कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग चिंताग्रस्त झाले आहे. जगातील चाळीसहून अधिक देशांमध्ये त्या त्या देशातील राज्यव्यवस्था समस्येकडे युद्धपातळीवरून हाताळण्याची तयारी करत आहे. दरम्यान चीनच्या बव्हंशी सर्व महत्वाच्या प्रांतांपर्यंत पोचलेल्या या व्हायरसमुळे २०० हून अधिक शहरे दोन महिन्यांहून अधिक काळासाठी पूर्णतया बंद ठेवावी लागली आहेत. यातूनच जगाची बॅकडोअर फॅक्टरी म्हणून मिरवणार्या चीनमधील उत्पादन व्यवस्था ठप्प झाल्याने मालाच्या पुरवठ्यासाठी जग हवालदिल झाले आहे. स्वस्त मिळतात म्हणून चिनी कंपन्यांकडे उत्पादन व्यवस्था देऊन पाश्चात्य जग निश्चिंत मनाने केवळ व्यापारावर एकाग्र झाले असतानाच हा प्रचंड मोठा हादरा बसत आहे. एकवेळ अणुबॉम्ब पडला तर जितके क्षेत्र प्रभावित होणार नाही त्याच्या कित्येक पटीने मोठ्या विस्तारातील भूभागात हे निसर्गनिर्मित की मानवनिर्मित संकट पसरले आहे पण उत्पादनव्यवस्था मात्र एका देशापुरती सीमित झाली असल्याने हा फटका अधिक जाणवत आहे. २००३ साली आलेल्या सार्सच्या साथीची आज लोकांना आठवण येणे स्वाभाविक आहे. सार्स आणि कोरोना साथीची तुलना जर आर्थिक क्षेत्रासाठी केली तर लक्षात येईल की त्यावेळी चीन जगाच्या जीडीपीमध्ये सुमारे ४.२% एवढा हिस्सा देत होता. आज हा हिस्सा १७% वर गेला आहे. साहजिकच सर्वांनाच चिमटा बसत आहे. त्याचे प्रतिबिब आपल्याला जगभरच्या शेयरमार्केटमध्ये दिसत असून एकजात सर्व ठिकाणी मार्केटस् कोसळल्याचे पहायला मिळत आहे.
झपाट्याने पसरणारी कोरोनाची साथ आपल्याही घरात डोकावणार का अशी शंका प्रत्येकाच्या मनामध्ये असली तरी खरी भीती मात्र वेगळीच आहे. ती अनामिक अहे - कदाचित जाणवत असून सुद्धा तिला शब्दरूप देता येत नाही कारण तिचा कार्यकारणभाव लोकांसमोर स्पष्ट झालेला नाही. ही भीती आहे हे संकट निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याची शंका. सुरूवातीच्या काळामध्ये चीनच्या ज्या वुहान शहरामध्ये साथीचा उगम झाला तेथील मांसविक्री बाजाराचे व्हिडियो समाजमाध्यमातून बघायला मिळत होते. आणि चिनी लोकांच्या खाण्याच्या सवयींमुळे हे संकट त्यांनी ओढवून घेतले आहे असा एक समज होता. पण हळूहळू अन्य बातम्या जशा झिरपू लागल्या तसतसे हे मानवनिर्मित संकट असावे अशी शंका साथीच्या उगमाबद्दल दृढ होऊ लागली आहे.
आधुनिक जगामध्ये कन्व्हेन्शनल वॉरफेअर - प्रचलित युद्धपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. आजवर जगाने आण्विक हल्ले तसेच रासायनिक हल्लेही पाहिले आहेत. पण हे सगळे फिके पडावे अशा प्रकारचे प्रयत्न आज काही देश करताना दिसतात त्याने सामान्य माणसाची झोप उडावी असे चित्र आहे. संशोधनाच्या नावाने नवनव्या आघाड्यांवरून मोठ्या प्रमाणावर मानवाची जीवित व वित्तहानी करण्याकडे कल दिसून येत आहे. आणि हे सर्व करताना आपला ठसा मात्र कुठेही असू नये याची काळजी घेऊन हे हल्ले कसे करता येतील याचाही विचार चालू आहे हा विचारच आपल्याला विचलित करणारा आणि भयभीत करणारा आहे.
वुहानमध्येच चीनने व्हायरस व तत्सम संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारली आहे तिच्यातूनच हा संसर्ग झाला असे आज सांगितले जाते तर अन्य काही लोक हे संकट अमेरिकेने चीनला धडा शिकवण्यासाठी मुद्दाम निर्माण केले आहे असे सांगत आहेत. वस्तुस्थिती ही आहे की जैविक अस्त्रास्त्रे बनवण्याच्या संशोधनामध्ये अनेक देश गुंतले आहेत. त्यासाठी कित्येक वर्षांपूर्वी म्हणजे १९७२ साली बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेन्शन म्हणून एक जागतिक व्यासपीठ तयार करण्यात आले होते. सुरूवातीपासून चीन या संस्थेमध्ये सहभागी नव्हता पण १२ वर्षांनंतर म्हणजे १९८४ सालापासून चीनही या संस्थेचा सदस्य असून संस्थेने अखिल मानवजातीच्या हितासाठी जे नियम बनवले आहेत ते चीनला मान्य असल्याच्या आणाभाकाही त्याने घेतल्या आहेत. केवळ सदस्यत्व घेताना अशा आणाभाका घेतल्या गेल्या असे नसून पुढील काळामध्ये चीनच्या सत्तेवर विराजमान झालेल्या सर्व सत्ताधार्यांनी कधी एकतर्फी तर कधी अमेरिकेसोबत अशी ग्वाही जगाला दिली आहे. असे असूनही चीनचे वर्तन याबाबतीत अतोनात संशयास्पद राहिले आहे.
आज जैविक संशोधानाची व्याप्ती किती मोठी झाली आहे हे पाहूनच आपली छाती दडपून जाईल. या संबंधाने चीनच्या कारवायांवर आक्षेप घेणारे अनेक अहवाल अमेरिकेच्या गुप्तचर खात्यांनी आपल्या सरकारला वेळोवेळी सादर केले आहेत. अमेरिकेने दटावून सुद्धा चीनचा आडदांडपणा असा आहे की तो आपला कार्यक्रम रेटून पुढे नेत आहे. जैविक अस्त्रास्त्रांच्या व्याप्तीपैकी केवळ एकाच मुद्द्यावर आज थोडी माहिती देते.
जसे प्रचलित युद्धपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत तसेच बदल प्रचलित औषधपद्धतीमध्ये अपेक्षित असून एक नवे युग आपल्या उंबरठ्यावर येऊन पोचले आहे. आजच्या घडीला जगातील औषध कंपन्या बहुतांश जनतेला चालतील अशी प्रयोगसिद्ध औषधे बनवण्याच्या उद्योगामध्ये गुंतली आहेत. आणि इलाज करणारे डॉक्टरसुद्धा हीच औषधे वापरून रूग्णांवर इलाज करतात. प्रत्येक रूग्णासाठी त्याला त्याच्या शरीराला साजेसे औषध बनवता ये ईल का असा प्रश्न काही दशकापूर्वी वेडगळपणाचा वाटला असता. आज मात्र संशोधन त्या दिशेने दमदार पावले टाकत असून यामधली क्रांती घडवून आणणारे संशोधन जीन्स - गुणसूत्रांच्या विषयात होत आहे. माणसाची गुणसूत्रे बदलता येतील का - जीवंत माणसामध्ये असे बदल करता येईल की उपलब्ध गुणसूत्रे वापरून त्यात बदल करून नवा मानव जन्माला घालता येईल हे प्रश्न आता गैरलागू राहिले नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या विषयामधली जगातील सर्वात मोठी कंपनी चिनी मालकीची असून ह्या व अन्य चिनी कंपन्यांनी काही अमेरिकन कंपन्या विकत घेऊन आपले प्रभुत्व टिकवण्याचे प्रयत्न केले आहेत. अमेरिकन कंपन्यांकडे जी बौद्धिक संपदा आहे तिच्यावर आपले प्रभुत्व स्थापन करण्याचे हे प्रयत्न आहेत. शिवाय ज्या अमेरिकेन कंपन्या "विक्री" साठी उपलब्ध नाहीत त्यांचा डेटा कसा चोरता येईल यावर चीन छुप्या मार्गाने कारवाया करत असतो. ग्लॅक्सोस्मिथक्लाईनसारख्या जगप्रसिद्ध कंपनीची बौद्धिक संपदाही अशा प्रकारे चोरण्याचे यशस्वी प्रयत्न झालेले दिसतात.
गुणसूत्रांचे संशोधन म्हणजे डिएनएवरील संशोधन. कल्पना करा की कॅन्सर पीडित काही हजार व्यक्तींची गुणसूत्रे डेटाच्या रूपात अशा कंपनीच्या हाती असेल तर ती कंपनी त्यावरील औषधे वा उपचार पद्धती किती यशस्वीपणे विकसित करू शकेल. जेव्हा चिनी कंपन्या अमेरिकन कंपन्याच विकत घेतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये अमेरिकनांची गुणसूत्रेही पडतात. त्यातून भलेही प्रत्येक व्यक्ती ओळखता येणार नाही पण संयुक्तपणे अमेरिकन नागरिकांबद्दल अनेक निष्कर्ष शास्त्रज्ञ अशा डेटामधून काढू शकणार नाहीत काय?
मूळ प्रश्न चीन याचा वापर कशासाठी करणार हा आहे. विधायक कामासाठी त्याचा वापर करून जर मानवजातीचे आयुष्य सुधारण्यासाठी होणार असेल तर ठीक पण जैविक हल्ले चढवण्यासाठी हा डेटा वापरला गेला तर? या भीतीदायक प्रश्नाची धार अधिक वाढवण्यासाठी एक अंगुलीनिर्देश पुरेसा ठरेल. आज चीनने खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये खूप मोठी घोडदौड केली आहे. २०२५ पर्यंत चीनला या क्षेत्रात प्रतिस्पर्धीच उरता कामा नये असा उद्दिष्ट समोर ठेवून चीन मार्गक्रमणा करत आहे. गुणसूत्रांचे संशोधन करायचे तर डेटा खूप मोठ्या प्रमाणावर तपासावा लागतो. हे काम मानवाने करण्याऐवजी कम्पूटर किंवा रोबोकडून करून घ्यायचे म्हटले तर? कल्पना करा की गुणसूत्रांचे संशोधन आणि त्याला जोड आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मिळाली तर किती वेगाने यामध्ये यश मिळू शकेल.
चीनचे वर्तन असे आहे की विज्ञानातील त्याच्या प्रगतीमुळे जग आश्वस्त नाही तर भयभीत होते. कोरोनाची भीतीही तीच आहे. तुला मला की त्याला संसर्ग होईल ही भीती मामूली आहे. मूळ प्रश्न अशा प्रकारची अस्त्रे बनली तर? आणि त्यावर उपाय तरी हाती आहेत काय ही आहे. चाळीसहून अधिक देश जेव्हा एका रोगाच्या साथीसाठी युद्धपातळीवर सज्जता ठेवतात तेव्हा त्यांच्याकडे निश्चितपणे जास्त माहिती उपलब्ध आहे. हे संकट म्हणजे जणू राष्ट्रावर लादले गेलेले युद्ध असल्यागत पावले उचलली जात आहेत. हल्ला कोणी केला हा प्रश्न आज जनतेसाठी गैरलागू असला तरी राज्यकर्त्यांना त्याचे उत्तर माहिती आहे. म्हणूनच अशी उपाययोजना आखली जात आहे. त्या माहितीचे स्वरूप काय आहे हे आपल्याला आज नेमके कळले नाही तरी या क्षेत्रातील बातम्याच झोप उडवणार्या आहेत. मुंह में राम बगल में छुरी असा हा राक्षस आहे. त्याचे स्वरूप आपण जितके समजून घेऊ तितकी सावधता बाळगता येईल. अशक्य नाही पण प्रयत्न मात्र हवेत.
बाप रे.. खूप भयावह आहे हे. पण face करण्याशिवाय पर्यायच नाहीय.. आपण काय काम करू शकू या सर्व विषयात?
ReplyDeleteIncrease awareness - spread the inputs
ReplyDelete