अरेबियायाने वापर केला. इराकमधील सरकारला जेरीस आणणारे हेच सैन्य पुढे लिबियामध्ये  घुसवण्यात आले तिथे गडाफीचा निःपात करण्यात आला. त्यानंतर सीरियामध्ये युद्ध चालू झाले. अशाप्रकारे इसिस वर नियंत्रण कोणाचे हे स्पष्ट होते.

आपण दिलेल्या मदतीची परतफेड म्हणून सौदीने पाकिस्तानच्या लष्करातील अधिकारी बोलावून इसिसच्या सैन्याला तांत्रिक प्रशिक्षण देण्यास फर्मावले. पाकिस्तानी लष्करातील अधिकारी हे काम गेली काही वर्षे करत आहेत. अगदी लिबियामध्ये घमासान सुरु झाले तेव्हाही पाक लष्कराची माणसे त्यांच्याबरोबरच होती. मोदी सरकार सत्तेमध्ये आले तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री अजित डोवाल सीरियामध्ये गेले असता आपले जुने कॉन्टॅक्टस वापरून त्यांनी सीरियन सरकारकडे असलेला इसिसचा सर्व डेटाबेस मिळवला. हे वृत्त खरे असेल तर अशामुळे पाकिस्तानचे कोणते अधिकारी इसिसच्या कामामध्ये गुंतले आहेत याची कुंडलीच भारताच्या हातात आली असे म्हणता येईल.

तेव्हा इसिसची सगळी कुंडली पाकिस्तानकडे असून त्याला इसिसचे अजिबात वावडे नाही. किंबहुना इसिसला भारताविरुद्ध आणि अफगाणिस्तान विरुद्ध वापरता येण्याची पूर्ण तयारी तो करतो आहे. श्री पर्रीकर यांनी रासायनिक अथवा 'अन्य' म्हणजे आण्विक अथवा जैविक हल्ल्याची शक्यता सूचित केली आहे. असे संशयास्पदहल्ले अफगाणिस्तानमध्ये चिनी सैन्याने तर केले नाहीत ना अशी शंका जरूर येते.

परवाच मी श्री डोवाल इस्राएल भेटीकरिता गेले असल्याचा फोटो टाकला होता. डोवाल तिथे गेले पण फेब्रुवारीच्या २१ तारखेला तुर्कस्तानचे पंतप्रधान एर्दोगन पाकिस्तानात येऊन गेले आणि त्यांच्या पाठोपाठ तुर्की सन्याचे वरिष्ठ अधिकारी २८ फेब रोजी पाकिस्तानात आले होते. या घटना बोलक्या असून भारताच्या परसदारात पुन्हा एकदा कमीत कमी नागरी युद्धाच्या आणि पेटलेच तर खऱ्याखुऱ्या युद्धाच्या पाऊलखुणा दिसू लागल्या आहेत.

इसिस ही इसिस आहे.  अफगाणिस्तानात घुसली तर तिला तेथून जवळच असलेल्या चीनच्या शिन ज्यांग प्रांतात प्रवेश करणे कठीण नाही. ह्या प्रांतामधली मुस्लिम जनता चीन सरकारच्या विरोधात आहे. तेव्हा ही आग चीनच्या दारात येऊन ठेपली आहे. शिन ज्यांग पेटले तर तिबेट पेटू शकते. एकदा का अमेरिकन पाठिंब्याने भारतीय सैन्य अफगाणिस्तानात दाखल झालेच तर काय काय घडेल सांगता येत नाही.













2 comments:

  1. Tarkasahit ghatananchi ani ekandar paristhitichi susangat manadani itihasachya adhare apan mandali ahe.khup sundar.N abhar

    ReplyDelete