Monday 27 March 2017

उ.प्र. निवडणुका - चीन आणि बोलणी - वाटाघाटी - - भाग १

उ.प्र. निवडणुका - चीन आणि बोलणी - वाटाघाटी - - भाग १

२०१६ च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ब्रिक्स परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष श्री शी जिन पिंग भारतामध्ये आले होते तेव्हाचा माहोल उण्यापुर्‍या सहा महिन्यांच्या आत बदललेला आहे. जैश ए महंमदचा प्रमुख मौलाना मासूद अझहर याला दहशतवादी म्हणून घोषित करावयाच्या युनोच्या ठरावाला चीनने तेव्हा नुकताच विरोध दर्शवला होता आणि चीनच्या व्हेटोमुळे हा ठराव संमत होऊ शकला नाही. आमचा दहशतवादाला संपूर्ण विरोध आहे पण दहशतवादाला विरोध या बुरख्या आड कोणी राजकारण करू नये असे चीन भारताला बजावत होता. त्याचा भावार्थ हाच होता की मोदी सरकार अंतर्गत राजकारणातील फायद्यासाठी मासूद अजहर वरती कारवाई करण्याचा धोशा लावते आहे. अशी आचरट टीका चीनने करावी यामध्ये हे स्पष्टच झाले होते की ज्यांना आपण जबाबदार जागतिक सत्ता समजत होतो ते शी जिन पिंग सरकारदेखील वस्तुस्थितीकडे पाठ फिरवून कानाला गोड वाटेल अशी स्तुती करणार्‍या टिनपाट भारतीय विचारवंतांच्या कडून आलेल्या ऐकीव माहितीवर ह्या महत्वाच्या विषयावर भूमिका घेण्याचा मूर्खपणा करत होती. भारताला असले इशारे देणार्‍यांच्या राजकीय (अ)समजावर इथल्या अडाणी जनतेने शिक्कामोर्तब केले तरी चिनी शहाण्यांचे डोळे मिटलेलेच होते. चीनचा हा इशारा म्हणजे एक नमुना होता हे कटू सत्य अगतिक चीनला आता उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर समजले असेल अशी अपेक्षा करू या.

अंतर्गत राजकारणामध्ये - म्हणजे मार्च २०१७ च्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये - भाजपला राजकीय ’फायदा’ व्हावा म्हणून मोदी सरकार मासूद अजहरला दहशतवादी घोषित करा म्हणून युनोकडे आग्रह धरते आहे आणि त्यांना थोपवण्याचे महान कार्य चीनच करू शकतो आणि ते त्याने केले पाहिजे असा जावई शोध लावणारे टिनपाट डावे भारतीय विचारवंत कोण असतील आणि त्यांच्यामधले कोणते उत्साही बुद्धिवंत चिन्यांच्या कानी लागले असतील हे मी सांगण्याची अजिबात गरज नाही. ज्याला राजकारणामध्ये तोंडावर आपटायचे आहे त्यानेच ह्या असल्या बुद्धिवंतांच्या नादी लागावे हा धडा आता चीनच्या पाठोपाठ तसाच्यातसा शिकण्यासाठी महाराष्ट्रामधला आणि एक पक्ष डोळे आकाशाकडे लावून बसला आहे हे आपण पाहत आहोच. असो.

तर उत्तर प्रदेशच्या विधानसभा निकालामध्ये मोदी यांनी हे सिद्ध केले आहे की लोकसभेला भाजपने ३३७ विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली होती त्यातल्या ३२५ जागांमध्ये ही आघाडी अजूनही म्हणजे तीन वर्षांनंतर टिकवली आहे. ही वस्तुस्थिती चीनला झोंबत असल्यास नवल नाही. मार्च २०१७ च्या निवडणूक निकालांनंतर म्हणजे १६ मार्च रोजी चीनच्या ग्लोबल टाएम्स या वृत्तपत्राने मोदी यांच्या विजयाची दखल घेत म्हटले आहे की " आर्थिक सुधारणा - विकास - परकीय भांडवलाचे भारतामध्ये स्वागत - या मोदींच्या धोरणावर जनता खूश आहे. सर्वच क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी सफल झालेली नसली तरी मोदी म्हणजे केवळ घोषणा देणारे राजकारणी नसून काम करू इच्छिणारे नेते आहेत ह्याची जनतेने नोंद घेतली आहे. जितक्या धडाक्याने मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय राबवला तितक्याच धाडसाने त्यांनी परराष्ट्र धोरण राबवले आहे. यापूर्वीचे भारत सरकार कोणालाच दुखवायचे नाही अशा भूमिकेमधून आपले निर्णय घेत होते पण मोदी आल्यापासून हे धोरण बदलले आहे. जे भारताच्या हिताचे आहे ते निर्णय मग ते कोणाला अप्रिय असले तरीही - मोदी सरकार धडाक्याने घेताना दिसते. मोदी सरकारने रशिया आणि चीनबरोबर आपले संबंध सुधारले - शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला आणि दुसरीकडे त्याच बरोबरीने मोदी यांनी दक्षिण चीन समुद्रावरील अमेरिकन धोरणाला आपला पाठिंबा दिला आहे आणि अमेरिकेने आपले आशिया पॅसिफिक संबंधातले धोरण पुन्हा एकदा समतोल करावे म्हणून मदत केली आहे. २०१९ मध्ये मोदी निवडणुका जिंकलेच तर भारताची ही कणखर भूमिका अशीच चालू राहील. ही बाब भारतासाठी सर्वोत्तम असली तरी अन्य देशांबरोबर विवाद मिटवण्याच्या आड येणारी ठरेल. असे असले तरीही कणखर भूमिका घेणार्‍यांचे एक बरे असते की एकदा का त्यांचे मत बनले की ते आपले निर्णय विनाविलंब घेतात कारण त्यावरील आवश्यक सरकारी पावले ते विलक्षण कार्यक्षमतेने घेऊ शकतात."

ग्लोबल टाईम्स हे चिनी कम्युनिस्ट विचारसरणीचे वर्तमानपत्र मानले जाते. त्यामध्ये आलेली मोदींची ही स्तुती विशेष म्हटली पाहिजे. शिवाय ऑक्टोबर २०१६ मध्ये जी मुक्ताफळे उधळण्यात आली ती कशी फोल ठरली आहेत याची ही कबूलीही मानता ये ईल. पण एकीकडे असे सूर लावायचे आणि दुसरीकडे मात्र अधिकृत बोलण्यांदरम्यान थयथयाट करायचा हे चीनचे वैशिष्ट्य आहे. जेणे करून आपल्या मनामध्ये नेमके काय आहे याचा समोरच्याला अंदाज बांधता येऊ नये आणि सतत गोंधळाची परिस्थिती ठेवून आपल्या होताचे तेव्हढे ओरबाडायचे हा नेहमीचा खाक्या आहे. कधी म्हणायचे बघ - शिवाजी पार्क पर्यंत धावलास तर चषक तुझाच - मग म्हणायचे - कसले शिवाजी पार्क? माहिम पर्यंत आलास तर काही होऊ शकेल आणि तुम्ही माहिमपर्यंत धावायची मानसिक तयारी केली की मग म्हणायचे अरे वरळी धरली तर जास्त सोयीचे आहे. म्हणजे काय केल्याने त्याचे समाधान आहे आणि त्याला नेमक्या कोणत्या मुद्द्यावर कलह सोडवायचा आहे ह्याचा थांगपत्ता चीन दुसर्‍याला लागू देत नाही. त्याचे हे गेम्स ओळखणारा खमक्या पंतप्रधान दिल्लीमध्ये बसला आहे हे त्यांचे दुःख असणारच. चीनची लबाडी काय हे असल्या जाहीर लेखामधून समजत नाही त्यासाठी काय वाटाघाटी चलू आहेत त्याचा गोषवारा बघावा लागतो. तो पुढील भागामध्ये.




No comments:

Post a Comment