Wednesday, 9 August 2017

हे गुओ वेन गुई कोण आहेत?


Image result for guo wen gui


सध्या चीनच्या समाजजीवनामध्ये दोन नाट्याविष्कारांनी प्रचंड खळबळ माजवली आहे. "In the Name of People" ही एक टीव्ही सीरियल दाखवली जात आहे. तिला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सुष्ट आणि दुष्ट यांच्यामधला झगडा दाखवणारी ही सिरियल कम्युनिस्ट पक्षाने सरकारी कामाच्या पार्श्वभूमीवरती बनवून घेतली आहे. सिरियलच्या एका भागामध्ये एक भ्रष्ट सुरक्षा अधिकारी दाखवला आहे. त्याचे एका खाजगी कंपनीशी साटेलोटे आहे. आपल्या मार्गामध्ये येणार्‍या एका इसमाला कायमचे शांत करण्याच्या खुनाच्या कार्स्थानामध्ये तो सहभागी होतो. हा गुन्हा उघडकीला येऊ नये म्हणून गुन्ह्याची चौकशी करणार्‍या तुकडीच्या प्रमुखालाही मारायचा कट तो करतो. ह्यात त्या प्रमुखाला तो एका ट्रॅफिक अपघातात मेला असे दाखवायचे ठरते. अखेर हा भ्रष्ट अधिकारी पकडला जातो असे सिरियलमध्ये दाखवले गेले आहे. 

दुसर्‍या एका भागामध्ये एक सामान्य अधिकारी दाखवला आहे. हा देखील भ्रष्टच असतो. आपल्याकडच्या चलनी नोटा तो एका गुप्त खोलीमधल्या फ्रीजमध्ये लपवून ठेवतो. पकडला गेल्यावरती त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते. तो म्हणतो मी पैसे खाल्ले खरे पण ते खर्च करण्याची माझी हिंमत झाली नाही. अशा तर्‍हेने जसे कुटील डाव रचणारे भ्रष्ट अधिकारी / पक्ष सदस्य आहेत तसेच काही निरुपद्रवी पण वाहवत गेलेले सदस्यही ह्या मोहामध्ये कसे फसतात अशी उदाहरणे समोर आणली जात आहेत. आणखी एका भागामध्ये पार्टीच्या वरिष्ठ सभासदाचा मुलगा हॉन्गकॉन्गच्या थ्री सीझन्स हॉटेलमध्ये आपल्या सहकार्‍यांच्या सोबतीने काही गुन्हे करण्याचे कारस्थान रचतो. वैशिष्ट्य असे की सर्व भागांमध्ये दाखवले जाणारे कथानक कुठे ना कुठे प्रत्यक्षात घडणार्‍या बातम्यांशी जुळते मिळते असते. 

ऑक्टोबर २०१७ मध्ये १९ व्या कॉंग्रेसची सभा व्हायची आहे. ह्यामध्ये शी जिन पिंग ह्यांना स्वतःला योग्य वाटतात असे उमेदवार सीपीसी आणि सीएमसी मध्ये घ्यायचे आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार भ्रष्टाचारविरोधी मोहिम चालवली आहे. तिच्या सापळ्यामध्ये त्यांचे विरोधक अडकवले जात आहेत असे आरोपही होत आहेत. सिरियलच्या योगे आपल्या भूमिकेमागे प्रत्यक्षात किती लोकमत आहे ह्याचा अंदाज बांधण्याचे प्रयत्न चालू असावेत. आपल्या जीवनामधील समस्यांवरती मोकळेपणे बोलण्याची चिनी जनतेला मुभा नाही. पण टीव्ही सिरियलच्या भागांवरती ते मोकळेपणाने बोलू शकतात. त्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवण्यास ह्या सिरियलला अजिबात त्रास झाला नाही. आणि चीनच्या सामाजिक वर्तुळात सर्वत्र त्याचीच चर्चा होताना दिसते आहे.

हा झाला एका नाट्याचा वृत्तांत. दुसरा नाट्याविष्कार मात्र खर्‍या जीवनामधला आहे. वरती थ्री सीझन्स मधील हॉटेलमध्ये घडलेला जो भाग दाखवण्यात आला त्याचे साम्य गुओ बेन गुई ह्या सुप्रसिद्ध उद्योगपतीशी दिसते. गुओ वेन गुई हे चीनमधले खर्‍याखुर्‍या जीवनामधले बांधकाम व्यावसायिक. २००८ मध्ये बीजींग येथे जे ऑलिम्पिक्स भरवण्यामध्ये आले तेव्हा त्यांनी काही इमारती बांधल्या होत्या. त्याचे अन्य व्यवसायही ह्याचा पार्श्वभूमीवरती उदयाला आले. खर्‍या जीवनामध्ये हॉन्गकॉन्गच्या फ़ोर सीझन्स हॉटेलमधून चीनचे दुसरे उद्योगपती श्याओ संशयास्पद रीत्या बेपत्ता झाले. श्याओ ह्यांचे गुओ ह्यांच्यासोबत काही उद्योगांमध्ये व्यवहार होत होते. २०१५ मध्ये चीनमधील काई शीन ह्या माध्यमगटाचे प्रमुख हु शुली ह्यांनी गुओ ह्यांच्या उचापतींवरती एक खळबळजनक लेख प्रसिद्ध केला. पेकिंग विद्यापीठाशी संबंधित एका कंपनीद्वारे भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीला आल्यानंतर २०१५ मध्ये गुओ गुप्तरीत्या चीनमधून गायब झाले. ते आता न्यू यॉर्क शहराच्या उच्चभ्रू मॅनहाटन विभागातील शेरी नेदरलंड अपार्टमेंट मध्ये आठ कोटी  डॉलर्स किमतीचे घर घेऊन तिथून आपली मोहिम चालवतात. अमेरिका युरोप अशा फेर्‍या मारणारे गुओ हे काही लोकशाहीचा आग्रह धरणारे चळवळे नाहीत. पण त्यांना चिनी समाजजीवन सोडून परदेशात आसरा घ्यावा लागला ह्याची चीड म्हणून ते तिथून चीनच्या भ्रष्ट यंत्रणेवरती होड उठवत असतात. गुओ हे शी जिन पिंग ह्यांचे विरोधक नव्हेत पण शी ह्यांची भ्रष्टाचारविरोधी मोहिम मात्र केवळ राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापरली जात आहे हे ते सतत ओरडून सांगत असतात. २०१७ मध्ये त्यांनी आपले म्हणणे ट्वीटर द्वारा प्रकाशित करण्यास सुरुवात केली. सेन्सॉरशिप असतानाही त्यांचे ट्वीटस् चिनी जनतेपर्यंत पोचतात. गुओ ह्यांनी वांग कि शांग ह्यांच्यावर केलेली टीका चांगलीच गाजली. वांग हे चीनच्या पॉलिट ब्यूरोच्या स्टंडिंग कमिटीचे सभासद आहेत. पार्टीच्या सेंट्रल कमिशन फ़ॉर डिसिप्लिन इन्स्पेक्शनचे प्रमुख ह्या नात्याने भ्रष्टाचार विरोधी मिहिमेमध्ये ठळक भूमिका बजावतत. साहजिकच ते शी जिन पिंग यांचे जवळचे सहकारी मानले जातात. शी ह्यांच्या कमिटीमधले अनेक सदस्य सत्तरीच्या आसपास आहेत आणि नियमाप्रमाणे ते निवृत्त व्हायला हवेत. पण शी ह्यांना वांग हवे आहेत. त्यांच्या पत्नीचे आणि हाई नान एयरलाईन्सचे जवळचे संबंध आहेत ह्यावर गुओ ह्यांनी लिहिले. इतकेच नव्हे तर डॉईश बॅंकेचे आणि HNA ह्या चिनी कंपनी ग्रुपचे कुठे वाजते आहे ह्याचीही त्यांनी माहिती दिली. शी ह्यांच्यानंतर त्यांच्या पदावरती जातील अशा सुन झेंगकै ह्यांच्याबद्दल गुओ ह्यांनी चांगले उद् गार काढले. ह्यानंतर झेंगकै ह्यांच्यावरती भ्रष्टाचार विरोधातील कारवाईचा बडगा उचलण्यात आला. 

लिंग जि हुआ ह्यांची कथा ऐकल्याशिवाय गुओ काय करून राहिलेत हे पुरे होणार नाही. हु जिन ताओ ह्यांचे विश्वासू सहकारी म्हणून लिंग जि हुआ ओळखले जात. त्यांचा पुत्र बीजींग मध्ये फ़ेरारीमधून प्रवास करत असताना मारला गेला. हे प्रकरण दाबायचा लिंग ह्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे राजकीय भविष्य गोत्यात आले. ह्या मृत्यूमागचे खरे रहस्य मला माहिती आहे असे गुओ म्हणतात. त्यांचे मा जि आन ह्या स्टेट सिक्यूरिटीच्या उपप्रमुखाशी चांगले संबंध होते. माजिआन ह्यांचे सिक्यूरिटी मंत्री झाउ यॉन्गकान्ग ह्यांच्याशी चांगले संबंध होते. गुओ ह्यांच्या संदर्भात आता लिंग - माजिआन आणि झाउ ह्या सर्वांवरती भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत आणि त्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. 

सिरियलच्या भागांमध्ये गुओ ह्यांच्यासरखी जी व्यक्ती दाखवण्यात आली आहे ती म्हणजे एक कळसूत्री बाहुले आहे आणि तिच्या दोर्‍या कोणीतरी खेचत आहे असे दाखवले होते. शेवटी सूत्रे खेचणारी ही व्यक्ती मृत्यू पावते असेही दाखवले गेले आहे. प्रत्यक्ष जीवनामध्ये गुओ ह्यांच्या भडिमाराने जेरीस आलेल्या शी ह्यांच्या सरकारने त्यांच्या विरोधामध्ये उघड उघड प्रचार मोहिम चालवली आहे. सरकारी माध्यमे गुओ ह्यांच्या मागे लागली आहेत. गुओ म्हणजे "one of China's most-wanted fugitives" असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. चीनमधून पलायन करून बाहेरच्या देशामध्ये वास्तव्यास गेलेले गुओ हे पहिले उद्योगपती आहेत. श्रीमंतीच्या बाबतीत त्यांचा नंबर ७० च्या पुढचा होता. हे गुओ व्हॉईस ऑफ अमेरिका ह्या चॅनेलला मुलाखत देत होते तेव्हा त्यांच्या मुलाखतीचे प्रक्षेपण अर्धवट थांबवण्यात आले. चीनकडून आलेला एक फोन असे त्याचे कारण सांगितले जाते. गुओ ह्यांचे नाव इंटरपोलला देण्यात आले आहे आणि इंटरपोलने गुओ ह्यांच्या नावे रेड कॉर्नर नोटिस काढली आहे. सध्याचे इंटरपोलचे प्रमुख हे पूर्वाश्रमी चीनचे पब्लिक सिक्यूरिटी खात्याचे उपमंत्री होते. 

फ्लॉरिडामधल्या "मार अ लागो" ह्या सुप्रसिद्ध रिझॉर्टचे गुओ हे सभासद आहेत. लंडनच्या मे फेयर मधील मार्क्स ह्या उच्चभ्रू क्लबचे सभासद आहेत. "मार अ लागो" हा रिझॉर्ट डॉनल्ड ट्रम्प ह्यांच्या मालकीचा आहे. आणि विश्रांतीसाठी ते तिथे अनेकदा जातात. 

सुन झेंग कै ह्यांना पदावरून खाली ओढण्यामागे वांग कि शान ह्यांचा मोठा हातभार लागला आहे. त्यांच्या जागी आलेले चेन मिन अर आता चॉंगकिंग ह्या महत्वाच्या शहराचे प्रमुख शी ह्यांच्या पसंतीचे आहेत. हे तर स्पष्ट आहे की चीनमधील राजकारण वांग कि शान ह्यांच्याशी निगडित राहणार आहे. त्यांच्या वयाची अडचण शी यशस्वीपणे डावलून त्यांना पुढच्या कमिटीमध्ये आणू शकतील का हा कळीचा प्रश्न आहे.

गुओ ह्यांच्या ह्या सत्यकथेवरून चीनमध्ये कशी खळबळ आहे ह्याची आपल्याला कल्पना येते. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा बडगा दाखवून आपल्याला कधीही दूर केले जाऊ शकते असे वाटणारे गट अर्थातच शी ह्यांच्याही विरोधात एकवटू शकतात. भ्रष्टाचाराची नाळ ज्यांच्याशी बांधली गेली आहे त्या सैन्याची प्रतिक्रिया ह्या सर्वावरती काय असेल ह्याची कल्पना करा. शी ह्यांना नको असतानाही दोका ला मध्ये सैन्य घुसू शकेल का ह्याची शंका येणे स्वाभाविक नाही का? असे असेलच असे नाही पण नसेलच असेही आपण आज तरी म्हणू शकू का? 

No comments:

Post a Comment